कोड्यांची माहिती हवी.

पहिल्यांदा कोडी कूणाला सूचली असतील.?याला काही परंपरा आहे का ? त्याचे काही लिखित पूरावे आहेत का? कोड्यांमागे काही उद्देश असतो का ? कोणी तज्ञ काही माहिती देऊ शकेल का ?

लेखनविषय: दुवे:

Comments

कोडे

कोडे म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीला ताण देऊन एखादा प्रश्न सोडवणे. यावरून प्रत्येक प्रश्नाला कोडे म्हणायला हरकत नाही परंतु प्रत्येक प्रश्नासाठी आपली कल्पनाशक्ती लढवावीच लागेल असे नाही. उदा.पाठ्यपुस्तकात धड्यावरून जे सरळसोट प्रश्न विचारले जातात त्याला कोडे म्हणता येणार नाही परंतु गणिताचा नियम शिकवून त्यावरून उलट सुलट पद्धतीने गणिते घालण्याला कोडी म्हणता यावे असे वाटते. कोड्यांनी गणित आणि तर्कशक्तीला उत्तम चालना मिळू शकते, तेव्हा यासाठीच कोड्यांची निर्मिती केली जात असावी. अनेक गणिततज्ज्ञांचा आणि गणितात रुची राखणार्‍या व्यक्तींचा तसेच भाषाशास्त्री, तर्कशास्त्री इ. चा हा विरंगुळा असतो.

माणसाला आपल्या बुद्धीचा वापर करायचे सुचले व जेव्हा प्रश्न पडायला सुरुवात झाली आणि त्याची उत्तरे शोधल्यावर त्याला जेव्हा आनंद मिळू लागला त्यावेळेपासूनच कोड्यांची निर्मिती होऊ लागली असावी. ब्रह्मदेवाने* जग निर्माण करून सर्वांनाच कोड्यात टाकले. याहून अधिक जुने पुरावे कोणते हवेत? (ह. घ्या.)

ऐतिहासिक दृष्ट्या जगातील सर्वात जुने कोडे आर्किमिडिजने (२८७-२१२ ख्रि.पू. काळ) घातल्याचे कळते तर ग्रीक पौराणिक कथांनुसार स्फिंक्स राक्षसी येणार्‍या जाणार्‍या वाटसरूंना पुढील प्रश्न विचारत असे -

"सकाळी चार पायांवर चालणारा, माध्यान्ही दोन पायांवर चालणारा आणि सायंकाळी तीन पायांवर चालणारा प्राणी कोण?" या कोड्याचे उत्तर न देणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण होते.

महाभारतात यक्षाने (किंवा यमाने) युधिष्ठिराला विचारलेल्या प्रश्नोत्तरांतही तर्कशक्ती लढवणे गरजेचे असल्याने तीही मला एकप्रकारे कोडीच वाटतात. मला माहित असलेली ही दोन-तीन उदाहरणे आहेत. याहूनही जुनी असल्यास कल्पना नाही.

निरनिराळी कोडी निर्माण करण्याबद्दल श्री. य. ना. वालावलकर यांचेही नाव ऐकून आहे.

जगातील काही उत्कृष्ट कोडी: रुबिक्स क्यूब, टॉवर्स ऑफ हनोई, जिगसॉ पझल्स, शब्दकोडी, सुडोकु इ.

असो. हा प्रतिसाद कोड्यात टाकणारा असल्यास क्षमस्व! कारण मी तज्ज्ञ नाही. हे केवळ सामान्यज्ज्ञान आहे तेव्हा चू. भू. द्या. घ्या.

* हे वाक्य ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली यावर विश्वास ठेवणार्‍यांसाठी आहे. :)

यक्ष/महाभारत

स्फिंक्सप्रमाणेच महाभारतात युधिष्ठिराला प्रश्न विचारणार्‍या यक्षाच्या प्रश्नांचा (यक्षप्रश्न हा शब्द बहुधा यावरूनच आला असावा), ऐतिहासिक कोड्यांत समावेश करता येईल. 'आपल्या सभोवती रोज इतकी माणसे मरत असताना माणूस आपण अमर आहोत असे समजून का चालतो?' हा एक प्रश्न आठवतो.

तत्वज्ञान

यक्षाचा प्रश्न तर्कापेक्षा तत्वज्ञानाच्या प्रांतातला वाटतो.

गणित व/वा तर्क वापरून किमान माहितीवरून वा सकृतदर्शनी परस्परविरोधी किंवा असंबद्ध माहितीवरून उपयुक्त, सुसंबद्ध निष्कर्ष काढणे हा कुठल्याही कोड्याचा गाभा असतो असे वाटते. कोड्यात टाकणारे प्रश्न सोडवून मेंदूला एक्झिलरेट* करता येते, मजा येते, म्हणून मला कोडी आवडतात.

* एक्झिलरेट = झिणझिण्या? की काय?

एक्झिलरेट

एक्झिलरेट/एक्झिलरेशन ला चपखल शब्द 'त्वरण' वाचल्याचा आठवतो.

चालना

त्वरण हा शास्त्रीय दृष्टीने जरी चपखल असला, तरी वरील वाक्याच्या संदर्भात चालना किंवा मेंदुला खाद्य/खुराक असे अपेक्षित असावे.

क्झि

मला एक्झिलरेटिंग म्हणजे exhilarating म्हणायचे होते. त्वरणातले ऍक्सिलरेशन नाही. :-)

स्वयंवर

चांगला प्रश्न आहे. पूर्वी राजकन्यांचे स्वयंवर असायचे तेव्हा (बिचार्‍या) राजपुत्रांना काहीतरी अफलातून करून दाखवायचा पण असायचा (सीता स्वयंवर किंवा द्रौपदी स्वयंवर). यात बौद्धिक कोडीही असायची का कल्पना नाही. (आत्ता तरी याचे उदाहरण आठवत नाही.)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

अर्थ?

राजेंद्रराव,
* इतरांना सार्त्र् नरकासमान का मानतो ते कृपया सांगावे.
काही दुसरा अर्थ असेल तर तोही स्पष्ट करावा, तेवढेच अज्ञानाचे निराकरण व ज्ञानात भर.

- दिगम्भा
*(माझ्या गंजलेल्या फ्रेंचच्या आधारे जो अर्थ लागला त्याप्रमाणे)

सार्त्र

दिगम्भा,
आपले भाषांतर अचूक आहे. याचे शब्दशः भाषांतर जरी "हेल इज अदर पीपल" असे असले तरी त्यामागचा अर्थ बराच गहन आहे. आपण नेहमी स्वतःला इतरांच्या नजरेतून बघतो आणि त्यामध्ये आपले खरे व्यक्तिमत्व बर्‍याचदा हरवून जाते. समाजात वावरताना आपल्याला खरे मत न मांडणे, आपल्या भावना न दर्शवणे असे प्रकार करावे लागतात. या सर्वांचा परिपाक म्हणजे हेल इज अदर पीपल. विषय अथांग आहे आणि हे फारच त्रोटक स्पष्टीकरण आहे.
यावर हा दुवाही बघावा
http://www.theatrehistory.com/french/sartre002.html

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

छान चालू आहे.

जसजसा गणित अन त्या कोड्यांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो.तसतसे ते संकटासारखे समोर येतातच.आता मी संकटाला घाबरणार नाही.त्याला सामोरे जाईन.कोंडके साहेब,फारच आवड दिसते तुम्हाला, कोड्यांची.मला ही रुची बदलावी लागेल असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
 
^ वर