पांडेश्वर

Pandeshwar

जेजुरी पासून दहा किलोमीटर अंतरावर पांडेश्वर आहे,महाराष्ट्रातील बहुतेक मंदिरे पांडव कथेशी जोडलेली असतात तसेच या मंदिराविषयी सांगितले जाते ते 'पांडव कालीन किंवा पांडवानी एका रात्रीत मंदिर उभारले असल्याने या क्षेत्राला पांडेश्वर असे म्हणतात' अशी लोकधारणा आहे .या मंदिराला गौरवशाली वारसा आहे या मंदिराचे बांधकाम तब्बल सोळाशे वर्षापूर्वीचे असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मुळचे चैत्यगृह नंतरचे शिखर ,दगडी मुखमंडप ,नदीकाठचा तट लगतच्या ओवा-या ,मराठा कालीन भित्तीचित्रे , रंगकाम आदी बाबींमुळे सोळाशे वर्षातील मंदिर रचनेतील बदलांचा आलेख दर्शवणारा ठेवा म्हणून इतिहास संशोधक व अभ्यासक याकडे पाहतात. भाविक भक्तांसाठी भव्य शिवलिंग तर पर्यटकांसाठी शिल्प व वास्तुरचना यांचे आकर्षण आहे.४३ बाय २३ बाय ७.५ सेंटीमीटर आकारांच्या विटांचे बांधकाम आपणास खूप काही सांगून जाते.मंदिरातील लंबगोलाकृती गाभारा व त्या पुढील गजपृष्ठाकार व आयताकृती छताचा सभा मंडप व जुन्या विटांचा वापर,उत्कृष्ठ गिलावा संशोधकांच्या दृष्टीने मोलाचा ठरला आहे .विटांच्या या प्राचीन वस्तूला चौथ्या शतकात आकार मिळाला असावा तर पुढील जोडकाम सतराव्या किंवा अठराव्या शतकात झाले असावे.दगडी मुख मंडपाच्या बाहेरील पाच फुटी द्वारपालांची शिल्पे तसेच मंडपात २४ व बाहेर २ अशी देकोष्ठ पाहण्यासारखी आहेत.सूर सुंदरी व देवतांची शिल्पेही येथे आहेत जालवातायने,प्रवेश द्वाराच्या मधोमध मंदारक ,भिंतीच्या पायाशी असणारी धर्म-यश नक्षी या सा-या गोष्टी कोरीव लेण्यांसारख्या आहेत.
अधिक माहितीसाठी लॉग इन करा www.jejuri.in
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा....

Comments

स्वागत आहे

उपाध्ये गुरूजी जेजुरी [आपले नाव आवडले. आपण तिथे पुजारी वगैरे आहात काय ? ] देवा तुझी सोन्याची जेजुरी संकेतस्थळ आवडले. आरपार अभिव्यक्तिचं आणि ऐसपैस असे संस्थळाचे रुप दिसते आहे. च्यायला, मी दोनेक वर्षापूर्वी विद्यार्थ्यांची ट्रीप घेऊन गेलो होतो जेजूरीला. लै मजा आली होती. पण हे पांडेश्वर काही पाहण्यात आले नव्हते. मला देवदर्शनाची आवड असल्यामुळे असे लेखन मला वाचायला आवडते. अजून् येऊ द्या. माहितीबद्दल आभारी.

-दिलीप बिरुटे
[धार्मिक]

मस्त

चित्रातील फोटोवरून तरी मंदिर प्रेक्षणीय वाटते. जास्त छायाचित्रे उपक्रमवर टाकली तर बरे होईल. म्हणजे मंदिरातील पुरातन भाग कोणता व मागच्या 100 वर्षात बांधलेला कोणता हेही लगेच कळेल. दक्षिण भारतातील देवळात बर्‍याच वेळा जुन्या सुंदर शिल्पांच्यावर भयानक दिसणार्‍या आधुनिक प्लॅस्टरकामाचे जोड दिलेले दिसतात. त्यामुळे एकूण प्रकरण बेगडी व भयानक दिसते. तसला प्रकार येथे नसेल अशी आशा आहे. उपाध्ये गुरुजी हा आयडी सध्या काही फुटकळ वाहिन्यांच्यावर स्वत:ला राशीतज्ञ म्हणून घेणार्‍या व्यक्तीच्या नावाचा उपहास करण्यासाठी तर घेतले नाही ना? अशी शंका येते. खुलासा झाल्यास बरे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

मंदिर

पहिल्यांदाच पाहिले. जेजूरीला कधी जाणे झाले नाही.
उपाध्ये चांगले सांगतात.
ते येथे असल्यास काही शंका आहेत त्या विचारता येतील.
शिवा

चांगली माहिती

मंदिराबद्दल अधिक विस्तृत माहिती उपलब्ध असल्यास आवडली असती. शक्य असल्यास उपक्रमावरच आणखी प्रकाशचित्रेही टाकावीत.

पांडेश्वर

छायाचित्र आवडले. भेट देण्याच्या स्थळांच्या यादीत नाव टाकत आहे. जेजुरी बद्दलही ऐकले आहे.
पांडेश्वर या नावाने पांडवांचा बोध झाला नाही. कदाचित पांडवेश्वर नाव जास्त योग्य ठरले असते. फोटोत शिखरही दिसत नाही.
तुम्ही चैत्यगृह म्हणता म्हणजे बौद्धांच्या काही खुणा आढळतात का? विटांचा आकार ही वेगळाच आहे. मंदिराच्या आसपास कुठे उत्खनन झाले होते का? इतर ऐतिहासिक माहिती मिळाली तर अजून बरे बाटेल. जेजुरीची ही अशीच माहिती द्या. तुमच्या संकेतस्थळाला भेट दिली. शिलालेख भाग पाहिला. आवडला.

प्रमोद

वा

वा.

अधिक चित्रे या पानावर बघता येतील.

जुन्या बांधकामाची शैली सोळाशे वर्षे नव्हे तर हजार वर्षांपूर्वीची आहे. शिवाय मराठेशाहीत जीर्णोद्धारही झालेला आहे - काही वास्तू त्या काळातल्या आहेत.

अशीच माहिती देत जावी. पुढील प्रवासवर्णनासाठी सुभेच्छा.

जुने व नवे बांधकाम

दुवा उपलब्ध करून दिल्याबद्दल धनंजय यांचे आभार. मी माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या दुव्यावरच्या फोटोतून जुन्या बांधकामाची शैली व ग्रेस नवीन बांधकामात दिसत नाही. नवीन बांधकाम भडक व बेगडी वाटते आहे. जेंव्हा अशा जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला गेला तेंव्हा नवीन बांधकाम जुन्यात मिसळून जाईल याची काळजी न घेतल्याने असे झाले असावे. मंदिराचा दर्शनी फोटो बघून मी हे मंदिर बघण्यासाठी जाण्याचा बेत ठरवत होतो. परंतु या दुव्यावरील फोटो बघितल्यावर माझा उत्साह एकंदरीत बराच कमी झाला.
उपाध्ये गुरुजींना विनंती की जुनी मंदिरे आहेत ती जपा त्याला सिमेंट कॉन्क्रीटची ठिगळे लावू नका. तरच पर्यटक जेजूरीला येतील.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

 
^ वर