अक्षरगणवृत्त आणि लक्षणाच्या ओळी

श्री. संजोप राव यांचा हा भागा वाचताना शाळेत विविध अलंकारांबरोबरच शिकलेली अनेक वृत्ते आठवली. त्यातील काहि मात्रा तर काहि अक्षरगण वृत्त होती.
अनेक वृत्तांची उदाहरणे विविध उदाहरणे अनेकांना माहित असतीलच.. त्याच बरोबर (अक्षरगण वृत्तासाठी) 'लक्षणाची ओळ' म्हणून एक ओळ असे. या ओळीचे वैषिष्ट्य असे की ही ओळ लक्षात ठेवल्यास वृत्ताचा ल-ग क्रम, यती, मात्रा सारे काहि आपोआप लक्षात येत असे कारण ती ओळ त्या वृत्तात असे वशिवाय इतरही माहिती देत असे.

आता आठवून बघता केवळ पृथ्वी वृत्ताच्या 'लक्षणाची ओळ' आठवते आहे:

सदैव धरिते जसाजसयलाग पृथ्वी पदी

(ही ओळ पृथ्वी या अक्षरगण वृत्तात तर आहेच शिवाय त्यामुळे यती, मात्राचा अंदाज तर येतोच शिवाय 'ज स ज स य ल ग' हा क्रमही ओळीत गुंफला आहे (जसाजसयलाग) )

जसजशा आठवतील (आणि आठवल्या तर) अश्या लक्षणाच्य्या ओळींची भर घालेच. तोपर्यंत तुम्हाला अश्या कोणत्या अक्षरगण वृत्तांच्या लक्षणाच्या ओळी व/किंवा त्याची उदा. आठवत असल्यास इथे जरूर द्यावी. [तुम्हाला केवळ उदा. माहित आहे मात्र लक्षणाची ओळ नाही असे असल्यासही इथे उदा. द्यावे. तुम्ही जरी केवळ उदा दिलेत तरी एखाद्याला त्यावरून लक्षणाची ओळ आठवेलही]

बर्‍याच उपक्रमींना याबाबत असलेली माहिती व रस लक्षात घेता धागा संपतेवेळी एक उजळणी + संकलन हाती येईल असा कयास, इच्छा आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

मालिनी...

"ननमयय गणानि मालिनी व्रुत्त होते"

(बाकी 'मालिनी' व्रुत्ताबद्दल काही आठवत नाही...:) )

किंचित् सुधारणा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
ननमयय गणानि मालिनी व्रुत्त होते
हे
न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते. असे हवे
.
करुणाष्टके (समर्थ) मालिनी वृत्तात आहेत.

अनुदिनि अनुतापे,तापलो रामराया
परमदिनदयाळा नीरसी मोह माया |

वसंततिलका

येता वसंततिलकी तभजाजगागी

मंदाक्रांता

"मंदाक्रांता म्हणति तिजला वृत्त हे मंद चाले" मभनततग

शंका

ही लक्षणाची ओळ समजली नाही..
मभनततग हा ओळीचा भाग नाहिये ना?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मंदाक्रांता

"मंदाक्रान्ता मभनततगा गागणी मंद चाले" अशी लक्षणाची ओळ आहे.

शार्दूलविक्रिडीत-
"मासाजा सतताग येती गण ते शार्दूलविक्रिडिती" (मसजसततग)

शिखरिणी-
जयामध्ये येती यमनसभलगा शिखरिणी' (यमनसभलग)

मो. रा. वाळिंबे यांचे व्याकरणाचे खूप सुंदर पुस्तक माझ्या संग्रही होते. त्यात बरीच उदाहरणे होती, आता एवढीच आठवली.

व्याकरण शुद्धता

गणवृत्ताची ओळख ओळ व्याकरणशुद्ध लिहिणे अत्यावश्यक असते.अन्यथा अपेक्षित गण पडणार नाहीत.
*"मासाजा सतताग येती गण ते शार्दूलविक्रिडिती"
शुद्धः-
मा सा जा स त ता ग येति गण हे शार्दूलविक्रीडितीं |
.
*जयामध्ये येती यमनसभलगा शिखरिणी' हे
शुद्धः--
जयामध्ये येती य म न स भ ला गा शिखरिणी|

धन्यवाद

दुरुस्ती केल्याबद्दल आभारी आहे.

मंदाक्रांता

आम्हाला शाळेत मंदाक्रांता सुलभ कविता कालीदासी विलासी असे शिकवले होते, असे आठवते.

शाळेची आठवण करून देणारा धागा!

+१

मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढमासी
होई पर्युत्सुक विकल तो कांत एकांतवासी
तन्नि:श्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी?
मंदाक्रांता सरस कविता कालिदासी विलासी

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

मंदाक्रांता म्हणति ...

मंदाक्रांता म्हणति तिजला, वृत्त हे मंद चाले |
ज्याच्या पादीं म भ न त त हे, आणि गा दोन आले ||
---वाचक्नवी

भुजंगप्रयात

भुजंगप्रयाती य चारीहि येती |

संस्कृतातील लक्षणकाव्ये

"श्रुतबोध" नावाचा एक ग्रंथ कालिदासाने रचला आहे, असे सांगितले जाते. यात सुमारे चाळीस वृत्तांची लक्षणकाव्ये आहेत. काव्य म्हणून कालिदासाच्या प्रतिभेच्या लायकीचा वाटत नाही. पण लक्षणकाव्ये या मर्यादित हेतूने चांगलीच आहेत.

कोणाला कुतूहल वाटत असेल, तर श्रुतबोध आणि त्याच्या हिंदी भाषांतराचे ध्वनिमुद्रण ईस्निप्स वरती मी ठेवलेले आहे.

त्यातील अनुष्टुभ् श्लोकाची लक्षणे मी अशी लक्षात ठेवत असे :
श्लोके षष्ठं गुरु ज्ञेयं सर्वत्र लघु पञ्चमम् ।
द्विचतुष्पादयोर्ह्रस्वं सप्तमं दीर्घमन्ययो: ॥
(सैल भाषांतर :
श्लोकीं गुरू सहावे अन् लघू सर्वत्र पाचवे ।
समपादांत जे ह्रस्व विषमीं दीर्घ सातवे॥)

लक्षणपंक्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
संस्कृत भाषेत लिहिलेल्या वृत्तलक्षणपंक्ती कधी वाचनात आल्या नाहीत.श्री.धनंजय यांनी दिलेली अनुष्टुभ छंदाचे लक्षण आताच वाचले.पद्यमय मराठीकरण त्यांना चांगलेच जमते.
श्रुतबोधाच्या दुव्याप्रीत्यर्थ धन्यवाद!

वृत्त-वृत्त

१)तया वृत्ता देती विबुधजन संज्ञा शिखरिणी
जयामध्ये येती य म न स भ ला गा गण गणी.
२)म्हणावे तयाला भुजंगप्रयात,
क्रमानेच येती य चारी जयात
पदी ज्याचिया अक्षरे येति बारा
'रमानायका, दु:ख माझे निवारा.'
३)ती इंद्रवज्रा म्हणिजे कवीने
ता ता ज गा गा गण येती जीने
त्या अक्षरे येति पदात अक्रा
'तारी हरी जो धरि शंखचक्रा'.
४)उपेंद्रवज्रा म्हणतात तीला
ज ता ज गा गा गण येती जीला
५)जाणा वसंततिलका व्हय तेचि वृत्त
येती जिथे तभ ज जा गग हे सुवृत्त.
६)आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित
मा सा जा स त ता ग येति गण हे पादास की जोडित.
७)मंदाक्रांता म्हणति तिजला, वृत्त ते मंद चाले
ज्याच्या पादी म भ न त त गा आणि गा दोन आले.
८)सुवृत्त बहु चांगले म्हणती सूज्ञ पृथ्वी तया
अधी ज स ज त्यापुढे स य ल गा हि येती जया.
९)मंदारमाला कवी बोलती हीस कोणी हिला अश्वघाटी असे
साता तकारी जिथे हा घडे पाद तेथे गुरू एक अंती वसे.

म स ज स त त ग

इत्यादि गणांचे लाँगफॉर्म पण द्यावेत कुणीतरी.

नितिन थत्ते

य र त न भ ज स म आणि ट्रुथ टेबल

आठवणीतून दिल्याने अर्थातच चुकले :) .. तेव्हा प्रतिसाद काढून टाकत आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

पृथ्वी वृत्ताची लक्षण ओळ

आहे वृत्त विशाल म्हणती सू़ज्ञ पृथ्वी तया |
आधी जसज त्या पुढे सयलगा ही येती तया ||

- स्वधर्म

सोपे आहे - भारत कधीही विजयी होणार नाही

@नितिन थत्ते -

गुरुकिल्ली - "यमाताराजभानसलगं"
य = यमाता = लगुगु
मा = मातारा = गुगुगु
ता = ताराज = गुगुल
ल = लघु , गु = गुरू
...इत्यादी.

अवांतर :
थोडक्यात काय तर बायनरीमधील ००० ते १११ ची आठ काँबिनेशन्स आहेत. ०=लघु, १ = गुरू.
नव्या वैज्ञानिक पद्धतीने हीच किल्ली "न सजय भारतम्" अशी मांडता येईल. (००० ते १११) याचा अर्थ 'भारत (कधीही) विजयी होणार नाही' असा निघतो.
आमच्या पूर्वजांना फलज्योतिषाबरोबरच मोर्स कोड,बायनरी, बिट, बाईट आणि पर्यायाने डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सही माहित होते याचाच हा धडधडीत पुरावा नाही काय?
या 'वैदिक' ज्ञानाचा विजय अस्स्सो. ;)

अतिअवांतर : रंग थोडे कमी पडले. 'हलकेच घ्या' हे काही वाचकांसाठी स्वतंत्रपणे नमूद करतो. :)

अक्षरगणवृत्त आणि लक्षणाच्या ओळी

सर्वांच्या माहितीकरता
कॅनडाहून "एकता " नावाचे त्रैमासिक गेल्या २५ एक वर्षापासून नियमीत प्रसिद्ध होते. त्यातील "समस्यापूर्ती"च्या सदरात प्रत्येकवेळी दिलेल्या तीन वेगवेगळ्या ओळी वापरून् त्यांची समस्यापूर्ती करायची ही स्पर्धा. या ओळी अक्षरगणवृत्त मात्रात असतात व यावर नेहमी विवेचनपण असते.
गावरान

गणवृत्तांविषयी आणखी थोडे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गणवृत्तबद्ध कवितेच्या एका कडव्यात चार ओळी असतात.एका ओळीतील सर्व अक्षरांचे तीन तीनांचे गट पाडायचे. प्रत्येक गटाचा एक गण असतो.शेवटी अधिकतम दोन अक्षरे उरतील.(०,१ किंवा २).लघु अक्षराचा गण ल गुरूचा ग.
तीन अक्षरांच्या गटांचे आठ प्रकार होतात.प्रत्येक प्रकाराचा एक असे आठ गण असतात.ते असे:य,र,त,न; भ,ज,स,म
.
गटांचे आठ प्रकार आणि गण असे:-
..प्रकार........गण..उदाहरण
आद्द्य लघु:-- य...यमाचा
मध्य लघु:-- र...राधिका
अन्त्य लघु:--त...ताराप
सर्व लघु :--न... नमन
.
आद्य गुरु :---भ...भास्कर
मध्य गुरु :-- ज...जनास
अन्त्य गुरु :--स...समरा
सर्व गुरु:-- म...मानावा
.
हे सर्व लक्षात ठेवण्याची सुलभ पद्य पद्धत :

य-यमाचा न-नमन त-ताराप र-राधिका |
म-मानावा स-समरा ज-जनास भ-भास्कर ||

 
^ वर