कादंबरी की आत्मचरित्र?

'चाळेगत' ही प्रवीण बांदेकर यांची कादंबरी वाचली. तिच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे की,"ह्या सगळ्याला कुणी कादंबरी नाह्य म्हटलं तरी चालण्यासारखं आहे; पण ह्याला माझं आत्मचरित्र म्हणण्याचा अडाणीपणा मात्र कुणी करू नये!"
'नातिचरामि'च्या प्रस्तावनेत मेघना पेठे यांनी म्हटले आहे की,"प्रथम-पुरुषी निवेदन करणारी व्यक्ती हे लेखकानं निर्माण केलेलं एक पात्र आहे, प्रत्यक्ष तो लेखक नव्हे, हेही आपण कित्येक वेळा विसरून जातो. अमुक पात्र म्हणजे 'हा' किंवा 'ही' असणार, ही गोष्ट 'याची' किंवा 'हिची' दिसतेय बहुतेक, असं प्रत्यक्ष आयुष्यातल्या तपशीलांवर आधारित अंदाज एखाद्या कलाकृतीवर लादतो, ते वेगळंच! हे सर्व निर्मितीप्रक्रियेबद्दलच्या अद्न्यानाचं द्योतक आहे."
कविता महाजन यांनी 'ग्राफिटी वॉल' या पुस्तकात एका लेखात 'ब्र' या कादंबरीला वाचकांनी आत्मचरित्र ठरविल्यावर आलेले अनुभव लिहिले आहेत. त्यांनी वाचकांना वरील दोघांप्रमाणे थेट अडाणी म्हटले नसले तरी उदाहरणे तशीच आहेत.
तर असे फक्त प्रथम-पुरुषी निवेदनामु़ळे होते की फक्त वाचकाच्या अडाणीपणामुळे होते की अजून काही कारणे असतात?

लेखनविषय: दुवे:

Comments

आमचे मत

उपक्रमावर स्वागत.

मेघना पेठ्यांची मीमांसा या संदर्भात ग्राह्य धरावी असं वाटतं.

+१

मेघना पेठ्यांची मीमांसा या संदर्भात ग्राह्य धरावी असं वाटतं.

-दिलीप बिरुटे

"कोसला" मधील निवेदक

"कोसला"मधील निवेदक आणि कादंबरीचा लेखक नेमाडे यांच्यामध्ये फरक आहे, हे मनात ठेवणे उचित आहे. (म्हणजे "कोसला"चा निवेदक ज्या मतांचे आणि जीवनदृष्टीचे समर्थन करतो, त्यांच्या विपरित मते नेमाड्यांची असू शकतात.) असे विस्तृत विश्लेषण नरहर कुरुंदक्र यांनी "धार आणि काठ" मध्ये केलेले आहे.

मी कोसला वाचलेली नाही, पण नेमाड्यांची आत्मनिवेदनशैली वापरून लिहिलेली "हिंदू" वाचलेली आहे. वरील विश्लेषणाशी सहमत आहे.

त्याच प्रमाणे श्री. ना. पेंडसे यांच्या "लव्हाळी" कादंबरीमधील आत्मनिवेदकाची मते ही लेखकाची मते नाहीत, हे आपोआप स्पष्ट होते. कादंबरीच्या वेगवेगळ्या कालखंडांत निवेदक त्याच्या रोजनिशीमध्ये परस्परविरोधी मते नोंदवतो - एक मित्र आधी आवडतो, मग आवडत नाही, मग पुन्हा आवडतो...
म्हणजे निवेदकाचे त्या मित्राच्या स्वभावाबद्दल विश्लेषण त्या-त्या परिस्थितीत प्रामाणिक आहे. परंतु कादंबरी एकसंध म्हणून बघू शकणार्‍या लेखकाचे त्या मित्राच्या पात्राबद्दल असे परस्परविरोधी विश्लेषण असू शकत नाही.

(तरी लेखकाच्या खर्‍याखुर्‍या अनुभवांचे धागे कल्पित लेखनात मिसळतात, यात काही शंका नाही. मात्र धागे मिसळतात, म्हणून प्रत्येक धागा लेखकाच्या खर्‍याखुर्‍या अनुभवातला आहे असे मानणे योग्य नव्हे.)

घाशीराम

हा प्रश्न आत्मचरित्रात्मक लेखनाबद्दलच नाही, तर एकंदरीतच ललित लेखनासाठी लागू होतो. मला जर एखाद्या बसमध्ये बसलेलो असताना शेजारच्यांचा चमत्कारिक अनुभव आला, आणि मी तो खुलवून, इतर काही वेळा बसमध्ये आलेले अनुभव मिसळून तो लिहिला तर ते सत्यकथन की काल्पनिक लेखन? ही रेषा आखणं खूप कठीण असतं. पण अशा रेषा आखून 'हे सत्य - हे काल्पनिक' असे गट करण्याकडे कल दिसतो. या गटांचा कितपत उपयोग होतो कल्पना नाही.

टोकाचं उदाहरण घ्यायचं झालं तर घाशीराम कोतवाल मध्ये तेंडुलकरांनी पेशवेकालीन पुण्याची पार्श्वभूमी आणि नाना फडणवीस यांची व्यक्तिरेखा वापरून चित्रण केलेलं आहे - संपूर्णपणे नव्या कथेचं. आता या कलाकृतीने इतिहासाशी नातं सांगावं, इमान राखावं अशी अनाठायी अपेक्षा लोकांनी बाळगली. मग कथा-सादरीकरण उत्कृष्ट दर्जाचं आहे की नाही यापेक्षा नाना खरोखरच स्त्रीलंपट होता की नाही यावरच वादंग झाला. खरा नाना वेगळा व नाटकातला नाना वेगळा हे समाजाला तितकंसं पटत नाही. प्रथमपुरुषी निवेदकाच्या कादंबरीतदेखील हाच प्रश्न निर्माण होतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सहमत.

लेखकाला जाणवणार्‍या वास्तवाची कलात्मक पुनर्बांधणी या अंगाने लेखनाकडे पाहू शकतो. नेमाडे सांगतात की साहित्य ही जीवनावर पोसली जाणारी परजीवी वस्तू आहे . ही भिजल्या लाकडी बुंध्यावर उगवलेली आळंबी ची उपमा समर्पक आणि अर्थपूर्ण वाटते.

अनरिलायेबल नॅरेटर

या प्रकाराचा घेतलेला सांगोपांग परामर्ष : http://en.wikipedia.org/wiki/Unreliable_narrator

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

फरक

'लेखक आणि निवेदक यांच्यात भेद आहे की नाही' या मुद्याचा 'निवेदक आणि कथनाच्या आतील वास्तव यांच्यात भेद आहे की नाही' या मुद्याशी संबंध नाही.

कुरकूर

लेखकाची नेमकी तक्रार काय आहे? पुस्तकाची सुरुवात होण्याआधीच्या पानांपैकी कोठेतरी (मेटाडेटामध्ये) स्पष्टपणे, "हे पूर्णतः सत्यकथन नाही" असा खुलासा देणे ही लेखकाचीच जवाबदारी नव्हे काय?
दुसरा मुद्दा असा की ज्या पात्राविषयी वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण करण्याचा लेखकाचा प्रयत्न असतो त्या पात्राविषयी लेखकाला स्वतःला सहानुभूती असल्याचा आरोप लेखकाने टाळू नये.

ओळखा पाहू

गावाची शीव ओलांडून कॉलेजचा उंबरा बघितलेली मी पहिलीच. त्यानंतर असल्या भंपक उद्योगात मी पडले त्याला इतिहास असला तरी चूक माझीच होती. मग व्हायचं ते सगळं झालं नको होतं तेही झालं. म्हणजे हा परिवर्तन-बिरीवर्तनाचा किडा ज्याच्या ज्याच्या डोक्यात वळवळतो तो आंतरजातीय वगैरे लग्न करुन आपण जग बदलणारी क्रांती वगैरे करावी अशा विचारात असतोच. तसा भंपक विचार करुन मी एका कळपातल्या हिरोच्या प्रेमात पडले. चक्क प्रेमात. म्हणजे अगदी हिंदी सिनेमात दाखवतात तसं त्यानंतर जे जे झालं त्याची एक फिल्मी स्टाईलचीच कथा होईल. कारण् आमचा हिरो बुळा निघाला. आता तुम्ही म्हणाल, ही बुळा वगैरे बिनधास्त बोलते म्हणजे भलतीच और बाई आहे. हेही स्वाभाविक आहे. पण् आमच्या गावात यापेक्षाही बायका बरंच काय काय बोलतात. आमची भाषाच तशीच. त्याला मी काय करणार ?

वरील उतारा लेखक-लेखिकेच्या स्वतःच्या जीवनाविषयी आहे की कथा,कादंबरीतल्या एखाद्या पात्राविषयी आहे. की आत्मचरित्रातल्या अनुभवा विषयी आहे. ओळखा पाहू ?

कथाच!

दिलीप बिरुटे :
तुम्ही दिलेला उतारा कथेतला असणार. मी आधी वाचलेला नाही.
स्टाईल नेमाड्यांची आहे. मजकूर वाचताना त्यात कादंबरीचा जीव नाही, हे समजतं.
( जर ही कादंबरी असलीच तर मालिकांप्रमाणे कथेत पाणी घातलेली कादंबरी असेल.)
आत्मचरित्र / अनुभवकथन नक्कीच नाही. कारण ज्या बायका असे आयुष्य जगतात त्या आत्मचरित्र लिहिण्याच्या फंदात पडणार नाहीत.
आणि लिहिले तरी ते असे स्टाइलबाज नसेल. हे कोणीतरी लेडि नेमाडे आहे. :-).

कथाच

चिमे,उतारा 'राजन गवस' या लेखकाच्या 'रिवणावायली मुंगी' या कथेतील आहे.
प्रथम पुरुषी निवेदनातून नायिकेची एकंदर वृत्ती सदर कथेतून वाचायला मिळते.

-दिलीप बिरुटे

चळवळछाप आंतरजातीय लग्ने

स्टाईल नेमाड्यांची आहे.
नेमाड्यांनीही हिंदूत अशा चळवळछाप आंतरजातीय लग्नांवर टिपण्या केल्या आहेत हे खरे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

शैली

प्रथम पुरुषी निवेदन असलेले लेखन मला वाचायला आवडते. असे निवेदन वाचकाला गुंतवून ठेवते. निवेदनात कथन असते. कोणीतरी काही सांगत आहे आणि ते ऐकले पाहिजे अशा स्वरुपाच्या लेखनात सहजता असते आणि वाचकाला पुढे कायची उत्सुकता लागते असे मला वाटते.

''माझं नाव तुळसाबाई साताप्पा मिसाळ. शिक्षण एस.वाय.बी.ए.नापास. तुम्ही म्हणाल, हे सांगण्याची गरज काय ? तर हे सांगितल्याशिवाय तुम्हाला पुढे काही कळणार नाही, म्हणून मला हे सांगणे गरजेचे वाटतं. दुसरं असं की, माझी जात तुम्हाला पटकन कळावी. त्यासाठी तुम्हाला फार वेळ डोकेफूट करुन घ्यावी लागू नये. पण एक घोटाळा आहेच. माझ्या मिसाळ आडनावावरुन तुम्हाला सर्वच कळणार नाही. तुम्ही एवढं ग्रहित धरलं असणार की ही ब्राह्मण नाही. मग तुम्ही म्हणाल, की मिसाळ हे आडनाव मंडल आयोगातल्या एखाद्या जातीतलं असेल;पण तो तुमचा समजही साफ चुकीचा आहे. पिसाळ आणि मिसाळ हे साधर्म्य साधून तुम्ही म्हणाल ही पंचकुळी, शहाण्णव कुळी मराठा असेल,तर बिलकूल नाही. उरता उरला पर्याय म्हणजे मी कुणबी असेन; पण कुणबी तर नाहीच नाही. (कथा : तिच्या वळणाची गोष्ट. लेखक. राजन गवस)

आता ही तुळसा कोणत्या जातीची असेल ही उत्सूकता वाचकाला लागते. निवेदनातून कथा अगदी सहज पुढे सरकत जाते. लेखनातील 'प्रथम पुरुषी निवेदन' ही एक उत्तम शैली आहे असे मला वाटते. असो. झाल्या अवांतराला आवरतो.

-दिलीप बिरुटे

स्पष्टीकरण

साधारणपणे कथेशी लोक रिलेट होण्या इतपत तपशील चांगला असेल तर ती कथा स्वानुभाव असण्याची शक्यता दाट असते, दुसऱ्याचा अनुभव किंवा कल्पना-शक्ती वापरून एवढे वास्तविक तपशील देता येतील ह्यावर विश्वास ठेवणे बहुतांश लोकांना अवघड वाटते.

तरी देखील असे स्पष्टीकरण देणे हे एकार्थी तो आरोप मान्य करण्यासारखे आहे असे वाटते.

माझे मत

मी काही 'लेखक' नाही आणि मला कोणी तसे समजतही नाही. तरी मी जे काही चार शब्द लिहायचा प्रयत्न करतो त्यात नेहमी 'मी' डोकावतच असतो याचे कारण म्हंटले तर मला प्रथमपुरुषी एकवचनातून लिहायला आवडते एवढेच. कधी कधी ते शंभर टक्के खरेच असते, कारण जसे पाहिले तसे लिहिण्यासाठी आपले डोके चालवायची गरज पडत नाही. कधी मी त्याला भरपूर मीठमसाला लावलेला असतो, तर कधी ते माझे स्वप्नरंजन असते. माझे लिखाण कोण वाचत असतील कोण जाणे. पण त्यांना माझी काहीच व्यक्तीगत माहिती असण्याची शक्यता नसल्याने ते काल्पनिक आहे की निवेदन आहे यात संभ्रम निर्माण झाला तरी त्याने कोणाला काही फरक पडणार नाही.

"हे माझे आत्मकथन आहे" असे लेखकाने मुद्दाम जाहीर केले नसेल ते काल्पनिक किंवा त्याचे स्वप्नरंजन धरावे असे मी समजतो. शिवाय प्रत्येक विषयाला दोन किंवा जास्त पैलू असू शकतात. लेखकाने आपला अनुभव प्रामाणिकपणे मांडला तरी त्या कथेला तेवढी एकच बाजू आहे असे समजण्याचे कारण नसते.

"तर असे फक्त प्रथम-पुरुषी निवेदनामु़ळे होते की फक्त वाचकाच्या अडाणीपणामुळे होते की अजून काही कारणे असतात?"
या प्रश्नाचे उत्तर असे देता येईल की जर वाचकाला ते कथानक वास्तविक वाटले आणि त्याला लेखकाच्या जीवनाबद्दल (विपरीत अशी) माहिती नसेल तर त्याला तो आत्मकथन समजू शकतो. याला हवे तर अज्ञान म्हणावे किंवा लेखकाच्या कथनशैलीचा प्रभाव म्हणता येईल.

अडाणीपणा

वाचकांना "अडाणी" म्हणणार्‍या लेखकांबद्दल मला नेहमीच गंमत वाटत आली आहे. जर लेखकाचे लेखन वाचकांपर्यंत एका विशिष्ट प्रकारे पोहोचत असेल तर वाचक अडाणी कसा ठरतो ते कळत नाही आणि लेखकाच्या लेखनाचा उद्देशही कळत नाही. जर लेखक आपला उद्देश वाचकांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरत असेल तर त्याचा दोष त्याने घ्यावा. वाचकांना देऊ नये.

ह्या सगळ्याला कुणी कादंबरी नाह्य म्हटलं तरी चालण्यासारखं आहे; पण ह्याला माझं आत्मचरित्र म्हणण्याचा अडाणीपणा मात्र कुणी करू नये!

जरा "कादंबरी नाहीच ही" असे म्हणून पाहावे म्हणजे वाचकांचा अडाणीपणा आणखी दर्शवला जाईल.

प्रथमपुरुषी लेखनात वाचक जर गुंतत असेल तर ती निवेदन करणार्‍याचे आणि पर्यायाने लेखकाचे खरे अनुभव आहेत असे मानण्याचा संभव आहे ही साधी गोष्ट आहे. लेखकाने हे विचारात घेऊनच लेखन केले असेल ना? की असे काही होऊ शकते याची कल्पनाच नसेल? कल्पना नसेल हे खोटे वाटते. त्यापेक्षा वाचकांना अडाणी ठरवण्यात काहीतरी आनंद लाभत असेल ही कल्पना खरी वाटते.

अर्थातच, वाचकांनीही लेखक आपल्यासमोर काही पुढे ठेवतो म्हणजे स्वतःचा आयुष्यपट खुला करतो अशी सरळसोट भावना बाळगू नये. लेखक लिहिताना त्याला आलेले अनुभव लेखनात मिसळत असतोच. या मिसळीचे प्रमाण किती हे लेखकाने स्पष्ट केल्याशिवाय वाचकांना कळणे अवघड आहे आणि लेखकाने स्पष्ट करावे अशी आशा बाळगणेही अयोग्य आहे.

जोड्यासह शालजोडी

येथे त्या लेखकाचे लाडीक वाक्य तुम्ही घेता त्यापेक्षा वेगळे मी समजलो.

लेखकाची अशीच इच्छा असते की वाचकाने गुंतून जावे. कोणी खूप गुंतून गेले, आणि ते आत्मचरित्र आहे इतके खरे वाटू लागले, तर ते लेखकाला हवेच आहे.

एखादा जण प्रियकराला म्हणेल "काय रे वेड्या, (अडाणीपणे) माझ्यासारख्या इम्पर्फेक्ट व्यक्तीच्या प्रेमात पडलास!"
तिथे "वेड्या, अडाणी" ही खरी शिवी नसते. पण "मी अपरिपूर्ण आहे, तुला वाटतो तसा परिपूर्ण नाही, या गैरसमजामुळे भविष्यात माझ्याविरुद्ध 'फसवणूक केली' असा निराश आरोप करू नकोस" हेसुद्धा खरेच असते.

त्याच प्रकारे "काही प्रिय वाचकांना माझे लेखन इतके गुंतवेल की त्यांना ते आत्मचरित्र वाटेल. पण ते तसे नाही. अरे माझ्या आवडत्या-वाचका, कसा रे तू माझ्यासारख्या इम्पर्फेक्ट लेखकाच्या गुंत्यात अडाणीपणे गुंतलास..."

- - -

अन्य लेखक जेव्हा लोकांना अडाणी म्हणतात, तेव्हा बहुधा "मी एक लेखक आणि तू एक वाचक सोडून बाकी सर्व लोक अडाणी आहेत" असा मथितार्थ असतो. हा प्रकार सुद्धा रोजच्या आपल्या संवादांत पुष्कळदा दिसतो.

"आपण मराठी लोक एकमेकांना फार त्रास देतो" मध्ये "मी-बोलणारा मात्र त्रास देत नाही, आणि तू-माझे-आनंदाने-ऐकणारासुद्धा त्रास देत नाही" असे ध्वनित असते.

लाडीक?

मला वाटते वरील दोन्ही लेखकांच्या भाष्यात कुठेच लाडिकपणा किंवा वाचकांशी साधलेली जवळीक दिसत नाही. उलट -

ह्या सगळ्याला कुणी कादंबरी नाह्य म्हटलं तरी चालण्यासारखं आहे; पण ह्याला माझं आत्मचरित्र म्हणण्याचा अडाणीपणा मात्र कुणी करू नये!

या वाक्यातून लेखकाचा नकारात्मक दृष्टीकोण प्रस्तावनेतच दिसला. प्रेमात पडल्यावर, नाते निर्माण झाल्यावर, विश्वासाने प्रियकराला "वेड्या" म्हणणे आणि कादंबरी वाचण्यापूर्वीच प्रस्तावनेत वाचकांना अडाणी म्हणणे यात मलातरी फरक दिसतो. :-)

----

मला वाटते, वाचकांना जसा अर्थ लावायचा असतो तसे लावण्यास त्यांना मोकळीक हवी. आम्ही हे असे लिहितो आणि त्याचा अर्थ वाचकांनी असाच घ्यावा वगैरे सक्ती हास्यास्पद आहे. प्रत्येक वाचकाने स्वतःच्या समजूतीप्रमाणे, आकलनाप्रमाणे अर्थ काढणे स्वाभाविक आहे.

सापेक्ष

एखादी कादंबरी आत्मचरित्र आहे किंवा नाही हे त्या-त्या कादंबरीवर अवलंबून असते. चाळेगत किंवा नातिचरामि मध्ये लेखकांनीच सांगितल्यामुळे आत्मचरित्र नाही हे कळले. पण प्रथमपुरूषी निवेदक असणारी कादंबरी लेखकाच्या आत्मचरित्राच्या जवळ जाणारीही अनेक उदाहरणे आहेत. मॉमने ऑफ ह्युमन बाँडेजमध्ये ही कादंबरी आत्मचरित्रासारखी आहे आणि ती लिहील्याने त्याला कॅथार्सिससारखा उपयोग झाला असे सांगितले आहे. डिकन्सच्या कादंबर्‍यांमध्येही बर्‍याच घटना त्याच्या आयुष्यात घडल्या होत्या असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. उदाहरणे दोन्ही प्रकारची सापडतात त्यामुळे याबद्दल साधारण नियम लावता येणे शक्य नाही.

यात अडाणीपणा कसा येतो हे कळले नाही. तुम्ही जे लिहीले आहे ते खरे घडले किंवा नाही हे तुम्ही सांगितल्याशिवाय वाचकांना कळणे शक्य नाही. आणि जोपर्यंत तुम्ही स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत वाचकांना त्यांचे अंदाज काढण्याचे स्वातंत्र्य आहे.

यात प्रथम-पुरूषी निवेदकाची उदाहरणे जास्त आहेत पण तसेच नेहेमी असेल असे नाही. लेखक त्यांच्या आयुष्यातील खर्‍या घटना/पात्रे यांचा कथा-कादंबर्‍यांमध्ये नेहेमी उपयोग करतात.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

 
^ वर