मराठीचे मूळ आणि विकिपीडिया

मराठी भाषेविषयी विकीवर पुष्कळ माहिती आहे. http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language पण त्यात काही महत्त्वाच्या ठळक त्रुटी दिसतात. एक तर मराठीच्या बोली भाषांच्या यादीत पश्चिम महाराष्ट्राच्या(पुणे ग्रामीण,सातारा,सांगली,कोल्हापूर इ.)बोलीभाषेचा उल्लेख नाही.दुसरे म्हणजे 'श्री चामुण्डरायें करवियलें,गंगराजें सुत्तालें करवियलें' हे वाक्य वादग्रस्त ठरवून कोंकणी भाषेतले मानले आहे. एक दोन संशोधकांनी ह्या वाक्याची भाषा मराठी मानायला विरोध केला आहे हे खरे पण केवळ त्यामुळे ते काँर्ट्रोवर्शिअल ठरत नाही कारण बहुसंख्य तज्ज्ञांनी ते मराठी मानले आहे. ह्या वाक्यातल्या क्रियापदांत 'वियलें' असे जे रूप येते, ते कोंकणी आहे असे ह्या दोन तज्ञांचे मत आहे. खरे म्हणजे लावियलें,ठेवियलें,धाडियलें अशी रूपे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतच्या मराठी भाषेत सररास दिसतात. करवियलें हे रूप 'करणे' चे प्रयोजक 'करविणे' याचे भूतकाळाचे रूप आहे.'सुत्तालें' ह्या शब्दाविषयीसुद्धा अशीच तर्कदुष्टता दाखवली आहे. ह्यामध्ये सुधारणा करता येणे शक्य आहे काय?
दुसरे म्हणजे कोंकणी भाषेवरचा लेख त्या भाषेच्या एकंदर व्यवहार आणि व्याप्तीच्या मानाने खूपच मोठा आणि अनेक तपशीलयुक्त आहे. यात अर्थात आक्षेप घेण्यासारखे काही नाही.पण तो वाचताना कित्येक ठिकाणी खोडसाळपणा केल्यासारखा वाटतो.कोंकणीवरचा इतर बारीकसारीक भाषांचा प्रभाव विस्ताराने वर्णिला आहे पण मराठीच्या प्रभावाविषयी चकारशब्दही नाही.मराठीविषयीचा आकस उघड जाणवतो. निदान मला तरी जाणवला.तसे नसेल तर उत्तमच आहे.
जाताजाता: कोंकणीवरच्या लेखाची भाषा मराठीवरच्या लेखापेक्षा अधिक सफाईदार आणि वाचनीय आहे हे मात्र खरे. पण त्यामुळेच त्यातली मते खरी,असे वाटण्याचा धोका वाढला आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

विकिलेख अधिक समृद्ध करणे

मराठीतले विकिलेख अधिक समृद्ध करण्याबाबत उपक्रम सदस्य निनाद पुढाकार घेत आहेत. इंग्रजी विकिपेडिया वरील "मराठी" लेख सुद्धा आपल्यापैकी कोणी समृद्ध करू शकतो.
- - -
"सुत्तालें" (सुत्तालय = सुत्तु[कन्नड, अर्थ "भोवती"]+आलय = भोवतीची वास्तू) हा शब्द कन्नड मुलुखातल्या वास्तूंसाठी वैशिष्ट्यपूर्ण असावा. तो मराठीत प्रचलित नाही, हे खरे आहे. कोंकणीत तरी प्रचलित आहे काय? (गोव्याच्या कोंकणीत फारसा नाही. मंगळूरच्या कोंकणीबाबत ठाऊक नाही. "सुत्तान"="भोवती" शब्द आहे, असे दिसते. पण कन्नड प्रभावामुळे वापरत असावे, असे वाटते.)
- - -
वरील विकिपानांवर (किंवा अन्यत्र) वाचले आहे, की ज्ञानेश्वरीत वापरलेली काही रूपे आजही कोंकणीमध्ये वापरलेली दिसतात, पण मराठीच्या बोलींमध्ये दिसत नाहीत. हे खरे आहे. पण यावरून कोणी "ज्ञानेश्वरी कोंकणीमध्ये आहे, मराठीमध्ये नव्हे" म्हटले, तर ती अर्थपूर्ण नसलेली शब्दशृंखला आहे. ई.स. ९००-१२०० काळात कोंकणी आणि मराठी या दोहोंत आदानप्रदान होत होते, इतपत काय आपल्याला म्हणता येईल. अथवा "त्या काळात या दोन्ही भागांत प्रवास करणारे प्रतिष्ठित लोक सरमिसळ करून बोलत" असे काहीतरी असू शकेल.

कोंकणी आणि मराठी भाषा जर शेजारीशेजारी सरमिसळ होत प्रगत होत असतील, तर "त्या दोहोंचा एकमेकांवर प्रभाव" असे म्हणणे सयुक्तिक आहे.

उपेक्षेने मारलेल्या व्यक्तीत अभिमानाचा जोरदार दिखावा असतो, तसा काही प्रकार कोंकणी भाषेवरील विकिलेखात दिसत आहे खरा.

ज्ञानेश्वरकालीन मराठी

सद्ध्याचा मराठीतल्या अकारान्त पुंलिंगी शब्दांची ज्ञानेश्वरीमधली उकारान्त रूपे कोंकणीमध्ये अजूनही प्रचलित आहेत हे खरे. 'अजी सोनियाचा दिनु,वर्षे आनंदाचा घनु' इ. पण त्यावरून ज्ञानेश्वरीची भाषा कोंकणी आहे असे म्हणता येणार नाही असे आपण म्हणता ते खरेच आहे.माझ्या मते दुसर्‍या सहस्रकाच्या सुरुवातीपर्यंत कोंकणी-मराठीचा प्रवास समांतरपणे पण अगदी निकटच्या अंतरावरून सुरू होता.दक्षिण कोंकणामध्ये अजूनही त्याणे-तॅणा,तिणे-तेणा (त्याने,तिने) असे कोंकणीतल्या 'ताणे' शी साधर्म्य दाखवणारे शब्द वापरले जातात.कोंकणी मराठीतून निघाली असे मुळीच नसले तरी दुसर्‍या सहस्रकाच्या सुरुवातीपर्यंत दोन्ही भाषांमध्ये खूपच सारखेपणा होता,इतका की दोन्ही भाषा एकच वाटाव्या. दोन्हींचे मूळही एकच असावे असे मला वाटते. नंतर मात्र त्यांमधले अंतर वाढत गेले आणि भावनिक अंतरही वाढल्यामुळे त्या नुसत्याच दूर गेल्या असे नव्हे तर त्यांच्यांत दुरावाही निर्माण झाला आहे .

सुधारणा

विकी हा तसाही हौशा-गवशांचा प्रकल्प आहे. तेथे येणारी माहिती हा जो तो आपापल्या समजूतीनुसार देत असतो. खोडसाळ वृत्त, अफवा याबाबत संपादक जागृत असतील तर ते त्यावर अंकुश लावतात परंतु संपादकांना सर्वच खरी-खोटी माहिती असते असे म्हणणे धाडसी आहे. अशावेळी सजग सदस्य लेखात सुधारणा करतात किंवा विकीवर चर्चा सुरू करून संपादकांना त्रुटी दाखवून देतात. खोडसाळ मजकूर बाजूला करून मूळ लेख प्रत्यावर्तित करण्याची सोय संपादकांकडे असते.

मराठी भाषेच्या बोली भाषा, इतिहास आणि इतर गोष्टींवर आपल्याकडे माहिती असल्यास आपण अवश्य विकीवर भर घालावी.

विकी संपादक

संपादकांच्या हेतूबद्दल शंका कधीच नव्हती.संपादकांना सर्वच विषयांत ज्ञान असेल असे मानणे चुकीचेच आहे.तसाही विकी फारसा 'रिलायेबल्' नाही हे आणि त्यातला हौसेनवशे(खे)पणा हा जाणवतच असतो.ज्या कोणी कोंकणीवरचा हा लेख लिहिला आहे त्याने जाणूनबुजून काही सत्ये दडपून ठेवली आहेत तर काही किरकोळ तपशिलांचे महत्त्व सोयीस्कररीत्या पुष्कळच वाढवून दाखवले आहे,हे इथे नजरेस आणून द्यायचे होते. सुधारणा कुणी सुचवल्या तर अंमलात आणल्या जातात हेही पाहिले आहे.सरस्वती नदीवरचा संपूर्ण लेख अनेक वेळा सुधारित झाला आहे. असो.
आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद.

तुम्हाला जे

तुम्हाला जे त्या लेखासाठी योग्य आहे असे जाणवते आहे ती भर तेथे द्या. शंका असेल तर तशी भर घालण्या आधी येथे चर्चा करा मग भर घाला. शिवाय त्या लेखाच्या चर्चापानावर तुमचे आक्षेप, मत नोंदवता येते. त्याचा उपयोग करा.

तुमचा मुद्दा मला पटला आहे. पण मराठीविषयीचा आकस हा मुद्दा बाजूला ठेवून; त्या लेखात काय भर घालता येते ती घालून मोकळ्या व्हा!
(ज्यांना संपादन करायचे ते करत बसतील आणि संपादन झालेच तर त्या विरुद्ध भांडताही येतेच!)

विकीच्या बाबतीत मी मानतो की - इतर कुणी तरी करेल वगैरे असे काही नसतेच. जे काय करायचे ते आज आणि आपणच करायचे असते. म्हणून लिहिल्याने होत आहे रे, आधी लिहिलेची पाहिजे!

-निनाद

मराठी

मराठीच्या बोली भाषांच्या यादीत पश्चिम महाराष्ट्राच्या(पुणे ग्रामीण,सातारा,सांगली,कोल्हापूर इ.)बोलीभाषेचा उल्लेख नाही.
ह्यात फारसे वावगे काही नाही.

ह्या सर्व बोलींना दखनी मराठी असे संबोधण्यात येते. भाषाशास्त्रानुसार त्यांच्यातील फरक फारसा नाहीच शिवाय प्रमाणभूत मराठीपेक्षाही ह्या बोली फार वेगळ्या नाहीत.

अगदी हेच उत्तर कोकणी (ठाणे, रायगड आणि रत्नागिरी) ह्या बोलीबद्दल म्हणता येईल.

ज्यांना मराठीच्या पोटभाषा असे म्हणता येईल अशा भाषा म्हणजे खानदेशी, वर्‍हाडी, दक्षिण कोकणी (सिंधुदुर्ग, गोवा, कारवार्, मंगळूर्) इत्यादी.

भाषा - इतिहास आणि भूगोल ह्या पुस्तकात प्रा ना गो कालेलकर यांनी एक रोचक तक्ता दिला आहे. समजा फक्त प्रमाणाभूत मराठीच उमजणार्‍या व्यक्तीने जर विविध भाषा प्रथमच ऐकल्या तर त्याला त्या आकळण्याची शक्यता किती?

१) इंग्रजी, फ्रेंच्, अरबी, चिनी - शक्यता शून्य
२) बंगाली, उडीया - फार कमी
३) हिंदी, गुजराती - कमी
४) खानदेशी, वर्‍हाडी - थोडेफार
५) दखनी मराठी - जवळपास पूर्ण

कोंकणी-मराठी वादात मी पडू इच्छित नाही कारण असे प्रश्न केवळ भाषाशास्त्रीय दृष्टीकोनातून सोडवले जाऊ शकत नाहीत. त्याला राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक परिमाणेही असतात. ग्रियर्सनने आपल्या लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियात दक्षिण कोकणीला मराठीची पोटभाषा मानले आहे. पण त्याच बरोबर खानदेशीला त्याने गुजरातीची पोटभाषा मानले आहे. भाषाशास्त्रीयदृष्ट्या हे योग्य असेलही कदाचित पण जर खानदेशी माणूस स्वतःला व्यापक मराठी समाजाचा हिस्सा मानत असेल तर, भाषाषास्त्र काय म्हणते यास अर्थ राहत नाही. तसेच, जर बहुसंख्य दक्षिण को़कणी भाषिकांना आपली भाषा स्वतंत्र/वेगळी आहे असे वाटत असेल तर भाषाशास्त्री काहीही म्हणोत, त्याने फरक पडत नाही.

पोर्तुगालचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व नसते तर, आज ती भाषा ही स्पॅनिशची पोटभाषा म्हणूनच राहिली असती असे अनेक युरोपीय भाषाशास्त्रींचे मत आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कोंकणी वाले लोक खरंच खोडसाळपणा करताहेत हे मात्र नक्की.

मी स्वतः एडिट् करण्याचा प्रयत्न केला, परंतु लग्गेच दुसर्‍या दिवशी येरे माझ्या मागल्या! आणि कोंकणीचा पुरावा काय तर म्हणे इ.स. २ र्‍या शतकातील??? जेव्हा न्यू इंडो आर्यन भाषाच तयार झालेल्या नव्हत्या तेव्हा कोंकणी कुठून येणार कप्पाळ? असो. बाकी मराठी प्रोसोडीवरती देखील विकिवर लेख नाही.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

 
^ वर