बुद्धिदाता

बुद्धिदाता
"माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे असे म्हणतात.याचा अर्थ प्रत्येक माणसाला बुद्धी असतेच असा घ्यायचा का?"
.
" विधान परिपूर्ण करण्याकरिता म्हणता येईल की ’ जी व्यक्ती मतिमंद नाही, काही विशिष्ट मनोविकारांनी ग्रस्त नाही,जिचा शैशवकाळ (दोलाकाल) संपला आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला बुद्धी असते.मात्र बुद्धीची जी सहा अंगे( भाग) आहेत त्यांतील सर्वच प्रत्येक व्यक्तीत असतील असे नाही."

"बुद्धीची सहा अंगे? कोणती ती?"
.
"स्मरणशक्ती,तर्कशक्ती,कल्पनाशक्ती,प्रतिभाशक्ती ,अंत:स्फुरणशक्ती आणि विवेकशक्ती ही माणसाच्या बुद्धीची षडंगे होत.यांतील पहिली तीन प्रत्येक माणसात कमी-अधिक प्रमाणात असतात,अशी माझी समजूत आहे"
.
"मानव सोडून अन्य सजीवांत कुणाला बुद्धी असते का?"

.
"काही मानवेतर प्राण्यांना काही प्रमाणात स्मरणशक्ती असते.बुद्धीची अन्य अंगे त्यांच्यात नसतात."
.
"ही बुद्धी माणसाला कशी प्राप्त झाली ? कोणी दिली?"
.
"तुमची स्वत:ची याविषयी काय धारणा आहे?"
.
"बुद्धी ही गोष्ट इतकी विलक्षण आहे की माणसाला ती आपोआप मिळाली नसावी.ती माणसाला मिळालेली ईश्वरी देणगी आहे असे मला वाटते.गणपतीला बुद्धिदाता म्हणतातच."
.
"मग देवाने माणसालाच का बुद्धी दिली? इतर प्राण्यांना का नाही? दहा-बारा हजार वर्षांपूर्वी माणूस गुहेत राहात होता.आज तो सुखसुविधापूर्ण आधुनिक घरात राहातो.लक्षावधी वर्षांपूर्वी कोळी जाळे विणत होता.आज तो त्याचप्रकारचे जाळे विणतो.बुद्धी असणे आणि नसणे यांतील हा भेद आहे.ते असो.माझा प्रश्न योग्य नाही.मी तो मागे घेतो."
.
"म्हणजे देवाने माणसालाच बुद्धी का दिली हा प्रश्न?"
.
"हो.पण ईश्वर बुद्धिदाता आहे असे गृहीत धरले तर एक तार्किक विसंगती निर्माण होते.त्यामुळे ते गृहीतक खोटे आहे असे सिद्ध होते.किंबहुना ईश्वराचे अस्तित्व नाकारावे लागते."
.
"ती विसंगती कोणती?"
.
"ईश्वराचे अस्तित्व पूर्णतया नाकारून चांगले सुखा-समाधानाचे,आनंदाचे, सौहार्दपूर्ण, समृद्ध जीवन जगणारे अनेक नास्तिक लोक आज आहेत.पूर्वीही होते.हे तुम्ही जाणताच."
.
"हो. अल्प स्वल्प प्रमाणात का होईना नास्तिकवाद पुरातन काळापासून अस्तित्वात आहे असे वाचले आहे."
.
"देव सर्वांचा बुद्धिदाता आहे ना? नास्तिकांना त्यानेच बुद्धी दिली आहे ना?"
.
"हो"
.
"देवाचे अस्तित्व खरे मानू नये अशी बुद्धी नास्तिकांना कोण देतो ? सर्वांचा बुद्धिदाता जर देव आहे तर कुणालाच देव नाकारण्याची बुद्धी होता नये.तशी होणे तर्कविसंगत आहे.तर तशी होते ही वस्तुस्थिती आहे."
.
"अहो,स्वत:च्या आई-वडिलांना मानू नये त्यांना घरातून बाहेर काढावे अशी बुद्धी काही मुलांना होतेच ना?"
.
"तुमचा युक्तिवाद चुकतो आहे.आई-वडील मुलाचे जन्मदाते असतात. बुद्धिदाते नव्हेत."
.
"देवाची करणी अतर्क्य असते.तो नास्तिकांना अशी बुद्धी का देतो हे आपल्याला समजणार नाही. त्यामागे त्याची काही सुबुद्ध योजना असेल."
.
"हे असले बोलणे अपेक्षितच होते.समजून घेऊ नये अशी इच्छा असेल तर काही समजणार नाही. माणसाला बुद्धी मिळाली ती उत्क्रांतीतून. त्याच्या जैविक पूर्वजांकडून. हळू हळू ती विकसित झाली."
.
"यावर काही प्रतिउत्तर असेल.मला ते आता सुचत नाही.विचार करून पुन्हा चर्चेला येईन."
.
"अवश्य यावे.स्वागत आहे."

लेखनविषय: दुवे:

Comments

कर्मसिद्धांत

गतजन्मातील पुण्यामुळे या जन्मात बुद्धी मिळाली असू शकेलच ना?

:)

शक्य.

(अजी म्या ब्रह्म पाहिले) :प

@यनावाला

"ईश्वराचे अस्तित्व पूर्णतया नाकारून चांगले सुखा-समाधानाचे,आनंदाचे, सौहार्दपूर्ण, समृद्ध जीवन जगणारे अनेक नास्तिक लोक आज आहेत.पूर्वीही होते.हे तुम्ही जाणताच."

तसेच अस्तिक लोक देखिल आहेतच की!

ईश्वराचे अस्तित्व मानलेच पाहिजे असा काही आग्रह नाही.

विसंगतीचे मूळ

> (अजी म्या ब्रह्म पाहिले) :प
हॅहॅहॅ
"Organizing atheists has been compared to herding cats, because they tend to think independently and will not conform to authority." डॉकिन्स

> तसेच अस्तिक लोक देखिल आहेतच की!
"देवाचे अस्तित्व खरे मानू नये अशी बुद्धी नास्तिकांना कोण देतो?" हा प्रश्न देण्यात आलेला आहे. "देवाचे अस्तित्व मानावे अशी बुद्धी आस्तिकांना देवाने दिली" हे चक्रीय विधान आहे आणि त्याच्या आधारे देवाचे अस्तित्व मानण्याचा आग्रह धरता येत नाही. "देवाचे अस्तित्व खरे मानू नये अशी बुद्धी नास्तिकांना कोण देतो?" या प्रश्नाने देवाचे अस्तित्व नाकारण्याचा आग्रह वरील लेखात धरण्यात आलेला आहे असे मला वाटते.

> ईश्वराचे अस्तित्व मानलेच पाहिजे असा काही आग्रह नाही.
तुमचा नसेल, यनावालांच्या बकर्‍याचा असेल.

प्रति:

हॅहॅहॅ
"Organizing atheists has been compared to herding cats, because they tend to think independently and will not conform to authority." डॉकिन्स

the belief that there was nothing and nothing happened to nothing and then nothing magically exploded for no reason creating everything and then a bunch of everything magically rearranged itself for no reason what so ever into self-replicating bits which then turned into dinosaurs. makes perfect sense.

"देवाचे अस्तित्व खरे मानू नये अशी बुद्धी नास्तिकांना कोण देतो?" हा प्रश्न देण्यात आलेला आहे. "देवाचे अस्तित्व मानावे अशी बुद्धी आस्तिकांना देवाने दिली" हे चक्रीय विधान आहे आणि त्याच्या आधारे देवाचे अस्तित्व मानण्याचा आग्रह धरता येत नाही. "देवाचे अस्तित्व खरे मानू नये अशी बुद्धी नास्तिकांना कोण देतो?" या प्रश्नाने देवाचे अस्तित्व नाकारण्याचा आग्रह वरील लेखात धरण्यात आलेला आहे असे मला वाटते.

त्याच अर्थी, देवाचे अस्तित्व मानणारे देखील सुखी असतात असा वाद करून देवाचे अस्तित्व असू शकते हा आग्रह मी केला.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नये

"शून्यमदः"चे भाषांतर?

वरील इंग्रजी वाक्याची सुरुवात "शून्यमदः"*चे स्वैर भाषांतर आहे काय?

(*शून्यमदः शून्यमिदं शून्याच्छून्यमादाय शून्यमेव समुच्च्यते (शून्यमेवावशिष्यते) ।)

इंग्रजी वाक्याच्या लेखकाने डायनोसॉरच्या उल्लेखाच्या पुष्टीकरिता जुन्या संस्कृत वाक्याचा दाखला दिलेला आहे काय? (तुमच्याकडे मूळ इंग्रजी पुस्तक असल्यास कदाचित संदर्भ/तळटीप वगैरे शोधून सांगता येईल.)

प्रति:

मी 'पूर्णमिदमं' एकले आहे, त्याच धर्तीवर शून्यदेखील योग्यच वाटते, मी दिलेल्या आंग्ल वाक्यांचा अर्थ काही वेगळ्याच दृष्टीकोनातून त्याचाशी जुळतो हे खरे पण शून्यातून निर्मितीचे त्याचे कारण अज्ञातच राहते.

मी हे आंतरजालावर वाचले आहे त्यामुळे संदर्भ देण्यासारखे पुस्तक वगैरे माहिती नाही.

असहमत

बिग बँग आणि उत्क्रांतीची तशी काही स्पष्टीकरणे विज्ञान देत नाही.

त्याच अर्थी, देवाचे अस्तित्व मानणारे देखील सुखी असतात असा वाद करून देवाचे अस्तित्व असू शकते हा आग्रह मी केला.

"नास्तिकांना देव यातना का देत नाही?" हा मुद्दाच नाही, "नास्तिकांना त्याच्या अस्तित्वाविषयी तो भ्रमित का होऊ देतो?" इतकाच मुद्दा आहे.

Ben Stein: What if after you died you ran into God, and he says, what have you been doing, Richard? I mean what have you been doing? I've been trying to be nice to you. I gave you a multi-million dollar paycheck, over and over again with your book, and look what you did.
Richard Dawkins: Bertrand Russell had that point put to him, and he said something like: sir, why did you take such pains to hide yourself?
संदर्भ

प्रति:

"नास्तिकांना देव यातना का देत नाही?" हा मुद्दाच नाही, "नास्तिकांना त्याच्या अस्तित्वाविषयी तो भ्रमित का होऊ देतो?" इतकाच मुद्दा आहे.

देव बुद्धी देत नाही, कर्मसिद्धांताप्रमाणे बुद्धी होते, नास्तिक सुखी आहेत म्हणून कर्मसिद्धांत अस्तित्वात नाही हे मानणे ठीक काय?

sir, why did you take such pains to hide yourself?

We don't see things as they are, we see things as we are. - Anais Nin

ठीक

देवाला बुद्धिदाता मानणार्‍या व्यक्तीशी घडलेला संवाद लेखात आहे. बुद्धी कर्मसिद्धांताप्रमाणे मिळते असे तुमचे प्रतिपादन असेल तर तुमचा गॉड हायपोथेसिस वेगळा आहे, त्याविषयी या धाग्यात चर्चा करणे हे विषयांतर होईल.

ठीक.

ठीक.

विपरीत निष्कर्ष

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
चर्चा प्रस्तावातीलः
"ईश्वराचे अस्तित्व पूर्णतया नाकारून चांगले सुखा-समाधानाचे,आनंदाचे, सौहार्दपूर्ण, समृद्ध जीवन जगणारे अनेक नास्तिक लोक आज आहेत......."
..या विधानावरून "असे संपन्न जीवन जगणारे आस्तिक लोक नाहीत."

असा निष्कर्ष निघत नाही.
पण या वाक्यावर श्री.आकोमी लिहितातः
"तसेच अस्तिक लोक देखिल आहेतच की! " यावरून त्यांनी तसा निष्कर्ष काढल्याचे दिसते. अन्यथा ते उपरिनिर्दिष्ट वाक्य लिहिते ना.
वस्तुतः तशा प्रकारचे जीवन जगणारे अनेक आस्तिक आहेत हे उघड आहे.हे चर्चा प्रस्तावात लिहिणाची मुळीच आवश्यकता नाही.

प्रति:

"ईश्वराचे अस्तित्व पूर्णतया नाकारून चांगले सुखा-समाधानाचे,आनंदाचे, सौहार्दपूर्ण, समृद्ध जीवन जगणारे अनेक नास्तिक लोक आज आहेत......."
..या विधानावरून "असे संपन्न जीवन जगणारे आस्तिक लोक नाहीत."

असा निष्कर्ष निघत नाही.

असा निष्कर्ष निघत नसला तर "नास्तिकांना अस्तिकांच्या सुखी असण्याबद्दल त्रास आहे" असा निष्कर्ष निघू शकेल.

सखेदाश्चर्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आ.को.मी. लिहितात:
"असा निष्कर्ष निघत नसला तर "नास्तिकांना अस्तिकांच्या सुखी असण्याबद्दल त्रास आहे" असा निष्कर्ष निघू शकेल. "


हा निष्कर्ष काढावा याचे सखेदाश्चर्य वाटते.असा निष्कर्ष दूरान्वयानेही निघू शकत नाही.अगदी बादरायण संबंध जोडायचा म्हटले तरी नाही.तसा निघतो असे ते कशाच्या आधारे म्हणतात?अर्थात हा प्रश्न निरर्थक आहे.कारण त्यांच्या अतिविपरीत निष्कर्षाला काडीचाही आधार नाही हे स्पष्ट आहे.थोडेसे लॉजिक समजणे एवढे अवघड असते का?कृपया पूर्वग्रह बाजूला ठेवून विचार करावा.

क्षमस्व

विषयांतर होत असेल तर क्षमस्व.

पण असा संबंध लावता येईल का? -

१. देव असण्याचा किंवा तो बुद्धिदाता असण्याच्या विचाराचा/भावनेचा अस्तिकाना त्रास होत नाही, तसेच देव नसण्याच्या भावनेचा नास्तिकांना त्रास होत नाही, परंतु देव/बुद्धिदाता असण्याच्या भावनेत सुखी असणाऱ्या आस्तिकांचा त्रास नास्तिकांना होत असेल? अशी भावना ह्या लेखामागे असू शकेल काय?
२. किंवा फक्त नास्तिकांना देव अशी बुद्धी का देतो? ह्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हणजे हा लेख असावा.

थोडी विसंगती

मराठी भाषेत 'बुद्धी असणे' (Intelligence) आणि 'बुद्धी होणे' (Thought) यांत फरक आहे.
लेखाचा अर्धा भाग बुद्धी असण्याचा उहापोह करतो तर दुसरा अर्धभाग बुद्धी होण्याचा परामर्श घेतो. ही विसंगती जाणवली.
तरीही लेख ठीकच म्हणता येईल.

विसंगती?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
बुद्धी असणे आणि बुद्धी होणे यांत मूलतः भेद नाही.असलेल्या बुद्धीचे उपयोजन म्हणजे काही कृती करण्याची,निर्णय घेण्याची बुद्धी होणे.मूळ विज्ञान असल्याविना जसे तंत्रज्ञान निर्माण होऊ शकत नाही तसेच बुद्धी असल्याशियाय बुद्धी होऊ शकत नाही.बुद्धी होणे,बुद्धी दाखवणे, बुद्धी वापरणे या सर्वांच्या मुळाशी बुद्धी आहे हे स्पष्टच आहे.चर्चा प्रस्तावात कोणतीही विसंगती नाही.

क्लिष्ट

'बुद्धीदाता वगैरे कोणी नसून उत्क्रांतीच्या प्रक्रियेत जे गुणधर्म विकसित झाले त्यापैकी एक म्हणजे बुद्धी' हा लेखाचा मथितार्थ आधीच पटलेला आहे, त्यामुळे या लेखाकडे मला कितपत तटस्थपणे पहाता येईल शंका आहे. तरीही लेखात एक धारदारपणा नसल्याचं जाणवलं.

लेखाचा अर्धा भाग बुद्धी असण्याचा उहापोह करतो तर दुसरा अर्धभाग बुद्धी होण्याचा परामर्श घेतो.

असंच काहीसं. पण नक्की सांगता येत नाही.

माणसाला बुद्धी मिळाली ती उत्क्रांतीतून. त्याच्या जैविक पूर्वजांकडून. हळू हळू ती विकसित झाली.

जर उत्क्रांतीने बुद्धी दिली तर उत्क्रांतीवर विश्वास न ठेवणारे कसे काय निर्माण होतील? असा प्रश्न विचारून उत्क्रांती निकालात काढता येते का? मला वाटतं अत्यंत सोपे युक्तिवाद करून देवाचं अस्तित्व पटवून देण्यात जे धोके असतात तसेच अतिशय सोपे युक्तिवाद करून उत्क्रांती सत्य आहे हे पटवून देण्यात होतात. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही जी मतं मांडली आहेत ती चुकीची आहेत. फक्त उत्क्रांतीच्या प्रक्रियेत दाता नाही, सगळं निसर्गनियमाने, आपोआपच होतं असं म्हणावं लागतं. मग ते 'आपोआपच' कसं होईल, कोणी केल्याशिवाय? या प्रश्नाचं थोडं लंबंचवडं उत्तर द्यावं लागतं.... एकंदरीत विषय क्लिष्ट आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

श्रीमंती

उत्क्रांतीने बुद्धी दिली तर उत्क्रांतीवर विश्वास न ठेवणारे कसे काय निर्माण होतील? असा प्रश्न विचारून उत्क्रांती निकालात काढता येते का?

विवेकवादाची निकड गरिबांना असते, श्रीमंतांना धर्म परवडतो. त्यामुळे, 'उत्क्रांतीवर विश्वास न ठेवणारे' निर्माण होणे हे 'प्रगती'चे लक्षण मानता येईल की!

धन्यवाद

'क्लिष्ट विषयाला पूर्ण न्याय न देता त्रोटक युक्तिवाद केलेला फसतो' हा माझ्या प्रतिसादाचा सारांश होता. तुम्ही तो इतक्या सफाईने प्रत्यक्ष दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

?

"जर उत्क्रांतीने बुद्धी दिली तर उत्क्रांतीवर विश्वास न ठेवणारे कसे काय निर्माण होतील? असा प्रश्न विचारून उत्क्रांती निकालात काढता येते का?" या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर देण्यासाठी मी प्रतिसाद दिला होता. ल चॅटलियर तत्त्वाचा (किंवा निगेटिव फीडबॅकचा) अनुभव अनेक विषयांत येतो. त्या अनुभवामुळे विषय क्लिष्ट का ठरावा?

गरज नव्हती..

अहो पहिलं प्रात्यक्षिक पुरेसं परिणामकारक होतं. अजून एक करून दाखवण्याची गरज नव्हती. पण माझा मुद्दा पटवण्यासाठी तुम्ही घेत असलेले कष्ट पाहून बरं वाटलं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

+१

मला वाटतं अत्यंत सोपे युक्तिवाद करून देवाचं अस्तित्व पटवून देण्यात जे धोके असतात तसेच अतिशय सोपे युक्तिवाद करून उत्क्रांती सत्य आहे हे पटवून देण्यात होतात.

असेच वाटते. साध्या गोष्टींमध्येही जाणूनबूजून अंधश्रद्धा बाळगणार्‍यांना अशा प्रयत्नांनी कितपत शहाणे करता येईल हा प्रश्न मलाही पडतो. स्वतःहून देव असण्याची शक्यता नाही हे पटण्याकरता निसर्ग, विज्ञान इ. बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या चर्चांनी फक्त शब्दांचे खेळ होऊन वेळ वाया जाण्याचाच धोका दिसतो.

-Nile

आवडले मात्र...

काय संगायचे आहे हे कळत असले तरी काहि तपशिलात शंका/चुका काढळल्या

काही मानवेतर प्राण्यांना काही प्रमाणात स्मरणशक्ती असते.बुद्धीची अन्य अंगे त्यांच्यात नसतात

याविधानाची सत्यता कशी पडताळावी? इतर प्राण्यांना कल्पनाशक्ती, अंतःस्फुरणशक्ती नसेलच हे कशावरून सिद्ध करावे? काहि प्राण्यांकडे (माकडे, अस्वले, हत्ती) काहिप्रमाणात तर्कशक्तीही असावी असे वाटते.

लक्षावधी वर्षांपूर्वी कोळी जाळे विणत होता.आज तो त्याचप्रकारचे जाळे विणतो.

लेखात हे उदा ठिक असावे. मात्र हे खरच सिद्ध होऊ शकते का? लक्षावधी वर्षांपूर्वी व आताच्या कोळ्याच्या काळे विणण्यात काहिच बदल झाला नसावा का? असा काहिसा अवांतर प्रश्न पडला.

माणसाला बुद्धी मिळाली ती उत्क्रांतीतून. त्याच्या जैविक पूर्वजांकडून. हळू हळू ती विकसित झाली

हे उत्तर एखाद्या सच्च्या आस्तिकाला पटवण्यासाठी फारच तोकडे वाटते. :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अव्यापारेषु व्यापार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"इतर प्राण्यांना कल्पनाशक्ती, अंतःस्फुरणशक्ती नसेलच हे कशावरून सिद्ध करावे? काहि प्राण्यांकडे (माकडे, अस्वले, हत्ती) काहिप्रमाणात तर्कशक्तीही असावी असे वाटते."

श्री.ऋषीकेश यांनी प्रदर्शित केलेली वरील शंका तशी योग्य आहे.
झाडाच्या ढोलीत माकड काठी खुपसते. वाळवीमुंग्या त्यावर चढून आल्या तर त्या खाते.यावरून त्याला बुद्धी आहे असे वाटते.
माकडे अनेक निरुद्देश कृती सतत करतात. त्या कृतींना माकडचेष्टा म्हणतात.कीलोत्पाटन केल्याने शेपूट अडकलेल्या माकडाची "अव्यापारेषु व्यापार" ही गोष्ट आपण वाचली असेल. पण अशा कृतींतून कधी यदृच्छया उपयुक्त गोष्ट घडते.उदा.भक्षप्राप्ती.अशी उपयुक्त ठरणारी कृती लक्षात ठेवून मा़कडे ती पुनःपुन्हा करतात.भक्ष्य मिळविण्यासाठी माकड काठीचा उपयोग करू शकते याचे कारण असे आहे.ती विचारपूर्वक केलेली कृती नव्हे.अनेक कृती नैसर्गिक प्रेरणेने तसेच सवयीने घडतात.
माणसाचे जवळचे नातेवाईक जे पुच्छहीन वानर चिंपांझी,गोरिला,यांना प्राथमिक स्वरूपाची तर्क बुद्धी असू शकते.

मानवेतर प्राण्यांबाबत; सहा अंगांबद्दल शंका

"स्मरणशक्ती,तर्कशक्ती,कल्पनाशक्ती,प्रतिभाशक्ती ,अंत:स्फुरणशक्ती आणि विवेकशक्ती ही माणसाच्या बुद्धीची षडंगे होत.यांतील पहिली तीन प्रत्येक माणसात कमी-अधिक प्रमाणात असतात,अशी माझी समजूत आहे"
.
"मानव सोडून अन्य सजीवांत कुणाला बुद्धी असते का?"
.
"काही मानवेतर प्राण्यांना काही प्रमाणात स्मरणशक्ती असते.बुद्धीची अन्य अंगे त्यांच्यात नसतात."

मानवेतर प्राण्यांत आणि मानवांत बुद्धीचे व्यापार कमी-अधिक प्रमाणात, थोडेफार वेगवेगळे होत असतील. असतीलच. परंतु सहापैकी पाच अंगे मानवेतर प्राण्यांत नाहीत, वगैरे, काय मुद्दा आहे, तो कळला नाही.

- - -

बुद्धीची अशी सहा अंगे वेगवेगळी कल्पून काय साधले असेल बरे? असा विचार करतो आहे. पैकी कुठलेही एक अंग नसताना अन्य कुठले अंग असल्याचे उदाहरण आपल्याला सापडू शकेल काय? (उदाहरण सापडल्यास वर्गीकरणाला आधार मिळतो.)

पुढील "ऑपरेशनल" व्याख्या बरोबर आहेत काय?
१. स्मरणशक्ती : भूतकाळातील अनुभवांचा संक्षेपाने मनातल्या मनात पुनरानुभव होणे (किंवा सांगणे). परंतु "संक्षेप" ही एका प्रकारची "रचना" असल्यामुळे क्रमांक २शी सरमिसळ होते आहे.
२. तर्कशक्ती : चिन्हांच्या रचनेची स्मृती =>काही चिन्हे आधी घेणे आणि त्या चिन्हांची वेगळी रचना स्मृतीतल्या रचनेसारखी बदलून मनातल्या मनात अनुभवणे (अन्य व्यक्तींना सांगणे)
३. कल्पनाशक्ती : स्मृतीतील वेगवेगळ्या अनुभवांचे अवयव मिसळून मनातल्या मनात अनुभवणे (अन्य व्यक्तींना सांगणे)
४. प्रतिभाशक्ती : ?? (सौंदर्यानुभवाशी संबंधित? कल्पनाशक्ती+सौंदर्य असे काही?)
५. अंतःस्फुरणशक्ती : ?? (कल्पनाशक्ती आणि प्रतिभाशक्तींचा स्रोत पश्चाद्-विस्मरणामुळे ठाऊक नसणे?)
६. विवेकशक्ती : ?? (तर्कशक्ती, कल्पनाशक्ती आणि प्रतिभाशक्ती यांची सरमिसळ?)

परंतु मानवेतर प्राण्यांत यांपैकी सर्वच असू शकतात.

- - -
"उपजत मनोव्यापार" आणि "जन्मानंतरच्या अनुभवांनी संस्कारित मनोव्यापार" असा फरक मला करता येतो. "स्मरण" हे बहुधा फक्त अनुभवांनी संस्कारितच असते. परंतु बाकी पाच अंगे उपजत आणि संस्कारित मनोव्यापारांच्या मिश्रणाने होत असावीत. ही पाच अंगे एकमेकांपासून वेगळी कशी, ते नीट समजत नाही.

लेखाचा मतितार्थ कळला, पण..

परंतु मानवेतर प्राण्यांत यांपैकी सर्वच असू शकतात.

बहुतेक असतात.

जर नसतात असे मानले तर मात्र उत्क्रांतीमध्ये विसंगती निर्माण होऊ शकते. फक्त मानवच् या प्रकारे उत्क्रांत झाला कसा?

खाली एक व्हिडीओ क्लिप देत आहे, आफ्रिकेतील कलहारी वाटवंटातील हा 'बबून' फक्त स्मरणशक्तीच्या पुढे जाऊन विचार करतो आहे असे वाटत नाही काय?

१.१५ नंतर पाहिला तरी चालेल.

-Nile

येथे भूलभुल्लैयाचे कोडे सोडवणारी बुरशी

येथे भूलभुल्लैयाचे कोडे सोडवणारी बुरशी बघावी :

...

सारेच धबधबे


हेही तसेच की! ;)

हाहा - सर्वच स्व-संघटक आंशिक

सर्वच गोष्टी अंशतः स्व-संघटक असतात. त्यातील स्वसंघटना कितपत प्रयोगकर्त्याच्या थेट अमलाखाली असते तो अंश कमीअधिक असतो. रूब गोल्डबर्ग प्रकारच्या यंत्रांमध्ये प्रयोगाच्या रचयित्यांकडे रचनेचा अंश अधिक असतो. चेंडूमध्ये रचयित्याने ठरवलेल्यापेक्षा वेगळ्या बदलांकडे रचनेचा अंश कमी असतो. (वरील यंत्रात रचयित्याने न-ठरवलेले चेंडूतले बदल म्हणजे चेंडूमधली झीज, वेगवेगळ्या ठिकाणच्या तापमानातील सूक्ष्म फरकामुळे होणारे चेंडूचे अकुंचन-प्रसरण, वगैरे.)

भूलभुलैय्या बुरशीपाशी ठेवणार्‍या प्रयोगकर्त्याकडे रचनेचा अंश कमी असतो. (भूलभुलैया प्रयोगकर्त्याने बनवला, हा भाग तर आहेच. पण त्यानंतर बुरशीतली प्रत्येक पेशी नेमकी कधी आणि कुठल्या दिशेने विभक्त होते, त्याबाबत हस्तक्षेप करत नाही.)

रचनेचा नेमका कितपत अंश प्रयोगकर्त्याने सोडून दिला, आणि तरी ढोबळमानाने अपेक्षित रचना झाली, तर आपण त्याला "हेतूचा आभास असलेले स्वसंघटन" म्हणतो? याची सीमा निव्वळ मानसिक ठरावाची आहे. (आर्बिट्ररी सायकोलॉजिकल आहे).

यथामती शंकानिरसन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय यांच्या शंका:
बुद्धीची अशी सहा अंगे वेगवेगळी कल्पून काय साधले असेल बरे? असा विचार करतो आहे. पैकी कुठलेही एक अंग नसताना अन्य कुठले अंग असल्याचे उदाहरण आपल्याला सापडू शकेल काय? (उदाहरण सापडल्यास वर्गीकरणाला आधार मिळतो.)


*विषयाचे विश्लेषण करून काही योग्य भाग (अंगे) पाडले तर एकेका भागाचा अभ्यास करणे सोपे जाते.असे भाग पाडणे ही बहुमान्य पद्धत आहे.म्हणून बुद्धीची सहा अंगे मानली.ही अंगे परस्परांशी कप्पाबंद नाहीत. प्रत्येक दुसर्‍याहून भिन्न आहे. पण पूर्णतया भिन्न नाही. स्मरणशक्ती ही अन्य सर्व अंगाना आवश्यक आहे.ती बुद्धीचा पाया आहे असे म्हणता येईल.मात्र तर्कशक्ती हे बुद्धीचे प्रधान अंग आहे असे मानतो.
निरीक्षणांवरून निष्कर्ष काढणे,साम्य-भेद ओळखणे,निष्कर्षाचे सामान्यीकरण करून निसर्ग नियम शोधणे इत्यादि कार्ये तर्कशक्तीच्या क्षेत्रात येतात.वैज्ञानिक संशोधकांत तर्कशक्तीचे आधिक्य प्रकर्षाने असावे.
*प्रत्येक सर्वसाधारण व्यक्तीत कल्पनाशक्ती असते.अनेकजण कल्पनेच्या राज्यात विहार करतात.पण त्या कल्पनांना योग्य रूप देऊन त्यांतून चित्र,शिल्प,संगीत,साहित्य अशा कलाकृतीची नवनिर्मिती करण्याची शक्ती ज्यांच्या ठायी असते ते प्रतिभावंत होत.बुद्धीचे हे अंग काही थोड्या व्यक्तीत दिसते.
*अंतःस्फुरणशक्तीविषयी दुसर्‍या प्रतिसादात लिहिले आहे.
*मी समाजात राहातो.समाजाच्या माझे हित आहे.पुढे जाऊन देशाच्या हिताशी,संपूर्ण मानवतेच्या हिताशी माझे हित निगडित आहे याची जाणीव होणे म्हणजे विवेक असे वाटते.तार्किकविचार पुढे नेला तर तर ही जाणीव होणे शक्य असते. तरी तर्कशक्ती आणि विवेकशक्ती ही दोन भिन्न अंगे मानली आहेत.

तर्क म्हणजे

मागे निनाद यांना लिहिलेले पुन्हा आठवले - तर्क म्हणजे गेस किंवा लॉजिक, तसेच तर्क करणे हे कल्पना करणेही असू शकते असे वाटते. कल्पनाशक्ती ही प्रतिभाशक्तीही असू शकते या वेगवेगळ्या आहेत की एका संचाचे उपसंच आहेत हे कळले नाही.

अंतःस्फुरण म्हणजे इंस्टिंक्ट का? ते माणसापेक्षा प्राण्यांत अधिक चांगले असते असे जाणकार म्हणतात.

इंटियूशन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली शंका विचारतातः
"अंतःस्फुरण म्हणजे इंस्टिंक्ट का?''
.
नव्हे.अंतःस्फुरण म्हणजे इंट्यूशन.आपण सर्वसाधारणपणे जाणीचेच्या पातळीवर विचार करतो.त्याचा वेग कमी असतो. आपण विचार करत आहोत याची सतत जाणीव असल्यामुळे वेग मंदावतो. निष्कर्षाप्रत यायला विलंब लागतो. वस्तुतः मेंदूतील प्रक्रिया विद्युत वेगाने घडू शकतात. काहीजणांच्या बाबतीत काही वेळा विचार प्रक्रिया नेणिवेच्या पातळीवर होऊ शकते. अशा वेळी नकळत झटकन योग्य निष्कर्ष निघतो. त्याला अंतःस्फुरण म्हणतात.
..
इंस्टिंक्ट चा संबंध बुद्धीशी नाही.

अस्तिक नास्तिक का देव आहे का नाही

अस्तिक वा नास्तिकपण श्रद्धेवर व परसेप्शनवर अधारित आहे. देव आहे का नाही त्याचा त्यात काही संबंध नाही. तो वेगळा विषय आहे. जरी देव खरोखरीच नसला तरी काही लोकं परसेप्शनने देव नसताना देव ही संकल्पना बनवतिल व मानायला लागतिल. त्यांना अस्तिक असे म्हणतो. तसेच देव खरोखरीच असला तरी काही लोकं परसेप्शनने तो नाही असे धरून चालतात व नास्तिक बनतात. हे एकेकाच्या कॉन्शियसनेस लेव्हल वर अवलंबून असेल कदाचित.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

बहुप्रचलित रूढार्थ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
ज्यांचे शिक्षण शालान्त परीक्षेपर्यंत झाले आहे अशा शंभर व्यक्तींचा यादृच्छिक समूह घेतला आणि त्यांतील प्रत्येकाला आस्तिक आणि नास्तिक या शब्दांचे अर्थ विचारले तर "देव मानतो तो आस्तिक.देव मानत नाही तो नास्तिक " असे अर्थ त्या समूहातील किमान नव्व्द जण देतील. तो प्रचलित अर्थच इथे अभिप्रेत आहे.

एक महत्वाचा पैलू

याच समूहाला 'देव म्हणजे काय? देवाची तुमची व्याख्या काय?" असा प्रश्न केल्यास अनेकविध उत्तरे मिळतील.

देवाची व्याख्या

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"याच समूहाला 'देव म्हणजे काय? देवाची तुमची व्याख्या काय?" असा प्रश्न केल्यास अनेकविध उत्तरे मिळतील. "
श्री.मूकवाचक यांचा प्रतिसाद

देव संकल्पनेविषयी विविध समज प्रचलित असले तरी बहुसंख्य लोकांत याविषयी काही समान विचार, समान भावना आहेत.आपण वाचतो, ऐकतो, पाहातो,अनुभवतो त्यावरून हे अनुमान निघते.बहुसंख्य लोकांच्या मनातील देवधारणे वरून त्याची व्याख्या केली तरच ती उपयुक्त ठरू शकेल.
....समजा शंभर व्यक्तींचा यादृच्छिक (रँडम)समूह आहे. त्या सर्वांना समजेल अशा भाषांत विचारले:
"पुढील गोष्टी तुम्ही सत्य मानता काय?:--
१)या विश्वाची निर्मिती देवाने केली.
२) संपूर्ण विश्वावर देवाची सत्ता चालते.
३)विशिष्ट पद्धतीने देवाची उपासना केली तर माणसाला अमरत्व मिळते.
४)मनोभावे केलेली प्रार्थना, पूजा-अर्चा, नवस या प्रकारांनी देव प्रसन्न होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करतो.
तर किमान नव्वद जणांची चारही उत्तरे हो, हो,हो, हो अशी येतील.
..यावरून देवाची व्याख्या अशी होऊ शकते:
..

"जगनिर्माता,जगन्नियंता,प्रार्थना, पूजा-अर्चा,नवसादीनी प्रसन्न होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करणारा,सश्रद्ध उपासकाला अमरत्व देणारा असा जो कोणी अलौकिक अस्तित्वात आहे असे मानले जाते तो देव होय."

व्याख्या

हे एकेकाच्या कॉन्शियसनेस लेव्हल वर अवलंबून असेल कदाचित.

सहमत्

सहमत आहे.

त्यामुळेच -

१. विश्वनिर्मितीबद्दल अजातवाद, युगपात सृष्टी, क्रमसृष्टी असे किमान तीन सिद्धांत मान्य आहेत. आपापल्या वैचारिक ऐपतीप्रमाणे, प्रचीती प्रमाणे जमेल ते, पटेल ते स्वीकारा अशी लवचिकता आहे.

२. प्रारब्ध, नियती या गोष्टी अमान्य न करताही कर्तव्य तत्पर हो, आपल्या मर्यादित का असेना कर्म स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग कर असा संदेश देता येतो. देहावर कर्मसिद्धांताची, मन आणि बुद्धीवर अधिदैविकाची (या प्रतलावर सुष्ट आणि दुष्ट असे द्वैत आहे, सत्व, रज आणि तम प्रवृत्ती आहे हे ओघानेच आले) सत्ता चालते. या पातळीवरच इष्टदैवत, त्याची उपासना या गोष्टी किमान सत्व प्रवृत्ती वाढण्यासाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता नेहेमीच असते. विशुद्ध आत्मतत्त्व मात्र निर्गुण, निराकार वगैरे असणाऱ्या ब्रह्माचाच अंश असल्याने निरंतर अविकारी असते. सत्वाच्या आधारानेच आत्मतत्वाच्या प्रचितीचा मार्ग सुकर होतो असा निर्वाळा सगळे संत एकमुखाने देतात.

३. भगवद्गीतेत तरी जो जन्माला येतो त्याचा मृत्यू होणे अटळ आहे, त्यामागे जे चैतन्य आहे ते अनादी अनंत आहे असा सिद्धांत येतो. आत्मसाक्षात्कार झाल्यावर देही असोनी विदेही अशी अवस्था येते. मग शरीर आले आणि जाईल, पण खरा मी (रमण महर्षी ज्याला 'सेल्फ' असे म्हणतात) तो तसाच राहील अशी प्रचीती येते. तेच अमरत्व.

४. मनोभावे केलेली पूजा यात 'मनोभावे' ला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे ठराविक उपासना, अनुष्ठान करणे आणि त्याची फलप्राप्ती याविषयीचे संख्याशास्त्रीय निष्कर्ष पूर्णपणे कुचकामी आणि गैरलागू ठरतात. मनोभावे, समर्पित वृत्तीने कुठलेही अनुष्ठान केले असता किमान रजोगुणी आणि तामसी वृत्ती थोड्याफार प्रमाणात तरी निवळते असा सर्वसाधारण अनुभव येताना दिसतो इतकेच म्हणेन. त्यामुळेच हे सगळे व्यर्थ आहे असे संख्याशास्त्रीय पुरावे गोळा करण्यापेक्षा जे करता ते मनोभावे करा, सत्वाकडे प्रवृत्ती होईल हे लक्षात घेऊन करा असे सांगणे सयुक्तिक ठरते. असो.

(हे सगळे अवान्तर झाले असल्यास क्षमस्व.)

अवांतर सुद्धा चांगले

सहमत

ऑखॅमचा बोथट वस्तरा आणि देवाची अथांग दाढी

देव कुबेर आहे, त्याच्याकडे पर्यायांची चंगळ आहे, तो उधळ्याही आहे.त्याच्याकडे मुक्त इच्छा आहे. त्यामुळे देव काय करू शकतो त्याला मर्यादा नाहीत. त्याची लीला अगाध आहे.(त्याची दाढी अथांग आहे.). 'वस्तरा' वापरायची गरज त्याला नाही. तो कुणाला कधी, कुठे, कसे ठेवेल ती त्याची मर्जी! आपण पामर जीव केवळ शक्यतेच्या बाबतीत बोलू शकतो. कोण,काय, कुठे, कधी, कसे असेल त्या शक्यतेची वारंवारिता शोधण्याचा प्रयत्न करतो आणि ठोकताळे बांधतो. वस्तर्‍याची गरज आपल्याला पडते कारण अनंत शक्यता आपल्या आवाक्यात येऊच शकत नाहीत. मग एखादी गोष्ट होण्याची शक्यता जास्त का असते? तर तसे करणे त्याला आवडत असते.त्याला त्याची सवय झालेली असते. (आपल्यालाही नाही का आपल्या ४०-५० वर्षातल्या जन्मजात सवयी चटकन बदलायला त्रास होत? त्याला तर वयच नाही.)
पण अधूनमधून काहीतरी बदल असावा म्हणून तो अनपेक्षित घटना घडवतो आणि आपले अस्तित्त्व दाखवतो.(जसे - जगातील सर्वात सुरक्षित मानल्या गेलेल्या अणुभट्ट्यांमध्ये स्फोट घडवणे आणि मानवाला त्याच्या मर्यादांची कल्पना देणे.)मानवाच्या आवाक्यात येण्याजोग्या/ न येण्याजोग्या सर्व गोष्टी त्याने आधीच केलेल्या आहेत. त्यालाच आपण निसर्ग नियम म्हणतो. आपण फक्त त्यांचा अर्थ लावण्याचा आणि शक्य झाल्यास त्यांची भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहोत. हा प्रयत्न आपल्याला करू देणे आणि त्यात यश - अपयश देणे हेही सर्व त्याच्या इच्छेनुसार होते.
सांप्रत चर्चेतला विषयही असाच आहे. प्रस्तुत लेखकाला हा लेख असा लिहीण्याची 'बुद्धी झाली' कारण त्याच्याकडे 'बुद्धीमत्ता आहे' आणि ती बुद्धीमत्ता असणे + लेख लिहीण्याची बुद्धी होणे हे दोन्हीही 'त्याच्याच' हातात होते/आहे/असेल.(मलाही हा प्रतिसाद देण्याला त्यानेच उद्युक्त केले आहे... :))

विकीवरच्या या दुव्यात तर या लेखाच्या पुढे जाऊन काही वाचायला मिळते. ते असे की नास्तिक लोकच जास्त बुद्धीवान असतात.
या पानावर बुद्धीमत्ता-संशोधक नायबोर्ग (अर्थातच नास्तिक!) याने असे म्हटले आहे की "I'm not saying that believing in God makes you dumber."
याउलट असेही म्हणता येईल की- स्वतःहून देवच हुशार व्यक्तींना मुद्दाम नास्तिक बनवतो.
("The God maketh the smarter an atheist."- ©) ;)

याच्या कारणाचे अनंत पर्याय असू शकतात -
पर्याय १ -
काही आत्मे त्याचे लाडके आहेत. त्यामुळे त्यांना त्याने मानव बनवून जास्त बुद्धीमत्ता प्रदान केलेली आहे.त्यातले काही उपक्रम नावाच्या मराठी संस्थळावर लिहितात.(त्याच्या इच्छेने). त्यातले काही आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर 'तो नाहीच' असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात तर काहींना 'तो आहेच' असे प्रकर्षाने मांडावेसे वाटते. (त्याच्या इच्छेने हे पालुपद आहेच.) हा खेळ वेगवेगळ्या ठिकाणी आणि पातळ्यांवर करणे त्याला आवडते.(उपक्रमावर वादविवाद रंगून या संकेतस्थळाची लोकप्रियता वाढावी अशीही त्याची एखादी सुप्त इच्छा असू शकेल बुवा!)
पर्याय २ -
जगातील काही पामर आत्म्यांना मुक्त इच्छा देण्याचा प्रयोग (खेळ) करून पाहण्याची त्याला हुक्की आलेली आहे.म्हणून ते स्वतःला स्वयंसिद्ध समजतात आणि देवाचे अस्तित्त्व नाकारतात.
पर्याय ३ -
कर्मसिद्धांत - त्याला न मानण्याची बुद्धी मोक्षमार्गावरील काही बुद्धीमान आत्म्यांना देव करवतो कारण ही सारी त्याचीच लीला आहे. या नास्तिक जन्मात त्या आत्म्यांचे पुण्य कमी होऊन पुढील जन्मी त्यांना देवाच्या अस्तित्वाची प्रखर जाणीव व्हावी यासाठीच देवाने त्यांना या जन्मी नास्तिक बनवले आहे. या जन्मी त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी (सुशील आचरणाने) पुण्य कमवायचे ठरवले तरी नास्तिकतेच्या पापामुळे तसे होत नाही आणि त्यांचे अधःपतन होते. पुढील निम्नयोनीच्या जन्मात त्यांना पुन्हा देवाला शरण जावे लागल्याने त्यांचा उद्धार होतो आणि नंतर मुक्तीचा मार्ग खुला होतो. हीच देवाची सुबुद्ध योजना आहे.

.
.
.

ज्याला समजून घेऊ नये अशी इच्छा असेल त्याला यातले काही समजणार नाही.

हा अर्थातच युक्तीवादासाठी युक्तीवाद आहे. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यायची आहे.

अर्थात् तशी ती घेणे न घेणे हेही 'त्याच्याच' मर्जीवर आहे म्हणा. ;)

ठीकच आहे

"बुद्धीदाता गणेश नाही" हे यनावालांचे प्रतिपादन ठीकच आहे. कारण तसा तो आहे असा विश्वास ठेवणार्‍यांना खालील प्रश्न विचारून निरुत्तर करता आले असते. गुन्हे करून तुरुंगात जाणार्‍या गुन्हेगारांपैकी बहुसंख्य लोक आस्तिक असतात (असे यनावाला म्हणतात आणि ते म्हणतात ते चुकीचे कसे बरे असेल? उगीच काही शंकेखोर लोक पुरावे द्या वगैरे कोल्हेकुई करतात त्याकडे यनावाला आणि उपक्रमी दुर्लक्ष करतात हे योग्यच आहे) तर अश्या गुन्हेगारांना गुन्हे करण्याची बुद्धी गणेशच देतो का? हा प्रश्न विचारून आस्तिकांना निरुत्तर करण्याची सोय या लेखामुळे राहिली नाही हा पुरोगामी चळवळीसाठी फायदा म्हणावा की तोटा? (यनावालांनी खुद्द नाना फडणीसाला "ईश्वरें तृणें करून (तुझे) रक्षण केले असे तू म्हणतोस तर मग तुझ्या आईला सैतानाने पळवले असे म्हणावे का असा प्रश्न विचारून निरुत्तर केले होते याची आठवण येते)

पुन्हा पुन्हा

श्री यनावाला यांच्या लेखनाचा आदर आहे. आस्तिकांच्या श्रद्धेची तर्कहीनता दाखवून देणे हे त्यांनी आपले जीवनकार्य मानले असल्यास त्यांचे कौतुक वाटते. मला मात्र या लेखासारखा अभिनव तोचतोचपणा कंटाळवाणा वाटू लागला आहे. याचा अर्थ यनावाला यांनी या विषयावर लिहू नये असा नाही हे कृपया ध्यानी घ्यावे.

 
^ वर