मेकॉले आणि शिक्षणपद्धती

(पुढील लेखन इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही पुस्तकांवरून आणि अन्य सामुग्रीचा वापर करून लिहिण्यात आलेले आहे. संकेतस्थळांचा उल्लेख तळाशी क्रमवारीने दिला आहे आणि ते संदर्भ क्र.१, क्र.२ अशा प्रकारे दिलेले आहेत. हे लेखन पूर्वी 'भाषा आणि जीवन'मध्ये मी लिहिलेल्या एका लेखाचा काही आणि थोडा संपादित भाग आहे.)

'Macaulay's Minute' ही गोष्ट आपल्या सर्वांच्या साधारण माहितीची आहे. १८३४ त मेकॉलेने एक टिपण लिहिले ज्याचे ह्या देशाच्या शिक्षणपद्धतीवर आणि पर्यायाने देशावर देशावर फार खोलवर आणि चिरस्थायी परिणाम झाले. पण त्याची पूर्वपीठिका आणि पार्श्वभूमि काय होती ह्याबद्दल फारशी महिती नसते, ती देणे हा ह्या लेखनामागील मर्यादित हेतु आहे. (मेकॉले ह्या नावाचा खरा इंग्रजी उच्चार 'मकॉलि' असा काहीसा आहे पण मराठी वाचकांना मेकॉले हा उच्चार अधिक परिचित असल्याने तोच येथे वापरला आहे.)

१८३४ सालचा हिंदुस्तान. दुसऱ्या बाजीरावाला बिठूरास पेन्शनवर पाठवल्यानंतर ब्रिटिश सत्ता हिंदुस्तानात सुस्थापित झाल्यासारखी दिसत होती. पुष्कळ भागात प्रत्यक्ष सत्ता आणि उर्वरित भागात ताटाखालची मांजरे बनलेले राजे-महाराजे आणि नवाब! ह्यामुळे एक उद्धट आत्मविश्वास सत्ताधारी वर्गामध्ये निर्माण झाला होता. युरोपीय (विशेषकरून ब्रिटिश) संस्कृति, ज्ञान, समाज आणि वंश (तेव्हाचा शब्द, आजचा नव्हे) हे हिन्दुस्तानी संस्कृति, ज्ञान, समाज आणि वंश ह्यांपेक्षा गुणतः श्रेष्ठ आहेत अशी भावना सत्ताधारी वर्गामध्ये दृढमूल होऊ लागली होती.

मेकॉले म्हणजे थॉमस बॅबिंग्टन मेकॉले (१८०० - ५९). १८३२ ते १८३३ अखेर लंडनमधून ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यावर देखरेख करणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोलचा सेक्रेटरी, तदनंतर १८३४ ते १८३७ अखेर ह्या काळात कलकत्त्यात गवर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये लॉ मेंबर अशी साधारण ६ वर्षे त्याचा हिंदुस्थानच्या कारभाराशी प्रत्यक्ष संबंध होता. इंडियन पीनल कोड तयार करणे हे महत्त्वाचे काम त्याने ह्या काळातच पार पाडले. ह्याखेरीज कमिटी ऑफ पब्लिक एज्युकेशनचा अध्यक्ष म्हणून त्याने जी विस्तृत टिप्पणी लिहिली तिला 'Macaulay's Minute' असे नाव मिळाले.

त्या टिप्पणीचा परिणाम म्हणजे हिंदुस्थानातली शिक्षणाची पद्धत मुळापासून बदलली आणि शिक्षणाला एक नवी दिशा प्राप्त झाली. आज आपणाला दिसतो तो भारत देश तिच्यातून निर्माण झाला आहे. हिन्दुस्तानी प्रजेला कशा प्रकारचे शिक्षण ह्यापूढे अधिक योग्य आहे ह्या मुद्द्यावरून कमिटीच्या दहा सदस्यांमध्ये ५-५ अशी विभागणी झाली होती. ५ सदस्यांच्या मते सरकारने तोवर चालत आलेले सरकारी शैक्षणिक धोरणच पुढे चालवावे ज्या योगे सरकार जुन्या पद्धतीच्या संस्कृत, अरेबिक आणि पर्शियनच्या अभ्यासावर भर देणारे धोरणच चालू ठेवील. उर्वरित ५ सदस्य इंग्रजी भाषा आणि आधुनिक ज्ञान देणाऱ्या नव्या पद्धतीचा आग्रह धरत होते. (ह्या दोन विचारांना पुढील लेखनात अनुक्रमे पौर्वात्य आणि पाश्चात्य असे संक्षेपाने संबोधले आहे.) कमिटीचा अध्यक्ष म्हणून मेकॉलेने जे भारदस्त टिपण (minute) लिहिले त्यामुळे पारडे पाश्चात्य पक्षाच्या बाजूस झुकले आणि तेव्हापासून इंग्रजी भाषेची चलती हिंदुस्थानात सुरू झाली. मेकॉलेचे मूळ पूर्ण टिपण केव्हाच गहाळ झाले आहे असे दिसते पण त्याचा पुष्कळसा भाग तळटीप ४ मध्ये उपलब्ध आहे. टिपण संक्षेपाने पाहायचे असेल तर ३:४०९ वाचा. (टिपणातील काही विधाने आज भारतीयांना रुचणारी नाहीत पण ती तत्कालीन पूर्वग्रह आणि समजुतींची द्योतक असल्याने मेकॉलेला आज त्यांवरून झोडपण्यात काहीच तथ्य नाही. त्यावर प्रस्तुत लिखाणामध्ये कोणतेहि मत व्यक्त करण्यात येत नाही हे मी विशेषेकरून उल्लेखीत आहे.)

ह्या वादातील पराभूत पौर्वात्य पक्षाचा प्रमुख म्हणजे हेन्री थॉबी प्रिन्सेप ( १७९२ - १८७८ ) आणि ब्राह्मी लिपीचा संशोधक जेम्स प्रिन्सेपचा थोरला भाऊ. हाही कलकत्त्यातील उच्चपदस्थांपैकी एक होता. गवर्नर जनरल विल्यम बेंटिंकचा अंतिम निर्णय त्याच्या पौर्वात्य पक्षाच्या विरोधात गेल्यामुळे कमिटीच्या सदस्यत्वाचा त्याने राजीनामा दिला.

शिक्षणधोरणविषयक हा वाद सरकारी पातळीवर केला जाण्याचे कारण म्हणजे हा वाद १८१३ सालच्या चार्टर कायदा आणि काही सरकारी पैसा एतद्देशीय प्रजेच्या शिक्षणासाठी वापरण्याची त्या कायद्यात करण्यात आलेली तरतूद. ही रक्कम 'learned natives of India' ह्यांच्या उत्तेजनासाठी वापरायची होती. 'learned natives of India' म्हणजे नक्की कोण ह्यावरचा वाद कलकत्त्यामध्ये कमिटी ऑफ पब्लिक एज्युकेशनपुढे विचारार्थ आला. हा मुद्दा कायद्याच्या शब्दांचा काय अर्थ लावावा असा होता. सदस्यांमध्ये पौर्वात्य आणि पाश्चात्य अशी ५-५ दुभागणी झाल्यामुळे मामला अध्यक्ष ह्या नात्याने मेकॉलेपुढे विचारासाठी आला. त्यावर तो म्हणतो: (क्र.४)

'... सार्वजनिक शिक्षण कमिटीच्या काही सदस्यांच्या मते आजतागायत चालत आलेली पद्धति हीच काय ती ब्रिटिश संसदेने १८१३ मध्ये पुरस्कृत केलेली पद्धति आहे...
मला नाही असे वाटत की संसदेने केलेल्या कायद्याचा कशाहि मार्गाने अर्थ लावला तरी त्यामधून सध्या लावलेला अर्थ काढता येईल. अमुकच भाषा किंवा अमुकच शास्त्र असे काहीहि कायद्यात उल्लेखिलेले नाही. 'वाङ्मयाचे पुनरुज्जीवन आणि विकास आणि सुशिक्षित एतद्देशीयांना उत्तेजन अशा हेतूने, आणि ब्रिटिश सत्तेखालच्या भागातील रहिवाशांमध्ये शास्त्रीय ज्ञानाचा प्रवेश आणि विकास व्हावा अशा हेतूने' काहीएक रक्कम बाजूस काढून ठेवण्यात आली आहे. ह्यावरून असे मांडण्यात येत आहे किंवा असे गृहीत धरून चालण्यात येत आहे की संसदेच्या मते वाङ्मय म्हणजे केवळ अरेबिक वा संस्कृत वाङ्मय. मिल्टनची कविता, लॉकचे तत्त्वज्ञान वा न्यूटनचे पदार्थविज्ञान ह्यांच्याशी परिचय असणाऱ्या एतद्देशीयाला जणू 'सुशिक्षित एतद्देशीय' ही उपाधि संसदेने लावलीच नसती. कुश दर्भाचे उपयोग आणि परमेश्वरात विलीन होण्याचे रहस्य हिंदूंच्या पवित्र ग्रंथातून शिकलेल्यांनाच जणू ही उपाधि लागावी. हा अर्थ समाधानकारक आहे असे मला वाटत नाही.' ( टिपणाच्या ज्या भागाचा हा अनुवाद आहे तो भाग क्र. ५ मध्ये बघावा.)

असे लिहिण्यामागचा आपला हेतूहि तो स्पष्ट करतो. तो भाग क्र. ६ येथे बघावा.

अशा रीतीने चार्टर कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रसंग पडल्याने आणि learned natives of India ह्या शब्दांचा अर्थ 'युरोपीय ज्ञान घेतलेले' असा प्रस्थापित झाल्याने जुन्या पद्धतीच्या शिक्षणावर खर्च केला जाणार सरकारी पैसा थांबवून त्याच्या जागी नव्या पद्धतीचे शिक्षण देण्यात यावे हा निर्णय सरकारी पातळीवरून करण्यात आला. हा निर्णय जरी हिंदुस्थानी प्रजेच्या भविष्यावर कायमचा परिणाम करणारा होता तरी तो घेतला गेला कलकत्तेकर इंग्रजांच्या छोटया उच्च वर्तुळात. आपल्या आणि आपल्या देशाच्या भवितव्यावर मूलभूत परिणाम करणारा असा काही निर्णय घेतला जात आहे ह्याची हिंदुस्थानी प्रजेला ना जाणीव होती ना काळजी. ह्या वर्तुळातल्या मंडळींनी आपल्याआपल्या ओळखींमधून काही शास्त्रीपंडित, काही काझीमौलवी आणि राममोहन रॉयसारख्या सुधारकांबरोबर वैयक्तिक सल्लामसलत केलीहि असेल पण त्याची कोठेहि नोंद नाही. प्राथमिक शाळेतील पाठयपुस्तकात एखादा मजकूर घालायचा असेल किंवा एखादे चित्र काढायचे असेल त्यासाठी उभयपक्षातील समर्थक रस्त्यावर येतात हे आजचे एक टोक आणि संपूर्ण हिंदुस्तानभर शिक्षण कसे असावे हा निर्णय काही टाळकी एकत्र जमून घेतात आणि गवर्नर जनरल आपल्या लेखणीच्या एका फटकार्‍याने त्याची अंमलबजावणी सुरू करतो हे दुसरे टोक ह्यांमधील विरोध लक्षणीय आहे.

हा संपूर्ण वाद क्र.१ येथे दर्शविलेल्या जागी वाचावयास उपलब्ध आहे. तेथील पल्लेदार इंग्रजीतील लांबलचक टिपणे वाचायची नसतील तर त्यांचा उत्तम सारांश क्र. २ मध्ये प्रोफेसर आणि शब्दकोषकार मोनियर विल्यम्स ह्यांनी लिहिला आहे. ( ह्या वेळेपर्यंत त्यांचे आडनाव विल्यम्स एवढेच होते. पुढे १८८६ साली त्यांना KCIE ही पदवी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या आडनावात ' मोनियर' हा शब्द जोडला आणि ते मोनियर मोनियर-विल्यम्स अशा double-barelled आडनावाने ओळखू जाऊ लागले.) (क्र.७)

शिक्षणपद्धति प्रमाणेच लिपीबदल करून सर्व हिन्दुस्तानी भाषांना रोमन लिपि लागू करावी अशा आग्रहाचेहि काही लोक होते आणि तो वादहि कलकत्तेकरांच्या छोटया वर्तुळात हिरीरीने लढवला गेला होता. त्याबद्दल अन्य केव्हातरी.

संदर्भः

१. The application of the roman alphabet to all the Oriental languages ... सेरामपूर प्रेस, १८३४. (http://tinyurl.com/yyt2x4q)

२. Original papers illustrating the history of the application of the Roman Alphabet to the Languages of India, संपादक मोनियर विल्यम्स, १८५९. (http://tinyurl.com/y2s5a6b)

३. The Life and Letters of Lord Macaulay Vol 1, जॉर्ज ओटो ट्रेवेल्यन, १८८०. http://tinyurl.com/y2zbqbq

४. http://www.languageinindia.com/april2003/macaulay.html

५. '...the opinion of some of the gentlemen who compose the Committee of Public Instruction, that the course which they have hitherto pursued was strictly prescribed by the British Parliament in 1813,...

It does not appear to me that the Act of Parliament can, by any art of construction, be made to bear the meaning which has been assigned to it. It contains nothing about the particular languages or sciences which are to be studied. A sum is set apart 'for the revival and promotion of literature and the encouragement of the learned natives of India, and for the introduction and promotion of a knolwdge of the sciences among the inhabitants of the British territories.' It is argued, or rather taken for granted, that by literature, the Parliament can have meant only Arabic and Sanscrit literature, that they never would have given the honorable appellation of 'a learned native' to a native who was familiar with the poetry of Milton, the Metaphysics of Locke, and the Physics of Newton; but that they meant to designate by that name only such persons as might have studied in the sacred books of the Hindoos all the uses of cusa-grass, and all the mysteries of absorption into the Deity. This does not appear to be a very satisfactory interpretation.'

६. '... it is impossible for us, with our limited means, to attempt to educate the body of the people. We must at present do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern; a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect. To that class we may leave it to refine the vernacular dialects of the country, to enrich those dialects with terms of science borrow2ed from the Western nomenclature, and to render them by degrees fit vehicles for conveying knowledge to the great mass of the population.'
(http://www.languageinindia.com/april2003/macaulay.html)

७. http://www.shikshapatri.org.uk/~imagedb/content.php/monier

लेखनविषय: दुवे:

Comments

मेकॉले आणि शिक्षणपद्धति

वरील लेखाचे 'प्रयत्न' असे शीर्षक चुकीने पडलेले आहे. त्याजागी 'मेकॉले आणि शिक्षणपद्धति' असे शीर्षक वाचावे.

अरविंद कोल्हटकर, ऑगस्ट १२, २०११.

आता शीर्षकात बदल केला आहे. - संपादन मंडळ.

चांगली माहिती

चांगली माहिती आहे.

नितिन थत्ते

टाळकी ?

इतक्या चांगल्या माहितीमध्ये श्री.कोल्हटकरांच्या "संपूर्ण हिंदुस्तानभर शिक्षण कसे असावे हा निर्णय काही टाळकी एकत्र जमून घेतात आणि गवर्नर जनरल आपल्या लेखणीच्या एका फटकार्‍याने त्याची अंमलबजावणी सुरू करतो हे दुसरे टोक ह्यांमधील विरोध लक्षणीय आहे" या वाक्याचे प्रयोजन समजले नाही. लॉर्ड मेकॉले याने अंमलात आणलेल्या एतद्देशियांसाठी नवीन शिक्षण पद्धती [विशेषतः बहुजनांना इंग्रजी आणि विज्ञान यांची महती जाणवून देणारी] ही कशी 'चुकीची' होती असा एक प्रकारचा औपराधिक सूर या वाक्यातून ध्वनीत होतो. गव्हर्नर जनरलच्या लॉ कौन्सिलमधील एक ज्येष्ठ पदाधिकारी या नात्याने हिंदुस्थानातील प्रजेसाठी सार्वजनिक पातळीवरील शिक्षणपद्धती कशी असावी यावर त्याची चेअरमन म्हणून झालेली नियुक्ती हे त्याच्याकडे त्या क्षेत्रातील असलेल्या क्षमतेमुळेच असे म्हणणे जर भाग असेल तर त्याच्या अध्यक्षतेखाली विधिवत स्थापन झालेली कमिटी आणि तिचे सदस्य यांचा दर्जा "टाळकी" म्हणण्यासारखा कसा असू शकेल ? समजा त्या कमिटीत राजा राममोहन रॉय सदृश्य एतद्देशीय असते तरच मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीच्या सूचना स्वीकारण्यायोग्य म्हणता आल्या असत्या का ?

सार्वत्रिक शिक्षणाबाबत घटनेच्या ४ थ्या प्रकरणातील ४५ व्या कलमात, "राज्य हे घटनेच्या अंमलापासून १० वर्षाच्या आत सर्व बालकांना वयाची १४ वर्षे पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे सार्वत्रिक मूलभूत जीवनशिक्षण (युनिव्हर्सल एलिमेन्टरी एज्युकेशन] देण्याची व्यवस्था करील." असे 'प्रॉमिस' करण्यात आले होते. पण आज स्वातंत्र्याची 'साठी' ओलांडून गेली असतानाही चौदा वर्षे वयापर्यंतच्या मुलाना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देता येत नसल्याने सार्वत्रिक शिक्षणाचा प्रश्न आमचे राज्यकर्ते सोडवू शकलेले नाहीत तसेच ज्या पातळीवर शिक्षण गेलेले आहे तेथील गळतीच्या प्रश्नाकडेही गांभिर्याने लक्ष दिले जात नाही. अशी निर्णयाबाबत शोचनीय स्थिती असेल तर मग जी काही सध्याची शिक्षणपद्धती आहे ती आणि त्यातील उपक्रम प्रचलित मॅकॉलेप्रणित शिक्षण व्यवस्थेच्या चाकोरीतच फिरत राहतील हे उघडच आहे.

....आणि ज्या अर्थी ती अजूनही शाबूत, धडधाकट असेल तर मग तशी ती इथे प्रदान करणार्‍यांना 'टाळकी' म्हणून हिणविण्यात काहीतरी चुकते असे वाटते.

अशोक पाटील

आक्शेप मान्य करण्याजोगा आहे.

'टाळकी' ह्या शब्दातून जो अर्थ व्यक्त होत आहे, त्यास जो आक्शेप घेण्यात आलेला आहे ते मान्य करण्याजोगे आहे.

असो! जे झाले ते झाले. अब रोनेसे क्या फायदा? पण समजा, हिन्दुस्तानी प्रजेला कशा प्रकारचे शिक्षण ह्यापूढे अधिक योग्य आहे? ह्या मुद्द्यावरून त्या गठीत कमिटीच्या सदस्यांमध्ये जी विभागणी झाली होती त्यातील (पराभूत झालेल्या) पौर्वात्य पक्षाचा ह्या कमिटीवरील निर्णयांवर वरचश्मा असता तर, भारतातील आजच्या शिक्शणपद्धतीवर काय, कोणता व किती परीणाम झाला असता?

मग आपण आजच्या काळात, केवळ ज्यांनी ती शिक्शणपद्धत आणली ते पाश्चात्य होते त्या पौर्वात्य विचारांच्या मंडळींचा देखील 'ती मोजकी टाळकी' असा उल्लेख केला असता कां?

गरज असेल तरच...

माहितीपूर्ण लेख! दिलेले दुवे अद्याप पाहिले नाहीत पण वेळ काढून वाचेनच. याच लेखाबरोबर लोकसत्तेतील ही बातमीही नजरेस पडली.

गरज असेल तरच मराठीत बोलण्याचे फर्मान

वर्तमानपत्रातील मराठीचा दर्जा

"गरज असेल तरच मराठीत बोलण्याचे फर्मान"

~ वार्तांकनातील वरील वाक्यरचना म्हणजे खास वृत्तपत्रीय उथळ लेखनाचे उदाहरण होय. वृत्तांत लिहिणार्‍या रेश्मा शिवडेकर यांची 'पत्रकार' म्हणून जी काही कारकिर्द असो, पण त्याना मराठीतील शब्दांचा सूक्ष्म भेद माहीत हेच वरील वाक्य प्रकट करते. 'फर्मान' या शब्दाचा इंग्रजीमध्ये अर्थ आहे 'ऑर्डर'. उदा. शाही फर्मान; ज्याला प्रत्युत्तर देता येत नाही. त्या आदेशातील हुकूमाची तात्काळ अंमलबजावणी करणे. पण शाळा असो वा महाविद्यालयीन वा विद्यापीठ पातळी असो, कुलगुरू प्राचार्य अथवा संस्थाचालक स्टाफसाठी असे कोणतेच 'फर्मान' काढीत नसतात. स्टाफला कोणत्याही प्रकारची नोटीस द्यायची असेल तर त्याचा जो मसुदा तयार केला जातो त्याला एकतर 'निवेदन' वा 'सूचना' असे शीर्ष दिलेले असते.

"रोजच्या शिकवणीत इंग्रजीचा प्रामुख्याने वापर करावा आणि आवश्यकता भासली तरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी मराठीत बोलावे अशी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना सूचना देण्यात येत आहे....प्राचार्य" अशा स्वरूपाचेच ते निवेदन असणार. म्हणजे 'फर्माना' ची तीव्रता त्यामध्ये येत नसून एकप्रकारची शैक्षणिक लवचिकता शब्दमांडणीत प्रकटते. शिक्षक/प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांशी कोणत्या भाषेत वर्गात वा वर्गाबाहेर संवाद साधत असतात याबाबत महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची यंत्रणा असणे शक्य नाही [कुणी अपेक्षाही ठेवीत नाही], त्यामुळे फक्त 'निवेदन' प्रसृत करूनच काम भागविले जाते.

मराठीचा र्‍हास होत चालला असल्याचा हाकारा वर्तमानपत्रातून या ना त्या माध्यमाद्वारे नेहमीच उठविला जातो, पण तिथे लेखन करणार्‍या पत्रकारांनी केलेले लेखन कोणत्या दर्जाचे आहे हे पाहण्याची जबाबदारी नेमकी कुणाकडे असते हाही एक संशोधनाचा विषय ठरावा. परवाच मुंबईच्याच दोन वर्तमानपत्रामध्ये अमेरिकेत झालेल्या सोनिया गांधींच्या ऑपरेशनबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती आणि त्यातील एक वाक्य "कार्यकारिणीने सोनिया गांधी यांच्या पश्चात राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली आहेत." काय अर्थ होतो 'पश्चात' चा ? पण ना वार्ताहराला ना उपसंपादकाला त्याची फिकीर.

अशोक पाटील

मेकॉलेची शिक्षणपद्धती

एक माहितीपूर्ण लेख वाचायला मिळाला. दिलेल्या संदर्भांमुळे अधिक वाचनही करता आले. धन्यवाद. नेट वर शोधून मेकॉलेचे मिनिटस ही मिळाले.

इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीवर काही आक्षेप मी पूर्वी ऐकले होते. त्यात दुय्यम नोकरदारांना (श्रेणी २-३-४) घडवणारी हा एक आक्षेप होता. ब्रिटीशांनी भारताचा विकृत इतिहास तयार केला आणि शिकवला. हे ऐकले होते. या आक्षेपांच्या बाजूने फारसा पुरावा मिळाला नव्हता. मूळ अरेबिक आणि संस्कृतातून् शिक्षण (आणि शिक्षणपद्धतीतूनही) घेण्याच्या प्रथेशी फारकत घेऊन इंग्रजी शिक्षण पद्धती मेकॉलेच्या काळात आली.

ही पद्धत येताना इतक्या हलक्या पावलाने आली असणार (पहिल्यांदा मॅट्रिक होणार्‍यांची संख्या अत्यल्प होती.). त्यामुळे देशांतर्गत त्यावर जोरकस प्रतिक्रिया उठणे कठीण असणार. त्यामुळे लेखात नमूद केलेला विरोध मला जाणवला नाही.

मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीत मूळ अरेबिक आणि संस्कृत माध्यम/पद्धतीस नाकारले होते. पण त्याच बरोबर जनभाषांना नाकारले नव्हते असे मला वाटते. मुंबई विद्यापीठाच्या १५० वर्षसोहळ्याच्या वेळी त्यावेळी प्रसिद्ध केलेली मराठीतील इंजिनियरिंग, विज्ञान विषयावरची पुस्तके प्रदर्शनात ठेवली होती. (हल्ली देखिल अशी पुस्तके मराठीत मिळत नाहीत.) या शिक्षण पद्धतीने ही जनभाषांनी दिलेली उत्तेजना समजायला हरकत नाही.

मराठी पुरते बोलायचे झाले तर मोल्सवर्थचा शब्दकोश आजही बघण्याजोगा आहे. एकदा मला त्याची छायाप्रत पहायला मिळाली होती. त्यातील अक्षरे (मराठीतली) अतिशय भिन्न होती. सहज वाचण्याजोगी नव्हती. याच दरम्यान मराठी छापखान्यांमुळे मराठी अक्षरांचे प्रमाणीकरण होत गेले.

येथील भाषा रोमन लिपीत आणण्याच्या विचारप्रयोगाबद्दल वाचायला आवडेल.

प्रमोद

शंका

उत्तम, माहितीपर लेख.
माझी शंका कदाचित पूर्णपणे विषयाशी संबंधित नसेल, तरीही विचारतो-

बरेचदा ईमेलमधून एक 'मेकॉलेचे पत्र' येत असते. त्यात त्याने २ फेब्रुवारी १८३५ रोजी ब्रिटिश संसदेला उद्देशून केलेल्या निवेदनाचा काही भाग दिलेला असतो. तो असा-

"I have travelled across lenght & breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such caliber, that I do not think we should ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and, therefore, I prpose that we replace her old and ancient education system, her culture, for if the indians think that all that is foreign and English is good greater than thier own, they will lose their self esteem, their native culture and they will become what we want them, a truly dominated nation"

आणि या पत्रानंतर "बघा, आता तरी सुधारा, इंग्रजीचा नाद सोडा..." वगैरे छापाची तथाकथित देशभक्तीपर आवाहने असतात.

आता हा जो काही मजकूर आहे, हा इतका जास्त उथळ आणि सोयीस्कर आहे, की त्याच्या खरेपणाबद्दल कोणालाही सहज शंका यावी. शिवाय ही भाषाशैली (आणि ते सर्व स्वल्पविराम- त्यातला एकही माझ्या मनाने घातलेला नाही..) अजिबातच पावणेदोनशे वर्ष जुनी आणि ब्रिटिश वाटत नाही.
हे नक्की काय गौडबंगाल आहे? ते पत्र खरंच मेकॉलेचे आहे का?

(मला इथे फोटो डकवता येत नाही. कुणाला सदर पत्र वाचायचे असल्यास गुगल इमेजेसवर जाऊन 'मेकॉलेज लेटर' असा सर्च मारावा, लगेच सापडेल.)

होक्स

ते पत्र नक्कीच होक्स आहे.

पत्र १८३५ मध्ये लिहिले असेल तर "वी शुड एव्हर काँकर धिस कंट्री" कशाला म्हणेल. १८३५ मध्ये ब्रिटिशांनी भारत अगोदरच जिंकला होता.

दुसरी गोष्ट म्हणजे देश जिंकण्याच्या आधी शिक्षणपद्धती बदलण्याचा विचार कोणी करूही शकत नाही.

नितिन थत्ते

खोडसाळपणा

तथाकथित 'मेकॉलेच्या पत्रा'बाबतचा तुमचा तर्क अगदी बरोबर आहे. ही बाब अजूनपर्यंतच्या प्रतिसादांमध्ये कशी आली नाही ह्याचेचे मी आश्चर्य करीत होतो तेव्हढयात तुमचा प्रतिसाद वाचला.

हे पत्र म्हणजे खोडसाळपणाचा उत्तम नमुना आहे कारण एका विशिष्ट विचाराला बळ देण्यासाठी मुद्दाम तयार करण्यात आलेला - manufactured - असा तो पुरावा आहे. ते कसे ते पुढे येईलच.

ब्रिटिश आणि पाश्चात्य लोकांकडून आपण जे जे घेतले ते एकतर वाईट आणि अनावश्यक होते
किंवा ते आपल्याकडे आधीच, वेदांमध्ये वगैरे, होते असे मानणार्‍यांचा एक मोठा गट आहे. ह्या गटाच्या मते पाश्चात्य विद्वानांनी पसृत केलेले अनेक सिद्धान्त, उदाहरणार्थ आर्य लोक आणि त्यांची भाषा आणि संस्कृति हे पश्चिमेकडून पसरत भारतापर्यंत पोहोचले, हे एका साम्राज्यवादी विचारातून निर्माण झालेले आहेत, ज्या विचारानुसार भारतात जे जे चांगले आहे ते ते पश्चिमेकडूनच इकडे आलेले आहे. असे गट मॅक्समुल्लरसारख्या प्राच्यविद्या विद्वानांच्यावर असा आरोप करतात की ते पाश्चात्य जगाच्या श्रेष्ठत्वाच्या गंडाने पछाडलेले होते. पैकी आर्यांचे मूलस्थान ह्या विषयावर बरेच उलटसुलट लिखाण छापील आणि जालावर उपलब्ध आहे आणि जि़ज्ञांसूंनी ते वाचून आपापली मते बनवावीत. मला ते पटत नाही एव्हढेच येथे लिहितो.

ह्याच गटाचे लोक मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीवरहि टीका करतात. ह्या पद्धतीतून बाहेर पडलेल्या सर्वांचा - म्हणजे पर्यायाने आजच्या सर्व सुशिक्षित भारतीयांचा - ते Macaulay's Children असा अधिक्षेपकारक उल्लेख करतात आणि मेकॉलेने जे काही केले ते साम्राज्यविस्ताराच्या हेतूने रचलेले एक पाताळयन्त्र होते असे दाखविण्याचा प्रयत्न करतात. मेकॉलेप्रणीत शिक्षण हे आपले राज्य चालविण्यासाठी कारकून हवेत म्हणूनच निर्माण झाले असे ते म्हणतात.

हा विरोधी विचार स्वतःला पटतो का आणि असे शिक्षण जर आपणास मिळाले नसते तर भारताची आजची परिस्थिति कशी राहिली असती हा विचार ज्याने त्याने स्वतःसाठी करावा. मला स्वतःला असे वाटते की मेकॉले जरी साम्राज्याचा पाईक होता तरी ब्रिटनमधल्या अन्य अनेक विचारवंतांप्रमाणे आपल्या हिन्दुस्तानी प्रजेचे कल्याण करण्याची जबाबदारी आपल्यावर ईश्वराने टाकली आहे असे मानणारा paternalistहि तो होता. एतद्देशीय ज्ञानामध्ये यद्यपि घटपटादि खटपट भरपूर होती तरी दारिद्र्यपीडित प्रजेचे ऐहिक आयुष्य सुखाचे करणारे उपयुक्त ज्ञान त्यामध्ये फारच थोडे होते, असे जे ज्ञान तोपर्यंत रेनेसांस आणि औद्योगिक क्रान्तीच्या योगे युरोपात निर्माण झाले होते ते हिंदुस्तानात आणले पाहिजे आणि त्यासाठी इथल्या भाषा समृद्ध केल्या पाहिजेत असे मानणार्‍या गटाचा तो प्रतिनिधि होता. आणि म्हणूनच इंग्रजी भाषा आणि त्यातील ज्ञान इकडे आणले पाहिजे ह्या त्याच्या टिप्पणीमागचा प्रमुख विचार होता. असे करतांना त्याने जे काही इथल्या मूळच्या ज्ञानाबाबत जे अधिक्षेपकारक उद्गार काढले ते अज्ञानमूलक होते हे खरे आणि आज तेच त्याच्या टीकाकारांच्या हातातील प्रमुख शस्त्र बनले आहे पण त्यांकडे दुर्लक्ष्य करून आपण आज एव्हढाच विचार करावा की त्या आधुनिक शिक्षणाविना आणि ब्रिटिशांनी देशाचे राजकीय एकीकरण, समाजसुधारणेचा विचार, आधुनिक संस्था असे जे काही मागे सोडले त्याशिवाय २०व्या आणि २१व्या शतकात आपण कोठे पोहोचलो असतो. ह्या बाबी जेथे नाहीत अशा आफ्रिका, अरब देश अशा जागांमध्ये अराजक आणि मानवसंहार चालू आहेत. आपली स्थिति तीच झाली असती. ब्रिटिशांनी ह्या देशाला kicking and screaming आधुनिक जगात आपल्या पायावर उभे राहण्याची सामुग्री दिली नसती तर आपल्या समाजधुरीणांनी तत्पूर्वीच्या १००० वर्षात काय कर्तबगारी दाखविली हे आपणांस विदित आहेच.

ह्या थोडया विषयान्तरातून बाहेर पडून पुन: 'मेकॉलेच्या पत्रा'कडे वळू. असे म्हणतात की निर्ढावलेला गुन्हेगारहि कोठेतरी एखादा कच्चा दुवा मागे सोडतोच ज्यावरून त्याचा गुन्हा पकडता येतो. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पत्र आहे.

हे पत्र 'लॉर्ड' मेकॉले ह्यांनी 'ब्रिटिश पार्लमेंटपुढे २ फेब्रुवारी १८३५' ह्या दिवशी केलेले भाषण आहे अशी त्याची प्रस्तावना असते. वस्तुस्थिति अशी आहे की २ फेब्रुवारी १८३५ ह्या दिवशी मेकॉले हा साधा मेकॉलेच होता त्याचा 'लॉर्ड' १८५७ त झाला जेव्हा त्याला बॅरन मेकॉले ऑफ रॉथलि उपाधि प्राप्त झाली. २ फेब्रुवारी १८३५ ह्या दिवशी मेकॉले इंग्लंडमध्ये नव्हता. १० जून १८३४ ह्या दिवशीच तो हिन्दुस्तानात मद्रासला पोहोचला होता आणि तदनंतर ४ वर्षे तो हिंदुस्तानातच होता. (वरील संदर्भांपैकी क्र. ४ ह्या चरित्रातील पृ. ३६९ पाहा.) साहजिकच पार्लमेंटपुढे त्या दिवशी त्याचे भाषण होणे केवळ अशक्य होते. म्हणून मी म्हणतो हा तथाकथित पुरावा खोडसाळ आणि बुद्ध्याच निर्माण केलेला आहे.

ब्रिटिशांनी त्यांचे शिक्षण आपल्या माथी मारण्यापूर्वी येथेच आपली उत्तम शिक्षणपद्धति चालूच होती आणि ती आपणांस पुरेशी होती असेहि मेकॉलेविरोधक बोलत असतात. त्यासाठी धरमपाललिखित 'The Beautiful Tree - Indigenous Indian Education in the Eighteenth Century' ह्या पुस्तकाचा आणि महात्मा गांधींच्या त्या पुस्तकावरच्या भलावणीचा आधार घेतला जातो. (हे पुस्तक येथे विनामूल्य उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.) १९३० च्या पूर्वी धरमपाल ह्या गांधीवादी अभ्यासकांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गोळा केलेल्या काही आकडयांच्या आधारे असे मांडण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्याकडे पाठशाळा, मदरसे, गावांतील दानशूर आणि सुखवस्तु लोकांनी चालविलेल्या पंतोजीप्रकारच्या शाळा ह्या माध्यमातून चालविलेल्या शिक्षणातून प्रजेच्या सर्व गरजा भागत होत्या आणि तीच पद्धति पुढे चालू ठेवण्यात काहीहि वावगे नव्हते. पण ही पद्धति ब्रिटिशांनी मारून टाकली आणि आपली नवी पद्धति प्रजेच्या माथी मारली.

ह्या पुस्तकावर बरेच काही लिहिता येईल पण त्यामूळे पुनः विषयान्तर होईल. एव्हढेच लिहितो की अशा अशास्त्रीय पद्धतीने आणि देशाच्या छोटया भागातून गोळा केलेल्या आकडेवारीवर भर देतांनाच त्याच पुस्तकात दिलेले कलेक्टरांचे अहवालहि वाचावेत, ज्यावरून येथील मूळच्या शिक्षणाच्या दर्जावर दुसरेच मत बनते. येथे ब्रिटिशांच्या पूर्वी शिक्षणक्षेत्रात सर्व काही आलबेल होते, शिक्षण समाजाच्या सर्व जातिजमातींपर्यंत पोहोचत होते आणि सगळे काही
hunky-dory होते असा जो सूर पुस्तकात आहे तो उपलब्ध पुराव्यानुसार बिलकुल पटणारा नाही. हे जर सगळे इतके छान होते तर महात्मा फुले आणि अण्णासाहेब कर्वे ह्यांना चळवळी का कराव्या लागल्या? ह्या सर्वापलीकडे जाऊन हेहि लक्षात घ्यायला पाहिजे की तोच रघु, तोच अमरकोष, तेच अंकगणित आणि मोडी लिखाणाचे शिक्षण यद्यपि फडयावर बसणे इतपतच दूरदृष्टि आणि महत्त्वाकांक्षा असणार्‍या कारकुनाला किंवा गावात सत्यनारायणाच्या पूजा आणि दिवसाचे पंचांग सांगणार्‍या गावजोशाला जरी पुरेसे असले तरी १९-२०व्या शतकातील राष्ट्रबांधणीला ते फारच तोटके होते आणि त्याचा काहीहि उपयोग झाला नसता. तेथे आधुनिक ज्ञानाचीच गरज होती आणि इंग्रजांनी ती, कोणत्याहि कारणासाठी का होईना आणि जबर किंमत वसूल करून का होईना, भागविली आणि त्याचा हिन्दुस्तानी प्रजेला झाला असला तर लाभच झाला. हे सत्य आपण मोकळया मनाने मान्य का करीत नाही हा मला नेहमी प्रश्न पडतो. महात्माजींच्या भलावणीबद्दल एव्हढेच म्हणणे पुरे की ते शिक्षण त्यांच्या डोळयापुढील स्वयंपूर्ण ग्रामाधिष्ठित समाजाला कदाचित पुरले असतेहि पण अशा आनंदी, थोडक्यात समाधानी असणार्‍या रामराज्याला जगातील अन्य दुष्ट लोकांनी तसेच मोकळे राहू दिले असते काय? मृगमीनसज्जनानां तृणजलसन्तोषविहीतवृत्तीनाम्| लुब्धकधीवरपिशुना निष्कारणवैरिणो जगति || (हरिण, मासा आणि सज्जन हे गवत, पाणी आणि संतोष एव्हढया थोडयावर खूष असतात. तरीहि त्यांना फासेपारधी, मासेमार आणि दुष्टजन हे निष्कारणवैरी असतातच.)

काही दुवे

मेकॉलेचे हे वाक्य (आणि कदाचित पूर्ण भाषण) मी पूर्वी वाचले होते. ते बनावट आहे हे पण वाचले होते. पण सत्य आणि बनावटपणा याचा छान मेळ घातला गेला आहे की भल्याभल्यांची फसगत होते. गुगलून पाहिले असता. अब्दुल कलामांच्या वेबसाईट वर ते होते असा हा दुवा म्हणतो. या दुव्यात योजना आयोगाचे डॉ. एस्.पी.गुप्ता यांनी ते येथे वापरले आहे.

२००२ साली भारत विकास परिषदेच्या नियतकालिकात हे उद्गार पहिल्यांदा आले असावेत असा उल्लेख आहे.

तुमच्या प्रतिसादाशी सहमत.

प्रमोद

इंग्रजी शिक्षणाची वैचारिक पार्श्वभूमी

ब्रिटिश आणि पाश्चात्य लोकांकडून आपण जे जे घेतले ते एकतर वाईट आणि अनावश्यक होते किंवा ते आपल्याकडे आधीच, वेदांमध्ये वगैरे, होते असे मानणार्‍यांचा एक मोठा गट आहे. .... असे गट मॅक्समुल्लरसारख्या प्राच्यविद्या विद्वानांच्यावर असा आरोप करतात की ते पाश्चात्य जगाच्या श्रेष्ठत्वाच्या गंडाने पछाडलेले होते.... मेकॉलेप्रणीत शिक्षण हे आपले राज्य चालविण्यासाठी कारकून हवेत म्हणूनच निर्माण झाले असे ते म्हणतात.

मेकॉलेप्रणीत शिक्षण हे आपले राज्य चालविण्यासाठी कारकून तयार करण्यासाठी लागू झाले असे दाखवून देणारे, व त्याला साम्राज्यवादाचे धोरण म्हणून विश्लेषण करणारे वेगवेगळ्या विचारप्रवाहाचे आहेत. यातले सगळेच (उ. मार्क्सवादी इतिहासकार, अनेक राष्ट्रवादी इतिहासकार) वेदांबद्दलची वरची विधाने करत नाहीत, आणि पाश्चात्य संस्कृतीला एकंदर संशयाच्या नजरेतून पाहत नाहीत. उलट, त्याचे अंतिम परिणाम आधुनिकता व सुधारणा आणण्याचाच होता, असे अनेकांचे मत आहे. या गटांतल्या फरकाला, व त्यांच्या या धोरणाच्या टीकेला अधिक जवळून पाहायला हवे.

मला स्वतःला असे वाटते की मेकॉले जरी साम्राज्याचा पाईक होता तरी ब्रिटनमधल्या अन्य अनेक विचारवंतांप्रमाणे आपल्या हिन्दुस्तानी प्रजेचे कल्याण करण्याची जबाबदारी आपल्यावर ईश्वराने टाकली आहे असे मानणारा paternalistहि तो होता. एतद्देशीय ज्ञानामध्ये यद्यपि घटपटादि खटपट भरपूर होती तरी दारिद्र्यपीडित प्रजेचे ऐहिक आयुष्य सुखाचे करणारे उपयुक्त ज्ञान त्यामध्ये फारच थोडे होते, असे जे ज्ञान तोपर्यंत रेनेसांस आणि औद्योगिक क्रान्तीच्या योगे युरोपात निर्माण झाले होते ते हिंदुस्तानात आणले पाहिजे आणि त्यासाठी इथल्या भाषा समृद्ध केल्या पाहिजेत असे मानणार्‍या गटाचा तो प्रतिनिधि होता. आणि म्हणूनच इंग्रजी भाषा आणि त्यातील ज्ञान इकडे आणले पाहिजे ह्या त्याच्या टिप्पणीमागचा प्रमुख विचार होता.

हे शिक्षणधोरण साम्राज्यवादीच होते, आणि पेटर्नलिझम् आणि जगाला सुसंस्कृत करण्याच्या जबाबदारीची जाणीव, हे ही त्यातच मोडते. अंतिम निर्णय काही निवडक व्यक्तींनी कलकत्त्यात घेतला असला तरी त्याची वैचारिक पार्श्वभूमी - पौर्वात्य/पाश्चात्य गटांमधले वादविवाद (.pdf) - हे अनेक दशके इंग्लंडमध्ये, व कलकत्त्यात कंपनी सरकारच्या अधिकार्‍यांमध्ये होत होते. १८व्या शतकाच्या उत्तरार्धात विलियम जोन्स वगैरे प्राच्यपंडितांचा वरचष्मा हळूहळू १९व्या शतकाच्या उदयास कमी होत गेला. याला दोन विचारप्रवाह कारणीभूत होते - क्रिश्चियन मिशनर्‍यांचा इवँजेलिकलिझम् व जेरेमी बेंथम/जेम्स मिल यांचा युटिलिटेरियनिझम्. दोन्ही प्रवाहातून प्राच्यपंडितांनी मांडलेल्या ब्रिटन-भारताच्या संबंधांचा, व भारतीय साहित्य-संस्कृतीबद्द्लच्या सहानुभूतिपूर्वक मतांना हाणून पाडण्यात आले. मिशनरी धार्मिक मागासलेपणाच्या मुद्द्यावरून भारतीय संस्कृतीवर कोसळले, तरी (धर्मांतरातून होऊ शकणार्‍या) "सुधारणा" या कल्पनेवर त्यांचा विश्वास होता. जेम्स मिल, त्यांचे चिरंजीव जॉन् स्ट्युअर्ट् मिल, इ. यांना धर्मांतरात अजिबात रस नव्हता, पण युटिलिटेरियनिझमला अनुसरून कायद्यातून (लॉ) सुधारणा घडवून आणणावर जबर विश्वास होता. जेम्स मिल यांचे १८१८ सालचे "हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया" हा भारताच्या सुधारणगरजेवर लांबलचक निबंध होता. त्याचा कंपनी सरकारच्या एकूण त्या काळच्या धोरणांवर प्रचंड प्रभाव पडला - सतीबंदी कायदा असो, रेल्वे-टेलीग्राफ असो, वा इंग्रजी शिक्षण असो. मेकॉले-मिल यांचे शासन-सुधारणांवरूनही अनेक वाद उठले, ज्यांचा त्या काळच्या ब्रिटिश व हिंदुस्तानी कायदेकानूंवर छाप पडली. पण भारताला असंस्कृत अवस्थेतून प्रगत स्थितीकडे नेण्याकरिता इंग्रजीची गरज होती, आणि त्याला साम्रज्यवादी, पेटर्नलिस्ट इंग्लंडची गरज होती, यावर त्यांचे एकमत झाले.

हा व्यापक पौर्वात्य-पाश्चात्य वाद इथे महत्त्वाचा आहे कारण भाषा व ज्ञान यांमधल्या विशेष संबंधावर निराळे तर्क मांडण्यात आले. युरोपीय ज्ञानाबद्दल अभिमान असला तरी, ज्ञान/संस्कृती या विशिष्ट भाषेतच उपजतात, व ज्या समाजात उपजतात त्याचे शिक्षण सर्वात आधी त्यातूनच व्हायला पाहिजे असा पौर्वात्यवाद्यांचा विश्वास होता. आंग्लपंथीयांनी हा मूळ भाषाशास्त्रीय, व epistemological (प्रमाणशास्त्रीय?) मुद्दा उचलून तो जागतिक (युनिवर्सल) पातळीवर इंग्रजीला, व फक्त इंग्रजीलाच लागू केला. हा वाद फारच बहुपेढी आहे, आणि मला इथे त्याचा सारांश ही नीट मांडता येणार नाही, पण मुद्दा एवढाच की मेकॉलेला भारतीय भाषा समृद्ध करण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता - टिपणात त्यांचा उल्लेख नाही. उपखंडातल्या दोन-तीन ठिकाणी संस्कृत-अरबी शिक्षण (फक्त भाषेचे, त्यातून एकूण शिक्षण नव्हे) चालू ठेवल्यास पुष्कळ आहे असे तो म्हणतो. तो कुठली ही इथली भाषा जाणत नव्हता हे खरे, पण ही त्याची जमेची बाजू होती - मिल ने आधीच विस्तारित पणे मांडले होते, की या भाषांबरोबर, एतद्देशीय माहितगारांबरोबर जास्त संबंध येणे हे आधुनिक तटस्थ व वैज्ञानिक दृष्टीस बाधकच होते, आणि त्यांपासून संपूर्ण अलिप्तपणा हाच खर्‍या, समर्थ अधिकार्‍याचे, इतिहासकारचे, पॉलिसीमेकरचे लक्षण होते. मेकॉलेने या वादाला, व त्यातून निघणार्‍या भाषिक/शैक्षणिक सिद्धांतांना फार मार्मिकपणे शासकीय धोरणाचे रूप दिले, हे लक्षात घ्यायला हवे. बायदवे, पूर्ण टिपण येथे आहे.

त्याने जे काही इथल्या मूळच्या ज्ञानाबाबत जे अधिक्षेपकारक उद्गार काढले ते अज्ञानमूलक होते हे खरे आणि आज तेच त्याच्या टीकाकारांच्या हातातील प्रमुख शस्त्र बनले आहे पण त्यांकडे दुर्लक्ष्य करून आपण आज एव्हढाच विचार करावा की त्या आधुनिक शिक्षणाविना आणि ब्रिटिशांनी देशाचे राजकीय एकीकरण, समाजसुधारणेचा विचार, आधुनिक संस्था असे जे काही मागे सोडले त्याशिवाय २०व्या आणि २१व्या शतकात आपण कोठे पोहोचलो असतो.

आपण इंग्रजी शिक्षणामुळे कुठे पोहोचलो आहोत, व कुठे राहिले असतो हा वाद फारच मोठा आहे, व त्याला सोपे, सरळ उत्तर माझ्याकडे तरी नाही, कारण साध्या "प्रगती" व "मागासलेपण" या संज्ञांपलीकडे अशा व्यापक धोरणाचे परिणाम शोधले पाहिजेत असे मला वाटते. येथे कुठली शिक्षणपद्धति चालू होती (होत्या), व त्यातील काय काय कसे मारले गेले व नक्की केव्हा, याला धरमपालांचे पुस्तक फारच कमी पडते; पण त्यामुळे हा प्रश्न विचारूच नये, व तसे विचारल्यास आपण प्रगती वा विज्ञानाविरुद्ध आहोत, असे होत नाही. इथे मेकॉलेच्या धोरणामुळे घडून आलेल्या बदलांचा, परिणामांचा आढावा घेणे अशक्य आहे, आणि मी देखील "मेकॉलेचीच एक मुलगी" असल्याने मराठीत हे विचार सविस्तर मांडणे मला कठीण जाते. पण याचे सर्वात दीर्घ परिणाम विज्ञानशाखांत नसून भाषाशास्त्रांत, इतिहासमिमांसात, समाजशास्त्रांत, एकूण ज्याला लूझ्ली epistemology म्हणू शकतो (ज्ञानसंपादनाच्या पद्धती - प्रमाणशास्त्र?), यात झाला आहे असे मला वाटते.
धर्मपालांचे पुस्तक फार जुने झाले. ब्रिटिश वासाहतिक कालात झालेल्या नवीन ज्ञानसंपादन पद्धतींमुळे घडून आलेल्या परिणामांवर आजकाल इतिहासकारांमध्ये बरेच संशोधन होत आहे. त्यात ना हंकी-डोरी पूर्वकालाचा सूर आहे, ना पूर्णपणे मेकॉलेसमर्थनाचा.*

हे जर सगळे इतके छान होते तर महात्मा फुले आणि अण्णासाहेब कर्वे ह्यांना चळवळी का कराव्या लागल्या? .... तेथे आधुनिक ज्ञानाचीच गरज होती आणि इंग्रजांनी ती, कोणत्याहि कारणासाठी का होईना आणि जबर किंमत वसूल करून का होईना, भागविली आणि त्याचा हिन्दुस्तानी प्रजेला झाला असला तर लाभच झाला. हे सत्य आपण मोकळया मनाने मान्य का करीत नाही हा मला नेहमी प्रश्न पडतो.

मोकळ्या मनानेच अजून अनेक प्रश्न आपल्या अलिकडच्या, आधुनिकतेच्या इतिहासाबद्दल विचारावेत असे मलाही वाटते. निव्वळ प्रांतिक किंवा धार्मिक राजकीय किंवा भाषाभिमानी दृष्टीकोनातून नाही; शिक्षणशास्त्राच्या, सांस्कृतिक व सामाजिक इतिहासाच्या दृष्टीकोनातून. आधुनिक ज्ञान म्हणजेच इंग्रजी शिक्षण हे एवढे सोपे समीकरण आहे का? तसे केले गेले त्याला काय कारण, संदर्भ होते? आधुनिक ज्ञान जर कुठल्याही भाषेत रेप्लिकेट करण्यासारखे असले तर इंग्रजी व भारतीय भाषांची उतरंडी कायमच का राहते, व एकूण आपल्याकडे धडून आलेल्या आधुनिकतेशी त्याचे काय गहन संबंध असू शकतील? एखाद्या भाषेतून शिक्षण घेतले तर त्याचे एखाद्या सांस्कृतिक ठेव्याशी काय नाते असते, व अनुवाद ह्या क्रीयेतून ते कितपत आयात-निर्यात करण्यात येते? सगळ्याच शास्त्रांना, विषयांना ही आयात-निर्यात समान जमते का, का काहींच्यात याने मूलभूत परिवर्तन होतात? "लर्नेड नेटिव्स" मधल्या अनेक गटांनी १८३५ च्या आधीच इंग्रजी शिक्षणांतर्गत तांत्रिक शिक्षणाची मागणी केली होती, पण १८३५ नंतर बहुकाल भारतात इंग्रजी शिक्षण म्हणजे इंग्रजी साहित्य व लिबरल एजुकेशन हेच होते. याचे काय कारण व परिणाम होते?**

इ. इ. मला वाटते मगच मेकॉले धोरणाची "जबर किंमत" नक्की काय व किती होती याचा काहीसा न्युआंस्ड् अंदाज आपण लावू शकतो. आणि मेकॉले चे खोटे टिपण लोकांना पाठवून ते पाताळयंत्र होते हे म्हणण्यापेक्षा, आपल्या भाषांना, व त्यांना वाचवण्याचे, समृद्ध करण्याचे, इंग्रजी आत्मसात करूनही तींतून शिक्षण द्यायचे नवीन विचार करू शकतो.

असो. हा मोठा गुंतागुंतीचा विषय. माफ करा, योगायोगाने मिल्-जोन्स-मेकॉलेंवरच वाचन चालू होते, त्यामुळे माझा प्रतिसाद खूपच लांबला! चूभूद्याघ्या.

* अवांतर: हा लेख "भाषा आणि जीवन" मध्ये प्रथम छापला होता असे वर वाचले - अन्य ठिकाणी प्रसिद्ध झालेले लेख संक्षिप्त रूपात उपक्रमवर चर्चेसाठी टाकता येतात का? असे असल्यास या नवीन संशोधनावरचा एक लेख मला टाकायला आवडेल.

** रा.भा. पाटणकर यांच्या "अपूर्ण क्रांती" (मौज, १९९८?) पुस्तकात याचे विस्तारित, चिंतनीय विश्लेषण आहे.

उत्तम प्रतिसाद

"पण भारताला असंस्कृत अवस्थेतून प्रगत स्थितीकडे नेण्याकरिता इंग्रजीची गरज होती, आणि त्याला साम्रज्यवादी, पेटर्नलिस्ट इंग्लंडची गरज होती, यावर त्यांचे एकमत झाले."

~ अत्यंत अभ्यासपूर्ण प्रतिसाद.
रोचना यानी दिलेल्या वरील वाक्यावरून दत्तो वामन पोतदार यांच्या एका लेखाची आठवण झाली. त्यातील एका भागात ते म्हणतात, "इंग्रजांना भाषेचे महत्व असे काही पटलेले दिसते की, ते सरकार एतद्देशीयांकरीता इंग्रजी भाषावृद्धीसाठी जो काही खर्च करते, एवढी मेहनत त्यावर करते हे पाहून लोकांनी विचारले, "हे इतके कशासाठी ?" तेव्हा सरकारी प्रवक्ता उद्गारला, "धिस इज् अवर रोड बॅक टु युरोप" - याचाच छुपा अर्थ असा की शासक असे समजत, इंग्रजी माध्यम राखले तर आपली राजकीय सत्ता संपुष्टात आल्यानंतरही आपले वैचारिक साम्राज्य भारतात त्यामुळे नंतरही टिकून राहील.

~ झालेही अगदी तसेच.

हाय रोड बॅक टू युरोप

हे उद्गार मुंबईचे गव्हरनर मौंट्स्ट्युअर्ट एल्फिन्स्टन ने काढले होते. वर उल्लेखिलेल्या "जबाबदारीच्या जाणीवेचे", ब्रिटिश साम्रज्याच्या मोठ्या मनाचे ते एक उदाहरण म्हणून प्रसिद्ध झाले. जॉन ब्रिग्ग्स् (मुंबईतलाच त्या काळचा अजून एक महत्त्वाचा लष्करी अधिकारी) ने एल्फिन्स्टनने शिक्षणासाठी उपलब्ध केलेल्या छापील पुस्त्कांकडे पाहून शंका व्यक्त केली की छापखाने, शिक्षण वगैरे आणले तर एके दिवशी भारतीय ब्रिटिशांविरुद्धच वळतील. एल्फिन्स्टन ने हे मान्य केले की पुढे जाऊन या सवलती ब्रिटिशांचे "हाय रोड बॅक टू युरोप" ठरू शकतील, तरी अडाणी प्रजेच्या प्रति ही त्यांची ड्यूटी होती.

एलफिन्स्टन

धन्यवाद रोचना. वाचली ती लिंक [एल्फिन्स्टनची]. "इट इज अवर हाय रोड बॅक टु युरोप" असेच कदाचित दत्तो वामन पोतदार यांच्या मूळ लेखात असेल. मी केवळ स्मरणाच्या आधारे तो प्रतिसाद दिल्याने "हाय" शब्द निसटला.

(मात्र तो लेख पोतदारांचाच होता हे नि:संशय.)

नेटिव्हांना शिक्षण सुविधा पुरविण्यावरून ब्रिग्ग्जने उपस्थित केलेल्या शंकेवर एल्फिन्स्टनचे "We are bound, under all circumstances, to do our duty to them" हे उत्तरही जनतेप्रती जबाबदारीच्या व्याख्येचे प्रतीक मानले गेले पाहिजे.

उत्तम प्रतिसाद

अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडला. एक शंका.

पण १८३५ नंतर बहुकाल भारतात इंग्रजी शिक्षण म्हणजे इंग्रजी साहित्य व लिबरल एजुकेशन हेच होते. याचे काय कारण व परिणाम होते?**

आताच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासंबंधी गुगलून पाहिले. भारतातील कित्येक ठिकाणी अभियांत्रिकी शिक्षण या दरम्यान सुरु झाले. मुंबईतील वीजेटीआय (१८८७) पुणे इंजिनियरिंग (१८५४), रुरकी (१८४७), बंगाल मधील शिबपूर (१८५६). ही काही त्यातील नावे. त्याच बरोबर वैद्यकीय शिक्षणात मद्रास (१८३५), ग्रँट मेडिकल मुंबई (१८४५) ही नावे (अजून नीटशी शोधली नाहीत.) याच काळातली आहेत.

प्रमोद

लिबरल व अभियांत्रिकी शिक्षण

बरोबर. काही संस्था होत्या, नाही असे नाही. रूर्की तर फार जुनी. पण अनेक इतिहासकारांचे मत असे दिसते की एकूण अभियांत्रिकी शिक्षणापेक्षा भाषा, साहित्य व ह्युमॅनिटीज् च्या विषयांना सुरुवातीच्या दशकात अभ्यासक्रमात प्राधान्य होते, आणि अभियांत्रिकी शिक्षणाचे प्रमाण आणि तींत भारतीयांचा प्रवेश वाढवण्यासाठी एतद्देशियांकडूनच सरकारवर जास्त प्रेशर होते. हे प्रमाण हळूहळू २०व्या शतकातच वाढत गेले.

इतिहासकारांचे मत

इतिहासकारांचे मत समजण्याजोगे वाटत नाही.

मेकॉलेनंतरच्या काळात महाराष्ट्रात (भारताची माहिती जमवली नाही.) 19 व्या शतकात विजेटीआय आणि पुणे अशी दोन मोठी अभियांत्रिकी (पदवी देणारी) महाविद्यालये होती. तदनंतर विसाव्या शतकात 1947 पर्यँत फक्त युडीसीटी आणि एल आयटी (नागपूर) ही दुय्यम (केमिकल इंजिनियरिंग या एकाच विषयाशी संबंधीत) महत्वाची कॉलेजेस निघालीत. त्यानंतर 1947 ते 1960 (महाराष्ट्राच्या स्थापनेपर्यँत) वालचंद, आय आयटी, विश्वेश्वरय्या (नागपूर) अशी तीन महाविद्यालये निघाली. 1960 साली अमरावती (बहुदा) औरंगाबाद आणि कराड त्यानंतर 1962 साली सरदार पटेल (मुंबई) अशी चार कॉलेजेस निघाली. आणि त्यानंतर परत नवीन महाविद्यालये होण्याचा मार्ग थबकला.

हे बघितल्यावर इतिहासकारांचे मत पटण्यासारखे वाटत नाही. याशिवाय काही जणांच्या आठवणीत या त्यावेळी अशा महाविद्यालयात प्रवेश घेणे फारसे कठीण नव्हते. असे असताना एतद्देशियांची मागणी असूनही अभियांत्रिकी शिक्षण देणारी महाविद्यालये निघत नव्हती आणि सरकारवर त्यांचे प्रेशर होते हे म्हणणे पटण्यासारखे नाही. इतिहासकारांनी कुठल्या माहितीवर त्यांचे मत आधारले आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

प्रमोद

अभियांत्रिकी शिक्षणाची मागणी

इतिहासकारांचे मत अनेकदा पटण्यासारखे नसते, आणि इथे ही तेच असू शकेल. पण मला वाटतं इथे चूक नसून नेमक्या एम्फसिस् मध्ये फरक होतो आहे. अभियांत्रिकी शिक्षणाच्या संस्था होत्या, आणि विज्ञान आणि वैज्ञानिक शिक्षणाचा सुरुवातीपासून उल्लेखही होता हे कोणी नाकारत नाही. पण त्या काळच्या अनेक भारतीय पत्रिका, सरकारला पाठवलेल्या अर्ज, संघटनांनी घेतलेल्या रेसोलूशन्स् मधला सूर असाच आहे, की सरकाराचे शैक्षणिक धोरण अभियांत्रिकी शिक्षणाकडे, आणि बेसिक विज्ञान शिक्षण व संशोधनाकडे द्यावे तितके लक्ष देत नाही. दीपक कुमारांचा हा लेख अनेक इतिहासकारांच्या तळटीपांमध्ये सापडतो. तो त्रोटकच आहे, पण सायन्स अँड् द राज ह्या त्यांच्या पुस्तकात याच विश्लेषणाचा विस्तार आहे. खुद्द मेकॉलेने युरोपीय विज्ञानाची बाजू टिपणात पौर्वात्यांविरुद्ध मांडली असली, तरी शालेय अभ्यासक्रमात इंग्रजी साहित्यावरच आधुनिक चरित्रघडणीचे उत्तम साधन म्हणून त्याचा अग्रह होता. शालेय स्तरावर, आणि खासकरून ग्रॅजुएट स्तरावर विज्ञान शाखांच्या विषयांच्या अभ्यासक्रमावरून बरीच विविध चर्चा झाली - यात प्रादेशिक विषमतेचाही भाग होता, कारण मुंबई विद्यापीठात विज्ञानाची वेगळा पदवीधर अभ्यासक्रम सुरू झाला, पण तसलाच कलकत्त्यात व लाहोरला आणायला बराच वेळ आणि प्रयत्न लागले. कलकत्ता विद्यापीठात बी.एस्.सी ची पदवी १८९९ साली नियुक्त करण्यात आली. बाकी बरीच कारणे व उदाहरणे - अभ्यासक्रमाच्या रचनेची, आर्थिक अडथळ्यांची - कुमार देतात. इथे चांगला गोषवारा मला देता येणार नाही, पण या पुस्तकातले अनेक लेख रूर्की, शिबपूर, कलकत्ता मेडिकल कॉलेज, इ. वेगवेगळ्या संस्थांच्या इतिहासावर आहेत, तेही चाळून पाहावे - पूर्ण वाचता आले नाही तरी गूगल "पर्दानशीन दर्शना"वर उपलब्ध आहे.

मला सुरुवातीच्या प्रतिसादामधल्या वाक्यात, मेकॉलेच्या टिपणामधल्या भारतियांना आधुनिक विज्ञानाची ओळख करू पाहणार्‍या धोरणामागे, "इंग्रजी शिक्षणां"तर्गत साहित्य-कला व अभियांत्रिकी/वैज्ञानिक शिक्षणाचे प्रश्न किती गुंतागुंतीचे ठरले, आणि सरकारच्या दैनंदिन प्रॅक्टिकल गरजांमध्ये आणि व्यापक स्तरांवर विज्ञानशिक्षण मिळवून देण्यामध्ये ह्यात विसंगती कशा होत्या हे सुचवायचे होते (वाक्यरचनेमुळे ते स्पष्ट झाले नसेल). तुम्ही दिलेल्या महितीप्रमाणे, यात प्रादेशिक विसंगतीदेखील असू शकतील, ज्यामुळे एंफसिस् आणि तर्क काहीसे वेगळेही निघू शकतील. खास मुंबई इलाक्यातल्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या इतिहासावर संशोधनपर लेख कुठे आढळल्यास इथे संगर्भ अवश्य द्यावा.

धन्यवाद

तिन्ही दुव्यांबद्दल आभार. दीपक कुमारांचा लेख बराचसा वाचता आला. इतर दोन पुस्तके सवडीने वाचायला लागतील असे दिसते.

दीपक कुमारांच्या तुम्ही दिलेल्या लेखाबरोबर हा लेखही मिळाला.
दीपक कुमारांचे मत बहुतांशी विज्ञानविषयक शिक्षणासंबंधी आहे. तांत्रिक शिक्षणासंबंधी ते त्यामानाने कमी लिहितात. या बाबतीतला तुमचा विचार तुम्ही सुस्पष्ट केला आहेच. हा विषय गुंतागुंतीचा आहे हे तुमचे मत मान्य करण्यासारखेच आहे.

मेकॉलेचा भर विज्ञानशिक्षणावर नव्हता. तो विज्ञान आणि तंत्रज्ञानशिक्षणाविरुद्ध (डिस्टेस्ट) होता, असे दीपक कुमार लिहितात. ह्या मतासाठीचा संदर्भ मात्र दीपक कुमारांनी दुय्यम पुराव्याचा घेतला आहे. ग्रिफिन यांचा अप्रकाशित पी.एच.डी. प्रबंध असा हा आधार आहे. त्यावेळच्या अनेक वैज्ञानिकांना (जगदीशचंद्र बोस, पी.सी रे इत्यादी) याचे वाईट अनुभव आले होते. याबद्द्ल त्यांचे विस्ताराने लिहिलेले मत वाचले. ते बहुतांशाने पटते.

तुमच्या दुव्यांमुळे अजून बरेच काही वाचायला मिळाले याबद्दल धन्यवाद.

प्रमोद

मेकॉलेचे विज्ञान शिक्षणाबद्दल विचार

मेकॉलेचा भर विज्ञानशिक्षणावर नव्हता. तो विज्ञान आणि तंत्रज्ञानशिक्षणाविरुद्ध (डिस्टेस्ट) होता, असे दीपक कुमार लिहितात. ह्या मतासाठीचा संदर्भ मात्र दीपक कुमारांनी दुय्यम पुराव्याचा घेतला आहे.

हो, हे दुर्दैवी आहे, आणि खरेतर चांगल्या संशोधन पद्धतीला सोडून आहे.

आपली चर्चा सांगतास आली खरी, पण माझ्या डोक्यात किडा वळवळतच होता, म्हणून अजून थोडी शोधाशोध केली. मेकॉले विज्ञान आणि तंत्रज्ञानशिक्षणाविरुद्ध होता याबाबत जालावरच्या तरी कुठल्याच प्राथमिक लेखाचा किंवा भाषणाचा संदर्भ मिळत नाही. पण अनेकांनी कुमारांइतका अतिरेकी शब्द वापरला नसला तरी, त्याला अभ्यासक्रमात विज्ञानापेक्षा साहित्याची भर हवी होती, हे विधान केले आहे. उदा. मेकॉलेचे हे नुकतेच प्रसिद्ध झालेले चरित्र (पृ. १२४). या अधिक, विख्यात संस्कृत/बंगाली साहित्याचे संशोधक शिवाजी बंदोपाध्याय यांचा "मेकॉले अँड राममोहन" म्हणून लेख आहे. त्यात ते राममोहन राय यांनी १८२३ साली लॉर्ड् ऍमहर्स्ट् यांना लिहीलेल्या पत्राचा व मेकॉलेच्या टिपणाचा लागोलाग अभ्यास करतात. १८१३ च्या कंपनी करारात इंग्रजी सरकाराने नेमलेल्या रकमेचा वापर जास्तीत जास्त विज्ञान शिक्षणासाठी व्हावा असा राममोहनांनी आवर्जून अर्ज केला होता. हे पत्र बरेच गाजले होते; मेकॉलेने ते वाचले होते, व त्याचा टिपण तयार करण्यात वापरही केला होता असा बंदोपाध्यायांचा अनुमान आहे (टिपणातील व पत्रातील काही ठळक साम्यांवरून). तरी, लर्नेड नेटिवांचा, आणि त्यांच्या मागणींचा उल्लेख करूनही, शेवटी जो मेकॉलेनिर्देशित शालेय अभ्यासक्रम तयार झाला त्यात साहित्य-कलेचाच भर होता. असे नक्की का, याचा लेखात फार विस्तारित विचार आहे - तुम्हाला पूर्ण वाचायचा असल्यास त्याचा पीडीएफ् माझ्याकडे आहे, हवा असल्यास ईमेल करू शकते, किंवा कुठे जालावर टाकता येतोय का बधते.

लेखांची वाट पाहतोय.

रोचना बाई,
तुम्ही आता केवळ प्रतिसाद देत राहू नका, इथे वरचेवर लेख हि लिहीत जा.
तुम्ही इतकं छानपणे विचार मांडता कि ते वाचून तुम्ही लिहीलेले लेख वाचायची खूप इच्छा होत आहे.

बाप रे!

धन्यवाद! जमेल तसे, (आणि धाडस होईल तसे!) लिहीत जाईन.

छान

छान. पहिला संदर्भग्रंथ चाळून बघितला. पुढलेही बघेन.

 
^ वर