चंद्राचा पुष्यनक्षत्रात प्रवेश

चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश
"या ! परवा तुम्ही गुरुपुष्यामृत योगाची बातमी वाचून दाखवली. त्यावर चांगली चर्चा करता आली.आज कोणती बातमी आणली आहे?"
.
"आज बातमी नाही.एक शंका आहे म्हणून आलो.परवा तुम्ही म्हणालात की चंद्र आकाशात
कुठेही असला तरी तो पुष्य नक्षत्रापासून सारख्याच अंतरावर असतो.तो पुष्याच्या जवळही जात नाही.त्यापासून दूरही जात नाही."
.
"हो. ते खरे आहे.सर्वच नक्षत्रांना लागू आहे.इथे नक्षत्र म्हणजे प्रत्यक्ष तारकासमूह.क्रांतिमार्गाचे २७ समान भाग पाडून होणारा (360/27=40/3=) 13.33 अंशाचा अवकाशाचा विशिष्ट पट्टा नव्हे.तसेच नक्षत्रापासून चंद्राचे अंतर म्हणजे त्या नक्षत्रात चंद्राला निकटतम असलेल्या तार्‍यापासून चंद्राचे अंतर.
भिन्न भिन्न तार्‍यांपासून वेगवेगळी अंतरे असणार.त्यांत मोठा फरक असणार.म्हणून किमान अंतर घ्यायचे.ते असो.तुमची शंका काय आहे?"
.
"पुष्य आणि स्वाती या दोन नक्षत्रांत किती अंतर आहे?"
.
"निश्चित माहित नाही. पण कित्येक अब्ज किलोमीटर असावे."
.
"चंद्र रोज नक्षत्र बदलतो. तो पुष्यातून स्वातीत गेला. तरी अजून पुष्यापासून तेव्हढ्याच
अंतरावर आहे?"
.
"हो.चंद्र कुठल्याही नक्षत्रात जात नाही.त्याच्यापासून नक्षत्रे खूप,खूप म्हणजे खूपच दूर
आहेत.तो पृथ्वी भोवती फिरतो.सत्तावीस दिवसांत एक फेरी पूर्ण करतो.पृथ्वी,चंद्र आणि पुष्य एका रेषेत आले की आकाशाच्या पडद्यावर चंद्र पुष्य नक्षत्राच्या तारकापुंज्यात दिसतो.
पुष्याजवळ आला आहे असे भासते. पण तो पुष्यापासून किमान ४०हजार अब्ज कि.मी.दूर असतो.चंद्राची पृथ्विप्रदक्षिणेची कक्षा साधारण सहा लाख किमि.व्यासाची असेल.हे अंतर नगण्यच. म्हणून तो त्या भ्रमण मार्गावर कुठेही असला तरी कोणत्याही नक्षत्रापासून त्याचे अंतर बदलले असे म्हणता येत नाही."
.
"पण चंद्र पृथ्वीसह सूर्याभोवतीही फिरतो ना? "
.
"हो.पृथ्वीपासून सूर्य १५ कोटी किमी दूर आहे. पृथी-चंद्र सूर्या भोवती फिरतात त्या
कक्षेचा अधिकतम व्यास ३०कोटी किमी असेल.म्हणजे अवकाशात चंद्र एका
स्थानापासून तीस कोटी किमी दूर असलेल्या दुसर्‍या स्थानी जातो हे खरे आहे."
.
"मग? त्याचे नक्षत्रापासूनचे अंतर बदलणार नाही? आपलं उगीच काही तरी काय?
अंतर बदलत नाही, अंतर बदलत नाही! "
.
"चंद्रापासून पुष्याचे किमान अंतर आहे चाळीस हजार अब्ज किमी.सध्याच्या आर्थिक
घोटाळ्यांतील रकमा वाचून चाळीस हजार अब्ज ही संख्या मोठी वाटत नसेल तर एक
उदाहरण देतो.समजा पुण्यात एक वर्तुळाकार क्रीडांगण आहे.त्याच्या परिघावर पूर्व,उत्तर,
पश्चिम,दक्षिण अशा चार दिशांना चार ध्वज रोवले आहेत.एक खेळाडू या मैदानाच्या
परिघावरून धावत फेर्‍या मारत आहे.तो पूर्वेच्या झेंड्याकडून पश्चिमेच्या झेंड्याकडे आला
म्हणजे त्याचे न्यूयॉर्क शहरापासून अंतर बदलले का? तो न्यूयॉर्कच्या अधिक जवळ
आला असे म्हणणार का? तो दक्षिणे कडून उत्तरेकडे गेला म्हणजे त्याने हिमालय पर्वतात
प्रवेश केला का?
पृथ्वी,चंद्र, पुष्य एका सरळ रेषेत येऊन आकाशाच्या पटलावर चंद्र पुष्य नक्षत्रात दिसू लागला की "आला ,आला,! चंद्र आला! त्याने पुष्य नक्षत्रात प्रवेश केला! चला चला! आज गुरुवार आहे.गुरुपुष्यामृत दुर्मिळयोग!.सोने खरेदीला चला! असे ओरडत होरारत्‍नांनी उड्या मारणे म्हणजे वरच्या उदाहरणातील मैदानाच्या मध्यभागी बसलेल्या माणसाने "आला आला! धावपटू उत्तर ध्वजाकडे आला! त्याने हिमालय पर्वतात प्रवेश केला." असे म्हणण्यासारखे असमंजसपणाचे आहे."
.
"अहो तीस कोटी किमी कुठे आणि मैदानाचा दीड-दोनशे मीटर व्यास कुठे?"
.
"अंतरांची गुणोत्तरे काढून बघा म्हणजे लक्षात येईल की तीस कोटी किमी च्या तुलनेत मैदानाचा व्यास फार मोठा आहे.चंद्र त्याच्या भ्रमण मार्गात कुठेही असला तरी त्याचे कुठल्याही नक्षत्रापासूनचे अंतर बदलले आहे असे म्हणता येणार नाही.
म्हणून पृथ्वीवरून पाहाताना चंद्र रोज वेगळ्या नक्षत्रात दिसतो तरी प्रत्यक्षात तो सगळ्याच नक्षत्रांत असतो अथवा कोणत्याच नक्षत्रात नसतो हे खगोलशास्त्रीय सत्य आहे.यात कोणतीही शंका संभवत नाही.जे पृथ्वी वरून आकाशाच्या द्विमिती पटलावर दिसते ते खरे की जे प्रत्यक्ष त्रिमितीय अवकाशतअसते ते खरे याचा विचार करावा. म्हणजे "चंद्राचा कन्या राशीत प्रवेश",गुरूचे कृत्तिकेत पदार्पण"."रोहिणीशकटभेद" इत्यादि सगळे अज्ञानमूलक शब्दप्रयोग असल्याचे समजेल."
.
"आता एक शंका अशी की जन्मपत्रिकेत चंद्रासाठी कोणत्या तरी एका राशीत ’चं.’अक्षर
असते.तो जर सर्वच नक्षत्रांत असेल तर सर्व राशींतही असणार. कारण २७ नक्षत्रांच्याच
बारा राशी असतात."
.
"वा! वा! छान मुद्दा काढलात.कुंडलीत सर्व राशींत चं लिहायला हवे! आणि चंद्रच का?
सर्वच ग्रह सदैव सर्व राशींत असतात (अथवा कोणत्याच राशीत नसतात).इथे सुद्धा
राशी म्हणजे अवकाशातील ३० अंशाचा विशिष्ट पट्टा नव्हे तर प्रत्यक्ष तारे.)कारण
सूर्यमालेचा व्यास नक्षत्राच्या किमान अंतराच्या तुलनेत नगण्य आहे."
.
"आता जन्मपत्रिकेत सर्व ग्रह सर्व राशींत दाखवले तर त्या पत्रिकेला काय अर्थ राहिला?
सर्वच पत्रिका मंगळाच्या निघतील.अशा पत्रिका करायच्या तरी कशाला?"
.
"अगदी बरोबर! जन्मकुंडली निरर्थक असते. ती करूच नये.जगातील सगळ्या मुली(खरेतर
सगळ्या व्यक्ती) मंगळाच्या असतात अथवा एकही मंगळाची नसते हेचखरे. खगोलशास्त्राच्या निर्विवाद सत्यांचा थोडा जरी विचार केला,कागदावरील कुंडलीकडे बघत न बसता प्रत्यक्ष अवकाशाच्य पोकळीत पृथ्वी,चंद्र, सूर्य,इतर ग्रह,नक्षत्रे ,राशी कुठे आहेत याचे चित्र डोळ्यांसमोर आणले, त्यांच्या अंतरांचा विचार केला तर कुंडली निरर्थकच ठरणार."
.
"तुम्ही सांगता ते बरेचसे पटते.पण अजून दोन शंका आहेत.त्या उद्या परवा विचारीन.
आता निघतो."
.
"शंका विचारायला अवश्य यावे.स्वागत आहे."
****************************************************

लेखनविषय: दुवे:

Comments

उदाहरणे

रुपके असतात ही जाणीव यनांना नाही हे धाडसी विधान आहे. एखाद्याची (त्यातही यनांसारख्या जेष्ठ उकक्रमींची) जाणीव वगैरे काढण्याआधी सबळ उदाहरणे द्यावीत अन्यथा तो आकस असू शकतो असे समजायला जागा आहे.

धाडसी नाही. हा खेळ बाहुल्यांचा, अवतार-पुनर्जन्म, चंद्राचे राशींतून भ्रमण या सर्व संकल्पना आहेत आणि समाजमान्य संकल्पना आहे. त्यांचा रुपके म्हणून उपयोग केला जातो याची जाणीव यनांना नाही म्हणूनच ते लेख टाकत राहतात असेच मला वाटते. याला मी आकस म्हणण्यापेक्षा माझा ग्रह म्हणेन. तुम्हाला माझे म्हणणे पटत नाही कारण तुम्हाला माझ्याबद्दल आकस आहे असेही कुणी म्हणू शकेल. ;-) ज्येष्ठ असणे म्हणजे योग्य असणे असे नाही. ज्येष्ठ तर बहुधा शशीओकही असावेत. इतर ठिकाणी यालाच व्यक्तिपूजा असे म्हणतात. निदान उपक्रमावर तरी हे "बाबापंथ" सुरू होऊ नयेत.

आणि असा लेख आला की मग तिथे तुमचा प्रतिसाद शोभून दिसेल. इथे नाही.

असा लेख आला की तो लेख टाकतील असे तिथे कसे शोभून दिसेल? मृगजळाचा मुद्दा इथे निघाला तेव्हा त्याविषयीचे भाकित येथेच शोभून दिसते. :-)

इथे यनांनी मुद्दा समजवण्यासाठी मृगजळाचे रुपक वापरले आहे हे तुम्हाला खरंच समजले नसेल तर चर्चा करणे व्यर्थ आहे

असहमत. हे रुपक आहे हे त्यांना समजले नाही असे मला वाटते पण पुढे चर्चा करणे व्यर्थ आहे याच्याशी सहमती. :-)

असहमत

हा खेळ बाहुल्यांचा, अवतार-पुनर्जन्म, चंद्राचे राशींतून भ्रमण या सर्व संकल्पना आहेत आणि समाजमान्य संकल्पना आहे. त्यांचा रुपके म्हणून उपयोग केला जातो याची जाणीव यनांना नाही म्हणूनच ते लेख टाकत राहतात असेच मला वाटते.

ही उदाहरणे यनावालांना रुपकांची जाणीव नाही, ह्या विधानाला पुष्टी देणारी नाहीत.

वरील उदाहरणांचा रुपके म्हणूनही उपयोग केला जात असावा. (तुम्ही तसा करतही असाल) पण ह्या कल्पनांना जसेच्या तसे स्वीकारणार्‍यांची संख्या कमी नाही. देवाच्या बाहुलीला नवस सांगणारे बाहुलीला रुपक मानत असतात का? चंद्राचे राशींतुन भ्रमण ह्यावरुन मनुष्य प्राण्याचे भविष्य मांडणारे ही कल्पना रुपक म्हणून वापरतात का?

उपक्रम

वरील उदाहरणांचा रुपके म्हणूनही उपयोग केला जात असावा. (तुम्ही तसा करतही असाल) पण ह्या कल्पनांना जसेच्या तसे स्वीकारणार्‍यांची संख्या कमी नाही.

हेच तर सांगत होते. आपण गोल गोल* जाऊन तेथेच येऊन धडकलो. मीच नाही बहुतांश** उपक्रमी हेच करत असावेत. या चर्चेला किंवा यनांच्या इतर चर्चांतून हेच बरेचसे उपक्रमी त्यांना सांगत असतात.

बाहुलीला नवस सांगणारे बाहुलीला रुपक मानत असतात का? चंद्राचे राशींतुन भ्रमण ह्यावरुन मनुष्य प्राण्याचे भविष्य मांडणारे ही कल्पना रुपक म्हणून वापरतात का?

या लोकांना त्यांच्या कठिण मातीवर यनांनी जाऊन अवश्य समजवावे. माझा पूर्ण पाठिंबा आहे.

* आता गोल गोल फिरायचा कंटाळा आला. बाय!

** शशिओक, गुंडो किंवा इतर कुणीही यनांच्या सर्वच लेखांचे ऑडयन्स नसण्याची शक्यता आहे तरीही आधीच्या प्रतिसादातील च बदलून बहुतांश हा बदल केला आहे.

धन्यवाद

शशिओक, गुंडो किंवा इतर कुणीही यनांच्या सर्वच लेखांचे ऑडयन्स नसण्याची शक्यता आहे तरीही आधीच्या प्रतिसादातील च बदलून बहुतांश हा बदल केला आहे.

धन्यवाद. (गोल गोल) प्रदक्षीणा कामी आली. :-)

शनी कोणत्या राशीत?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
डोळ्यांपुढे चित्र आणावे की अवकाशात कोण्या एका क्षणी शनिग्रह त्याच्या भ्रमण कक्षेत कोण्या एका स्थानी आहे.आता बारा राशी(म्हणजे तारका समूह) कोठे आहेत? सर्व राशी शनी भोवती आहेत. या राशी आणि शनी साधारणपणे एका पातळीत आहेत.राशी शनीपासून खूप, खूप म्हणजे खूपच दूर(किमान ४०हजार अब्ज किमी) आहेत.
आता शनी कोणत्या राशीत आहे? विचार करावा. (यासाठी पृथ्वी कोठे आहे हे जाणण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही.पृथ्वीवरून तो कुठल्यातरी एका राशीत दिसेल.पण प्रश्न तो नाही.)
माझ्यामते शनिग्रह सर्व राशींत आहे अथवा कोणत्याही राशीत नाही.
जो विचार शनीबद्दल तोच अन्य सर्व ग्रहांबद्दल.
यांत काही विस्कळित विचार आहे असे मला वाटत नाही.)

फ्रेम ऑफ रेफरन्स

इथे नक्षत्र म्हणजे प्रत्यक्ष तारकासमूह.क्रांतिमार्गाचे २७ समान भाग पाडून होणारा (360/27=40/3=) 13.33 अंशाचा अवकाशाचा विशिष्ट पट्टा नव्हे.

हे पटलं नाही. तारका समूह म्हणजे काय? त्या विशिष्ट पट्ट्यात एकत्र भासणाऱ्या तारकांचा आर्बिट्ररी पद्धतीने एकत्रीकरण करून केलेला समूह. मुळात त्या तारका आकाशात एकत्र दिसतात याचं कारण आपण सर्वच वापरत असलेली पृथ्वीची फ्रेम ऑफ रेफरन्स. 'चंद्र अमूक नक्षत्रात गेला' हे विधान चुकीचं नाही. कारण त्या पृथ्वीवरून दिसणाऱ्या कोनीय पट्ट्यालाच नक्षत्र म्हणण्याची पद्धत तयार करता येते.

तुमच्याच तर्काचा अतिरेक केला तर 'अमेरिकेतली पूर्व ही भारतातल्या पूर्वेच्या विरुद्ध दिशेला असते. त्यामुळे दिशा या संकल्पनेलाच अर्थ नाही.' किंवा 'सूर्य उगवतो ती पूर्व कशी म्हणता येईल? सूर्य उगवत नसतो, पृथ्वी फिरत असते. त्यामुळे खरं तर सूर्य व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेला पूर्व दिशा म्हटलं पाहिजे' असं म्हणता येईल. मुद्दा असा की आपल्या फ्रेम ऑफ रेफरन्स मधली निरीक्षणं महत्त्वाची असू शकतात. त्यांच्यात होणाऱ्या बदलांवरून काही भाकितं करणं योग्य असतं काही भाकितं करणं योग्य नसतं. या योग्यायोग्यतेविषयी जरूर चर्चा करता येईल, पण निरीक्षणं संकलित करण्याची पद्धतीच निराधार म्हणण्यात काय फायदा? 'माझी उजवी बाजू' मी वळलो की बदलते म्हणून ती निरुपयोगी कल्पना ठरत नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

पृथ्वीची फ्रेम ऑफ रेफरन्स

आकाशस्थ ज्योतींचे पृथ्वीवरून निरिक्षण करण्यासाठी फक्त ही फ्रेम ऑफ रेफरन्स आवश्यक असते. प्रत्यक्षात त्याला काहीही अर्थ किंवा महत्व नाही. अलीकडच्या काळात संगणकाच्या सहाय्याने बनवलेले विश्वाचे ऍटलास जर आपण बघितलेत तर त्यात पृथ्वीची फ्रेम ऑफ रेफरन्स वापरलेली नसते. सूर्यमाला ज्या गॅलॅक्सी मध्ये आहे ती आकाश गंगा गॅलॅक्सी व इतर काही गॅलॅक्सी यांचा मिळून एक गट होतो. त्या गटाला छोटा गट असे म्हटले जाते. हा छोटा गट अवकाशाच्या व्हर्गो या नावाने ओळखल्या जाणार्‍या खंडात किंवा भागात आहे. यना जे सांगत आहेत ते शास्त्रीय दृष्टीने अतिशय अचूक आहे. चंद्र, सूर्य किंवा पृथ्वी हे आकाशगंगेच्या ज्या सर्पिल आकाराच्या भागात(स्पायरल आर्म) आहेत तिथेच असतात. कोठेही जात नाहीत. तेंव्हा चंद्र अमूक नक्षत्रात गेला हे म्हणणे पूर्णपणे अशास्त्रीय व भ्रामक आहे. या शिवाय आता आपण चंद्र व सूर्य यांच्या पृथ्वीवरून केलेल्या निरिक्षणांप्रमाणे भासमान होणार्‍या स्थानांचा कालमापनासाठी वापर करत नसल्याने या निरिक्षणांचा आता तसा काही उपयोगही उरलेला नाही. चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

 
^ वर