झुंडशाही, अभिव्यक्ती स्वांतत्र्य, विचार आणि भावना

प्रस्तावना -

मुद्दा होता भारताने विश्वचषक जिंकल्या नंतरच्या पुण्यातील उधाणाचा, काही/बहुतांश लोकांना हि एक आनंदाची गोष्ट वाटली आणि त्यांनी तो आनंद वयक्तिक आणि सार्वजनिकरित्या साजरा केला, आनंद खूप होता म्हणून उत्साह किंवा उन्माद देखील जास्त होता, हे असे क्वचित घडते (निदान पुण्यात) म्हणून ते सर्वाना आश्चर्यकारक वाटले.

काहीना त्या सार्वजनिक उन्मादाचा त्रास झाला म्हणजेच आवाजाचा त्रास, झोप न लागणे वगैरे शारीरिक/मानसिक त्रास झाले, तर काहीना झालेला त्रास थोडा वैचारिक होता, जसे कुठलीतरी खासगी टीम भारतीय असल्याचा दावा करीत लोकांच्या वयक्तिक अथवा सांघिक भावनेशी खेळत आहे, किंवा या देशातील बहुतांश लोक कुठल्यातरी खासगी टीमसाठी आपला वेळ, शक्ती वाया घालवीत आहेत, इतकेच नव्हे तर असे वागून ते इतर लोकांना देखील त्रास देत आहेत. आणि हे सर्व होताना ती खासगी टीम मात्र अफाट पैसे कमवत आहे. छे! हा तर निव्वळ मुर्खपणा आहे.

कदाचित काही लोकांना असे देखील वाटले असेल कि आनंद झाला हे ठीक, थोडाफार साजरा केला हे पण ठीक, पण एकदम एवढे स्तोम माजवण्याचे आणि आरडा-ओरडा करण्याचे कारण नाही. विश्वचषक जिंकला म्हणजे काही "मुंग्यान् मेरू पर्वत तर नाही गिळला न?" एकूण काय तर जिंकल्याचे समाधान आहे पण अतिरेकी उन्माद नको.

उन्माद आवडला नाही म्हणजे नक्की काय झालं? तर माझ्यामते ह्या उन्मादात जी सांघिक भावना दिसली, म्हणजे लोकांनी गाडीवर किंवा एकत्र जमून आरडा-ओरडा करत आनंद साजरा केला, ती सांघिक भावना थोडीशी झुंडशाही कडे झुकणारी वाटली. झुंडशाही म्हणजे "आम्ही" "करतो"/म्हणतो "तेच" खरं हि भावना. थोडं वेगळ्या पद्धतीने सांगायचं झाला तर "गाव करील ते राव काय करील" हा प्रकार वयस्क आणि बुद्धिवाद्यांना आवडत नाही. मी मुद्दाम हे उदाहरण घेतलं, ह्यात गाव चांगलं वागो व झुंडशाही करो त्यामागे विचार नसून भावनाच कार्यरत असते. माणसांचा कुठलाही कळप एखादे काम एकत्र येऊन करतो (कुठल्याही प्रत्यक्ष दबावाखाली नाही) त्याला कारणीभूत असते ती भावनाच, त्या भावनेचा स्त्रोत विचारात असू शकेल हे मान्य. पण एकूण हि झुंडशाही बुद्धिवाद्यांना मान्य नाही. कारण, बहुदा ती कळप-भावना माणसाचे स्वतंत्र/वयक्तिक वैचारिक अस्तित्व नाकारते!!

झुंडशाही -

हि झुंडशाही कुठे कुठे दिसून येते? तर साधारणपणे मनसे किंवा शिवसेना सार्वजनिकरित्या जो विरोध दर्शवितात त्यात ती प्रामुख्याने आढळते, कोणत्या प्रसंगी आढळते? तर, जेम्स लेन, शिवरायांबद्दल काय विनोद केला जातो ह्याचे आपल्या माहितीपर पुस्तकात स्मरण करून देतो, धर्माने मुसलमान असलेला एम.एफ.हुसेन भारतात सरस्वती, भारतमाता, द्रौपदी ह्यांची नग्न चित्रे काढतो, पुण्यात दादोजींचा पुतळा सत्ताधाऱ्यांकडून लाल महालातून हलविला जातो, कुठला तरी पाणीपुरीवाला शौचाचे भांडे पाणीपुरी साठी वापरतो किंवा अजून अशी बरीच उदाहरणे आहेत/असतील. अश्या प्रकारांमध्ये शिवसेना किंवा मनसे त्यांच्या संघटनेच्या ताकदीचा वापर करून विरोध दर्शवितात, त्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते किंवा जाहीरपणे दहशत बसावी असे कृत्य दिसते, किंवा क्वचित मारहाण देखील होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य -

प्रत्येक व्यक्तीला त्याचे मत बोलून/लिहून व्यक्त करण्याचा जन्मसिद्ध अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वांतत्र्य. घटना देखील असे काहीसे स्वातंत्र्य देते, हा मुलभूत हक्क आहे असे मानले जाते.

वाद -

अभिव्यक्ती स्वातंत्र्यात, जे मत प्रदर्शन होते ते चांगले किंवा वाईट नसतेच ते फक्त मत असते आणि ते व्यक्त करण्याचा हक्क सर्वांचा आहे असा

प्रतिवाद बुद्धिवादी करतात. त्या मतांमुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या जातात, त्यातील काही लोक भावना दुखावली म्हणून निषेध दर्शवितात, निषेधाचे स्वरूप वैचारिक किंवा कृत्य असते, आता ह्यातील वैचारिक प्रतिक्रियेला आक्षेप नाही, पण कृत्य प्रतिक्रिया जर सावर्जनिक असेल तर त्याला आक्षेप असण्याची शक्यता अधिक, जेवढी प्रतिक्रिया तीव्र (चढती क्रमवारी - काम-बंद, रास्तारोको, तोडफोड, हिंसा) तेवढा आक्षेप जास्त. एकूण काय तर शब्द मांडताना विचार(सदसद्विवेक बुद्धीने) नाही केला तरी चालेल पण कृती करताना विचार(सदसद्विवेक बुद्धीने) करा हि मागणी.

बहुतांश लोक कुठल्यातरी गोष्टीशी भावनिकरीत्या जोडले गेलेले असतात, धर्म, देश, समुदाय, परिवार, मित्र वगैरे किंवा अजून इतर गोष्टींशी एक भावनिक बंध असतो, ह्या गोष्टींशी निगडीत काहीही सकारात्मक/नकारात्मक घडल्यास त्या भावनेतून तसा प्रतिसाद उमटतो, हि सहज-क्रिया आहे. प्रतिक्रियेची तीव्रता हि भावनिक-बंधाच्या तीव्रतेशी आणि बौद्धिक जडणघडणीशी निगडीत असते.

साधारण पणे तोडफोड/हिंसा आक्षेपार्ह मानली जाते हे मान्य, पण हिंसेपेक्षा त्यामागची भावना/हेतू आक्षेपार्ह मानली/मानला जावी/जावा. पण हेच गणित माझ्यामते सार्वजनिक अभिव्यक्तीला/मत व्यक्त(शाब्दिकरित्या) करण्याला लागू पडते.

ज्या भावना आणि विचार मिश्रित समाजात आपण राहतो तेथे आपले वयक्तिक मत व्यक्त करताना जबाबदारी पाळली पाहिजे असे माझे मत आहे.

जे शब्द हिंसेचे सुतोवाच करतात किंवा विचार व्यक्त करणाराच कृती करेल हि शंका निर्माण होते असे शब्द(आज्ञार्थी,विध्यर्थी) देखील आक्षेपार्ह आहेत हे सर्वमान्य आहे. म्हणजे स्त्रियांना छेडणे, कृती करण्याची धमकी देणे वगैरे आक्षेपार्ह आहे हे सर्वमान्य आहे.

पण काही शब्द हे तत्कालीन सामाजिक चौकटी मोडणारे असतील पण ते वर दिल्याप्रमाणे आज्ञार्थी/विध्यर्थी नसतील तर त्यांना आक्षेपार्ह ठरवायचे का? जसे कर्व्यांनी स्त्रीशिक्षणाला पाठींबा देणारी काही वक्तव्ये आधी केली असतील, मग कृती केली असेल, हि गोष्ट त्याकाळी कदाचित आक्षेपार्ह मानली गेली असेल, किंवा दलितांच्या हक्कांसाठी सवर्णांच्या विरोधात केली गेलेली विधाने/कृती, बालविवाह किंवा सतीप्रथे विरुद्ध विधाने, पाकिस्तानात ब्लास्फेमी वर व्यक्त केलेले सार्वजनिक मत, किंवा जेम्स लेनने सांगितलेला विनोद, महंमदचे कार्टून किंवा, मुंबई स्वतंत्र प्रांत किंवा गुजरात मध्ये विलीन करण्याची घोषणा, दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण ह्या सगळ्याच गोष्टीना पूर्ण-स्वातंत्र्य असायला हवे काय? शाब्दिक लिबर्टी आणि फ्रीडम ह्यामध्ये फरक करणे गरजेचे नाही काय?

काहीवेळेस शब्द हे कृतीला पर्याय म्हणून वापरले जातात, भावना एकच असते, मग कृती आक्षेपार्ह असेल तर शब्द देखील आक्षेपार्ह ठरायला हवेत, मुळात भावनाच आक्षेपार्ह ठरायला हवी. विनोद हा कृती करण्याचे धाडस नाही म्हणून केला जातो, त्यामुळे असा विनोद देखील आक्षेपार्ह ठरायला हवा जो कृतीला पर्याय म्हणून केला जातो.

कृत्य हिंसा असू शकते, त्याचप्रमाणे शाब्दिक हिंसा पण असू शकते. दीपक चोप्रा लांच्छनास्पद/लबाड आहे हि शाब्दिक हिंसा आहे, हेच दीपक चोप्रा अवैज्ञानिक पद्धतीचे आचरण करतात हि विवेकी टीका/समीक्षा आहे. भावनेचा कोणता अविष्कार चालतो ह्यापेक्षा भावना आहे हे मान्य केल्यास वेग-वेगळ्या स्तरातून त्या भावनेचे वेग-वेगळे अविष्कार दिसणार हेही मान्य करायला हवे.

शब्द भावनिक/मानसिक इजा करतात, छेडण्यामध्ये/व्यंगांवर केल्या जाणाऱ्या विनोदांमध्ये देखील पुढे कृती केली जाऊ शकते ह्या भीतीपेक्षा वापरले गेलेले शब्द अधिक त्रासदायक असतात, अशा छेडणाऱ्या लोकांना जिची/ज्याची छेड काढली जात आहे त्यांनी शारीरिक इजा केल्यास ते आक्षेपार्ह नसावे असे माझे मत आहे.

सकारात्मक कृतीचे समर्थन/सुतोवाच करणारी जबाबदार विधाने जरी समाजाची चौकात मोडणारी असेल तर ती मान्य असायला हवी. सतीप्रथा किंवा बालविवाह ह्याविरोधातील विधाने जरी तत्कालीन समाज-विरोधी असली तरी त्यामध्ये पुरुष-प्रधान संस्कृतीच्या स्वार्थी वागण्याला लगाम घालणे आणि स्त्री वर्गास माणुसकीची वागणूक मिळणे हि सकारात्मक भावना होती, म्हणून अशा प्रकारची विधाने मान्य असायला हवीत.

बेजाबदार शब्द/मते चालत असतील तर, तशीच बेजाबदार/भडक भावनेतून आलेली कृती पण चालायलाच हवी. बेजाबदार आणि जबाबदार काय हे ठरवायला हवे हे मान्य, पण, "शब्द चालतील पण कृती चालणार नाही" हे अमान्य.

बेजाबदार शब्द चालत नाहीत म्हणूनच कदाचित उपक्रम वर देखील काही बंधने आहेत, तसेच घटनेने देखील १५३ अ कलम सांगितले असावे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ह्या विषयावर माझी आणि श्री.रिकामटेकडा ह्यांचाशी चर्चा झाली, पण एकंदरीत दुसऱ्या पानावरची चर्चा करणे तसे आवघड जाते आणि मला उपक्रमिंची ह्या विषयावरची मते जाणून घ्याची इच्छां झाली म्हणून हा चर्चा-प्रस्ताव.

व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या चुका असतील तर त्या देखील सांगाव्यात, पुढील वेळेस सुधारणा केल्या जातील.

लेखनविषय: दुवे:

Comments

शाब्दिक व शारीरिक

दोन्ही पद्धतीने हिंसा होऊ शकते. पण हिंसा या शब्दानच शारीरिक इजा डोळ्यासमोर येते. त्यामुळे विचार करताना त्या दोन्ही समान नसल्यासारखं वाटतं. पण शेवटी परिणाम एकच होतो. आपला मेंदू कुठल्यातरी विशिष्ट 'वाईट' स्थितीमध्ये जातो. फरक इतकाच आहे धक्का यांनी म्हटल्याप्रमाणे शारीरिक इजेने येणारी स्थिती ही बहुतेक व्यक्तींमध्ये अधिक समसमान असते. कारण शरीर खूपच सारखं असतं. त्यात दिसणारी लक्षणं अधिक उघड असतात. त्यामुळे तिचं वर्गीकरण करून दुखापतीच्या तीव्रतेबद्दल एकमत होणं अधिक संभाव्य असतं. मानसिक इजेच्या बाबतीत इतका सारखेपणा नसतो, व लक्षणंही व्यक्तिनिरपेक्ष नसतात. त्यामुळे एखादा तज्ञच तिच्या तीव्रतेचा खात्रीलायक अंदाज करू शकतो.

शब्द व स्पर्श किती तीव्रतेने वापरले जावेत याबाबत सर्वांच्याच मनात एक सर्वसाधारण व्यवहारात उपयोगी पडणारी स्केल असते. आपण ही स्केल वापरतो त्यात विशिष्ट शब्द किंवा काहीसा त्रासदायक स्पर्श करणाऱ्याचा उद्देश काय आहे याला अतोनात महत्त्व असतं. मित्रांकडून थट्टामस्करीत शिव्या खायला, किंवा टपलीत मारून घ्यायला काही वाटत नाही. मात्र तेच तिऱ्हाइताने केलं तर आपल्याला त्रास होऊ शकतो. आपल्याला त्रास व्हावा अशा उद्देशाची खात्री असेल तर अधिकच त्रास होतो. ती स्केल कायद्याच्या भाषेत कशी मांडावी हा प्रश्न खूपच किचकट आहे. उद्देशाविषयी कायदे करणं अधिकच कठीण. विचारांच्या अभिव्यक्तीमागचे उद्देश तर शब्दांच्या पलिकडेच असतात. पण तशा स्केलची मांडणी दोन्ही बाबतीत होऊन विशिष्ट मर्यादेपलिकडील त्रास देण्याला बंदी असावी याबाबत वाद नसावा. उद्देशपूर्वक त्रासाला आणखीनच कडक प्रतिबंध असावेत. मात्र उद्देशांची छाननी करताना तारतम्य असावं.

"स्टीक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स बट वर्डस् विल नेवर हर्ट मी" हे विधान उठसूट शब्दांनी भावना दुखावून घेऊन स्टिक्स आणि स्टोन्स हाती घेणाऱ्यांनी लक्षात ठेवलं तर एकंदरीतच जगातल्या वेदना कमी होतील.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सहमत

माझ्या लेखाची आपण समरीच दिली आहे, फक्त माझे एक मत वेगळे आहे जे कि - "काही" परिस्थितींमध्ये मानसिक त्रासाला प्रतिसाद म्हणून शारीरिक इजा केल्यास, शारीरिक इजेच्या घटनात्मक/न्यायालयीन चौकशीनंतर ती इजा प्रतिसाद म्हणून स्वीकारली जावी, पण मानसिक त्रास झाला हे अगदी सुस्पष्ट असावे, आता सर्वच परिस्थितीत मानसिक त्रास मोजता येत नाही आणि त्याचा पुरावाही देता येत नाही हा खूप मोठा अडथळा ह्या प्रक्रियेत आहे हे मी मान्य करतो.

मोजमाप

"काही" परिस्थितींमध्ये मानसिक त्रासाला प्रतिसाद म्हणून शारीरिक इजा केल्यास, शारीरिक इजेच्या घटनात्मक/न्यायालयीन चौकशीनंतर ती इजा प्रतिसाद म्हणून स्वीकारली जावी

तुमचा हा मुद्दा मला नीट लक्षात आला नव्हता.

तत्वतः कोणीच हिंसक प्रतिसाद देऊ नये अशी कायदा-सुव्यवस्थेत अपेक्षा असते. अर्थात अतिरेकी इजा झाली किंवा होणारच अशी खात्री असेल (क्लिअर अॅंड प्रेझेंट डेंजर) तर तिचा सामना केल्यास न्यायव्यवस्था कनवाळूपणे पहाते. तुम्ही म्हणता तसा मानसिकला शारीरिकने उत्तर देण्याचा प्रकार विशेषतः घरगुती कलहात होतो. अशा वेळी मानसिक छळाला कंटाळून हिंसेचा मार्ग स्वीकारण्याची उदाहरणं कमी नाहीत. मात्र धनंजय यांनी मांडलेला निर्बल व सबलाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. थोडक्यात सासू सतत घालून पाडून बोलते म्हणून थोबाडीत मारणारी सून क्षम्य वाटते, पण एखाद्या पुस्तकात काहीतरी लिहून आलं म्हणून झुंडीने लाठ्याकाठ्या घेऊन कोणाच्या घरावर जावं हे बहुतेक बाबतीत क्षम्य वाटत नाही.

मानसिक त्रास मोजता येत नाही आणि त्याचा पुरावाही देता येत नाही

हा मुद्दा महत्त्वाचा आहे यात वादच नाही. मोजमाप न करता येण्यासारखे निकष वापरल्यास कधी कधी निर्दोषावरही गुन्हा शाबीत करता येईल. त्यामुळे न्यायदानाबाबतीत ती गोष्ट किती प्रमाणात वापरता येईल याची शंका वाटते.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

जेम्स लेन आणि ज्ञानशाखेची चौकट

विनोद किंवा तर्क हे इतिहासाचा किंवा संशोधनाचा भाग असणे हे दुर्दैवी वाटते, ४०० वर्षापूर्वीच्या एका वंदनीय माणसाविषयी काहीही तर्क/विनोद(संदर्भहीन) तत्कालीन समाज लाऊ शकतो पण त्याला इतिहासाचा भाग केल्यास अजून ८०० वर्षानंतर तो माणूस वंदनीय राहील का? आपले इतिहासाबद्दलचे ज्ञान (माझ्या मूलभूत अज्ञानापेक्षा) जास्त आहे असे समजूयात, असे असल्यास तुम्ही वाचलेल्या बखरी/ऐतिहासिक पुस्तके ह्यामध्ये असे किती विनोद आपणास आढळले ह्याबद्दल थोडा प्रकाश टाकावा.

आपल्या प्रतिसादांमध्ये जेम्स लेनने जे केले ते गैर होते असे सारखे येते आहे. म्हणून त्याविषयी हा शेवटचा खुलासा:
शिवाजीविषयी जर काही विनोद/वदंता कोणत्या तरी काळात असतील, तर त्या अस्तित्वात होत्या हा इतिहासाचा एक भाग आहे. तुमच्या-माझ्या नाकारण्याने त्यांचे अस्तित्व नष्ट होत नाही. त्यांना विनोद/वदंता म्हणून स्वीकारण्याने त्या विनोद/वदंताच रहातात; सत्य होत नाहीत. विनोद/वदंतांचा अभ्यास इतिहाससंशोधनात गैर ठरत नाही. त्यामुळे त्या विनोद/वदंतांच्या अस्तित्वाचे परिणाम इतिहासतज्ज्ञ तपासतील; तुमचे-माझे त्या त्या विनोदाला विनोदी न मानणे किंवा त्या वदंता नाकारणे हेदेखील ते इतिहासाचा एक भाग मानतील, पण ८०० वर्षांनंतर शिवाजी वंदनीय रहावा यासाठी त्या विनोद/वदंतांचे अस्तित्वच नाकारणारे स्वतःला इतिहासतज़्ज्ञ म्हणवून घ्यायच्या लायकीचे नसतील. कारण त्या विनोद/वदंतांचे अस्तित्व दिसून आल्यानंतरही त्या नाकारणे हे संशोधनाच्या चौकटीत गैर ठरते.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

+१

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.

चर्चा सारांश

अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्यादित असावे असे बर्याच जणांचे मत आले, काहींनी मर्यादित/प्रसंगानुरूप/विवेकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे असे देखील मत व्यक्त केले. साधारणपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे असे सर्वच लोकांना वाटते, मी देखील त्यास सहमत आहेच. वाद कदाचित अभिव्यक्ती स्वातंत्र्य विवेकी आहे कि नाही ह्यावर असू शकेल, पण त्या विवेकाबद्दल समाज-मते काळ-सापेक्ष असण्याची शक्यता अधिक आहे असे बहुतांश लोकांना वाटते, तरी देखील टोकाची आक्षेपार्ह वाटणारी उदाहरणे आहेतच जशी शौचाच्या भांड्यावरील देवतांची चित्रे, ती देखील काहीना आक्षेपार्ह वाटणार नाहीत पण तसे मत निदान ह्या चर्चेत समोर आले नाही.

झुंडशाही एकूणच नकारात्मक शब्द असल्याने सगळ्यांनीच ह्या चर्चेत त्यावर आक्षेप नोंदविला, झुंडशाही सविवेक असू शकते ह्याच्या जवळपास जाणारे विधान फक्त श्री घासकडवी ह्यांनी मांडले, तरी एकूण सर्वाना झुंडशाही ही सकारात्मक असू शकते हेच मुळात पटत नाही. मी दिलेली उदाहरणे मनसे किंवा शिवसेनेची सद्य उदाहरणे असल्याने कदाचित आक्षेप असावा, मी न दिलेली उदाहरणे, जशी स्वातंत्र्य लढ्यात झुंडशाहीने तत्कालीन इंग्रज राजवटी विरुद्ध उठाव/तोडफोड/हिंसा केली असता बऱ्याच गोष्टी आक्षेपार्ह न मानता स्वीकारल्या जातात, थोडे अजून मागे जाता शिवाजीने जे केले ते देखील तत्कालीन मोगल/आदिल शाही राजवटी विरुद्ध केलेला देशद्रोहच होता/ झुंडशाहीच होती, अगदी सुरतेची लुट देखील निखळ झुंडशाहीच होती पण ते सर्व स्वीकारले जाते, बहुदा धनंजय म्हणतात त्याप्रमाणे फुले/आंबेडकरांची मते पश्चाद बुद्धीने आक्षेपार्ह न वाटता स्वीकारार्ह वाटतात तद्वत काही झुंड शाहीची उदाहरणे पश्चाद बुद्धीने आक्षेपार्ह न वाटता स्वीकारार्ह वाटत असावीत (पण ह्या उदाहरणांवर चर्चा झाली नाही व ही माझी मते आहेत)

काही परिस्थितींमध्ये शारीरिक इजेचा हक्क असावा पण घटनेने त्यास बंदी असावी, म्हणजेच शारीरिक इजेची घटनात्मक चौकशी केल्यावर काही परिस्थितींमध्ये सूट मिळावी असे माझे मत होते, त्यावर देखील संदिग्ध मते चर्चेत जाणवली. मानसिक इजेचे मोजमाप करणे आवघड आहे त्यामुळे मानसिक इजेला नुकसानभरपाई कशी असावी ह्याबद्दल देखील संदिग्ध मते होती.

अस्मिता आणि अभिव्यक्तीची योग्य सांगड घालणे गरजेचे आहे असे मत मी व्यक्त केले, पण धनंजय वगळता अस्मिते बद्दल बाकी कोणी मत व्यक्त केले नाही, बहुदा त्यावर मत द्यावे वाटले नसेल किंवा एकूणच अस्मिता हा वादातीत विषय असल्याने बहुदा मत देण्याचे टाळले असावे, किंवा इतर काही कारण असण्याची शक्यता आहे.

 
^ वर