माझ्या संग्रहातील पुस्तके ११ 'समुद्र'

' स्त्रीला नेमके हवे तरी काय असते?' 'व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट?' हा प्रत्येक पुरुषाला पडलेला सनातन प्रश्न आहे. स्त्रीपुरुषामधील कोणतेही नाते घ्या, त्या नात्याकडे बघण्याचा पुरुषाचा आणि स्त्रीचा दृष्टीकोन भिन्न असतो. नवरा-बायकोच्या नात्यात तर हे अधिकच प्रकर्षाने दिसते. एकमेकांत मिसळून गेलेले नवरा बायको खरोखर तसे मिसळून गेलेले असतात का? (तसे मिसळून जाणे आवश्यक आहे का हा वेगळा प्रश्न आहे). वर्षानुवर्षे एकत्र जगल्यानंतर (सहजीवनानंतर म्हणा हवे तर) 'अमक्याची बायको' किंवा 'अमक्याचा नवरा' ही स्त्री-पुरुषांची एकच ओळख शिल्लक राहाते का? राहावी का? याही पलिकडे जाऊन ज्याच्याबरोबर किंवा जिच्याबरोबर आपण सगळे आयुष्य काढतो त्याच्या किंवा तिच्या मनातले सगळे पदर आपल्याला उलगडलेले असतात का?
हा काही नवीन प्रश्न नाही. पण या विषयावरची मिलिंद बोकिलांची 'समुद्र' ही नव्वद पानांची कादंबरी अगदी नव्या पद्धतीने विचार करायला लावणारी आहे. मिलिंद बोकील हा तशा नव्या पण झपाट्याने जुन्या होत जाणार्‍या पिढीतला वेगळ्या वाटेने जाणारा लेखक. बोकिलांच्या 'उदकाचिया आर्ति' आणि 'झेन गार्डन' या कथासंग्रहांतून मानवी नात्यांमधली गुंतागुंत समजून घेण्याची त्यांची कुवत आणि त्यांचे यथायोग्य चित्रण करण्याची त्यांची क्षमता दिसून आलेलीच आहे. 'समुद्र' मध्ये बोकील एक पाऊल पुढे टाकतात. भास्कर आणि नंदिनीच्या लौकिकार्थाने अत्यंत सुखी संसारातला एक तिढा ते दोघे सुटीवर म्हणून गेलेले असताना उघडा होतो. विश्वास या पायावर आधारलेले त्या दोघांमधले नाते या नव्या खुलाशाने किंचित थरथरते. 'हे असे का?' हा भास्करला प्रश्न पडतो. एखाद्या टिपिकल साचेबंद नवर्‍याप्रमाणे त्याचीही प्रतिक्रिया अपेक्षित अशीच होते. आधी लिहिल्याप्रमाणे 'स्त्रीला नेमके काय हवे असते?' हा प्रश्न त्यालाही पडतो...
स्पॉयलर अलर्टचा दोष पत्करुन लिहायचे झाले तर 'अस्तित्व' या महेश मांजरेकरच्या चित्रपटाच्या चाकोरीतून जाणारी कथा. पण या कथेच्या निमित्ताने बोकील एकूणच स्त्री-पुरुष यांच्यामधील नात्यांवर काही मार्मिक भाष्य करतात. स्त्री आणि पुरुष हे फक्त शरीरांनी नव्हे तर शरीरांपासून प्रत्येक गोष्टीने, विशेषतः मनाने, भिन्न आहेत, आणि भिन्नच असतील - यात सरस-निरस हा प्रश्नच नाही - हे 'समुद्र' चे फार ढोबळ असे सार झाले. खरे तर 'समुद्र' चे अमुक असे सार नाहीच. 'समुद्र' ही या मध्यमवयीन जोडप्याने दोघांना एकत्र वेळ काढता यावा म्हणून घेतलेली सुटी आहे. या सुटीच्या पार्श्वभूमीवर ऐकू येणारी समुद्राची मंद गाज आहे. हवेतला किंचित उकाडा आहे. आणि या सगळ्या सुस्तावलेल्या सुटीत या जोडप्याचे हळूहळू सुटे होत जाणारे आयुष्य आहे, 'सहजीवन' आहे.
'समुद्र' आपल्याला विचार करायला लावते. स्वतःला तपासून बघायला लावते. पुस्तकाचे किंवा एकंदर कुठल्याही कलाकृतीचे हे यश म्हणावे लागेल. नवर्‍याच्या हातात हात गुंफून फिरायला बाहेर पडलेली बायको या ठोकळ दृष्याकडे बघताना आरशासमोर आरसा ठेवलेला असावा पण प्रत्येक आरशातले प्रतिबिंब दुसर्‍या प्रतिबिंबापेक्षा जरासे तिरके असावे तशा काही शक्यता दिसायला लागतात. 'खरेखुरे आयुष्य हे काल्पनिक विश्वापेक्षा कितीतरी नाट्यमय, अकल्पनीय असू शकते' हे एक (काल्पनिक) कादंबरी वाचतानाच पटते.
बाकी बोकिलांची सरळ, संयत भाषा आता परिचित झाली आहे. शरीरसंबंधांची वर्णने करताना ती जरा अधिक अलंकारिक, सूचक होते, पण तेवढे क्षम्य ठरावे. रस्त्यावरच्या रहदारीपासून सुटीवर गेल्यावर खोलीत गेल्यागेल्या अधीरपणे बायकोला मिठीत घेणार्‍या नवर्‍यापर्यंत बोकीलांनी बारीक निरखलेले असते. आणि त्यांच्या लिखाणात ते तसे बारकाईने आणि अगदी सहजपणाने येत जाते. नवरा गाडी चालवत असताना नकळत झोपी जाणारी नंदिनी आपण कुठेतरी पाहिलेली असते, पण नवर्‍याच्या दंडातले गोळे बघून 'इट ऍक्चुअली टर्नस अस ऑफ' असे ती म्हणते तेंव्हा आपण थोडे थबकतो.
'समुद्र' हे 'मौज'चे मार्च २००९ चे प्रकाशन. जुलै २०१० मध्ये या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली. म्हणजे एकंदरीत मराठी पुस्तकाच्या मानाने बरेच म्हणायचे. मराठीतली काही सर्वोत्तम पुस्तके निवडली तर त्यात 'समुद्र' ची वर्णी लागणार नाही. पण 'समुद्र' मला आवडली. एका बैठकीत संपली हेही आवडले आणि पुस्तके विकत घेताना शंभर वेळा विचार करायच्या सध्याच्या दिवसांत ८० रुपये ही या पुस्तकाची किंमत तर फारच आवडली.

Comments

एक फेमस वाक्य आठवले

'प्रत्येक' स्त्री ला 'एकाच्' पुरुषाकडून "अनेक" गोष्टी हव्या असतात. आणि प्रत्येक पुरुषाला "अनेक" स्त्रीयांकडुन "एकच" गोष्ट हवी असते ;)

बाकी पुस्तक वाचणिय दिसते :)

- टारझन

टारझण

टारझण, हे वाचले का?

"दंडातले गोळे बघून 'इट ऍक्चुअली टर्नस अस ऑफ' असे ती म्हणते तेंव्हा आपण थोडे थबकतो."

जरा दमानं व्यायाम करा.

-खाजण

?

सदस्य आपला अनुभव खुपच कमी असावा :) कारण दंडातले गोळे बघुन टर्ण ऑफ होणार्‍यांची प्राकृतिक, भौगोलिक आणि माणसिक परिस्थिती अतिषय खच्ची झालेल्या असतात , असा आमचा दावा आहे :)
तसा आमच्या गोळ्यांचा आम्हास अभिमाण आहे :) आपल्या काळजीबद्दल धणुर्वात.

- (वॅनिला सदस्य) टारझन

प्रतिसाद

पुस्तकाची ओळख आवडली. जमेल तेव्हा पुस्तक वाचेन असे म्हणतो.

शाळा

मिलिंद बोकिलांची 'शाळा' कादंबरी सुद्धा चांगली वाटलेली.

आजकाल पानामागे एक रुपया ही किंमत आवडण्यासारखीच म्हटली पाहिजे.

गौरी देशपांडे आणि मिलिंद बोकील यांच्या शैलीत आणि विषयांत साम्य वाटते. यावर वाचकांचे काय मत आहे?

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

माझे मत

गौरी देशपांडे आणि मिलिंद बोकील यांच्या शैलीत आणि विषयांत साम्य वाटते. यावर वाचकांचे काय मत आहे?

मला बोकील आणि आशा बगे यांच्या शैलीत आणि विषयांत साम्य दिसते.
सन्जोप राव
ऑल प्रतिसाद आर इक्वल, बट सम प्रतिसाद आर मोर इक्वल दॅन अदर्स.

छान.

आपण करून दिलेली ओळख छान आहे, मी स्वतः मिलिंद बोकीलांच काही वाचलं नाहीये त्यामुळे त्यांच्या लिखाणाबद्दल विशेष माहिती नाही.

पण ही केवळ कादंबरी असेल तर काही लोकांची "थोडी" निराशा होऊ शकते, कारण कादंबरीत "असे का?" चे उत्तर बहुदा लिहिलेले नसते. पण नातेसंबंधांचे माहितीपर विश्लेषण असेल तर ते उत्सुकता निर्माण करु शकेल. कादंबरीत स्वतःच्या अनुभवातून केलेला कल्पनाविलास जास्त असण्याची शक्यता असते, त्यामध्ये अनुभव जेवढा व्यापक तेवढी कादंबरीतील माहिती चांगली असते तरीदेखील कुठे तरी ड्रमॅटीक एलिमेंट असतोच.

खरे आहे.

कादंबरीत स्वतःच्या अनुभवातून केलेला कल्पनाविलास जास्त असण्याची शक्यता असते, त्यामध्ये अनुभव जेवढा व्यापक तेवढी कादंबरीतील माहिती चांगली असते तरीदेखील कुठे तरी ड्रमॅटीक एलिमेंट असतोच.
खरे आहे. बोकिलांचे एकूण लिखाण विश्लेषणात्मक असते. केवळ मनोरंजन असे त्यांच्या लिखाणाचे स्वरुप असत नाही. म्हणून तर त्यांचे लिखाण वाचावेसे वाटते.

सन्जोप राव

चांगले पुस्तक - उत्तम परीक्षण

बोकीलांच्या इतर पुस्तकांसोबत हे पुस्तकही माझ्या संग्रहात आहे. पुस्तक वाचनीय आहे यात काहीच शंका नाही. मात्र उत्तरार्धात ते फार संथ वाटले होते. भास्कर आणि नंदिनीच्या प्रश्नावर दुसरे योग्य उत्तर असू शकत नाही हे बोकीलांनी सूचकपणे सांगितले आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अटेन्शन

अटेन्शन!! आपल्या आवडत्या पुरुषाकडून, "अटेन्शन" हवे असते. सतत प्रयास असतो त्याला मोहवायचा, बांधून ठेवण्याचा ..... आणि हे मिळत असताना तो मानसिकरीत्या दुर्बळ तर वाटत नाही ना हे पदोपदी जोखण्याचा.
_________________
ओळख खूप आवडली.

जोखणे

आणि हे मिळत असताना तो मानसिकरीत्या दुर्बळ तर वाटत नाही ना हे पदोपदी जोखण्याचा.

पुरुषांना हे पदोपदी जोखणे त्रास देणारे असते. पूर्ण विश्वास टाकणे त्यांना अपेक्षित असते. (संदर्भः मेन आर फ्रॉम मार्स अँड वुमेन आर फ्रॉम विनस)

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

अहंकार

दुर्बळ व्यक्तीला बांधून ठेवण्यात अहंकार सुखावत नाही. त्यात कसली आली आहे मजा? कदाचित त्यामागची सबकॉन्शस भूमिका चांगल्यातली चांगली गुणसूत्रे पुढील पीढीकडे सोपविणे आदि असू शकेल. या आदिम प्रेरणेमागे शास्त्रिय रहस्य असू शकेल. नव्हे असेलच. पण वेळोवेळी ताकदीचा सतत अदमासा घेणे जरूरी वाटते एका विशिष्ठ मर्यादेपर्यंत. त्यानंतर विश्वास जरूर टाकता येतो.

?

दुर्बळ व्यक्तीला बांधून ठेवण्यात अहंकार सुखावत नाही. त्यात कसली आली आहे मजा?

हेच! हे मजेसाठी केलं जातं हे स्वीकारलं कि मग आक्षेप नाही.

कदाचित त्यामागची सबकॉन्शस भूमिका चांगल्यातली चांगली गुणसूत्रे पुढील पीढीकडे सोपविणे आदि असू शकेल.

थोडं विस्तारून सांगाल काय? बांधून ठेवण्यात हा हेतू कसा काय असू शकतो ह्याबद्दल उत्सुकता आहे? बांधून ठेवणे हि भावनिक गरज असते, लक्ष वेधून घेणे हा एक मनोविकाराचा भाग आहे.

पण वेळोवेळी ताकदीचा सतत अदमासा घेणे जरूरी वाटते.

हे मान्य, हे सर्वच लोक कायमच करीत असतात, ते गरजेचे देखील आहे. त्यातूनच विश्वास दृढ होऊ शकतो.

सिलेक्शन् थिअरी

>> हेच! हे मजेसाठी केलं जातं हे स्वीकारलं कि मग आक्षेप नाही. >>
ब्लेटंटली मजेसाठी केले जात नाही. खरे पाहता ताकदीचा अदमासा घेण्याच्या वृत्तीतूनच ते होत असते. निरर्थक मजा अशी काहीच नसते.
>> थोडं विस्तारून सांगाल काय? बांधून ठेवण्यात हा हेतू कसा काय असू शकतो ह्याबद्दल उत्सुकता आहे?>>
"सिलेक्शन थिअरी" बद्दल थोडेफार वाचले होते. तदनुसार पुरुषांना ब्लाँडस का आकर्षित करतात याचे कारण या स्त्रिया सळसळते सोनेरी केस, प्रकाशमान अंगकांती यामुळे मुख्य म्हणजे "आरोग्य आणि चांगली गुणसूत्रे पुढील पीढीकडे सोपबविण्याचे वचन (प्रॉमिस)" रेडिएट करतात असे वाचले होते. आत्ता एकच लेख मलातरी सापडला - पुरुष ब्लाँडस कडे आकर्षित का होतात .
याच नियमानुसार कदाचित स्त्रियादेखील मनोबल वेळोवेळी चाचपून पहात असाव्यात. ज्यायोगे सर्वोत्तम आय क्यू असलेल्या पुरुषाची गुणसूत्रे पुढील पीढीत सोपविता यावीत. असू शकते.

>> बांधून ठेवणे हि भावनिक गरज असते, लक्ष वेधून घेणे हा एक मनोविकाराचा भाग आहे.>>
लक्ष वेधून घेणे हा स्त्रियांच्या प्रांतात मनोबविकार नसून नॉर्म् ऑफ् लाइफ (नेहमीचा भाग) आहे. त्याशिवाय इतक्या प्रसाधनांच्या कंपन्या, शॉपींग मॉल्स, ऍक्सेसरीज, सिलीकॉन प्रॉडक्ट्स (हे उदाहरण जरा अतिच झालं) चालले नसते. बांधून ठेवणे ही गरज आहे हे जर मान्य केले तर , तर त्या गरजेची पूर्तता करायला आकर्षित करणे, लक्ष वेधून घेणे हे क्रमप्राप्त आहे.

काही अंशी सहमत

"सिलेक्शन थिअरी" बद्दल थोडेफार वाचले होते. तदनुसार पुरुषांना ब्लाँडस का आकर्षित करतात याचे कारण या स्त्रिया सळसळते सोनेरी केस, प्रकाशमान अंगकांती यामुळे मुख्य म्हणजे "आरोग्य आणि चांगली गुणसूत्रे पुढील पीढीकडे सोपबविण्याचे वचन (प्रॉमिस)" रेडिएट करतात असे वाचले होते. आत्ता एकच लेख मलातरी सापडला - पुरुष ब्लाँडस कडे आकर्षित का होतात .याच नियमानुसार कदाचित स्त्रियादेखील मनोबल वेळोवेळी चाचपून पहात असाव्यात. ज्यायोगे सर्वोत्तम आय क्यू असलेल्या पुरुषाची गुणसूत्रे पुढील पीढीत सोपविता यावीत. असू शकते

मान्य, अलभ्य गोष्टींचे आकर्षण हा वैश्विक नियम आहे असे मला वाटते.

सबकॉन्शस भूमिका चांगल्यातली चांगली गुणसूत्रे पुढील पीढीकडे सोपविणे आदि असू शकेल

हा "विचार" काही अंशी मान्य आहे पण प्रथम-दर्शी हि "भूल" किंव्हा "मोहाचा" प्रकार आहे. विचार करून आकर्षित होण्याला "आकर्षण" म्हणणे थोडे कठीण वाटते आहे.

लक्ष वेधून घेणे हा स्त्रियांच्या प्रांतात मनोबविकार नसून नॉर्म् ऑफ् लाइफ (नेहमीचा भाग) आहे....त्याशिवाय इतक्या प्रसाधनांच्या कंपन्या, शॉपींग मॉल्स, ऍक्सेसरीज, सिलीकॉन प्रॉडक्ट्स (हे उदाहरण जरा अतिच झालं) चालले नसते. बांधून ठेवणे ही गरज आहे हे जर मान्य केले तर , तर त्या गरजेची पूर्तता करायला आकर्षित करणे, लक्ष वेधून घेणे हे क्रमप्राप्त आहे.

"गरजेची पूर्तता" हा मनाच्या बाबतीत फसवा प्रयोग आहे, हि गरज पाण्याची तहान असते तशी आहे, ती पूर्ण होत नाही आणि आकर्षणाचा खेळ चालूच राहतो. लक्ष वेधून घेण्याची(डोपामाईन) ची गरज भासली कि आकर्षित करा हा संदेश पाठवला जात असावा, त्यावर विवेकाचा ताबा हा व्यक्ती सापेक्ष आहे त्यामुळे मनोविकाराची डिग्री वेग-वेगळी आहे, कदाचित विवेक जास्त असेल तर त्याला विकार म्हणणे अनुचित ठरेल हे मान्य.

बोकिल!

एका उत्तम पुस्तकाच्या ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. मिलिंद बोकिल यांचे लेखन आवडते. 'शाळा' आवडले आहे. 'समुद्र' वाचायचे आहे. बरेच ऐकले आहे त्याबद्दल.

बिपिन कार्यकर्ते

एक शंका..

हे पुस्तक वाचायच्या आधीच उत्तम कसे काय ठरवून टाकले?

छान

शाळा वाचले आहे, बोकिलांची शैली चांगली वाटली. परीचय पुस्तक वाचण्यास प्रवृत्त करणारा आहे.

 
^ वर