मुंबईच्या मनकर्णिके

मुंबइच्या मनकर्णिके,नेसुनी फिकें वसन हें गहिना
तूं जातिस कोठें अशी गडे भर दिशीं, उन्हाचा महिना

तलखीची चिकचिक हवा, त्यात मी नवा, जीव घाबरतो
भाबडासाबडा सांब, राहूनी लांब तुजकडे बघतों
गर्दीचा दर्दी कुणी हिकमती गुणी जवळ घुटमळतो
असकारा पाहुन असा, जीवाचा ससा भेदरुन पळतो
तूं तल्लख पुरती खरी ! चाबकापरी फिरवसी नयना
तूं जातिस कोठें अशी गडे भर दिशीं, उन्हाचा महिना

उचलून उंच कुंतलां, मोरकुंचला बांधला वरती
ही चोळी थोडी थिटी,तुझी बळकटी दाविते पुरती
हा अंचल चंचल गडे वायुवर उडे, नेत्र भिरभिरती
टाचेंत उचलले बूट घालती कूट, गोंधळे धरती !
ही फैनाबाजी अशी ग शिकलिस कशी उडवण्या दैना
तूं जातेस कोठें अशी गडे भर दिशीं, उन्हाचा महिना

चित्राच्या छ्त्रीमधुन चित्र तूं बनुन लगबगा जाशी
मी साधाभोळा कवी, तर्‍हा तव नवी कळेना मजशी
जरी सांज दूर राहिली तरी उमलली कशी गुल्बशी !
सोन्याची बावनकशी घडवली जशी कुणीं उर्वशी !
भरमाध्याह्नीं उतरली चोरपावलीं चांदणी रैना !
तूं जातिस कोठें अशी गडे भर दिशीं, उन्हाचा महिना
वसंत बापट

श्री. शंकर वैद्य यांच्या कवितेवर जी टिपणी केली ती जरा डोक्यावरून गेली असे दिसते. असो. दोष माझा ( व मी निवडलेल्या कवितेचा!).
त्या डोकेदुखीवर उतारा म्हणून श्री. वसंत बापट यांची लावणी देत आहे. आता मी काही लिहावे असे दिसत नाही. शेवटी लिहावयाचे म्हणजे इतर शाहिरांनी या विषयावर लिहलेल्या समांतर कल्पना व लावणीमधील साम्य. ते राहू दे. या कवितेचा रसास्वाद प्रत्येकाने स्वत:च घडाभर भरून घ्यावा हेच जास्त उचित. हा घडा भरतांना बाहेर आलेले ओघळ रसिकांनी आम्हाला स्नान करण्याकरिता येथे दिलेत तर सोन्याला सुगंध !

शरद

Comments

शब्दपटू

मी ज्या समाजवादी शाळेत शिकलो तेथे बापटांची अनेक प्रचारकी थाटाची गाणी आम्हाला म्हणावी लागत असत. तेव्हापासून बापट जरा कमीच आवडतात. प्रस्तुत रचना त्यांच्या शब्दपटुत्वाची खात्री पटवते.

फैनाबाजी, असकारा, गुल्बशी

प्रस्तुत रचना त्यांच्या शब्दपटुत्वाची खात्री पटवते.

सहमत. प्रस्तुत रचनेत अनेक अनवट शब्द आहेत. जसे फैनाबाजी, असकारा, गुल्बशी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर