'फना' व कश्मीरप्रश्न

बरेच दिवस लिहीन लिहीन म्हणत होतो. पण संदर्भ लवकर हाती लागला नाही.

'फना' चित्रपटांतील नायक अतिरेक्यांचा हस्तक असतो. हे अतिरेकी आझाद कश्मीरचे स्वातंत्र्यसैनिक असतात. त्यांचीही काही बाजू आहे हे सूचित करण्यासाठी चित्रपटांत भारतीय दहशतवादविरोधी पथकांतील अधिकार्‍याच्या तोंडी 'कश्मीरींना त्यांचा स्वयंनिर्णयाचा हक्क न मिळाल्यामुळे आझाद कश्मीरवादी अतिरेकी बनले आहेत' अशा आशयाचे वाक्य टाकले आहे. चित्रपटाचा नायक या परिस्थितीला भारत व पाकिस्तान दोघांनाही सारखेच जबाबदार धरतो. सत्य परिस्थिति अगदी वेगळी आहे.

या संदर्भांत अरविंद लवकरे यांचा रीडिफ् वरील ३ जून २००३ चा Atavistic under duress हा लेख पहावा. त्यांत म्हंटल्याप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष आयोगाने १३ ऑगस्ट् १९४८ ला केलेल्या ठरावानुसार कश्मीरांत सार्वमत घ्यायला भारताने तयारी दर्शविली होती. पण याच ठरावांत सं.रा.आयोगाने काही पूर्वअटी घातल्या होत्या त्या अशा:
१) पाकिस्तान जम्मू व कश्मीर मधून आपले सैन्य काढून घेईल.
२) तसेच पाकिस्तान जम्मू व कश्मीरमधल्या टोळीवाल्यांना, लढाईच्या उद्देशाने आलेल्या व कायमस्वरूपी न राहाणार्‍या पाकिस्तानी नागरिकांना परत बोलावील.
३) अंतिम निर्णय होईपर्यंत पाकिस्तानने रिकाम्या केलेल्या प्रदेशावर सं.रा.संघाच्या देखरेखीखाली स्थानिक लोकांचे प्रशासन असेल.
४) सं.रा.संघाने नेमलेल्या विशेष आयोगाने भारताला पाकिस्तानने वरील अटी पूर्ण केल्याचे कळवल्यानंतर भारत टप्प्याटप्प्याने आपले सैन्य मागे घेईल.

उपरोल्लेखित १३ ऑगस्ट् १९४८ चा ठराव मान्य असल्याचे भारताने सं.रा.संघाला २५ डिसेंबर १९४८ च्या पत्राने कळवले होते. तेव्हापासून आजपर्यंत वरीलपैकी कोणतीही अट पाकिस्तानने पूर्ण केलेली नाही. त्यामुळे सार्वमत न झाल्याबद्दल भारताला जबाबदार धरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

हा इतिहास चित्रपट काढतांना लक्षांत न घेण्याइतका बिनमहत्त्वाचा आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

फना हे निमित्त!

अहो कोर्डे साहेब,

फना हे एक निमित्त झालं. हा प्रश्न आजचा नाहीये.

या सगळ्याच्या मुळाशी वेळोवेळी, म्हणजे ५० हून अधिक वर्ष काँग्रेसचं शेपूटघालू आणि बोटचेपं धोरण हे या काश्मिरच्या न फुटणार्‍या गळवाला कारणीभूत आहे. आता काय बोलायचं? आजोबांनी जीनांपुढे मान टाकली आणि चाचा नेहरूंची घाईघाईने खुर्चीवर बसण्याची हाव आपल्याला नडली आहे! नाहीतर तेव्हाच हा प्रश्न सरदार वल्लभभाईंनी एक हाती सोडवला असता!

असो..

तात्या.

तद्दन फालतू

अशा फना या हिंदी चित्रपटाने योग्य-अयोग्य इतिहास यांची जाण ठेवावी, त्याचा अभ्यास करावा याची अपेक्षा आपण ठेवावी याचे आश्चर्य वाटते.

हा चित्रपट लक्षांत घेण्याइतका महत्त्वाचा आहे का?

-शॉर्ट सर्किट

काळ सोकावतो..

हा चित्रपट लक्षांत घेण्याइतका महत्त्वाचा आहे का?

माझ्या मते आहे. कारण आपण म्हणतो,

'म्हातारीच मेली ना? मग त्याचं काय एवढं?'

पण दु:ख म्हातारी मेल्याचं नसतं, तर काळ सोकावत असतो हेही लक्षात घेतलं पाहिजे.

'अबक' = 'पफब' असं जर कुणी म्हटलं तर तुम्ही आम्हीदुर्लक्ष करतो. पण चित्रपट हे माध्यम इतकं प्रभावशाली आहे की काही काळाने 'अबक' = 'पफब' हे खरंच वाटू लागतं. म्हंणून त्याचं वेळीच खंडन झालं पाहिजे असं मला वाटतं.

इतके दिवस, नव्हे इतकी वर्ष तुम्हीआम्ही निधर्मीपणाचं किंवा हिंदू रष्ट्र असं म्हटल्याने अंगावर पालबिल पडल्यासारखं वागलो. त्यामुळे कुत्रं एकिकडे पीठ खात होतं हे आपल्या कुणाच्याच लक्षात आलं नाही. आणि आज जेव्हा हे लक्षात आलं आहे तेव्हा वेळीच न फोडलेलं गळू पिकून त्याचं गँगरीन झालेलं आपण पाहतो आहोत!

असो..

आपला,
(स्वातंत्र्योत्तर भारताचा राजकीय विश्लेषक!) तात्या.

काळावरचा उतारा

नमस्कार,

इथे फना नामक निद्रानाशावर अतिगुणकारी चित्रपटाबद्दल चर्चा झाली, तर ज्यांनी तो पाहिला नाही त्यांचीही हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता चाळवली जाईल. शिवाय फना चित्रपटाचे साहाय्य घेऊन पंडित नेहरु, महात्माजी गांधी यांना शेलक्या शिव्याही बहाल होतील. त्यामुळे या चर्चाविषयात तसला काळ सोकावू नये म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने प्रतिसाद दिला.

धन्यवाद,
शॉ.स.

अवांतरः अशुद्धलेखनाचा काळ सोकावू नये असेही आम्हाला वाटते. अन्यथा उद्या लोक
एकिकडे = एकीकडे
रष्ट्र = राष्ट्र
असे ग्राह्य धरुन चालतील.

शिवाय काश्मीरचे कश्मीर केव्हा झाले हे देखील त्यांना कळणार नाही.

असोच!

आपला,
शुद्धलेखित लघुसर्किट (म्हणजेच) शॉर्ट सर्किट

पडली वाटतं पाल अंगावर! ;)

शिवाय फना चित्रपटाचे साहाय्य घेऊन पंडित नेहरु, महात्माजी गांधी यांना शेलक्या शिव्याही बहाल होतील.

अरेच्च्या! इतक्यातच पडली वाटतं पाल अंगावर? ;)

असो असो! झटकून टाका. जाईल लगेच! ;)

अवांतरः अशुद्धलेखनाचा काळ सोकावू नये असेही आम्हाला वाटते. अन्यथा उद्या लोक
एकिकडे = एकीकडे
रष्ट्र = राष्ट्र
असे ग्राह्य धरुन चालतील.

अच्छा! म्हणजे मुद्दे संपलेले दिसताहेत! ठीक आहे, ठीक आहे!!

आता आम्हीही या विषयावर अधिक काही बोलणार नाही!

अडचणीत आणणारे प्रश्न विचारल्यावर शेळीच्या पायाच्या जखमेला मलमपट्टी करण्याकरता निघून जाणार्‍या मोहनचा विजय असो...

कोटावर गुलाबाचं फूल लावणार्‍या इंटरनॅशनल इडियटचा विजय असो...

आपला,
(शेपूटघालू निधर्मी!) तात्या.

जगमोहन यांनी मांडलेला मुद्दा

हा चर्चेचा प्रस्ताव मांडल्याबद्दल शरद कोर्डे धन्यवाद.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाप्रमाणे पाकिस्तानने कोणतीही पावले उचलली नाहीत. पाकिस्तानने काश्मीरातून सैन्य काढून घेणे तर दूरच राहिले तर सार्वमत केवळ भारताच्या अधिपत्याखालील काश्मीरात घेतले जावे अशी मागणी केली.तेव्हा सार्वमत घेण्यासाठी भारत अजिबात बांधील नव्हता.

जानेवारी १९९४ मध्ये ठाणे येथे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांनी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत भाषण केले होते.त्याला मी आवर्जून गेलो होतो. जगमोहन आणीबाणीदरम्यान बदनाम झाले असले आणि अगदी २००७ मध्येही ते संजय गांधींचे समर्थक असले तरीही त्यांनी राज्यपालपदी असताना दहशवतवादाविरूध्द खंबीर पावले उचलली होती हे सत्य आहे. त्या भाषणात त्यांनी मांडलेला एक प्रमुख मुद्दा असा---

लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष असताना अमेरिकेतील दक्षिणेकडील राज्ये संघराज्यातून गुलामगिरीच्या प्रश्नावरून फुटून निघायच्या बेतात होती. दक्षिणेकडील राज्यांनी रिचमंड येथे राजधानी असलेले ' Confederate' संघराज्य स्थापन केले होते. तरीही लिंकन यांनी यादवी युध्दाचा धोका पत्करून अमेरिकेची एकात्मता टिकवली. जर जनतेची आकांक्षा हा एकच मुद्दा असता तर त्याच न्यायाने लिंकन यांनी जनतेच्या आकांक्षांची पायमल्ली करून देशाची एकात्मता टिकवली. आजच्या काळात दक्षिणेतील फ्लॉरिडा, जॉर्जिया इतकेच काय तर रिचमंड राजधानी असलेल्या व्हर्जिनिया राज्यातील लोक न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन सारख्या उत्तरेतील राज्यातील लोकांप्रमाणेच स्वत:ला 'अमेरिकन' म्हणवतात. ते स्वतःला 'Confederate' म्हणवत नाहीत. त्याचप्रमाणे काश्मीरच्या संदर्भात धर्माच्या नावावर आणि भारताला त्रास द्ययच्या उद्देशाने पाकिस्तान काश्मीरींना भडकविण्याचे काम करत आहे हे उघड आहे.समजा असे आपण धरून चाललो की काश्मीरींना भारतात राहायचे नाही तरीही लिंकनप्रमाणे खंबीर पावले उचलून काश्मीरला भारतातच ठेवावे. भविष्यकाळात पाकिस्तानचा खरा डाव लक्षात येताच काश्मीरी लोक स्वतःला अभिमानाने 'भारतीय' म्हणवतील.

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

प्रतिसाद आवडला.

प्रतिसाद आवडला,सहमत.

मी

मी काही ही न लिहण्याचा निर्णय घेतला होता पण ज्या जागी ते आले तेथे मी लिहावे असे माझे मन मला सांगत आहे !

ते जर नसते .... तर...
आम्हाला स्वाधिनता मिळालीच नसती का ?
ते जर नसते तरी देखील भारताची फाळणी झाली असती का ?
ते जर नसते तरी देखील हा काश्मीर प्रश्न उभा राहीला नसता का ?
ते जर नसते तर गोरे जाऊन काळे राज्यकर्ते भारताचे शासन सांभाळण्यासाठी आले असते का ?
ते जर नसते तर चार-पाच महत्वाची आंदोलने अशीच जनतेला कारण न देता मागे घेता आली असती का ?
ते जर नसते तर आपले काही देशभक्त नेते असेच आपले आयुष्य अंधकारमय अवस्थेमध्ये / फाशीच्या तक्तावर संपवले असते का ?
ते जर नसते तर.. काही प्रश्न तयार होण्याआधीच संपले नसते का ?

हे झाले ते विषयी !

दुस-या विषयी न बोललेले बरे !

बाकी फना एक निरागस प्रेम कथा होती ... ह्या कथेमध्ये देशप्रेम हे फक्त मसाला भरण्यासाठीच होते... ना त्याना (ज्यानी हा चित्रपट बनवला त्यानी) ह्या बद्दल संशोधन केले असावे, कारण हा माहीती पट नाही आहे की ज्यामध्ये खरीच माहीती ह्यावी त्यांनी ?
मसाला का ? ज्या पध्दतीने अमीर काही खून करतो... त्या असाध्य नव्हेच तर देवाला देखील शक्य नाहीत.... भारताच्या राजधानी मध्ये ... राजधानीच्या सर्वात महत्वाच्या जागी (लाल किल्ला) हल्ला ! तोही हा हिरो एकटाच असताना... अशक्य ! दिल्ली मध्ये सर्वात मागासलेला विभाग म्हणजे बादली पूर.... येथे ही पोलीस एकटा दुकटा दिसत नाही पण अमीर खान जसपाल भट्टीला आरामात मारतो ! क्या बात है ! दारुगोळा लावून ईमारत नष्ट करतो (प्रयत्न करतो) ज्या मध्ये तो मरण पावला अशी खोटी बातमी ...काजोल ला भेटते तो सीन !....
मागील वर्षामध्येच दिल्ली पोलीसांनी कमीत कमी १४० आतंकवादी पकडले व किती तरी दारुगोळा !

चित्रपट व सामान्य जीवन एक दुस-याला नेहमीच पुरक राहीले आहेत, जसे काही चित्रपटातील काही सीन पाहून चोरी करणे, खुन करणे !
पण जेव्हा जेव्हा देशप्रेम हे कथानकामध्ये येते तेव्हा मात्र ही निर्माती मंडळी डोळे झाकून काही ही तपशील न शोधता लेखकाने जे संवाद / कथा लिहली आहे त्यावर अवलंबून राहतात हे मात्र् विचित्रच वाटते !

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

पाकीस्तान !

पाकीस्तान ला अट घालणारे व तो ती अट पुर्ण करेल अशी अपेक्षा बाळगणारे दोघे ही मुर्ख !
हेच अंतीम सत्य !

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

 
^ वर