रशियन संस्कृत साम्य

कित्येक वर्षांपूर्वी रशियन भाषा शिकतांना असे अनेक वेळा जाणवत असे की ती भाषा आणि संस्कृत ह्यांमध्ये बरेच साम्य आहे. आता इंडो-युरोपीय म्हणतात त्या गटातल्या भाषामधील साम्य हा नवा विषय मुळीच नाही. २०० वर्षांपासून विल्यम जोन्स, बॉप अशा विद्वानांना तो ठाऊक आहे.

तरीही संस्कृत आणि रशियनमधील साम्य हे तशा प्रकारच्या अन्य साम्यांपेक्षा अधिक आहे असे जाणवत राहते. असाच विचार असणारे बरेच संस्कृतज्ञ रशियामधे आहे आणि त्यांचा एक चर्चागटहि मला ठाऊक आहे. दिल्ली विद्यापीठामधील फिनो-उग्रिक भाषागट विभागातील प्राध्यापिका इंदुलेखा ह्यांनी लिहिलेला Cognate Words in Sanskrit and Russian असा एक निबंधहि माझ्या वाचनात आलेला आहे. उपक्रमाच्या वाचकांच्या परिचयासाठी अशा सुमारे ५० प्रमुख शब्दांचा मी रशियन आणि संस्कृत उच्चारणांचा तक्ता केला आहे. त्यात असे शब्द निवडले आहेत की जे भाषानिर्मितीच्या प्राथमिक अवस्थेमध्येहि वापरात असणार. तक्ता ५ भागात चित्ररूपाने पुढे जोडले आहेत. चित्ररूपाने अशासाठी की रशियन अक्षरे अन्य मार्गाने येथे दर्शविता आली नसती. ती चित्रे येथे नीट दिसावीत एव्हढी अपेक्षा आहे.

ह्या तुलनेच्या मर्यादाहि स्पष्ट करतो. संस्कृत भाषेला रशियनपेक्षा खूप प्राचीन परंपरा आणि इतिहास आहे. आजची रशियन भाषा हजार-बाराशे वर्षांहून जुनी नाही. तिची किरिलिक लिपीसुद्द्धा बिझांटियममधून त्याच सुमारास आलेली आहे. त्या अर्थाने तिची आणि संस्कृतची तुलना एका पातळीवर करता येणार नाही. पण एकतर तत्पूर्वीचे स्लाव लोक काय बोलत होते ह्याबाबत फार माहिती उपलब्ध नाही आणि मला थोडीफार माहीत आहे ती आधुनिक रशियन भाषा. एव्ह्ढे मात्र म्हणता येईल की आधुनिक रशियन आणि संस्कृतमधॅ जर इतके जवळचे साम्य दिसते तर प्राचीन (आणि आता हरवलेल्या) रशियनच्या पूर्वज भाषेशी ते साम्य अधिकच असणार.

ह्या साम्याचा असा अर्थ सहजच निघू शकतो की अतिपूर्व काळात प्राचीन संस्कृत (किंवा तिचीहि पूर्व भाषा) आणी रशियनची पूर्व भाषा बोलणारे गट हे एकत्रित किंवा एकमेकांपासून निकट राहात असले पाहिजेत, जेणेकरून त्यांच्यामध्ये शब्दांची देवाणघेवाण होऊ शकली. लॅटिन इ. भाषांच्या पूर्व भाषा बोलणार्‍या लोकांच्या निकटपणापेक्षा हा निकटपणा अधिक असला पाहिजे. अर्थात हा केवळ तर्क आहे कारण कसलाही पुरातत्वीय पुरावा त्यासाठी आज उपलब्ध नाही.

तक्ते पुढीलप्रमाणे:

Chart 1
तक्ता १Chart 2
तक्ता २Chart 3
तक्ता ३Chart 4
तक्ता ४Chart 5
तक्ता ५
 
लेखनविषय: दुवे:

Comments

रशियन संस्कृत साम्य

वरील तक्ता प्रयोग फसलेला दिसतो. काही वेळाने पुनः प्रयत्न करेन. क्षमस्व.

[तक्त्यातील चित्रांची रुंदी कमी असल्याने (गूगल चित्रदुव्यातले s128 म्हणजे १२८ पिक्सल)तक्ते नीट दिसत नव्हते. चित्रांची रुंदी आता वाढवली आहे. -- संपादन मंडळ]

पुन:प्रयत्न-

तक्त्यातील शब्द, रशियन लिपीशिवाय, असे आहेत. (' हे चिह्न असे दर्शविते की तत्पूर्वीच्या व्यंजनाचा उच्चार 'मृदु' आहे.)

प्रथम संस्कृत सार्थ, नंतर रशियन शब्द देवनागरीमध्ये.

पा-पिबति पिणे पीत्'
प्लु-प्लावते तरणे प्लावात्'
विद्-वेत्ति जाणणे व्येदात्'
पत्-पतति पडणे पादात्'
दा-ददाति दात्'
जी जीवति जगणे ज्झीत्'
मृ म्रियति मरणे मिर्येत्'
श्रु शृणोति स्लूषात'
ज्ञा जानाति जाणणे झ्नात्'
स्मि स्मयते हसणे स्मियात्'
दिन दिवस द्येन्'
नक्त रात्रि नोच्'
नभस् नभ नेबऽ
हिम हिवाळा ज्झिमा
श्वेत पांढरे स्व्येत्'
अग्नि आग अगोन्'
धूम धूर दिम्
उदक पाणी वदा
मधु मध म्योद्'
मांस म्यासऽ
क्रविस् रक्तमांस क्रोव्'
मातृ माता मात्'
भ्रातृ भाऊ ब्रात्'
स्वसृ बहीण सिस्त्रा
दुहितृ मुलगी दोच्'
देवृ दीर दयेव्येर्\
अक्षि डोळा अको
गल गळा गोर्लऽ
वृक लांडगा वोल्क्'
नव नवीन नोविय्
तत् (पु स्त्री न बहु) तो ती तें ते तोत्' ता तो त्ये
एतत् (पु स्त्री न बहु) हा ही हें हे एतोत्' एता एतऽ एति
उभ उभय ओबा
स सहित स् (संस्कृतप्रमाणे तृतीया विभक्ति लागते)
कदा केव्हा कग्दा
तदा तेव्हा तग्दा
एक अदिन्
द्वा द्वा
त्रि त्रि
चतुर् चेतिर्य्
पञ्च प्यात्'
षष् श्येस्त्'
सप्तन् स्येम्'
दशन् द्येव्यात्'
शत स्तो

अरविंद कोल्हटकर, ऑगस्ट ०१,२०११.

प्रश्न

लेख अजून नीट वाचला नाही. परंतु शीर्षकावरून लगेच मनात आलेला प्रश्नः

सदरहु साम्य "आर्य कॉकेशस पर्वताच्या प्रदेशातून भारतात आले" त्या थिअरीला दुजोरा देतो का? ;-)

नितिन थत्ते

आर्यांचे मूल स्थान

नितिन ह्यांच्या प्रश्नाला सरळ उत्तर देणे मी टाळत आहे, अशासाठी की हा प्रश्न बराच गुंतागुंतीचा आहे आणि त्याची चर्चा सरळ रस्ता सोडून लवकरच राजकीय क्षेत्रात शिरते. ज्यांना जिज्ञासा आहे आणि अधिक वाचन करावयाची इच्छा आहे त्यांच्यासाठी जालावर आणि छापील अशी भरपूर चर्चा आणि मतमतांतरे उपलब्ध आहेत. अशा अभ्यासाला http://en.wikipedia.org/wiki/Indigenous_Aryans येथून प्रारंभ करता येईल.

अरविंद कोल्हटकर, ऑगस्ट ०३, २०११.

चांगली माहिती....परंतु

रशियन भाषेत आणि भारतीय भाषांत कमालीचे साम्य असल्याचे मागेही ऐकले होते परंतु अशी यादी पाहिली नव्हती.

चहालासुद्धा रशियन मध्ये चा वगैरे म्हटले जाते असे ऐकले आहे. (अर्थात त्याचा उगम रशिया आणि भारताला विभागणारा चीन असावा.)

रशियन-संस्कृत शब्दांची यादी आणि माहिती आवडली. उपक्रमावर अशापद्धतीचे आणखी लेख यावेत. उपक्रमी सदस्यांत कोल्हटकरांची भर उपयुक्त आहेच परंतु कोल्हटकरांना थोडं आस्ते घ्या असे सांगावेसे वाटते. त्यांच्याकडील सर्व माहिती त्यांनी उपक्रमावर द्यावीच आणि ती हवीहवीशीही आहे परंतु जे आदले लेख आहेत त्यात सुरू झालेल्या चर्चेत सहभागी व्हावे आणि विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्नही करावा. त्यातूनही बरीचशी माहिती बाहेर येते आणि वाचकांना जोडून ठेवणे साध्य होते. तेव्हा दोन लेखांमध्ये थोडा अवकाश ठेवावा अशी विनंती.

सूचना

सूचना योग्य आहे. मलाही तसेच जाणवले आहे.

अरविंद कोल्हटकर, ऑगस्ट ०२, २०११.

सातम् भाषा आणि चेंतुम् भाषा

हिंद-युरोपीय भाषावृक्षाच्या अगदी आधीच्या शाखा कुठल्या, याबाबत मतभिन्नता आहे.

त्यापैकी एक विचारसरणी भाषांचे दोन विभाग पाडते (विकिपेडिया दुवा) :
(१) सातम् भाषा : यात येणारे भाषासमूह म्हणजे हिंद-इराणी (यांच्यापैकी संस्कृत आहे), आर्मेनियन, बाल्टो-स्लाविक (यांच्यापैकी रशियन आहे), आल्बेनियमन, आणि काही लहान भाषाकुळे
(२) चेंतुम् (किंवा केंतुम्) भाषा : यात येणारे भाषासमूह म्हणजे इतालिक (यांच्यापैकी लातीन आहे), केल्टिक, जर्मॅनिक, तोकेरियन, आनातोलियन, वगैरे.

या विभागणीमध्ये रशियन ही नात्याने (लातिनापेक्षा) संस्कृताच्या अधिक जवळ जाते.

"सातम्" हा अवेस्त्यातील भाषेतला "१००" संख्येकरिता शब्द आहे. रशियन "स्तो", अवेस्ता "सातम्", संस्कृत "शतम्" वगैरे ठिकाणी प्रथम व्यंजन ऊष्मन् आहे.
चेंतुम्/केंतुम् (१०० संख्येसाठी लातीन शब्द) यात पहिले व्यंजन स्पर्श व्यंजन आहे.
यावरून ही नावे त्या कोण्या भाषाशास्त्र्याने निवडली. त्यात खूप काही खास नाही. पण परंपरेने नावे चिकटून बसलेली आहेत.

- - -
दिलेली उदाहरणे माहितीकरिता उत्तम आहेत. (वर दिलेल्या विकिपेडिया दुव्यावरती अधिक शास्त्रीय माहिती बघता येईल.) धन्यवाद.

 
^ वर