माझ्या संग्रहातील पुस्तके १२- सआदत हसन मंटो
विविध भाषांमधील श्रेष्ठ लेखकांचा परिचय करुन देणारी छोटेखानी पुस्तके साहित्य अकादमी अगदी नाममात्र किंमतीत उपलब्ध करुन देत असते. उर्दू साहित्यातील प्रखर आणि विवादास्पद लिखाण करणार्या सआदत हसन मंटोची ओळख करुन देणारी पुस्तिका नुकतीच वाचनात आली. मंटो या लेखकाचे नाव जितके विचित्र, तितकाच तो माणूसही विचित्र होता. मंटो जेमतेम त्रेचाळीस वर्षे जगला, पण त्याची ही वर्षे एखाद्या निखार्यासारखी होती. कमालीचे संवेदनशील मन, उपजत प्रतिभा आणि लिखाणावर मेहनत करण्याची तयारी असा त्रिवेणी संगम घडून आला की लेखन बावनकशी होणारच. मंटोच्या साहित्यात हेच झालेले दिसते. मंटोचा आयुष्यपट बघताना त्याच्या व इतर काही थोर साहित्यीकांच्या जीवनातील काही विस्मयकारक साम्ये डोळ्यांसमोर येतात. साहीरप्रमाणे मंटोचे त्याच्या वडीलांशी कधी पटले नाही. गालिबसारखा तो ’आधा मुसलमान’ होता आणि मजाजसारखा (’ऐ गमे दिल क्या करुं’ वाल्या) तो दारुच्या जबरदस्त आहारी गेलेला होता. मजाजसारखाच मंटोलाही दारुनेच संपवला. पण मला वाटते संवेदनशील माणसाची हीच शोकांतिका असते. ’गम कुछ इस कदर बढे, की मैं घबराके पी गया’ हे लिहिले आहे साहीरने, पण ते इतरही बर्याच साहित्यिकांना लागू असावे, असे वाटते. याचा अर्थ कुणीही दारुड्या गणागणपाने स्वत:ला संवेदनशील आणि जगाच्या निर्घृणतेचा बळी म्हणवून पीत राहावे असे नाही, पण शैलेंद्रपासून मदनमोहनपर्यंत आणि अशी अनेक उदाहरणे ही शोकांतिका अधोरेखित करुन जातात, हे खरे. असो.
मंटोचे घराणे मूळचे काश्मिरवासी. नंतर ते पंजाबमध्ये येऊन स्थायिक झाले. मंटोची भावंडे धार्मिक वृत्तीची, प्रतिष्ठीत आणि संयमी स्वभावाची होती. मंटो बाकी पहिल्यापासूनच क्रांतिकारक, बंडखोर, नास्तिक आणि बेफाम प्रवृत्तीचा होता. मानवी स्वभावाचा हा एक पीळ न समजण्यासारखा आहे. एकाच कुटुंबातील दोनपाच लोक सरळ, रेल्वेच्या रुळासारखे, कागदी पिशव्यांसारखे, घड्या घातलेले आयुष्य जगत असतात आणि त्यांचाच एखादा रक्ताचा भाऊ संपूर्ण उद्धस्त, विस्कटलेले भणंग आयुष्य जगतो (आणि एक दिवस मरुन जातो!). हे असे का होते याला काही उत्तर नसावे. असलेच तर ते शंभर टक्के पटेल असे नाही. वाचनाची जबरदस्त आवड असणारा मंटो, वाचलेली पुस्तके विकून टाकून त्या पैशांतून उंची सिगारेटी ओढणारा मंटो, तरुण वयात शिक्षणावरुन लक्ष उडाल्याने बेछूटपणे जगत राहाणारा मंटो, स्वातंत्र्यपूर्व काळात कधी सशस्त्र क्रांतीची स्वप्ने बघणारा तर कधी वैफल्यग्रस्त होऊन स्मशानात जाऊन बसणारा मंटो, तरुण वयातला अस्वस्थपणा दूर करण्यासाठी दारु, चरस, कोकेनसारखी व्यसनं करणारा मंटो आणि एकदा लेखन हेच आपलं खरं काम याची जाणीव झाल्यावर झपाटल्यासारखा तुफानी वेगानं नाटकं, निबंध, व्यक्तिचित्रं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथा लिहिणारा मंटो ... यातला खरा मंटो कोणता हेच कळेनासे होते. उत्तम लेखक हा आधी उत्तम वाचक असावा लागतोच. मंटोने विशेषत: परदेशी साहित्यिकांचे उत्तमोत्त्म साहित्य वाचलेले होते. लिहायला सुरवात केल्यानंतर प्रथम पत्रकारिता, नंतर हिंदी सिनेसृष्टीशी संबंधित लिखाण आणि मग स्वतंत्र नाटके, कथा असा मंटोचा लेखनप्रवास घडला. मंटोच्या मुंबईतील सिनेमाच्या विश्वातील सफरीबद्दल या पुस्तकात फारसे नाही. पण एकंदरीत या मायानगरीला मंटो फारसा पसंत पडला नाही, असेच दिसते. १९४८ साली मंटो पाकिस्तानात निघून गेला आणि पाकिस्तानात गेल्याचा त्याला (साहिरप्रमाणेच) पश्चाताप होत राहिला. त्याने अहमद नदीम कासमी यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे: ’ वास्तविक मी आता अशा अवस्थेला पोहोचलो आहे जिथे नकार आणि विश्वास यात फरकच राहिलेला नाही’. हे वाचल्यावर मला चटकन ’गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया’ हेच आठवले. पाकिस्तानात त्याने विपुल लिखाण केले हे खरे, पण वैयक्तिक जीवनात त्याची घसरणच होत राहिली. त्याचे मद्यपान तो मुंबईत असतानाच वाढले होते, पाकिस्तानात गेल्यावर मात्र ’दारुनेच त्याला प्यायला सुरवात केली’.
मंटोच्या वैयक्तिक वैफल्याला त्याने शहरात बघीतलेले दाहक जीवन मोठ्या प्रमाणावर कारणीभूत झालेले दिसते. ग्रामीण आणि प्रादेशिक जीवनाबद्दल मंटोने फारसे लिहिले नाही. मंटोचे लेखन हे तात्कालिन शहरी संस्कृती, फाळणी, हिंदु-मुस्लीम दंगे, त्या काळातील शहरी जीवनातील समस्यांचे आळोखेपिळोखे आणि सामाजिक प्रश्न अशा विषयांवर केंद्रित झालेले आहे. वेश्या आणि वेश्यांचे आयुष्य यांवर मंटोने कित्येक कथा लिहिल्या आहेत. त्यातल्या कैक कथांवर अश्लीलतेचे आणि बीभत्सतेचे आरोप झाले. ’ठंडा गोश्त’, ’काली सलवार’, ’खोल दो’ अशा त्याचा कथा प्रचंड वादग्रस्त ठरल्या. त्यामागची कारणेही सहज समजण्यासारखी आहेत. साठेक वर्षांपूर्वीचा काळ, समाजात वेगाने होणारी स्थित्यंतरे आणि दुटप्पी, कावेबाज समाजाला सहन न होणारे मंटोचे ढोंगे उघडी करणारे लेखन हे समीकरणच स्फोटक असले पाहिजे. ’खोल दो’ या कथेत सकीनावर तिच्याच जातीचे लोक, रजाकार, अत्याचार करतात. बेशुद्ध पडलेल्या सकीनाला उपचाराकरता डॊक्टरांकडे नेतात तेंव्हा डॊक्टर म्हणतात की तिला खुली मोकळी, हवा मिळण्यासाठी ’खिडकी खोल दो’. ’खोल दो’ हे शब्द ऐकून अर्धवट शुद्धीत असलेली सकीना आपल्या हातांनी आपल्या पायजम्याची नाडी सोडते आणि विजार खाली सरकवते. हे असले सगळे लिहिणाया मंटोला त्या काळातील लोकांनी सैतान समजून जिवंत जाळले नाही हेच नवल. मंटोच्या कथांमध्ये थैमान घालणारी कामवासना, हिंसाचार, शारिरीक व मानसिक कुरुपता, ओंगळपणा हे सगळे एकूण समाजाला पचायला जडच गेले असणार.
एका बाजूला असले भेदक लिखाण करत असताना मंटोने दुसरीकडे हलकेफुलके विनोदी लिखाणही केले आहे. मंटोची विनोदी नाटके, लेख, निबंध यांची संख्या खूप मोठी आहे. पाकिस्तानात असताना मंटोचे बारा कथासंग्रह, दोन निबंधसंग्रह, दोन व्यक्तिरेखांचे संग्रह, एक लघुकादंबरी आणि त्याच्या कथांवर झालेल्या खटल्यांच्या संदर्भातले एक पुस्तक असे बरेच साहित्य प्रसिद्ध झाले होते. पाकिस्तानात असताना जवळजवळ दिवसाला एक कथा असा त्याचा लिखाणाचा वेग होता. वर्तमानपत्राच्या कार्यालयातल्या खुर्चीत उकीडवा बसून मंटो झरझर लिहीत असे. कथा लिहून झाली की तिच्या मानधनातून दारु खरेदी करत असे. असले काही वाचले की एकीकडे त्याच्या प्रतिभेबद्दल आदर आणि दुसरीकडे त्याच्या व्यसनांबद्दल घृणा असले काहीसे मनात येते. मंटोने त्याच्या मुंबईतील मुक्कामात बकालातले बकाल आयुष्य अनुभवलेले होते. भायखळा आणि नागपाडा भागातल्या अंधार्या चाळी, म्हशींचे गोठे, घोड्यांचे तबेले, इराण्यांची हॉटेले आणि वेश्यांची मोठी वस्ती असलेला फोरास रोड हे सगळे त्याने बघीतले, अनुभवले. यातूनच त्याने उर्दू भाषेत ’टंटा, मस्तक, मस्का-पॊलिश, मालपानी, दादा, घोटाला, फोकट, कंडम’ अशा अनेक शब्दांची भर घातली. त्यामुळे मंटोची स्वतःची उर्दू लेखनाची एक शैली विकसित झाली असावी असे वाटते.
सआदत हसन मंटोवरच्या वारिस अल्वी यांनी लिहिलेल्या आणि विश्वास वसेकरांनी अनुवादित केलेल्या या लहानशा पुस्तकाने मंटोचे लेखन वाचावेसे मला वाटू लागले आहे. अशा प्रकारच्या पुस्तकांचे हेच साध्य असते. मंटोचे जितके पचेल तितके लेखन मुळातून वाचावे, इतर अनुवादित स्वरुपात वाचावे असे हे पुस्तक वाचून इतरही वाचकांना वाचले तर साहित्य अकादमीचा हा उपक्रम यशस्वी झाला असे म्हणता येईल. अशा लहानशा पुस्तकाची किंमत अकादमीने अगदी नाममात्र – पंचवीस रुपये- ठेवली आहे हे या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल.
Comments
ओळख आवडली
अवांतर - "कमालीचे संवेदनशील मन" हा शापच असतो. पण त्याचे ठुसठुसणे नंब करण्यासाठी दारू हा काही उपाय नाही. मानसोपचारतद्न्याकडून वेळीच उपचार करवून औषधोपचारांची सहायता वेळीच घेणे" हीच योग्य पावले म्हणता येतील. हां अशा लोकांच्या हातून कलानीर्मीती जरूर होते हे मान्य कारण बरेचदा भावना अतिटोकदार असतात.
असो! पुस्तकाची ओळख आवडली. "खोल दो" ही कथा अंगावर आली पण अतिरंजित वाटली नाही.
मनोरुग्ण
दारुच्या आहारी गेलेले सगळे प्रतिभावंत मनोरुग्णच असतात असे मला वाटत नाही. कित्येकदा दारु हेच त्यांच्या सर्जनशीलतेचे मूळ असते. यात दारुचे उदात्तीकरण करण्याचा बिलकूल हेतू नाही. इतक्या मोठ्या प्रतिभेचे धनी असलेल्या लोकांना दारु ही एक दिवस आपल्याला संपवणार आहे, हे समजत नसेल हे पटत नाही. पण ही किंमत देण्याची त्यांची तयारी असतेच; किंबहुना अशा लोकांना मृत्यूविषयी एक गूढ आकर्षणही वाटत असते. दारु जर हे साध्य करुन देणार असेल तर चांदीच्या वाटीत बासुंदी घेऊन खाल्ल्यासारखे या लोकांना वाटत असेल काय? या संदर्भात गौरी देशपांडेंचे उदाहरण आठवते.
मंटोच्या आयुष्यातला दारु ही सगळ्यात बिनमहत्त्वाची बाब आहे, असे मला वाटते. या पुस्तकात त्याच्या या व्यसनाचे तपशीलवार वर्णन आहे, म्हणून मी त्याचा लेखात उल्लेख केला, इतकेच. मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेतली तरी असे लोक काही फारसे वेगळे आयुष्य जगले असते असे मला वाटत नाही. 'तंग आ चुके है कश्म-ए-कशे जिंदगी से हम' लिहिणारा साहीर दारु पीत नसता आणि प्रोझॅक घेत असता तर त्याने 'झोपडी में चारपाई, मानुष बिना सूनी पडी' किंवा 'आगेपीछे हुवा तो झटपट होने लगी' असे लिहिले असते काय?
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक
सहमत
पुस्तकाची ओळख आवडली. मंटो यांच्या काही अनुवादित कथा वाचनात आल्या होत्या. त्याही आवडल्या होत्या.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मस्त
वा मंटो कसा का असेना तुमचा हा लेख त्याची मस्त ओळख करून देतो. लेख वाचून छान वाटले, मंटो देखील वाचूच कधीतरी. तूर्तास धन्यवाद.
ओळख आवडली
या लेखकाचे नाव ऐकले होते. वाचन (हिंदीमध्ये भाषांतरित का होईना) कधी होईल, कोणास ठाऊक.
चांगला लेख
मंटोबद्दल आधी ऐकले आहे. पण वाचनाचा योग आला नाही.
मंटोच्या वैयक्तिक वैफल्याला त्याने शहरात बघीतलेले दाहक जीवन मोठ्या प्रमाणावर कारणीभूत झालेले दिसते.
जीवन अनेकदा दाहकच असते. वैफल्य समजूनही अशा ठिकाणी अडकून बसण्यात, बाहेर पडता न आल्याने किंवा स्वतःवर बंधने घालून घेतल्याने असते.
परिचय
आवडला. काही वर्षांपूर्वी लोकसत्तेच्या 'लोकरंग' पुरवणीत मंटोच्या काही कथांचा अनुवाद वाचलेला आठवतो. अल्पाक्षरी पण अतिशय प्रभावी कथा. बर्याचशा फाळणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या. त्यातली एक (बहुतेक मिस्टेक) नावाची कथा अजून आठवते. दंगल चालू असताना एक माणूस दुसर्याचा तलवार पोटात खुपसून खून करतो. तलवार कोथळा बाहेर काढतेच, पण विजार फाटून त्या मृत व्यक्तीचा धर्मही उघड होतो. 'च् च्! मिस्टेक झाली' असं स्वतःशीच खुनी पुटपुटतो आणि कथा तिथेच संपते.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
या लेखावर आत्ता पर्यंत न आलेल्या काही प्रतिक्रिया.
मंटो चे वैफल्य काहीच नाही. माझे पहा. उपक्रम वरील प्रत्येक क्षुद्र जीवावर मी कसा डाफरत असतो ते तुम्हाला दिसले नाही? खरा तर मीच त्याच्या पेक्षा जास्त वैफल्यग्रस्त आहे. माझ्याबद्दल कोणी कसा लेख लिहित नाही मला कळत नाही.
डार्क मटार
मंटो हा अस्तित्वात होता याला काहीही पुरावा नाही. त्यामुळे त्याच्यावर असे लेख लिहिणे म्हणजे अंधश्रद्धेची पराकाष्ठा आहे.
रिकाम टेकडी
;-)
मराठीमाणूस
छान ओळख
मंटोविषयी लिहायला लागलं तर भारून जाऊन लिहिण्याखेरीज पर्याय नाही. त्यामुळे वेळ काढून लिहितो.
फाळणीने जणू त्याच्या जिवाचीच फाळणी झाली होती. ना इथला ना तिथला, पण दोन्हीकडून घायाळ असा सीमा रेषेवर पडलेला टोबा टेकसिंग आठवतो.
असो. अजून नंतर.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
लिहा
लिहा, लिहा, नंतर का होईना.
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक
अधुरी पण छान ओळख
मंटोची अपुरी, अधुरी असली तरीही छानपैकी ओळख. मंटो लोकांना वाचायला उद्युक्त करू शकणारी. थोडक्यात पुस्तकाने काम फत्ते केले आहे असे वाटते. पण मंटोची खरी ओळख त्याच्या कथांतूनच, त्याच्या लिखाणातूनच होते असे मला वाटते. कारण त्याचे लिखाण त्याच्या अनुभवांपेक्षा, जगण्यापेक्षा वेगळे नाही. अत्यंत पारदर्शक.
मंटोच्या लिखाणात कुठलाही फुलोरा नाही. सुंदरसुंदर शब्द नाहीत. मंटो त्याची अस्वस्थता थेट साध्या शब्दांत अतिशय लख्खपणे वाचकांपुढे मांडतो.१ मंटोच्या कहाण्या ह्या इकडूनतिकडून, कुठूनतरी ऐकून मग सांगितलेल्या कहाण्या वाटत नाहीत. त्या निष्कर्ष मांडत नाहीत. उपदेशही करत नाहीत. त्याच्या कथांत फालूत वर्णने क्वचितच आढळतील. तर मंटो हा माझा अत्यंत आवडता कथाकार, लेखक. म्हणूनच बहुधा मराठी कथाकादंबऱ्या बोर मार असाव्यात.
बाय द वे, मंटो पुण्यातही काही दिवस होता. त्याची 'मम्मी' ही कथा वाचल्यावर तेव्हाचे फिल्मी पुणे कसे असेल ह्याचीही थोडी कल्पना येते.
१. "तो फुलपाखरांमागे जाळे घेऊन धावणाऱ्या शिकाऱ्यासारखा शब्दांचा पिच्छा पुरवतो. पण त्याच्या हाती ती येत नाहीत. ह्याच कारणामुळे त्याच्या लिखाणात सुंदर शब्द नाहीत", असे त्याने सआदत हसनमध्ये लिहिले आहेच. पुढे जाऊन त्याने स्वतःची तुलना लाठी चालवणाऱ्याशी (लट्ठमार) केली आहे. असा लट्ठमार ज्याने स्वतःच्या मानेवर जेवढ्या लाठ्या पडल्या त्या सुखाने झेलल्या. "मुझे ये कितना बड़ा इत्मिनान है के में जो कुछ महसूस करता हूँ, वही ज़बान से बयान करता हूँ," असे त्याने 'एक ख़त' ह्या कथेत एका जागी नमूद केले आहेच.
उत्तम
बर्याच दिवसांनी परिचय वाचला. (म्हंजे तुम्ही लिहित होतातच मला वाचायला जमले नव्हते.)
परिचय उत्तम. आभार.
मंटोचे लेखन अजिबात वाचलेले नाही. आता अनुवाद शोधले पाहिजेत. मराठीत त्यांच्या लेखनाचे कोणी अनुवाद केले आहेत का?
साहित्य अकादमीची सगळी पुस्तके अल्प/अत्यल्प किंमतीचीच असतात असा अनुभव आहे .
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
मस्त ओळख
मंटोचे लेखन अजिबात वाचलेले नाही. कधीतरी उत्तपत्रिका तपासायला एकत्र येणार्या उर्दु विषयाच्या प्राध्यापकांच्या तोंडून मंटोबद्दल केवळ चर्चा ऐकली आहे. मोठा लेखक आहे. जरा विक्षिप्त आहे. संवेदनशील आहे. फाळणीबद्दलचे लेखन सुंदर आहे. मर्ढेकरांप्रमाणे काही लेखनावर खटलाही चालला वगैरे. परंतु आपण मात्र चांगली ओ़ळख करुन दिली आहे. उत्तम लेखकाच्या आयुष्याशी 'व्यसन' का चिकटते काही कळत नाही. नियती वगैरे म्हणतात ते असेच असावे असे वाटते. बाकी, मंटोची उत्तम ओळख करुन दिल्याबद्दल धन्यु.......!
चलो,कुछ दूर महखाने से गुज़र कर देखते है
सआदत मंटो का जीवन
-दिलीप बिरुटे
शुद्धलेखनाचा सराव : उकीडवा= उकिडवा, साहित्यीकांच्या= साहित्यिकांच्या, प्रतिष्ठीत=प्रतिष्ठित.
मंटोच्या मला आवडलेल्या कथा
वर चित्तरंजन यांनी जे मंटोविषयी लिहिलं आहे ते खरं आहे. पण मंटोची थोरवी त्याच्या निव्वळ शब्दांच्या साधेपणात नव्हती. त्याने वापरलेल्या प्रतिमा, रूपकं ही अस्सल होती. त्या प्रतिमाही तसं म्हटलं तर साध्याच होत्या. पण ज्या सहजतेने त्या एकमेकांभोवती विणल्या होत्या त्यात त्याचा समर्थ, कुशल हात जाणवतो. टोबा टेकसिंगचा वर उल्लेख केला. फाळणीच्या काळात जेव्हा लोकांची देवाणघेवाण चालू होती तेव्हा वेड्यांच्या इस्पितळांमधल्या वेड्यांचं काय करायचं हा प्रश्न होता. त्यातलाच एक थोडासा अर्धवट टोबा टेकसिंग. खरं तर ते त्याचं नाव नव्हतं. त्याचं नाव केव्हाच हरवलेलं होतं. शिल्लक राहिलेलं होतं ते त्याचं गाव. त्याला सगळेजण त्याच्या गावाच्या नावावरूनच हाक मारायचे. येणाऱ्या जाणाऱ्याला तो आपलं गाव इकडे गेलं की तिकडे असा प्रश्न विचारायचा. धड इथला न तिथला, केवळ आपल्या गावाला आठवणाऱ्या शिखाचं ते वर्णन आहे. - एकाच वेळी आयडेंटिटी हरवण्याचं, एखादं गाव इथे जावं की तिथे जावं या प्रश्नातल्या निरर्थकपणाचं, पराधीनतेचं भकास वर्णन केवळ त्याला गावाचं नाव देऊन साधलेलं आहे. शेवटच्या भागात कथेत पेरलेले सगळे धागे तो एकत्र आणतो. एका बाजूला भारतीय वेडे आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी वेडे, वायरींच्या पलिकडे उभे असलेले, कुठे तरी पोचण्याची वाट बघणारे... आणि त्यांच्या मध्ये सीमारेषेवर कोणाचीच जमीन नाही अशा जागेवर मरून पडलेला टोबा टेकसिंग.
खोल दो विषयी तर लिहिलेलंच आहे. त्या तरुणीच्या हालचालीत कोरली गेलेली फाळणीची जखम. ती एरवी दिसतही नाही. ती दुसऱ्यांनीही केलेली नाही. आपल्यांनीच केलेली. इतकी हळुवारपणे उघडून दाखवली आहे... तिथल्या आसपासच्यांना तिने विजार खाली केल्यावर जी लाज, घृणा वाटली असेल तितकीच आपल्याला मंटो वाटायला लावतो.
तिसरी मनावर ठसलेली गोष्ट म्हणजे ठंडा गोश्त. नुकत्याच मारलेल्या बकऱ्याच्या मांसाच्या उष्णतेमुळे थंडीत त्यातून एक वाफ बाहेर पडताना दिसते. हे मांसल, उष्ण, लसलसतं रूपक वापरून एका पौगंडावस्थेतल्या मुलाचं चित्रण केलं आहे. यापलिकडे खरं तर कथेविषयी सांगणं कठीण आहे. कारण फारसं काही घडत नाही. पंचलाईन सांगत नाही.
मंटोची टोबा टेक सिंग आणि इतर काही कथा इथे वाचायला मिळतील.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी