अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ८ (पी.एच.डब्ल्यू.आर.)

प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर्स

तांदूळ निवडतांना आपण त्यातले वेगळे दिसणारे खडे वेचून त्यांना काढून टाकतो, पिठामधल्या कोंड्याचे कण आकाराने मोठे असल्यामुळे चाळणीच्या बारीक छिद्रांमधून खाली पडत नाहीत, रेती धुतली तर त्यातली माती पाण्याबरोबर वाहून जाते, पाण्यात मिसळलेला मद्यार्क (अल्कोहोल) त्याला उकळवून पाण्यापासून वेगळा केला जातो. एकमेकात मिसळलेले भिन्न पदार्थ अशा अनेक पध्दती वापरून आपल्याला पुन्हा वेगवेगळे करता येतात कारण त्या दोहोंच्या गुणधर्मात काही महत्वाचे फरक असतात. त्या फरकामुळे आपण त्यांचे वेगळेपण ओळखून त्यांना बाजूला करू शकतो. पण मूलद्रव्यांचे वेगवेगळे आयसोटोप्स मात्र सर्वच दृष्टीने अगदी एकसारखे असतात, त्यांचे एकूण एक भौतिक व रासायनिक गुणधर्म (फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज) जवळ जवळ समान असतात, त्यांचे अतीसूक्ष्म अणू एकमेकात बेमालूम मिसळलेले असतात. घन किंवा द्रवरूप अवस्थेत ते अणू जवळच्या इतर अणूंना घट्ट चिकटलेले असल्यामुळे त्यांना वेगळे करणे अशक्यच असते. वायूरूप स्थितीत मात्र प्रत्येक अणू स्वतःच सुटा होऊन फिरत असतो पण तो सुपरसॉनिक विमानाच्या गतीने दाही दिशांना भरकटत असतो. वेगवेगळ्या आयसोटोप्सच्या अशा गतीमान अणूंना एकत्र आणून त्यांचे निरनिराळे समूह बनवणे कोणत्याही सोप्या क्रियेने शक्य नसते. थोडक्यात सांगायचे तर आयसोटोप्सना एकमेकांपासून सहजासहजी वेगळे करता येत नाही.

निसर्गात सापडणा-या युरेनियममध्ये यू २३५ आणि यू २३८ हे त्याचे दोन आयसोटोप्स असतात. त्यामधील यू २३५ भंजनक्षम असते, त्यापासून अणू ऊर्जा उत्पन्न करता येते, पण यू २३८ या कामासाठी उपयुक्त नसते. नैसर्गिक युरेनियममधून या दोहोंना वेगळे करण्यासाठी या सर्वात जड अशा मूलद्रव्याला वायुरूप अवस्थेत आणून त्या वायूचे पृथक्करण करणे हे कल्पनातीत महाकठीण कर्म असते. त्याबाबतचे सारे कार्य अत्यंत गुप्तपणे केले जाते. त्याची माहिती आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री मिळत नाही. यामुळे व्यावसायिक दृष्ट्या विद्युत निर्मितीसाठी नैसर्गिक युरेनियमचा उपयोग कसा करता येईल याविषयी सुरुवातीपासूनच विविध दिशेने प्रयत्न चाललेले आहेत. त्या दृष्टीने ग्राफाईट मॉडरेटर रिअॅक्टर्स बनवण्याच्या प्रयत्नाबद्दल मागील भागात पाहिले.

हेवी वॉटर मॉडरेटर आणि नैसर्गिक युरेनियम फ्यूएल यांचा वापर करून सुध्दा ही गोष्ट साध्य करता येते. हैड्रोजन या मूलद्रव्याचा ड्यूटेरियम नावाचा एक वजनदार जुळा भाऊ (आयसोटोप) अत्यल्प प्रमाणात त्यातच मिसळलेला असतो. त्याचे दोन अणू आणि ऑक्सीजनचा एक अणू यांच्या संयोगाने जड पाणी (हेवी वॉटर) बनते. साध्या पाण्यातच ते जड पाणीसुध्दा किंचितसे असते. आपल्या शरीरात नेहमीच चमचाभर हेवी वॉटर असते असे म्हणता येईल. पण शुध्द हेवी वॉटरच्या निर्मितीसाठी मात्र हैड्रोजन या मूलद्रव्याच्या ड्यूटेरियम या दुर्मिळ आयसोटोपाला वेगळे काढावे लागत असल्याने हे कामसुध्दा सहजपणे करता येत नाही. मात्र पाणी हा द्रव आपल्या चांगला ओळखीचा आहे, आर्किमिडीजच्याही आधीपासून त्यावर संशोधन केले गेले आहे, पाणी आणि वाफ यांच्या गुणधर्मांबद्दल भरपूर आणि सविस्तर माहिती उपलब्ध आहे, विविध प्रकाराने त्यांचा वापर होत असलेली नानाविध प्रकारची यंत्रसामुग्री गेल्या दोन तीन शतकांपासून तयार होत आली आहे, शिवाय जड पाणी हे विनाशकारी, विस्फोटक किंवा विषारी असे भयानक द्रव्य नसल्यामुळे त्याच्या उत्पादनावर सरसकट फार कडक आणि जाचक आंतरराष्ट्रीय प्रतिबंध कदाचित घातले जात नसावेत. अशा अनेक कारणांमुळे युरेनियमच्या एन्रिचमेंटच्या तुलनेत हेवी वॉटर बनवणे किंचित सुलभ, कमी खर्चिक आणि आवाक्यातले वाटते.

इतर प्रगत देशांनी देखील सुरुवातीच्या काळात हेवी वॉटरच्या उपयोगावर संशोधन केले असले तरी कॅनडाने या बाबतीत स्पृहणीय यश मिळवले. कँडू या नावाने ओळखल्या जाणा-या अनेक रिअॅक्टर्सची उभारणी कॅनडामध्ये करून त्यांनी हे तंत्रज्ञान प्रस्थापित केले, तसेच अशा प्रकारचे रिअॅक्टर्स इतर देशांना निर्यात केले. भारतीय अणूऊर्जेचे जनक डॉ.होमी भाभा यांनी पन्नास वर्षांपूर्वी दूरदृष्टीने विचार करून हेच तंत्रज्ञान भारतासाठी सर्वात चांगले आहे हे ओळखले आणि या क्षेत्रातील भारताच्या धोरणाला योग्य दिशा दिली. कॅनडामध्ये डग्लस पॉइंट या जागी २२० मेगावॉट क्षमतेचे पहिले पॉवर स्टेशन बांधले जात असतांनाच त्याच्या मागोमाग भारतात राजस्थानातील रावतभाटा या ठिकाणी तशाच स्वरूपाचा पहिला प्रकल्प कॅनडाच्या सहाय्याने उभारला गेला. त्यानंतर त्याच डिझाइनचा आणखी एक रिअॅक्टर त्याच्या बाजूला स्थापन केला गेला. हे करतांना आपल्या तंत्रज्ञांनी यासंबंधीचे तंत्रज्ञान आत्मसात केले आणि आधी त्यात थोडा थोडा आणि नंतर आमूलाग्र फरक करत अशा प्रकारची न्यूक्लियर पॉवर स्टेशन्स देशभरात अनेक ठिकाणी स्वतःच्या प्रयत्नातून उभारली.

पी.डब्ल्यू,आर प्रमाणेच प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर्स (पी.एच.डब्ल्यू.आर) मधले प्रायमरी कूलंट (हेवी वॉटर) फक्त रिअॅक्टर, पंप आणि स्टीम जनरेटर्स एवढ्या भागात आणि रिअॅक्टर बिल्डिंगमध्येच फिरत असते. स्टीम जनरेटर्समधून बाहेर पडलेली साध्या पाण्याची वाफ टर्बाइनमधील चक्राच्या शाफ्टला फिरवून कंडेन्सरमार्फत परत येते. त्याला जोडलेल्या जनरेटरमध्ये विजेची निर्मिती होते. पी.एच.डब्ल्यू.आर. मधला सगळाच कन्व्हेन्शनल एरिया जवळपास पी.डब्ल्यू.आर.सारखाच असतो. या दोन प्रकारच्या रिअॅक्टर्समध्ये मात्र काही महत्वाचे फरक आहेत. पी.एच.डब्ल्यू.आर.मधील रिअॅक्टर व्हेसल आकाराने बरेच मोठे असते आणि त्याच्या सिलिंडरचा आंस आडवा असतो. त्यातून आरपार जाणा-या नळ्यांच्या आकाराचे तीन चारशे कूलंट चॅनल्स (किंवा फ्य़ूएल चॅनल्स) बसवलेले असतात. या नळ्यांमध्ये जुडग्यांच्या आकारातली अनेक फ्यूएल बंडल्स ठेवतात आणि त्यांच्या मधून वाहणारे सुमारे १०० बार इतक्या उच्च दाबाचे हेवी वॉटर त्यातील ऊष्णतेला बाहेर वाहून स्टीम जनरेटरकडे नेते. रिअॅक्टर व्हेसलमधील कूलंट चॅनेल्स सोडून त्यांना सर्व बाजूंनी वेढलेला उरलेला मोकळा भाग हेवी वॉटर मॉडरेटरने भरलेला असतो. यातील जड पाण्याचा दाब १-२ बार इतका अगदी कमी असतो. त्याचे तपमान वाढू नये यासाठी एका वेगळ्या पंपाद्वारे हे पाणी निराळ्या हीट एक्स्चेंजरमधून खेळवून थंड केले जाते. पी.डब्ल्यू.आर. मधील एकाच कॉमन सर्किटमध्ये वाहणारे साधे पाणी कूलंट आणि मॉडरेटर ही दोन्ही कामे करते, पण पी.एच.डब्ल्यू.आर. मध्ये उच्च दाबाचे कूलंट आणि कमी दाबाचे मॉडरेटर अशा दोन वेगवेगळ्या सिस्टिम्समध्ये जड पाणी वहात असते. ते कोठेही एकमेकांत मिसळत नाही.

नैसर्गिक युरेनियममधील भंजनक्षम भाग कमी असल्यामुळे वीजनिर्मितीसाठी त्यातला जेवढा भाग खर्च होतो त्याची लगेच भरपाई करणे आवश्यक असते. फ्यूएलिंग मशीन्स नावाच्या खास यंत्रांद्वारे हे काम रिअॅक्टर चालत असतांनाच केले जाते. याला ऑन पॉवर रिफ्यूएलिंग म्हणतात. चित्रात दाखवल्याप्रमाणे एका कूलंट चॅनलच्या दोन बाजूंनी दोन मशीने त्याला जोडली जातात. एका बाजूने नवे इंधन आत ढकलले जाते आणि जुने खर्ची पडलेले इंधन (स्पेंट फ्यूएल) दुस-या बाजूच्या मशीनमध्ये घेतले जाते. त्यानंतर ती मशीने चॅनलपासून वेगळी होतात. स्पेंट फ्यूएल त्याच्या स्टोअरेज बे किंवा पूलमध्ये पाण्याखाली साठवून ठेवले जाते आणि पुढील चॅनलच्या फ्यूएलिंगसाठी एका फ्यूएलिंग मशीनमध्ये नवे फ्यूएल घेतले जाते.

ड्यूटेरियम हे मूलद्रव्य न्यूट्रॉन्सना अगदी अल्प प्रमाणात शोषून घेते (अॅब्सॉर्ब करते) या कारणाने हेवी वॉटर हे सर्वोत्कृष्ट मॉडरेटर समजले जाते. पण जे थोडे न्यूट्रॉन्स या क्रियेत ड्यूटेरियमच्या न्यूक्लियसमध्ये प्रवेश करतात त्यांच्यामुळे ट्रीशियम नावाचा हैड्रोजनचा तिसरा आयसोटोप तयार होतो आणि तो मात्र रेडिओअॅक्टिव्ह असतो. तो इतस्ततः पसरू नये आणि मूल्यवान हेवी वॉटर वाया जाऊ नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. या रिअॅक्टरमध्ये बसवलेली सर्व यंत्रसामुग्री, उदाहरणार्थ पंप्स, व्हॉल्व्हज, हीट एक्स्चेंजर्स, फिल्टर्स, पाइप्स, फिटिंग्ज, सील्स वगैरेची कसून तपासणी केली जाते आणि त्यांच्या लीकटाइटनेसला सर्वाधिक महत्व दिले जाते.

प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर्स भारताच्या अणूऊर्जेच्या कार्यक्रमाचा गाभा असल्यामुळे त्यांचे डिझाईन, त्यामधील यंत्रांची निर्मिती, वीज केंद्रांची उभारणी आणि त्यांचे व्यवस्थापन, निगराणी या सर्व बाबतीत आपण खूप मजल मारली आहे आणि जवळजवळ स्वयंपूर्ण बनलेलो आहोत.

. . .. . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Comments

कॅन्डू

प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिऍक्टर बद्दल वाचायची उत्सुकता होती ती पूर्ण झाली. वाचताना हे जाणवले की पूर्वीचे लेखही (समांतरता पाहण्यासाठी) चाळावे लागतात. धन्यवाद. नैसर्गिक युरेनियम वापरणारा हा एकमेव असावा (चु.भु.द्या घ्या). या पूर्वीच्या लेखात (या लेखमालेतल्या नाही.) जड पाणी आणि साधे पाणी यांच्या मॉडरेटर म्हणून होणार्‍या उपयोगाबद्दल वाचले होते. जड पाण्यात न्युट्रॉन फारशा प्रमाणात ऍब्सॉर्ब केले जात नाही. म्हणून ते नैसर्गिक युरेनियम सोबत वापरता येते. या उल्लेखाची आठवण झाली.

याच बरोबर विकीत दिलेली माहिती वाचली.

कॅनडा कडून आलेल्या कॅन्डू रिऍक्टर्स नंतर भारताने याच पद्धतीचे १३ रिऍक्टर्स बांधले. नैसर्गिक युरेनियम सोबत प्लुटोनियमचा वापर केला. विकी वरील माहिती नुसार भारत आणि कॅनडा सोडल्यास या रिऍक्टरला फारसे यश लाभले नाही.

विकीतील माहितीनुसार या जडपाण्यात ट्रिशियमचा एक उल्लेख वेगळा वाटला. जड पाण्यातील ट्रिटीयम वेगळे काढले जाते. हे ट्रिशियम आणि ड्युतेरियम हायड्रोजन बॉम्ब बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते. (ट्रिशियम बनवण्याचा हा एकमेव मार्ग आणि सर्वात सोपा मार्ग नाही असे ही लिहिले आहे.) पण भारताने जो ४५ कि.ट. चा हायड्रोजन बॉम्बचे परिक्षण केले होते (पोखरण २) मधे त्यात याचा वापर झाला असावा.

माहितीपूर्ण लेख वाटले. सुरुवातीला सांगितलेल्या यादीतील सर्व पद्धतीचे रिऍक्टर संपले असावेत. पुढील भागात अजून काय माहिती येते याबद्दल उत्सुकता आहे.

प्रमोद

नैसर्गिक युरेनियम

मॅग्नॉक्स प्रकारच्या रिऍक्टरमध्ये वापरले जाऊ शकते, पण ते यशस्वी ठरले नाहीत. याबद्दलची माहिती मी आधीच्या लेखात दिली आहे. सध्या तरी पी एच डब्ल्यू आर या एकाच प्रकारात हे व्यावसायिक पातळीवर होत आहे.
या लेखाचा विषय फक्त अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती कशी होते एवढ्यापुरताच मर्यादित आहे.

 
^ वर