आली माहेरपणाला

आली माहेरपणाला

व्यथा कोणाला चुकल्या आहेत ? लहान बालक, तरुण प्रियकर-प्रेयसी, वृद्ध आईवदील, शंबुक-एकलव्यासारखे खालील स्तरातील माणसे व त्यांना शिक्षा देणारे राम-द्रोणाचार्य यांसारखी उच्च स्तरातील राजे-राजगुरू, "जाणता राजा" शिवशंभू व क्रूरकर्मा पादशहा औरंगजेब, दोन वेळा जेवण मिळावयाची भ्रांती असणारे श्रमिक व कोट्यावधींचा घोटाळे करणारे राजकारणी, मनस्वी कलाकार, सर्वांना काही ना काही व्यथा आहेतच. वैयक्तिक माणसे सोडाच पण समाजाचा एखादा संपूर्ण घटकच व्यथित असू शकतो. या सर्वांचे प्रतिबिंब साहित्यात उठणारच आणि शृंगार रसांचा राजा म्हणून गौरवला गेला असला तरी तुमच्या लक्षात दीर्घ काळ राहिलेली कविता-कथा ही करुणेतच चिंब भिजलेली असते. अशा काही कवितांची ओळख आपण करून घेणार आहोत. आता मी लिहणार म्हटले म्हणजे या कविता किमान पन्नासएक वर्षे जुन्या असणार हे आलेच. पण तरीही त्यातील भळभळणारी वेदना आजही, बदलत्या काळातही, तुमच्या हृदयाला चटका लावून जाईल.

कै. इंदिरा संत यांच्या काव्याला त्यांच्या वैयक्तिक जीवनातील आघातामुळे दु:खाची किनार लाभली. त्यांच्या बहुतेक सगळ्याच कवितांवर जोगियाच्या आर्त स्वरांची सावट पडलेली तुम्हाला दिसेल. पण अतिशय संयत शब्दांत व्यक्त केलेली अभिव्यक्ती हुरहुर लावून जाते. त्यांच्या "शेला" (१९५१) या संग्रहातील "आली माहेरपणाला" ही कविता बघा :

आली माहेरपणाला ;
आणा शेवंतीची वेणी,
पाचूमरव्याचे तुरें,
जरीकुसर देखणी !

आली माहेरपणाला ;
आणा रवा-तूप-लोणी ;
केशरवेलचीचा
वास भरे कोनोकोनी !

आली माहेरपणाला ;
चाले कौतुक सोपयांत,
माजघरीं, चुलीपाशीं,
झेंडूच्याही फुलोर्‍यांत !

कौतकाची गोड लाट
अशी येतां अंगावर
थरथर पापणींत
आणि डोळे कुठे दूर !

नव्या जाणिवेची कळ
कशी कुणा सांगायाची ;
नव्या संसाराची राणी---
राणी नाही हृदयाची !

एके काळीं माहेरवाशीण पहिल्यांदी माहेरी आली कीं तो एक सणच असे, विशेषत : लहान गावांत, खेडेगावात. दसर्‍या-दिवाळीपेक्षा जास्त आनंदाचा. कौतकाचा भाग जास्त. लहानथोरांना काय करूं, काय नाही असे होऊन जाई. लहानसहान गोष्टीना मह्त्व प्राप्त होई. परसातील शेवंती; जी फक्त देवपूजेसाठी परडीत गोळा व्हावयाची, तिची आता वेणी केली जाऊ लागली. पाचू-मरवा या तश्या दुर्लक्षित रहाणार्‍या सुगंधी रोपट्यांकडे आता लक्ष जावू लागले. लाडू जरी अधूनमधून होत असले तरी आतांच्या लाडवांकरतां केशर-वेलची हवी अशा मागण्या चुलीपासून बाहेरच्या ओसरीपर्यंत पोचू लागल्या. स्वयंपाकघरात, माजघरांत,सोप्यात, घरात सर्वत्र पसरलेली ही कौतुकची लाट पार परसातील बागेतही पोचली तर नवल नव्हे.

ही लाट, उर्दू शायरीत म्हटले आहे त्या प्रमाणे " मह्सूस कर सकता हुं, छू नही सकता" अशी जाणवणारी. इथ पर्यंत सगळे कसे सुखावून सोडणारे, आपल्यालाही त्या लाटेत सामिल करून घेणारे. पण पुढील कडव्यात एकदम पाल चुकचुकते. जिच्या करता हे सर्व चाललेले तिचे काय ? तिची पापणी थरथरणारी व डोळे मात्र यात कुठेच नाहीत; ते दूर काहीतरी शोध घेण्यात गुंतलेले !

कसे सांगावयाचे ? कुणाला सांगावयाचे ? काय सांगावयाचे ? सर्वजण आनंदात असतांना त्यांच्या सुखाला विरजण कसे काय लावणार ? कसे सांगाव्याचे की तुम्हाला दिसणारी ही नव्या संसाराची राणी, तिला जे काय हवे आहे ते मिळवण्यात अपयशी ठरली आहे !

या climax ला कविता संपते. कविता संपते म्हणजे कवियत्री स्वत : काही सांगावयाचे थांबविते. आता तिला काही सांगावयाचे उरलेले नाही. पुढे जे काही काव्य आहे, खरे म्हणजे अधुरी कहाणीच, ती आता रसिक वाचकाने स्वत:च लिहायाची आहे. सहृदयतेने स्वत:च्या मनात.फार थोड्या कविता वाचकाला असे आपल्यात सामील करून घेतात. व सामील करून घेतल्यावर आपल्या खोल मनात दुसरी कविता लिहण्यस प्रवृत्त करतात.

शरद

Comments

छान

छान कविता व रसग्रहण. अशा 'करुणेत चिंब भिजलेल्या' आणखी कवितांविषयी लिहा.
आता मी लिहणार म्हटले म्हणजे या कविता किमान पन्नासएक वर्षे जुन्या असणार हे आलेच.
वा वा. हे तर तुमच्या लेखनाचे आणखी एक बलस्थानच म्हणायचे. एरवी चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्यांना आणि दमलेल्या बाबाच्या कहाण्यांना कविता म्हणावे लागते.
कै. इंदिरा संत यांच्या काव्याला त्यांच्या वैयक्तिक जीवनातील आघातामुळे दु:खाची किनार लाभली
इंदिराबाईंच्या खाजगी जीवनाची चिरफाड न करता आणि त्यांच्या जीवनातील खाजगीपणाबद्दल आदर बाळगून याविषयीही काही लिहिता आले तर लिहा. लेखक / लेखिकांची जडणघडण बघीतली की त्यांच्या लेखनाचाही काहीसा उलगडा होतो. 'रायटिंग, नॉट दी रायटर!' हे खरे असले तरी. अगदी वेगळे उदाहरण द्यायचे तर मायकेलअँजेलोने घडवलेले रेखीव, देखणे, प्रमाणबद्ध नग्न पुरुषांचे पुतळे बघताना यामागे त्याला स्वतःला नर देहाचे असलेले आकर्षण हे कारण ध्यानात घेतले तर त्याची कला अधिक कळल्यासारखी वाटते.
सन्जोप राव
ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया
ये इन्सां के दुश्मन रवाजों की दुनिया
ये दौलत के भूखे समाजों की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है

किमान पन्नासएक वर्षे जुन्या

अत्यंत सुंदर रसग्रहण. शाळेत असतांना वाचलेली कविता पूर्णपणे समजण्याचे ते वय नव्हते. त्यानंतर इतक्या वर्षांनी ली पुन्हा वाचायला मिळाली आणि मजा आली.
किमान पन्नासएक वर्षे जुन्या काळाचा ज्यांना अनुभव आहे त्यांना निश्चितच त्यातले गांभिर्य चांगले समजेल. आता जागतिक खेड्यात राहणार्‍या आणि मोबाइल फोनवर सतत एकमेकांच्या संपर्कात असणार्‍या पिढीला कदाचित त्यातली तीव्रता कळणार नाही.

सुंदर

कविता आणि रसग्रहण सुंदर आहे.

>>मोबाइल फोनवर सतत एकमेकांच्या संपर्कात असणार्‍या पिढीला कदाचित त्यातली तीव्रता कळणार नाही.

याच्याशी असहमत आहे.

ऑनसाईट असल्याने महिन्यातून एकदा घरी ४ दिवस जायला मिळते. त्यावेळी (पुरुष असूनही) कवितेत वर्णन केलेली भावना (स्वतःतर) अनुभवली जातेच; पण चार दिवसांसाठी घरी आलेल्याला खुश ठेवण्याची घरच्यांची धडपड सुद्धा अनुभवायला मिळते.

ती भावना सतत संपर्कात असण्या नसण्याने बदलत नाही.

नितिन थत्ते

रसग्रहण मस्त

रसग्रहण आवडलेच..
शिवाय ही भावना हळूहळू केवळ स्त्री नाहि तर पुरुषांनाही जवळची वाटु लागेल हे पटले.. जोडपी आता मुलाच्या व मुलीच्या पालकांपासून वेगळी राहु लागली आहेत. अश्यावेळी आपल्या पालकांकडे गेल्यावर ही धडपड/लगबग/जिव्हाळा बहुतेक प्रत्येकाला अनुभवास येतो..

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

कविता आणि रसग्रहण

कविता आणि रसग्रहण, दोन्ही आवडले.

त्यातील भळभळणारी वेदना आजही, बदलत्या काळातही, तुमच्या हृदयाला चटका लावून जाईल.

खरे आहे... शेवटचे कडवे वाचून मन उदास झाले. लग्न झाल्यावर मुलीला आपल्या लहान-मोठ्या प्रत्येक सुखासाठी धडपडणार्‍या आई-बापाला आपल्या मनीचे दु:ख सांगायला धजावतच नाही. त्यामुळे, मुलीने चेहर्‍यावर आणलेले उसने हसू पाहून आईबापाला तिचे कौतुक आणि मनात समाधान वाटत असते. त्याचवेळी मुलीच्या मनात मात्र अश्रूंच्या धारा असतात.
फार केविलवाणा आणि मन पिळवटून टाकणारा प्रसंग!

कै. नको

कै. इंदिरा संत

इथे कै. नको. कवी/कवयित्रीच्या नावाआधी असे लिहिण्याचा प्रघात नाही असे वाटते. ख्रिस्तवासी/लेट शेक्सपिअर, पैंगंबरवासी/मरहूम मीर, बुद्धवासी बाशो असे कुठे वाचल्याचे आठवत नाही. तसाही चांगला कवी त्याच्या कवितेतूनच जिवंतच असतो. बाकी रसग्रहण छानच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

छान रसग्रहण

छान रसग्रहण. माहेर सोडून जे हरवलं आहे ते तर कौतुकापोटी दामदुपटीने पदरात पडतंय. पण हे सगळं सोडून जे कमवण्यासाठी गेले त्याच्या नावे घागर रिकामीच आहे...

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

 
^ वर