कविता महाजन यांची मल्टीमीडिया कादंबरी

फेसबुकवर 'कुहू' या मल्टीमीडिया कादंबरीची लिंक देऊन मी लिहिलं :
कविता महाजनच्या 'कुहू'चे ट्रेलर. सध्या पोरं खुश आहेत एकदम कुहूवर आणि पोरांचे आजोबादेखील. :-).
http://www.youtube.com/watch?v=Xs9VIiZBd9I
त्यावर कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांच्यासोबत झालेली चर्चा फेसबुकच्या मर्यादा आहेत म्हणून् उपक्रमवर देत आहे.

बांदेकर : koohoo kharech afalatoon! "kalavantachi niyati' hi mazi aavadti theme mala sapadli tyat. thanks Kavita! pan aamchya sarkhya garib lokansathi Kavitane Koohoochi ek jan-aavrutti kadhavi.

मी : या बाबत मी सहमत नाही. अशा पुस्तकांचे खर्च आणि त्यामागची मेहनत किती असते. कॉफीटेबल्सबुकच्या नावाखाली आम्ही वाट्टेल त्या किमतीची पुस्तकं घेतो. ते जाऊ दे. पण साधे आपले टाटास्कायचे महिन्याचे बिल किती असते? आणि तो टीव्ही आपण किती वेळ पाहतो आणि त्यावर काय पाहतो? पुस्तक आणि डीव्हीडी एकत्र आणि रंगीत पुस्तक आणि आणि आर्टपेपर आणि ३डी कव्हर हे सगळं पाहिल्यावर माझे बाबा म्हणाले की ही किंमत कमीच आहे. प्रोब्लेम आसा आहे की आपल्याला पुस्तकांना इतके पैसे देण्याची सवय नाही. आणि बांदेकर सर आम्हा मित्रमैत्रिणींनी काळजी आहे की ती एवढे मोठे कर्ज कसे फेडणार? तुमच्याकडे 'दर्शन'चा अनुभव असताना तुम्ही तरी असे म्हणायला नको होते.

बांदेकर : बाई, मी आपला एक सामान्य वाचक आहे. तरीही महिन्याला आवडलेली आणि गरजेची पुस्तके विकत घ्यायला सरासरी दोनेक हजार रुपये जातातच. कुहूची कथा शंभर रुपये किमतीचे (आताच्या पुस्तकाव्यतिरिक्त आणखी एक) पुस्तक काढून माझ्यासारख्या सामान्य लोकांपर्यंत गेली ...असती तरी तरी मला ती तितकीच आवडली असती, असे वाटले. आपल्याकडे आधीच पुस्तके परवडत नाहीत म्हणून बोंब असते. अशा लोकांना हे निमित्तच पुरवतो आपण. असो. ते टाटा स्काय वगैरे ठीक आहे. तो ज्याचा त्याचा प्राधान्यक्रम असतो. पण पुस्तके गरिबालाही परवडावीत, हेही खरे. आणि ’दर्शन’चं म्हणाल तर ती आमच्यासारख्या लोकांची खाज असते. तिथे आम्ही पदरमोड करून अंक प्राध्यापक आणि मान्यवरांना(ही) फ़ुकट वाटतो, अशी तक्रार करणे मुर्खपणाच नाही का?

मी : पण म्हण्जे मग ती डीव्हीडी आणि ते मल्टीमीडिया सगळं व्यर्थच म्हणावं का? शब्दांच्या मर्यादा जाणवल्या म्हणून बाकी माध्यमं वापरली, असं लेखिका म्हणते. तर बाकीच्या माध्यमांमधून कथा कशी 'अधिक' उलगडते यात ( म्हण्जे पेंटींग, शास्त्रीय संगीत इ.) सामान्य वाचकांना रस नाही असे समजायचे की 'त्यातलं आपल्याला काय कळतं?' म्हणून सामान्य वाचक ते सोडून देतात? मग कला आणि तंत्रज्ञानातला अवेअरनेस नकोच का?
दुसरे म्हणजे आपण विकत घ्यावीत अशी ललित साहित्यातली खरोखर किती पुस्तकं दर महिन्याला बाजारात येतात? मी तुमचं 'चाळेगत' घेतलं, नंतर 'हिंदू' घेतलं. मग जयंत पवार, प्रतिमा जोशी आणि समर खडस यांचे कथासंग्रह घेतले. (कवितासंग्रह फुकट वाचण्यातही मला रस नाही. ) मग कुहू घेतले. बाकी काही अनुवादित पुस्तके घेतली. आणि काही जुनी घेतली, माझ्या संग्रहात नसलेली. इतर सगळी इंग्रजी. तर एक महाग पुस्तक घ्यायला काय हरकत आहे? मराठीत असे प्रयोग होऊच नयेत का?
मुलांसाठी जी उत्तम इंग्लीश पुस्तकं आम्ही परदेशातून मागवतो ती किती उत्तम छापलेली, चांगला कागद, सुंदर पेंटींग्जनी सजलेली असतात. आणि मराठीत साधी रेखाटणं नीट नसतात. हा दळभद्रीपणा संपायला नको का?

लेखनविषय: दुवे:

Comments

कल्पना नाही

एक महाग पुस्तक घ्यायला काय हरकत आहे?

भारतातील किती स्तरांतील लोकांना महाग पुस्तके परवडतात याची कल्पना नाही. कुहूची किंमत किती आहे?

माझा स्वतःचा महाग पुस्तके घेण्याकडे कल नसतो. त्यापेक्षा लायब्ररीतून महाग पुस्तक आणून वाचले जाते. महाग पुस्तक घ्यायची वेळ आलीच तर चांगले डील किंवा डिस्काउंट बघून घेते. तरीही, पुस्तकासाठी $५० पेक्षा जास्त खर्च केल्याचे आठवत नाही. मला परवडत नाही.

मराठीत असे प्रयोग होऊच नयेत का?

अवश्य व्हावेत.

हा दळभद्रीपणा संपायला नको का?

नक्कीच संपायला हवा पण त्यासाठी वाचक वर्ग किती आणि कोणता याचे परीक्षण करणे आवश्यक आहे. इंग्रजी वाचकांची संख्या आणि मराठी वाचकांची संख्या यांचे गुणोत्तर व्यस्त असण्याची शक्यता आहे.

बायदवे,

महिन्याला आवडलेली आणि गरजेची पुस्तके विकत घ्यायला सरासरी दोनेक हजार रुपये जातातच

सध्या भारतातील पुस्तकांच्या किंमती माहित नाहीत पण दोनेक हजारात चार पुस्तके (५०० चे १) येत असावीत. लोकांकडे महिन्याला चार पुस्तके वाचण्याचा वेळ आहे? (हा कुत्सित प्रश्न नाही. खरेच आश्चर्य वाटले.)

अवांतरः प्रस्तावना, आगा पीछा नसलेले लेख वाचले की फारसं काही कळत नाही. मराठी साहित्याशी संबंध राहिलेला नसेल तर आणखीच पंचाईत येते. कुहू काय आहे? कुणासाठी आहे? बांदेकर कोण?(तसे ते वाचकांना अडाणी म्हणणारे हे कळले), दर्शन म्हणजे काय? वगैरे सर्व प्रश्न अनुत्तरित राहतात तेव्हा कृपया थोडी पार्श्वभूमी ठेवून लेखन करावे ही विनंती.

कुहू

प्रियाली,
१. कुहूची किंमत १५०० रु. आहे. ते पूर्ण रंगीत ( ऑईलपेंटींगसह ) आर्टपेपरवर छापलेले पुस्तक आहे. त्याचे मुखपृष्ठ ३ डी आहे. मुख्य पुस्तक डीव्हीडीवर आहे. त्याला आरती अंकलीकर यांचे संगीत आहे. पुस्तक आणि डीव्हीडी यांची ही एकत्र किंमत आहे. अधिक माहिती 'कुहू.इन' या वेबसाईटवर मिळेल. एका मराठी पुस्तकासाठी केलेली ही अशी पहिलीच वेबसाईट असावी.
२. लोक पुस्तके भरपूर वाचतात, फक्त ती महानगरांबाहेर राहणारी जास्त वाचतात.
३. प्रवीण बांदेकर हे मराठीतील मान्यवर कवी आणि कादंबरीकार आहेत. ते 'दर्शन' नावाचे दर्जेदार वाड्.मयीन मासिक गेली अनेक वर्षे स्वखर्चाने काढत आले आहेत. सध्या त्यांची 'चाळेगत' ही कोकणाच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी गाजते आहे. तिला अनेक पुरस्कार मिळत आहेत.

धन्यवाद

वरील माहितीसाठी धन्यवाद.

१५०० रु. ही पुस्तकाची किंमत काहीजणांना जास्त वाटणे साहजिक आहे. विशेषतः पुस्तके/ चित्रपट एकदा वाचली/ पाहिले की त्यात पुन्हा पुन्हा वाचण्या/पाहण्यासारखे काही नाही त्यामुळे किंमत वसूल झाली नाही असे वाटू शकते.

माझ्यामते कुहूची किंबहुना कोणत्याही महाग पुस्तकाची काही काळाने पेपरबॅक आवृत्ती काढणे योग्य आहे. अर्थातच, मराठी पुस्तके सीडीवर, डीव्हीडीवर उपलब्ध झाली तर आनंदच आहे.

लोक पुस्तके भरपूर वाचतात, फक्त ती महानगरांबाहेर राहणारी जास्त वाचतात.

ओक्के. हे पटण्यासारखे वाटते.

महिन्याला चार पुस्तके

चार या संख्येला तसा काही अर्थ नाही. पुस्तक किती मोठे आहे (आणि ते वाचकाला किती गुंगवून टाकणारे आहे) यावर ते कसे आणि किती वेळात वाचले जाते हे अवलंबून असते. 'नाथ हा माझा' हे कांचन घाणेकरांचे तसे बर्‍यापैकी मोठे पुस्तक मी वाचायला उचलले आणि संपवूनच खाली ठेवले. एरिक सेगलचे 'मॅन, वुमन ऍन्ड चाईल्ड' हे तसे छोटेखानी पुस्तक असेच एका बैठकीत वाचल्याचे आठवते. खरे तर तशी बरीच आहेत. वेळ किती मिळतो आणि किती काढता येतो हा प्रश्न आहे. वेळ आणि आवड असेल तर बाकी दिवसाला दोन- अडीचशे पानांचे एक पुस्तक वाचून होणे शक्य आहे. मी गेल्या तीन दिवसांत साधारण या आकाराची तीन पुस्तके वाचली.मराठी.

सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

सहमत

वेळ आणि आवड असेल तर बाकी दिवसाला दोन- अडीचशे पानांचे एक पुस्तक वाचून होणे शक्य आहे.

सहमत आहे. दिवशी २५० पानी मराठी पुस्तक संपविणे काही कठीण नाही. त्यात सबस्ट्न्सच किती असतो ;) इंग्रजी पुस्तके वाचायला आणि वाचताना दम लागतो. आणि बरेचदा डिक्शनरीही. त्यामुळे वेळही लागू शकतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

एक प्रश्न

"चिमा" ही आयडी कविता महाजन यांची आहे काय? असल्यास उपक्रम संकेतस्थळावर स्वागत आहे.

यूट्यूब आणि कुहू संकेतस्थळ बघितले. मोठाच प्रकल्प दिसतो. एखाद्या कोर्‍या-करकरीत डीव्हीडी किंवा व्हिडियो-गेमची किंवा एखाद्या मध्यम-रेंज सॉफ्टवेअरची किंमत जितपत असावी, तितपत किंमत असायला हरकत नाही.

- - -
मागे एक मराठी व्याकरणावरचे पुस्तक शंभरेक डॉलरना विकत घेतले. पुस्तक खूप चांगले आहे. तरी ही किंमत फारच होते, असे माझे मत झाले. भारतातील कित्येक (विद्यार्थ्यांना सोडाच) कॉलेज ग्रंथालयांच्या आवाक्याबाहेर हे पुस्तक आहे. अशा पुस्तकांची "भारतीय आवृत्ती" काढायला पाहिजे.

सुदैवाने

धनंजय,
मी एक वाचक आहे. सुदैवाने लेखक नाही. कविता महाजन तर नक्कीच नाही.
--------
कॉलेजेसमधून ग्रंथालयांसाठी युजीसी भरपूर पैसे देते. खेरीज प्राध्यापकांनी पुस्तके विकत घेतली तर त्यांचे अर्धे पैसे युजीसी देते, असे माझ्या एका प्राध्यापक मैत्रिणीने सांगितले. पुष्कळ प्राध्यापक या योजनेचा किंचितही फायदा घेत नाहीत. .. अगदी ग्रंथालयातही जात नाहीत, हे निराळे.

एक चूक- एक बरोबर.

>>>प्राध्यापकांनी पुस्तके विकत घेतली तर त्यांचे अर्धे पैसे युजीसी देते
चूक. अशी कोणतीही योजना माझ्या तरी माहितीत नाही. अशी योजना असेल तर कृपया मला कळवावे ही लम्र सॉरी नम्र विनंती. मागे एकदाच एक हजार रुपये भरायचे आणि दोन हजाराची पुस्तके घ्यायची अशी योजना आली होती.त्यानंतर मात्र अशी काही स्कीम आल्याचे आठवत नाही. युजीसीने पुस्तकांसाठी ना परतीच्या अटीवर पुस्तकांसाठी अनुदान दिले असते तर मी माझ्या घरात एक मोठं असं संदर्भ ग्रंथालय वाचकांसाठी खुले केले असते. असो, अनुदान न देताही मी मात्र महिन्याला काही पुस्तके नक्कीच विकत घेतो. वाचन होईल तेव्हा होईल असे आपले धोरण असते. :)

>>> कॉलेजेसमधून ग्रंथालयांसाठी युजीसी भरपूर पैसे देते.
युजीसी महाविद्यालयातील ग्रंथालयासाठी खूप मोठे अनुदान देते हे मात्र खरे आहे.

>>>>पुष्कळ प्राध्यापक या योजनेचा किंचितही फायदा घेत नाहीत. ..
अपवाद सर्वत्रच असतात.

>>>>अगदी ग्रंथालयातही जात नाहीत, हे निराळे.
अपवाद सर्वत्रच असतात. (महाविद्यालय सोडून असलेले ग्रंथालय ना ?)

-दिलीप बिरुटे

प्रकल्प चांगला

हा प्रकल्प चांगला वाटतोय. युट्यूबवरील व्हीडीओ आवडला. कविता महाजन ह्या लेखिकेबद्दल फेसबुकवरील त्यांच्या स्वत:बद्दल लिहीलेल्या असंख्य अपडेट वाचून वाचून कळले होतेच.

कादंबरी का म्हणायचे?

ह्या मल्टिमीडिया कादंबरीला गंध येतो का कागदाचा? लोळत, कूस बदलत मल्टिमीडिया कादंबरी वाचता येते का? पुस्तकातली अक्षरे वाचकाच्या कल्पनाशक्तीला आव्हान देतात. तो स्वतःचे विश्व तयार करतो आणि त्यात बुडून जातो. ह्या मल्टिमीडिया कादंबरीत तेवढाच स्कोप असतो का?
थोडक्यात कल्पना छान वगैरे सगळे ठीक आहे पण मल्टिमीडिया कादंबरीला कादंबरी का म्हणायचे? की आणखी एक गिमिक?

बाय द वे, कुहू कितीला पडते बरे?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लोळत, कूस बदलत

लोळत, कूस बदलत पुस्तके वाचणे बहुधा सर्वांनाच आवडते पण पुस्तक वजनी असेल तर थोडा प्रश्न येतो. अशावेळी किंडल, नूक, आयपॅड वापरणे मला आवडते. सोयीचे पडते. लोळत कूस बदलत वाचता येते. अर्थातच, अशी पुस्तके वाचायची तर इ-रीडरचा खर्चही जमेस धरायला हवा. ;-)

गाडी चालवताना ऑडियो बुक्स ऐकणे हे खूपच वेळ वाचवणारे असते. लोकांना वाचायला वेळ कसा मिळतो असा प्रश्न मी वर विचारला होता खरा पण दिवसाचा एक पूर्ण तास माझ्याकडे पुस्तक ऐकायला वेळ असतो हे मी विसरूनच गेले होते. :-)

कुहूची किंमत रु.१५०० आहे असे वर वाचले. यू ट्यूबवर विडिओ पाहता हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे का असा प्रश्न पडला.

जो जे वांछील.

पुस्तक उत्तम असेल तर पैसे देखील देऊ, पण उगाच 'पल्याड' महागाची पुस्तके असतात म्हणून आपल्याकडे पण हवीत हा हट्ट 'उगाच' वाटतो. बाकी ज्यांना परवडते ते घेऊ जाणे. पुस्तक काढणारयाच्या उद्देश बद्दल चर्चा करणे वेगळे आणि घेणाऱ्याच्या उद्देशाबद्दल चर्चा करणे वेगळे. कोणी पुस्तके दिवाणखान्यात चांगली दिसतात म्हणून घेतात कोणी वेळ जात नाही म्हणून पुस्तके काढतात(असे वाटते). जो जे वांछील...

 
^ वर