तर्कक्रीडा १५:दोन लोककोडी

( कोड्यांपायी कुणाचा अधिक कालापव्यय होऊ नये. यास्तव ही सोपी कोडी आहेत.श्री.राज जैन यांची सूचना आहे तदनुसार उत्तरे व्यनी.तून पाठवावी ही विनंती.)
(|) सत्यनारायण : एका पिशवीत चार किलो गहू आहेत.तुमच्यापाशी एक वजन काटा(दोन पारड्यांचा) आहे.तसेच एक किलोग्रॅमचे वजन आहे.अन्य कोणतेही वजन नाही.हा काटा आणि एक किलोचे एकच वजन वापरून आणि केवळ तीनदाच वजन करून चार किलो गव्हाचे सव्वा-सव्वा किलोचे तीन वाटे करायचे.(उरलेले पाव किलो गहू कबूतरांना टाकायचे.)
....तर वरील सर्व अटी पाळून सव्वा सव्वा किलोचे तीन वाटे कसे करता येतील?
*************
(||) चटईवरील तांब्या :एका खोलीच्या मध्यभागी एक चटई (१ मी रुंद ,२ मी.लांब) पसरली आहे.चटईच्या मध्यभागी एक तांब्या ठेवला आहे. तांब्यात अगदी कठोकाठ नसले तरी बरेच पाणी आहे.
आता त्या तांब्याला अन्य कोणत्याही वस्तूचा (तसेच शरीराच्या कोणत्याही भागाचा ) स्पर्श न करता , ,आतील पाणी न सांडता आणि चटईला कोणत्याही प्रकारची हानी (कापणे, फाडणे, जाळणे इ) न पोचवता तो तांब्या चटईवरून जमिनीवर आणावयाचा आहे.
....तर हे कसे साधता येईल?
(तांब्याखालून चटई खसकन ओढायचा प्रयत्‍न केल्यास तांब्या कलंडून पाणी सांडेल हे निश्चित.)

.........यनावाला.(कृपया उत्तर व्यनि ने पाठवावे.)

लेखनविषय: दुवे:

Comments

आता कंटाळा आला बरं का!

आता कंटाळा आला बरं का या कोड्यांचा...
आपला
(अ तार्किक)
गुंडोपंत
~ उपक्रम वयाने वाढावे ह्याचे मी समर्थन करतो!
म्हणजे काय?
म्हणजे 'वय वर्षे १८ अधिक' अशा समूहा चे वावडे उपक्रमाला का असावे बरं? ~

बापरे

ही सोपी कोडी आहेत?
वाला राव,
आपण कृपया अशी बुद्धीला चालना देणारी कोडी देत रहा. याने उपक्रमावर एक चांगला कोड्यांचा साठा तायर होईल आणि नोकरी परीक्षांच्या वेळी वापरता येईल. आणि अशी बरीच कोडी इतरांनी सोडवलेली पाहिल्यावर मलाही कधीतरी सर्वात पहिल्यांदा उत्तर देता येईल ही आशा.

माहिती आणि विचारांची देवाणघेवाण..ही ही ही

'कोडी घालणे' (!!) हे उपक्रमाच्या माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीच्या सोकॉल्ड ध्येयधोरणात कसे काय बसते हे कळले नाही.

मजकूर संपादित.

असो!

आपला,
(हलकट कोकणी) तात्या.

मिसळपाव डॉट कॉमच्या संपादक मंडळात प्रवेशभरती सुरू आहे. इच्छुकांनी संत तात्याबांकडे अर्ज करावेत! ;)

सत्यनारायण

या कोड्याचे उत्तर श्री. तो यांनी सर्वप्रथम पाठवले आहे. ते अचूक आहे. अभिनंदन!
.......यनावाला

संदर्भ

एक शंका.

आपल्याला ही कोडी सुचली आहेत की, आपण ती कुठून आणता आहात?
(नाही, एखदी गोष्ट अगदी स्वतः ला सुचली नाही, तर ती माणूस कुठेतरी वाचतो. ती त्याला इतकी आवडते की त्याला वाटायला लागते हे तर 'आपणच' म्हंटले आहे.)
जर उसनी आणत असाल तर संदर्भ द्यायला काय हरकत आहे?
(याचे त्याचे विचार निर्लज्ज पणे ढापून वापरणारा...)
गुंड्या
~ उपक्रम वयाने वाढावे ह्याचे मी समर्थन करतो!
म्हणजे काय?
म्हणजे 'वय वर्षे १८ अधिक' अशा समूहा चे वावडे उपक्रमाला का असावे बरं? ~

अजून

आपल्याकडे Analytical रीझनिंग् / logical रीझनिंग् च्या कोड्यांचा साठा असेल तर तो पण इथे मोकळा करा.

कोडी अन त्रास.

कोडी वाचून वाचून, ती न सोडवता आल्यामूले, मला मळमळल्यासारखे होतेय.डॉक्टर म्हणाले "तसं काही काळजीचे कारण नाही.तुम्हाला अजून एक आठवडाही झाला नाही,इथे वावरायला. हा त्रास कोड्यांचा आहे तुम्हाला. तेव्हा कोडी वाचू नका.कोड्यांचा एखाद्यालाच असा त्रास होतो.यनावाल्यांची कोडी दिसली की,न वाचता प्रतिसाद द्यायचा.फार सूंदर कोडी आहेत म्हणून."करु का असा प्रयत्न.

ता.क.( कोड्यांपायी कुणाचा अधिक कालापव्यय होऊ नये. यास्तव ही सोपी कोडी आहेत.श्री.राज जैन यांची सूचना आहे तदनुसार उत्तरे व्यनी.तून पाठवावी ही विनंती.) या ऐवजी ज्यांना ज्यांना आवड आहे त्यांना कोडी व्य. नि.तून नाही का पाठवता येणार.

स्पष्टोक्ता.
नाना कोंडके

हम्म! पटले

ता.क.( कोड्यांपायी कुणाचा अधिक कालापव्यय होऊ नये. यास्तव ही सोपी कोडी आहेत.श्री.राज जैन यांची सूचना आहे तदनुसार उत्तरे व्यनी.तून पाठवावी ही विनंती.) या ऐवजी ज्यांना ज्यांना आवड आहे त्यांना कोडी व्य. नि.तून नाही का पाठवता येणार.

पटले तुमचे म्हणणे. फक्त यनावालांना कोड्यांची आवड कोणाकोणाला आहे त्याचा विदा पुरवावा लागेल, ज्यांना कोडी आवडत नाहीत त्यांनी ही जबाबदारी उचलावी म्हणजे त्यांना होणारा त्रास आपसूक बंद होईल. तसेच, आपला प्रश्न की कोडी व्य. नि.तून नाही का पाठवता येणार हा ही व्य. नि. तूनच विचारायला हवा होता, जाहिर काही लिहाच कशाला?

सत्यनारायण

सर्व अटी पाळून सव्वा सव्वा किलोचे तीन वाटे करण्यात मनीमाऊ यशस्वी झाल्या. अभिनंदन!
......यनावाला.

सत्यनारायण

आवडाबाई यांनी या कोड्याचे अचूक उत्तर शोधले. अभिनंदन!
.......यनावाला.

दोन लोककोडी

(|) मृदुला यांनी १.२५ किलो.चे तीन वाटे केले खरे. पण ४ दा वजने करावी लागली.
(||)चटई-तांब्या या कोड्याचे उत्तर पाठविणार्‍या मृदुला या अद्यापि एकमेवच.
उत्तर शोधण्यात त्या बव्हंशी यशस्वी झाल्या.रीतीत अजून सुधारणा शक्य आहे.
.....यनावाला.

कोडीकार्

आमची भाकिते ही नेहमी इतरांना कोड्यात टाकतात. पण या कोड्यांच नि आपल कधी जमल नाही. हे यनावाला म्हणजेच सुप्रसिद्ध् कोडीकार य.ना.वालावालकर. ज्यांनी कोड्याला प्रतिष्ठा दिली. अनेकांच्या बुद्धीला खाद्य दिलं
प्रकाश घाटपांडे

अच्छा तर असं आहे की,

अच्छा तर असं आहे की,
"मी नाही, मी नाही " असं म्हणता म्हणता काही लोक भाकितं पण वर्तवतात.
आणी 'आपण कोणाकोणाला ओळखतो' हे पण सांगतात!
कोडं जरा सुटल्या सारखं वाटतंय का?

(खोचक)
गुंडोपंत

~ उपक्रम वयाने वाढावे ह्याचे मी समर्थन करतो!
म्हणजे काय?
म्हणजे 'वय वर्षे १८ अधिक' अशा समूहा चे वावडे उपक्रमाला का असावे बरं? ~

कोडी

वालावलकर,
आपली सर्व कोडी खूप आवडतात.विशेषतः त्यातली पात्रांची नावे.अगदी सर्वात पहिल्यांदा कोड्याचं उत्तर देता आलं नाही तरी इतरांची उत्तरे आणि स्पष्टीकरणे वाचायला आवडतात.
मला मागे एका नोकरी मुलाखतीला असेच काहीतरी पाच लिटरचा जग वापरुन ९ लिटर पाण्यातले तीन लिटर बाजूला काढा की असाच कायसासा प्रश्न आला होता.
कृपया आणखी येऊ द्यावी. उपक्रमाच्या ध्येयात न बसणार्‍या अनेक इतर गोष्टी /लेख अजून उपक्रमावरच आहेत. नरकात गेलेले नाहीत. आणि मुळात कोडी ही 'गणित' आणि 'तार्किक विचार करण्याची दिशा' यामुळे उपक्रमाच्या धोरणात बसतात असे वाटते. तरी कृपया नकारर्थी प्रतिसादांमुळे कोडी देणे सोडू नका.
पुढील कोड्यांसाठी शुभेच्छा.
(मी आणि नवर्‍याने काल गव्हाच्या कोड्यावर विचार करुन उत्तर शोधले. ते आमच्या दोघांपैकी एकाच्या व्य. नि. तून पाठवले आहे.)
आपला व्याकरणाचा व्यासंगही बराच आहे. व्याकरणातल्या एखाद्या विषयावर लेखही आवडेल.

सहमत आहे

मुळात कोडी ही 'गणित' आणि 'तार्किक विचार करण्याची दिशा' यामुळे उपक्रमाच्या धोरणात बसतात असे वाटते.

सहमत आहे. अश्या गणिती आणि तर्कशास्त्रीय प्रश्नांमुळे आणि त्यांच्या उत्तरासाठी प्रतिसादातून होणार्‍या चर्चेमुळे सहभागी होणार्‍यांनाच नव्हे तर वाचकांनाही फायदा होतो असे वाटते. ज्यांना गणिताची आवड आहे त्यांना आपली कौशल्ये चकचकीत (पॉलिश्डः)) ठेवण्यासाठी आणि इतरांना गणिताची आवड लागण्यासाठी याचा खूपच उपयोग होईल असे वाटते.

अवांतर - इन्फोसिस या भारतातील अग्रेसर आणि गुंतवणुकदारांच्या लाडक्या कंपनीच्या प्रवेशपरीक्षेत फक्त आणि फक्त कोडीच असतात (म्हणजे काही वर्षापूर्वीपर्यंत असायची, आता बदलले असल्यास माहीत नाही.)

को (खो)डी

कोडी सोडवण्याचा प्रयत्न करताना हँग ओव्हर (जडत्व)येतो. काही उपाय आहे का ?
प्रकाश घाटपांडे

हे ही एक कोडेच..

कोडी सोडवण्याचा प्रयत्न करताना हँग ओव्हर (जडत्व)येतो. काही उपाय आहे का ?

हेही एक कोडेच आहे आणि त्याचे उत्तर आमचे वालावलकरशेठच देऊ जाणे! ;)

तात्या.

प्रसिद्ध लेखक आणि जालावरील इतर लेखक यांच्यात मिसळपाव डॉट कॉमवर कोणताही भेदभाव केला जाणार नाही! एखाद्याचे लेखन ध्येयधोरणात बसत नसले तरी त्याची पंधरा पंधरा भागांची मालिका प्रसिद्ध करायची आणि एखाद्याचे लेखन ध्येयधोरणात बसत नाही म्हणून क्षणात उडवून लावायचे, असला हलकट प्रकार मिसळपाव डॉट कॉमवर नसेल!

उपक्रम पंत

उपक्रम पंत, या लेखातील या विषयाला सुसंगत नसलेले प्रतिसाद काढावेत हि नम्र विनंती.


मराठीत लिहा. वापरा.

दोन लोककोडी

श्री.दिगम्भा यांनी 'सत्यनारायण' कोड्याचे उत्तर पाठविले. ते अचूक आहेच.
**त्यांनी ' चटई- तांब्या' याचेही उत्तर अचूक दिले. ते कोडे त्यांनी पूर्वी वाचले होते असे लिहिले आहे. कांही वर्षांपूर्वी 'सकाळ' (पुणे) मधे 'तर्कक्रीडा' याच शीर्षकाचे गणिती आणि तार्किक कोड्यांचे साप्ताहिक सदर मी लिहीत होतो. त्यात हे प्रसिद्ध झाले होते.

तेथे वाचले नव्हते

मी ते कोडे तर्कक्रीडा/सकाळ मध्ये वाचले नव्हते, अन्यत्र इंग्रजीतून वाचले होते, गैरसमज नसावा.

- दिगम्भा

म्हणजे?

अन्यत्र म्हणजे कुठे हो दिगम्भाशेठ ?
मी यनावाला यांना पुर्वी ही असे आवाहन केले आहे की,
ही कोडी ते कुठून आणी कशी आणतात हे संदर्भ देणे योग्य ठरेल.

पण त्यांनी त्याला अनुल्लेखाच्या युक्तीने त्याला प्रतिसाद
देणे टाळले आहे.

आमचा एक मित्र असे इंग्रजीतले सायकॉलॉजीचे लेख वाचून आम्हाला त्याचे डोस देत असे. एकदा लायब्ररीत आम्हालाच काही सायकॉलॉजीचे लेख मिळाले. त्या मित्राने सायंकाळी भेटल्यावर डोस द्यायला सुरुवात करताच, पुढचे आम्हीच सांगुन मोकळे झालो. तो चाट! मग चांगला झापला त्याला संदर्भ देण्यावरून.
सांगण्याचा उद्देश असा की; आपण काही सगळे आपलेच विचार देत नसतो. कुणाचे तरी विचार आपण काही सरमिसळ(पाव) करुन वापरत असतो.
मग जे आपले नाहीचे त्याचा संदर्भ द्यायला काय हरकत?
काय म्हणता?

(संदर्भासहित)
आपला
गुंडोपंत

~ उपक्रम वयाने वाढावे ह्याचे मी समर्थन करतो!~

गुंडो यांना उत्तर

गुंडोपंत,
आपल्याला कोड्यांत ती सोडवण्याइतका रस नाही हे उघड आहे, मग आपण ऋषींचे कूळ व नदीचे मूळ यात एवढे स्वारस्य का घेत आहात?
या बाबतीत माझे मत असे आहे की नाचणार्‍या मोराच्या मागे जाऊन पहायचा खटाटोप करू नये, त्याचे खरे सौंदर्य समोरूनच दिसते.
कोडी वरिजिनल आहेत की नान्-वरिजिनल यात कोडी सोडवणार्‍याला रस नसतो, ती चांगली की वाईट एवढेच तो बघतो. आणि जगात ओरिजिनल फारच कमी गोष्टी असतात. तेव्हा यनावालाजींना टोचून बोलण्याची गुंडोगिरी करण्याचे आपल्याला काहीच कारण नाही.
माझे स्वतःचे कोडे कोणी चोरले असते तर परिस्थिती वेगळी झाली असती. पण ही शक्यता मुळातच कमी, कारण कोडी बनवणे ही महान गोष्ट आहे व तुमच्या-माझ्या आवाक्यातली नाही. म्हणून यनावालाजींच्या बद्दल अशा रीतीने संशय व्यक्त करण्याऐवजी आपण आदर बाळगून रहावे हे योग्य.
हो, आणि मी ते कोडे कुठे वाचले होते ते मला आठवत नाही, हे आपल्या प्रश्नाचे उत्तर. ते राहून जायला नको - नाहीतर जन्मभर छळाल;))
सस्नेह,
- दिगम्भा

आम्हाला आठवतंय! ;)

आणि मूळ माहिती देणार्‍यावर जेव्हा "हे फक्त अमुक तमुक गोष्टीचे मराठीकरण आहे" असा बिनबुडाचा आरोप करण्यात येतो, तेव्हा लेखकाला किती संताप येतो, ह्याचे उदाहरण आपल्याला माहिती असेलच.

दिगम्भाशेठचे माहीत नाही, पण आम्हाला मात्र वरील उदाहरण चांगलेच आठवत आहे हे इथे नमूद करू इच्छितो! ;)

आपला,
तात्यागद्धा वरकर्णी!

कशी काय

माहितीच्या देवाणघेवाणीत मूळ माहिती कुठलीही असो, त्याच्या प्रकटीकरणाला जे प्रयत्न लागतात (विशेषतः माहितीसाठी अनवट असलेल्या मराठी भाषेत), त्याचे कौतुक करायलाच हवे.

हे मान्य!
पण ही माहिती कुठुन आली याचे काहीच नाही का?
उद्या मी तुमचा एक प्रकाशित झालेला पेपर मराठीत आणला तर हे कुठुन आले याचा काही माग द्यायला नको? अशी उचलेगीरी कशी काय चालते बुवा तुमच्याकडे?

आपला
गुंडोपंत

~ उपक्रम वयाने वाढावे ह्याचे मी समर्थन करतो!~

बरं बुवा!

बरं बुवा!
सोडलं संदर्भ देण्याचं आता खुष?

आपण ऋषींचे कूळ व नदीचे मूळ यात एवढे स्वारस्य का घेत आहात?

अरे काय चाललय काय?
कोणताही संदर्भ मागण्यात गैर ते काय आहे? आणी वाईट वाटण्यासारखे तरी काय आहे? आणी तुमच्या प्रतिसादाला चक्क युयुत्सुंचा प्रतिसाद? फाऊल धरावा असे म्हणणार्‍या माणसा कडून? ज्यांनी अनेक पेपर्स प्रसिद्ध केले आहेत ते? दिलाय का कधी एक तरी प्रकाशनाला संदर्भांशिवाय? (मैत्रि निभावताय वाटते दिगम्भांबरोबर?) का ते पेपर्स इंग्रजी मध्ये आहेत म्हणून कुळ विचारले तर चालते?

कोडी कुठुनही आणली तरी चालतील. मी मराठीकरणाच्या अजिबात विरोधात नाही हे स्पष्टपणे सांगतो. पण मराठी पुढे न्यायची असेल तर संदर्भ देणे हेच योग्य आहे.

संदर्भामुळेच विकास होतो यावर माझा ठाम विश्वास आहे. ही परंपरा भारतातही होती/आहे. कोणत्याही किर्तनकाराचे किर्तन ऐका, अभंगांचा संदर्भ दिला जातो. मग इथे सूट का?
जरा मनाला भावणार्‍या भाषेत कोडी आहेत म्हणून?
संदर्भ देण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील कोणतीही वापरता येईल. युयुत्सु तर अवश्य सांगु शकतील त्या पद्धती खुलसेवार.

आपला
गुंडोपंत
~ मराठी मध्ये संदर्भ देणे महत्वाचे आहे ह्याचे मी समर्थन करतो!~

कोड्यांचे संदर्भ

श्री.गुंडोपंत यांस,
सप्रेम नमस्कार." माहिती दुसरी कडून घेतली असेल तर त्याचा संदर्भ द्यावा " हे आपले म्हणणे रास्त असून मला पूर्णतया मान्य आहे. पण कोड्यांच्या बाबतीत काय होते तर कोडे आपण कुठेतरी कधीतरी वाचलेले असते. आपण ते सोडविण्याचा प्रयत्न करतो,सोडवतो. आपले मित्र कोडी घालतात त्यावर आपण विचार करतो.पण हे सर्व संदर्भ आपण टिपून ठेवत नाही.(मी तरी नाही) . कोडे विसरले जाते. पण चांगल्या कोड्याची मध्यवर्ती कल्पना स्म्ररणात रहाते.त्यावर आधारित कोडे लिहिता येते. गणिती तत्त्वे आपल्याला ज्ञात असतात. त्यांवर आधारित कोडी सहज लिहिता येतात.कोडी लेखन म्हणजे काही प्रतिभेचा मोठा आविष्कार नव्हे की विचारपरिप्लुत असा प्रबंध नव्हे. विरंगुळा,मनोरंजन हे त्याचे उद्दिष्ट आहे.
तर्कक्रीडा सदरातील प्रत्येक कोड्याचे लेखन माझे स्वतःचे आहे. काही कोड्यांच्या मध्यवर्ती कल्पना पूर्वी माहित असलेल्या आहेत. जिथे निश्चित माहित आहे तिथे संदर्भ दिलेला आहे.
दै.सकाळ मधे तर्कक्रीडा हे सदर मी तीन वर्षे लिहिले.(सदर साप्ताहिक होते). सकाळचा वाचक वर्ग मोठा आहे. ही कोडी इंग्रजीतून उचलून भाषांतरित करून दिली असती तर अनेक जागृत वाचकांनी सकाळकडे पत्रे लिहून कळविले असते आणि सदर कधीच बंद पडले असते.
असो.आपल्या सूचने अनुसार यापुढे संदर्भ देण्यात अधिक प्रयत्नशील राहीन.
.............यनावाला.

श्री. यनावाला यांस,

नमस्कार मंडळी ,
आपण सर्वांनीच मोकळेपणाने प्रतिसाद दिला आहे.
सर्व मुद्यांचा व शंकांचा खुलासा झालाच आहे. या वरील साद- प्रतिसाद - विवाद, यात आम्ही जर चुकुन काही आगळीक केली असेल तर क्षमा करा. वालावलकर साहेब आपणा विषयी कधी संशय नाहिये आणी नसेल. आपली कोडी ही उत्तम आहेत. मला खात्री आहे की या कोड्यांचा स्पर्धा परिक्षा सारख्या ठिकाणी चांगलाच उपयोग होत आहे. आपल्या व्यासंगामुळे इतर लोक आपणास नवीन पुस्तके, दुवे माहिती देत असतीलच. जसे जमेल तसे ही माहिती संकलित करुन प्रकाशित केलीत तर मराठी मध्ये लॉजिकल रिझनिंगच्या कोड्यांचे एक छान भांडार बनेल. माझा पहिला प्रतिसाद आपण दृष्टीआड करुन आपण हा उपक्रम असाच चालू ठेवा अशी माझी नम्र विनंती आहे.

युयुत्सु राव, कॉपीराईट (आणी कॉपीलेफ्ट) या विषयावर एक् चर्चा नक्की घेउ या. मला खात्री आहे खुप उपयोगी ठरेल.

प्रियालीताई, आपण माहिती दिलीत ती नेहमी प्रमाणेच अभ्यासपुर्ण आहे.
आपले कोड्यांच्या भषे बद्दलचे लेखन तर अगदी योग्य आहे. कोडी खुलवण्यात त्यातुन एक किस्सा बनवण्यात पण मजा असते हे खरे आहे.

दिगम्भाराव,
आपणाही चर्चा नक्की सुरु ठेउ या आणी बिनधास्त ठेउ या! काही प्रमाणात युयुत्सुंचीच प्रेरणा आहे हे 'का आणी कसे विचारण्याला'. आम्ही कितीही भांडलो तरी ते मुद्या पुरते आहे हे ध्यानात ठेवा... तुमच्याशी संवाद साधतांना काही आगळीक केली असेल तर क्षमा करा.

अनेक मुद्यांचा उहापोह अजून व्हायला हवा आहे. प्रश्नांची उत्तरेही द्यायला हवी आहेत. तरी ही हा (सं)वाद आता इथे संपवु या!
परत एकदा, काही आगळीक केली असेल तर क्षमा करा.
आपला नम्र
गुंडोपंत
~ उपक्रमावर नदीचे मुळ नि ऋषींचे कुळ विचारलेच जावेत ह्याचे मी समर्थन करतो ;) ~

जाऊद्या हो

(मला उद्देशून लिहिल्यासारखा भास झाला म्हणून हे लिहितो आहे.)

पंत, रागावू नका.

(आपल्याला कोड्यांत ती सोडवण्याइतका रस नाही हे उघड आहे, मग आपण ऋषींचे कूळ व नदीचे मूळ यात एवढे स्वारस्य का घेत आहात?)

माझ्या उपरोल्लेखित वाक्याचा पूर्वार्ध सोडून देऊन फक्त उत्तरार्ध विचारात घेतला तर जसा आव्हानात्मक अर्थ लागतो तसा मला अभिप्रेत नव्हता.
एक ध्यानात घ्या. जादू, कोडी, चुटके, खेळ या सगळ्या मनोरंजनाच्या गोष्टी आहेत. त्यात अन्य गंभीर लेखाप्रमाणे किंवा संशोधनात्मक लेखनाप्रमाणे कोणी संदर्भ विचारत नाही आणि देतही नाही. आतापर्यंत प्रत्येक जादू कशी केली, तिचा इतिहास काय, ती कोणाकडून शिकली याचा तपशील देणारा एकही जादूगार मला भेटलेला नाही. आपण तरी प्रत्येक विनोद सांगताना तो कोणाकडून ऐकला, कुठल्या मासिकात वाचला वगैरे पेडिग्री देत बसतो का?

कोडी घालणार्‍या व सोडवणार्‍यांच्या मैफिलीत आपल्यासारख्या मूलतः त्या विषयात रस नसलेल्या सद्गृहस्थाने अशा प्रकारच्या शंका विचारून त्यांचा रसभंग करणे बरे नव्हे असे व एवढेच मला म्हणायचे होते.

असे पहा, हे यनावालांचे मैदान आहे, त्यांचा हा खेळ आहे, ते व त्यांचे फ्यान्स इथले खेळाडू आहेत. या सर्वात आपण आपले चित्त कशाला अडकवून घ्यायचे?
एकदिवशी सामन्याच्या वेळी आपण जाऊन सचीनला म्हणू का की बाबा आम्हाला तुझ्या क्रिकेटमध्ये काही रस नाही पण तू प्रत्येक वेळी खेळताना बॅट कुठल्या दुकानातून घेतलीस हे सांगणे आवश्यक आहे?

त्यासाठी व्यनि आहेत. किंवा आपल्या शिरस्त्याप्रमाणे तुम्ही वेगळा लेख/प्रस्ताव लिहून हाच प्रश्न पुन्हा काढू शकता, तिथे दिलखुलासपणे हवी तेवढी चर्चा होऊ शकते. वाटल्यास आपण यनावालांना तिथे पाचारण करून हेच प्रश्न विचारू. संदर्भ देणे आवश्यक आहे किंवा कसे याचा आणखी खोलवर ऊहापोह करू.

युयुत्सूंप्रमाणे मी अमेरिकन नाही, पक्का भारतीय आहे. त्यामुळे सर्व ज्ञान सर्वांची सार्वजनिक मालमत्ता असते व संदर्भ न देताही वाट्टेल ते ज्ञान वाट्टेल तिथे पाजळता येते, त्या बाबतीत आपण कोणाच्या बापाला घाबरायचे कारण नाही अशी माझी समजूत आहे. नैतिक, कायद्याचे, वगैरे अडथळे भारत व चीनमध्ये कधी आलेले ऐकले आहेत का?
आता असे वागणे योग्य की अयोग्य हा मुद्दा त्या चर्चेसाठी ठेवूया.

आणि, गुंड्याभाऊ, युयुत्सूंच्या इंटिग्रिटीला तुम्ही काय समजलात? केवळ मैत्रीसाठी ते कुठल्याही बकवास गोष्टीला पाठिंबा देतील असे तुम्हाला वाटले तरी कसे? अहो, क्षणभर त्यांना मी लिहिल्यापैकी कुठला तरी मुद्दा भावल्यासारखे झाले म्हणून त्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. आतापर्यंत त्यांना आठवतही नसेल तो कोणता मुद्दा होता ते.

पहा बुवा.

- दिगम्भा

कोड्यांचे संदर्भ - रेमंड स्मलयन

इतरांपेक्षा खास वेगळे काहीच सांगायचे नाही आणि सांगायचेच झाले तर फक्त गुंडोपंतांनाच नाही. कोड्यांचे संदर्भ प्रत्येक ठिकाणी देता येतीलच असे नाही. तसेही हे कोडे मला ट्रेनमधल्या एका गृहस्थाने सांगितले अशाप्रकारचे संदर्भ देण्यात फारसा काही प्वाईंट दिसत नाही. विनोद आणि कोडी फिरून फिरून जगभर पोहोचतात त्यामुळे प्रत्येक वेळेस संदर्भ आवश्यक नसतो परंतु एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या कोड्यांचा उपयोग केला असेल, विशेषतः जी कोडी त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहेत अशा व्यक्तींचा उल्लेख मात्र करावा.

यनावालांच्या एका कोड्यात मला प्रसिद्ध गणिती रेमंड स्मलयन यांच्या नावाचा उल्लेख/ संदर्भ सापडला. सहज म्हणून संदर्भ चाळले तर त्यांच्या 'द रिडल ऑफ शहरझादी' या पुस्तकाबद्दल वाचायला मिळाले. आज ग्रंथालयातून हे पुस्तक आणले.

साधे गणिती प्रश्न (क्ष ने ला अमुक देणे आहे प्रकारचे) या पुस्तकात अरेबियन नाईट्सच्या पात्रांचा आणि कथांचा उपयोग करून अतिशय खुबीने दिलेले आहेत. जसे,

अब्दुल नावाच्या जवाहर्‍याचे दुकान १० चोरांनी लुटले. त्यापैकी काही सशस्त्र होते तर काहींकडे शस्त्रे नव्हती. सशस्त्र चोर जुने जाणते होते तर बाकीचे त्यामानाने नवे. असो, त्यांनी ५६ रत्नांची पिशवी चोरली. वाटणी करताना सशस्त्र चोरांना ६ तर शस्त्रहीन चोरांना ५ रत्ने मिळाली. तर सशस्र चोर किती?

अशी कोडी सोडवायला जितकी गंमत वाटते तेवढी ती वाचायलाही गंमत वाटते. कोडी खुलवण्याची ही पद्धत यनावालांनीही येथे राखली आहे. मला स्वतःला कोडी सोडवण्यात खूप स्वारस्य असतेच असे नाही, (कंटाळा करणे हा मुख्य भाग) गेल्या कित्येक वर्षांत शब्दकोडेही नाही सोडवलेले परंतु एखाद्याने ते केले तर कौतुक वाटते याच बरोबर ती कोडी कशी मांडली आहेत, कशी खुलवली आहेत याचेही कौतुक वाटते.

ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये असे अल्पसंतुष्ट माणसे म्हणत असावीत कारण या दोन्ही गोष्टी शोधून मिळाल्या आहेत की, तेव्हा ते शोधण्यात काहीही गैर नाही. प्रश्न असा की आम्ही नक्की काय शोधतो? ट्रेनमधले कोणी गृहस्थ शोधण्यापेक्षा मला हे शहरझादीच्या कोड्यांचे पुस्तक मिळाले ते महत्त्वाचे वाटले.

सत्यनारायण

श्री. चाणक्य यांच्याकडून या कोड्याचे अगदी अचूक उत्तर आले. अभिनंदन!

धन्यवाद

धन्यवाद. अजुन कोडी येउ देत.


मराठीत लिहा. वापरा.

हा उपक्रम थांबवू नये

कोड्यांचा उपक्रम थांबवू नये. ज्यांना यात रस नाही त्यांना न वाचण्याचे स्वातंत्र्य आहेच.

दोन लोककोडी

वरदा यांनी पहिल्या कोड्याचे उत्तर बरोबर दिले. अभिनंदन!
चटई-तांब्या कोड्याचेही त्यांनी उत्तर दिले आहे. मात्र ते पटण्यासारखे नाही.

तर्क.१५: दोन लोककोडी

सत्यनारायण :...याचे उत्तर सर्वांनी अचूक दिले.
**एका पारड्यात (१ किलो.वजन+१॥ किलो गहू) तर दुसर्‍यात २॥ किलो गहू असा समतोल करावा.
**(१ किलो वजन +१॥ किलो.गहू) बाहेर काढून २॥ किलो गव्हाचा दोन पारड्यात समतोल करावा.म्हणजे १। किलोचे २भाग मिळतील.
** आता ३ रा सवा किलोचा भाग कसा मिळवावा हे स्पष्टच आहे.
.............................................................................
चटई आणि तांब्या :...याचे उत्तर मृदुला आणि वरदा यांनी कांही अंशी दिले. मृदुला लिहितात :"चटई गुंडाळावी. मात्र गुंडाळी खालच्या बाजूला ठेवावी....तांब्या सरकत जाईल. असे करत करत तांब्याखालून चटई सावकाश काढून घ्यावी." हे शक्य वाटत नाही. कारण चटई तिरपी होऊन तांब्या कलंडण्याचा संभव.
...खरेतर चटईचा स्पर्श तांब्याला झालाच आहे."अन्य कोणत्याही वस्तूचा स्पर्श न करता..." असे लिहिले आहे.
...म्हणून सतरंजी नेहमी प्रमाणेच पण हळूहळू आणि घट्ट गुंडाळीत जावे.गुंडाळी तांब्याजवळ आली की तिनेच तांब्या पुढे ढकलला जाईल. शेवटी हळुवारपणे फरशीवर येईल.
************************

(पुणे सकाळ मधे ' तर्कक्रीडा' नावाचे साप्तहिक सदर मी तीन वर्षे लिहिले.(२००१ ते २००३).इथली बहुतेक कोडी तिथलीच.तांब्याला सतरंजीचा स्पर्श झालाच आहे.आता सतरंजी सोडून अन्य कोणत्याही.........हा त्या कोड्यातील ठळक भाग मी इथे हेतुतः गाळला.पण ती चूक झाली.दिला असता तर अनेकांना उत्तर सापडले असते.मृदुला यांना उलट्या गुंडाळीची खटपट करावी लागली नसती.)

कोडीकार

श्री. प्रकाश घाटपांडे यांनी जे लिहिले आहे त्यांतील,"यनावाला म्हणजे कोडीकार य. ना. वालावलकर" एवढ्या एकाच गोष्टीशी मी सहमत आहे.
..........यनावाला

 
^ वर