अवधान - एक तेलुगु प्रकार.
दुसर्या एका चर्चागटात मला वरील प्रकार कालपरवाच कळला. महाराष्ट्रात मी तरी असे काही पाहिलेले वा ऐकलेले नाही. अन्य कोणास ठाऊक असल्यास तो अनुभव सर्वांस वाटता यावा, तसे नसल्यास एका नवीन गोष्टीची आपणा सर्वास ओळख करून द्यावी हा ह्या टीपेमागील हेतु आहे.
आपल्या शेजारी तेलुगु भाषिक प्रदेशात अवधान नावाचा एक सार्वजनिक कार्यक्रम केला जातो. त्याला खूप जुनी परंपरा आहे. त्यातील अवधानी - शतावधानी, अष्टावधानी इत्यादि - १००, ८ अशा 'पृछकां'च्या प्रश्नाना तात्काल केलेल्या पद्यातून उत्तर देतो. हे प्रश्न एकामागून एक असे विचारले जातात. उत्तर देणारा एका वेळी पद्याची एकच ओळ सांगतो आणि पुढच्या पृच्छकाकडे वळतो. सर्व पृच्छकांची पाळी झाली म्हणजे तो पुनः पहिल्या पृच्छकाकडे वळून त्याच्या उत्तराची दुसरी ओळ सांगतो. त्याच्यानंतर दुसरा पृच्छक, अशा क्रमाने सर्व पृच्छकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो आणि हे सर्व करतांना दुसर्या कशाचाहि वापर न करता हे तो केवळ आपल्या स्मॄतीनेच करतो. असे हे स्मृति आणि काव्यरचनाकौशल्य ह्यांची एकत्रित प्रदर्शन आहे. ह्याविषयी अधिक महिती येथे पहाता येईल. अवधानाचे अनेक कार्यक्रम Youtube वर उपलब्ध आहेत. अर्थात् ते सर्व तेलुगुमध्ये असल्याने मला तरी अगम्य आहेत. वानगीसाठी येथे आणि येथे जावे.
महाराष्ट्रात तरी जुन्या पंडिती परंपरेमध्ये असे काही कोणी केल्याचे माझ्या माहितीत नाही.
मराठीत 'अष्टावधानी' असा शब्द आहे पण त्याच अर्थ 'अनेक गोष्टींचे एकाच वेळी भान असलेला', किंवा multi-tasker एव्हढाच आहे. त्यामागे काही सांस्कृतिक परंपरा असल्यास तिच्या खुणा पुसून गेल्या आहेत असे वाटते. 'अवधानी' आडनावाच्या अनेक व्यक्ति आहेत. त्यांचा कोणीतरी पूर्वज मूळचा तेलुगु-भाषिक आणि 'अवधान' करणारा असावा पण आज त्याची आठवण त्याच्या वंशजांमध्ये उरल्यासारखे दिसत नाही.
Comments
शक्य
पुणे विद्यापीठामध्ये संस्कृत/(न्याय शास्त्र??) विभागात कोणी एक विद्वान अशाप्रकारे अष्टावधानी असल्याचे एकले आहे, अशा गोष्टी लक्षात ठेवण्याचे विशिष्ठ तंत्र असते असे देखील एकले आहे.
एकाग्रता
अवधान म्हणजे एकाग्रता आणि अष्टावधानी म्हणजे आठ ठिकाणी (किंवा आठ दिशांकडे) काय चालले आहे याचे भान ठेवणारा असे मला वाटत होते.
अवधानम् ही सांस्कृतिक परंपरा मोठी रोचक वाटली. यूट्यूबवरील दुवा फारसा कळला नाही तरी तेथे काय चालले आहे हे लक्षात येत आहे.
असेच नसेल. विकीवरील दुव्यात कर्नाटकातही अवधानम् ही परंपरा असल्याचे कळते. तेव्हा महाराष्ट्रातही ती असण्याची शक्यता वाटते. किंबहुना, ही प्रथा कर्नाटकात (किंवा महाराष्ट्रात होती) तिथून ती आंध्रातही गेली पण तेथे रुजली आणि राहिली असेही काही असू शकेल. अवधानी आडनाव लावणारे लोक कोण? मूळचे कुठे वसले आहेत यावरून अधिक माहिती काढता येईल. असो. ही केवळ एक शक्यता.
मल्टीटसस्कींग
एकाच वेळी आठ प्रकारचे अवधान (भान) असणारा तो अष्टावधानी असे सर्वश्रुत आहे पण ही आठ अवधाने नेमकी कोणती हे काही समजल नाही बुवा!
मल्टीटास्किंग म्हणजे बहुअवधानी म्हणता येईल का?
प्रकाश घाटपांडे
अधुनिक काळात
हल्लीच्या काळात, मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपाव, मीमराठी, पुस्तकविश्व, ऐलपैल, लईभारी अशा (आठ अवधाने) आठ संकेतस्थळांवर विविध आयडी घेउन आपल्याच अशा आयडींकरवी आणि इतर अनेकांच्या आयडीकरवी काय काय चालू आहे ह्याचे भान ठेवत चर्चेत सहभागी होण्यास अष्टावधानी म्हणायला हरकत नाही. ;)
टीव्ही साठी चांगली कल्पना
अष्टावधानी असणे या कौशल्यावर एक फक्कड रिऍलिटी शो होऊ शकेल.
चन्द्रशेखर
अवधानम् चा आधुनिक इतिहास
युनिवर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया च्या लीसा मिचेल या संशोधिकेने नुकतेच तेलुगु भाषेतल्या "मातृभाषा" या संकल्पनेवर पुस्तक लिहीले आहे - त्यात अवधानम् चा थोडासा उल्लेख आहे. आधुनिक काळात, निरनिराळ्या तांत्रिक, बौद्धिक व राजकीय बदलांमुळे "भाषा" आणि "स्थानिकता" यांमधल्या परस्पर संबंधांत कसे परिवर्तन होत गेले याचा त्या आढावा घेतात. भाषा या संज्ञेकडे पाहण्याचे ब्रिटिश अधिकारी/मिशनरींनी आणलेले नवीन दृष्टीकोण, त्यातून भाषेचा अभ्यास, साहित्यसंपादन, व भाषिक अस्मितेवर झालेले परिणाम यावर पुस्तकाचा भर आहे. त्या अंतर्गत अवधानमचेही बदलते स्वरूप नजरेस येते.
अवधानम् चा उल्लेख छापखान्यांनी आणलेल्या बदलांच्या संदर्भात आहे. छापखाने आले, आणि लिखित/छापील प्रती तयार करणे रिलेटिव्हली सोपे झाले. पण हा निव्वळ तांत्रिक बदल नसून, परिणामी स्मरणशक्ती व लेखनक्रिया/ लेखन, पठण/वाचन, मौखिक/लिखित दस्तावेज यांच्यामधला परस्पर संबंध ही बदलत गेला असा त्यांचा तर्क आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून स्मरणशक्तीवर आधारित असलेल्या दक्षिण भारतातील ज्ञानसंपादन पदधती लोपास गेल्या.
१९व्या शतकातल्या काही तेलुगु आत्मचरित्रांमध्ये अवधानम् बद्दलचे निरनिराळे उल्लेख आहेत. त्यावरून ही कला मठातल्या गुरु, वा गुरुकुलातल्या काही पंडित मंडळीं, व दरबार, दिवाणखान्यापुरती मर्यादित होती असे दिसते. त्याबाहेर क्वचितच, व काही लोकांत त्याचा भुताटकीचा प्रकार असाही लौकीक होता. पण हळूहळू, या वर्तुळांतून नवीन सार्वजनिक स्थळात अवधानम् ने प्रवेश केला, व २०व्या शतकाच्या पूर्वार्धात त्याला नवीन, भरभरून प्रतिसाद मिळू लागला. इन् फॅक्ट्, "प्रदर्शन" हे त्याचे नवेच रूप होते असे मिचेल सांगतात - आधीच्या सीमित जागेतचे त्याचे देव-घेवाचे, बौद्धिक, शैक्षणिक स्वरूप आता मोठ्या (बहुतेक पॅसिव्ह्) प्रेक्षकजमावापुढे होऊ लागले. स्मरणशक्तीवर आधारित ज्ञानसंपादनाच्या जगात, विशिष्ट संदर्भ असलेल्या एका प्रथेचं, नवीन काळात, नवीन संदर्भात करमणूक म्हणून पुन्हा पुढे आले, असे त्यांचे म्हणणे आहे. पाश्चात्य पद्धतीत शिक्षण घेतलेल्या नवीन अभिजात वर्गाचे अवधानम् चे शैक्षणिक संदर्भ तुटले असले तरी "आपली संस्कृती" या सदराखाली त्याचे नव्याने स्वागत झाले.
अवधानम् सारखेच, सामुहिक स्थळात रचल्या जाणार्या "चाटू" कवितांचाही काहीसा असाच इतिहास आहे, असे विख्यात तेलुगु साहित्याचे अभ्यासक वेलुचेरु नारायण राव यांनी दाखवले आहे. चाटू कवितांत भाग घेणे हे स्मरणशक्ती वाढवण्याचे, भाषा कशी वापरावी, कविता रचना शिकण्याचे साधन होते - ते आता उखाण्यांसारखे सांस्कृतिक करमणूक, "तेलुगु अस्मिते" च्या "कल्चरल कंसंप्शन" मधे मोडते.
(पुस्तक सध्या समोर नाही, त्यामुळे काही तपशील चुकले असल्यास चुभुदयाघ्या.)
धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुमच्या प्रतिसादातून माहिती मिळाली.
याच विशयावरील एका प्रतिसादामधून इथे माहिती मिळाली होती.
अवधानाचे प्रकार
तो दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. मिचेलचे पुस्तक शोधून काढले, आणि दुव्यावर दिलेल्या यादी सारखीच एका आत्मचरित्रातील यादी मिचेल देतात. त्यात थोडे साम्य आहे.
हे आत्मचरित्र कंडुकूरी विरेशलिंगम् यांचे आहे (तेलुगु भाषेतले पहिले आधुनिक आत्मचरित्र असा त्याचा लौकिक आहे). विरेशलिंगम् यांना स्वत: ही कला अवगत होती, व खाजगी महफिल वगैरेंमध्ये कार्यक्रम करीत. त्यांनी दिलेल्या यादीनुसार ही अवधाने कार्यक्रमात असत:
(मिचेल यांनी केलेल्या वीरेशलिंगम यांच्या तेलुगु कथानकाच्या इंग्रजी अनुवादावरून् मी हा गोषवारा मराठीत देत आहे - विषय लक्षात घेता या "द्राविडी" प्राणायामाकडे थोडे दुर्लक्ष करावे!)
१. पद्यरचना: दहा जणांनी सांगितलेल्या विषयावर, व छंदामध्ये दहा पदे रचणे
२. "व्यस्ताक्षरी" (हा मूळ संहितेतलाच शब्द आहे) - ३२-३२ अक्षरांचे दोन परिच्छेद, एक तेलुगूत, व एक संस्कृत मध्ये एका कागदांवर लिहून ठेवली जात. प्रत्येक अक्षराला आकडा दिला जात असे. मग त्या कागदाचे तुकडे करून, दुसरे अवधान चालू असताना एकेक अक्षर फक्त वेळोवेळी विरेशलिंगमांना दाखविले जात. मनातल्या मनात ते परिच्छेद गूंफून शेवटी म्हणूण दाखवण्याचे काम त्यांचे.
३. "निषेधाक्षरी" ("): प्रत्येक ओळीत एक अक्षर निषिद्ध असलेले वगळून पद्यरचना करणे.
४. "समस्या पूरणम् ("): एखादी समस्या दर्शवणारी ओळ घेऊन पद्यरचना करणे (?)
५, ६, ७: बुद्धीबळाचा डाव्, पत्त्यांचा खेळ, व एका विषयावर व्यवस्थित, अर्थपूर्ण चर्चा एकाच वेळेस करणे.
८. वरचे सगळे करत असताना, पाठीवर किती फुलांचा वर्षाव होतो आहे, हे मोजणे.
दुर्दैवाने, विरेशलिंगमांनाच पुढे ही कला "फावल्या वेळातील निरुपयोगी करमणूक" वाटू लागल्याने त्यांनी कार्यक्रम बंद केले, असे चरित्रात पुढे नमूद केलेले आहे. मिचेल यांच्या मते, "आधुनिक" कार्यांमध्ये - समाज सुधारणा, आधुनिक शिक्षण, छापखान्याचा व्यवसाय, इ. - या सगळ्यामध्ये गुंतल्याने, अवधानम् त्यांना निरर्थक व निरुपयोगी वाटू लागले, यात नवल नाही.
संदर्भः लीसा मिचेल, लँग्वेज, इमोशन अँड् पॉलिटिक्स इन् साउथ इंडिया: द मेकिंग ऑफ अ मदर टंग, इंडियाना युनिवर्सिटी प्रेस्, २००९, पाने - १४६-१५४. वरील यादी पान १४७ वर आहे.
पुणे, कोल्हापूर
रोचना यांच्या विस्तृत प्रतिसादानंतर अवधानांबद्दल बरीच माहिती मिळाली. मनोगतावरील प्रतिसादात म्हटले आहे की प्रतिसादकर्त्याने अवधानांचे प्रयोग पुणे-कोल्हापूर येथे पाहिले आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रातही हे प्रयोग मराठीत होतात असे मानण्यास जागा आहे का? याबद्दल अधिक माहिती मिळाली तर बरे होईल.
आजही
सुप्रसिद्ध अवधानींबाबत येथे अधिक माहिती मिळू शकेल, आजही असे अवधानी हयात आहेत असे दिसते. उदा. डॉ. आर.के. प्रसाद, डॉ. शंकर राजारामन इ.
अवधानी
आमच्या नात्यात अवधानी आडनाव लावणारे अनेक आहेत, पण सगळे उत्तर कर्नाटकातले. बहुतेक वैदिक घराण्यातले. कधीकाळी कोणी अष्टावधानी होऊन गेला, व त्यावरून हे आडनाव पडले का, हे माहित नाही (सध्या तरी तसे पांडित्य गाठलेले कोणी नाही :-)).
अवधानम् चा प्रथम उल्लेख १२व्या शतकातल्या एका कानडी संहितेत आढळतो असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. पण हा आज "तेलुगु" प्रकारच का होऊन बसला आहे, या बद्दल मात्र मिचेल यांचे पुस्तक काही सांगत नाही.
अष्टावधानी, गोंधळी, पिंगळा
श्री.कोल्हटकर यांचा लेख आणि रोचना यांचा सविस्तर प्रतिसाद वाचल्यावर "अवधानी" वा "अष्टावधानी" हा प्रकार म्हणजे आपल्याकडील "गोंधळी" प्रकार असावा अशी शक्यता वाटते. हैद्राबाद/विजयवाडा येथे नोकरीनिमित्य असणार्या माझ्या भाच्याकडून तिथे असे अवधानम चे जाहीर कार्यक्रम होत असून थिएटरमध्ये ते पाहण्यासाठी गर्दी करणार्यांची संख्याही कमी नाही असे त्याच्या वृत्तांतावरून तरी दिसते. आत्ता आठवते ते त्याने अशा एका कार्यक्रमाला लावलेली हजेरी आणि त्याचा एका मेलमध्ये केलेला उल्लेख. नागा शांती स्वरूपा (प्रथम नाम विसरलो) या दोन बहिणीनी या क्षेत्रात आंध्रामध्ये खूप प्रसिद्धी मिळविली असून केवळ तालवाद्य, शिट्टी, टाळ्या, घंटानादम् आदी माध्यमाद्वारे निर्मित होणार्या आवाजावरून 'पृच्छका' च्या भावनांना या बहिणी अचूक प्रतिसाद (आणि तोही हसतखेळत वातावरणात) देतात आणि सभागृहाची वाहवा मिळवितात.
आपल्या राज्यात "गोंधळी" नावाची जमातीत् [जी शासनदरबारी एस्.टी.कॅटेगरीमध्ये मोडली जाते] असे अष्टावधानाचे प्रयोग करीत असे. यजमानाच्या दारात दोघे उभे राहत आणि सध्याच्या पिढीतील मुलांच्या कल्याणाप्रित्यर्थ 'जागर' करण्याचा कार्यक्रम इतर निवासी लोकांच्या समोर सादर करीत असत. म्हणजे गोंधळ्यांची दुसरी टीम् बैलाला घेऊन् रस्त्यावर् दूर उभी आणि प्रमुख यजमानाच्या दारात. ज्या मुलाच्या नावाने यल्लमाच्या पुढे दुवा मागायचा असतो त्याचे नाव बोटांच्या खुणाद्वारे रस्त्यावर उभे असलेल्या साथिदाराकडे 'रीले' केले जाई, मग ते अष्टावधानी त्या खुणा पाहून (नागा शांतीसम) त्या मुलाचे नाव आपल्या देवी आवाहनात गुंफत असत. याही लोकांची स्मरणशक्ती वाखाणण्यासारखी असे. वर्षातून एकदाच आळीत येऊनसुद्धा घरातील प्रत्येकाची नावे आणि शरीरवैशिष्ट्यही ते लक्षात ठेवत असत.
मला वाटते 'वासुदेवी पिंगळा' हाही यातीलच एक प्रकार असावा.
अनुभव
हा अनुभव एकदा घेतला आहे. तुमची बरीच वैयक्तिक माहिती सुद्धा या लोकांकडे असते, हे कसे हे मला ठामपणे अजूनही कळलेले नाही.
-Nile
शब्द व त्यांचे अर्थ
हा प्रतिसाद मुळ प्रस्तावाशी संबंधित नाही. तरीपण, एका शब्दांतून दुसरे शब्द कसे बनत जातात, हे सांगण्याचा एक प्रयत्न.
अवध = मनोव्यापारातील असा एक स्तब्ध व थिजलेला क्शण जो 'सद्य घटका व येऊ घातलेली घटका' यामधील एक कालखंड व्यक्त करतो.
अवधी = दोन क्शणामधील एक कालखंड
अवधान = ध्यानमग्न अवस्था
स+ अवध = सावध = अमूक एक कालखंडातील जागरूक अवस्था
अवधानी = ध्यानमग्न अवस्था प्राप्त करणारी व्यक्ती
सावधानी = ह्या शब्दाचा अर्थ हिंदीत वापरला जातो. मराठीत मात्र 'सावधगिरी' असा बदलून वापरला जातो.
अवधानातील प्रगत अवस्था - प्रावधान ह्या शब्दाचा अर्थ 'प्रोअॅक्टीव होण्यासाठी आवश्यक असलेली दृश्टी' असा होण्या ऐवजी हिंदीत तो इंग्रजीतीला 'प्रोव्हीजन' असा होतो, तर मराठीत हा शब्दच व त्यायोगे ती संकल्पनाच नाही, दृश्टी नाही. (उदा. शिवाजी महाराज प्रावधानी होते. संकट काळात काय घडेल? घडू शकेल हे जाणून घेण्यासाठी ते त्यांच्यात देवी आणण्याची पद्धत अवलंबत असत.)
गंमत म्हणजे इंग्रजीत -
'व्हीजन' म्हणजे 'कल्पनेची दृश्टी' असा होतो, परंतु
'प्रोव्हीजन' म्हणजे 'व्हीजन अहेड'किंवा 'व्हीजन इन अॅडव्हांस' असे न होता,
'सप्लाय' असा होतो.
सवाल जवाब्
तमाशात सवाल जवाब असतात* ते अवधानाचे प्रकार म्हणता येतील का?
*तमाशे आता असतात की नाही याची कल्पना नाही.
नितिन थत्ते
तमाशा
"तमाशात सवाल जवाब असतात..."
~ नाही. तमाशातील 'सवाल जवाब' हा सर्वस्वी वेगळा (जरी आगळा नसला तरी) प्रकार असून तिथे "अवधानी"सम संकेतांना बिलकुल थारा नसतो. मी कोल्हापूरचा असल्याने त्या त्या वयात येथील "लक्ष्मी थिएटर" मध्ये अगदी अस्सल तमासगिरांच्या (आणि गिरीणींच्याही) असल्या सवालजवाबाला हजेरी लावली आहे (अर्थात योग्य ते तिकिट काढूनच). इथे समोरासमोर - कोल्हापुरी भाषेत आमरासमोर - दोन पार्ट्यातील तो 'कूक्ड्' झगडा घडत असल्याने सवयीने आज नेमका काय विषय असेल आणि कोणती सवालजवाबाची मैफल झडेल याचा सवयीने ठोकताळा बांधता येत असे. पण एक करमणूक इतपतच त्याचे महत्व असल्याने (अर्थात हजेरी लावणारे सगळेच वसंत सबनीस लेव्हलचे नसल्याने) नेमका काय प्रकार स्टेजवर चालला आहे, याकडे एका मर्यादेपलिकडे प्रेक्षकही लक्ष देत नसत. शेवटी "मी तमाशाला गेलो" ही एक झिंग अनुभवण्याची असल्याने त्यामागील सादरीकरणाचे गांभीर्यही कुणी मनावर घेत नाही.
आजही तुरळक प्रमाणात तमाशाचे फड (त्यांच्या भाषेत 'फड') होतात, पण ते प्रामुख्याने ग्रामीण भागात जत्रा-म्हाई मोसमात. दुर्दैवाने हल्ली पठडीतील गाण्याऐवजी रेकॉर्डेड हिंदी गाण्यावरच तमाशातील कलाकार् ती सो-कॉल्ड् कला सादर करताना आढळत असल्याने पारंपरिक सवालजवाबांनीही 'राम' म्हटला आहे. आमच्याकडील ते प्रसिद्ध लक्ष्मी थिएटर आता जुगारी लोकांच्या तीन पत्तीची बैठक झाली आहे.
घुंगरू कायमपणे विसावण्याच्या मार्गावर आहे.
मजेदार
जवळपास २० वर्षांपूर्वी मी बघितलेल्या तमाशातही हिंदी गाण्यावरच -- माझ्या आठवणीनुसार 'दिल दिवाना बिन सजना के माने ना' आणि 'धक धक करने लगा'-- कलाकार आपली कला सादर करीत होते. तो फारच मजेदार अनुभव होता.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
धक धक्
"माझ्या आठवणीनुसार 'दिल दिवाना बिन सजना के माने ना' आणि 'धक धक करने लगा'-- कलाकार आपली कला सादर करीत होते."
~ खरंय (दुर्दैवाने). मात्र हे झाले ते बाजारसूत्र "मागणी तसा पुरवठा" या न्यायाने. पारंपारिक तमाशा म्हणजे केवळ शृंगारिक गाणी आणि त्यावर आधारित 'अपीलिंग डान्स' इतपतच व्याख्या घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील साखर सम्राटांनी 'मिळते दोन घटकांची करमणूक तर उधळूया नोटा लता-लंका बारीवर" असे म्हणत मीटिंगला हजर असणार्या संचालकांची मग कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर तशा प्रकारची सोय करण्यात येत असे (आजही हा प्रकार चालू आहे, पण करमणुकीची व्याख्या आणि साधने बदलली आहेत).
इतर अनेक कलांच्याबाबतीत जसे घडते तसेच आणि काळाच्या ओघात राम जोशी, अनंत फंदी, होनाजी बाळा, शाहीर प्रभाकर आणि अगदी अण्णाभाऊ साठे यांच्या रचना मागे पडत गेल्या आणि 'लावणी' च्या नावाखाली तुम्ही म्हणता तसे 'धक धक' स्टेजवर धकधकू लागले आणि आता तर बैठकीच्या लावणीत (हा एक वेगळा विषय होईल) तर 'वाजले की बारा...'च कंपल्सरी आयटम झाला आहे.
सांगितले तर आश्चर्य वाटेल पण आजही इकडच्या ग्रामीण भागात बारीतील मुलीकडे 'हाय क्या करू राम मुझे बुढ्ढा मिल गया' ची फर्मास फर्माईश फेकली जाते आणि ती (नेहमीच्याच तालावर) पुरीही केली जाते. त्या मानाने 'दिल दिवाना' फ्रेश तरी आहे.
गोंधळी/अवधानम्
सहमत.
तसेच मला वाटते, गोंधळी व अवधामम् दोन्हीमध्ये हजरजबाबीपणा, सवाल-जवाब, व करमणुकीचा भाग असला, आणि आजकाल त्यांच्या स्टाइल मध्ये बरेच साम्य दिसून येत असले तरी ऐतिहासिक दृष्ट्या पाहता, त्यांच्या मूळ ध्येयांमध्ये, सामाजिक संदर्भांमध्ये बराच फरक असावा. अवधानम् ही एका सीमित, संस्कृत/भाषा/साहित्य यात शिक्षण मिळविलेल्यांसाठी एक उच्च पातळी गाठायचे, व गाठल्यावर ते दर्शवायचे साधन होते. यात स्मरणशक्ती, पाठांतर, मनातल्या-मनात गणित, कविता रचणे या कलांचे पोषण करणे, पॉलिश करणे हे सगळे होत असे - थोडक्यात, कुठले ही बाह्य, कृत्रिम साधन न वापरता स्मरणशक्तीचे व मानसिक लौचिकतेचे प्रदर्शन. यातून करमणूक होत असली तर ते सोन्याहून पिवळे, पण अवधानम् मध्ये भाग घेणे वा सादर करणे सर्वात आधी मानसिक व्यायाम असावा असा माझा तरी अंदाज आहे.
या उलट, गोंधळी बर्याच प्रमाणात हेच स्किल्स् वापरत असले, तरी त्यांचा प्रथम करमणूकी साठी, आणि येजमानांच्या, व प्रेक्षकांच्या आनंदासाठी वापर होत असे. मग त्यात सवाल जवाबांचा हजरजबाबीपणा आला, आणि पोवाडे पाठ करून आयत्या वेळी एका सरदाराच्या घराण्याचा इतिहास सुरळीतपणे त्याच पोवाड्यात गुंफणे हे ही आले. आणि गोंधळ हा सामुदायिक प्रकार आहे - अवधानम् एका माणसाला एकाच वेळी किती चेंडू झेलता येतील याची परीक्षा असे. कुठलेही फॉर्मल शिक्शण न घेता (पाठशालात संस्कृत शिकणार्यांना स्मरणशक्ती वाढविण्यासाठी मिळायचे तसे) गोंधळी हे मौखिक ज्ञान/द्स्तावेज तयार करून पिढ्यांपिढ्या जपून ठेवत, ही बाब मात्र ग्रेट आहे.
अर्थात, आज अवधानम् देखील एक करमणूकच आहे, हे पटले.
स्मरणशक्ती
"कुठलेही फॉर्मल शिक्शण न घेता (पाठशालात संस्कृत शिकणार्यांना स्मरणशक्ती वाढविण्यासाठी मिळायचे तसे) गोंधळी हे मौखिक ज्ञान/द्स्तावेज तयार करून पिढ्यांपिढ्या जपून ठेवत, ही बाब मात्र ग्रेट आहे..."
~ १००% सहमत. असाच प्रकार "हळबी" नावाच्या एका भटक्या जमातीत सापडतो. हे लोक गावातील लोकांच्या घराण्याच्या चढउताराचा, पिढीचा, जमीनजुमल्यांचा, शेतीवाडीचा [इतकेच काय अमुक एकाने अमुक एका वर्षी कोणते उत्पादन शेतात घेतले] इत्थंभूत हिशोबठिशोब ठेवीत. हे करण्यासाठी त्याना त्या त्या जमिनीच्या मालकाने "असाईन्" केलेलेच असते असे नाही. जमातीचा मुखिया आपल्या पोरांना 'तू अमुक एका गल्लीकडे बघ" अशी सूचना देई, म्हणजे ती स्वीकारणारा पुढील कार्यवाही करण्यास सुरू करे. तो एक प्रघात अगदी ब्रिटिशांच्या काळापासून ते ते गाव जपत आले होते. म्हणजे घरातील कर्ता मागील लोकांबाबत काही ठोस तरतूद न करताच स्वर्गवासी झाला आणि मग जमीन वाटपाचे खटले सख्ख्या आणि चुलतभावंडात उपटले तर गावकामगार पाटील या हळब्या लोकांच्या पोतडीतील नोंदीवर विश्वास ठेवीत आणि त्या नुसार न्यायनिवाडा. बहुतांशी प्रसंगी तसे निर्णय दोन्ही पक्षी मान्य होत असत अन् मग त्याच्या बदल्यात त्या हळब्याला वर्षभराचा शिधाही त्या त्या कुटुंबाकडून दिला जाई. अर्थात वाद राहिलाच तर मग नाईलजास्तव ते ठरलेले नित्याचे कोर्टकचेर्यांचे झेंगट उभे राही आणि मग 'दे तारीख पे तारीख' या घोषावर तीच नव्हे तर पुढील पिढीही अक्षरशः भिकेला लागे.
स्मरणशक्तीचा विषय निघाला म्हणून हा प्रतिसाद. वर रोचना म्हणतात त्याप्रमाणे या हळब्यांनीही कुठे फॉर्मल शिक्षण घेतलेले नसते. पण अगदी लहाणपणी पाहिलेल्या एखाद्या "बाळ्या"स तो मुंबईला जाऊन "बाळासाहेब" बनला तरी म्हाईला परतल्यावर हेच हेळबी त्याला लागलीच ओळखत आणि त्याच्याबरोबर नोकरीनिमित्य मुंबईला गेलेल्या अन्य बाब्यांची नावानिशी चौकशीही करीत.
काळाच्या ओघात आता ही स्मरणशक्तीची उदाहरणे हळुहळू अस्तंगत होत चालली आहेत याचा विषाद नक्कीच वाटतो.
हळबी
हळबे हे आडनाव ऐकले होते, पण हळबी या जमातीबद्दल प्रथमच वाचायला मिळाले. त्यांची ही माहिती/ हिशोब नोंदवण्याची पद्धत संपूर्ण पणे मौखिक होती का? एकूण लेखनक्रिया, कारकूनांच्या दैनंदिन कामकाजाच्या प्रथा, प्रशासकीय माहिती गोळा करणे, लिखित/मौखिक ज्ञानाचे परस्पर संबंध इ. मध्ये मला रस आहे, त्यामुळे या जमातीच्या इतिहासाबद्दल अधिक वाचायला आवडेल.
आपली चर्चा मूळ प्रस्तावापासून लांब जात आहे हे खरे, पण जमीनजुमल्यांचा नोंदीवरून्, आणि स्मरणशक्तीच्या उल्लेखांवरून आठवले:
तामिळ नाडूच्या रयतवारी प्रशासन स्थापन करण्यात आले, तेव्हा स्थानिक कारकूनांमध्ये आणि ब्रिटिश अधिकार्यांमध्ये बरेच वाद उठले. स्थानिक तेहसिलदार व कणकुपिळ्ळै (कुलकर्णी) यांच्या कडून प्रचलित असलेल्या करवसुलीच्या पद्धतींबद्दल माहिती अधिकार्यांना हवी होती, पण कणकुपिळ्ळैंवर अधिकार्यांचा विशेष संशयही होता. याचे कारण कणकुपिळ्ळै सगळी माहिती लिहून ठेवीत नसत - पाठांतरावर व स्मरणशक्तीवर जास्त भर देत असत, आणि पाम लीफ वर मोजके लिखाण त्याला मदत म्हणून असे. तेहसीलदार सहा महिन्यांनी वा वर्षानंतर आला, की करवसूलीच्या माहितीचे पठण करावे लागायचे. मोजकेच लिहीणारे, व प्रश्न विचारल्यास मनातल्या मनात गणित सोडवून महिती देणारे कारकून ब्रिटिश अधिकार्यांना भ्रष्ट व अविश्वासू वाटू लागले. वसूली व जमीनीची करवसूलीची क्षमता हे स्थानिक अधिकारी कमी करून सांगतात असे त्यांना वाटत. करवसूली व प्रशासन जास्त पारदर्शक करण्यासाठी अखंड रेकॉर्ड लि़हून काढायला हवा म्हणून मग अनेक बदल आणले. तपशीलवार कागदी लेखनाचे, व वसूलीच्या गणिताच्या नोंदीचे नवीन नियम अमलात आले. इथे देखील लिखित / मौखिक पद्धतींमधले संबंध बदलत गेले.
ही झाली तामिळनाडूतली गोष्ट - पण आपल्याकडे, मुंबई इलाक्यात व एकूण महाराष्ट्रात, अशी प्रशासकीय माहिती मौखिक रूपात जपून ठेवणे ब्रिटिश प्रशासनात सुद्धा होती का, या वर अधिक वाचायला आवडेल.
हेळवी
या जमातीचे नाव 'हेळवी' असे ऐकलेले आहे. (हळबी हा कानडी उच्चार असू शकेल.)
थोडेसे हटके
@ रोचना आणि श्री.विसुनाना
~ रोचना आपल्या प्रतिसादात म्हणतात त्याप्रमाणे हे काहीसे विषयांतर होणार आहे, पण आता उपविषय या नात्याने यावर सविस्तर लिहितो, इथेच. आशा आहे की, श्री.कोल्हटकर यांच्या मुख्य विषयाला ढाक लागणार नाही.
"हळबी, हळबा, हळबे, हळवी, हेळवी" ही रूपे त्या त्या राज्यातील (आन्ध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, महाराष्ट्र आदी) मूळ परिस्थितीनुसार रूजली आहेत. भारत सरकारच्या "कास्ट कॉम्पोडीअम" मध्ये सर्व मौखिक उच्चार त्या त्या वेळेच्या सेन्ससला अनुलक्षून् नोंदविले गेले आहेत. हिंदी/मराठीतील "श" से दक्षिण भारतात 'स' केले जाते. उदा. शिवाजी, सुभाषचे स्पेलिंग आपण Shivaji Subhash असे करतो तर दक्षिणेत Sivaji Subhas असे केले जाते तद्ववतच शेड्यूल्ड ट्राईबमधील आपल्याकडीलच "वंजारा" जमात उत्तरेत "बंजारा" बनते. [यावर अगदी "जात पडताळणी प्रमाणपत्र प्रदान" अंतर्गत सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस लढल्या जात आहेत. फार किचकट आहे ही सारी जात/जमात निश्चितीची प्रक्रिया...वेळखाऊ आणि पैसेखाऊदेखील]. त्यामुळे 'हळबा' म्हटले काय किंवा "हळवा, हेळवी" म्हटले काय, ती सर्व रूपे भारत सरकारच्या एस्.टी. कॅटेगरी अंतर्गत समाविष्ठ झाली असून त्या सर्व उपगटाना त्यांच्यासाठी सरकारी कोट्यातील आरक्षण मिळते. अगदी "अॅबओरिजिन्" सम यांची स्थिती असून [किंवा होती असे म्हणू या] आपल्या राज्यातील (१) अमरावतीच्या मेळघाट तालुक्यात (२) चंद्र्पूर जिल्ह्यातील सिरोंचा तालुका तसेच गडचिरोलीतील दुर्गम भाग (३) केळापूर, वाणी हे दोन यवतमाळ जिल्ह्यातील दोन तालुके, इथे समस्त हळबे/हळवे विखुरले होते. १९७१ च्या राज्य खानेसुमारीमध्ये काही अंशी भंडारा जिल्ह्यातही यांच्या वसाहती आढळल्या. बिहार राज्यातून छ्त्तीसगड अलिकडे वेगळा झाला, पण हाच भाग तसेच आंध्र प्रदेश आणि ओरिसाच्या किनारपट्टीलगतच्या काही प्रांतात तुरळक प्रमाणावर हळब्यांच्या वस्त्या आजही आहेत. "डायलेक्ट" देखील उडिया, छत्तीसगडी आणि मराठी या तिन्हीचे मिश्रण आहे. भंडार्यामध्ये मराठीचे वर्चस्व जाणवत असे, पण बस्तर जिल्ह्यातील बोलीवर तुळूचा प्रभाव होताच. पण कुठेही स्वतंत्र लिपी अर्थातच नाही, ज्या राज्यात वस्ती तेथील बोलीभाषा फार चटकन आत्मसात करतात (किंवा करत असत) अशी ख्याती. स्मरणशक्ती जबरदस्त असल्याने गावचा गोतावळा मौखिक स्वरूपात सदैव समोर ठेवीत असत. लिखावट (बहुतेक) मोडी असणार. मला एकदा एका हळब्याकडे त्याची पोतडी पाहावयास मिळाली होती. साधारणतः पूर्वीचे दिवाणजी हिशोबासाठी वापरत तसल्या लाल कापड बांधणीच्या त्या जाडसर वह्या असत. बोरू तर पाहिलाच होता; पण लिखावट काही केल्या लक्षात येईना. तो हळबा एका भाषेचे किंवा लिपीचे नाव घेत होता...साधारणतः "च" "छ" किंवा 'च्ज्' असा उच्चार येत होता. अक्षर मात्र होते अगदी टपोरे. शाई अर्थातच दाट काळी. ती पोतडीही त्याच्याकडे त्याच्या आजोबापासून चालत आली होती. [तारीख किंवा तारखेची कसलीही निशाणी मला कुठेच आढळली नाही.]
गोतावळा आणि वंशावळीच्या "अप-टु-डेट" माहितीसाठी ते [अर्थातच] सुगीच्या दिवसात त्या त्या गावी जमा होत. सारे एकाच जिल्ह्यात फिरत असेही नाही. तुकड्यातुकड्याने भटकंती असे. गावातील सर्व माहिती यजमानासमोरच नोंदवित...अन् तेही अगदी हसतखेळत, आता हायस्कूलला जाणार्या पोराला 'तुला रांगत होतास त्यावेळेपासून पाहतोय मी..." मग त्याच्या विधानाला घरातील आजीचा दुजोरा. इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी झाल्या की आणलेल्या धोतरात यजमान देईल तो शिधा घेऊन 'येतो म्होरच्या मोसमात' असे म्हणून तिथून पुढच्या गल्लीत जाणे.
माझ्या माहितीप्रमाणे, किंवा वर म्हटल्याप्रमाणे "वादा"च्या वेळी यांच्या पोतडीतील नोंदी - ज्या मोठ्या आवाजात खुद्द हेळवीच पंचांसमोर वाची - ग्राह्य मानल्या जाण्याचा प्रघात होता आणि ज्याच्या म्हणण्याविरूद्ध ती नोंद गेली असेल तोही ती मुकाट्याने मान्य करी. पण साधारणतः १९६९ च्या बॅन्क् राष्ट्रीकरणानंतर तसेच १९७१ च्या 'राजेराजवड्यांचे तनखे बंद' या दोन देशव्यापी घटनांनंतर सर्वसामान्य जनतेला कायदे म्हणजे काय आणि त्याचा नेमका सर्वसाधारण जनतेवर काय परिणाम होतो, याचा अंधुकसा का होईना अंदाज येऊ लागला आणि मग ही जुनी व पारंपारिक 'रेकॉर्ड् कीपिंग् सिस्टीम्" ही विरळ होत गेली कारण नव्या दमाचा ग्रामयुवक त्यासाठी शहरात जाऊन वकिलामार्फत जमिनीची केस लढविणे महत्वाचे मानू लागला. असो.
"अवधान" परंपरेत तुळू पट्ट्यात हे हळवी येत असल्याने धाग्याच्या अनुषंगाने हे लेखन केले आहे असे कृपया मानावे.
धन्यवाद!
विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
स्टार माझा न्यूज फीचर
'स्टार माझा' वाहिनीवरून १६ मे २०११:
***
शेकडो घरांचा चालताबोलता इतिहास
कुटुंबाचा आणि घराण्याचा चालता बोलता इतिहास म्हणजे हेळवी. बरा बलूतेदारमधला हा प्रकार आता कमी होत चालला आहे. तरीही ग्रामीण भागात अध्याप हेळवी मनाच्या स्थानावर आहेत. तुमच्या कित्येक पिढ्यांचा इतिहास जतन करण्याचे काम हा पिढ्यान पिढ्या करत असतो.
आयुष्याची वाट अनावाणी तुडवणारा हा अवलिया आहे हेळवी. आपल्या परिवाराचा त्याग करून लोकांच्या परिवाराची, वंशावळीची खडानखडा माहिती ठेवणारा. म्हणजेच शेकडो घरांचा चालताबोलता इतिहास! 100, 200 नव्हे तर तब्बल 1300 वर्षांचा!
तुमच्या पूर्वजांचा इतिहास, त्यांचं मूळ नाव, ते कुठून कुठे गेले, त्यांच्या वंशावळीची नावं, नव्या पिढीची नावं ही त्यांच्या या कळकटमळकट पण तितक्याच महत्त्वाच्या वहीत नोंद आहेत. कागवाडचे हे हेळवी सांगली जिल्ह्यातल्या अनेक गावात दर तीन वर्षांनी येतात. पण कोणत्याही अपेक्षेविना हे विशेष!
इतिहासाच्या या मित्राच्या आगमनानं घरातलं वातारण भारून जातं. असं वाटतं जणू आपले पूर्वजच घरी आले.
वर्षा दीड वर्षात एखाद्या दिवशी येणाऱ्या हेळव्यांची आपण आतुरतेनं वाट पाहतो. पण सध्या या हेळवींची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइपत कमी झालीये. बाळू हेळवी ही परंपरा जतन करीत आहेत. पण पुढे या परंपरेचं काय होणार? आणि हा ऐतिहासिक दस्तऐवज स्वतःच इतिहासजमा होणार?
***
महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील (नरसोबावाडी जवळच्या) कागवाड गावात अजूनही हेळवी आहेत असे दिसते.
रावण
"म्हणजेच शेकडो घरांचा चालताबोलता इतिहास! 100, 200 नव्हे तर तब्बल 1300 वर्षांचा!"
~ या मताला [सकारण] दुजोरा देत आहे.
आमच्या मराठा समाजात ९६ कुळी घराणे नावाचा एक प्रकार आहे. लग्नाच्यावेळी दोन्ही पक्षाकडील वंशावळीचा अक्षरशः किस काढला जातो. अमुक एकाचा पदर तमुक एका घरात जुळला आहे की, जुळला असल्यास ज्याच्याबरोबर जुळला ते घराणे ९६ कुळी आहे का...वगैरे वगैरे. अर्थात ह्या गोष्टींची महता अलीअलीकडे जरी कमी होत चालली असली तरी विशेषतः 'मुली' कडील स्वत:ला सरदार समजणारी इकडची काही घराणी होणारा जावई आपल्याला हवा त्याच कुळातील आहे का याची तपासणी अन्य कोणत्याही डॉक्युमेन्टेशनपेक्षा या "हेळव्या" कडून करून घेतात.
गेल्या वर्षी माझ्या परिचयातील एका मराठा युवकाचा विवाह अशाच सो-कॉल्ड ९६ कुळीतील मुलीशी होण्याचे घाटत होते. या मुलाचे आडनाव 'रावण' [कोल्हापूर, सातारा भागातील मराठ्यांत हे आडनाव आहे]. 'घोरपडे' घराण्यातील मुलीकडील ज्येष्ठांना 'रावण' आडनाव आपल्या पदरातील आहे याचा विश्वास बसला नाही, आणि मुलगा तर शिक्षण, रुप, नोकरी, भविष्य आदी आघाड्यावर पसंद पडण्यासारखाच असल्याने, त्यानी मग रावण घराण्याला ओळखत असलेल्या कर्नाटकातील अथणी परिसरातील एका हळव्याला गाठले. त्याच्याकडे योग्य ते दप्तर होतेच. 'रावणां' च्या मग अगदी इ.स्. १६०० पर्यन्तच्या पिढीच्या कबरींची खुदाई करण्यात आली. मग एका ठिकाणी नोंद सापडली की, रावण घराणे हे मूळचे नाशिकमधील 'देशमुख' - मराठा सरदार घराणे. १६७७ मध्ये झालेल्या वाताहतीमध्ये त्या घराण्याची काही शकले होऊन त्यातील् एक कोल्हापुरात येऊन राहिले तर दुसरे कोकणात गेले. आता कोल्हापुरकराने 'रावण' नाव घेण्याबाबतचा उल्लेख त्या दप्तरी सापडले नाहीत, मात्र घोरपडे घराण्याचे समाधान झाले होते. आणि मग त्या हेळव्याला रितसर बिदागी देण्यात आली व पुढे अन्य बाबींच्या तपशीलाबाबत जादा देवाणघेवाण न होता 'रावण-घोरपडे' विवाह धुमधडाक्यात पार पडलाही.
सांगायचा मुद्दा हा की, जरी जमीनजुमल्याच्या वादासंदर्भात आज जरी हळव्यांच्या साक्षी ग्राह्य मानल्या जात नसल्या तरी रोटीबेटी व्यवहारामध्ये त्याना 'मानाचे पान' दिले जाते.
"महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील (नरसोबावाडी जवळच्या) कागवाड गावात अजूनही हेळवी आहेत असे दिसते."
कागवाड, अथणी, मंगसुळी, हिटणी आणि ऐणापूर या भागात आजही यांच्या वस्त्या आहेत.
सवाल जवाब्
तमाशात सवाल जवाब असतात* ते अवधानाचे प्रकार म्हणता येतील का?
*तमाशे आता असतात की नाही याची कल्पना नाही.
नितिन थत्ते
माहितीपूर्ण
चर्चा आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.
अवधानाशी दुरूनच संबंध असावा, पण पूर्वी भारतातील मौखिक परंपरेमध्ये पाठांतराची अशी एक विशिष्ट पद्धत होती याची आठवण झाली. स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा वाढवण्यासाठी वापर होत असावा.
पाठांतराचे श्लोक उलटे सुलटे कसेही पाठ केले जात असे वाचले आहे. येथे अष्टाध्यायी पाठ कसे करतात याबद्दलचे वर्णन वाचायला मिळेल. http://narayan-prasad.blogspot.com/2010/08/9.html येथे (१.३) पहा.