छंदिष्ट की नादिष्ट?

एकेकाळी बहुतेक मुलं काहीना काही छंद जोपासत असत. त्यात विविध देशांची पोस्टाची तिकिटे आणि नाणी जमवणे या गोष्टी अगदी कॉमन’ होत्या. कारण परदेशात फोनवरून बोलणे दुरापास्त होते. आजच्या काळाप्रमाणे संगणकाच्या माध्यमातून ई-मेल किंवा चॅटिंगही उपलब्ध नव्हते. परदेशातून येणार्‍या पत्रांची तिकिटे (जबरदस्तीने, न फाडता) काढून जमवणे आणि त्यांचा अल्बम करणे, त्यामुळेच विशेष होते. काही काळाने यालाही बाजारी स्वरूप आले. परदेशातील (टाकावू) तिकिटे विकत घेता येऊ लागले. श्रीमंताच्या मुलं-मुलीं असल्या गठ्ठ्याने विकत घेतलेल्या तिकिटांचे अल्बम दाखवून मिरवू लागले.

जगात नानाविध छंद आणि छंदिष्ट माणसे आहेत. छंदाचे अनेक चित्र विचित्र प्रकार आपल्याला बघायला मिळतात. समुद्र किनार्‍यावरील विविध प्रकारचे शंख-शिंपले गोळा करणारे त्यात आहेत. विविध पक्ष्यांची पिसे गोळा करून पक्ष्यांबद्दलची उत्सुकता काही जण जपत असतात. विविध क्षेत्रातल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींच्या स्वाक्षरी घेऊन ठेवण्याचा छंद त्याकाळी अनेकांना होता. ज्यांना परवडू शकते अशांना छायाचित्रणाचा छंद जोपासता येतो. ढिगाने पुस्तकं विकत घेवून घरभर पुस्तकांचा पसारा करणार्‍या पुस्तकवेड्यांना छंदिष्ट म्हटलेले कदाचित आवडणार नाही. कारण ते स्वत:ला ज्ञानेपासक समजत असतात. काही असले तरी अनेक जण आपापल्या कल्पनेने, आपापल्या कुवतीनुसार चित्रविचित्र छंद जोपासत असतात, हे मात्र खरे.

काहींना वेगवेगळ्या प्रकारचे की-चेन्स गोळा करण्याचे वेड असते. त्यासाठी ते जिवाचे रान करुन, वाटेल तेथे जाऊन की-चेन घेऊन येतील. मुंबईतील एका अवलियाला वेगवेगळ्या प्रकारची घड्याळे जमविण्याचा छंद आहे. अनिल अवचट यांचे ओरिगामी, बासरीवादन वा त्याची निर्मिती, मिनिएचर चित्रकला, छंद या वर्गात मोडतात. काहींना गाण्याचे कॅसेट्स वा गाण्याच्या तबकड्या गोळा करण्याचा छंद असतो. (आता या दोन्ही अडगळीत पडल्या आहेत). त्यातही एका विशिष्ट गायक वा गायिका वा कवी वा संगीतकार यांचेच कॅसेट्स ते गोळा करत असतात. शेकडो कॅसेट्स त्यांच्या संग्रहात असतात. कदाचित एक दोनदा ते ऐकतही असतील. परंतु गाणे ऐकण्यात त्यांना रस नसतो. परंतु कॅसेट्स गोळा करून त्याची मांडणी करण्यात त्यांना अतीव आनंद मिळत असतो. माझ्या ओळखीचे एक इंजिनियर कुटुंब आहे. त्यांच्या घरातील एक भिंत फक्त वेगवेगळ्या आकारातील डबल एंड स्पॅनर्स, रिंग स्पॅनर्स, बॉक्स स्पॅनर्स, स्क्रूड्रायव्हर्स, व इतर टूल्सची मांडणी करून सजविली आहे. यातील प्रत्येक हत्यारासाठी त्याच्या आकाराप्रमाणे जागा ठरवून दिलेली आहे. परंतु त्याचा कधी काळी वापर झाला आहे याच्या खुणा मात्र दिसत नाहीत. बाजारातील टूल्स विकत घेऊन त्याची मांडणी करणे हा त्यांना जडलेला छंद आहे. भीमसेन जोशी यांच्या नि:सीम चाहत्यापैकी एकाला भीमसेनजींनी उच्चारलेला प्रत्येक शब्द न शब्द, गायिलेली प्रत्येक तान न तान टेप करून ठेवण्याचा छंद जडला होता. रियाज करताना, गप्पा मारताना, खाताना-पिताना, (खोकत असतानासुद्धा!) हे गृहस्थ त्यांच्या मागे पुढे जावून टेप सुरू करून ठेवत असत. अशाप्रकारचे काही हजार रेकॉर्डेड् टेप्स त्यांच्याकडे असावीत. एका मान्यवराला दिलीपकुमार या नटाने वेड लावले. शंभर शंभर वेळा दिलीपकुमारचे चित्रपट बघण्यात या गृहस्थाने आपला वेळ, पैसा व आयुष्य खर्ची घातले. पुण्याचे माजी महापौर यानी 10-15 हजार सिनेमा बघितल्याचे विधान आपल्याला अजूनही स्मरत असेल. गडप्रेमी गो.नी. दांडेकर यांची गडभ्रमंती नादिष्ट या सदरातच मोडेल. उदगीर येथील पासष्ट वर्षीय शंकर नरसिंगराव मुर्कीकर या व्यक्तीने आपल्या आयुष्यातील जवळपास १८ ते २० लाख रुपयांची पुंजी छंद जोपासण्यासाठी खर्च केला आहे. त्यांनी देशातील व विदेशातील पोस्टाची तिकिटे, सर्व प्रकारचे आंतरदेशीय पत्र, लिफाफा, अनेक देशांतील चलनी नोटा, सर्व प्रकारचे पुरातन काळापासून नाणे, एक रुपया ते एक हजार रुपयांपर्यंतच्या चलनी नोटा जमविल्या आहेत.

छंदातून आनंद मिळत असेल तर ते केव्हाही चांगलेच ठरेल. काही वेळा छंदिष्टपणातून कलानिर्मिती व शास्त्रीय प्रगती होऊ शकते. गाण्यांच्या छंदिष्ट मंडळींकडून सहगल के गाने, लता के गाने, रफी के गाने अशा नावानं चित्रपट-संगीतावर केलेल काम संशोधनाच्या तोडीचे ठरले होते. अनेक अडचणींवर मात करून प्रसंगी लोकांची चेष्टाही सहन करून टीकेची पर्वा न करणारे हे छंदोपासक आपल्या पाहण्यात नक्कीच असतील.

परंतु छंद या शब्दाला काही मर्यादा आहेत. छंद हा फावल्या वेळात करण्याचा प्रकार आहे. परंतु काही तज्ञांच्या मते टोकाचा छंद हा गुणदोष समजला जातो. छंदाची पुढची पायरी नाद लागण्यात होतो. अशांना आपण नादिष्ट म्हणतो. सतत 'हवेत असणे' मानसिक दौर्बल्याचे लक्षण ठरते. तहान, भूक, झोप, पोटासाठी उद्योग, कौटुंबिक सौख्य, वेळ-काळ, श्रम-पैसा, इत्यादी कुठल्याही सोयी-गैरसोयीची, मानापमानाची पर्वा न करता, आपल्याच तंद्रीत राहून, एखाद्या गोष्टीकडे व/वा त्या गोष्टीतील बारीक सारीक details कडे कायम ध्यास असणार्‍याला व त्यासाठी वाटेल ती किंमत देण्यास तयार असलेल्याला आपण नादिष्ट म्हणू शकतो. नाद व व्यसनाधीनता यातही फरक करण्याची गरज आहे. पण हा सततचा नाद काही वेळा 'मनोविकारा'च्या जवळपास जाण्याची शक्यता असते. मानसिक दोष जास्त असेल तर मात्र उपचाराची गरज लागते. याचीच पुढची पायरी nerdमध्ये रूपांतरित होते.

पुलंच्या समग्र लेखनसाहित्यात ' बालगंधर्व' हा शब्द किती वेळा आला असेल हे आपण सांगू शकाल का? 'स्वामी'कार रणजित देसाई या लेखकाने 'जीवन' वा तत्सम अर्थाचा शब्द किती वेळा वापरला आहे हे त्यांची पुस्तकं वाचताना आपण कधी मोजलात का? कदाचित नाही. कारण आपण त्या अर्थाने 'nerd' नाही. 'nerd' या इंग्रजी शब्दाला फिट् बसणारा समानार्थी शब्द अजूनही मराठीत आलेला नसावा. ( चू. भू. दे. घे.) खरे पाहता इंग्रजीतसुद्धा हा शब्दप्रयोग अलिकडचाच - 1950-60 मध्ये रूढ झालेला - आहे. सामान्यपणे nerds कुणातही न मिसळता आपण बरे व आपले काम बरे या वृत्तीचे असतात. बहुतांश nerds माणूसघाणे या सदरात मोडतात. एखादे मनाजोगे काम हाती घेतल्यानंतर ते तडीस नेईपर्यंत त्यांचे समाधान होत नाही. त्यासाठी दिवस रात्र, वेळ काळ न बघता राबत असतात. व अशाप्रकारे काम करण्यातच त्यांना आनंद मिळतो. परंतु छंदिष्ट वा नादिष्ट (वा विक्षिप्त !) हे शब्द nerdच्या जवळपासचे वाटत असले तरी त्या nerdच्या समानार्थी नाहीत. nerds मात्र कधीच वेळेचे (वा कशाचेच !) बंधन पाळत नाहीत.

माझ्या मते focussed असलेल्या आजच्या पिढीला nerds म्हणायला हरकत नसावी. शाळेत असताना रुबिक क्यूबवर पोसलेल्या या पिढीतल्या कित्येकांनी आपल्या nerdsपणाच्या जोरावर कुठल्या कुठे पोचले आहेत याची कल्पना करता येणार नाही. गूगलवर काम केलेल्यांना आपल्याला nerdsच म्हणावे लागेल. ब्लॅकबेरी, जावास्क्रिप्ट, वर्ल्ड वाइड वेब, सर्च इंजिन्स, iphone, ipad, मोबाइल फोन, टचस्क्रीन सुविधा, ट्वीटर, फेसबुक, यूट्यूब, इत्यादींच्या संकल्पनांपासून प्रारूपपर्यंत त्यांना मूर्तस्वरूप देऊन बाजारात यशस्वी करून दाखविणे कदाचित nerdsनाच जमेल, हे येरा गबाळाचे काम नव्हे. म्हणूनच काही nerds अत्यंत श्रीमंत झालेले आहेत. सचिन तेंडुलकरची आतापर्यंत कमावलेली संपत्ती अंदाजे 200 कोटी रुपये (फक्त 5 बिलियन डॉलर्स) असल्यास गूगलच्या संस्थापक जोडीची संपत्ती प्रत्येकी 940 कोटी डॉलर्स एवढी आहे. सचिनला उन्हातान्हात घाम गाळून पैसा कमवावा लागतो. परंतु माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंताना वातानुकूलित ऑफिसमध्ये बसून संगणकाच्या codeशी खेळ खेळत बसले तरी आपोआप संपत्ती गोळा होत जात असावी. nerd या चार अक्षरी वेडपटांचा महिन्याचा पगार मात्र पाच - सहा आकड्यात मोजावा लागतो.

या nerdsच्या कामगिरीने इतर क्षेत्रातील अनेक नामवंताना व सेलिब्रिटींनासुद्धा nerds करून टाकले आहे. काही सेलिब्रिटींना ट्वीटरवर आपल्या चाहत्यांच्या संपर्कावर सतत राहून चाहत्यांची संख्या वाढविण्याचे वेड जडले आहे. काहींना बाजारात आलेल्या इलेक्ट्रॉनिक् गॅजेट्स विकत घेऊन जमविण्याचा छंद जडला आहे. बराक ओबामा अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर ब्लॅकबेरीसाठी आकाश-पाताळ एक केल्याचे आठवत असेल. त्याचे साप्ताहिक वार्तापरिषद यूट्यूबवर आलेच पाहिजेत यावर त्याचा कटाक्ष आहे. काहींना संगणक गेम्सने खिळवून ठेवले आहे. दर महिन्याला नवीन अद्यावत मोबाइल फोन विकत घेणार्‍यांची भारतातील nerds संख्याही कमी नसावी.

म्हणूनच यानंतरच्या पिढीने छंदिष्ट (वा नादिष्ट - 'नाडी'ष्ट नव्हे!) बनण्यापेक्षा nerds बनून कतृत्व दाखविणे गरजेचे आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

छंदांचा उभा-आडवा लेखाजोखा

छंदांचा व्यापक असा आणि उभा-आडवा लेखाजोखा आवडला. बहूतेक सगळे मराठी मध्यमवर्गाला माहिती असलेले (काडेपेट्यांच्या कव्हरचा सोडून) छंद उल्लेखलेले आहेत. आणखी दोन राहीलेले छंद म्हणजे सिगारेटची वेगवेगळी पाकीटं आणि थंडपेयांच्या बाटलीचे बिल्ले.
खरे आहे, पोष्टांच्या तिकीटांचा छंद ती तिकीटं विकत मिळायला लागल्यापासुन एकदम भंकस वाटायला लागला. पुर्वी मी परदेशातून येतांना लोकांना सुव्हेनीर म्हणून तिकीटं विकत आणत असे पण ते घेणा-याच्या चेह-यावरील भाव पाहून नंतर त्या नादी लागलो नाही. पण अशी विकतची तिकीटं श्रीमंतांनांच परवडतात हा गैरसमज आहे. श्रीमंतांबद्दल आकस असणारे तुम्ही नसावेत असे वाटते.

कालानुरुप छंद बदलणारंच. तुमच्या आधीच्या पिढीला असलेले छंद खूपच वेगळे असणार आणि आता जे आहेत तेच बरे..त्यांना ते बदलायला लावू नये. छंदांचं नंतर काय होतं हे माहिती असल्यानं लहानपणी कोणता छंद होता ह्याला काही महत्व ९९.९९९९% लोकांना राहत नाही.

छंदांचा विषय निघाला की आजकाल मला उद्धव ठाकरेंची आठवण येते. त्यांच्या फोटोग्राफीच्या छंदाला हसणा-या लोकांना त्यांनी फार मार्मिक उत्तर दिले होते.."मी माझे छंद प्रदर्शीत करतो..तुम्ही तुमचे करा.."

लेखाचा शेवट इतका भावला नाही. ह्यानंतरच्या पिढीने काय करावे हे त्यांच्यावरच सोडले तर बरे.

छंद

छान लेख. माझ्या मते छंद हे जोपासलेच पाहिजेत. लहानपणा पासून एखादा चांगला छंद अंगिकारायला पाहीजे. मोठे झाल्यावर हल्लीच्या ‘न्युक्लीयर’ कुटंबांतुन छंद हाच प्रत्येकाचा खरा सोबती ठरणार आहे. चांगला छंद आपल्याला कठीण प्रसंगी कामास येईल. आपले मनोस्वास्थ्य जोपासण्यास त्याची अतोनात मदत होते. छंद जोपासण्यानी ब-याच अंशाने आपल्या डोक्यावरचा ताण कमी होण्यास नैसर्गीकरीत्या मदत होते. चांगले छंद आपला एकटेपणा दुर करतात व तो असा एक विरंगुळा आहे की जो जोपासल्याने आपली प्रसन्नता टिकवुन ठेवली जाते. ह्या जगात तोच मनुष्य यशस्वी गणला जातो ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे. गुरु रविंद्रनाथ टागोरांचे ‘एकला चालो रे’ हे गीत हाच उपदेश आपल्याला देते की स्वतःची वाटचाल अशीच आनंदाने चालु ठेवा. छंद आपला हा प्रवास सुकर करण्यास निश्चित मदत करेल.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

यश

ह्या जगात तोच मनुष्य यशस्वी गणला जातो ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे

ओसामा बिन लादेन प्रसन्नतेने, आनंदाने जगला म्हणुन त्याला यशस्वी म्हणता येईल का??

का नाही?

ओसामा बिन लादेन प्रसन्नतेने, आनंदाने जगला म्हणुन त्याला यशस्वी म्हणता येईल का??

का नाही? ओसामा प्रसन्नतेने, आनंदाने जगला हे गृहितक मन्य केले तर तो एक यशस्वी आयुष्य जगला हेही मान्य करायला हरकत नसवी. यशस्वी म्हणजे काय याची त्याची व्याख्या अमेरिकेच्या व्याख्येपेक्षा वेगळी होती, इतकेच.
''नर्ड' व्हा' हा संदेश आवडला. पूर्वी एक ज्येष्ठ पत्रकारांनी 'समाजातली विक्षिप्तंची संख्या वाढली पाहिजे' असे म्हटले होते, ते आठवले. केवळ वैयक्तिक आर्थिक लाभासाठीच नव्हे तर समाजाच्या प्रगतीसाठी झपाटलेल्या लोकांचे समाजात असणे आवश्यक आहे. एरवी सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून, नियमित अथवा प्रासंगिक मैथुन करुन सुखाने झोपी जात असतेच.
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

व्याख्या

जर प्रसन्न आनंदाने जगणे ही यशस्वी होण्याचि व्याख्या असेल तर त्याची व्याख्या अमेरीकेच्या व्याख्येपेक्षा वेगळी कशी काय?

व्याख्या

ट्विन टॉवर्स पाडल्यानंतर ओसाबाला प्रसन्न आनंद झाला असेल, तो त्या क्षणी यशस्वी. त्याला मारल्यावर अमेरिकेला प्रसन्न आनंद झाला, त्या क्षणी अमेरिका यशस्वी.
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

आनंदच आनंद

हो... आणि ओसामाच्या छातीवर गोळ्या झाड्ल्या तेव्हा तोही जय जिहाद किंवा तत्सम आरोळी ठोकून हसत हसत मरणाला सामोरा गेला असेल. म्हणजे काय दोन्हीकडे आनंदच आनंद! ;)
कुणी ओसामाच्या प्रेताचा फोटो पहिला आहे का?? असल्यास दुवा द्यावा प्लीज.

राहून गेलेले छंद

--कुणी ओसामाच्या ......दुवा द्यावा प्लीज.--

ह्या अशा छंदांची गणनाही राहून गेली आहे.

असा छंद धरी

बिन लादेन च्या छंदापेक्षा असा छंद बरा.....

रोचक

रोचक.

निबंध नीट कळला नाही. "छंदिष्टाला एकट्याला आनंद व्हावा अशा छंदांपेक्षा कलानिर्मिती किंवा तंत्रज्ञानाची प्रगती होणारे नाद अंगीकारावे" असा काहीसा संदेश असावा असे वाटते.

अथवा : "मन रमून जाईल असा नाद हाच उदंड पैसा देणारा उदरनिर्वाहाचा व्यवसाय असल्यास बरे" असा संदेश असू शकेल.

नर्ड्स आणि आजची 'तरुणाई'

माझ्या मते focussed असलेल्या आजच्या पिढीला nerds म्हणायला हरकत नसावी.

आजची पिढी नक्की कशा बाबतीत विशेष focussed आहे असं तुम्हाला अभिप्रेत आहे ते कळत नाही. पण Nerd Attention Deficit Disorder असा एक शब्दही आजकाल वापरात येताना दिसतो. उदा: हे पहा. त्यामुळे हा मुद्दा थोडा गोंधळाचा वाटतो आहे.

या nerdsच्या कामगिरीने इतर क्षेत्रातील अनेक नामवंताना व सेलिब्रिटींनासुद्धा nerds करून टाकले आहे.

चाहत्यांची संख्या वाढवणं हा माणूसघाणेपणाच्या विरोधातला मुद्दा वाटतो. अद्ययावत गॅजेट्स विकत घेत रहाणं हे नर्ड बनण्यासाठी पुरेसं ठरेल असं वाटत नाही. नर्ड लोकांचा गॅजेट्सचा वापर हा अन्य लोकांहून वेगळा असतो. त्यांना सर्वसामान्य वापरकर्त्यांहून खूप अधिक खुब्या माहीत असतात. काही वेळा ते एकमेकांच्या सल्ल्यानं त्यांत बदलही (हॅक्स) करतात. लोकप्रिय गॅजेट्सपेक्षा त्यांच्या पसंतीची गॅजेट्स वेगळी असतात असंही दिसतं. उदा: आजच्या 'तरुणाई'च्या मते आयफोन हा 'सेक्सी' असेलही, पण त्यात हवं ते करता येत नाही (कारण प्लॅटफॉर्म खुला नाही) म्हणून अ‍ॅंड्रॉईडला पसंत करणारे, विंडोजपेक्षा लिनक्स पसंत करणारे आणि तुम्ही वर उल्लेखलेले नामवंत वगैरे यांमध्ये मूलभूत फरक आहेत असं वाटतं.

चकचकीत, सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रसाधनांचा आणि फॅशन अ‍ॅक्सेसरीजचा वापर करणारे आजकालचे युवक-युवती नर्ड बनण्याच्या जवळपासही नाहीत असं एकंदरीत वाटतं.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

छंदिष्ट की नादिष्ट?

५० वर्षापूर्वी मला अंगाला लावायच्या वेगवेगळ्या साबणाची कव्हर्स् (रॅपर्स्) जमवायचा छंद होता. त्यांच्या डिझाईन्सनुसार ती कापून त्यांचे मी बरेच आल्बम बनवले आहेत. त्यांचे मी नुकतेच "पिकासो डि़जिटल" आल्बम केले आहेत. ते पहायला कोणाला रस असेल तर माझ्याशी संपर्क करा. धन्यवाद.

गावरान

 
^ वर