फुकुशिमा अणुशक्ती वीजकेंद्र

phukushima NPP Schematic

जपानमध्ये येऊन गेलेल्या महाविनाशक भूकंप आणि सुनामी या नैसर्गिक प्रकोपानंतर आता फुकुशिमा येथील अणुशक्तीवर चालणा-या वीजकेंद्राची सर्व जगाला भयंकर काळजी लागली आहे. हिरोशिमा आणि नागासाकी यानंतर आता फुकुशिमाचा आसमंत (कदाचित सारा जपान देश) त्यामध्ये संपूर्णपणे उध्वस्त होणार असे भयंकर अतिरंजित भाकित दर्शवणा-या बातम्या टीव्हीवर सर्रास दाखवल्या जात आहेत. त्यासंबंधी वृत्तपत्रांमध्ये येणारे वृत्तांत आणि काही वर्तमानपत्रांमधील अग्रलेखातसुध्दा सामान्य वाचकांची अशा प्रकारची दिशाभूल केली जात आहे. अमेरिका आणि युरोपमधील अनेक देश त्यापासून भयभीत झाले आहेत असे सांगितले जात आहे. त्याचा परिणाम भारतापर्यंत किती प्रमाणात येऊन पोचणार आहे यावरसुध्दा चर्चा चालली आहे. फुकुशिमा येथील परिस्थिती निश्चितपणे अत्यंत गंभीर असली तरी अणुबाँबच्या स्फोटापेक्षा ती बरीच वेगळी आहे. या वस्तुस्थितीचे आकलन होण्यासाठी या दोन्हींमधील फरक समजून घ्यायला हवा.

युरोनियम व प्ल्यूटोनियम ही मूलद्रव्ये 'फिसाईल' म्हणजे 'भंजनक्षम' आहेत. याचा अर्थ त्यांच्या परमाणूचा 'न्यूट्रॉन' या मूलभूत कणांशी संयोग झाल्यास त्याचे 'फिशन' म्हणजे 'भंजन' होऊ शकते. भंजनाच्या क्रियेमध्ये त्या एका परमाणूचे विभाजन होऊन त्याचे दोन तुकडे पडतात आणि त्यातून दोन नवे लहान परमाणू निघतात, त्याशिवाय प्रचंड प्रमाणात ऊष्णता बाहेर पडते. हिलाच 'परमाणुऊर्जा' किंवा 'अणुशक्ती' असे म्हणतात. प्रत्येक भंजनक्रियेमध्ये परमाणूच्या दोन तुकड्यांच्या (नव्या परमाणूंच्या) सोबत दोन किंवा तीन सुटे न्यूट्रॉनसुध्दा बाहेर पडतात आणि प्रचंड ते वेगाने दूर फेकले जातात. त्यातल्या एका न्यूट्रॉनचा संयोग दुस-या फिसाईल अॅटमशी झाल्यास त्याचे पुन्हा भंजन होते. अशा रीतीने विभाजनांची साखळी पुढे चालत जाते. ती चालत राहण्यासाठी एका जागी पुरेसे भंजनक्षम मूलद्रव्य उपलब्ध असल्यास ती क्रिया अत्यंत वेगाने वाढत जाते आणि पहिल्या एका भंजनापासून तीन, नऊ, सत्तावीस, एक्याऐंशी अशा क्रमाने वाढत गेल्यास भंजनांची संख्या एकाद्या सेकंदात अनेक परार्धांवर जाऊ शकते आणि त्यातून निघालेल्या अपरिमित ऊष्णतेमुळे महाभयानक असा विस्फोट होतो. हा विस्फोट अधिकाधिक तीव्र व्हावा अशा प्रकारची रचना अॅटमबाँबमध्ये केलेली असते. पण त्यासाठी आवश्यक तितके संपृक्त असे (काँसेंट्रेटेड) भंजनक्षम मूलद्रव्य त्या जागी उपलब्ध नसल्यास ही प्रक्रिया सुरू झाली तरी तितक्याच वेगाने ती मंदावत जाऊन क्षणार्धातच ती पूर्णपणे बंद पडते. निसर्गतः मिळणा-या युरेनियममधील भंजनक्षम भाग १ टक्क्याहूनसुध्दा कमी असल्यामुळे नैसर्गिक रीतीने भंजनाची साखळी चालू राहू शकत नाही. युरेनियमच्या खाणीत कधी आण्विक स्फोट झाल्याची घटना घडलेले ऐकिवात नाही.

ही भंजनप्रक्रिया नियंत्रित प्रमाणावर करून त्यातले संतुलन काटेकोरपणे सांभाळल्यास त्यातून ठराविक प्रमाणात सतत मिळत रहाणा-या ऊर्जेचा शांततामय कामासाठी उपयोग करून घेता येतो. या तत्वावर आधारलेल्या न्यूक्लीयर पॉवर स्टेशन्समध्ये गेली अनेक वर्षे वीज निर्माण केली जात आहे. अशा प्रकारच्या रिअॅक्टरवर चालणारी चारशेहून जास्त परमाणू वीज केंद्रे आज जगभरात कार्यरत आहेत आणि जगातील विजेच्या एकंदर निर्मितीच्या १६ टक्के वीज त्या केंद्रामध्ये निर्माण होत आहे. खुद्द जपानमध्येच अशी ५५ केंद्रे असून जपानला लागणारी ३०-३२ टक्के वीज त्यांच्यापासून मिळते. निसर्गाच्या कोपामुळे, दुर्दैवी अपघातामुळे, कोणाच्याही चुकीमुळे, निष्काळजीपणामुळे किंवा हेतूपुरस्सर केलेल्या घातपातामुळे अशासुध्दा या 'परमाणूभट्टी'चे रूपांतर 'अॅटमबाँब'मध्ये होऊ शकणार नाही याची तरतूद या अणूभट्ट्यांच्या रचनेमध्येच केलेली असते.

बहुतेक सर्व अणुविद्युतकेंद्रात ज्या प्रकारचे इंधन वापरले जाते त्यातील भंजनक्षम भाग फक्त ०.७ ते ४ टक्क्यापर्यंत असतो. बोरॉन, कॅड्मियम यासारखे न्यूट्रॉन्सना पटकन शोषून घेणारे 'न्यूट्रॉन्सचे विष' त्यांच्या भंजनावर सतत नियंत्रण ठेवण्यासाठी बसवलेल्या 'कंट्रोल रॉड्स'मध्ये वापरले जाते. शिवाय या न्यूट्रॉन्सच्या जालिम विषांचा मोठा वेगळा साठा रिअॅक्टरच्या एका भागात 'शटऑफ'साठी जय्यत तयार ठेवलेला असतो आणि वेळ येताक्षणी तो आपोआप रिअॅक्टरच्या मुख्य गाभ्यामध्ये शिरून क्षणार्धात त्याचे कार्य पूर्णपणे बंद पाडतो. याला 'शटडाऊन' असे म्हणतात. जपानमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळीसुध्दा या प्रक्रियांनी त्यांचे काम चोख प्रकारे केले आणि भूकंपाचा इशारा मिळताच त्या भागातील सर्व अणुशक्तीकेंद्रे आपोआप ताबडतोब 'शटडाउन' झाली म्हणजे बंद पडली. त्यांमध्ये होत असलेल्या अणूंच्या विभाजनाच्या प्रक्रिया क्षणार्धात पूर्णपणे बंद झाल्या. त्यामधून आता अणूबाँबसारखा विस्फोट घडण्याची काळजी करण्याचे कारण नाही.

मग ही 'आणीबाणीची परिस्थिती' कशामुळे उद्भवली आहे? युरेनियमच्या अणूचे विभाजन झाल्यानंतर त्याचे जे दोन तुकडे होतात त्यात क्रिप्टॉन, झेनॉन, आयोडिन, सीजीयम यासारखे किरणोत्सर्गी पदार्थांचे परमाणू असतात. रिअॅक्टरमधील भंजनक्रिया बंद झाल्यानंतरसुध्दा त्यांच्यापासून रेडिओअॅक्टिव्हिटीचे उत्सर्जन चालत राहते आणि त्या क्रियेमधूनसुध्दा बरीचशी ऊर्जा बाहेर पडत असते. लोहाराच्या भट्टीमधील आग विझल्यानंतरसुध्दा बराच काळ त्याची धग शिल्लक असते त्याप्रमाणे पण फार मोठ्या प्रमाणावर अणूभट्टीसुध्दा दीर्घकाळपर्यंत धगधगत राहते. या ऊष्णतेमुळे रिअॅक्टरच्या अंतर्भागातले तापमान वाढत राहते. तसे होऊ नये यासाठी 'बंद' असलेल्या रिअॅक्टरलासुध्दा थंड करत राहणे आवश्यक असते. मोटारीचे इंजिन थंड ठेवण्यासाठी त्याचा बाजूचा भाग (जॅकेट) पाण्याने वेढलेला असतो आणि इंजिनामधील ऊष्णतेमुळे तापलेले पाणी रेडिएटरमध्ये फिरवून थंड केले जाते. साधारणपणे अशाच व्यवस्थेने बंद असलेल्या रिअॅक्टरला थंड ठेवले जाते.

अणुविद्युतकेंद्र व्यवस्थितपणे काम करत असतांना रिअॅक्टरमधील इंधनाच्या आजूबाजूने प्रवाहित असलेल्या पाण्यापासून वाफ तयार केली जाते आणि त्या वाफेवर टर्बाइन्स चालवून विजेची निर्मिती होते. केंद्र बंद केल्यावर टर्बाइन्स थांबतात, तरीसुध्दा रिअॅक्टरमधील इंधनामधून सतत काही ऊर्जा बाहेर पडतच असते. हे प्रमाण नंतर हळूहळू कमी होत जाते. ही ऊर्जा 'रिअॅक्टर व्हेसल'च्या बाहेर काढून तेथील तपमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी अणुइंधनाच्या सभोवती खेळणारे पाणी रिअॅक्टरव्हेसलच्या बाहेर ठेवलेल्या 'हीट एक्स्चेंजर'मध्ये नेऊन थंड केले जाते आणि थंड केलेले पाणी पुन्हा रिअॅक्टर व्हेसलमध्ये सोडले जाते. पाण्याचे हे अभिसरण सतत चालू ठेवण्यासाठी पंपांचा उपयोग केला जातो. पॉवरस्टेशनमधील विजेचे उत्पादन बंद झाले तरी बाहेरून मिळत असलेल्या विजेवर हे पंप चालतात. बाहेरील वीजपुरवठा ठप्प झाला तरी हे पंप चालवण्यासाठी खास डिझेल जनरेटर्स सज्ज ठेवलेले असतात. जगातील सर्वच न्यूक्लिअर पॉवर स्टेशन्समध्ये या सगळ्यांची चोख व्यवस्था केलेली असते आणि त्यांच्याकडून हे काम एरवी अगदी सुरळीतपणे चालत राहते. यापूर्वी या बाबतीत कोठेही आणि कधीच कसला त्रास झालेला नाही.

जपानमधील भूकंप आणि सुनामीमुळे या वेळी नक्की काय आणि किती बिनसले याचा नीटसा उलगडा अजून झालेला नाही. फुकुशिमा येथे एकंदर सहा रिअॅक्टर्स आहेत. त्यापैकी तीन रिअॅक्टर्स या घटनेच्या वेळी काम करत होते. इतर रिअॅक्टर्स मेंटेनन्ससाठी बंद ठेवलेले असल्यामुळे त्यांना विशेष धोका नव्हता. भूकंप येताक्षणीच त्या वेळी चालत असलेले तीन रिअॅक्टर्स ताबडतोब बंद केले गेले आणि पहिला तासभर त्यांना थंड करण्याचे कामसुध्दा व्यवस्थितपणे चाललेले होते. त्यानंतर सुनामी आला आणि त्या भागाला वीजपुरवठा करणा-या सर्व ट्रान्स्मिशन टॉवर्सना त्याने धराशायी केल्यामुळे विजेचा पुरवठा संपूर्णपणे बंद पडला. डिझेल इंजिनांचेसुध्दा नुकसान झाल्यामुळे अथवा त्यांच्या तेलाचा साठा वाहून गेल्यामुळे ती सुरू झाली नाहीत. त्यानंतर तेथील तंत्रज्ञ ती इंजिने किंवा वेगळे जनरेटर्स सुरू करून त्यावर हे पंप चालवण्याचे प्रयत्न करत राहिले. पण बंद झालेल्या तीन रिअॅक्टर्समध्ये पाण्याचे अभिसरण अपेक्षेप्रमाणे होत नव्हते एवढे नक्की आणि त्या रिअॅक्टरांना थंड करण्यासाठी आवश्यक असलेला पाण्याचा पुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांच्यापुढे सध्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.

या रिअॅक्टरमधील इंधन उभ्या कांड्यांच्या (फ्यूएल रॉड्स) स्वरूपात असते. रिअॅक्टर व्हेसलमधून होत असलेला पाण्याचा प्रवाह थांबला किंवा तो फार कमी झाला की आधीपासून त्या उभ्या कांड्यांच्या आजूबाजूला असलेल्या पाण्याची वाफ होऊन ती वरील भागात जाते आणि रिअॅक्टरच्या पात्रामधील पाण्याची पातळी कमी होत जाते. त्यामुळे इंधनाचे तपमान जास्तच वाढत जाते. वाढत वाढत ते एका मर्यादेच्या पलीकडे गेल्यानंतर त्याचा पाण्याशी संयोग होताच पाण्याचे पृथक्करण होऊन हैड्रोजन वायू तयार होतो आणि त्याचा दाब वाढत जातो. त्यामुळे बाहेरून आत पाठवल्या जाणा-या पाण्याला विरोध होऊन त्याचा प्रवाह आणखी कमी होतो किंवा बंदच होतो. दाब कमी करण्यासाठी हा हैड्रोजन वायू पात्राच्या बाहेर सोडावा लागतो किंवा एकाद्या फटीतून तो बाहेर निसटतो. बाहेर पडलेल्या गरमारगम हैड्रोजन वायूचा बाहेरील हवेशी संपर्क येताच त्याचा स्फोट होतो. फुकुशिमा येथील रिअॅक्टरबिल्डिंग्जमध्ये असे स्फोट झाल्याची बातमी आहे. घरातील गॅस सिलिंडरचे फुटणे किंवा रस्त्यावरील अपघातात पेट्रोल टँकरचा उडालेला भडका यांच्याप्रमाणे हे सुध्दा 'रासायनिक स्फोट' आहेत. रिअॅक्टरबिल्डिंगमध्ये झालेले हैड्रोजन वायूचे स्फोट म्हणजे 'अॅटम बाँब' नाहीत किंवा 'हैड्रोजन बाँब' नव्हेत. 'आण्विक' स्फोटाची तीव्रता रासायनिक स्फोटांच्या कोट्यवधी पटीने जास्त असते. त्यामुळे आजूबाजूचा सारा प्रदेश पार नष्ट होऊन जातो. या दोन प्रकारच्या विस्फोटांमध्ये गल्लत करू नये.

हैड्रोजनवायूच्या या स्फोटांमुळे रिअॅक्टरबिल्डिंगचे छप्पर उडाले असले, बाह्य भिंती पडल्या असल्या तरी आतल्या बिल्डिंग शाबूत आहेत. मुख्य म्हणजे ज्या रिअॅक्टर व्हेसल्समध्ये सर्व किरणोत्सर्गी द्रव्ये बंद असतात, त्यांना अजून गंभीर धोका पोचलेला नाही. तसेच त्याच्या सभोवार असलेले मजबूत कंटेनमेंटसुध्दा जवळजवळ अभंग राहिले आहे. पण कोणत्याही क्षणी त्यामधून भरपूर विकीरण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून वीस किलोमीटर्स परीघामधील सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षित जागी नेण्यात आले आहे. त्याच्या पलीकडे राहणा-या लोकांना सावध केले गेले आहे. येनकेन प्रकारेण रिअॅक्टर व्हेसल्समध्ये पाणी पाठवत राहण्याचे खटाटोप चाललेले आहेत. त्यात यश मिळेल अशी आशा आहे. पण तरी सुध्दा जास्तीत जास्त काय वाईट होऊ शकेल याचा विचार करून त्या दृष्टीने पाउले उचलण्याचे कामसुध्दा चालले आहे.

जर रिअॅक्टरमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी जाऊन ते त्याला थंड करू शकले नाहीच तर इंधनाच्या छड्या अधिकाधिक गरम होत जातील. त्यांचा 'मेल्टिंग पॉइंट' गाठला गेल्यास त्या वितळून खाली पडतील. याला 'कोअर मेल्ट़डाऊन' असे म्हणतात. फुकुशिमा येथील तीनही रिअॅक्टर्समध्ये काही प्रमाणात मेल्टडाऊन झाले असावे अशी शंका आहे. रिअॅक्टरच्या आत नक्की काय चालले आहे ते आज कळण्याचा मार्ग नाही. आपण फक्त त्याचे बाह्य दुष्परिणाम पाहू शकतो आणि त्यांचे मोजमाप घेऊ शकतो. अशा वितळलेल्या धातूंच्या रसामुळे रिअॅक्टर व्हेसलचे सहासात इंच जाडीचे पात्रसुध्दा वितळू लागले तर कदाचित ते फुटेल किंवा त्याच्या तळाला भोक पडून त्यामधून आतले बरेचसे रेडिओअॅक्टिव्ह पदार्थ बाहेर पडतील. त्यातले बरेचसे पदार्थ कंटेनमेंटमध्येच बंदिस्त राहतील अशी अपेक्षा आहे. रिअॅक्टर बिल्डिंगचेच छप्पर उडालेले असल्यामुळे कंटेनमेंटमधून बाहेर पडलेले वायुरूप पदार्थ हवेत मिसळून जगभर पसरतील आणि द्रवरूप पदार्थ जमीनीत शिरून भूगर्भात पसरतील. घनरूप पदार्थ तेवढे तिथेच राहतील. तिथे अॅटमबाँबचा स्फोट मात्र होणार नाही.

यापूर्वी अमेरिकेतील 'थ्री माइल आयलंड' या न्यूक्लियर पॉवर स्टेशनमध्ये 'कोअर मेल्टडाऊन' झाले होते, पण त्या वेळी सर्व किरणोत्सर्गी पदार्थ रिअॅक्टरच्या कंटेनमेंटच्या आतच राहिले. त्यांच्यापासून बाहेर कोणालाही कसलाही उपसर्ग झाला नाही. त्या अपघातात सुध्दा पॉवर स्टेशनचे भरपूर नुकसान झाले. ते युनिट कायमचे बंद झाले. म्हणजे त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. पण कोणाच्या आरोग्याला धक्का लागला नाही. रशियामधील चेर्नोबिल येथे झालेल्या अपघातात मात्र भरपूर मोठ्या प्रमाणात रेडिओअॅक्टिव्ह द्रव्ये रिअॅक्टर बिल्डिंगच्या बाहेर पडून वातावरणात पसरली. याचे कारण त्या जागी चांगले कंटेनमेंट नव्हते. चेर्नोबिल दुर्घटनेमुळे जे लोक प्रत्यक्ष घटनास्थळी मृत्यूमुखी पडले त्यातले बहुतेक सर्वजण रशीयातल्या अग्निशामक दलाचे वीर जवान होते. किरणोत्सर्गामुळे बाहेरच्या जगातील खूप लोकांना बाधा झाली होती. त्यातले अनेक लोक त्यांना झालेल्या दुर्धर आजारामुळे वारले किंवा अपंग झाले. त्यांचा नेमका आकडा सांगता येणार नाही, कारण त्या विषयावर बराच वाद आहे. चेर्नोबिलचा परिसर उध्वस्त झालेला नाही. त्या जागी असलेले इतर रिअॅक्टर एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरसुध्दा काम करत राहिले होते. चेर्नोबिलला घडलेली ही घटना अत्यंत भयानक होती यात शंका नाही. तिची पुनरावृत्ती होता कामा नये यासाठी त्यानंतर जगभरातील सर्व ठिकाणच्या रिअॅक्टर्सवर जास्तीचे अनेक निर्बंध घालण्यात आले आणि ते अंमलातही आणले जात आहेत. पण या दुर्घटनेला हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर झालेल्या बाँबहल्ल्यांच्या मालिकेत बसवता येणार नाही. त्या दोन्ही हल्ल्यांमध्ये झालेली हानी अनेकपटीने मोठी होती.

चेर्नोबिलमधील अतीतीव्र विकीरणकारी द्रव्ये तो रिअॅक्टर चालत असतांना झालेल्या अपघातात बाहेर पडली होती. ती विषारी द्रव्ये एकाद्या सुनामीसारखी इतक्या अचानकपणे वातावरणात मिसळली की त्या भागातील लोकांना त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करून घेण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. त्यांना तशी संधीच मिळाली नाही. फुकुशिमाचे रिअॅक्टर बंद होऊन आता पाचसहा दिवस उलटले आहेत. त्यामुळे त्यातून बाहेर पडू पाहणा-या द्रव्यांची तीव्रता कमी झाली असणार. ती आता कदाचित फार मोठ्या प्रमाणात बाहेर पडणार नाहीत आणि पडली तरी त्यांची तीव्रता चेर्नोबिलच्या मानाने कमी राहील असा अंदाज जपानच्या अधिकृत गोटातून व्यक्त गेला जात आहे. त्या भागातील दोन लाख लोकांचे केलेले स्थलांतर आणि त्या पलीकडच्या लोकांना दिलेल्या सूचना, वाटली गेलेली औषधे यासारख्या सावधगिरीच्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत. फुकुशिमा येथील रिअॅक्टर्समध्ये होत असलेल्या घटना अमेरिकेतील थ्री माइल आयलंडपेक्षा नक्कीच अधिक भीषण आणि धोकादायक आहेत. पण त्या चेर्नोबिलएवढ्या होऊ नयेत यासाठी शर्थीचे प्रत्न चालले आहेत. त्यांमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी यांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही.

आज अण्वस्त्रधारी देशांची संख्या वाढली आहे, त्य़ांच्यातले काही देश परस्परांचे हाडवैरी आहेत. त्यांचेमध्ये महायुध्द भडकण्याचा धोका आहे. अतिरेकी कृत्ये करणा-या दहशतवादी शक्तींची संख्या आणि सामर्थ्य वाढतच चालले आहे. त्यांच्या हातात जर अण्वस्त्रे पडली तर ते त्याचा कसा उपयोग करतील याचा नेम नाही. अशातून अण्वस्त्रांचे स्फोट घडण्याची टांगती तलवार मात्र आपल्या डोक्यावर टांगलेली आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

अतिशय चांगला लेख

अणुशक्ती केंद्रातील यंत्रणेबाबत जी माहिती मिळाली, ती समयोचित आहे. फुकुशिमा दाइइची केंद्राबद्दल बातम्या आता नीट समजून घेता येतील.

मॉडरेटर रॉड्स

सर्व बातम्या वाचल्यानंतरही एक गोष्ट मला समजू शकलेली नाही. भूकंपाचा धक्का बसल्याबरोबर तंत्रज्ञांनी सर्व रिऍक्टर्स बंद केले असे बातमीत म्हटले होते. रिऍक्टर्स बंद केले म्हणजे काय? याची माझी माहिती अशी आहे. रिऍक्टरमधे इंधन म्हणून जे युरेनियमचे रॉड बसवलेले असतात ते एखाद्या मधमाशीच्या पोळ्याच्या आकाराच्या फ्रेम मधे बसवलेले असतात. ही संबंध फ्रेम खाली वर करता येते. मॉडरेटर रॉड्स अशाच दुसर्‍या एका फ्रेम मधे बसवलेले असतात. इंधन रॉड खाली घेतले की मॉडरेटर रॉड्स त्यांच्या मधे येतात व आण्विक प्रक्रिया थंडावते/ बंद करता येते. तंत्रज्ञांनी भूकंपाचा धक्का बसल्याबरोबर इंधन रॉड्स खाली घेतले. यामुळे आंविक प्रक्रिया थंडावून बंद पडावयास हवी असे मला वाटत होते. प्रत्यक्षात तसे न होता रिऍक्टर मधून उष्णता निर्मिती चालूच राहिली आहे. हे कसे याचे आकलन मला झालेले नाही. यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

दुवा

या दुव्यातून अधिक माहिती मिळू शकेल असे वाटते.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

खुलासा

मॉडरेटरचे रॉड नसतात तसेच मॉडरेटरमुळे भंजनाच्या क्रियेला अधिक चालना मिळते. मॉडरेटरच्या मदतीमुळेच ती क्रिया चालत असते.
रिअॅक्टर ट्रिप, स्क्रॅम किंवा शटडाऊन होतो त्यावेळी त्यामधील फ्यूएल व मॉडरेटर हे पदार्थ जागच्या जागीच राहतात. पॉयझनने युक्त असे कंट्रोलरॉड, अॅबसॉर्बर रॉड, शटऑफरॉड वगैरे रॉड रिअॅक्टर कोअरमध्ये शिरतात आणि न्यूट्रॉन्सना खाऊन टाकून फिशन चेन रिअॅक्शन बंद पाडतात. त्याशिवाय मॉडरेटरमध्ये पॉयझन मिसळणे (पॉयझन इंडेक्शन) हा मार्गसुध्दा अवलंबिला जातो.
रिअॅक्टर बंद होतो याचा अर्थ त्याच्यामध्ये चालणारी फिशन न्यूक्लिअर रिअॅक्शनची साखळी थांबते. परंतु पूर्वीपासून साठलेले फिशन प्रॉडक्ट्स किरणोत्सर्ग करत राहतात. त्यामुळे त्यातून ऊष्णता बाहेर पडत राहते. ही ऊष्णता फ्यूएलमधून बाहेर पडत नाही, तर फिशन प्रॉडक्ट्समधून निघत असते. हे मी माझ्या लेखात लिहिले आहे.

खुलासा

खुलाशाबद्दल धन्यवाद
चन्द्रशेखर

मॉडरेटर विषयी थोडेसे...

श्रृंखला अभिक्रिये मधे जे न्यूट्रॉन्स बाहेर पडतात त्यांची गती व उर्जा फार जास्त असते व ती कमी (नियंत्रित) केल्या विना ते पुढचे अणूविभाजन करू शकत नाहीत ते त्यांच्या वेगा मुळे निसटून वाया जातील. आणि ही गती/ उर्जा फारकमी झालीतर ते अणूविभाजन करण्यास असमर्थ होतील. तर हे न्यूट्रॉन्स ची उर्जा व गती नियंत्रित करून त्यांना अणूविभाजना करता सुयोग्य असे करण्याचे काम ( त्यांना फास्ट स्पीड वरून थर्मल स्पीड ला आणण्याचे काम) मॉडरेटर पदार्थ करतात. हेवी वॉटर , साधे पाणी व ग्राफाइट हे पदार्थ मॉडरेटर म्हणून वापरले जातात. या पैकी ग्राफाइट रॉडस् च्या स्वरूपात वापरतात तर हेवीवॉटर व साधे पाणी हे रिअॅक्टर मधील नळ्यां मधून पंप वापरून खेळवले जाते.(डिस्कव्हरीवरच्या चेर्नोबिल दुर्घटने बद्दलच्या कार्यक्रमात बोरॉन रॉडस् चा वापर पहिले करावयास हवा होता ग्राफाईट रॉडस नंतर वापरायला हवे होते असे मत व्यक्त केले होत असं आठवतं.)
साधे पाणी वापरायचे झाले तर कमी आकाराचे रिअॅक्टर बनवता येइल कारण साध्या पाण्याची मॉडरेशन करण्याची क्षमता जास्त असते पण त्या मुळे अभिक्रिया सुरु ठेवायची तर अधिक संपृक्त युरेनियमची गरज पडते व त्याचा वारंवार पुरवठा करावा लागतो.

ते शक्य नसल्यास हेवीवॉटर वापरतात व अधिक आकारमानाचे रिअॅक्टर लागते. व गळती वर काटेकोर लक्ष ठेवल्यास हेवीवॉटर चे पुनर्भरण बराच काळ करावे लागत नाही.

अशाप्रकारे युरेनियम संपृक्त करायचे की हेवी वॉटर वापरायचे हा सवाल डिझायनर समोर असतो.

मॉडरेटर

चांगली माहिती दिली आहे. त्यावर थोडे स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे.
श्रृंखला अभिक्रिये मधे जे न्यूट्रॉन्स बाहेर पडतात त्यांची गती व उर्जा फार जास्त असते व ती कमी (नियंत्रित) केल्या विना ते पुढचे अणूविभाजन करू शकत नाहीत ते त्यांच्या वेगा मुळे निसटून वाया जातील. आणि ही गती/ उर्जा फारकमी झालीतर ते अणूविभाजन करण्यास असमर्थ होतील. तर हे न्यूट्रॉन्स ची उर्जा व गती नियंत्रित करून त्यांना अणूविभाजना करता सुयोग्य असे करण्याचे काम ( त्यांना फास्ट स्पीड वरून थर्मल स्पीड ला आणण्याचे काम) मॉडरेटर पदार्थ करतात. हेवी वॉटर , साधे पाणी व ग्राफाइट हे पदार्थ मॉडरेटर म्हणून वापरले जातात. या पैकी ग्राफाइट रॉडस् च्या स्वरूपात वापरतात तर हेवीवॉटर व साधे पाणी हे रिअॅक्टर मधील नळ्यां मधून पंप वापरून खेळवले जाते.

फ्यूएलचे (युरेनियमचे) रॉड किंवा बंडल्स असतात आणि मॉडरेटर त्याच्या सर्व बाजूला पसरलेले असते. साधे किंवा जड पाणी हे मॉडरेटर असल्यास फ्यूएल त्यात बुडवले जाते, ग्राफाइट मॉडरेटर असल्यास ग्राफाइटच्या ठोकळ्यांमध्ये फ्यूएल रॉडसाठी मोकळ्या जागा ठेवल्या जातात.
(डिस्कव्हरीवरच्या चेर्नोबिल दुर्घटने बद्दलच्या कार्यक्रमात बोरॉन रॉडस् चा वापर पहिले करावयास हवा होता ग्राफाईट रॉडस नंतर वापरायला हवे होते असे मत व्यक्त केले होत असं आठवतं.)
बोरॉन हे न्यूट्रॉन्सचे विष असल्यामुळे त्याचा उपयोग कंट्रोल रॉड्समध्ये होऊ शकतो. बोरॉन हे मॉडरेटर होऊ शकत नाही.
साधे पाणी वापरायचे झाले तर कमी आकाराचे रिअॅक्टर बनवता येइल कारण साध्या पाण्याची मॉडरेशन करण्याची क्षमता जास्त असते पण त्या मुळे अभिक्रिया सुरु ठेवायची तर अधिक संपृक्त युरेनियमची गरज पडते व त्याचा वारंवार पुरवठा करावा लागतो.
त्यासाठी दरवर्षी रिअॅक्टरला सुटी (औटेज) द्यावी लागते.
ते शक्य नसल्यास हेवीवॉटर वापरतात व अधिक आकारमानाचे रिअॅक्टर लागते. व गळती वर काटेकोर लक्ष ठेवल्यास हेवीवॉटर चे पुनर्भरण बराच काळ करावे लागत नाही.
पण दररोज फ्यूएलिंग करावे लागते
अशाप्रकारे युरेनियम संपृक्त करायचे की हेवी वॉटर वापरायचे हा सवाल डिझायनर समोर असतो.
हे दोन पर्याय आहेत. आपली क्षमता आणि आर्थिक व तांत्रिक बाबींचा विचार करून निर्णय घेतला जातो.

दोन गोष्टी ..

दोन गोष्टी बद्दल थोडे स्पष्टीकरण हवे आहे.
१)पण दररोज फ्यूएलिंग करावे लागते >>> सर, मला वाटते की हे ( साधे पाणी वापरणार्‍या) लाइट वॉटर रिऍक्टर च्या बाबतीत असावे कारण रिऍक्टर चे आकारमान कमी हवे असेल तर साधे पाणी व अधिक संपृक्त युरेनियम चा वापर केला जाईल. आकारमान कमी म्हणजे अर्थातच भंजनक्षम इंधन (युरेनियम ) ही कमी मावणार व पुन्हा पुन्हा ( अगदी दररोज ही) भरावे लागणार.
हेवी वॉटर वापरणार्‍या रिऍक्टर मधे या उलट कमी संपृक्त युरेनियम व अधिक आकारमान असे आहे त्या मुळे अधिक भंजनक्षम इंधन (युरेनियम ) मावेल व दररोज भरावे लागणार नाही.
की या बाबी चा संबंध युरेनियम किती संपृक्त आहे त्याच्याशी अधिक असेल?

२) बोरॉन हे मॉडरेटर होऊ शकत नाही>>> हे बरोबर, बोरॉन हे श्रृंखला अभिक्रियेसाठी विष आहे. पण डिस्कव्हरीच्या चेर्नोबिल वरील कार्यक्रमात जे मत व्यक्त केले होते, ते बहुधा त्या रिऍक्टरचे विशेष डिझाईन मुळे असावे. रिऍक्टरच्या वेगवेगळ्या झोन मधे तापमान नेमेके किती हवे याचे अधिक चांगले नियंत्रण करण्या साठी ग्राफाईटसुध्दा रॉड स्वरुपात वापरले असावे. अर्थात हा माझा अंदाज आहे. कारण त्या कार्यक्रमात असे म्हटले होते की ग्राफाइट रॉड चा वापर अगोदर केल्याने रिऍक्टरच्या काही भागातले (बेड मधले) तापमान मर्यादेबाहेर गेले व मग बोरॉन रॉड वापर करूनही ते नियंत्रणात आले नाही.

( सर, तुमच्या या लेखामुळे मी पुन्हा एकदा थोडासा अभ्यास केला, बैलाला पराणी टोचल्या बद्दल आभार!! :) )

स्पष्टीकरण

धन्यवाद. आपण दाखवलेल्या उत्सुकतेमुळे रिअॅक्टर या विषयावर एक वेगळा लेख लिहावा असे मला वाटू लागले आहे. सध्या थोडक्यात सांगतो.
कोळशाच्या भट्टीमध्ये टाकलेला सारा कोळसा जळून जातो आणि त्याचे रूपांतर धूर आणि राख यांचेमध्ये होते. त्या भट्टीमधील आग पेटती ठेवण्यासाठी त्यात सतत कोळसा टाकत रहावा लागतो. रिअॅक्टरचे असे नाही. त्यातल्या युरेनियमचा अत्यल्प भाग भंजनाद्वारे रोज नष्ट होत असतो. त्यामुळे भंजनाची प्रक्रिया क्षीण होते. त्याची साखळी तुटली की ती पूर्णपणे थांबते. तेंव्हासुध्दा रिअॅक्टरमधील फ्यूएल आकाराने जवळजवळ पहिल्याइतकेच शिल्लक असते. कोळशाप्रमाणे ते जळून खाक होत नाही. फक्त त्यातील भंजनक्षम द्रव्याची टक्केवारी कमी झालेली असते.
साधे पाणी हे सर्वात चांगले मॉ़डरेशन करत असले (न्यूट्रॉन्सच्या गतीला मंदावत असले) तरी ते करत असतांना ते काही न्यूट्रॉन्सना शोषून घेते. त्यामुळे रिअॅक्टरचा आकार कितीही मोठा केला तरी साधे पाणी आणि निसर्गदत्त युरेनियम यांच्या द्वारे भंजनाची साखळी चालत नाही. त्यासाठी युरेनियम २३५ ची टक्केवारी वाढवणे आवश्यक असते. संपृक्त युरेनियम आणि साधे पाणी यांचा उपयोग करून चालवलेला रिअॅक्टर आकाराने लहान असतो. इंधनाचा वापर झाल्यामुळे त्यातील भंजनक्षम यू२३५ मध्ये रोज घट होत असते. वर्षभरात होणारी घट भरून काढता येईल इतके जास्त इंधन रिअॅक्टरमध्ये सुरुवातीलाच भरून ठेवता येते, किंबहुना ते तसे ठेवणे आवश्यक असते. त्यानंतर वार्षिक सुटीमध्ये काही सर्वाधिक जुने फ्यूएल रॉड बाहेर काढून त्यांचे जागी नवे ठेवले जातात. त्यामुळे पुढील वर्षभराची बेगमी होते.
हेवी वॉटर हे तुलनेने कमी प्रमाणात मॉडरेशन करत असल्यामुळे ते जास्त प्रमाणात वापरावे लागते. त्यामुळे रिअॅक्टरचा आकार वाढतो. जड पाण्यात न्यूट्रॉन्सचे शोषण अत्यल्प प्रमाणात होत असल्यामुळे जड पाणी मॉडरेटर असलेल्या रिअॅक्टर्समध्ये नैसर्गिक युरेनियमचा उपयोग करता येतो. त्यात फक्त ०.७ टक्के भंजनक्षम यू २३५ असतो. त्यामुळे भंजनाची साखळी जेमतेम चालत राहते. भंजनाद्वारे यू२३५ चे प्रमाण कमी झाले की ती बंद पडते. ते होऊ नये यासाठी जवळ जवळ रोजच्या रोज थोडेसे जुने इंधन (स्पेंट फ्यूएल) बाहेर काढून त्या जागी ताजे इंधन भरले जाते आणि अशा रीतीने समतोल साधला जातो.

डिस्कव्हरीवरील कार्यक्रम मी पाहिलेला नाही. कंट्रोल करण्यासाठी बोरॉन प्रमाणेच ग्राफाइटचा (बोरॉनचा उपयोग अॅब्सॉर्बर म्हणून तर ग्राफाइटचा बूस्टर म्हणून) उपयोग केला जाणे शक्य आहे. रिअॅक्टरच्या सर्व भागात निर्माण होत असलेल्या ऊष्णतेमध्ये समतोल रहावा यासाठी असे स्थानिक उपाय योजले जात असतात.

माझ्या सारखे...

रिअॅक्टर या विषयावर एक वेगळा लेख लिहावा असे मला वाटू लागले आहे. >>>>

माझ्या सारखेच अनेक जण तुमच्या लेखाची नक्कीच वाट पहातील. जरूर लिहा , लवकर येउद्या, क्रमश: मालिका ही चालेल.

माहितीपूर्ण लेख

लेख माहितीपूर्ण आहे. आवडला.

प्रमोद

असेच म्हणतो

लेख माहितीपूर्ण आहे. आवडला.

-दिलीप बिरुटे

छान

नक्की काय घडत आहे याचा बराचसा खुलासा या सुंदर लेखाने झाला आहे.

अर्थात या अनुभवानंतर आपल्या अणुभट्ट्यांमध्ये योग्य ती काळजी घेतली जावी अशी अपेक्षा करणे योग्यच आहे.

सिरिअस गोष्ट म्हणजे अमेरिकेत काहीच झाले नाही पण जपान मध्ये मात्र स्फोट होण्यापर्यंतची वेळ आलीच आहे. शिवाय किरणोत्सार वाढला असल्याचे बातम्यांमध्ये सांगितले गेले आहे.

आपल्या आसपास सर्वत्र अनेक धोकादायक गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात. उदा घरात एलपीजी चे दोन दोन सिलिंडर आपण ठेवतो. आपल्या घराजवळ पेट्रोलपंप असतात त्यात हजारो लीटर पेट्रोल साठवलेले असते.

तरी अश्या गोष्टींपासून असलेला धोका लोकल असतो शिवाय बहुतेक गोष्टीतले धोके माहिती असतात.

अणुऊर्जेच्या बाबतचा धोका अधिक वाटतो कारण रेडिएशनने होणारे दुष्परिणाम दूरवर परिणाम करणारे, लाँगटर्म आणि कदाचित जनुकीय संक्रमण होण्याजोगे असतात. शिवाय अणुऊर्जेच्या बाबतीत नेहमी एक गुप्ततेचा पडदा असतो ज्याने पॅनिक आणि अफवा पसरण्यास मदत होते.

शिवाय भोपाळच्या अनुभवातून ज्या काळज्या अमेरिकेत घेतल्या जातात त्या भारतात घेतल्या जातीलच याची खात्री वाटत नाही.

नितिन थत्ते

क्रायसिस

नव्याने येत असलेल्या बातम्यांनुसार दुर्घटना चेर्नोबिल इतकी भयंकर असल्याचे ऐकू येत आहे.

नितिन थत्ते

चेर्नोबिल आणि फुकुशिमा

जागतिक इव्हेंट स्केल अशी आहे.
0 –जराशी वाकडी वाट
1 - विसंगती
2 - घटना
3 - गंभीर घटना
4 - स्थानिक परिणाम करणारा अपघात
5 -अधिक विस्तृत प्रमाणावर परिणामकारक अपघात- कदाचित काही प्रतिबंधक उपाय करावे लागण्याची शक्यता
6 -गंभीर अपघात - बराच किरणोत्सार - प्रतिबंधक उपाय करावे लागण्याची शक्यता
7 -मोठा अपघात - विस्तृत प्रमाणावर आरोग्य आणि पर्यावरणावर परिणाम करणारा मोठा किरणोत्सार - योजनापूर्वक दीर्घकाल प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आवश्यकता

चेर्नोबिल येथे झालेल्या अपघातात रिअॅक्टरची शक्ती मर्यादेबाहेर वाढली, त्यामुळे स्फोट झाला, ग्राफाईटला आग लागली आणि रिअॅक्टरमधील जवळजवळ सर्व रेडिओअॅक्टिव्ह पदार्थ आभाळात जाऊन युरोपभर पसरले. त्यामुळे काही उपाययोजना करायला सवड मिळाली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितवित्ताची हानी झाली.

फुकुशिमा येथे झालेल्या अपघातात यातले काहीही घडले नाही. तीन रिअॅक्टर्समधील दुर्घटना स्केल ५ च्या आणि एकंदर परिस्थिती स्केल ७ ची असे जाहीर केले गेले आहे. योजनापूर्वक प्रतिबंधक उपाययोजना पहिल्या दिवसापासून सुरू झाली आहे आणि आवश्यकता भासल्यास ती दीर्घकाल चालू राहील

यावरून दोन्हीमधील फरक लक्षात यावा.

हेलिकॉप्टरमधून पाणी फवारणी

सकाळीच जपान रिऍक्टरवर हेलिकॉप्टरमधून पाणी फवारणी करत असल्याची बातमी वाचली. सोबत काही भागातील वीजही सुरू होईल असा अंदाज वर्तवला आहे. समयोचित आणि सोप्या भाषेतला लेख.

आवडला.

चांगला लेख

हा समयोचीत लेख एकदम आवडला.

फुकुशिमा येथील तीनही रिअॅक्टर्समध्ये काही प्रमाणात मेल्टडाऊन झाले असावे अशी शंका आहे.

खरे आहे. सध्या माध्यमांमध्ये "मेल्टडाऊन" या शब्दावरून बरेच चर्विचर्वण चालले आहे. नक्की "मेल्टडाऊन" कधी झाले म्हणायचे यावर पण जरा गोंधळाचे वातावरण आहे. रॉड्स वितळले तर कोअर मेल्टडाऊन, पण जो पर्यंत छप्पर उडत नाही तो पर्यंत सर्वच कंटेंड असेल. मात्र स्फोटातून येणार्‍या वाफेतून देखील किरणोत्सर्ग बाहेर येत होता. काही काळ वारा हा पूर्वेकडे म्हणजे सागरात वहात असल्याने ते प्रमाण कमी झाले होते...

ती आता कदाचित फार मोठ्या प्रमाणात बाहेर पडणार नाहीत आणि पडली तरी त्यांची तीव्रता चेर्नोबिलच्या मानाने कमी राहील असा अंदाज जपानच्या अधिकृत गोटातून व्यक्त गेला जात आहे.

सुरवातीस सीएनएन, एनबीसी आणि इतर सतत चेर्नोबिलशी तुलना करत होते. एका एम आय टी च्या अणूशास्त्रज्ञ/प्राध्यापकाची मुलाखत घेत असताना त्याने संयम ठेवत पण काहीसे वैतागून सांगितले की ह्याची तुलना चेर्नोबिलशी करू नका. हा प्रकार थ्री माईल आयलंड प्रमाणे आहे. तेंव्हा ऐकल्याप्रमाणे एकूण इंधन का जे काही शिल्लक होऊन हा अपघात होत आहे, ते एकूण क्षमतेच्या १ टक्क्याहून कमी आहे. शिवाय एकूणच अपघात टाळू शकत नसले तरी त्याला कंट्रोल करत, त्याचा वेग कमी करत ठेवला गेला आहे.

बाकी अजून एक प्रश्न सतत भेडसावत आहे. अशा अतिधोकादायक ठिकाणी काही तज्ञ आणि कर्मचारी अजूनही कसे राहून काम करत आहेत? त्यांचे किरणोत्सर्गाला किती एक्स्पोजर झाले असेल. त्यांचे खरेच कौतूक करावेसे वाटते....

डिझास्टर म्यानेजमेंट

लेख खूप माहितीपूर्ण व संग्रही ठेवण्याजोगा आहे. आवडला.

जापानमधे भुकंप व त्सुनामीची शक्यता अधिक असतांना त्यांनी सगळ्या शक्यता गृहीत धरुन तेथील डिझास्टर म्यानेजमेंट केले असावे असा कयास होता. पण तो तेथील घडामोडी पाहता, कोठेतरी कमतरता राहून गेली असावी असे म्हणता येते.

अचूक असणे शक्य नसते

पण तो तेथील घडामोडी पाहता, कोठेतरी कमतरता राहून गेली असावी असे म्हणता येते.

आपद्कालीन व्यवस्थापनात अचूक असणे शक्य नसते. पण तसे प्लॅनिंग केलेले असले की बर्‍याचशा गोष्टी सुखरूप होतात. अपवादात्मक अपघात/घातपात सोडल्यास सर्व आटोक्यात राहू शकते...

शीतयुद्धाच्या काळात अणूस्फोटासंदर्भात, तसे घडल्यास जनतेने कसे वागावे याची एक रोचक चित्रपुस्तिका मी एकदा पाहीली होती. त्याची माहिती त्यावेळेस सर्व जनतेला होती. त्याचा फायदा थ्री माईल आयलंड च्या अपघाताच्या वेळेस झाला. जपान मधे पण भूकंपाचे शिक्षण सर्वांना असल्याने अनेक जण त्यातून वाचू शकले. अगदी लहान मुले पण शाळेत व्यवस्थित टेबलाखाली बसली. माझा एक भारतीय मित्र भारतात कामानिमित्त आला होता पण बायको-मुले टोकीयोतच होती. रात्रभर बायको एकीकडे आणि मुले एकीकडे (शाळेत) पण सुदैवाने सर्व दुसर्‍या दिवशी सुखरूप घरी आले. पण हे होऊ शकले कारण तसे शिक्षण दिलेले होते म्हणून. मात्र त्सुनामीच्या वेगाने ज्या गोष्टी काही भागात झाल्या त्यातून बरेचसे हाताबाहेर गेले आणि ते अपवादात्मक होते.

थोडे अवांतरः

९/११ च्या आधी २००० सालात अमेरिकेत "वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन" चा कुठे कसा वापर होऊ शकतो, का होऊ शकतो, कुठले शस्त्र वगैरेचा डिटेल सर्वे केला गेला होता. त्यात न्युयॉर्कच्या आपद्कालीन व्यवस्थापन समितीच्या अधिकार्‍यांनी जी ठिकाणे सांगितली होती त्यात तीन प्रामुख्याने होती: "वर्ल्ड ट्रेड सेंटर, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि एम्पायर स्टेट बिल्डींग."कसे? "तर विमानाची धडक बसून! " म्हणजे कल्पना होती, थोडीफार तयारी देखील होती पण नक्की काय करता येणे शक्य नसल्याने ते तसेच नशिबाच्या हवाली सोडण्यात आले... मात्र त्यातूनही जे काही शिकले गेले त्याचा उपयोग नंतर "करेक्टीव्ह ऍक्शन्ससाठी" करण्यात आला...

पुष्टी

मुंबईतील २६ जुलैच्या पावसानंतर काही कंपन्यांची ऑफिसे पाण्यात गेली व कॉम्पुटर सर्व्हर पाण्यात बुडाले होते. ते टाळण्यासाठी हल्ली पनवेल / आसपास एक ब्याकअप सेंटर (बीपीसी) उभे करण्याचा निर्णय अनेक कंपन्यांनी घेतला. काहीनी इतर शहरांना पसंती दिली. वर्ल्डसेंटरच्या हल्ल्यानंतर अशाच ब्याकअप सेंटरमुळे तेथील कंपन्यांनी त्यांचे काम काही तासांतच सुरळीत केल्याच्या घटना ऐकल्या आहेत. त्सुनामी सारख्या लाटेचा संहार-उपद्रव क्षमता ५ वर्षांपुर्वीच माहीती झाली होती. असे असतांना पुरेसे डीझास्टर म्यानेजमेंट प्लानिंग केले नव्हते असे म्हणण्यास पुष्टी मिळते. पण माझे मत एकांगी असु शकते.

सुरूच होऊ शकले नाहीत...

खाली एका प्रतिसादात आनंद घारे म्हणतात, "फुकुशिमामध्ये झालेला भूकंप आणि आलेली त्सुनामीची लाट यामध्ये विजेचे खांब पडून वाहून गेले आणि डिझेलजनरेटर्सचे अतोनात नुकसान झाल्यामुळे ते सुरूच होऊ शकले नाहीत." अशाच प्रकारच्या तृट्या तेथे राहून गेल्या होत्या व त्सुनामीचा सामना करण्याची तयारी त्याठिकाणी नव्हती.

उत्तम

अगदी वेळेवर लेख टाकलात. मराठीतून हे सगळं वाचताना बरं वाटलं.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

+१

सुंदर आढावा घेतला आहे. ज्ञानात बरीच भर पडली. धन्यवाद!

लेख आवडला

बातम्यांमधून सगळी माहिती मिळत नाही. त्यात कधीकधी सीएनएन वगैरे काहीतरी सनसनाटी व्हावे, यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेले असतात का काय अशी शंका येते. त्या पार्श्वभूमीवर हा माहितीपूर्ण लेख फार सोप्या शब्दांत मांडला आहे.

धन्यवाद..

असेच

म्हणतो. सोप्या शब्दात समयोचित लेख. धन्यवाद.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

न्युयोर्क टाईम्स

न्युयोर्क टाईम्स मध्ये या बद्दल अतिशय विस्तृत आणि सचित्र माहिती येत आहे. त्यावरून या प्रकरणाचे गांभीर्य कळत आहे. या घटनेला सामान्य ठरवण्याचा वरील लेखाचा एकंदर रोख पाहता लोकांनी न्युयोक टाईम्स मधली बातमी वाचणेच जास्त योग्य ठरेल..
मराठीमाणूस

काहीसा सहमत

वरील लेख उत्तम माहिती देतो आहे.
विवेचनही योग्य आहे. तांत्रिक माहिती वाचनीय आहे. परंतु ही माहिती योग्यच आहे यासाठी संदर्भांचे दुवे दिले तर तर त्याची उपयुक्तता वाढेल असे वाटते. अणु बाँब आणि उर्जा प्रकल्प यातला फरक फारच थोडा आहे.
पण तरीही ही घटना फार मोठी नाही आणि आवाक्यातली आहे असा काहीसा सूर लेखातून दिसून येत आहे.
या घटनेला सामान्य ठरवण्याचा वरील लेखाचा एकंदर रोख पाहता यांच्याशी सहमत आहे. ही प्रक्रिया कधीच १००% सुरक्षित नव्हती आणि नाही हेच यातून सिद्ध होते असे मला वाटते. इतकेच नव्हे या उर्जेच्या नादापाई तयार झालेला आण्विक कचरा ही समस्या नंतरही (हजार वर्षे?) शिल्लक राहतेच.
याच वेळी अमेरिका, फ्रान्स आदी (अणुभट्ट्या बनवणार्‍या?) बहुतेक सर्व देशांनी त्यांच्या नागरिकांना त्वरित जपान सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत हे घटनेचे गांभीर्य सुचवत नाही का?
जगभर दर्जा विषयक मापदंड असलेला प्रगत जपान जर अणु आपत्ती व्यवस्थित नियंत्रित करू शकत नाही, तर इतरांचे त्यापुढे काय?
या आठवड्यात द एज या वार्तापत्रात वाचलेल्या बातम्यांनुसार -

  • चीन ने आपला आपला अणुउर्जा कार्यक्रम आहे तेथेच स्थगित केला आहे.
  • ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी अणुउर्जा हा पर्याय न वापरण्याचे घोषित केले आहे.
  • जर्मनीच्या अध्यक्षांनीही असेच म्हंटले आहे.
  • भारताच्या पंतप्रधानांनी सर्व अणुप्रकल्पांची सुरक्षा तपासण्याचे आदेश दिले आहेत.
  • बहुतेक गुंतवणुकदारांनी पैसे काढून घेतल्याने युरेनियमच्या कंपन्यांचे शेयर्सचे भाव गडगडले आहेत.

असे येथील वार्तापत्रांच्या लेखातून आलेल्या माहितीनुसार समजले.
-निनाद

सहमत

निनादच्या निरीक्षणाशी सहमत.

रेडिएशन अमेरिकेपर्यंत पोहोचणार अशाही बातम्या आहेत. मुख्य रिऍक्टर बंद केल्यावर नुसत्या गॅसच्या शेगडीच्या धगीने एवढा हल्लकल्लोळ होत असेल तर् एखादा रिऍक्टर फुटला तर् काय दशा होईल?

भारतात नकली पायलट विमाने उडवू शकतात तर अणुप्रकल्पावर क्रॅशलँडिंगही होऊ शकते.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

काहीसा कोड्यात

घटना गंभीर नाही, असे लेखात म्हटले आहे, असे वरील दोन प्रतिसादकांना काय म्हणून वाटले?

समजा
० गांभीर्य = केळ्याच्या सालीवरून घसरून पडण्याआधी तोल सावरणे
आणि
१०० गांभीर्य = हायड्रोजन बाँबाचा आणि डर्टी-फिशन बाँबाचा एकत्र स्फोट

अशी रेंज घेतली तर वरील लेखात गांभीर्य किती जाणवते आहे? तुमच्या मते गांभीर्याचे सुयोग्य गुणांकन किती असावे?

# चीन ने आपला आपला अणुउर्जा कार्यक्रम आहे तेथेच स्थगित केला आहे.

चीनने चालू अणुभट्ट्या बंद केल्या आहेत काय? किंवा जर्मनीने, किंवा ऑस्ट्रेलियाने?
मागे मिनेसोटा मधील "ट्रस कन्स्ट्रक्शन" या प्रकारचा एक पूल कोसळला होता. मला वाटते, की अशा बांधणीचे पूल बांधणे आता स्थगित झाले आहे. अशा बांधणीचे जे पूल अस्तित्वात आहेत, त्यांची या अपघातानंतर काळजीपूर्वक तपासणी केली गेली. या तपासण्यांच्या नंतर पैकी काही पूल पुन्हा खुले करण्यात आले. या घटनाक्रमातून "ट्रस बांधणीच्या पुलांचे धोके गंभीर/आवाक्यात" यांच्यापैकी काय म्हणून दिसून येते?

बहुतेक गुंतवणुकदारांनी पैसे काढून घेतल्याने युरेनियमच्या कंपन्यांचे शेयर्सचे भाव गडगडले आहेत.

मला वाटते की स्टॉक बाजार हा थोड्या दीर्घ मुदतीच्या गणिताने बघितला पाहिजे. इतके गडगडणे आणि चढणे गेल्या १० वर्षांत बरेचदा झालेले आहे.

हे रियो टिंटो कंपनीचे स्टॉक :
http://www.google.com/finance?q=NYSE%3ARIO
हे कॅमेको कंपनीचे स्टॉक :
http://www.google.com/finance?q=CCO.TO

येथे यू.एस स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवासी सूचना :
३४ देशांसाठी.

जपानबद्दल म्हणतात :
- अणुभट्टीपासून ८० किमी पर्यंत असल्यास त्या क्षेत्राबाहेर निघावे
- प्रवास काळजीपूर्वक करावा
- यूएस सरकारी नोकरांच्या कुटुंबीयांना स्वतःहून जपान सोडायचे असेल तर मदत मिळेल

इजिप्तबद्दल काय म्हणतात त्याच्याशी तुलना करावी :
- निदर्शने टाळावी
- निकडीचा नसलेला प्रवास पुढे ढकलावा
- यूएस सरकारी नोकरांच्या कुटुंबीयांना परत आणले

- - -

येथे शब्दात पकडायची इच्छा नाही. पण सुयोग्य गांभीर्य वाटल्यास अशी कोणची कृती आपण करू जी या लेखाच्या कमी गांभीर्यामुळे वेगळी करायचा मोह होईल?
जपानमधील अणुभट्टीची दुर्घटना "आवाक्याबाहेर" आहे हे पटल्यास कुठली महत्त्वाची कृती करावी (आणि वरील लेखामुळे ती "आवाक्यात" असल्याचा गैरसमज झाल्यामुळे कृती होणार नाही?)

आणि असा क्रियाशील फरक जर नसेल, तर गांभीर्याचा मुद्दा मला समजलेलाच नाही.

गांभीर्यपट्टी

हैड्रोजनवायूच्या या स्फोटांमुळे रिअॅक्टरबिल्डिंगचे छप्पर उडाले असले, बाह्य भिंती पडल्या असल्या तरी आतल्या बिल्डिंग शाबूत आहेत. मुख्य म्हणजे ज्या रिअॅक्टर व्हेसल्समध्ये सर्व किरणोत्सर्गी द्रव्ये बंद असतात, त्यांना अजून गंभीर धोका पोचलेला नाही. तसेच त्याच्या सभोवार असलेले मजबूत कंटेनमेंटसुध्दा जवळजवळ अभंग राहिले आहे. पण कोणत्याही क्षणी त्यामधून भरपूर विकीरण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून वीस किलोमीटर्स परीघामधील सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षित जागी नेण्यात आले आहे.

घटना गंभीर नाही असे म्हणायचे नसावे. परंतु चेर्नोबिल घटना आण्विक दुर्घटना स्केलवर ७/७ स्केलची आहे असे म्हणतात आणि जपान ६/७. ते का हे ह्या लेखामुळे कळाले असे म्हणायला हरकत नाही.

०-१०० च्या स्केलवर जपान दुर्घटना ८५ च्या आसपास होते.

लेखातल्या खालील शक्यता सत्यात आल्या तर ८५ चे १०० होईल. या गोष्टी क्लिअर होत नाहीत तोवर चेर्नोबिलच्या तुलनेत किंवा १०० च्या तुलनेत ही घटना ८५ गंभीर किंवा अतीगंभीरपेक्षा कमी गंभीर आहे असे म्हणायला हरकत नाही.

जर रिअॅक्टरमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी जाऊन ते त्याला थंड करू शकले नाहीच तर इंधनाच्या छड्या अधिकाधिक गरम होत जातील. त्यांचा 'मेल्टिंग पॉइंट' गाठला गेल्यास त्या वितळून खाली पडतील. याला 'कोअर मेल्ट़डाऊन' असे म्हणतात. फुकुशिमा येथील तीनही रिअॅक्टर्समध्ये काही प्रमाणात मेल्टडाऊन झाले असावे अशी शंका आहे. रिअॅक्टरच्या आत नक्की काय चालले आहे ते आज कळण्याचा मार्ग नाही. आपण फक्त त्याचे बाह्य दुष्परिणाम पाहू शकतो आणि त्यांचे मोजमाप घेऊ शकतो. अशा वितळलेल्या धातूंच्या रसामुळे रिअॅक्टर व्हेसलचे सहासात इंच जाडीचे पात्रसुध्दा वितळू लागले तर कदाचित ते फुटेल किंवा त्याच्या तळाला भोक पडून त्यामधून आतले बरेचसे रेडिओअॅक्टिव्ह पदार्थ बाहेर पडतील. त्यातले बरेचसे पदार्थ कंटेनमेंटमध्येच बंदिस्त राहतील अशी अपेक्षा आहे. रिअॅक्टर बिल्डिंगचेच छप्पर उडालेले असल्यामुळे कंटेनमेंटमधून बाहेर पडलेले वायुरूप पदार्थ हवेत मिसळून जगभर पसरतील आणि द्रवरूप पदार्थ जमीनीत शिरून भूगर्भात पसरतील. घनरूप पदार्थ तेवढे तिथेच राहतील. तिथे अॅटमबाँबचा स्फोट मात्र होणार नाही.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

अंधश्रद्धा का सावधपणा? :-)

या आठवड्यात द एज या वार्तापत्रात वाचलेल्या बातम्यांनुसार - * चीन ने आपला आपला अणुउर्जा कार्यक्रम आहे तेथेच स्थगित केला आहे......* बहुतेक गुंतवणुकदारांनी पैसे काढून घेतल्याने युरेनियमच्या कंपन्यांचे शेयर्सचे भाव गडगडले आहेत.

हे वाचत असताना, लोकल दुर्घटनेनंतर दुसर्‍या दिवशी त्याच ठरावीक वेळच्या त्याच ठरावीक लोकलने जायचे टाळणारी मनोवृत्ती आठवली. ९/११ नंतर (विमाने सुरू झाल्यावर आणि सुरक्षाव्यवस्था कडक झाल्यावरही) बरेच दिवस अनेक जण विमानाने प्रवास करायचे टाळायचे. अमेरिकन एअरलाईनने तर "फ्लाईट ११" बंदच करून टाकली... आता हे ती दुर्दैवी आठवण नको म्हणून म्हणणे समजू शकते आणि योग्य देखील वाटते. तरी देखील हे काही मूळ समस्येला उत्तर होत नाही.

त्या संदर्भात चीन (स्थगिती) आणि भारताने (तपासणी) घेतलेला निर्णय योग्य वाटतो. कदाचीत सुधारीत इंजिनियरींग डिझाईन लागेल, सुरक्षायंत्रणा अत्याधुनिक करावी लागेल, त्यात इनोवेशन्स लागतील वगैरे सर्व मान्य आहे आणि ते सर्व केले तरी १००% जरी सर्व सुरक्षित करता आले नाही तरी सुरक्षेची हमी नक्कीच वाढू शकते असे वाटते.

बाकी अणुशक्तीच्या संदर्भात मला अणुकचर्‍यापेक्षा, आपल्या देशाकरता, भ्रष्टाचाराने पोखरलेल्या यंत्रणा आणि माजलेले खाजगी क्षेत्र यांच्या संगनमतामुळे, त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबद्दल शंका मनात रहाते आणि हा सर्वात मोठा धोका वाटतो.

काहीसा असहमत

>>बाकी अणुशक्तीच्या संदर्भात मला अणुकचर्‍यापेक्षा, आपल्या देशाकरता, भ्रष्टाचाराने पोखरलेल्या यंत्रणा आणि माजलेले खाजगी क्षेत्र यांच्या संगनमतामुळे, त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबद्दल शंका मनात रहाते आणि हा सर्वात मोठा धोका वाटतो.

भ्रष्टाचारने पोखरलेल्या यंत्रणा सर्वच देशात असतात.
भ्रष्ट नियामक यंत्रणांचा सहभाग असला तरी मूळ दोष 'भारतात आपल्याच कंपनीत सुरक्षेच्या यंत्रणांत कपात करून पैसे वाचवावे' असा विचार मनात आणणार्‍या कंपन्यांचा आहे. आणि तसा विचार कंपन्या करतात हे भोपाळमध्ये दिसले आहे.

@धनंजय: सध्याची घटना गंभीर नाही असे आनंद घारे यांना म्हणायचे असावे असा विचार प्रतिसादकांच्या मनात येण्याचे कारण माझ्यामते "स्फोट हायड्रोजन वायूचा झाला आहे-अण्विक नव्हे" अशा प्रतिपादनामुळे आला.

नितिन थत्ते

कारण

भ्रष्ट नियामक यंत्रणांचा सहभाग असला तरी मूळ दोष 'भारतात आपल्याच कंपनीत सुरक्षेच्या यंत्रणांत कपात करून पैसे वाचवावे' असा विचार मनात आणणार्‍या कंपन्यांचा आहे. आणि तसा विचार कंपन्या करतात हे भोपाळमध्ये दिसले आहे.

वाक्याशी सहमत. म्हणूनच त्यातून निघणारा अर्थ हा परत भ्रष्टाचाराकडे वळतो. प्रगत राष्ट्रात असे का होत नाही? कारण सुरक्षेसाठीचे पैसे हे इतरत्र वळवावे लागत नाहीत. अवांतर उदाहरणः मॅसॅच्युसेट्स मध्ये मला वाटते सरकारी अधिकार्‍याला $५० पेक्षा अधिक हे कुठल्याही फॉर्मॅट मध्ये दिले तर ते नियमबाह्य आहे... तसेच एखाद्या सरकारी अधिकार्‍यास कोणी सामान्याने विशिष्ठ कामासाठी तज्ञ अथवा चांगली कंपनी सांगायला सांगितली तर किमान दोन नावे सांगणे महत्वाचे असते नाहीतर तो फेव्हरेटीजम् धरला जाऊ शकतो...

भारतातदेखील कुठल्याही कंपनीला जेंव्हा सरकार कंत्राट देते तेंव्हा ते तपासण्यासाठी एक सरकारी (त्या क्षेत्रातील माहीतगार) अधिकारी/विभाग असतो. हे अगदी खडी आणि काँक्रीट अथवा डांबर टाकून केल्या जाणार्‍या रस्त्यांच्या बाबतीतही असते. तरी देखील कधी कधी एकाच पायवाटेवर दरवर्षी रस्ते बांधले जातात आणि तरी देखील पायवाट तशीच रहाते. (आता इतके करणे अवघड असेल, पण हे प्रकार पुर्वी घडले आहेत). असे कंत्राटदार-कंपन्या का करू शकतात कारण त्यांनी तोंडे बंद केली असतात. कधी कधी अधिकार्‍यांची आणि नेहमीच राजकारण्यांची.

मग शेवटी एखादा प्रामाणिक अडकवला जातो... मला एकदम अनेक वर्षांपुर्वी वाचलेल्या अनील बर्व्यांच्या "अकरा कोटी गॅलन पाणी" या पुस्तकाची आणि त्यातील शेवट्च्या ओळीची आठवण झाली: "बिच्चारा स्वामी!" (स्वामी हे आडनाव आहे, नाहीतर चर्चा भलतीकडेच जायची!)

अवांतर

अकरा कोटी गॅलन पाणी हे तेव्हा अस्वस्थ करून गेले होते. अजूनही स्वामी कुठे तरी दिसतो तेव्हा करतेच. :(
-निनाद

माहितीपुर्ण लेख

समायोचित व माहितीपुर्ण लेख.

विशेषतः मराठीतून लिहिल्याने विषय समजायला मदत झाली.

अभिज्ञ.

सामान्य नाहीच

ही घटना सामान्य आहे असे माझ्या लेखात कोठेही लिहिलेले नाही. हे घटना भीषण आहे यात शंकाच नाही. पण अणुशक्ती विद्युत्केंद्रातला हैड्रोजन वायूचा स्फोट हा आण्विक स्फोटाच्या मानाने अत्यंत कमी शक्तीशाली असतो . त्याची तुलना अणूबाँबशी करू नये हे मी या लेखात लिहिले आहे.
या केंद्रात पाण्याखाली साठवलेल्या स्पेंट फ्युएलच्या साठ्यामधील पाणी कमी झाले, शिवाय त्या भागात आग लागली या नव्या घटना गेल्या दोन दिवसात समोर आल्या आहेत. त्यांचे निवारण करण्यासाठी हॅलिकॉप्टरमधून पाण्याची फवारणी करण्यात येत आहे.

जपानमधील घटनाक्रमाने पोळलेल्या एका जपानी महिलेने काढलेले हृदयद्रावक उद्गार असे आहेत, "सुनामीत माझे घरदार वाहून गेले आहे आणि आता हे लोक सांगताहेत की घराबाहेर पडू नका"

लक्षात आले

पण अणुशक्ती विद्युत्केंद्रातला हैड्रोजन वायूचा स्फोट हा आण्विक स्फोटाच्या मानाने अत्यंत कमी शक्तीशाली असतो . त्याची तुलना अणूबाँबशी करू नये हे मी या लेखात लिहिले आहे. हे लक्षात आले :) गैरसमज नसावा.
-निनाद

लेख आवडला.

माहीतीपूर्ण लेख.

तसेच फुकुशिमाच्या ५० वीरांना शुभेच्छा

लेख आवडला.

लेख आवडला. ऊर्जेच्या सतत वाढत्या गरजेमुळे अणुऊर्जेसारखा धोकादायक मार्ग स्विकारावा लागणे अनिवार्य झाले आहे. दुसरीकडे त्याला पर्याय म्हणून पुढे येणारे सौरऊर्जेसारखे मार्ग अजूनही प्रायोगिकच आहेत. त्यामुळे अणुऊर्जेस सध्यातरी पर्याय नाही. हा मार्ग अजून किती काळ स्विकारावा लागणार? असा यक्षप्रश्न आहे.

नेमका काय फरक

लेख आवडला.
जपानच्या व भारताच्या अणुशक्ती वीजकेंद्रात नेमका काय फरक आहे ? अस वाचल होत की अश्या आपत्तीच्या ही वेळी भारतात ली केंद्रे सुरक्षीत् असतील.
जापनीज डिझाइनस या सुरक्षीततेच्या बाबतीत तडजोड केलेल्या असतात का?

लेख खूप आवडला

अतिशय सोप्या भाषेत, तांत्रिक शब्द न वापरता एकंदरीत समस्येचा आढावा घेतलेला आवडला. अणुऊर्जा, रेडिएशन वगैरे शब्दांचीदेखील लोकांना भीती वाटते. एकंदरीत इतिहास बघता अणुऊर्जेइतकी स्वच्छ व सुरक्षित ऊर्जा दुसरी कुठची नाही असा प्रभावी युक्तीवाद करणारा लेख वाचल्याचं आठवतं. पण एक विमान कोसळलं की त्याची प्रचंड मोठी बातमी होते, पण कारचे अपघात रोजच होत असतात त्यामुळे त्याचं काही वाटत नाही तसं काहीसं आहे.

हा लेख वाचून एकंदरीत परिस्थिती काय आहे याची कल्पना यायला मदत झाली. धनंजय यांनी क्रियाशील फरक विचारला आहे, त्याला काळजी कमी होणे हे पुरेसं उत्तर वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

तसं नाही

>>पण एक विमान कोसळलं की त्याची प्रचंड मोठी बातमी होते, पण कारचे अपघात रोजच होत असतात त्यामुळे त्याचं काही वाटत नाही तसं काहीसं आहे.

नुसतं तेवढंच नसतं. विमानाच्या अपघातातून जिवंत राहण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते. म्हणून बातमी मोठी असते. किती मेले हे सांगायला वेळ लागत नाही. (मृतांची संख्या = प्रवाशांची संख्या + कर्मचार्‍यांची संख्या).

तसंच डिझेलच्या टाकीला आग लागली किंवा स्फोट झाला तर परिणाम ७-८ दिवस टिकणारे आणि स्थानिक असतात. अणुभट्टीत स्फोट झाल्यावर परिणाम दीर्घकालीन + दूरगामी असतात. म्हणून भीती जास्त.

नितिन थत्ते

अणुभट्टी थंड करण्याची आणीबाणीची सोय अणुभट्ट्यांत असते का?

प्रिय आनंद,
सुंदर आणि समयोचित लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. लेख छानच झाला आहे. या आधी या अणुशक्तीकेंद्रांबद्दल Metals in the service of Man या पुस्तकातील माहिती पुसट-पुसट आठवली. दुर्दैवाने ती माहिती नीट आठवत नाहीं. पण जे थोडेफार आठवते आहे ते लिहितो. चूक असल्यास क्षमस्व.
(१) पहिली गोष्ट आठवते ती ही कीं हे शुद्धीकृत युरेनियमचे रॉड्स जेंव्हां वर खेचले जातात तेंव्हां उष्णतानिर्मिती होते. कांहींही कारणाने ते भट्टीत पडल्यास ही अणुशक्तीप्रक्रिया आपोआप बंद पडते. म्हणजे ही एक तर्‍हेची Fail safe योजना मानली जाते. मला हे जे आठवते आहे ते बरोबर आहे कां?

(२) कांहीं (कु)शंका.
गरम वातावरण आणि त्या गरम गोष्टीला थंड करणे हे सर्व आमच्या पोलाद निर्मितीत रोजचेच आहे. आज Continuous casting of steel मध्ये प्रचंड दाबाखालील (६ ते ७ बार) पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने (प्रति मिनिटाला १२०० लिटर्स) ६ ते २० मिमि जाडीच्या तांब्याच्या साच्यात (Mould tube) वितळलेले पोलाद (१६२० डि. सेल्सियस) ओतले जाते आणि ६०० मिमि प्रवासानंतर ते घन स्वरूपाची साल (Solidifies shell) बनलेल्या परिस्थितीत बाहेर येते. जर पंप व्यवस्था बंद पडली तर हे पोलाद क्षणात तांब्याच्या साच्याला छिद्र पाडू शकते आणि त्यातून पाणी बाहेर येऊन पोलादाबरोबर मिसळल्यामुळे स्फोट होऊन समोर उभे असलेल्या कामगाराला वा सुपरवायजरला इजा करू शकते. मग या माणसांना वाचविण्यासाठी काय केले जाते?
गुरुत्वाकर्षणाचा उपयोग केला जातो. आधीपासूनच पुरेशा उंचीवरील टाकीत पाणी साठविलेले असते आणि वीज बंद पडताक्षणी किंवा पाण्याचा दाब कमी होता क्षणी Non-return valve च्या सहाय्याने हे साठविलेले पाणी तांब्याच्या साच्यात सोडले जाते व दुर्घटना टळते. आजही वर्षाकाठी २-३ वेळा PLN कडून (इंडोनेशियातले MSEB चे रूप) वीजप्रवाह खंडित झाल्यामुळे असा प्रसंग येतो. पण मी काम करत असलेल्या कुठल्याच कंपनीत कुठलीही गंभीर दुर्घटना कधीच झालेली नाहीं.
अणुशक्ती केंद्रांत अशी व्यवस्था असते का? नसल्यास ही कॢप्ती वापरून अणुभट्टी थंड ठेवता येईल कां? अर्थात् या भट्ट्या डिझाईन करणारे तंत्रज्ञ नक्कीच अनुभवी असणारच, पण एक शंका आली म्हणून लिहीत आहे.
आज-काल तर आमच्या पोलाद वितळविण्याच्या भट्टींत ७० टक्के Brick-lining चा भाग Water-cooled panels नी व्यापलेला असतो. ही पॅनेल्स पाणी असेतोवर 'शेर' असतात आणि पाणी बंद पडताच 'म्याँव' होतात. यांनाही असेच उंचीवर साठविलेल्या पाण्याच्या सहाय्याने थंड ठेवले जाते.
हे सारे अणुभट्टीतही होतच असेल. कारण ही व्यवस्था मी गेली ४५ वर्षे पहात आलो आहे व ती Modern technology मुळीच नाहीं. तर अशी कांही Emergency cooling arrangement अणुभट्ट्यांत असते का?
सविस्तर खुलासा केल्यास आभारी होईन.
(सगळ्यात चांगली व्यवस्था माझ्या पहिल्याच कंपनीत-मुकुंदमध्ये- दस्तूर कंपनीने योजलेली होती. तिथे १०० टक्के पाणी Overhead tank मध्ये पंप केले जाई व तिथून गुरुत्वाकर्षणाच्या सहय्याने वेळेवर Emergency cooling arrangement द्वारा मिळे. अणुभट्टीत ही टाकी पुरेशी दूर ठेवता येईल व तेथील वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची रिपेरीही सहज व कामगारांना धोक्यात न घालता करता येईल. कुणाला इंटरेस्ट असल्यास मी त्याची आकृतीही (Flow diagram) काढून इथे डकवू शकेन!)
कांहीं चुकले असल्यास क्षमस्व!
___________
जकार्तावाले काळे

पर्यायी व्यवस्था

सुधीर,
तुझ्या तपशीलवार पत्राला तसेच उत्तर देत आहे.
१.बहुतेक पॉवर स्टेशन्समधले युरेनियमचे फ्यूएल रॉड भट्टी चालू असतांना जागचे हलत नाहीत. आम्ही बनवतो त्या PHWR रिअॅक्टरमध्ये मात्र आम्ही फ्युएलिंग मशीनच्या सहाय्याने नव्या फ्यूएलला हळू हळू भट्टीत घालतो व जुन्या झालेल्या इंधनाला बाहेर काढतो. तसेच काही प्रकारच्य़ा रिसर्च रिअॅक्टरमध्ये फ्यूएल रॉड्सना हलवण्याची योजना असू शकते.
कॅड्मियम, बोरॉन, कोबाल्ट, गॅडोलिनियम आदि काही धातू न्यूट्रॉन्सचे वैरी आहेत. सर्व प्रकारच्या रिअॅक्टर्समध्ये त्यांचे रॉड रिअॅक्टरच्या डोक्यावर टांगून ठेवलेले असतात. कसल्याही प्रकारच्या धोक्याची किंचित सूचना मिळताच ते धाडकन खाली येतात आणि न्यूक्लिअर फिशनची प्रक्रिया थांबवतात. फुकुशिमामध्येसुध्दा त्यांनी आपले काम चोख केले होते.
२. फिशनची क्रिया बंद पडल्यानंतर युरेनियममधून ऊष्णता मिळणे थांबते. पण आधी होऊन गेलेल्या फिशनमधून क्रिप्टॉन, झेनॉन, सीजियम, आयोडिन वगैरे फिशन फ्रॅग्मेंट्स तयार होऊन साठलेली असतात. त्यांच्यामधून अल्फाबीटागॅमा प्रकारचे किरण बाहेर पडतच राहतात, त्यांच्यासोबत ऊष्णता बाहेर पडत राहते. निखारे विझले तरी राखेमधूनच ऊष्णता निघत रहावी असा हा प्रकार आहे. हजार मेगावॉट इलेक्ट्रिकल कपॅसिटी असलेल्या स्टेशनमध्ये ते चालले असतांना तीन हजार मेगावॉट इतकी ऊष्णता निघत असते. त्याच्या अगदी १-२ टक्के म्हंटले तरी तीसचाळीस मेगावॉट एवढा मोठा हा आकडा असतो. याला डिकेहीट म्हणतात.
प्रत्येक स्टेशनमध्ये डिकेहीटरिमूव्हल सिस्टम असतेच आणि ती अत्यंत खात्रीलायक असते. तापलेल्या लोखंडामध्ये त्याचे वजन गुणिले तपमान गुणिले स्पेसिफिक हीट एवढी एन्थाल्पी असते. ती शोषून घेऊन त्याला थंड करण्यासाठी किती पाणी लागेल याचे गणित मांडून त्याची व्यवस्था करता येते. त्याच प्रमाणे रिअॅक्टरला थंड करण्यासाठी पर्यायी पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत तग धरता येईल एवढे पाणी डोक्यावरील टाकीत साठवलेले असते आणि ते इमर्जन्सी कोअरकूलिंग सिस्टिममधून रिअॅक्टरमध्ये येते. लोखंड एकदा निवले की थंडच राहते, त्याच्या पोटात हीटसोक्स असत नाही. पण फिशनफ्रॅग्मेंट्समधून मात्र डिकेहीट तयार होऊन ती बाहेर येतच राहते आणि तिला रिअॅक्टरच्या बाहेर काढण्यासाठी पाण्याच्या पर्यायी पुरवठ्याची योजना असावी लागते. त्यासाठी एका मागे एक अशा बॅकअप सिस्टिम्स असतात आणि क्रमाक्रमाने त्या कार्यान्वित होतात. त्यासाठी पाणी कोठून येणार, ते कोणत्या मार्गाने जाणार वगैरे सर्व ठरलेले असते आणि त्यात काही अडथळा आला तर त्याचे पर्यायसुध्दा ठरलेले असतात. पण पाण्याचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी पंपांची गरज असते आणि त्यांना चालवण्यासाठी विजेची किंवा निदान डिझेल इंजिनांची आवश्यकता असते.
काही नव्या प्रकारच्या रिअॅक्टर्समध्ये पाण्याने भरलेले अगडबंब ओव्हरहेड टँकसुध्दा आहेत. फुकुशिमाला ते नसावेत. असे टँक असणे हे भूकंपाच्या दृष्टीने पाहता बिल्डिंगला धोकादायक ठरते.
फुकुशिमामध्ये झालेला भूकंप आणि आलेली त्सुनामीची लाट यामध्ये विजेचे खांब पडून वाहून गेले आणि डिझेलजनरेटर्सचे अतोनात नुकसान झाल्यामुळे ते सुरूच होऊ शकले नाहीत. सगळीकडेच हाहाःकार उडालेला असल्यामुळे तातडीने कोणतीच गोष्ट बाहेरून आणणे शक्य नव्हते. रिअॅक्टरमध्ये असलेल्या पाण्याची वाफ होऊन गेल्यावर त्या वाफेचा दाब वाढत होता पण तिला बाहेर सोडण्यात किरणोत्सर्गाचा धोका होता. अखेर ती वाफ हैड्रोजनला सोबत घेऊन बाहेर आलीच आणि त्याचा भयानक स्फोट होऊन बिल्डिंगचे छत उडाले, भिंती कोसळल्या. अखेर काही प्रमाणात किरणोत्सर्ग झालाच.
असल्या परिस्थितीत जिवाची पर्वा न करता आणि माथा शांत ठेऊन जे तंत्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांना कुर्निसात करावा वाटतो.

आणीबाणीसाठी पंपांची व्यवस्था

मला म्हणायचे होते कीं उंचीवरची पाण्याची टाकी आणि त्याचे पंप अणुभट्टीपासून दूर असावेत आणि एकाद्या सोयिस्कर डोंगरावर असावेत. (डेंपो कंपनीच्या गोव्याच्या प्लँटमध्ये -जिथे मी काम केले आहे-अशी टाकी डोंगरावरच होती)
याचे दोन फायदे होतात.
१) अणुभट्टीत कांहीं बिघडल्यास पाणी गुरुत्वाकर्षणाने येते. (पंप ती टाकी भरायला लागतात पण पाणी पंपांशिवायच येते.)
२) शिवाय दूर अंतर असल्याने कामगारांना पंपिंग सिस्टिमची किंवा विजेची रिपेरी करायला सोपे आणि सुरक्षित असते. (अशी सिस्टिम मुकुंदमध्ये होती).
धन्यवाद.
___________
जकार्तावाले काळे

आमची पद्धत

फुकुशिमाबद्दल मला सांगता येणार नाही, पण आमच्या पॉवरस्टेशन्समध्ये केवळ फायर फायटिंगसाठी ठेवलेले पाण्याचे मोठे टँक्स जवळपास टेकडी असल्यास तिच्या माथ्यावर आणि नसल्यास उंच खांबांवर ठेवलेले असतात आणि त्यात साठवलेले पाणी गुरुत्वाकर्षणाने खाली येते. पण मी उत्तरात लिहिल्याप्रमाणे ही व्यवस्था सुद्धा मर्यादित वेळच पुरते. तेवढ्या वेळात दुसरी पर्यायी व्यवस्था कार्यान्वित करावी लागते.

महत्त्वाची माहिती

गर्डिअन पेपर मध्ये ही बातमी आली आहे. इकडे तिकडे शोधलं असता ही एक लिंक मिळाली.

भूकंप आणि सुनामी सोडल्यास पुढचा हाहाकार भ्रष्ट आचारामुळे घडला आहे असे दिसते. सारे एका माळेचे मणी.

झाल

झाल आता, कलीयुगात सगलेच जायचे. ही जापानी सुरुवात झाली पाहा. भोग चुकायचे नाही.
आपला
अण्णा

 
^ वर