तर्कक्रीडा १४: सुंद आणि उपसुंद

सुंद आणि उपसुंद
............ज्यांच्यामुळे मराठी भाषेला 'सुंदोपसुंदी' हा शब्द लाभला,त्या असुर बंधूंची कथा सर्वश्रुत आहे.या दोघांच्या नाशासाठी इंद्राने तिलोत्तमा अप्सरेला सुंदकारण्यात पाठविले.तिच्या प्राप्तीसाठी हे जुळे भाऊ आपसात लढून नाश पावले. ही झाली पौराणिक कथा.
ऐतिहासिक काळातही सुंदकारण्यात सुंद आणि उपसुंद असे दोन जुळे भाऊ होऊन गेले.ते शिवभक्त होते.प्रत्येक सोमवारी ते शिवव्रत करीत.त्या दिवशी ते खोटे बोलत नसत.
....सुंद हा मंगळ, बुध ,गुरू या तीन वारी असत्यच बोलत असे.इतर चार वारी सत्यच सांगत असे.
....उपसुंद हा शुक्र, शनी,रवि या तीन वारी खोटेच बोलत असे.इतर चार वारी खरेच बोलत असे.
एक चिनी प्रवासी सुंदकारण्यातून जात असता वेळोवेळी हे दोन भाऊ त्याला भेटले. त्यांचा सत्यासत्य बोलण्याचा लौकिक (कोण कोणत्या वारी खरे खोटे बोलतो ते सर्व) चिनी प्रवाशाला माहीत होता.मात्र ते जुळे असल्याने त्यांच्यातील सुंद कोण ,उपसुंद कोण हे ओळखणे त्याला शक्य नव्हते.त्यांच्या भेटी विषयींचे काही प्रसंग चिनी प्रवाशाने टिपून ठेवले आहेत.त्यांतील एक पुढील प्रमाणे:
....." रात्री एका दत्तमंदिरात झोपलो.सकाळी उशिरा जाग आली.आज वार कोणता ते विसरलो.पण गुरुवार नाही हे नक्की.कारण दत्तमंदिरात सामसूम आहे.दैवयोगाने ते जुळे भाऊ भेटले. एकाने पांढरे वस्त्र परिधान केले होते तर दुसर्‍याने निळे. आज कोणता वार हे त्यांना विचारले.पुढील उत्तरे मिळाली:
......श्वेतवस्त्रधारी: आज सोमवार नाही.
....नीलवस्त्रधारी: खरेतर आज मंगळवार आहे.
....श्वेतवस्त्रधारी: मी उपसुंद आहे.

तर त्या दिवशी कोणता वार होता?
...सुंद कोण श्वेतवस्त्रधारी की नीलवस्त्रधारी ?
((प्रा. रेमंड स्मुलियन याच्या एका कोड्यावर आधारित.)

लेखनविषय: दुवे:

Comments

अंदाज

वार: मंगळवार
सुंदः श्वेतवस्त्रधारी

वार गुरुवार नाही हे आधीच सांगितले आहे. वारांबाबत दोघांची उत्तरे भिन्न असल्याने सोमवार असणे शक्य नाही कारण सोमवारी दोघेही खरे बोलतात. राहिलेल्या वारांच्या पर्यायात प्रत्येक दिवशी एकाचे उत्तर बरोबर हवे. सोमवार हे चुकीचे उत्तर ठरल्याने दुसरे उत्तर मंगळवार हेच बरोबर हवे.

श्वेतवस्त्रधारी सोमवार असल्याचे मंगळवारी खोटे बोलला म्हणून तो सुंद.

सुधारित उत्तर

सुंद आणि उपसुंदाचे उत्तर सोमवार सोडून सत्य-असत्य या काँबिनेशनने येते. (सोमवार खेरीज दोघेही एकाच दिवशी सत्य किंवा असत्य बोलत नाहीत.)

सोमवार नाही असे खरे उत्तर उपसुंद मंगळवार बुधवारी देऊ शकतो तर मंगळवार आहे असे खोटे उत्तर सुंद केवळ बुधवारी देऊ शकतो, म्हणून बुधवार बरोबर.

वारः बुधवार
सुंदः नीलवस्त्रधारी.

अगदी

अगदी असेच. सोमवारी, सोमवार व मंगळवार अशी उत्तरे मिळणार नाहीत, म्हणून मंगळवार.

सुधारणा

माझ्या हातून एक चूक झाली.त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो.
श्वेतवस्त्रधारीचे पहिले विधान "आज सोमवार नाही" असे हवे होते. 'नाही'च्या ठिकाणी ' आहे' पडले.खरोखर मोठीच चूक झाली.क्षमस्व.
..........यनावाला.

उत्तर

त्या दिवशी बुधवार होता, श्वेतवस्त्रधारी उपसुंद असल्यामुळे खरे बोलला की आज सोमवार नाहीये. नीलवस्त्रधारी बुधवारी खोटे बोलत असल्यामुळे तो म्हणाला "आज मंगळवार आहे".

उत्तर

वार - बुधवार
सुंद - नीलवस्त्रधारी

नवे उत्तर

मेघदूत व मनिमाउ यांच्याप्रमाणेच. :-)

सुंद-उपसुंदः उत्तर

बहुतेकांनी अचूक उत्तर दिदेच आहे .थोडक्यात युक्तिवाद असा:
*सोमवारी "आज सोमवार नाही."असे दोघांपैकी कोणीच म्ह णणार नाही. म्ह.त्या दिवशी सोम. नाही.
*श्वे.व.धा.चे विधान खरे.म्ह.त्याचे"मी उपसुंद आहे "हेही विधान खरे. म्ह.तो उपसुंद.
*उपसुंदाचे खरे बोलण्याचे वार सोम, मंगळ,बुध,गुरु.पैकी तो दिवस सोम नाही,गुरु नाही(दिलेले) तसेच मंगळही नाही कारण सोम सोडून दोघांचा सत्यकथनाचा एक समान दिवस नाही."आज मंगळ" असे सुंद म्हणतो म्ह.ते खोटे.
*म्ह.तो दिवस बुधवारच.

 
^ वर