अलंकारांची आठवणीतली उदाहरणे

दोड्ड आणि दुड्डु दोन्ही शब्द असलेला "दोड्ड-दुड्डु" शब्द माझ्या दृष्टिपटलावर दुडदुड दौडला.

धनंजय यांच्या लिखाणातील हा आनंददायक अनुप्रास वाचून अलंकारांची काही उदाहरणे आठवली.
बाई मी उगवताच रवीला
दाट घालुनि दही चरवीला
आत गे फिरविताच रवीला
सार काढुनी हरी चरवीला
हा यमक किंवा
गारा वारा पर्जन्यधारा रमावरा आता तुम्हीच तारा असे म्हणून सर्वांनी पोबारा केला
हा अनुप्रास.
अलंकारांची अशी आणखी काही लक्षात राहातील अशी उदाहरणे उपक्रमी सांगू शकतील काय?
अगदीच 'काकाने काकूच्या...' वगैरे बाळबोध उदाहरणे नसावीत पण 'पंत पंचगंगेच्या पाचव्या पायरीवरुन पाय पसरुन पाण्यात पडले. पंतांची पिवळी पुणेरी पगडी परशुरामाने पळवली. पोलिसांनी परशुरामाला पुण्यापासून पन्नास पावलावर पकडले. पोलिसांनी पंतांची पिवळी पुणेरी पगडी पंतांना पोस्टाने परत पाठवली' वगैरे चालतील (!)

लेखनविषय: दुवे:

Comments

वर्जन २

गारा, वारा, पर्जन्यधारा यांचा एकच मारा होऊन "रमावरा, आता तुम्हीच तारा" असे रडत ओरडत सर्व वर्‍हाडी सैरावैरा पळत सुटले.

कनक आणि कांता द्वय कात राया

आजोबांनी पुर्वी एकवीले होते, ते काय आहे माहीत नाही (त्यातील यमक किंवा अनुप्रास वै. माहीत नाही.)

कनक आणि कांता द्वय कात राया
केले प्रभो ने नर कातराया
जो सापडेना नर कात राया
तो योग्य जाणा नरका तराया

अन्योक्ती

भद्रं भद्रं कृतं मौनं कोकिलै: जलदागमे |
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ||

अर्थ : हा अन्योक्ती अलंकार असलेला श्लोक आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला कोकिळांनी मौन धारण केले ते फार चांगले झाले. कारण पावसाळ्याच्या सुरवातीला जेंव्हा बेडूक [डराव डराव असा घाणेरडया आवाजात ] बडबड करतात, तेंव्हा गप्प बसणेच चांगले. [जेंव्हा सामान्य बुद्धीची माणसे खूप बडबड करतात तेंव्हा प्रतिभावंतानी गप्प बसणेच चांगले. कारण त्यांची झेप सामान्यांना कळणार नाही. ]

...................जालावरून साभार्

तंतकाव्यातले वैशिष्ट्य

तंतकाव्यात हे वैशिष्ट्य फार असे. अनंतफंदीच्या "लंडेगुंडे हिरसेतट्टू" मधील पुढली ओळ आता मराठीतली म्हण झालेली आहे :

बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडुं नको

ही द्विपदी परशरामाची :

नाजुक रुपडें दिपडें ठिकडें जिकडे तिकडे अस्करा
कराडची का कोलापुरची देखण्यांत बाकी तारा

(स्रोत : म. वा. धोंड "मर्‍हाटी लावणी")

- - -
"ती फुलराणी" नाटकात एक (पंतकवी) वामनपंडिताच्या कडव्याचे उद्धरण आहे -

वंशी नादनटी तिला कटितटीं खोवूनि पोटीं पटीं
कक्षें वामपुटीं स्वशृंग निकटीं वेताटिही गोमटी
जेवी नीरतटीं तरूतळवटीं, श्रीश्यामदेहीं उटी
दाटी व्योमघटीं सुरां सुख लुटी घेती जटी धूर्जटी ॥

(यातील बरेचसे शब्द/अन्वय मला समजत नाहीत.)
बांबूची बासरी, नाद करण्यात नटीसारखी कुशल, तिला कमरेपाशी पोटावरच्या कपड्यात खोवून (आहे)
डावीकडच्या काखेत (स्वशृंग ?गुरे? निकट असता ?) सुंदर वेताटी-काठी (आहे)
जेवतो पाण्याच्या किनार्‍यावर, झाडाच्या खाली; मंगल सावळ्या अंगावर उटी (आहे)
आकाशातल्या ढगांत दाटी (?), देवांमध्ये सुख लुटले जात आहे (?) शंकर (धूर्जटी) जटी घेती (?)

शब्दचित्र

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"वंशी नादनटी....."या रचनेविषयी श्री.धनंजय लिहितातः--"(यातील बरेचसे शब्द/अन्वय मला समजत नाहीत.)"

..
त्यांनी लिहिलेला अर्थ अचूक आहे.मात्र स्वशृंग शब्दाने गुरे दाखविली जात नसावी.
.
हे शब्दचित्र आहे.स्वभावोक्ती अलंकार म्हणता येईल. प्रसंग असा:
श्रीकृष्ण गाई चरावयाला वनात घेऊन गेला.दुपारी जेवणाची वेळ झाली.कृष्णाने शिदोरी सोडली...आता शब्दचित्रः
*श्रीकृष्ण एका झाडाखाली सावलीत बसला आहे.जवळच एक निर्झर खळखळत आहे.कृष्णाने एक वस्त्र कमरपट्ट्यासारखे बांधले आहे.विविध नाद काढणारी बासरी त्यात खोवून ठेवली आहे.आपले शिंग आणि वेताची काठी या वस्तू डाव्या बगलेत आहेत.त्याच्या श्यामल अंगावर चंदनाची उटी आहे.
असा हा श्रीकृष्ण भोजनाचा सोहळा पाहाण्यासाठी आकाशात देवादिकांनी दाटी केली आहे.त्यांत श्रीशंकर(धूर्जटी) तसेच ऋषी (जटी) आहेत.ते सर्व कृष्णदर्शनाचा आनंद लुटत आहेत.
.
[शिंगः-गुराख्यापाशी गाई वळविण्यासाठी काठी असते.तसेच एक फुंकण्याचे शिंग असते.एखादी गाय चरण्याच्या नादात कळपापासून खूप दूर गेली तर तिला बोलावण्यासाठी शिंग वाजवायचे. त्या ध्वनीच्या अनुरोधाने ती कळपाकडे येते.]
.
[कृष्णाने या वस्तू बगलेत धरून का ठेवल्या? खाली जमिनीवर ठेवून तो मोकळेपणाने का जेवत नाही? ते वामन पंडितांना ठाऊक! पंडित विसराळू असावे.कुठे गेले की आपली पिशवी,छत्री, डोक्याला घाम आला तर प्रसंगी काढलेली टोपी या वस्तू हातात किंवा बगलेत धरून ठेवायच्या.खाली ठेवल्यास परतताना विसरण्याची भीती! आपल्या या सवयीचे आरोपण त्यांनी कृष्णावर केले असावे.]

पंतकाव्य यमक/ श्लेश

भीम म्हणे कुंतीला ब्राह्मणसमुदाय रडती फार का पूस।
त्यांचे दुःख हराया अग्नीला भार काय कापूस ।।

संदर्भः बकासुराच्या भीतीने भयभीत झालेले लोक
काव्यः (बहुधा) पांडवप्रताप

फटका - अनुप्रास

हटातटाने पटा रंगवुन जटा धरिशि का शिरी |
मठाची उठाठेव का तरी ||

औषध

औषध नलगे मजला
औषध नल गे मजला
हा आणि
दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए

हे दोन्ही श्लेष

तिचे दात मोत्यांसारखे आहेत - उपमा
तिचे दात म्हणजे जणू मोतीच - उत्प्रेक्षा
तिच्या दातांचे मोती चमकले - रुपक

सन्जोप राव

वैसे तो तुम्हीनें मुझे बरबाद किया है
इल्जाम किसी और के सर जाये तो अच्छा.

दमयंती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
पूर्ण आर्या अशी आहे:--
ती शीतलोपचारी जागी झाली हळूच मग बोले|
औषध न ल गे मजला, परिसुनी माता बरे म्हणुनी डोले|
.
दमयंतीच्या अंगाचा दाह होत होता.तिच्यावर शीतलोपचार चालले होते.मधेच ती गुंगीतून जागी झाली आणि म्हणाली," आई ,मला (कसले) औषध लागू पडत नाही .[ नलराजा हेच माझे औषध आहे ग!]. हे ऐकून आईने ठीक आहे असे म्हणून मान डोलावली .(कन्येच्या मनातील श्लेष मातेला उमगला की नाही न कळे!)

भीष्मप्रतिज्ञापूर्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या वामन पंडितांच्या रचनेत पुढील कडवे आहे:--
तो स्तोम येता बहुसायकांचा
झालाचि पार्थव्यवसाय काचा
कांचावला वीर पुढे धसेना
झाली नृपा सर्व भयांध सेना
.अर्थः
(राजा जनमेजया,भीष्माच्या धनुष्यांतून सुटलेल्या) असंख्य बाणांचा तो लोंढा (अंगावर) आल्यावर अर्जुनाचे काम ढिले पडले.तो वीर कचरला.त्याला पुढे जायला धीर होईना.सगळी सेना भीतीने जणू आंधळी झाली.

थोडी भर

१)गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
चंचलतनु चपलचरण अनिलगण निघाले. : यमक,अनुप्रास
२)येणारच नेणारा जाणारच होडी,भरतीला जोर भरे वेळ उरे थोडी : यमक, अनुप्रास
दोन्ही बोरकर.
३)मंद समीरे यमुनातीरे वसति वने वनमाली.(जयदेव?)
४)बालिश बहु बायकांत बडबडला : अनुप्रास
५)रंभाकाननात वारा हो : श्लेष
६)तयासारिखे बोलती तोक सारे
खुणा॑वूनि अन्योन्य की 'तो कसा रे?': यमक,श्लेष

दोन पैसे

तमाखुपत्रं राजेंद्र भज मा ज्ञानदायकम् |
तमाखुपत्रं राजेंद्र भज माऽज्ञानदायकम् ||

पहिली ओळ :
संधीची फोड - तम् आखुपत्रं राजेंद्र भज मा ज्ञानदायकम् . शब्दार्थ - तम् आखुपत्रं = त्या गणपतीला, भज=भक्ति कर, मा=लक्ष्मी (धन), दायक=देणारा
अर्थ - हे राजेंद्रा, धन व ज्ञान देणार्‍या त्या गणपतीची तू भक्ति कर.
दुसरी ओळ :
संधीची फोड - तमाखुपत्रं राजेंद्र भज मा अज्ञानदायकम् . शब्दार्थ - तमाखुपत्रं = तंबाखूचे पान. भज=नादी लाग, मा=नको, अज्ञान=ज्ञानाचा अभाव
अर्थ - हे राजेंद्रा, अज्ञान देणार्‍या (निर्माण करणार्‍या) तंबाखूच्या पानाच्या नादी तू लागू नको (सेवन करू नको).

(उपक्रमावरच्याच एका जुन्या चर्चेत श्री. शरद कोर्डे यांच्या प्रतिसादातून )

--------------------------------------------------

'स्वस्त्री घरात नसता कण्डु शमनार्थ रण्डिरा खावी |
तीही घरात नसता स्वहस्ते चिबुल्ली दाबावी ||'

हा श्लेष प्रसिद्ध आहे, अनेकांना माहिती असेलच.
ज्यांना नसेल त्यांच्यासाठी शब्दार्थ-
कण्डु = खोकला
रण्डिरा= साखर
चिबुल्ली= कण्ठाचा उंचवटा- ऍडम्स ऍपल.

(दुसरा अर्थ सुस्पष्ट आहे, त्यामुळे लिहित नाही. ;))

------------------------------------------------------

(श्री. रावसाहेबांनी उल्लेख केलेला 'दिल चीज क्या है..' मधला श्लेष मला समजला नाही.
कृपया स्पष्टीकरण द्यावे.)

------------------------------------------------------

कधीतरी मी सहज म्हणून अनुप्रासात काव्यरचना केली होती. त्यावर उपक्रमींचे अभिप्राय वाचायला आवडतील.

पापण्यातले पाश पुसुनी प्रसन्न पिवळी पहाट होते..
सरसर सरसर सकाळ सगळी साकल्यावर सांडत जाते..!

लगेच लपते नभात लाली, लगबग लगबग प्रकाश होतो
भरभर भरभर घड्याळ पळते, असा भास भरदिवसा होतो

टळटळणारी दुपार सगळे टाळे लावून टाळत जाती..
नीरव दुपारी निवांत निद्रा नशीबवान नेत्रांना येती..

मध्यान्हीच्या मधाळ वेळी मनामनाची मरगळ जाते
कातरवेळी कुठे कुणाचे 'काळीज' कोणी कापत जाते...

हुरहुरण्याचा हव्यास हळवा हाती घेउन हसते रात्र,
गळपटलेल्या गरीब गावी गाढ झोपते- गात्रन् गात्र..!

बसल्या बसल्या कसा बघा ना, 'बरा' कवीही बहकत जातो...
आयुष्याला असा अचानक "अनुप्रास" आवडता होतो..!

-ज्ञानेश.

----------------------------------------------------

मुझे जा न कहो, मेरी जां

श्री. रावसाहेबांनी उल्लेख केलेला 'दिल चीज क्या है..' मधला श्लेष मला समजला नाही.
कृपया स्पष्टीकरण द्यावे.

मेरी जां, मुझे जा न कहो मेरी जां, मेरी जां मेरी जां| - (चित्रपटः अनुभव) यातला श्लेष लक्षात आला का? दिल चीज क्या है मधला श्लेष थोडासा तशाच प्रकारचा आहे बहुधा.

बुझा दिये है

खुद अपने हाथों मुहब्बतोंके दिये जलाकर
या गाण्यात दिये शब्द दोन ठिकाणी वेगळ्या अर्थाने वापरला आहे.
बुझा दिये है खुद् अपने हाथों

श्लेष?

त्यात श्लेष आहे असे वाटत नाही.

गाण्यात ज्या प्रकारचे टोनिंग आहे त्यावरून "माझे मन काय आहे ते समजून घ्या" असा अर्थ मी आधी समजत होतो.
नंतर कुठेतरी गद्यात कोणालातरी बोलताना ऐकल्यावर, त्याचा अर्थ "माझं मनच काय ? तुम्ही माझा जीवही घ्या" (दिल चीज क्या है? आप मेरी जान लीजिये) असा असल्याचे लक्षात आले. पुढच्या "फक्त एकदा माझं म्हणणं माना" या ओळीवरून हा दुसरा अर्थच योग्य आहे असे वाटते. (पहिला अर्थ नाहीच).

नितिन थत्ते

दोन्ही अर्थांनी दुसरी ओळ चालते

दोन्ही अर्थांनी दुसरी ओळ चालते.

अर्थ १: माझे हृदय काय वस्तू आहे ती तुम्ही जाणून घ्या । (ते जाणल्यावर मानालच असा विश्वास, किंवा जाणण्याबाबत अधिक आर्जवी विनंती...) एकदा तरी माझे मानूनच घ्या ।

अर्थ २: माझे हृदयच काय, माझे जीवनच तुम्ही घ्या | (अवघे जीवन आपलेसे करण्याच्या विनंतीबाबत...) फक्त एकदा का होईना माझी ही विनंती तुम्ही मान्य करा ।

'मेरी' चे काय?

अर्थ एक तितकासा योग्य वाटत नाही.

'दिल' हा पुल्लिंगी शब्द आहे, त्यामुळे "मेरी दिल आप जान लीजिये" अशी वाक्यरचना संभवत नाही.
'मेरी' हा शब्द नि:संशय 'जान' साठीच आहे. त्यामुळे अर्थ दोन हाच एकमेव अर्थ आहे असे मला वाटते.

चालेल

(उर्दूसारख्या संस्कृतोद्भव भाषांमध्ये तरी) विशेषण अनेक नामांना लागू असेल, तर जवळातजवळच्या नामाशी लिंग-वचन साधले तरी चालते.
(संस्कृत व्याकरणात याविषयी चर्चा झालेली आहे. कौंडभट्टाने केलेला ऊहापोह मी वाचलेला आहे. मराठी व्याकरणकारांचेही असेच निरीक्षण आहे. रमेश धोंगडे यांच्या पुस्तकात ही चर्चा बघितली आहे. हिंदी/उर्दूबाबत सवयीमुळे माहीत आहे, की वापर असाच आहे. इंग्रजीमध्ये विशेषणे बदलत नाहीत.)

उदाहरणार्थ मराठीत कोणी म्हणेल :
किंवा
"डाकूंनी फक्त त्याची बायकोच पळवली नाही, मुलगाही मारला."
"डाकूंनी फक्त बायकोच पळवली नाही, त्याचा मुलगाही मारला."
यात तुम्ही व्याकरणदृष्ट्या काय सुधारणा करू शकाल?

तेच हिंदी-उर्दूत :
डाकुओंने बस उसकी बीवी नहीं उठा ली, लड़काभी मारा ।
डाकुओंने बस बीवी नहीं उठा ली, उसका लड़काभी मारा ।

वरील उदाहरण तसेच आहे.

कसे?

'माझे मन तुम्ही ओळखून घ्या' असा अर्थ घेतल्यास 'जान' हे नाम न राहता क्रियापद होईल (ना?)

१)मेरा दिल क्या चीज है, आप जान लीजिये
२) मेरी दिल क्या चीज है, आप जान लीजिये...

पैकी मला पहिली वाक्यरचनाच (अजूनही) निर्दोष वाटते आहे.

चीजशी जवळीक

चीज"शी जवळीक साधून स्त्रीलिंग होईल.
दिल मेरी चीज़ क्या है? (यह) आप जान लीजिए ।

मराठीतही :
हृदय अफलातून वस्तू आहे माझी, जाणून घ्या.
हृदय अफलातून वस्तू आहे माझे (?चालेल पण दौडणार नाही?), जाणून घ्या.

पटतंय.

हे लक्षात आले नव्हते हां. मला मेरी हा चीज साठी वापरलेला शब्द वाटत होता.

नितिन थत्ते

पुन्हा काही

१)हटातटाने पटा रंगवुन जटा धरिशी का शिरी,मठाची उठाठेव का तरी?
२)हे मंदमंदपद सुंदर कुंददंती,चाले जसा मदधुरंधर इंद्रदंती.
३)राधासखिसंवादे छेकापह्नुती ही आयका,रसिक हो, किती चतुर बायका.(हे संपूर्ण कवन द्वयर्थी शृंगारिक संवादांतून कृष्णलीला वर्णन करणारे आहे.)

छान धागा

छान धागा..
अतिशयोक्ती, प्रास वगैरे अलंकाराचीही उदा वाचायला आवडतील

(अतिशयोक्ती मधे चाराण्याचं तेल सोडून.. :) )
रामरक्षेत प्रास मुक्तहस्ताने दिसतो असे वाटते

शंका: 'अं'काराने प्रास होतो का? जसे:
रामम् लक्ष्मणम् रघुवरम् सीतपतीम् सुंन्दरम्
काकुस्थम् करुणार्णवम् गुणनिधीम् विप्रप्रियम् धार्मिकम्

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

लक्ष्मीस्तोत्र

अगस्ती मुनींनी रचलेल्या लक्ष्मी स्तोत्राचे पठन करताना मला नेहेमी वाटते की खालील ओळ ही श्लेष अलंकाराचे उदाहरण आहे. कोणास माहीत असल्यास कृपा करून अधिक प्रकाश टाकावा.

लक्ष्मीउवाच -

"
.
.
.
यः पठेत्प्रातरुत्थाय श्रद्धा-भक्तीसमन्वीत|
गृहे तस्य सदा स्थास्ये नित्यं श्रीपतिनासह||

(१) (मी ) श्रीपती = विष्णू समवेत त्या घरात नित्य रमते
आणि
(२) श्री ही पतीसमवेत त्या घरात नित्य रमते

असे २ अर्थ निघत असावेत असा कयास
____________________________________

शंकरास पूजिले सुमनाने
हा दुसरा श्लेषालंकार

दोन अर्थ नाहीत.

फक्त पहिलाच अर्थ असू शकतो. स्थास्ये हे क्रियापद प्रथम पुरुषी एकवचनी आहे.त्यामुळे वाक्याचा कर्ता 'मी' हाच असू शकतो.'मी नेहमी(च) श्रीपतीसह (श्री म्हणजे लक्ष्मी,तिचा पती म्हणजे अर्थात विष्णू) (त्या घरात)
सदासर्वकाळ वास करीन' हाच अर्थ आहे.

शक्य आहे

आपण म्हणता तेच शक्य वाटते.
कारण मूळातच हा श्लोक लक्ष्मी उवाच म्हणजे लक्ष्मी म्हणाली या वाक्यप्रयोगानंतर येतो.
पण खात्री करून घेतली.

पा पा पं पौ प पा

पावाच्या पाचशे पंचाचन्न पौष्टिक पदार्थांच्या पाककृती
माझ्या एका लेखाचा मथळा

अजून् २

गुरु-गोविंद दोनो खडे काके लागू पांव
बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो बताय||

(१) गुरु आणि गोविंद दोघेजण् एकत्र माझ्यासमोर आले. मी द्विधा झालो की कोणाच्या पाया प्रथम पडू? हे गुरुदेव आपण धन्य आहात ज्यांनी माझी ती द्विधा मनस्थिती दूर केली हे सांगून की "तू गोविंदाच्या पाया पड"

(१) गुरु आणि गोविंद दोघेजण् एकत्र माझ्यासमोर आले. मी द्विधा झालो की कोणाच्या पाया प्रथम पडू? गोविंदच प्रत्यक्ष म्हणाले - "गुरु हा सर्वश्रेष्ठ. तेव्हा त्याच्या पाया प्रथम पड"
______________________________

Pride goes before fall.
(1) गर्वाचे घर खाली
(२) (आवश्यक/सार्थ) अभिमान जर गेला तर नाश हा निश्चित आहे.

शिवाय आणखी एक अर्थ

"प्राईड गोझ बिफोर फॉल" वाक्याचा आणखी एक अर्थ :
(सिंहांचा) कळप हेमंत ऋतूच्या पूर्वी निघून जातो.

मस्त

अफलातून!!!

कहीं का दीपक कहीं की बाती

आज बने है जीवनसाथी
देख हंसा है चांद मुसाफिर
देख चांद की ओर
यातला शीर्षकातल्या ओळीतला श्लेष चटकन लक्षात येणार नाही. पण हे गाणे लिहिणार्‍याच्या गीतकाराचे नाव सरस्वतीकुमार "दीपक" होते हे समजले तर त्यातली मजा कळते.

कहीं का दीपक कहीं की बाती

धन्यवाद

विविध उदाहरणे देणार्‍य सर्व जाणकारांचे आभार. 'दिल चीज..' मधला श्लेष धनंजय यांनी समजावून दिला आहेच.
सन्जोप राव

समुद्रयमक

(मी प्रथमच हा धागा आज पाहिला)

अनलसमीहित साधी राया वारा महीवरा कामा|
अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा||

(कोणाचा आहे ठाऊक नाही, बहुधा मोरोपंत...)

अन्वयः महीवरा राया, वारा अनल-समीहित साधी
तसा, हे धीरा, अनलस मीहि कामा यावा, रामही, वराका मा.

(कृष्ण युधिष्ठिरास उद्देशून)

हे महीवरा राजा, (जसा) वारा अनल (अग्नि)चे इच्छित (समीहित) साधतो
तसा, हे धैर्यवान् पुरुषा, अनलस (उद्योगी) असा मी कामाला येईन, (बल)रामहि (येईल) (आणि मग) बिचारी रुक्मिणी (सुद्धा येईलच).

अरविंद कोल्हटकर, जुलै, २४, २०११.

अरविंद कोल्हटकर, टोरोंटो,

अलंकारांची आठवणीतली उदाहरणे

या संदर्भात मला दोन ओळी पुसटश्या आठवतात. त्या खाली देत आहे.

"श्रितवृंद जया हरिचंदन मानित गतिजित सिंदुर(?) जो
रघुनंदन पंडित वंदित ज्यास वळित्रय बंधुर कंधर जो"

चू. भू. द्या. घ्या.

कुणाला ते पूर्ण कडवे किंवा योग्य शब्द आठवत असतील ते कृपया दुरुस्त करा.
गावरान, पटोमॅक

 
^ वर