सैया निकस गये

सैयॉं निकस गये

नवरा-बायकेतील भांडणे तर आदि काळापासून चालत आलेली आहेत. कधी बायको रुसून बसते तर कधी नवरा घराबाहेर चालता होतो. बर्‍याच वेळी हे कपातले वादळ असते. काही वेळाने मिटते; दिलजमाई होते. पण दरवेळी हा तिढा सहजपणे सुटतोच असे नाही. तो नाहीच आला तर मग घरातील नातेवाईक, आजूबाजूच्या आयाबाया जमा होतात आणि.... आणि दोष तिचाच असणार हे गृहीत धरले जाते. तिला जीव तोडून पटवावयाचा प्रयत्न करावा लागतो .... " प्रियकर गेला खरा पण मी काही भांडण काढले नव्हते. काही बोलले नाही, बोलाचाली झाली नाही; मी तर मान खाली करून गुपचुप उभी होते." कोणाचा विश्वास बसत नाही असे पाहिल्यावर ती सखीची साक्ष काढावयाचा प्रयत्न करते ... " माझ्यावर विश्वास नाही तर सखीला विचारा, चादर घेऊन मी पलंगावर पडलेली होते." आता सगळे चर्चा करावयास लागतात, हा गेला तरी कसा असेल ?" मग तिच्याकडे चौकशी. बिचारी म्हणते " या रंगमहालात इतके दरवाजे, खिडक्या; कसे कळणार कसा गेला ?" शेवटी हताश होऊन एवढेच म्हणते " या असल्या ताटातुटीपेक्षा लग्नच झाले नसते, कुमारी राहिले असते, तर बरे झाले असते."

सैयॉं निकस गये मै ना लढी थी !!

ना कछु बोली, ना कछु चाली
सरको झुकायें मै तो चुपके खडी थी !!

मेरा गर ना मानो तो सहेलिसे पुछो
चादर औढे मै तो पलंगा पडी थी !!

रंगमहलके दस दरवाजे
न जाने कौनसी खिडकी खुली थी !!

कहे कमाली, कबीरकी बेटी
ऐसे रिहाईसे तो कुवॉरी भली थी !!

आपल्याकडे कुटुंबातील सगळे सभासद काव्य करतात अशी दोन उदाहरणे. पहिले नामदेव व दुसरे चोखामेळा. उत्तरेत कबीर,कबीराचा मुलगा कमाल व मुलगी कमाली या सर्वांच्या नावावरील काव्य उपलब्ध आहे. वरील शोकगीत कमालीचे. पण ... नुसतेच एक शोकगीत लिहावयास कबीराचा वारसा सांगणे योग्य दिसत नाही. कमाली तर येथे "कबीरकी बेटी " असा स्पष्ट उल्लेख करत आहे. काय असावे ?

हे तर एक रुपक दिसते. जीव (आत्मा) व कुडी. बघा. कुडी किती तळमळीने सांगत आहे; किती हताश झालेली दिसते आहे. जीव आहे, त्याच्या आधिपत्याखाली बिचारे शरीर गुपचुप, मान खाली घालून उभे आहे.तो गेला. आजूबाजूचे म्हणणारच " ऑ, असा कसा मेला ? " साक्ष काढावयाची ती आजुबाजूंच्या लोकांचीच. शेवटी चादर पसरून देह पलंगावर पडला पण त्यालाही जीव कसा गेला, कां गेला, काही काहीच कळणारे नाही.

दस दरवाजे. लगेच लक्षात येणार नाही. शरीराच्या नेत्र, कर्ण, नाक, मुखादी नऊं रंध्रांमुळे शरीराला नेहमी "नवद्वारा" म्हटले जाते. इथे मात्र कमाली "दस दरवाजे" म्हणत आहे. हा दहावा दरवाजा म्हणजे "ब्रह्मरंध्र". अध्यात्मशास्त्रात, विषेशत: योगमार्गात, डॊक्याच्या टाळूच्या जागी एक रंध्र आहे असे समजले जाते. त्याला म्हणतात "ब्रह्मरंध्र". य़ॊग्याचा, संन्याशाचा प्राण या रंध्रातून बाहेर जातो.( कित्येक संन्याशांच्या पंथात सन्याशी मेल्यावर त्याच्या डोक्यात खिळा मारून एक भोक पाडले जाते !) तर कमाली म्हणते आहे, " हे असेच होणार होते तर मग मी जन्माला आलेच नसते तर काय बिघडले असते ?

कै. शोभा गुर्टु यांचा आवाज फार कोमल, गोड म्हणता यावयाचा नाही. पण त्याला एक "दर्द " होता. त्यांची मराठी गाणी, "माझिया प्रियाला," "त्यानीच छेडले ग, " आठवा. त्या आवाजाला पर्याय नाही. त्यांनी "सैया निकस गये " मैफलीत म्हणावयास सुरवात केली आणि मग ते भजन त्यांचा ट्रेडमार्कच झाला. भारावून जावे असाच तो अनुभव असे.

शरद

Comments

वा..

वा. सुरेख लेख शरदराव. उपक्रमावरील पुनरागमनाने आनंद झाला.

दस दरवाजे. लगेच लक्षात येणार नाही. शरीराच्या नेत्र, कर्ण, नाक, मुखादी नऊं रंध्रांमुळे शरीराला नेहमी "नवद्वारा" म्हटले जाते. इथे मात्र कमाली "दस दरवाजे" म्हणत आहे. हा दहावा दरवाजा म्हणजे "ब्रह्मरंध्र". अध्यात्मशास्त्रात, विषेशत: योगमार्गात, डॊक्याच्या टाळूच्या जागी एक रंध्र आहे असे समजले जाते. त्याला म्हणतात "ब्रह्मरंध्र". य़ॊग्याचा, संन्याशाचा प्राण या रंध्रातून बाहेर जातो.

अत्यंत माहितीपूर्ण!

( कित्येक संन्याशांच्या पंथात सन्याशी मेल्यावर त्याच्या डोक्यात खिळा मारून एक भोक पाडले जाते !)

नवलच! अशी वेगळी सोय करण्यामागचे लॉजिक काय असावे बरे?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

:) लॉजिक

१. भारी(उच्च) गोष्टींना अलवीदा करण्यासाठी मार्ग माहित असणे आणि तो चांगला असणे आवश्यक आहे

२. समोरचा व्यक्ती ह्या लायकीचा होता (उच्च) हे असे केल्याने प्रेरीत होते, आणि तश्या लेवल ला आपणही पोहोचावे
ही भावना बाकींच्या लोकात तयार होते (भलेही डोक्यात भोक पाडण्याच्या आधी जीव(?) बाहेर गेला असो पण नंतर तसे केल्याने
व्यक्ती लै भारी होती असे लोकांना वाटते आणि समाधान मिळते)

असे काहीसे कारणे असावीत.
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

+१

काही इमारतींमध्ये पेंटहाऊसला खासगी उद्वाहक असतो तसे! किंवा नोकरांना सर्विस एलेवेटरची सक्ती असते तसेही असू शकेल ;)
--
सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या डोक्याची हाडे जुळलेली नसतात. त्यामुळे, त्यांच्या कवटीला खरोखरीच तसे छिद्र असते. योग, संन्यास, इ. जीवनशैली निवडणे बालबुद्धीचे निदर्शक समजावे काय?

प्रतिसाद संपादित

मूळ चर्चेशी संबंधित नसणारे प्रतिसाद काढले आहेत याची नोंद घ्यावी. चर्चेशी संबंधित नसणार्‍या विषयांवर संवाद साधण्यासाठी खरडवही किंवा निरोपसुविधेचा वापर करावा.

क्षमस्व !

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

विना-दहन विल्हेवाटाशी प्रथेचा संबंध

(पुढील स्पष्टीकरणाचे काही भाग मी कुटुंबातील एका वृद्धाकडून ऐकले होते. अन्यत्र शहानिशा केलेली नाही.)

संन्याशांच्या शवाची विल्हेवाट लावताना दहन करत नाहीत. दफन किंवा नदीत विसर्जन करतात. (असा एक विधी ऋषिकेश गावात होत होता तेव्हा मी तेथे होतो. शवाच्या विसर्जनाची प्रथा ही फक्त कर्णोपकर्णी माहिती नाही, अनुभवातली आहे.)

दहन होणार्‍या शवाची कवटी फुटेपर्यंततरी वाट बघितली पाहिजे अशी प्रथा आहे. (इतकेच काय, चितेवर कवटी फुटली नाही, तर आत्मा देहात अडकून राहातो आणि पिशाच्च होतो, असा एक समज आहे. पण तो धर्मशासंमत की बिगरधार्मिक-गावंढळ समज आहे, हे मला माहीत नाही.)

ज्या संन्याशांचे दहन होणार नसते, त्यांची कवटी फुटण्याची अशी सोय करावी लागते. (खिळा घालून.)

असेच

'विवरे नऊ आहेत - जिज्ञासूंनी मोजून पाहावीत' हे आठवले. 'चदरिया झीनी रे झीनी' मध्ये तानसम्राट अनुप जलोटाजी असेच विष्लेषण देतात. सदर लेखातले रसग्रहण आवडले असले तरी हे 'औदुंबर' सारखे होत नाही ना अशी दुष्ट शंका आली.
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

कौनो ठगवा नगरीया लूटल हो...

सुसंदर्भ स्पष्टीकरण आवडले.
कमलीच्या वडिलांच्या (कबीरांच्या) एका प्रसिद्ध भजनाची - "कौनो ठगवा नगरीया लूटल हो" आठवण झाली.
यातले रूपक जास्त स्पष्ट आहे.

वसुंधरा कोमकली - पं. कुमारांच्या आवाजातले हे भजन तर सुप्रसिद्ध आहेच -
http://ww.smashits.com/audio/player/free-music.cfm?SongIds=79328

पण 'अनकही' मध्ये आशा भोसले यांनी गायलेले हे व्हर्जनही आवडण्यासारखे आहे -

http://youtu.be/BhaykhMkphE

मलाही याची आठवण आली

तसा खूप फरक असला, तरी याची आठवण आली. शैलीत काहीतरी साधर्म्य आहे, आणि शव-म्हणजे-प्रेयसी/वधू या रूपकातही काही साधर्म्य आहे.

सुस्वागतम

शरदराव आपल्या पुनरागमनाने आनंद जाहला. सुस्वागतम

चन्द्रशेखर

छान

रसग्रहण आवडले. अनेक आभार.

मस्त!

शरदकाका, उपक्रमावर पुनरागमनाने आनंद झाला. अजून लेख येऊ द्या. पौराणिक कथांवर वगैरेही. :-)

रसग्रहण मस्तच झाले आहे. आवडले.

थोडेसे अधिक

रसग्रहण आवडले. लहानपणी ऐकलेल्या बाकी सर्व गायक/गायिकांमध्ये शोभा गुर्टूंचा आवाज वेगळाच वाटे.

गाण्याचे दोन्ही अर्थ वैध असले तरी पहिला अर्थ अधिक योग्य वाटतो, दुसरा अर्थ योग्य वाटला तरीही माझ्या दृष्टीने त्यातील रसास पोषक नाही. मृत्यू हा साधारणतः गंभीर अनुभव असतो. कमाली यांनी कबीराची बेटी म्हणून हा अर्थ मुद्दाम आणला असला तरी तो मृत्यूच्या गांभीर्यास पोषक नाही असे वाटते. अर्थात हे म्हणणे तुमच्या रसग्रहणाबद्दल नाही.

*शिवाय कुंवारी भली, म्हणजे काय? कारण कुंवारी म्हणजे लग्न न झालेली. म्हणजे 'आत्म्याचे कुडीशी मीलन न झालेली' असा काही घ्यायचा का? असे कोण असते? हा अर्थ लागत असला तरी बरोबर वाटत नाही. (हाच प्रतिसाद अन्यत्रही दिला आहे).

शरदर्तुच्या पुनरागमे, एकेक पान वाढावया

("शरदृतु" हे संस्कृतातले साधुरूप आहे, त्याबाबत माफी मागून) पुनरागमनाने आनंद झाला.

शरद यांनी वसंतपुष्पमाला ओवण्यास घ्यावी.

 
^ वर