प्रिय आत्मन- ओशो स्मृती गंध

मी ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी विदर्भ प्रवास करुन आलो. गजानन महाराजांच्या खामगाव जवळ नांदुरा येथे १९९८-२००० या कालात मी बैंकेचा शाखाप्रबंधक म्हणुन होतो. त्यामुळे तेथे देखील मित्रांना भेटणे या उद्देशाने २ दिवस मुक्काम होतो. त्या भेटित मला वरिल मथळा असलेले एक पुस्तक माझ्या मित्राने मला भेट दिले. ते वाचल्या नंतर ओशो याबद्दल मला जे वाटले ते आपणासोबत शेअर करावे म्हणुन हा प्रपंच.

वरिल नावाचे हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशन डेक्कन जिमखाना, पुणे-४ यांनी २ आक्टोबर २००८ रोजी प्रकाशीत केले आहे. लेखक आहेत सत्य निरंजन (पी.सी. बागमार) आणी यास प्रस्तावना दिली आहे श्री यशवंत देव यांनी. यशवंत देव यांच्या शब्दात या महापुरुषाबद्दल थोडी माहिती साभार देत आहे ओशो या वादळाबद्दल. तुमची उत्सुकता वाढली तर वरिल पुस्तक जरुर वाचा.

"ओशो रजनीश" नावाचे एक सुनामी वादळ भारतात घोंघावून गेले. ११ डिसेंबर १९३१ ते १९ जानेवारी १९९० इतका दीर्घकाळ या वादळाचा झपाटा होता. कुठलेही वादळ येते ते वस्तुंचे नुकसान करुन जाते. मानवी जीवनही हाहाकार करुन जाते. पण या वादळाची गतीच न्यारी! या वादळाने समाजातल्या दंभावर हल्ला चढविला आणि सत्याला अभय दिले.

या पुस्तकात ओशोंच्या निवडक प्रवचनांचा सारांश वाचकाला आढळेल . अनेक ठिकाणी ओशां स्वता:च आपल्यासमोर आहेत आणि आपल्यालाच उद्देशुन जणू "ध्यान करा" अस निग्रहाचं प्रतिपादन करीत आहेत असं वाटेल.

'संभोग से समाधी की ओर' हे पुस्तक हजारों लोकांनी वाचलं - काहींनी उघडपणे वाचलं , काहींनी लपून - छपुन वाचलं ! त्या पुस्तकावर जसा गदारोळ उठला, तसंच त्या पुस्तकाबद्दल फार चांगली मतंही बोलली गेली. ओशोंनी कशाचीही पर्वा न करता जे भावलं , अनुभवलं तेच समाजापुढं ठेवलं. त्यातील सुत्र एकच . "ध्यान करा ! ध्यान करा !! सर्व प्रकारचे असमाधान नाहीसे करु शकणारा तोच एक राजमार्ग आहे." ओशोंनी सर्वांना जवळ केले. हिंदू, मुस्लीम , जैन , बौध्द्, इसाई... इतकंच काय अमेरिकेमधल्या हिप्पी पंथीयांनाही त्यांनी दूर लोटले नाही. उलट त्यांना ध्यांनाची गोडी लावली आणी मनाच्या तळाशी असलेल्या शांतीच्या शोधासाठी प्रवृत्त केले. एखाद्या डौक्टरच्याभोवती रोग्यांचा गराडा पडलेला असतो. आपल्याला औषध हवे असेल तर आपण त्या रोगी गर्दीकडे दुर्लक्ष करुन डौक्टरलाच भेटले पाहिजे ! ओशोंचे वास्तविक मुल्य त्यांच्याभोवतीच्या अर्ध्याकच्च्च्या साधकांकडे बघुन केले तर तो एक मोठा प्रमाद असेल.

ओशोंच्या आश्रमात हजारो साधक येत् होते. त्यांच्या अपुर्णात्वाकडे पाहून ओशोंची करुणा उलट वाढली. त्यांनी अशा मंडळींना हाकलून तर दिले नाहीच; उलट आईच्या मायेने त्यांना जवळ केले आणि त्यांना ध्यानाचा लळा लावला.

ओशो म्हणजे करुणासागरच . त्यांच्या करुणापूर्ण दृष्टीचे अनेक प्रसंग या पुस्तकात सविस्तर पणे शब्दबध्द केले आहेत . ओशोंवर् एकदा एका व्यक्तीने सुरा फेकून मारला होता. त्या व्यक्तीवर सुध्दा राग न धरता ओशोंनी त्याला प्रेमच दिले.

सन १९८० मध्ये अमेरिकेतल्या ओशो आश्रमाची स्थापना झाली होती. तिथली ६४००० एकर जमीन खरेदी करुन, 'रजनीशपुरम' ची केलेली स्थापना . तिथे २५००० साधक एकावेळी बसू शकतील एवढा ध्यानकक्ष होता. परंतु अमेरिकन सरकारचे लक्ष ओशो आणि कम्युन होते. त्यांना सत्य-असत्य या गोष्टित रस नव्हता. ओशोंच्या रुपाने त्यांना एकूणच ख्रिश्चन धर्मावर संकट वाटत होते. व त्याकरिता येनकेन प्रकारे त्यांना ओशोंचा काटा काढायचा होता. व कम्युन नष्ट अकरायचे होते. त्याकरिता त्यांनी ओशोंना कोणतेही संयुक्त कारण ने देता बेकायदेशीर पणे अटक केली व बारा दिवस निरनिराळ्या तुरुंगातुन फिरविले व त्या दरम्यान त्यांना 'थेलियम' नांवाचे विष अन्नातुन दिले. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला व अनेक प्रकारच्या शारिरिक व्याधींना त्यांना तोंड द्यावे लागले. शेवटी औक्टोबर १९८५ मध्ये ओशोंना अमेरिकेहून हद्दपार करण्यात आले. या सर्व गोष्टींचा अतिशय बारकाईने आणि सविस्तर आढावा ज्युलिएट फॉर्मन यांनी लिहीलेल्या ' Twelve days that shook the world'
या पुस्तकात वाचायला मिळतो. अमेरिकन सरकारचे बेकायदेशीर व बेमुर्वतखोर कृत्यांचे पाढेच बिनतोड पुराव्यानिशी या पुस्तकांत वाचायला मिळतात. यानंतर ओशोंनी जागतिक दौर्‍याच्या निमित्ताने अनेक पाश्चात्य देशांना भेटी दिल्या . त्या सर्व देशांनी ओशोंना प्रवेश नाकारला. या सर्वामागे अमेरिकेचे कारस्थान होते हेही सिध्द झाले. ओशो म्हणतात, "या निमित्ताने हे तथाकथित सुसंस्कृत , पढारलेले व लोकतंत्र प्रणालिचे देश किती बेकायदेशीर व खोटेपणाने वागू शकतात हे सिध्द होते."

पुण्याच्या आश्रमात अनेक जण उत्सुकतेपोटी येत असत. त्यात साहित्यिक , पत्रकार, उद्योगपती, अभिनेते असे अनेक क्षेत्रातले दिग्गज होते.

पु.ल.देशपांडे, शिवाजीराव भोसले, 'दै.केसरी', 'दै.सकाळ' अशा वर्तमानपत्रांचे संपादक इ. अनेक मंडळी आश्रमात येऊन तिथली दिनचर्या पाहून चकित होत असत.

ओशोंची धारणा अशी होती , की भारताने भौतिकाकडे पाठ फिरवली म्हणूनच भारत गुलामहिरी भोगू लागला. 'कर्मकांड म्हणजे धर्म' असा पंडित पुरोहितांनी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रचार केला . 'धन दान करा; म्हणजे तुम्हाला पुण्य लाभेल' असे सांगतांना धन स्वतः आधी मिळवले पाहिजे हे ते सोयीस्करपणे विसरले. आणि मग धन जोडण्यात पाप ते कसले? या प्रश्नावर पंडित , पुरोहित , काय बोलणार ? ओशोंनी या सर्व अनिष्ट प्रचाराचा आणि प्रवृत्तींचा सणसणीत शब्दात समाचार घेतला.

या पुस्तकाचे वाचक, अनेक चरित्र-ग्रंथाप्रमाणे हे पुस्तक वाचून जर केवळ 'छान आहे'; 'अरे वा', ओशो असे होते; हे आम्हाला माहीतच नव्हते' असं म्हणुन स्वस्थ बसतील तर ओशो म्हणजे नेमकं काय आहे हे त्यांना कधीही कळणार नाही. कारण ओशाँची ओळख तेव्हाच होते, जेव्हा आपल्याला आपली स्वतःच्या 'स्व'ची ओळख होते. जिवनात सर्व वस्तुंच्या उपभोगाच्या पलिकडे गेल्यानंतर जी 'अवस्तु' अनुभवाला येते, त्याचेच नाव 'ओशो' त्या अवस्तूकडे जाण्याचा मार्ग म्हणजेच द्यानमार्ग.

लेखनविषय: दुवे:

Comments

१००

ओशोंच्या कृपेने या लेखाला १०० प्रतिसाद नक्की मिळोत. ;-)

:-)

ओशो व आधुनिकोत्तरवाद याबद्दल जाणकारांकडून वाचायला आवडेल.

आता बाकी ९८

अगदी

ओशोंची धारणा अशी होती , की भारताने भौतिकाकडे पाठ फिरवली म्हणूनच भारत गुलामगीरी भोगू लागला.
या विषयी आम्ही सहमत आहोत.
धर्म प्रसाराचे फार मोठे काम या प्रभृतींनी केले आहे यात मात्र संशय नसावा.
आपला
गुंडोपंत

ओशोंवरचे आणखी एक पुस्तक

माझ्याकडे ओशोंचे एक आत्मचरित्र आहे. पण ते त्यांनी लिहिलेले नसून कुणीतरी संकलित केलेले आहे.

ह्या पुस्तकामुळे माझा ओशोंबद्दलचा आदर बराच वाढला. पुस्तकाचे नावच आहे Autobiography of a Spiritually Incorrect Mystic! दुर्दैवाने लोकांना ओशो फारसे भावले नाहीत कारण लोक फक्त् त्यांच्या रोल्स राईस् मोजत बसले. त्यांचे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोचलेच नाही....

गौरी

+१

माझ्याकडे ओशोंचे एक आत्मचरित्र आहे. पण ते त्यांनी लिहिलेले नसून कुणीतरी संकलित केलेले आहे.

इतरांकरवी 'आत्मचरित्र' लिहिण्यासाठी परकायाप्रवेशच आवश्यक ठरेल. अशा व्यक्तीविषयी आदर असल्यास तो वाढणे स्वाभाविकच आहे.

+१

>>रोल्स राईस् मोजत बसले
रोल्स राईस् मध्ये बसलेल्यांचे तत्वज्ञान नाही तर एवढ्या 'रोल्स राईस्' कश्या गटवल्या हे जास्त ऐकावे वाटेल. :)

आत्मचरित्र

ओशोंनी पुस्तक कधीच लिहिले नाही. प्रत्येक प्रवचनाचा रेकार्डीग व्हावे हा त्यांचा आग्रह असे. अशा रेकार्डीग मुळेच त्यांचे विचार अनेक पुस्तक रुपात आज उपलब्ध आहेत.

विश्वास कल्याणकर

दुनिया झुकती है........

जगभरात ओशोचे म्हणून 44 भाषेत सुमारे 2000 पेक्षाही जास्त मुद्रित व ऑडिओ पुस्तकांचे टायटल्स बाजारात आहेत. त्यांच्या विक्रीचे मूल्य 10 लाख डॉलर्सचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. परंतु त्यापैकी कुठल्याही पुस्तकात ओशोच्या वा ओशोच्या (अमेरिकेतील वा पुण्यातील) आश्रमातील

  • रोल्स रॉइस गाड्यांचा ताफा,
  • मादक पदार्थांचा सर्रास वापर
  • वायर टॅपिंग
  • करचुकवेगिरी
  • शहरातील पिण्याचे पाणी मुद्दामहून दूषीत करणे
  • खुनाचे प्रयत्न
  • होमोफोबिया
  • नायट्रस ऑक्साइडचा वास घेत बेधुंद अवस्थेत राहणे

इ.इ. भानगडींचा कुठेही उल्लेख नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते.
मध्य प्रदेश येथील चंद्र मोहन जैन रजनीश, श्री रजनीश, आचार्य रजनीश, भगवान रजनीश व शेवटी ओशो रजनीश कसा काय झाला हे आपल्यासारख्या सामान्याना कधीच कळले नाही (व कळणारही नाही!)
म्हणूनच दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये!

 
^ वर