तर्कक्रीडा ११:अचंबिता आणि चकिता

अचंबिता आणि चकिता या दोघी बुद्धिमान आहेत.गणितात त्यांची विशेष गती आहे.एकदा त्या गणिताच्या बाईंना शंका विचारायला गेल्या.
........"या, ग, या! बसा." बाई आनंदून म्हणाल्या.
एकजण बाईंच्या टेबलाच्या उजव्या बाजूच्या खुर्चीवर बसली.दुसरी डाव्या बाजूच्या.
........"तुम्ही दोघी आलांत म्हणजे काही विशेष शंका असणार.पण तत्पूर्वी मीच तुम्हांला एक कोडे सांगते."
कोडे म्हटल्यावर कळी खुलली.
........."मी आताच दोन धन पूर्णांकी (+इंटिजर्स) संख्यांचा विचार करीत होते.प्रत्येक संख्या १(एक)पेक्षा मोठी आहे.त्यांची बेरीज मी या कागदावर लिहिली आहे.चंबू, तू ही चिठ्ठी घे.चकू,तू ही घे.यावर त्याच दोन संख्यांचा गुणाकार आहे." प्रत्येकी कडे एक चिठ्ठी देत बाई म्हणाल्या.
त्या दोघीना बाईंचे शिकविणे आवडते. पण कधी बाई त्यांची अशी नांवे घेतात ते मुळीच आवडत नाही.
........"अचंबिता,तुझ्याकडच्या चिठ्ठीवर त्या दोन संख्यांची बेरीज आहे.ती पाहा.आता तू चकिताच्या चिठ्ठीवरील गुणाकार किती ते सांगू शकशील काय?"
........"नाही बाई. ते शक्य नाही."अचंबिता लगेच म्हणाली.
........"चकिता, तुझ्या चिठ्ठीवर त्याच दोन संख्यांचा गुणाकार आहे.तो पाहा. आता अचंबिताच्या चिठ्ठीवरील बेरीज तू सांगू शकशील का?"
थोडी आकडॅमोड करून चकिता आत्मविश्वासाने म्हणाली,
........."होय बाई.ती बेरीज ३९९(तीनशे नव्व्याण्णव) असली पाहिजे."
........."बरोबर!३९९ च आहे." अचंबिताने मान डोलावली,"आता मी तुला गुणाकार पण सांगू शकेन."
तर तो गुणाकार किती?
****{योग्य गणिती युक्तिवाद केल्यास कोडे तोंडी सोडविता येईल.'चुकत माकत'(ट्रायल -एरर) पद्धतीची आवश्यकता नाही.}
..........यनावाला.

लेखनविषय: दुवे:

Comments

७९४

अ. ब = ? (चकिता)
अ + ब = ३९९ (अचंबिता)

ज्या अर्थी चकितेला बेरीज बरोबर सांगता आली, त्या अर्थी त्या दोन संख्यांचा गुणाकार असा असला पाहिजे की ज्यांच्या अवयवांची एकच एक जोडगोळी अस्तित्वात असली पाहिजे. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाले, तर त्या 'मूळ संख्या' (प्राईम नंबर्स) हव्यात.

२ ही पहिली मूळ संख्या. त्यामुळे ३९७ ही जोडगोळीतील दुसरी संख्या हवी, आणि ती सुद्धा मूळ संख्याच आहे. त्यामुळे उत्तर २*३९७ = ७९४.

७९४

गुणाकार ७९४.

चकूला बेरीज लगेच सांगता आली म्हणजे तिच्याजवळच्या संख्येचे केवळ दोन मूळ विभाजक असले पाहिजेत. मूळ संख्या २, ३, ५, ७, ११... यात दोन सोडल्यास सगळ्या मूळ संख्या विषम. कारण सम संख्यांना दोनने भाग जाणारच. दोन विषम संख्यांची बेरीज सम. पण आपल्याला माहित असलेली बेरीज ३९९ आहे विषम. म्हणजे ३९९ = प + २. प = ३९७. आता ३९७ ही नक्की मूळ संख्या आहे का ते मला माहित नव्हते, पण गणिताच्या बाईंनी कोडे बरोबर सांगितले असेल तर ३९७ मूळ असायला हवी. म्हणून उत्तर ३९७ x २ = ७९४.
पहिल्या हजार मूळ संख्यांमध्ये ३९७ सापडली.

७९४

युक्तिवाद वरीलप्रमाणेच!

तेच

माझेही तेच उत्तर -
येथे आपण दोन प्राईम नंबर्स शोधतोय - त्यातला एक तरी सम असायला हवा - आणि फक्त २ हाच एक सम आणि प्राईम नंबर आहे
म्हणून - २ आणि ३९७

गुणाकार - २ x ३९७ = ७९४

तर्क.११ उत्तर

या वेळी अनपेक्षितपणे सर्वांची उत्तरे अगदी बरोबर आली.पूर्वानुभवा वरून हे अनपेक्षित होते.क्षमा करा. आपण सर्वजण नि:संशय बुद्धिमान आहात. उच्चविद्याविभूषित आहात.याची मला जाणीव आहे.पण कधी धाई होत होती.दिशा चुकत होती.या वेळी तसे झाले नाहीं. नंदन,मृदुला,अमित,आवडाबाई या सर्वांनी योग्य उत्तरे दिली.मृदुलाबेन आणि आवडाबाई यांनी तर तीनच विधानांत कोडे मोडीत काढले. "दोन संख्यांची बेरीज विषम असेल तर त्यांतील एक संख्या सम असते."हे आपण प्राथमिक शाळेत शिकलो.प्रथमदर्शनी अवघड भासणार्‍या समस्येवर या ज्ञानकणाचा प्रकाश पडताच सगळे लख्ख झाले.चाचपड संपली.थेट उत्तरच डोळ्यांसमोर दिसले. छोट्याशा ज्ञानाचा प्रभाव किती असतो पाहा!
....आता अधिक अवघड कोड्यांचा विचार करायला हवा.
........यनावाला.
****ता.क.आपल्या उपक्रम परिवाराचे एक सदस्य श्री. अमित कुलकर्णी यांनी मला व्यनि. पाठवून एका कोड्या विषयी कळविले. त्यांना निश्चित असे काहीच आठवत नव्हते.पण त्यांच्या या व्यनि.वरून मला या कोड्याची मध्यवर्ती कल्पना आठवली. त्यावरून हे शब्दबद्ध केले. श्री.अमित यांना धन्यवाद.

थोडीशी सरमिसळ

नंदन,मृणाली,अमित,आवडाबाई या सर्वांनी योग्य उत्तरे दिली.मृणालीबेन आणि आवडाबाई यांनी

तुम्हाला मृदुला म्हणायचे होते असे समजून घेते. :-)

 
^ वर