युद्धाचे काही फायदे असू शकतील का?

युद्ध ही मानवी इतिहासातील अटळ घटना आहे. युद्धाचे तोटे सर्वांनाच द्न्यात आहेत - जीवीत/वित्त हानी, शारीरीक/मानसिक क्लेश , सामाजिक उलथापालथ आदि.
पण नाण्याला २ बाजू असतात् या न्यायाने युद्धाचे काही फायदे असू शकतील का? जर अनंत काळ युद्ध झाले नाही तर मानवी लोकसंख्या बेसुमार वाढेल, लोक निश्चिंत, कामचुकार, आळशी बनतील का? की कलेस प्रोत्साहन मिळून लोकांची उर्जा मार्गी लागेल?
ताकाचे मंथन करूनच लोणी काढावे लागते तद्वत सामाजिक उलथापालथ , मग ती सिव्हिल वॉर असो की जागतिक युद्ध असो वेळोवेळी आवश्यक असते का? या विषयावर मते जाणून घ्यायला आवडतील.

जालावर पुढील - लेख वाचनात आला. चांगला वाटला.

माझे मत - जगात युद्धे झाली नाहीत तर रग/खुमखुमी जिरणार नाही आणि शेवटी आपसात लढाया होऊन अशा ना तशा चकमकी झडतीलच. मानवी रक्तात आक्रमकपणा आहे. युद्धामुळे मानसिक तसेच शारीरीक शक्ती मार्गी लागत असावी.

____________________________

हा चर्चा प्रस्ताव उपक्रमाच्या नियमात बसत नसेल तर उडविण्यात यावा.

लेखनविषय: दुवे:

Comments

आर्थिक फायदे

कोणालातरी आर्थिक फायदे तर आहेतच. माझ्याकडे म्युच्युअल फंड समभाग आहेत, फंडकडून गुंतवणूक झालेल्या काही कंपन्या युद्धोपयोगी सामग्री तयार करतात. त्याचा फायदा मला व्याज किंवा समभागांच्या वधारलेल्या किमतीत मिळतो.

रग/खुमखुमी जिरण्याबाबत : लढवय्यांपैकी ज्या व्यक्तीची रग मरण पावल्यामुळे जिरते, त्याच्या दृष्टीने फायद्यापेक्षा तोटा अधिक आहे. धडधाकट जिवंत राहिलेल्या जेत्यासाठी रग जिरण्याचा फायदा बहुधा तोट्यापेक्षा अधिक आहे. म्हणूनच :

मानवी रक्तात आक्रमकपणा आहे. युद्धामुळे मानसिक तसेच शारीरीक शक्ती मार्गी लागत असावी.

या वाक्याचा संदर्भ समजला नाही. या वाक्यातील माहितीमधून फायदा किंवा तोट्याबद्दल काय कळते?

उदाहरण पटले

युद्धामुळे आक्रमकपणास वाव मिळत असावा अन्यथा तशाही चकमकी झडल्याच असत्या. म्हणजे काय तर युद्ध अपरिहार्य आहे. मग त्याचे फायदे का शोधू नयेत? असा एक विचार.

आर्थिक लाभाचे उदाहरण पटले. "देअर इज जस्ट ऍज मच मनी टू बी मेड इन द रेक ऑफ अ सिव्हिलायझेशन ऍज इन द अपबिल्डींग ऑफ वन." हे "गॉन विथ द विंड" मधील वाक्य आठवले.

जर्मन ऑटोबान

जालावर उलट - सुलट विधाने आहेत.
पैकी एक विधान असे आहे - २र्‍या महायुद्धापूर्वी, जर्मनीने "ऑटोबान" हे युद्धात उपयोगी पडावे म्हणून बांधले. या विधानाची 'मिथ" म्हणून केलेली खंडने देखील जालावर आहेत.
पण जर हे विधान खरे मानले तर आत्ता आपण् जे एक्स्प्रेस वे/ फ्री वे/हाय वे वापरतो त्यांचा उगम युद्धसामुग्री या हेतूनेच झाला असा होतो.
हा युद्धाचा एक मोठा फायदाच म्हणायला पाहीजे.

ज्ञात

युद्धाचे तोटे सर्वांनाच द्न्यात आहेत

'ज्ञ' हे अक्षर 'जे' व 'एन' या कळा दाबून लिहिता येते. द्न्यात हे रावलट वाचायला कसेसेच वाटते.
सन्जोप राव
मुत्तकोडीकव्वाडीहडा, मुत्तकोडीकव्वाSSSडीहडा
प्यार में जो ना करना चाहा, वोभी मुझे करना पडा

ज्ञ

धन्यवाद सन्जोप राव.

फायदे

जॉर्ज ऑरवेलच्या १९८४ मधील स्पष्टीकरण -

औद्योगिक क्रांतीच्या काळात यंत्रांचा शोध लागल्यापासूनच मानवी कष्ट, हालअपेष्टा यांपासून मुक्ती मिळण्याची स्वप्ने समाजातल्या विचारवंतांना पडू लागली. जसजसे उत्पादन वाढू लागले तसतसे सर्व जनतेला कष्टरहित आणि मुबलक जीवन देणे शक्य असल्याची जाणीव त्यांना झाली. काही दशकातच असा समाज निर्माण होईल की ज्यात लोक कमी तास काम करतील, त्यांना मुबलक प्रमाणात सर्व उपभोग्य वस्तू उपलब्ध होतील आणि त्यांना कलांचा आणि जीवनाचा पुरेपूर आस्वाद घेणे शक्य होईल अशी चित्रे रंगवली जाऊ लागली.
परंतु असा समाज निर्माण होणे हे मुळातूनच धोकादायक असल्याचे समाजव्यवहाराचे नियंत्रण करणार्‍या लोकांना जाणवू लागले. ज्या समाजात सर्व लोक भरभराटीचे आयुष्य जगतात आणि सर्वांना सर्व सुखसोयी सहज उपलब्ध असतात अशा समाजात विषमतेची उघड चिह्ने शिल्लक रहात नाहीत. अशा भरपूर मोकळा वेळ असणार्‍या लोकांना स्वतःचा विचार करता येईल आणि केव्हा ना केव्हा तरी नियंत्रक सत्ताधार्‍यांचे इथे काय काम? असा प्रश्न त्यांना पडून ते त्या सत्ताधार्‍यांना बाजूस सारतील. म्हणून उतरंडीची समाजरचना दारिद्र्य आणि अज्ञानाच्या वातावरणातच शक्य आहे.

यावर उपाय म्हणून काहींनी शेतकीप्रधान भूतकाळाकडे परतावे असा प्रचार करायचा प्रयत्न केला पण औद्योगीकरणाची ओढ फार प्रबळ झालेली होती. शिवाय त्यातून लष्करीदृष्ट्या कमकुवत होण्याचा आणि त्यामुळे पराभूत होण्याचा धोका होता.

काहींनी उत्पादन कमी करण्याचा उपाय करून पाहिला. १९२०-४० च्या दरम्यान अनेक अर्थव्यवस्था कुजवण्यात आल्या, लोकांना बेकार करून त्यांना सरकारी मदतीवर जगवले गेले. परंतु यातूनही लष्करी कमकुवतपणाचा धोका टळत नव्हताच. पुन्हा टंचाई कृत्रिम असल्याचे लोकांना उघड दिसत होते. प्रश्न होता लोकांचा खरा फायदा करून न देता यंत्रयुगाची चाके फिरती कशी ठेवायची? वस्तू निर्माण करायच्या पण त्यांचे समाजात वाटप करायचे नाही. (किंवा वाटप करण्यायोग्य वस्तू निर्माणच करायच्या नाहीत).

हा दुहेरी हेतू सततच्या युद्धांनी साध्य होतो. लोकांना सुखसोयी पुरवण्यासाठी वापरता येण्याजोग्या वस्तूंचा नाश करण्याचा युद्ध हा मार्ग आहे. जरी युद्धात प्रत्यक्ष वस्तू नष्ट झाल्या नाहीत तरी त्यांचे उत्पादन चालू ठेवता येते; जेणे करून मनुष्यबळाचा वापर कुठल्याही प्रकारे उपयुक्त नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी करता येतो. प्रचंड खर्च करून आपण तरंगता किल्ला बांधत आहोत. थोड्या वर्षांनी हा तरंगता किल्ला कालबाह्य म्हणून टाकून दिला जाईल आणि नवा तरंगता किल्ला बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल.

अशा रीतीने युद्ध हे संपत्तीचा आवश्यक नाश घडवून तर आणतेच पण त्याच बरोबर हे कार्य मानसिकदृष्ट्या स्वीकारार्ह रीतीने घडवून आणते. सततची युद्धमान परिस्थिती लोकांना कायम त्यागासाठी तयार ठेवते. [आम्ही गवत खाऊन राहू; पण **** बनवूच]. भविष्यात मिळणार्‍या काल्पनिक विजयाच्या आशेने सत्ताधार्‍यांना संपूर्ण अधिकार द्यायला लोक तयार होतात.

१९८४ मधील राज्यव्यवस्था एका विशिष्ट निष्ठेची दाखवलेली आहे परंतु बहुतेक वर्णन सर्व राजवटींना लागू पडते. अमेरिकेतला मिलिटरी-इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्स ही तर अधिकृत मान्यता असलेली टर्म आहे.

काही आनुषंगिक फायदे सिव्हिलियन समाजाला होतात. जसे बरीच आधुनिक गॅजेट्स + मटेरिअल्स ही माणसे मारण्याच्या, युद्धात बचावाच्या, हेरगिरीच्या साधनांच्या संशोधनातून निर्माण झाली आहेत.

बहुतेक संशोधनासाठी खूप पैसा लागतो आणि तो पुरवणार्‍या यंत्रणा सहसा त्यातून मिळणारे रिटर्नस किती आणि ते किती काळात मिळणार याची काळजी करतात. त्यामुळे संशोधनासारख्या कामासाठी पैसा मिळवणे फार अवघड असते. युद्धसामुग्रीसाठी संशोधन करायचे म्हटल्यावर पैसा अधिक सुकरपणे उपलब्ध होत असावा.

नितिन थत्ते

प्रतिसाद आवडला

ज्या समाजात सर्व लोक भरभराटीचे आयुष्य जगतात आणि सर्वांना सर्व सुखसोयी सहज उपलब्ध असतात अशा समाजात विषमतेची उघड चिह्ने शिल्लक रहात नाहीत. अशा भरपूर मोकळा वेळ असणार्‍या लोकांना स्वतःचा विचार करता येईल आणि केव्हा ना केव्हा तरी नियंत्रक सत्ताधार्‍यांचे इथे काय काम? असा प्रश्न त्यांना पडून ते त्या सत्ताधार्‍यांना बाजूस सारतील. म्हणून उतरंडीची समाजरचना दारिद्र्य आणि अज्ञानाच्या वातावरणातच शक्य आहे.

+१. नवनवीन कारणे शोधून अशांतता खदखदत ठेवणे आणि त्या आधारे सत्ता आपल्या अंकित ठेवणे यासाठी युद्धे होतात/ होतील.

+१

अतिशय मुद्देसूद आणि समर्पक प्रतिसाद.

>> प्रश्न होता लोकांचा खरा फायदा करून न देता यंत्रयुगाची चाके फिरती कशी ठेवायची? वस्तू निर्माण करायच्या पण त्यांचे समाजात वाटप करायचे नाही. (किंवा वाटप करण्यायोग्य वस्तू निर्माणच करायच्या नाहीत). हा दुहेरी हेतू सततच्या युद्धांनी साध्य होतो. लोकांना सुखसोयी पुरवण्यासाठी वापरता येण्याजोग्या वस्तूंचा नाश करण्याचा युद्ध हा मार्ग आहे. >>

बाप रे!!

सुखसोयी

काही दशकातच असा समाज निर्माण होईल की ज्यात लोक कमी तास काम करतील, त्यांना मुबलक प्रमाणात सर्व उपभोग्य वस्तू उपलब्ध होतील आणि त्यांना कलांचा आणि जीवनाचा पुरेपूर आस्वाद घेणे शक्य होईल अशी चित्रे रंगवली जाऊ लागली.
परंतु असा समाज निर्माण होणे हे मुळातूनच धोकादायक असल्याचे समाजव्यवहाराचे नियंत्रण करणार्‍या लोकांना जाणवू लागले

असं समजु कि आपल्या समाजव्य्वस्थेच्या उतरंडीच्या अंतापाशी देखिल सर्व सोयि आहेत. जाहिरातीत दिसणार्‍या सर्व प्रकारच्या वस्तू त्याच्याजवळ आहेत. चारचाकीने कामाच्या स्थळी जातो. पण कामे काय असतील? सर्वांकडे पृथ्वी तलावर उपलब्ध असलेल्या सर्व सोयी आहेत तर काम काय असेल? सर्वच जर बिनबोभाट चाललए तर कामं तरी कसली करायची? असु शकणारी कामे* - सुखसोयीच्या वस्तुंचे उत्पादन, अज्ञानी व्यक्तिला ज्ञानी करणे, रोज्च्या कच‍र्‍याची विल्हेवाट लावणे, अधिक सुखसोयी कशा मिळतील ते पहाणे, शहरे रस्ते वाहतुक यांचे नियोजन करणे, चोर्‍या मार्‍या झाल्याच तर अपराध्याला पकडून पिडीताला योग्य न्याय देणे.....
याच्या पुढची पायरी म्हण्जे आता सर्व सुखसोयी त्यांच्या परमोच्च बिंदुवर आहेत. यापेक्षा जास्त सुखसोयी असुच शकत नाहित.
त्यावेळी परिस्थिती काय असेल? उठल्या उठल्या आपले दात घासुन होतायत...किंवा रात्री विशिष्ट जेल दातांना लावल्याने सकाळी ते घासायची गरज नाही, आंघोळीची गोळि, बसल्याजागी काम, इ इ इ *
अशावेळीही युध्दे होणार नाहित कशावरुन? दुसरा करत असलेली, केलेली किंवा करणारी एखादी गोष्ट नाही पटली तर भांडणे होतात त्याचे पर्यवसान युध्दात होते. माणसाचा हा मुळ स्वभाव बदलेल असे तुम्हाला वाटते का? युद्धात फ़ायदा वगैरे कोण पहात असेल असे वाटत नाही. तो एखाद्या गोष्टीवरुन उगवलेला सुड असतो. अमेरिकेने पर्ल हार्बरवर हल्ला केल्यावर जपान युद्धात उतरले. ( फ़ाशीमागे जी मानसिकता असते तीच युद्धामागे असते असे वाटते)

*यात कुणी वाढ केली तर स्वागत आहे.

जीव - जमीन

आत्ताची आणि भविष्याची सुऱक्षीतता (जीव आणि जमीन यांची) हे काय ते युद्धाचे कारण आणि फायदे.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

अंकल सॅमचे फायदे

लेखाचा उद्देश्य केवळ 'जर-तर', 'असेल-नसेल' इतपतच मर्यादित असल्याने आणि लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी अंतर्गत तो येत असल्याने मुळात काही क्षण युध्द (युध्दे) होईल का या वस्तुस्थितीकडे थिंक टॅन्क वळविणे गरजेचे आहे.

या क्षणी तर सांप्रत पृथ्वीतलावर रशियाचे तुल्यबळ सामर्थ्य नष्ट झाल्यावर अमेरिका हाच एक सर्वसामर्थ्यवान देश उरला आहे हे नाकबूल करण्यात अर्थ नाही. तसे पाहिल्यास रशिया हा एकसंध असतानाही आर्थिकदृष्ट्या कधीच अमेरिकेच्या तुलनेत सामर्थ्यवान नव्हता. त्यातच अनेक कारणास्तव त्या देशाची अनेक शकले झाली आणि या सर्वांचा इतर राष्ट्रांच्या दृष्टीने एक हानिकारक परिणाम झाला आनि तो म्हणजे आज जगात अमेरिका हे एकमेव लष्करी आणि आर्थिक अशा दोन्ही बाबतीत सर्वश्रेष्ठ राष्ट्र झाले आहे. जगात युद्ध व्हायचे असेल वा नसेल [होत असेल तर ते थांबवणे वा होत नसेल तर ते पेटविणे] ही सर्वस्वी बाब आता व्हाईट हाऊसमधील 'ओव्हल चेम्बर' मध्ये असलेल्या खुर्चीत बसलेल्या "एक्झेक्युटिव्ह" च्या सहीवर अवलंबून आहे.

रशियन अस्वल हतबल झाल्याने अमेरिकन गरूड आता सर्वत्र स्वच्छंद्पणे विहार करीत अनेक अविकसित राष्ट्रांचा तारणहार बनला आहे. गल्फवाले भले सोन्याच्या ढिगारात लोळत असतील पण त्यानाही युद्ध या संकल्पनेपासून मैलोगणती दूर राहायचे असल्याने त्यांच्यावरसुद्धा अमेरिकेचाच पगडा पूर्ण बसला आहे. त्यामुळे कोणत्याही खंडात कोणत्याही कारणास्तव युद्ध पेटलेच तर त्याचा सर्वाधिक फायदा अंकल सॅमलाच मिळणार हेही सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. झाले युद्ध तरी फायदा आहेच अन् न झाले तरी त्याचा बॅन्क बॅलन्स रोडावणार नाही हेही तितकेच खरे.

तरीही एक विषय म्हणून 'युध्दाचे फायदे' पाहायचेच असतील तर कारखानदारी आणि बाजारव्यवस्थेला पूरक असे वातावरण तयार होईल, तरूणाईची क्रयशक्ती "सीमा संरक्षण" या भल्या कारणासाठी उपयोगात येईल.

.....आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खंडोगणती चॅनेल्सपुढे "आता ब्रेकिंग न्यूज" साठी काय दाखवायचे हा प्रश्नही उभा राहणार नाही.

हे खरे आहे काय?

...तो म्हणजे आज जगात अमेरिका हे एकमेव लष्करी आणि आर्थिक अशा दोन्ही बाबतीत सर्वश्रेष्ठ राष्ट्र झाले आहे.

-अमेरिकेवर १४.३ ट्रिल्यन डॉलर्सचे (~ ६३० लाख कोटी रु.) कर्ज आहे. आज - उद्या जर या कर्जाची कमाल मर्यादा वाढवली नाही तर त्या देशाची पत खाली येण्याचा होण्याचा धोका आहे.यातले जवळजवळ ५ ट्रिल्यन डॉलर्स कर्ज अन्य देशांकडून घेतलेले आहे. यातले १.२ ट्रिल्यन डॉलर्स म्हणजे भारताच्या एकूण वार्षिक अर्थव्यवस्थेच्या आकाराचे कर्ज एकट्या चीनने दिलेले आहे.
एकूण कर्जातला बराच मोठा भाग अलिकडच्या काळात (१९९० ते २०११) अमेरिकेने केलेल्या युद्धांमुळे (किमान ५ ट्रिल्यन डॉलर्स) निर्माण झाला आहे असे दिसते. अमेरिकेने आपली सर्व युद्धे ताबडतोब थांबवावीत असे त्यांच्याच कायदेमंडळाचे म्हणणे आहे.
यावरून असे दिसते की चीनने अमेरिकेपुढे आर्थिक (आणि काही प्रमाणात लष्करी) आव्हान उभे केले आहे.

त्यामुळे कोणत्याही खंडात कोणत्याही कारणास्तव युद्ध पेटलेच तर त्याचा सर्वाधिक फायदा अंकल सॅमलाच मिळणार हेही सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.

- कोणत्याही खंडात युद्ध पेटले तर अमेरिकेला कोणत्यातरी एका बाजूने त्या युद्धात पडावे लागेल. तसे सध्यातरी त्यांना परवडणारे नाही.

नेमकं सांगायचं झालं तर

अमेरिकेवर १४.३ ट्रिल्यन डॉलर्सचे (~ ६३० लाख कोटी रु.) कर्ज आहे. आज - उद्या जर या कर्जाची कमाल मर्यादा वाढवली नाही तर त्या देशाची पत खाली येण्याचा होण्याचा धोका आहे.

उद्या २ ऑगस्टला.

या संदर्भात लोकसत्तेतील संपादकीय वाचण्याजोगे आहे.

बाकी प्रतिसादाशी +१.

फार किचकट नसावे

कर्जमर्यादा वाढविणे प्रकरण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला नवखे आहे असे नाही [शिवाय लोकसत्तेच्या संपादकीयात म्हटलेच आहे की, अशी अधिक कर्ज उभारणी अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत ७४ वेळा मंजूर करून वाढविण्यात आली आहे.], शिवाय रिपब्लिकन्सनी कितीही हाकारा केला तरी डेमोक्रॅट्स तो प्रस्ताव किनार्‍यावर लावतीलच यात शंका नको.

ज्या खर्चांवर नियंत्रण तात्काळ आणणे गरजेचे आहे तीवर जुलैच्या पहिल्या आठवड्यात तिथे उहापोह झाला आहे. सध्याचे फेडरल रिझर्व्हचे चेअरमन आणि अमेरिकेतच नव्हे तर जगभर नावाजले गेलेले अर्थतज्ज्ञ बेन बर्ननके यानी तर जाहीरपणे कर्जमर्यादा वाढविल्यावर थेट सोशल् सिक्युरीटी, वैद्यकिय सेवा आणि मिलिटरी खर्चावर कपातीची कुर्‍हाड चालविली पाहिजे असे प्रतिपादन करून एकप्रकारे मर्यादा वाढविणे हा जास्त किचकट विषय होणार नाही असाच संकेत दिला आहे.

मात्र एक सत्य आहे की, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जागतिक पातळीवर जे ट्रीपल 'ए' चे मानांकन आहे ते कदाचित घसरू शकेल. पण याचा अर्थ असाही नाही की ते रेटिंग् "डी" पर्यंत जाईल.

पाहू, घोडामैदान २४ तास अंतरावरच आहे.

अमेरिकेचे कर्ज

'कर्जाची कमाल मर्यादा' (डेट सिलिंग) ही जगात फक्त दोन देशांमधे आहे, अमेरिका आणि डेन्मार्क. त्यापैकी डेन्मार्क मधे ती इतकी वर नेउन ठेवली आहे की कधीच वाढवावी लागत नाही. बाकी सर्व देशांमधे अर्थसंकल्प मंजुर केला जातो आणि त्यानुसार खर्च करताना जितके सरकारचे उत्पन्न अपुरे पडत असेल तितके कर्ज घेतले जावे असे सोपे समीकरण असते. कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी मूळात अर्थसंकल्पातच प्रकल्पांना मंजुरी देताना विचार केला जातो. एकदा का अर्थसंकल्प मंजुर झाला की त्यानंतर कर्ज किती घ्यावे ह्यावर कृत्रिम मर्यादा ठेवणे हा वेडेपणा आहे.

हे म्हणजे घर घ्यायचे, गाडी घ्यायची आणि इएमाअय फारंच होतोय म्हणून आपणच कर्जावर एक नियंत्रण आणायचे आणि हप्ते भरण्यास नकार देण्यासारखे झाले. घर आणि गाडी जर घेतलेली आहे तर त्याच हप्ता भरणे ह्यातच शहाणपण आहे. तो न दिल्यास अर्थातच पत खालावणार. आणि त्याचे दुरगामी परीणाम होणार.

दुसरा मुद्दा म्हणजे अमेरिका जरी कितीही कर्जात असली तरी अजून त्यांची पत खूप मोठी असल्याने जगभरातील लोक अमेरिकन बाँड्सनाच पसंती देतात. सध्या सगळेच देश आर्थिक संकटात आहेत त्यामुळे अमेरिकेच्या कर्जाचा डोंगर वाईट असला तरी तितका नुकसान करणारा नाही. पण अमेरिकेने त्यांची पत खालावुन घेणे हा पर्याय मात्र समस्त जगाला नुकसानीचा ठरु शकतो

एकूण कर्जातला बराच मोठा भाग अलिकडच्या काळात (१९९० ते २०११) अमेरिकेने केलेल्या युद्धांमुळे (किमान ५ ट्रिल्यन डॉलर्स) निर्माण झाला आहे असे दिसते.

हे अर्धसत्य आहे. सध्याचा कर्जाचा डोंगर हा युद्धांसोबत, १. बुश टॅक्स कट्स मुळे बुडालेले उत्पन्न आणि त्याच वेळेस वयस्कर लोकांसाठी सुरु केलेली स्वस्त औषध योजना. २.वयस्कर लोकांची वाढती लोकसंख्या आणि त्यांचा एकुणच आरोग्याचा वाढलेला खर्च ३. २००८ चे आर्थिक संकट, ज्यामुळे वाढलेली बेकारी, बुडालेले उत्पन्न, बेल-आउट मनी इ.इ. ह्या गोष्टींमुळेही अमेरिकन अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे.

आणखी एक मुद्दा म्हणजे, अमेरिकेचे कर्ज आकड्यांमुळे इतके प्रचंड वाटत असले तरी अमेरिकेची अर्थव्यवस्थाच प्रचंड असल्याने ते अधिक उठून दिसते. देशाचे उत्पन्न (जीडीपी) आणि कर्ज ह्यांचे गुणोत्तर काढल्यास अमेरिका जगात ३७व्या स्थानावर आहे. अमेरिकेपेक्षा जपान, जर्मनी, युके, फ्रान्स, इटली, नॉर्वे, फिनलंड अशा प्रगत देशांनी (त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेने) जास्त कर्ज घेतले आहे. ह्यापैकी बर्‍याच देशांचा कुठल्याही युद्धातील सहभाग हा नगण्य आहे पण तरीही त्यांचा कर्जाचा डोंगर आहे, कारण आरोग्यसेवा सरकारतर्फे सर्वांना स्वस्त दरात उपलब्ध करणे ह्यासारख्या सामाजिक योजना राबवताना कर्ज उभे होणे अपरीहार्य आहे.

उत्तम

मृत्यूचे भय, अस्मिता वगैरे आड येत नसेल तर, सगळे फायदेच आहेत की. जेवढे जिंकाल तेवढे तुमचे. तसे एक प्रकारे युद्ध हा "व्यवहार" बेसलाईन करण्यासाठी उत्तम मार्ग आहे.

फायदे उचलण्यासाठी अगोदर आपण जिवीत असणे महत्त्वाचे!

चर्चेचा प्रस्ताव एकंदरीतपणे मानवजातील युद्धामुळे काय फायदा होतो असा आहे. त्यात असे मानले गेलेय कि 'मानवी इतिहासात युद्ध ही अटळ घटना आहे.' ते खरे ही आहे. हावरट मानवजातीची लोकसंख्या वाढत जाणे हे निसर्गासाठी धोकादायक आहे. ती कमी होण्यासाठी युद्ध व्ह्यायला हवीतच. जेवढी लोकसंख्या जास्त, तेवढे विचार, संकल्पना जास्त. जेवढ्या ह्या वैचारीक संकल्पनांमध्ये भेद-दुरावा वाढत जाईल तेवढी युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता जास्त! पण हे झालं सामुहीक स्तरावरील भेद-दुराव्याबद्दल!

मानवाचे व्यक्तीगत स्तरावरील वास्तवातले जीवन जगणे हे देखिल एक युद्धच असते नाही कां?
आयुश्य जगायचेय म्हटले तर 'युद्ध करणे' आलेच! कोणी, कधी चांगले वागून, गोडी-गुलाबीने जिंकू पाहतो, तर कोणी, कधी अभिनय करून, खोटं-खोटं गोड बोलून, दुसर्‍याला हरवू पाहतो. ह्या युद्धात आपण जिंकलो तर फायदा होतोच. पण आपण हरलो तर मग खूप हाल होतात. गंमत म्हणजे युद्धाचे नियम देखिल क्शणा-क्शणाला बदलत असतात. युद्धानंतरचे फायदे उचलायचे असतील तर, युद्ध सातत्याने जिंकायलाच हवे.

युद्ध

युद्धाचा नुकसानीचा कॉलम बघता जे काही फायदे दिले आहेत ते फारंच नगण्य ठरावेत.

दुसर्‍या महायुद्धामधे रशीयाला मदत करुन जर्मनीचा पाडाव करणारी अमेरिका शितयुद्धावेळी जर्मनीला मित्र बनवुन रशियाला शह देत होती. दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी कोमात गेलेला एखादा सैनिक सत्तरीच्या दशकात शुद्धीवर आला तर उठल्या उठल्या म्हणला असता, "चला रशीयन दोस्तांच्या मदतीने जर्मनीचा खातमा करुया"

आइनस्टाइनच्या 'जग माझ्या नजरेतुन' ह्या निबंधातले आइनस्टानचे मत वाचण्यासारखे आहे,

"This topic brings me to that worst outcrop of herd life, the military system, which I abhor... This plague-spot of civilization ought to be abolished with all possible speed. Heroism on command, senseless violence, and all the loathsome nonsense that goes by the name of patriotism -- how passionately I hate them!

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

कुचकामी दुवा

चर्चा प्रस्तावात दिलेल्या दुव्यावरचा परिच्छेद 'युद्धाचे फायदे/तोटे' यासंदर्भात पूर्णत: गैरलागू आहे. युद्ध पुर्वीपासून होत आलेली आहेत आणि होत राहणार या विधानाखेरीज त्यात काहीही नाही. मूळ चर्चाप्रस्तावाविषयी एवढेच म्हणावेसे वाटते की युद्धाचे अर्थातच फायदे असतात. हे फायदे/तोटे युद्धाची व्याप्ती, वापरल्या जाणार्‍या शस्त्रांची विनाशाची क्षमता या गोष्टींमुळे प्रत्येक युद्धात कमी अधिक असतात.

मान्य

@का - मान्य, ठळक उदाहरणे नाहीत दुव्यामध्ये पण काही आयडीया आहेत जसे - बरीच संशोधने (इनोव्हेशन्स) ही युद्धाकरता म्हणून झाली. युद्धे झाली नाहीत तर लोकसंख्या अफाट वाढेल, युद्धाची अपरिहार्यता आदि. याहून चांगला दुवा सापडला तर याच धाग्यावर शेअर करेन.

बाकी मला खूप माहीती चर्चेमधून मिळाली. सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार.

 
^ वर