क्रूर पर्यायातून निवड
नमस्कार मित्रहो.
एका अत्यंत गंभीर प्रश्नाबाबत इथे लिहावे असे वाटले म्हणून ही चर्चा. साधारण दीड वर्षांपूर्वी माझ्या नात्यातील एका बाळाला 'रेटीनोब्लास्टोमा' नावाच्या डोळ्याच्या कॅन्सरचे निदान झाले. हा अत्यंत क्वचित आढळणारा एक कॅन्सर आहे. कुटुंबावर हा एक मोठाच आघात होता. मग सर्व मार्गांची माहिती मिळवली गेली आणि भारतातील एका नामांकित डोळ्यांच्या रूग्णालयात उपचार करण्याचे ठरले. त्यात प्रामुख्याने केमोथेरपी आणि लेसर उपचार केले गेले. उपचारांचा त्रास बाळाच्या आई-वडीलांना खूपच होत असे पण पहिल्या तीन केमोथेरपीमध्ये
डोळ्यातील गाठी कमी झाल्याचे रिपोर्टस आले, त्यामुळे सर्व जण त्रास सहन करत होते. चौथ्या केमोथेरपीनंतर सहाव्या केमोपर्यंत मात्र गाठी फ़ारश्या कमी झाल्या नाहीत आणि डॉक्टरही हळूह्ळू डोळा काढण्याचा सल्ला देऊ लागले. तथापि एक डोळा जरी काढला, तरी रोग मेंदूकडे पसरणारच नाही, किंवा दुसरा डोळा बरा होईल याची कसलीच खात्री डॉक्टरांकडून मिळत नव्हती. दुसऱ्या बाजूला केमोमुळे बाळाची तब्येतही अत्यंत नाजूक झाली होती. त्याचे व आई वडीलांचे खूप हाल होत असत. कसेतरी दिवस काढणे व आशा जिवंत ठेवणे एवढेच सर्वांच्या हातात होते.
नंतर पुण्यातील औंधजवळच्या अतिप्रसिध्द होमिओपॅथी डॉक्टरांचे उपचार घेतले. गाठींची वाढ सुरूवातीला मंदावल्यासारखी वाटत होती व डॉक्टर आपण प्रयत्न करू, यश मिळेल असे सांगत. त्यांच्या औषधाने जवळजवळ सहा ते आठ महीन्यानंतरही रिपोर्टसमध्ये फारसा फरक पड्ला नाही. ऍलोपॅथीचे डॉक्टर या प्रयत्नाना उपचारच मानत नाहीत, आणि त्यांच्य़ा मते रोग बरा होत नव्हता, कदाचित थबकला होता.
असे नैसर्गिकपणेही होऊ शकते. ऍलोपॅथीचे डॉक्टर अर्थातच बाळाला योग्य उपचार देत नाही आहात, विनाकारण वेळ वाया घालवता आहात असा सल्ला देत होते. पुन्हा ऍलोपॅथीच्या उपचारांची अर्थात कसलीही हमी नव्हतीच. रोगापेक्षा ईलाज भयंकर या अनुभवाने तिकडे जाणे पालकांनी टाळले होते.
आता गाठींची अजूनच वाढ झाली आहे. बाळाची इतर प्रगतीही दिसत नसल्याने बरीच कमी आहे. उदा. तीन वर्षांनंतरही एक दोन शब्दच बोलतो. सध्या तब्येतीचा इतर त्रास नाही पण डोळ्याचा मात्र त्रास वाढ्त आहे. म्हणून ऍलोपॅथीच्या डॉक्टरना आता विचारले तर, ते पुन्हा केमोज सुरू कराव्या लागतील व दोन्ही डोळे काढावे लागतील असा सल्ला देतात. हे सर्व केले तरी जीवाची शाश्वती नाहीच. बाळाच्या पालकांपुढे आता दोन पर्याय आहेत. कसलीही शाश्वती नसताना केमो, ऑपरेशन इ. करत राहण्याचा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय म्हणजे आला दिवस चांगला मानून त्या बाळाला सांभाळणे व त्याचे मिळेल तेवढे आयुष्य जमेल तेवढ्य़ा आनंदात घालवणे. थोडक्यात नैसर्गिक मृत्यूची वाट पाहणे. यात निदान उपचारांच्या यातना तरी नाहीत. सध्या मुलाच्या पालकांचा कल दुसरा पर्याय निवडण्याकडे आहे. उपक्रमींना यावर काय वाटते, आणखी काही पर्याय असू शकतील काय? अशी परिस्थिती पूर्वी कोणावर आल्यास त्यांनी कसे तोंड दिले? अशा प्रकारची चर्चा येथे अपेक्षित आहे.
टीप: आयुर्वेद किंवा इतर पर्यायी उपचार पध्द्तीसाठी काही तज्ञांना भेटलो होतो, पण कोणीच अशी केस
बरी केल्याचा दावा केला नाही, म्हणून वरीलप्रमाणे उपचार घेतले गेले.आता पुन्हा नव्याने कोणतीही
उपचार पध्द्ती ट्राय करण्यासारखी परिस्थिती वाटत नाही.
Comments
सल्ला देणे योग्य नाही
एव्हरी प्रॉब्लेम इज फायनली इकॉनॉमिकल.
सल्ला देण्याइतपत अधिकार कुणा उपक्रमींकडे आहे असे वाटत नाही. स्वतःचा निर्णय स्वतःलाच घ्यावा लागतो. बाळाचे पालक जो निर्णय घेतील तो "त्या परिस्थितीत सर्वात योग्य असाच असेल". त्यांनी कन्व्हेन्शनल उपचार मध्यंतरीच्या काळात थांबवले हा ही त्या वेळच्या परिस्थितीत योग्यच निर्णय असणार.
येथे होणार्या चर्चेतून त्यांच्यावर अनावश्यक दडपण येऊ नये असे वाटते.
नितिन थत्ते
सल्ला नव्हे, पण अनुभव शेअर् करायला काय हरकत?
>> एव्हरी प्रॉब्लेम इज फायनली इकॉनॉमिकल.
हे का लिहीले ते समजले नाही.
>>स्वतःचा निर्णय स्वतःलाच घ्यावा लागतो.
एकदम सहमत.
पालक ही चर्चा वाचण्याची शक्यता नाही. पण काही नवी दिशा मिळाल्यास मला त्यांच्या पर्यंत पोहोचवता येईल. हा समुदाय या चर्चेसाठी योग्य नाही असे वाटले नाही.
आर्थिक परिस्थिती
नितीन थत्तेंनी हे असे लिहिले असावे कारण चिकाटी सोडण्याला अनेक कारणे असू शकतात त्यापैकी आर्थिक परिस्थिती नसणे हेही एक आहे. त्यात केमो ने काही साध्य होत नसेल तर त्यावर पैसे खर्च करण्यातही काही अर्थ नाही. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांच्यासाठी एव्हरी प्रॉब्लेम इज नॉट फायनली इकॉनॉमिकल.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
श्वास
श्वास या सिनेमामध्ये अशा प्रकारची केस दाखवली आहे. त्यातला मार्ग सिनेमा पहात असतांना तरी मला योग्यच वाटत होता. आयुष्यात येणार्या अशा डायलेमांना उत्तर नसते. अशी निराशाजनक वेळ आल्यावर लोक उपास तापास, व्रते वैकल्ये, अंगारे धुपारे वगैरेंच्या मागे लागले तरी त्यांना दोष द्यावा असे वाटत नाही. आशा अमर असल्यामुळे त्यांचे काही दिवस तरी बरे जातात. कष्टमय जीवन की दयामरण यावर सर्वोच्च न्यायालयानेदसुद्धा स्पष्ट आदेश दिलेला नाही.
उपक्रमावर ही चर्चा करण्यात मला काही गैर दिसत नाही. कदाचित कोणाला तरी एकादा चांगला उपाय माहीत असेल तर?
दोन स्वानुभव
मुलाच्या पालकांनी काय करावे यावर मी टिप्पणी करू शकत नाही. वरची केस वाचून अतिशय खेद झाला. लहान मुलांना अशा दु:खातून जावे लागू नये हीच इच्छा!
दोन स्वानुभव येथे नमूद करते.
माझ्या नात्यातील एका ४०च्या व्यक्तीस कोलोन कॅन्सरने गाठले. इतक्या कमी वयात त्यांच्यावर उपचार होऊ शकतील आणि त्यांचे शरीर ते सहन करू शकेल या आशेतून किमो आणि इतर उपचार केले. खूप खर्च केला पण विशेष फरक पडला नाही. शेवटी या व्यक्तीने आपल्याला उपाय नकोत असे ठरवले आणि शेवटचे काही दिवस आपल्या नातेवाईकांसोबत काढले.
माझ्या मामांना वयाच्या ७३व्या वर्षी कॅन्सर झाला. त्यांची लेक ऑन्कॉलॉजिस्ट. तिने जमतील ते सर्व उपचार केले. किमोमुळे मामांची तब्येत खालावली. त्यांना न्युमोनिया वगैरेंनी ग्रासले आणि अतिशय वेदनेत त्यांचा मृत्यू झाला.
वरील दोन्ही उदाहरणात ज्यांना हे पर्याय पटले नाहीत त्यांनी दोष दिले. ज्यांना पटले त्यांनी घरच्यांचे सांत्वन केले. असे प्रसंग कठीण असतात त्यामुळे असेच करावे तसेच करावे असे ठरवणे खूप कठीण आहे.
अजून एकदा चांगल्या डॉ. शी भेटून ...
केस फार तळमळीची आहे.
अजून एका चांगल्या डॉ शी भेटून बघता येयील काय ?
चिमूकल्यासाठी आमच्याकडून देवाकडे प्रार्थना :( .
मनूष्य अजून हतबल आहे , हे बघून नेहमीच हळहळ वाटते. अजून खूप
अभ्यास करायचा आहे माणसाला... आपल्याला... सर्वाना... अशी परिस्थीती न येण्यासाठी.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
पहीला पर्याय योग्य वाटतो
पहीला पर्याय योग्य वाटतो. प्रयत्नांती यश लाभेलही. चिकाटीने प्रयत्न करावेत , धीर सोडू नये.
सहमत आहे
चिकाटी सोडू नये हे बरोबर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिवस आणि बाळ कमी त्रासात जगेल असे उपचार केले तर चालतील.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
दु:खद
फार दु:खद अनुभव आहे. "श्वास" चित्रपटात कथेच्या आड झालेल्या चर्चेची आठवण झाली.
अर्थिक अडचण असल्यास सहकार्य होउ शकते.
चिमूकल्यासाठी आमच्याकडून देवाकडे प्रार्थना ,मुलाच्या पालकांनी काय करावे यावर आपण टिप्पणी करू शकत नाही.
समजा उपचार करावयास अर्थिक अडचण असल्यास सहकार्य होउ शकते.
माझी मैत्रिण
माझी एक अत्यंत प्रिय मैत्रिण कर्करोगाने काही वर्षांपूर्वी गेली. तिला वेगळी ट्रीटमेंट चालली होती - ती बरी होईल असे वाटेपर्यंत गेली. तिने आल्टरनेटिव म्हणून काही आयुर्वेदिक औषधे घेण्याचाही प्रयत्न केला होता. ती औषधे भारतातून आणावी लागत. आणि आणणे हे सरळ काम होते असे वाटत नाही. पण फायदा झाला नाही. पण अशा अवस्थेत काय करावे हा प्रश्नच असतो. जेव्हा जिवावरचे दुखणे असते तेव्हा लोक सर्व पर्याय वापरतात किंवा वापरत नाहीत, जे आयुष्य आहे ते पदरी पाडून घेतात. हे दुर्दैवाने काय करावे असे सांगता येणार नाही.
वरचे वाचून खूपच वाईट वाटले.
उपाय
२०१० च्या लोकसत्ता मध्ये डॉ. उल्हास कोल्हटकर लिखित प्रतिमा तंत्र या विषयावर एक लेख वाचल्याचे आठवले. डॉ. ओ. कार्ल सिमॉनटन यांनी दिलेली १९७१ साली ६१ वर्षांच्या घशाच्या कर्करोगाने शेवटची आशा सोडलेल्या रुग्णाची जवळपास पुनर्जन्माची कहाणी आहे. येथे त्याचा दुवा आहे.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=673...
लहान मुल असल्याने या किती नक्की उपयोग होईल हे सांगता येत नाही. पण कोणत्याही त्रासाशिवायचा हा मानस-औषधोपचार करायला हरकतही नसावी. या तंत्राचा वापर कसा करावा याची माहितीही तेथे आहे.
माझ्या जवळच्या व्यक्तींमध्ये (वय ६०+ ) कर्करोग जवळपास नाहीसा झाल्याचे उदाहरण आहे. त्यांनीही काही काळ केमो घेतली होती. त्यामध्येही त्यांचा 'जीवनाकडे पाहण्याचा आशावादी दृष्टीकोन' हा प्रमुख भाग असल्याचे तत्कालीन आँकोलॉजिस्टने माझ्याशी झालेल्या चर्चेत नमूद केले होते. रुग्णाने याचे श्रेय आधुनिक वैद्यकाने केलेली शल्यचिकित्सा, आयुर्वेदीय औषधे, रामदेवजी बाबांचे प्राणायाम उपचार असे सर्वांनाच दिले आहे.
-निनाद
मंबो जंबो
'डॉक्टर' उल्हास कोल्हटकर हे असला भंपकपणा अनेकदा लिहितात. दीपक चोप्रा हे नाव आम्हाला डिस्ग्रेस आहे.
ते
प्रतिसाद समजला नाही.
दीपक चोप्रांचे तर नावही माझ्या प्रतिसादात नाही.
-निनाद
माझे मत
तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे "त्यांनी काय करावे" अशा शब्दांत उत्तर न देता "मी काय केले असते" अशा काल्पनिक प्रकारचे देतो.
"तुमचे अपत्य किती वयाचे असताना मरण पावले तर तुम्हाला सर्वाधिक दु:ख होईल?" या प्रश्नाचे "पाचव्या महिन्याचा गर्भ असेपर्यंत शून्य दु:ख, मात्र, त्यापुढे सहा महिन्यांचा गर्भ ते सत्तर/ऐंशी वर्षांचा व्यक्ती असेपर्यंत कधीही मरण पावले तरी समानच दु:ख होईल" असे ऑन/ऑफ प्रकारचे उत्तर कोणी देईल असे मला वाटत नाही. विशेषतः, संभाषण शिकलेल्या अपत्याबद्दल नक्कीच अधिक प्रेम उत्पन्न झालेले होईल, त्याआधीच मृत्यू आल्यास कमी दु:ख होईल, असा माझा अंदाज आहे.
पुढे अपत्य होण्याची शक्यता खुली असताना, आणि त्याच्या संगोपनासाठीच्या आर्थिक तरतुदींवर केमो इ. चा खूप मोठा भार पडण्याच्या परिस्थितीत, पुरावाधिष्ठित वैद्यकाची कास सोडणे मला पटत नाही. आप्तांच्या अंधश्रद्धांवर (उदा. आयुर्वेद, होमिओपॅथी) आधारित उपचार देणे, किंवा 'शाश्वती नसलेले' प्रायोगिक वैज्ञानिक उपचार देणे इ. निर्णय मी आर्थिक परिस्थितीनुसार ठरविले असते. अन्यथा, वेदनारहित मृत्यू हाच सर्वोत्तम मार्ग वाटतो.
दु:खद
फार दु:खद. सल्ला देण्यासारखे माझ्याकडे काही नाही. फक्त एकच, कालच कॅंसर पेन(वेदने)वरती माझ्या एका मैत्रिणीच्या डिफेंसला गेलो होतो. तिच्याशी बोलून इतके नक्कीच सांगू शकतो की कँसरमध्ये भरपूर वेदना होत असतातच. (म्हणजे उपचार केले नाहीत तर रुग्णाची वेदने पासून मूक्तता होते असे मानणे चूकीचे आहे.) कदाचित, मला खात्री नाही, केमोथेरपीसारख्या उपचारांमूळे रुग्ण वरुन खूप दयनीय दिसतो पण रुग्णाच्या वेदनेत उतार पडू शकत असावा. पैशांचा प्रश्न आहेच.
-Nile
आभार
प्रिय उपक्रमींनो,
आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. हा प्रश्न नक्कीच कुणी कुणाला सल्ला देण्यासारखा नाही. पण काहींनी अनुभव शेअर केल्यामुळे उपचार थांबवण्याचा निर्णय घेणारेही लोक असतात हे वाचून दिलासा मिळाला. निनाद यांनी सुचविलेला लोकसत्तामधला लेखही वाचला. वाचून विपश्यनेच्या अनुभवाची आठ्वण झाली. तशीच काही पुस्तकेही मी वाचली आहेत. (उदा. कॅन्सरशी झूंज - डॉ. बावडेकर) पण कुठेतरी माणसाच्या, त्याच्या ज्ञानाच्या फार मर्यादा आहेत हे सत्य समोर येते.(धक्का यांनी असेच काहीसे मत मांडले आहे.).
या घटनेत मी अगदी जवळून सामील आहे. खूप विचार येतात आणि आयुष्यभर लक्षात राहिल असा अनुभव मिळतोय. 'जे शक्य असतील ते' ऍलोपॅथीचे उपचार चालू ठेवण्याचा निर्णय सारासार विचार करता योग्य वाटत नाही. त्याच्या शेवटच्या दिवसात आराम मिळावा ईतपतच ऍलोपॅथी उपचार सुरू ठेवणे योग्य वाटते.
काही मुद्दे विचारात आले:
- मूल बोलू शकत नाही परंतु उपचार करताना प्रचंड घाबरते व विरोध करते. ते सहन करणे कठीण आहे. सध्या त्याला जेंव्हा दुखते/ त्रास होतो, तेव्हाच ते रडते. इतर वेळी अगदी नॉर्मल! मला उद्या त्रास होणार आहे, हा त्रास त्याला नाही. त्यामुळे बाळ आला क्षण जगते. मोठ्या माणसांच्या बाबतीत मात्र आजाराचा आणि मानसिक (मृत्यू, भविष्यातील उपचार-वेदनांची भीती) असे दोन्ही त्रास असतात.
- कदाचित (खात्री नाहीच) पहिल्या पर्यायात आयुष्य वाढेल, पण त्याचा दर्जा काय असेल? रोग पुन्हा उद्भवण्याची भिती पण बाळ जसे मोठे होईल, तशी त्याला जाणवू लागेल. सर्वांनाच एका अनिश्चित काळासाठी भितीच्या छायेत जगावे लागेल.
- मृत्यू ही फक्त अशुभ, भीतीदायक, नकारात्मक गोष्टच आहे असे आपण नेहमी मानतो. डॉक्टरांचा दृष्टीकोनही कसल्याही परिस्थितीत मृत्यू टाळणे हेच आपले काम असा वाटला. काही डॉक्टरांना तर अतिप्रगत व तीव्र उपचार थांबवण्याचा विचार करणे हाच एक फार मोठा नैतिक अपराध वाटला.
- कर्मसिध्दांत खरा असेल काय? अन्यथा हे दु:ख बाळाच्या व पालकांच्या वाट्याला का आले असावे?
- आपल्याला रोजचा दिवस जगायला मिळणे हे केवढं मोठं भाग्य आहे! आणि आपण केवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे अस्वस्थ होत असतो.
- होमिओपॅथी हा खरेच उपचार आहे का? या प्रकरणात कोणत्याच बाजूने ठोस पुरावा मिळाला नाही. कदाचित या प्रकारच्या गंभीर रोगावर तिथे ईलाज नसावा, पण ती अंधश्रध्दा म्हणता येईल काय?
कन्फ्यूशिअसने म्हटल्याप्रमाणे हेही दिवस लवकरच संपतील, तूर्त पुढे जे येईल त्यात मुलांच्या पालकांना आधार देणे एवढी एकच दिशा मला दिसते आहे.
वेदना-रहित उपचार
रिकामटेकडा ह्यांच्याशी काही अंशी सहमत.
प्राप्त परिस्थितीत वेदना-रहित उपचार चालू ठेवावेत(आयुर्वेद वगैरे), निदान पालकांना उपचार केले नाहीत ह्याची टोचणी लागून राहणार नाही. बाकी कठीण परिस्थिती आहे आणि बाकी कोणाचे कुठलेहि शब्द पोकळच वाटतील. माझ्या सदिच्छा. लहानग्याला कमीत कमी त्रास होवो हि आशा.
वेदना-रहित उपचार
आयुर्वेद हा वेदना-रहित उपचार आहे हा गैरसमज आहे. आयुर्वेदाच्या नावाखाली पराकोटीचे पथ्यपाणी करुन आणि अगम्य बंधने घालुन रुग्णाचे + आप्तेष्टांचे जीवन हालाखीचे केलेले पाहिले आहे.
??
"वेदना रहित" आयुर्वेदिक उपचार होतच नाही असे आपले मत आहे काय? आणि त्याच उद्देश "टोचणी लागू" नये हे मी पुढे सांगितले आहे.
होय
आयुर्वेदात (चरक/सुश्रुत/वाग्भट बृहत्त्रयी की इतर काही?) कोणकोणते वेदनाशामक उपचार आहेत? त्यांची पोटन्सी, एफिकसी, ADR कितीकिती?
??
प्राप्त परिस्थितीत आणि उपलब्ध उपचारांमध्ये कमीत कमी त्रास आणि कमी टोचणी हे साध्य करणे ह्या उद्दिष्टाने मी वरील उपाय सुचविला, बाकी बाळाच्या पालकांची हिम्मत असल्यास जमेल ते आणि ज्यावर विश्वास असेल सर्व प्रयत्न करावेत. बाकी औषधात अपेक्षित एफिकसी असती तर हा लेख आलाच नसता. ज्ञात आयुर्वेदात ती आहेच असा दावा मी करत नाही.
आणि हो वेदना-रहित..वेदनाशामक नाही.
ठीक
धन्यवाद
मत
वेदना रहित उपचार ऍलोपथी/होमिओपथी/नॅचरोपथी/चायनीज मेडीसीन सगळ्याच प्रकारात असावेत. तुमच्या विधानात तुम्ही, 'आयुर्वेदासारखे वेदना रहित उपचार चालू ठेवावेत' असे म्हंटले आहे. त्यातुन एक अर्थ असा निघतो की आयुर्वेद हा इन् जनरल वेदना रहित असतो. (तुमचा तसे म्हणण्याचा उद्देश कदाचित नसला तरी त्यातुन असा अर्थ निघतो आहे) तसेच तुम्हीच नव्हे तर इतरांकडूनही असे मत ऐकल्याने वरील प्रतिसाद दिला.
ठीक
तौलनिक दृष्ट्या आयुर्वेद नक्कीच कमी वेदना देणारा आहे, होमिओपथी बद्दल माझा काहीच अनुभव नाही म्हणून कदाचित मी आयुर्वेदाबद्दल विधान केले. बाकी वेदना-रहित उपचार असतील तर ते सगळेच करावे असे ठीक.
पॅलीएटीव ट्रीटमेंट
ह्या अत्यंत कठीण परिस्थीतीत दुर्देवाने हाच पार्याय सर्वात योग्य वाटत आहे.
डोळे काढले असते
चर्चा वाचली . अनेक जणांप्रमाणे मी ही कळवळलो.. वाईटही वाटले.
श्री. रिकामटेकडा म्हणाले त्याप्रमाणे काय करावे नाही मात्र 'मी काय केले असते' ते सांगतो.
मी डोळे काढले असते. जीवास मुकण्यापेक्षा, किंवा इवल्याशा जीवाला केमोथेरपी देत राहून आर्थिक, मानसिक, शारिरिक क्लेश आणि फुकटची जिवंत आशा हे टाळण्यासाठी तरी मी डोळे काढण्याचा निर्णय घेतला असता. अगदी मुल जगेल याची खात्री नसली तरीही एक प्रयत्न म्हणून!
पुढे, डोळे काढल्यावर व मुल जगल्यावर, अंधशाळेत घालणे व इतर गोष्टी शिकवणे वगैरे जे करावे लागले असते ते आनंदाने केले असते
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
डोळे काढून केमो टाळता येत नाही
उलट कोणत्याही शस्त्रक्रियेने रोग पसरण्याची शक्यता वाढते, म्हण्ऊन केमो द्यावीच लागली असती.
ओह्!
माझ्या एका परिचिताला बोन कॅन्सर झाला असता (अगदी सुरवातीला डिटेक्ट झाला) केवळ ३ केमो सेशन्स, आणि एक ऑपरेशन ज्यात 'तो' हाडाचा तुकडा काढून तिथे कृत्रिम हाडाचे रोपण केले.
यावरून माझा तरी असा समज झाला होता की ऑपरेशन्स केल्यावर केमोथेरपीची काहि मर्यादित सेशन्स करावी लागतात. आयुष्यभर केमो घेत त्रास सहन करण्यापेक्षा हे बरे असे वाटले होते.
मात्र तुमची माहिती साधार व खरी असल्यास, मला माझ्या मताचा पुनर्विचार करावा लागेल
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?