थोडे सहजच सैलसर...

स्थळः एक प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान संस्था
वेळ: सकाळची
संवादः
कर्मचारी१: अरे आपल्या कँपसमधल्या गेस्टहाऊसमधे नव्या खेळांच्या सोयीबरोबर स्विमिंग पूलही होतोय
कर्मचारी२: हो का? वा! वा! आता पुढल्या क्लायंट व्हिजिटला त्याला तिथेच उतरवता येईल. ही सोय नसल्याने आपल्या क्लायंटला वेगळ्या हॉटेलात उतरवावं लागे. कारण आता बाकी कंपन्यांमधे ती सोय आहे ना!
क.१: मला नाही हा तसं वाटत! क्लायंटला फक्त उत्तम काम हवं असतं त्याला तुम्ही देताय त्या सोयींशी घेणंदेणं अजिबात नसतं. तुम्ही ते काम किती पैशात करून देताय इतकंच तो बघतो
क.२: अरे इतकं सोपं नाही ते. आता बघ इतक्या माहिती तंत्रज्ञान पुरवणार्‍या कंपन्या आहेत. त्या वाईट का आहेत? तीच ती माणसं तशाच प्रकारे काम करतात. तरी मोठे क्लायंट इथेच काम का देतात? अनेक छोट्या कंपन्या आहेत त्या खूप स्वस्तात काम करून देतात, तेही योग्य वेळेत आणि चांगल्या दर्जाचं तरी इथे महाग कंपनी का?
क.१: हो असं होतं खरं. पण क्लायंट तुम्ही त्याची सरबराई कशी करता यावर थोडंच काम देतो
क.२: अरे त्यावर तो अजिबातच काम देत नाहि. मात्र या गोष्टीमुळे त्याची शक्ती फक्त कामावर केंद्रीत रहाते. आता कँपसमधेच उत्तम सोय होत असेल तर हॉटेलात उतरण, तिथून हॉटेलपर्यंतचा प्रवास, पुन्हा परतीचा प्रवास वगैरे आलंच शिवाय त्या हॉटेलच्या सेवेवर आपला कंट्रोल नसेल तो वेगळा. इथे कमी खर्चात शक्ती वाया न जाता क्लायंट व्यवस्थित रहातो
क.१: हं खरंय. पण तु मगाशी म्हणत होतास तसे क्लायंट मोठ्या कंपन्यांकडेच जास्त का जातो?
क.२: अरे क्लायंटला स्वतःच्या कंपनीत एक बजेट दिलं असतं. ते बजेट जर एखाद्या वर्षी वापरलं गेलं नाही तर पुढल्या वर्षी कमी बजेट मिळायची शक्यता असते. शिवाय त्याला त्याच्या संस्थेत उत्तर द्यायची असतात अश्यावेळी या मोठ्या कंपन्यांची नावं घेतली की त्याच्या व्यवहारावर फारसा संशय कोणी घेत नाही. अरे ही केलीये ही नुसती सोय नाही आहे तर इन्व्हेस्टमेंट आहे.
क.१: अरे पण काहि कंपन्या आहेत की जिथे अश्या सोयी नाहित पण क्लायंट पूर्वापार जात आहेत. त्यांना कामाचा अनुभवही वाईट नाही.
क.२: अरे ब्रँड व्हॅल्यू म्हणूनही काहि असतं की नाही? एके काळी त्यांनीही अश्या सोयी देऊन ते क्लायंट गोळा करून ठेवले असतात आता नवे क्लायंट फक्त जूनी प्रसिद्धी ऐकून येतात तेव्हढे. मात्र बघितलंस तर अश्या कंपन्यांना मोठे क्लायंट मिळवणं हळूहळू कठीण होत जातं
(कर्मचार्‍यांना इतर मित्र भेटतात आणि गप्पांचा विषय बदलतो)

========================================
स्थळः एक प्रसिद्ध धर्मस्थळ
वेळ: सकाळची
संवादः
स्थानिक१: अरे आपल्या गावातल्या धर्मशाळेत नव्या खोल्या, स्वतंत्र संडास, गरम पाणी, मोफत भोजन वगैरे सगळी सोय होतोय
स्थानिक२: हो का? वा! वा! आता भक्तांना इथेच रहावंस वाटेल आणि आपला धंदा वाढेल. आधी ही सोय नसल्याने एकतर भक्तांना बाहेरच्या महागड्या हॉटेलात उतरवावं लागे.
स्था.१: मला नाही हा तसं वाटत! भक्तांना फक्त देवाशी मतलब असतो त्याला तुम्ही देताय त्या सोयींशी घेणंदेणं अजिबात नसतं.
स्था.२: अरे इतकं सोपं नाही ते. आता बघ इतकी धर्मस्थळं आहेत. तिथे देव नाही असं काही आहे का? तिथेही भक्त जाऊच शकतात की. तरी मोठे मोठे भक्त इथेच का येतात? अनेक छोटी धर्मस्थळं आहेत जिथे देवाचं दर्शन/सेवा खूप सहज करता येत्ते, तेही कमी वेळेत आणि उत्तम-शास्त्रोक्त तरी इथे का बरं येतात?
स्था.१: हो असं होतं खरं. पण भक्त तुम्ही त्यांना गावात सेवा देता यावर याचं थोडंच ठरवतो?
स्था.२: अरे त्यावर तो अजिबातच ठरवत नाही. मात्र या गोष्टीमुळे त्याचं इथे येणं-रहाणं सुलभ होतं त्याला पुन्हापुन्हा यावंस वाटतं. आता आवारातच रहायची उत्तम सोय होत असेल तर हॉटेलात उतरणं, तिथून देवळापर्यत येणंजाणं, बाहेर खाणं वगैरे वगैरे आलंच. शिवाय बाहेर भक्तां मिळणार्‍या सेवेवर आपला कंट्रोल नसेल तो वेगळा. इथे कमी खर्चात शक्ती वाया न जाता भक्त व्यवस्थित रहातो
स्था.१: हं खरंय. पण तु मगाशी म्हणत होतास तसे भक्त मोठ्या धर्मस्थळींच जास्त का जातो?
स्था.२: अरे, जेव्हा एखादा धनाढ्य भक्त एखाद्या ठिकाणी पैसा खर्च करतो, देणगी देतो तेव्हा त्याला समाजात प्रश्न विचारले जातातच. त्याची उत्तर द्यायची वेळ कोणालाही नकोच असते. या मोठ्या धर्मस्थळांची नावं घेतली की त्याच्या व्यवहारावर फारसा संशय कोणी घेत नाही. शिवाय तिथे दिलेला पैसा हा लोकांसाठीच आहे असेही तो सांगु शकतो. थोडक्यात आपल्याकडे भक्तांची सोय म्हणून नव्हे तर इन्व्हेस्टमेंट म्हणून या सोयी कराव्या लागतात.
स्था.१: अरे पण काहि धर्मस्थळे आहेत की जिथे अश्या सोयी नाहित पण भक्त पुर्वापार जात आहेत.
स्था.२: अरे पौराणिक महत्त्व, नाव म्हणूनही काहि असतं की नाही? एके काळी त्यांनीही अश्या सोयी दिल्याच असतात. ते भक्त टिकून असतात. आता नवे भक्त जुनी प्रसिद्धी ऐकून येतात तेव्हढे. मात्र बघितलंस तर अश्या ठिकाणे मोठे-धनाढ्य भक्त फारसे जाताना दिसत नाहीत.
(स्थानिकांना इतर मित्र भेटतात आणि गप्पांचा विषय बदलतो)

लेखनविषय: दुवे:

Comments

हा हा हा

भक्तांच्या धार्मिक स्थळांना भेटी आणि 'सॉफ्टवेअर आऊटसोर्सिंग' यातली तुलना आवडली. उपक्रमावर सध्या नास्तिकतेचे वारे जोरात वाहू लागलेले आहेत असे म्हणावे की काय?
अवांतरः लेखाच्या शीर्षकाविषयी कुतुहल आहे. थोडे सहजच सैलसर... ही पुनरुक्ति वाटते 'सहजच' म्हटले की त्यात 'सैलसर' हे आलेच...

सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

गमतीदार

हा हा, गमतीदार् संवाद आणि तुलना.

-Nile

साधर्म्य

:-) हा हा. ऋषिकेश तुलना आवडली.

बाकी उपक्रमावर नास्तीकवाद्यात जहाल व मवाळ असे दोन गट आहेत काय? जसे सशस्त्र क्रातींकारकांना त्यांच्या मार्गाशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणे अशक्य वाटायचे तसे कट्टर नास्तीकवाद्यांना लोकांवर हल्ले चढवणे, आयडी बॅन करणे इ. शिवाय आजवर चालत आलेल्या रुढी, परंपरायुक्त आस्तीकवादाचे कालानुरुप परिवर्तन अशक्य वाटते का?

गमतीदार

गमतीदार.

ऋषिकेश यांनी त्यांच्या अनुदिनीवर किंवा अन्य संकेतस्थळावरसुद्धा हा लेख द्यावाच. *(वैचारिक आणि ललित यांचे मिश्रण - शैलीच्या दृष्टीने सुयोग्य - असलेला हा लेख आहे. परंतु माहितीपूर्णपेक्षा ललिताकडे अधिक झुकणारा लेख आहे, असे माझे मत आहे. उपक्रमाच्या धोरणाची अंमलबजावणी करणार्‍यांना काय वाटेल, हे मला ठाऊक नाही.)*

ललित

किस्से गमतीशीर असले तरी हे ललित लेखन वाटते. निदान तसा भास तरी होतो. ऋषीकेश हे येथले ज्येष्ठ (वयाने नाही) सदस्य आहेत. त्यांना ही गोष्ट ध्यानात आली नाही का? संपादन मंडळाने कार्यवाही करण्यापेक्षा ऋषीकेश यांना चर्चेचे प्रयोजन किंवा येथे देण्यामागे त्यांचा हेतू, त्यावर त्यांना अपेक्षित असलेली चर्चा वगैरे सांगण्यासाठी वेळ द्यावा असे वाटते. जर तसा खुलासा आला नाही तरच पुढील कार्यवाही करावी.

ह्म्म्

होय.. ललित वाटते आहे याबद्दल सहमत आहे.. फक्त सध्या उपक्रमावर चालु असणार्‍या (साधारणसारख्याच) चर्चांवर एकेक मत देण्याऐवजी हे लेखन केले होते. लेखन ललित असले तरी यातून चर्चा अशी आकार घेईल असे वाटले होते (आधी पुढील प्रश्न चर्चेसाठी लेखाच्या शेवटी दिले होते मात्र चर्चा फक्त त्या दिशेने सिमीत करायची नसल्याने काढून टाकले. नेमके प्रश्न साठवलेले नाहित मतितार्थ देतो आहे)

  • धार्मिक अर्थकारण --> धर्माआडून होणारे मनी लाँडरिंग --> त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम
  • धर्मक्षेत्रांना/धर्मसंस्थांना वेगळे आर्थिक नियम का? या संस्था तर इतर कोणत्याही व्यापारी संस्थेप्रमाणे(किंबहूना अधिक (प्रसंगी अर्थव्यवस्थेला घातक होईल इतके)) अर्थार्जन करताना दिसतात
  • भक्त हा ग्राहक झाला आहे. --> मग त्या अनुशंगाने येणारे प्रश्न जसे भक्ताची गैरसोय झाल्यास त्यास ग्राहक मंचावर तक्रार करता यावी का?वगैरे वगैरे

शिवाय लेखन लेख या सदरात लिहिले गेल्याने अधिक गोंधळ झाला असावा. तरी हे लेखन उपक्रमाच्या धोरणात बसत नसेल तर कृपया येथून उडवावे.

आता हा लेख मिसळपाव.कॉम येथेही प्रकाशित केला आहे.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

विरंगुळा

सदर लेख विरंगुळा व विचार या सदरात मोडतो.

# धार्मिक अर्थकारण --> धर्माआडून होणारे मनी लाँडरिंग --> त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम
# धर्मक्षेत्रांना/धर्मसंस्थांना वेगळे आर्थिक नियम का? या संस्था तर इतर कोणत्याही व्यापारी संस्थेप्रमाणे(किंबहूना अधिक (प्रसंगी अर्थव्यवस्थेला घातक होईल इतके)) अर्थार्जन करताना दिसतात
# भक्त हा ग्राहक झाला आहे. --> मग त्या अनुशंगाने येणारे प्रश्न जसे भक्ताची गैरसोय झाल्यास त्यास ग्राहक मंचावर तक्रार करता यावी का?वगैरे वगैरे

हे विचार संवाद या स्वरुपात मांडले आहेत. केवळ संवाद स्वरुपामुळे त्याला लालित्य आले म्हणुन लगेच वर्ज्य असा विचार करणे मला योग्य वाटत नाही. गद्यबंबाळ होण्यापेक्षा थोड्या हलक्या फुलक्या संवादाने विचार मांडला आहे.
दोन्हीची तुलना आवडली. देवस्थाने स्वच्छ असतील येणार्‍या भक्तांना स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, चप्पल बूट ठेवण्याची सोय,पार्किंगची सोय, प्रशस्त वाटेल असा परिसर,निवासाची सोय, थोडा बाग बगीचा हिरवाई असे असल्यास प्रसन्न वाटते. अस्तिक काय पण नास्तिकांनाही प्रसन्न वाटावे असा परिसर असलेली मिशन, मठ ,उपासना मंदिरे ही नक्कीच पर्यटन म्हणुन तरी आकर्षित करतात. बाहेरुन आलेला मनुष्य प्रवासाने थकलेला असतो. त्याला फ्रेश होण्याची आवश्यकता असते.
देवस्थान ट्रस्ट यांच्या दृष्टीने भक्त हा एक प्रकारचा ग्राहकच असतो. तो खूष झाला तर दानपेटी देणगी यात त्याचा हात जरा सैल सुटतो.
कंपनीच्या अतिथी निवासात देखील येणारा सरबराईने खुष होउन कंपनीला काम देण्याकडे त्याचा कल झुकतो. अतिथि देवो भव|
प्रकाश घाटपांडे

 
^ वर