अल बिरुनीचा भारत: भूगोल आणि थोडा इतिहास
अल् बिरुनीचा भारतात हिंदू (अल बिरुनीचा शब्द) लोकांसंबंधी आणि प्रदेशाबद्दल बरीच माहिती आहे. या हिंदू लोकांच्या चाली रिती आणि भाषा ही इतरजगापेक्षा खूप भिन्न आहेत असे तो लिहितो. त्यामुळे बाहेरच्यांना त्यांच्या बद्दल समजण्यास अडचण येते. पहिल्याच प्रकरणात मुहमद गझनीच्या स्वार्यांनी भारतात कशी उलथापालथ झाली याचे वर्णन आहे. त्यामुळे हिंदू विज्ञाने दूर पळून गेली असा उल्लेख आहे. या उल्लेखात थोडी खंत जाणवते.
भूगोल
अल बिरुनीचे ज्ञान मोठ्या प्रमाणात लोकांना विचारून आलेले आहे. तो विविध ठिकाणी प्रत्यक्ष गेला होता असे नाही. त्यावेळचे लोक एका ठिकाणाहून दुसरी कडे कसे जात असत याचा तो एक उल्लेख करतो. एक बैल साधारण २०००-३००० मण ओझे वाहून नेतो असे त्याला सांगण्यात आले (प्रकरण १८ वे पान १९८ च्या आसपास). हे ओझे तो एका खेपेत नेत नाही. तर जा-ये करत काही दिवसात खेपा करून हे ओझे नेतो. असे ओझे नेण्यास जेवढा वेळ लागतो तेवढ्या दिवसाचा प्रवास असे म्हणण्याची तेव्हा पद्धत होती. पूर्वी रोज पाच (?) मैलाची मजल होत असे वाचल्याचे आठवले. ही मजल एवढी लहान असण्याचे कारण सर्व सामान दिवसातून दोन-तीन वेळा खेपा करून हलवत असणार.
अलबिरुनीने अंतरे फर्साख म्हणजे ४ मैल या एककाने दिली आहेत.
अलबिरुनीच्या वेळी दिल्ली -आगरा ही महत्वाची शहरे नसावीत. पुढे २ शतकात पृथ्विराज चौहान आणि महमद घोरीच्या वेळी मात्र ते महत्वाचे शहर असावे. उत्तरमध्य भारताचा विचार केला तर कनौज राजधानी होते. कनौजचा संबंध तो पंडूच्या मुलांशी जोडतो. महुरा (मथुरा) आणि तानेसर (स्थानेश्वर) हे कुरुक्षेत्राचे ठिकाण यांचा तो उल्लेख करतो. पण दिली व आग्रा यांचा उल्लेख त्यात नाही. प्रयाग, बनारस यांचा उल्लेख आहे. गंमत म्हणजे प्रयाग ते गंगासागर यातील अंतर तो १२ फर्साख इतकेच देतो.
पूर्वेकडील भागाच्या माहितीत नेपाळ, भोतेशर (भूतान?) येते. तिथून दिसणारे लाल मातीचे तिबेट तर काळ्या मातीचा भारत असे एक वर्णन आहे. त्याशिवाय दोर्यांवरचे झुलते पूल आणि खाली १०० यार्ड खोलीत असलेली वाहती नदी याचे वर्णन आहे.
कनौजच्या दक्षिणपूर्वेतील राजधानीचे शहर खजुराहो आहे. या भागात ग्वाल्हेरच्या किल्याचा उल्लेख आहे. मथुरेहून उज्जैन, धार मार्गे महाराष्ट्रात जातो. यामधे मंदगिर म्हणून गोदावरीच्या काठच्या ठिकाणाचा उल्लेख आहे. त्यानंतर दुसर्या मार्गाने येताना महाराष्ट्रानंतर कोकण लागतो आणि त्याची राजधानी म्हणून टाना असा उल्लेख आहे. धार - कांड( २०)-नमावुर (१०) हे नर्मदेच्या काठचे शहर- मंदगिर (६०) हे गोदावरी काठचे शहर. (कंसातले आकडे फर्साखचे) धार पासून १८ फर्साख वर महारट्टदेश आहे असे ही तो म्हणतो तेथून टाना समुद्राकाठचे २५ फर्साख.
आता हे मंदगिर कुठे असावे? त्याचबरोबर टाना हे ठाणे असेल तर मधल्या काळात त्याला साष्टी म्हणत त्याचे काय?
बजाना (राजकोट जवळील गाव?) चा उल्लेख वारंवार येतो. या मार्गाने सोमनाथ, बिहरोज (भरूच) आणि टाना येतात. बजानाच्या पश्चिमेस मुलतान आहे.
समुद्रमार्गे कच्छ आणि सोमनाथ भागातील चाचे आणि त्यांची बिरा नावाची जहाजे त्यावेळी प्रसिद्ध होते. बिहरोज (भरूच?) झाल्यावर सन्दन ५० फर्साक वर येते. तिथून सुबारा ६ वर तर त्यापुढे टाना ५ वर येते.
याच प्रकरणात पहिल्यांदा पश्चिमेतील देशांचे वर्णन येते. शेवटी श्री लंका, स्वर्णद्वीप (सुमात्रा?) या देशांची माहिती येते.
इतिहासः
बिरुनीने भारताच्या इतिहासाबद्दल फारसे लिहिले नाही. वेगवेगळे संवत/शक याबद्दल लिहिताना इतिहासाचा उल्लेख येतो. (प्रकरण ४९)
आकडे लक्षात ठेवण्यासाठी त्यावेळचे लोक गमती करत असावेत. जसे वल्लभसंवत आणि शालिवाहन शक यांच्या मधील फरक ६ चा घन + ५ चा वर्ग (२१६+२५ =२४१) एवढा आहे. विक्रमसंवताचा आकडा ३४२ गुणिले ३ + वर्षनावाने येणारे साल एवढा येतो. आजच्या सारखे तेव्हाही लोक चार आकडी सनातील पहिले दोन आकडे लिहित नसत.
शालिवाहन शकाचा थोडा इतिहास बिरुनीने लिहिला आहे. हे लोक शूद्र होते. त्यावेळी असेही म्हटले जायचे की शालिवाहन हा हिंदू नव्हता तर तो पश्चिमेकडून आला होता. विक्रमादित्याने शकाचा पराभव करून त्याला मारले असा उल्लेख तो करतो. पण या विक्रमादित्याचे आणि विक्रमसंवत वाल्या विक्रमादित्याच्या काळात मोठा फरक आहे हे तो नमूद करतो. गुप्त हे जुलमी राज्यकर्ते होते म्हणून ते संपल्यावर त्यांचे संवत कोणी वापरत नाही असे तो म्हणतो.
काबुलमधील तिबेटी /तुर्की लोकांचे राज्य याच प्रकरणात आहे. एका गुहेत बसलेल्या माणसाला लोकांनी राजा केल्याची सुरस आख्यायिका त्याने लिहिली आहे. काबुल मधील ही राजवट पुढे इराणच्या राजाची अंकित बनली. त्यासुमारास त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला.
इतर चर्चा
अल बिरुनीने लिहिलेल्या भुगोलाच्या वर्णनावरून त्याने नमूद केलेली नावे सध्या कुठल्या शहरांची आहेत हे बघण्याची उत्सुकता लागते. या नावावरून आणि अंतरावरून एक नकाशा करता येऊ शकेल. (कोणी केलाही असेल). या चर्चेतून थोडाफार असा प्रयत्न व्हावा.
प्रमोद
Comments
हा नकाशा बघा
नेटावर शोधल्यावर एक नकाशा मिळाला पण वेळेअभावी त्यातला खरेपणा शोधलेला नाही. बघा काही उपयोगाचा आहे का ते. नकाशा टाटा फंडामेंटल अनुसंधान संस्थानाच्या http://www.tifr.res.in संकेतस्थळावरून साभार.
चंद्रशेखर आणि प्रमोद सहस्रबुद्धेंचे लेख एका मागोमाग एक वाचल्याने गोंधळ उडाला म्हणून नकाशे चिकटवते आहे.
नकाशा
हा नकाशा एकदम बरोबर आहे. अल बिरुनीच्या पुस्तकातली सगळी नावे यात असावीत.
प्रमोद
एक अंदाज
आपल्या लेखात उल्लेखलेले संदन म्हणजे संजाण असावे. सुबारा म्हणजे शूर्पारक अर्थात सोपारा. टाना हे ठाणेच असावे. ठाणे म्हणजे साष्टी नव्हे. सद्ध्या मुंबई उपनगर जिल्ह्यात मोडणारा आणि नजिकच्या भूतकाळात ठाणे जिल्ह्याचा भाग असलेला वांदरे ते वसई खाडीपर्यंतचा पश्चिमेकडचा बेटसदृश टापू म्हणजे साष्टी. ठाण्यासकट ह्या सर्वच प्रदेशाला कोणेएके काळी साष्टी म्हटले जात असेल की कसे,ह्याची कल्पना नाही.पण पोर्तुगीजांच्या आगमनापासून तरी ह्या प्रदेशाची साष्टी अशीच नोंद आहे. आणि जरी ठाणे साष्टी प्रदेशात मोडत होते असले तरी ठाण्याची स्वतंत्र अशी स्वतःची ओळख होतीच. उदा. मुंबई भारतात येते हे खरे पण मुंबई म्हणजे भारत किंवा भारत म्हणजे मुंबई नव्हे. मुंबईची स्वतःची ओळख आहेच.
साष्टीची बखर हे वसईच्या पोर्तुगीज्-मराठे लढाईचे वर्णन करणारे पुस्तक प्रसिद्ध आहे. ह्या पुस्तकात मुख्यतः साष्टी बेटातून मराठ्यांना कशी कुमक आणि मदत मिळाली त्याचे वर्णन आहे.