वडिलांसाठी एकेरी संबोधन - कितपत योग्य?

साधारणपणे मध्यमवर्गीय पांढरपेशा वर्गांत वडीलांना 'अहो-जाहो' करण्याची पद्धत आहे. पण अलीकडे अलीकडे याच वर्गांतील काही कुटुंबांत वडिलांना "ए बाबा", "ए डॅडी", "ए पप्पा", असे एकेरी संबोधण्याची पद्धत रूढ होत आहे. हे कितपत योग्य आहे? यांत वडिलांचा अनादर होत नाही का?
या नव्या पद्धतीचे समर्थक असे सांगतात की एकेरी संबोधनामुळे जवळीक निर्माण होते. शिवाय आपल्या अगोदरच्या पिढीतल्या आईसाठी आपण एकेरी संबोधनच वापरतो. मग वडिलांना अरे-तुरे करायला काय हरकत आहे?
ही नवी पद्धत पडण्याचे एक कारण असे सांगितले जाते की आजकाल बायको नवर्‍याला अरे-तुरे करून नावाने हाक मारते. त्यामुळे मुले आईच्या पावलावर पाऊल टाकून वडिलांसाठी एकेरी संबोधन वापरायला शिकतात. याचमुळे काही ठिकाणी सुरवातीला नवर्‍याला एकेरी संबोधणारी बायको मुले झाली की अहो-जाहो म्हणू लागते. कारण मुलांनी वडिलांना अरे-तुरे करू नये असे तिला वाटत असते.
काहींच्या म्हणण्याप्रमाणे वडिलांना बहुमानार्थी संबोधल्याने वडीलांमध्ये वडीलकीची भावना सतत जागृत राहाते व मुलांचे क्षेमकुशल ही आपली जबाबदारी आहे असे त्यांना वाटत राहाते.
आईला एकेरी हाक मारणारी मुले वडिलांपेक्षा आईवर ज्यास्त प्रेम करतात हे खरे असले तरी तिला हिडिस-फिडीस करतांना फारसा विचार करीत नाहीत हेही खरे आहे.
आपणांस याविषयी काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

अस करा

अस करायला हवे कोर्डे की आईलाही अहो-जाहो करून संबोधा. म्हणजे उद्या एखाद्याची आई-बहीण हवाईसुंदरी असेल तर् तो मुलगा मुलगी तिच्याकडे आदराने बघेल, विरंगुळा, कमीची वागणूक देणार नाही.

काय म्हणता?

हल्ली

हल्ली उपक्रमावर असे विषय चर्चेला घालायची फॅशन वा फॅडच आले आहे. उगाच आपले पिढी वा संस्कृती वा धर्म वा जात वा संस्कार वा .... याचे कधी हि न संपणारे विषय सतत चघळत ठेवायचे...

श्री. कोर्डे , हा विषय चर्चेला येण्यामागची भावना जाणून घ्यायला जास्त आवडेल.

अवांतरः पुर्वी फोन चैनीचे साधन होते. आज त्यामुळे आपण एकमेकांना आदर देत नाही असे वाटते का?


मराठीत लिहा. वापरा.

जिव्हाळ्याचा विषय

हल्ली उपक्रमावर असे विषय चर्चेला घालायची फॅशन वा फॅडच आले आहे. उगाच आपले पिढी वा संस्कृती वा धर्म वा जात वा संस्कार वा .... याचे कधी हि न संपणारे विषय सतत चघळत ठेवायचे...

मला वाटतं ज्याला एखादा विषय स्वतःप्रमाणेच इतरांच्याही जिव्हाळ्याचा असण्याची शक्यता आहे असे वाटते त्याने त्यासंबंधी 'उपक्रम'वर लिहायला हरकत नसावी.

श्री. कोर्डे , हा विषय चर्चेला येण्यामागची भावना जाणून घ्यायला जास्त आवडेल.

वडिलांसाठी एकेरी संबोधन मला खटकते. तसेच ते बर्‍याचजणांना खटकत असण्याची शक्यता आहे. अनेकांना अनेक गोष्टी खटकत असतात. पण बरेचजण इतर आपल्याला प्रतिगामी, जातीय, असहिष्णु, समजतील या भीतीने आपला निषेध व्यक्त करायला पुढे येत नाहीत. अशा वेळी कोणी तरी (इतरांचा रोष किंवा उपहास पत्करण्याची तयारी ठेवून) सुरवात करणे आवश्यक असते.

सहमत

वडिलांसाठी एकेरी संबोधन मला खटकते. तसेच ते बर्‍याचजणांना खटकत असण्याची शक्यता आहे. अनेकांना अनेक गोष्टी खटकत असतात.

सहमत.

लहानांना मोठ्याचा आदर करावा असे वाटत नाही व मोठ्याना लहानांच्या भावनांची कदर करावी असे वाटत नाही हीच आजची सत्य परस्थीती आहे.

काळानुसार परंपरा ह्या बदलत जातात तेव्हा समाजामध्ये असे काहीतरी विचित्र घडत आहे असे मोठ्यांना वाटते तर मोठी माणसे ही नव्या पिढीला समजवून घेत नाहीत असे लहानांना वाटते !

राज जैन

जिव्हाळा

मला वाटतं ज्याला एखादा विषय स्वतःप्रमाणेच इतरांच्याही जिव्हाळ्याचा असण्याची शक्यता आहे असे वाटते त्याने त्यासंबंधी 'उपक्रम'वर लिहायला हरकत नसावी.
हरकत काहीच नाही.

वडिलांसाठी एकेरी संबोधन मला खटकते. तसेच ते बर्‍याचजणांना खटकत असण्याची शक्यता आहे. अनेकांना अनेक गोष्टी खटकत असतात. पण बरेचजण इतर आपल्याला प्रतिगामी, जातीय, असहिष्णु, समजतील या भीतीने आपला निषेध व्यक्त करायला पुढे येत नाहीत. अशा वेळी कोणी तरी (इतरांचा रोष किंवा उपहास पत्करण्याची तयारी ठेवून) सुरवात करणे आवश्यक असते.

मान्य, आज आपल्या समाजात कोणी तरी सुरूवात करण्यासारखे महत्वाचे अनेक मुद्दे आहेत. या विषयामधुन नक्कि काय साध्य होणार आहे आणि इतरांना त्याचा उपयोग्/फायदा मिळणार आहे? तुम्हाला तुमचे मुद्दे मान्य करणारे मिळतील आणि अमान्य करणारे सुद्धा. त्यातले जे मान्य करणारे मिळतील त्याने तुमचा व इतरांचा इगो सुखावेल कारण हा विषय तुमच्या खटकण्यापासून सुरू झाला आहे. एवढेच काय ते साध्य होइल असे माझे वैयक्तिक मत आहे.

घरात कोणी कोणाला काय म्हणायचे हा त्या घरातला प्रश्न आहे. त्याची येथे चावडीवर चर्चा कशाला?

अवांतरः घरातल्या मोठ्या मुलींना पुर्वी पालक अन धाकटी भावंडे अक्का म्हणत. आता सरळ नावाने वा दिदी म्हणतात. हे कितपत योग्य आहे? हे आपल्याला खटकते का?


मराठीत लिहा. वापरा.

सापेक्ष

आई,देव,मित्र,राजा यांना एकेरी संबोधन आहे. शिवाजी महाराजांना एकेरी संबोधन हे राजा असल्यामुळे आहे. वडिल हे मित्रासारखे असतील तर एकेरी,पुरुषप्रधानता नको म्हणून एकेरी,इंग्रजीत एकेरी आहे म्हणून एकेरी.

ये चल ना भो.

१)वडीलांना फार कमी लोक एकेरी नावाने संबोधतात
२)वडीलांना कसे संबोधावे,हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे,पण तरिही सार्वजनिक ठिकाणी तरी मागची पिढी अन आत्ताचीही अहो,काहो,च संबोधन वापरतात.हा आमचा अनूभव आहे..(दारु पिऊन तराट झालेल्या बापाला,मुलगा ये चाल ना भो घरी.असे म्हणतांना आम्ही ऐकले आहे.हे आम्ही नमूद करू इच्छितो.)
३)"ए बाबा", "ए डॅडी", "ए पप्पा", हे आम्ही अजून ऐकलेले नाही.ओ बाबा,ओ डॅडी ,ओ पप्पा असेच ऐकले आहे.
४) काही तरी चर्चा घडवून आणायची हाच चर्चेमागे हेतू दिसतो.पूढे आपल्याकडून चांगले विषय चर्चेला येतील ही अपेक्षा.

आपला स्पष्टवक्ता.
नाना कोंडके.

एकेरी संबोधन

वडीलांना एकेरी संबोधण्याचा प्रकार सर्वत्र नाही, बहुतांश घरांत वडीलांना अहो-जाहो म्हणूनच संबोधल्या जाते. आता काही लोकांकडे हा प्रकार दिसतो आहे. मात्र हा प्रकार प्रत्येकाचा पारिवारीक आहे असं माझं मत.

एक मात्र खरं की वडीलांचा किंवा कुणाचा ही सार्वजनिक किंवा जाहिर उल्लेख करायचा असल्यास त्यांचा उल्लेख एकेरी न करता बहुमानदर्शक असावा. ही जाहिर वर्तनाची अपेक्षा.

काही मोठे (माझ्या आयुष्यात ज्यांना मोठं स्थान आहे) माझ्या ओळखीचे आहेत ज्यांना आपल्या मुलांनी एकेरीने संबोधावंसं वाटतं. या मागे माझा तर्क असा की, मागच्या पिढी पेक्षा आताची नवीन पिढी आपल्या मुलांच्या जास्त जवळ आहे. मुलांशी मैत्री करण्यामागे हा 'अहो- जाहो' चा दुरावा मधात येत असावा, किंवा या प्रकारामुळे काहिसा औपचारिकपणा वागण्यात येत असावा असे त्यांचे मत असावे. या मागे आपल्या वडीलांची आपल्याला वाटणारी भीती, किंवा त्यांच्या जवळ जायचे असल्यावरही या आदरमिश्रीत दरार्‍याने त्यांच्यापासून दुर राहने झाले असेल, आणि त्याच वेळी आईशी मात्र एकेरीत भरपूर गप्पा करता आल्या असतील तर, असा प्रकार आपल्या मुलांच्या बाबतीत टाळावा असा काहिसा प्रकार असावा. एक मात्र नक्की की असं एकेरी संबोधन जेथे असेल तेथे मुलं वडीलांच्या जास्त जवळ असलेली मी पाहिली आहेत.

यावरून एकेरी संबोधनाने मुलं-पालक जवळ येतात असा माझा शोध नाही तर असं जेथे आहे तेथे अशी जवळीकता मी पाहिली आहे असं माझं अल्प निरिक्षण आहे.

अवांतर : -
पुण्यातील लोकांचं या एकेरीवर भरपूर प्रेम असल्याचं दिसून येतं. सार्वजनिक ठिकाणी कुणाही अपरिचिताला सुध्दा हे लोक एकेरीने संबोधतांनी पाहिलेलं आहे. सर्वात आश्चर्य तेव्हा वाटलं (खरं तर पुण्यातल्या गोष्टींचं आश्चर्य वाटण्याचे दिवस केव्हांच मागे पडलेत.) जेव्हा पुण्यातील दुकाणदार आपल्या गिर्‍हाईकांना एकेरी संबोधतांना पाहिले. अर्थात हा अनुभव मराठी दुकानातीलच आहे. पुण्या व्यतिरिक्त अन्य कुठेही असा प्रकार होत असल्याचे मला माहित नाही. आता पर्यंत विदर्भात, मराठवाड्यात, मुंबई आणि नाशिकातही फिरलोय पण असा अनुभव इतरत्र कुठेच नाही.

नीलकांत

थोबाड फोडले असते..

हल्ली बर्‍याच कुटुंबात लहान मुले आपल्या वडिलांना 'ए बाबा, ए पप्पा', असे एकेरी नांवाने संबोधतांना आम्ही पाहातो. लहान मुलांच्या केलेल्या फाजील आणि बाष्कळ लाडामुळे असे होते असे आम्हाला वाटते.

आमचे वैयक्तिक मत विचाराल तर आम्हाला हे अत्यंत चुकीचे वाटते. वडिलांशी 'अहो-जाहो' च्या भाषेतच बोलले पाहिजे असे आमचे मत आहे. आम्ही आमच्या वडिलांना एकेरी नांवाने संबोधले असते तर त्यांनी वेळीच आमचे थोबाड फोडले असते!

असो, गेले बिचारे रामभाऊ! त्यांना आमची विनम्र आदरांजली!

तात्या.

सहमत

आमचे वैयक्तिक मत विचाराल तर आम्हाला हे अत्यंत चुकीचे वाटते. वडिलांशी 'अहो-जाहो' च्या भाषेतच बोलले पाहिजे असे आमचे मत आहे. आम्ही आमच्या वडिलांना एकेरी नांवाने संबोधले असते तर त्यांनी वेळीच आमचे थोबाड फोडले असते!

सहमत

मी वापरत नाही.

मग् आईला अहो जाहो का नको?

???

काय मत आहे जनतेचं??

प्रश्न जन्माला घालणारा (अभिजित)

इतपत

आईसाठी एकेरी संबोधन वापरणे जितपत योग्य, वडिलांसाठी वापरणेही तितपत योग्य.

एकेरी संबोधन

वडिलांना एकेरी नावाने संबोधणे योग्य की अयोग्य याची काही कल्पना नाही.
माझ्याबद्दल सांगायचे तर मी माझ्या वडिलांना 'ए डॅड' अशी हाक मारते व त्यांचा उल्लेख करताना 'माझे बाबा'(माझे डॅड असाही नाही) असा करते.
अशी हाक मारल्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनांत असलेला आदर किंचितही कमी झाला नाही. पण प्रेम , जवळीक मात्र नक्कीच वाढली. माझ्या मुलांनी माझ्या नवर्‍याला 'ए डॅड' / 'ए पप्पा' अशीच हाक मारलेली मलातरी आवडेल.

सुदैवाने,

अशी हाक मारल्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनांत असलेला आदर किंचितही कमी झाला नाही. पण प्रेम , जवळीक मात्र नक्कीच वाढली.

वडिलांशी प्रेम आणि जवळीक वाढण्याकरता त्यांना 'अरेतुरे' करण्याची गरज आम्हाला कधीच भासली नाही, ना कधी आम्हाला तसे शिकवले गेले. त्यामुळे वडिलांशी अरेतुरे चा अधुनिक उथळपणा न करताही आम्ही प्रेम आणि जवळीक जपू शकलो हे आमचे सुदैव!

आणि प्रेम आणि जवळीक वाढते म्हणून 'मला अरेतुरे करा' किंवा 'मला अरेतुरे करा' म्हणजे प्रेम आणि जवळीक वाढेल (!), असले उथळ आणि भंपक संस्कार आमच्या वडिलांनीही कधी आमच्यावर केले नाहीत हेही आम्ही आमचे सुदैव मानतो!

त्यामुळे कधी फाडकन कानफट फोडतील याचा भरवसा नसूनसुद्धा (!) तसेच त्यांना अहोजाहो असे संबोधून सुद्धा (!) आमच्या वडिलांशी आमची असलेली प्रेम आणि जवळीक आजही आमच्या मनात ताजी आहे. आणि ती आहे हे दाखवण्याकरता त्यांना अरेतुरे करण्याचे केवीलवाणे समर्थन आज आम्हाला करावे लागत नाही हेही आम्ही आमचे सुदैव मानतो!

अजून काही दिवसांनी शाळाकॉलेजातल्या गुरुजनांनासुद्धा अरेतुरे करण्याची फॅशन निघेल! कारण प्रेम आणि जवळीक वाढली पाहिजे ना! आणि गुरुजनांशी प्रेम आणि जवळीक वाढली तर विद्याही अधिक प्राप्त होईल! ;)

चालू द्या...छान चाल्लंय! ;)

कालाय तस्मै: नम:! दुसरं काय?!

तात्या.

अरेतुरे

तात्या, अरेतुरे म्हणण्यात उथळपणा, भंपकपणा आणि केविलवाणेपणा कसा येतो हे जरा समजवून सांगा.
जर तुम्ही गुरूजनांची गोष्ट करता आहात तर एकिकडे म्हणायचे "आई माझा गुरू" आणि लगेच "ए आई". आपल्या नियमा नुसार मग आईला "अहो आईच" योग्य आहे.


मराठीत लिहा. वापरा.

संस्कार??

अपगच्छतु ते दु:खम् मा भूर् बाष्प परिप्लुतः| (रामायण २-३४-४६)

...वरो दत्तः कैकेय्यै वरदा त्वया | (रामायण २-३४-४२)

न च शक्यम् मया तात शातुम्... (रामायण २-३४-४९)

जिथे प्रत्यक्ष भगवान प्रभु श्री रामचंद्र आपल्या पित्याला एकेरी संबोधत आहेत तिथे आम्हा पामरांची काय कथा?
रामावर त्याच्या वडिलांनी असले उथळ आणि भंपक संस्कार केले होते असे म्हणता येईल काय?
ह्याला अरेतुरे करण्याचे केवीलवाणे समर्थन म्हणता येईल काय?

खरे म्हणजे...
मटण खाताना आम्ही "अजापुत्रं बलीं दध्यात्..." असले श्लोकही लोकांसमोर ठेवतो. ;)
प्रत्यक्ष इंद्रादि देव स्वर्गात "सुरापान" करत मेनकादि अप्सरांचा नाच पहातात म्हणून त्यांना सुर म्हणतात असाही प्रवाद निर्माण करतो.कोंबडी आणि मासे खाण्यासाठी मात्र अजून असे श्लोक अजून सापडले नाहीत हे खेदाने नमूद करावे लागते.
तेंव्हा आपण करतो त्यालाच पूर्वसुरींचे समर्थन सापडणे अवघड नाही. (यालाच संस्कार म्हणतात असा आम्हाला दाट संशय आहे.;))आपली संस्कृती अगाध आहे!

लहान मुलांना काय कळतं?(सकारात्मक प्रश्न)

लहान मुले लहान असताना आजुबाजूच्या मोठ्या लोकांचे अनुकरण करत असतात. एकतर अनुकरण चालूच असते त्याचबरोबर् त्यांचे आईबाबा त्यांना त्यांच्या मते योग्यायोग्य शिकवत असतात. मुलांची विवेकबुद्धी (चुकीची किंवा बरोबर)विकसित झाल्यावर ते आधीच्या वागण्यात बदल करू शकतात. किंवा ते करतातच. कित्येक बाबा बाबा करणारी लहान् मुलं मोठी झाल्यावर बाबांना घराबाहेर काढतात. आणि दादा दादा करणारी मुलं भाऊबंदकी करतात. कित्येकजण न बोलताही असा काही आधार देतात की आपलंच मन विश्वास ठेवत नाही.

तेव्हा कोण कोणाला कसा बोलावतो (वा संबोधतो) पेक्षा आतून तो खरोखर किती आदर बाळगतो हे महत्त्वाचे. काय?

ए बाबा म्हणून जवळ घेतलं तर ते ओ बाबा म्हणून चुना लावण्यापेक्षा बरंच नाही का? युगानयुगे चालत आलेल्या (यासारख्या काही)परंपरा तेवढ्या जरूरीच्या वा सार्थ नाहीत हे जुन्या लोकांनाही पटतं खरं पण त्याचवेळी ते बदल पचवूही शकत नाहीत. यथाकाल हे सगळं सर्वमान्य किंवा सामान्य बनून् जातं. उदा: मुलींनी मुलांचे कपडे घालणे, उशिरपर्यंत घराबाहेर असणे, मुलांनी केस वाढवणे.

पुरोगामी (अभिजित)

प्यार किया नहि जाता हो जाता है...

धाकापोटीचा आदर किंवा अंधानुकरणाने साधली जाणारी जवळीक दोन्हीही टोके शेवटी दु:खकारकच.

एकवचनाच्या सुखात आम्ही तरी तृप्त आहोत.

अरे बाबा!

माझी दोन्ही मुले मला "अरे बाबा" म्हणतात.
कधीकधी नावानेही हाक मारतात.

माझ्या वडिलांना मी "अहो बाबा" म्हणतो. त्यांच्या पाठीमागेही.

या दोन्ही गोष्टी मला आवडतात.

त्यात कुणाला गैर वाटत असेल तर वाटो बापडं.
तोंडासमोर अहो-जाहो... पाठीमागे "आमचा म्हातारा" म्हणण्यापेक्षा एकेरी हाक मारलेली परवडली
असे माझे मत आहे.

माझ्या मुलांनी मला काय म्हणावं ते मी ठरवणार किंवा ती ठरवतील.
तुमच्या मुलांनी (असतील तर) तुम्हाला काय म्हणावं ते तुम्ही ठरवावे नाहीतर ती ठरवतीलच. सोप्पय!

भाव महत्वाचा

तोंडासमोर अहो-जाहो... पाठीमागे "आमचा म्हातारा" म्हणण्यापेक्षा एकेरी हाक मारलेली परवडली

अगदी खरं बोललात विसुनाना.
आणी नव्या आणी जुन्या पिढी चा इतका छान पुल, इतक्या सहजतेने झाल्याबद्दल आपले कौतुक करावे तितके कमी आहे. (अनिल अवचट पण असाच पुल आहेत का?)
'उपर की तो बनी, अंदर की राम जाने' यात काही अर्थ नाही हो.
असा देखल्या देवा दंडवत घालून "तात, बाबा, महाराज" अशी हाक मारली तरी त्यात अर्थ नाही. शेवटी 'भाव' महत्वाचा आहे.
मनात भाव नसेल तर राजाच्या पदव्यांनाही अर्थ नसतो.

आपला
गुंडोपंत

~ उपक्रम वयाने वाढावे ह्याचे मी समर्थन करतो!
म्हणजे काय?
म्हणजे 'वय वर्षे १८ अधिक' अशा समूहा चे वावडे उपक्रमाला का असावे बरं? ~

काही म्हणा.

ए बाबा काय किंवा ओ बाबा काय प्रेम कधी कमी जास्त होतं का?

वडिलांना ते मान्य आहे का?

आदरार्थी हाक मारणे हे सुसंकृतपणाचे लक्षण आहे यात शंका नाही पण, लागल्या सवरल्यास तोंडी निघणारे पहीले शब्द म्हणजे 'आई ग'.
आईला एकेरी हाक मारताना तिचा अपमान होतो का? समाजात लोक आईला एकेरी हाक मारतात ते तीच्या वात्सल्यापोटी. अहो जगतपित्याला ते अरेतुरे करतात. माझ्या हिशोबी ज्याला तुम्ही हाक मारणार त्याला जर ते संबोधन मान्य असेल आणि त्या हाकेत अवहेलना नसेल तर काहीच हरकत नाही.
ही गोष्ट कौटुंबीक आहे परंतू महाराष्ट्रसंस्कृतीत (समाजात) बस़णारी नाही हे ही खरे, म्हणूनच एकेरी संबोधण्याची हौस ही घरापूरती मर्यादीत राहावी.

हेमंत

 
^ वर