मुंबईतले स्फोट आणि इप्रतिक्रिया
मुंबईत नुकतेच स्फोट झाले. मुंबई हादरली वगैरे मथळे ४० फाँटमधे लिहून वृत्तपत्रांनी धमाका केला. च्यानेलवाल्यांच्या उत्साहाला तर बघायलाच नको. पण हे नेहमीचेच. त्यापेक्षा वेगळे म्हणजे जालकृपेने आता प्रत्येकाहाती कळफलक आल्याने जालपटूंच्या प्रतिक्रियांचा भडीमार. भीषण स्फोटोत्तर काव्यांशिवाय फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्स, मराठी संकेतस्थळे जिकडेतिकडे कर्कश्श आणि आक्रस्ताळ्या प्रतिक्रियांचा, प्रतिसादांचा, स्टेटस मेसेजांचा खच पडला आहे. आदरणीय राजजींना अशातही परप्रातीयांचा लोंढा आठवला.
बरं राजकारण्यांना शिव्या देणारे सेफ आंतरजालीय सुखवस्तू हे विसरतात की शेवटी राजकारण्यांची जमात ही परग्रहावरून आलेली नाही. सोशल एँगर समजू शकतो, कर्कश्शपणा आणि आक्रस्ताळेपणाही समजून घेऊ शकतो पण कधी कधी हे जरा जास्तच होते आहे असे वाटते. ' स्फोटाच्या दिवशी कसाबचा वाढदिवस होता' अशी अफवा काय उडवली जाते आणि त्यावर फालतू विनोद काय केले जातात. 'बाबा रामदेवच्या सैन्यात भरती व्हायचे आहे' काय अन् काय नि काय. अशी किती किती बौद्धिक दिवाळखोरी काय चालू आहे. स्फोटाची चित्रे पाहण्याइतकीच क्लेषदायक ह्या लोकांची मूढता वाटते. बरं ह्यावर कुणी काही बोलावे तर "माझा अमुक नातेवाईक दादर किंवा झवेरी बाजाराजवळ राहतो म्हणून माझा तरी संताप अजून आटोक्यात यायचा आहे" अशी प्रतिक्रिया.
अश्या डोक्यात जाणार्या प्रतिक्रिया वाचून काय वाटते? निदान माझा संताप तरी आटोक्यात यायचा आहे.
Comments
वेळ का घालवा?
दांभिकपणाची किव येते.
किव
समस्त भारतीय षंढ आहेत, भारतीय लोकशाही भाडखाऊ आहे अशा ओळी स्वतः परदेशात बसून पाडणे, आणि असल्या टुकार कवितेवर 'आमच्या मनातल्या भावना लिहिल्या' असे प्रतिसाद देणे ह्या सगळ्याचीच किव वाटते.