दुसरी भाषा

नमस्कार,

पालकांना पडणार्‍या काही प्रश्नांचा उहापोह मी या आधीही उपक्रमावर केला आहे. पालक असणार्‍या आणि पालक नसणार्‍या उपक्रमींचाही या चर्चांत सहभाग असतो आणि अतिशय उपयुक्त सल्ले दिले जातात, मते मांडली जातात असा अनुभव आहे म्हणून आणखी एक विषय चर्चेस घेत आहे.

इयत्ता आठवीपासून ज्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेतील गुण उत्तम आहेत त्यांना दुसरी भाषा शिकण्यास प्रोत्साहित करणारे पत्र शाळेकडून गेल्या आठवड्यात घरी आले. त्यानुसार, स्पॅनिश, फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल आणि आपल्या आवडीनुसार विद्यार्थी भाषा निवडू शकतात.

आता आम्हाला प्रश्न पडला की या तीनही भाषांची फारशी माहिती नाही. तेव्हा आवडीनुसार भाषा कशी निवडायची? म्हणजे आवड निर्माण करण्यासाठी भाषेची थोडीशी ओळख होणे महत्त्वाचे आहे किंवा आवडीचा विचार न करता व्यवसायाभिमुख राहून भाषेची निवड करावी. (उदा. स्पॅनिश भाषक लोक अमेरिकेत बरेच असल्याने स्पॅनिश येणे भविष्यात उपयुक्त ठरू शकेल.)

  • उपक्रमींनी हा प्रश्न कसा सोडवला असता हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
  • पुढील दोन तीन महिन्यांत मुलांना परकीय भाषांची ओळख करून देण्यासाठी नेमके काय सांगावे?
  • ही ओळख त्यांना कशी करून द्यावी? काय आणि कसे पटवून द्यावे.
  • उपक्रमावर स्पॅनिश/फ्रेंच/जर्मन भाषा जाणणारे सदस्य आहेत. त्यांनी या भाषा शिकण्यासाठी का निवडल्या हे जाणून घ्यायला आवडेल.
  • का फारसा विचार न करता व्यवसायाभिमुख राहून स्पॅनिश स्वीकारावे?
लेखनविषय: दुवे:

Comments

ओरीएंटेशन

मी खालील तीन माहितीस्रोत त्यांना समजेल अशा स्वरुपात सांगुन निर्णय त्यांनाच घ्यायला लावला असता. तसेच शाळेत हा प्रश्न मांडून त्यांना तिनही भाषेची "ओरीएंटेशन" द्यायला लावुन मुलांना ठरवायला मदत होइल असे पहा असे सांगितले असते.
१. जर्मन
२. स्पयानिश
३. फ्रेंच

उत्तम धागा

मस्त धागा. चर्चा वाचण्यासाठी उत्सुक.
पुढेमागे कॅनडामध्ये स्थायीक होण्याच्या दृष्टीने फ्रेन्च भाषा येणे आवश्यक आहे एवढी माहीती मला आहे. पॉईंटस मिळण्याच्या दृष्टीने या भाषेचा उपयोग होतो.

अमेरिकेत स्पॅनिश उपयोगी - माझेही हेच मत

* उपक्रमींनी हा प्रश्न कसा सोडवला असता हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
* उपक्रमावर स्पॅनिश/फ्रेंच/जर्मन भाषा जाणणारे सदस्य आहेत. त्यांनी या भाषा शिकण्यासाठी का निवडल्या हे जाणून घ्यायला आवडेल.
* उपक्रमावर स्पॅनिश/फ्रेंच/जर्मन भाषा जाणणारे सदस्य आहेत. त्यांनी या भाषा शिकण्यासाठी का निवडल्या हे जाणून घ्यायला आवडेल.

फ्रेंच शिकण्याबाबत - "काही पर्याय नव्हता म्हणून". आमच्या शाळेत सातवीपर्यंत त्रिभाषासूत्र असे होते : पहिली इंग्रजी, दुसरी हिंदी, तिसरी मराठी.
आठवीनंतर तिसरी भाषा म्हणून मराठीशिवाय एकच पर्याय उपलब्ध होता - फ्रेंच. तालुक्याच्या गावातली शाळा, म्हणजे पर्याय होता हेच पुष्कळ म्हणायचे. फ्रेंच शिक्षणाची पद्धत "धड्यातील वाक्यांतल्या रिकाम्या जागा भरा" अशा प्रकारच्या पाठांतराची होती. उपयोगाच्या दृष्टीने जवळजवळ शून्य. दहावीमध्ये त्या मानाने शिक्षिका चांगली होती. बहुतेक मुले "मार्क चांगले पडतात" म्हणून याच प्रकारे शिकू इच्छितात, म्हणून तिने हात टेकलेले होते. तरी स्वतः तिचे उच्चार त्यातल्या त्यात बरे होते. पण चुकीचे उच्चार सुधारून शिकवण्यासाठी तिच्यापाशी तास नव्हते. या सगळ्या निराश परिस्थितीत तिने एक चांगले केले - ज्या मुलांना अधिक शिकायची इच्छा होती, त्यांना अभ्यासक्रमाबाहेरची सोपी-सोपी गोष्टीची पुस्तके देऊन प्रोत्साहन दिले.
त्या शिक्षिकेच्या मुळे मला वर्तमानपत्र वाचण्याइतपत फ्रेंच येते, पण उच्चार कळत नसल्यामुळे अगदी जुजबीसुद्धा बोलता-ऐकता येत नाही.
पर्याय असता, तर मी जरूर पोर्तुगीज शिकलो असतो. गोव्यात तेव्हासुद्धा काही सुविद्य वयोवृद्ध लोक उत्कृष्ट पोर्तुगीज बोलतात. समोरासमोर कोणाशीही बोलताना अर्थातच कोंकणी किंवा मराठीतच बोलणे होते. शाळेत थोडे शिक्षण मिळाले नाही, तर स्वतःहून त्यांच्याकडून भाषा शिकणे दुरापरस्त असते. भाषा उत्तमरीत्या बोलणारा हा कित्येकदा चांगला शिक्षक नसतो.

स्पॅनिश भाषा मी अमेरिकेत शिकलो. हे शिकण्यासाठी दोनतीन हेतूंचा शुभसंगम झाला होता. (१) स्पॅनिश बोलणारे काही मित्र होते. (२) जोडीदाराला स्पॅनिश शिकायची खुमखुमी होती. (३) इंग्रजी-भाषांतरात वाचलेले स्पॅनिश अभिजात साहित्य मुळात वाचायची इच्छा होती. (४) त्या वेळी आंतरराष्ट्रीय आरोग्यसेवा-व्यवस्थापन व्यवसायात पडायचे होते, त्यात स्पॅनिश उपयोगी पडेल, असे "व्यावाहारिकपणे" वाटले. (या व्यवसायात पडणे मुळातच "व्यावहारिक" नव्हते. त्यामुळे "व्यावहारिक"पणा पुष्कळदा टाकाऊ असतो.)
स्पॅनिश शिकल्यामुळे मला अनेक सुविद्य आणि धमाल मित्र-मैत्रिणींशी अधिक गहिरी मैत्री करता आली आहे. अमेरिकेच्या आजूबाजूच्या स्पॅनिशभाषक देशांत प्रवास करताना सोय झालेली आहे. (फक्त इंग्रजी बोलूनही प्रवास करता येतो, पण संवाद कोणाशी आणि किती विषयांवर करता येतो, त्यावर फार मर्यादा पडते.) कित्येक उत्तम कवितांचा-साहित्याचा उपभोग घेता आला आहे.
- - -
एखाद्या भाषेत संवाद आणि साहित्यास्वादाचा अनुभव मिळाला की असेही होते - आणखी-आणखी भाषा याव्या अशी खायखाय सुटते.
कन्नड यावे, तमिळ यावे, पोर्तुगीज यावे, अरबी यावे, चिनी यावे, ...
पैकी काही भाषा शिकायचा मी प्रयत्नही केलेला आहे. परंतु यश तसे नगण्यच. कारणे :
१. प्रौढाला शिवण्याचे प्रशिक्षण असलेला शिक्षक मिळत नाही
२. सरावासाठी वेळ मिळत नाही
३. पूर्वीइतकी ग्रहणशक्ती राहिलेली नाही
४. वापर करण्यास ठिकाण मिळत नाही.
- - -
मी जर आजही गोव्यात/महाराष्ट्रात राहात असतो, तर आणखी एक भारतीय भाषा - कन्नड, गुजराती, तेलुगु, बांग्ला शिकायचा प्रयत्न केला असता.

* पुढील दोन तीन महिन्यांत मुलांना परकीय भाषांची ओळख करून देण्यासाठी नेमके काय सांगावे?
* ही ओळख त्यांना कशी करून द्यावी? काय आणि कसे पटवून द्यावे.

माझा स्वतःचा अनुभव म्हणजे जमल्यास त्या भाषेच्या क्षेत्रात प्रवास करावा. मागे एकदा जर्मनीमध्ये कामानिमित्त गेलो होतो, तेव्हा लोक इतके छान वाटले, की "अरे आपल्याला जर्मन यायला हवे होते" असे राहूनराहून वाटत होते. लहानपणी कन्नडबद्दल असेच वाटे! कारण गाडी लोंडा-बेळगाव करत पुण्या-मुंबईला जायची. त्याचा "फायदा" घेऊन आईने कन्नड बाराखडी आम्हा मुलांना शिकवली, आणि स्टेशनांची नावे, आणखी फलक वाचण्यासाठी गंमत-जंमत म्हणून आम्ही मुले शिकलोसुद्धा :-)

- अमेरिकेतील काही राज्यांतून मेक्सिकोमधील काही पर्यटनस्थळांना ड्राइव्हिंग करून भेट देता येते. (स्पॅनिश इलाखा)
- अन्य काही ठिकाणांहून केबेक-कॅनडा येथे जाता येते (फ्रेंच इलाखा)
- नाहीतर प्रत्येक गावातल्या मेक्सिकन दुकानांमध्ये काही खास "भारतीय" वस्तू मिळतात. मी स्वतः केळीची पाने, केळफूल, करमले (कोकणात मिळतात - "स्टारफ्रूट"), अशा गोष्टी मेक्सिकन दुकानातून आणतो. पण पपई, पेरू, कैर्‍या, पपनस वगैरे इंडियन-स्टोरमधून मिळणार्‍या वस्तू मेक्सिकन दिकानातही मिळतात. अशा मेक्सिकन खरेदीच्या "सहली"त मुद्दामून टंगळमंगळ केली, मुलांना "तुम्हाला काय विकत घ्यायचे आहे" म्हणून खरेदीत गोवले तर तितकाच वेळ "पर्यटन" वाढेल. मग उगाच कोणी मैत्रीपूर्ण गिर्‍हाईक किंवा दुकानदाराशी "हे-काय-ते-काय" गप्पा मारता येतील. लोक एकमेकांत स्पॅनिश बोलतानाचे ऐकू येईल...

- - -

वेगळाच आणि महत्त्वाचा विचार :
मुलांनी स्वतः कुठले कुतूहल दाखवले आहे काय? त्यांच्या सध्याच्या छंदांच्या प्रसंगात दुसर्‍या कुठल्या भाषेतील चिह्ने वगैरे दिसतात काय? जपानी-चिनी वगैरे? त्याबद्दल त्यांचे स्वतःचे कुतूहल चाळवलेले आहे काय?

विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद

विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद. अमेरिकेत राहून स्पॅनिशचा सर्वाधिक उपयोग होऊ शकेल असे बोलणे घरात झाले होते परंतु माझ्या मुलीला फ्रेंच भाषेबद्दल किंचित अधिक आकर्षण दिसले. असे का हे विचारले असता त्यामागे काही विशेष कारणे होती असे दिसले नाही. (सर्वच स्पॅनिश शिकणार म्हणून मी काहीतरी वेगळे शिकावे आणि स्पॅनिशबद्दल किंचित अढी दिसली) पण स्पॅनिशचा उपयोग सांगितल्यावर तिला फ्रेंच-स्पॅनिशबद्दल भेदभाव राहिला नाही पण मी तिला भरीस पाडते आहे असे मला वाटू लागले. :-))

मुलांनी स्वतः कुठले कुतूहल दाखवले आहे काय?

फ्रेंच भाषेबद्दल कुतूहल वाटते हे वर म्हटले आहे पण का ते नेमके माहित नाही.

त्यांच्या सध्याच्या छंदांच्या प्रसंगात दुसर्‍या कुठल्या भाषेतील चिह्ने वगैरे दिसतात काय?

मध्यंतरी देवनागरी शिकण्याचे वेड लागले होते. काही जोडाक्षरे सोडली तर व्यवस्थित लिहिता-वाचता येत होते पण शाळेचा अभ्यास सुरु झाल्यावर सध्या वेड मागे पडले आहे. (हे वेड का लागले तर चित्रपटाची टायटल्स वाचता यावीत म्हणून. ;-))

आणखी थोडेसे अवांतरः

दोनतीन वर्षांपूर्वी वाद्य निवडण्याबद्दल असा प्रश्न आला असता खालील मुद्दे लेकीनेच मांडले

- ऑर्केस्ट्रात वायोलिन अधिक वाजते
- वायोलिनची सुरावट इतर वाद्यांपेक्षा आवडते
- वायोलिन वादक ऑर्केस्ट्रात पुढे बसतात

म्हणून वायोलिन शिकायचे आहे.

भाषांच्या बाबतीत तिला चटकन असे मुद्दे मांडता आले नाहीत. स्पॅनिशबद्दल थोडीशी अढी असल्याचे जाणवले पण थोडेफार समजावल्यावर ती दूर झाली.

हेच महत्त्वाचे आहे

परंतु माझ्या मुलीला फ्रेंच भाषेबद्दल किंचित अधिक आकर्षण दिसले.

शक्य असेल तेव्हातरी मुलांच्या कलाने जायला हरकत नाही. तसे केल्यास मुलगी फ्रेंच लवकर शिकून कदाचित तिला इतर भाषा शिकण्याचीही आवड निर्माण होईल.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

भाषा

ऑफिसकामानंतर वेळेचा सदुपयोग करावा म्हणून फ्रेंच शिकलो होतो. बाकी तसा इतर हेतू वगैरे काही नव्हता. नवीन भाषा शिकण्याची आवड म्हणून. तसेच फिरायला गेलो तर फ्रान्सला जाण्याची शक्यता जास्त वाटली. सोबत काम करणार्‍या बंगाली, तामीळ मित्रांमुळे त्या थोड्याफार शिकलो. पण कन्नड शिकण्याची इच्छा आहे.

जर्मन पेक्षा स्पॅनिश आणि फ्रेंच जास्त उपयोगी पडतील. कारण त्यांचे मूळ देश सोडून जगात बर्‍याच देशात या भाषा बोलल्या जातात. परंतु अनुवादक म्हणून करिअर करावयाचे असल्यास जर्मन शिकली तर जास्त फायदा होत असावा (मागणी-पुरवठा) असे वाटते.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

बहुतेक

प्रश्नांची उत्तरे माझ्या अनुभवातून देता येणार नाहीत. चर्चा उत्सुकतेने वाचते आहे.

* उपक्रमींनी हा प्रश्न कसा सोडवला असता हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

मुलांना फार चॉईस दिला तर मुले (निदान माझी मुलगी) फारसे ऐकत नाहीत :( असा अनुभव आहे. त्यामुळे आपण त्यांना नवीन विषयाची (नुसतेच भाषा असे नव्हे) थोडी ओळख करून द्यावी लागते. महत्त्व पटवावे लागते. हे महाअवघड काम आहे. कोणत्या क्षणी आपण पालकांपासून चालकांच्या भूमिकेत शिरतो ते कळत नाही. :)

वर धनंजय यांनी सांगितल्यावरून आठवण झाली, माझ्या वडिलांनी लहानपणी मला कन्नड मुलुखातून गाडी जाताना कन्नड भाषेची पुस्तके आणली होती. बंगाली भाषेचीही ओळख करून देणारी पुस्तके आणली होती. पण नंतर फॉलोअप झाला नाही तर ती भाषा मागे पडते हेही तितकेच खरे.

तशीच मागे गोव्याला मुलीबरोबर गेले तेव्हा मी जुजबी कोकणी बोलणे शिकवणारी पुस्तके आणली. इथल्या मित्रांमध्ये कोकणी भाषिक बरेच आहेत तेव्हा ही पुस्तके वाचलीस तर अमूक मावशीशी थोडेसे तिच्या भाषेत बोलता येईल असे सांगितले, त्यामुळे थोडा रस आला. पण तेव्हा देवनागरी वाचण्यातला रस कमी होता, त्यामुळे बंधने आली. आता गेले तीनचार आठवडे तीच आपण होऊन मराठी पुस्तके वाचते आहे. त्यामुळे या भाषेची ओळख बहुतेक परत नव्याने करू.

यक्षप्रश्न

मी पालकांपेक्षा मुलांच्या वयाला जास्त जवळची आहे असे वाटते म्हणून मी भाषा निवडताना काय केले आणि आता निवडायची झाल्यास काय करेन ते सांगते.

मी जेव्हा जर्मन भाषा शिकायला लागले तेव्हा नुकतीच १०वीची परीक्षा संपली होती. त्या वेळी जर्मन शिकणारी मुले बरीच कमी होती. मला आठवतं, त्या वेळी नवीन लेव्हल सुरू करायला १८ मुले जमण्याचीही मारामार होत असे. आमच्या शाळेतली एक ताई एमएमबीमध्ये जर्मन शिकणार होती म्हणून मला चर्चगेटपर्यंत जायला सोबत असेल आणि एकदम इंग्रजीमध्ये संवाद साधणार्‍या लोकांत सोबत असेल या दृष्टीने ती जिथे जाईल, तिथे मी गेले. पण नंतर जर्मनच्या प्रेमात पडले. पण जर्मन भाषेचा काही बाबतींत थोडा त्रासदायक अनुभव आला. एक म्हणजे इथे एमएमबी देईल त्याहून अधिक पुस्तके उपलब्ध नाहीत. त्यात एमएमबीला दर ४-५ वर्षांनी आपल्या लायब्ररीतली सगळी पुस्तके विकण्याचा आणि विकून झाल्यावर पुढच्या महिन्यात परत नव्याने पुस्तके जमवण्याचा झटका येतो. विकत घ्यावी म्हणावे तर काही जुजबी शब्दकोशांखेरीज तोही पर्याय उपलब्ध नाही. इथे डीडब्ल्यू सोडून कोणते जर्मन टी.व्ही. चॅनलही लागत नाही (तेही आमच्याकडे २०१०मध्ये लागायला लागले). त्यामुळे यापुढे कोणती भाषा शिकायची झाल्यास त्या भाषेतले मूळ साहित्य, चित्रपट आणि टी.व्ही. सिरियल्स सहजासहजी उपलब्ध असल्या तरच त्या वाटेला जायचे असे ठरवले आहे.

दुसरा एक मला महत्त्वाचा वाटणारा मुद्दा हा, की ती भाषा शिकवणारे शिक्षक कसे आहेत/ शाळेत भाषाशिक्षणाला अंत होत नाही, हे जरी खरे असले, तरी एखाद्या शिक्षकामुळे किंवा त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे एकदा का त्या भाषेविषयी अढी निर्माण झाली की ती आयुष्यभर जात नाही हे भारतातील एका विशिष्ट भाषेवरून पाहिलेले आहे.

आणि आणखी एक मुद्दा म्हणजे कोणत्या देशाबद्दल किंवा कोणत्या देशाच्या संस्कृतीबद्दल किंवा साहित्याबद्दल आपल्याला आकर्षण वाटते याचा मागोवा घ्यावा व त्या देशाची भाषा शिकावी. आम्हाला दहावीला इतिहास या विषयात पहिले व दुसरे महायुद्ध अभ्यासाला होते व त्या निमित्ताने मी वि.स. वाळिंबेंचे 'दुसरे महायुद्ध', 'ऍन फ्रँक ची रोजनिशी' (मराठीतून) ही पुस्तके वाचली होती व जर्मनी या देशाबद्दल एक कुतुहल निर्माण झाले होते.

असो. भाषानिवडीचा यक्षप्रश्न सोडवण्यासाठी ऑल द बेस्ट.

राधिका

माझे मत

माझ्या मते आपण नकळत आपल्याच आवडी मुलांवर लादत असतो, त्या कदाचित व्यावहारिक देखील असतील पण त्या लादल्या जातात हे खरे. येथील प्रतिसादात स्पॅनिश भाषेश मिळणारा सपोर्ट बघता आपले स्पॅनिश बद्दलचे मत अजून दृढ होणार ह्यात शंका नाही.

पुढील दोन तीन महिन्यांत मुलांना परकीय भाषांची ओळख करून देण्यासाठी नेमके काय सांगावे

माझ्यामते आपल्याला जी भाषा योग्य वाटते तिचीच ओळख करून द्यावी. मुलांची आवडीचे निकष भावनेशी जास्त जवळ असतात जे आपण "कोणते वाद्य शिकायचे" ह्या प्रसंगात नमूद केले आहे, त्यामुळे त्यांची भावना स्पॅनिश बद्दल दृढ केली कि निवडीचे काम होईल. सर्व भाषांचा परिचय करून दिल्यावरही मुले त्यामध्ये जे जास्त आकर्षक आहे तेच निवडणार, ते मान्य करायची तयारी ठेवावी अथवा आपली आवड हि त्यांची आवड कशी बनेल ह्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी धनंजय ह्यांनी वर नमूद केलेले पर्याय उत्तम आहेत, स्पॅनिश इलाख्यास भेट देणे, स्पॅनिश गोष्टींचे उद्दतीकरण होईल/संबंध येईल अशा गोष्टी इंग्रजी किंवा मराठीतून रोज मुलांना सांगाव्यात, काइट्स नावाच्या चित्रपटातील काही भाग जिथे ह्रीतिक स्पॅनिश शिकण्याचा प्रयत्न करतो तो दाखवावा (जर ह्रीतिक आवडता हिरो असेल तर), स्पॅनिश गाणी घरात वाजवावीत. असे सगळे काही करावे ज्यामुळे स्पॅनिश ला ग्ल्यामर प्राप्त होईल, आकर्षणातून निवड हा नियम मुले पाळतात.

हाच प्रकार सर्व भाषांबाबत केला जाऊ शकतो व मुलांना निर्णय घेण्यास वाव दिला जाऊ शकतो.

पण ह्यापलीकडे जाऊन माझे व्यावहारिक नसलेले मत असे आहे - मुले जी भाषा शिकत आहेत ती तुम्हास देखील शिकणे अपरिहाःर्य आहे, जर भाषा घरात बोलली गेली तर ती जास्त उत्तम रित्या मुले शिकू शकतील असे माझे मत आहे. तसेच गोडी टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला ती भाषा येणे महत्वाचे आहेच. एक मुद्दा असाही कि मुलांची ग्रहण शक्ती खूप जास्त असते, त्यामुळे अवांतर वेळेत दर वर्षी एक नवीन भाषा शिकण्यास काहीच हरकत नसावी, एक पूर्ण वर्ष एका भाषेसाठी मुलांना ती भाषा कळू शकेल एवढे नक्कीच पुरेसे आहे, पुढे शाळेत भाषा बदलण्याचे स्वात्यंत्र असल्यास त्याचा उपयोग होऊ शकेल. आता उपलब्ध वेळ आणि इच्छाशक्ती ह्याचा मेळ बसेल कि नाही हे तुम्हास जास्त योग्य ठाऊक.

अवांतर - माझी बहिण मला असे सांगत असे कि दर वर्षी एक नवीन गोष्ट शिकायची मग ते वाद्य असो/ भाषा असो/ खेळ असो/ कला असो, त्या विषयाची ओळख करून घ्यायची आणि मग त्यातील जे आपल्याला आवडते त्यास जास्त वेळ द्यायचा. ती त्याचप्रकारे तिच्या मुलाला दर वर्षी एका नवीन गोष्टीची ओळख करू देत आहे, ते तत्व मला खूपच प्रभावी वाटले.

भाषा शिक्षण

पालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या विषयावरचा धागा आहे.
माझी एक भाची पुण्याला फर्गुसन कॉलेजमधे शिकते. तिच्या बाबतीत सुद्धा हाच प्रश्न पालकांना पडला होता व त्या वेळी आम्ही बरीच चर्चा केली होती.
आता जी भाषा शिकायची त्याचा पुढील आयुष्यात उपयोग व्हावा म्हणून ती शिकायची की एक फॅशन किंवा गंमत म्हणून शिकायची हे प्रथम ठरवले पाहिजे. पाश्चिमात्य समाजात फ्रेंच शिकण्याची एक फॅशन असते असा माझा अनुभव आहे. त्या भाषेचा प्रत्यक्षात कितपत उपयोग होतो हे मला तरी फारसा काहीच अनुभव नसल्याने सांगणे कठिण आहे. तीच स्थिती बहुदा जर्मन शिकण्याची आहे. मी कॉलेजात जर्मन शिकलो होतो. आयुष्यात पुढे त्या ज्ञानाचा फारसा काहीच उपयोग झाला नाही.
दक्षिण मध्य एशिया मधे बरेच वास्तव्य केल्याने मला चिनी भाषेचे महत्व आता चांगलेच लक्षात आले आहे. अमेरिकेमधल्या वास्तव्यात स्पॅनिश भाषेला असलेले महत्व असेच उमगले होते. माझ्या निरिक्षणावरून माझे तरी ठाम मत झाले आहे की
1. शक्यता असल्यास चिनी(मॅ न्डरीन) भाषा शिकणे सर्वात महत्वाचे व गरजेचे आहे.

2. त्या खालोखाल मी स्पॅनिशला प्राधान्य दे ईन. अमेरिकेत वास्तव्य करायचे असल्यास स्पॅनिश जास्त उपयुक्त ठरावे. परंतु पुढच्या काही दशकांनंतर चिनी भाषाच सर्वात महत्वाची ठरणार आहे असे मला तरी वाटते.
3. फ्रे न्च जर्मन वगैरे भाषा गंमत किंवा हौस म्हणून शिकाव्या.भविष्यात फारशी उपयुक्तता दिसत नाही.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

मत

स्पॅनीश पर्यायाला मत दिले आहे. किंवा स्पॅनीश भाषा एक्स्ट्रा क्लास लावणे व लेकीला आवडेल ती उदा. फ्रेंच.

स्पॅनीश - अमेरीकेत बराच वापर तसेच द. अमेरिकतले देश, स्पेन
फ्रेंच - फ्रान्स बरोबर कॅनडा, बेल्जियम, स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग, मोनॅको व अनेक अफ्रिकन देशात जसे कॅमेरुन, हैती, सेनेगल, येथे देखील बोलली जाते.

उल्लेख केलेले सर्व देश तसे सुस्थितीतले आहेत जिथे पुढे मागे कामानिमित्त जायची संधी आहे.

आवड असलेली भाषा शिकायला कदाचित सोपीही वाटेल हा एक मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे.

माझी निवड

मी फ्रेंच भाषा शिकायला घेतली त्यामागे वेगवेगळी कारणं होती. ती थोडक्यात सांगतो. तसंच आधी माहीत नसलेले पण भाषा शिकल्यानंतर जाणवलेले काही घटकही सांगतो.

इंग्रजी साहित्याच्या वाचनात हळूहळू लक्षात येऊ लागलं की एका पातळीपलीकडे तुम्हाला फ्रेंच येते आहे हे गृहित धरलं जातं. वुडहाऊस किंवा अगाथा ख्रिस्तीसारख्या लोकप्रिय लेखकांच्या लिखाणातही फ्रेंच शब्द सर्रास पखरलेले असायचे. त्याच्या विरुध्द टोकाला असणार्‍या 'टाईम्स लिटररी सप्लिमेंट'सारख्या साहित्यविषयक गंभीर नियतकालिकातही (त्यात जगभरच्या आणि सर्व विषयांवरच्या सकस साहित्याला स्थान असतं) फ्रेंच आणि इतर भाषांत हा भेद दिसायचा. अनेक पुस्तक-परिचयांमध्ये वाक्यंच्या वाक्यं फ्रेंचमध्ये उद्धृत केलेली असायची आणि इंग्रजी अनुवाद दिलेला नसायचा. जर्मन किंवा इतर भाषांच्या बाबतीत मात्र अनुवाद दिलेला असायचा.

त्याशिवाय दृश्यकलांमधल्या माझ्या रुचीलाही फ्रेंच भाषा येणं गरजेचं होतं. एकेकाळी पॅरिस हे जागतिक कलेचं केंद्रस्थान असल्यामुळे दृश्यकलाक्षेत्रात फ्रेंच भाषेचं वर्चस्व होतं. फ्रेंचांचं कलाप्रेम जगजाहीर असल्यामुळे त्यांच्या सार्वजनिक अवकाशात कलेला उच्च स्थान आहे. त्यामुळे पडणारा फरक अनेक ठिकाणी दिसतो. ब्रिटिश लायब्ररीमधली आणि फ्रेंच लायब्ररीमधली कलाविषयक पुस्तकं/नियतकालिकं यांचा दर्जा आणि वैविध्य यांची तुलनाच होत नाही. अगदी पॅरिसच्या विमानतळावरचं पुस्तक-मासिकांचं दुकान आणि तसंच लंडन/न्यूयॉर्कमधलं दुकान यांतही हा फरक जाणवतो. लहान मुलांच्या पुस्तकांचं देखणेपण यांतही फ्रेंच पुस्तकं आणि इंग्रजी पुस्तकं यांतला फरक लक्षणीय असतो.

पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा विचार केला तर विसाव्या शतकाअगोदर जर्मन भाषेला पर्याय नव्हता. पण विसाव्या शतकात याही क्षेत्रात फ्रेंचचं महत्त्व वाढलं. तसंच सामाजिक किंवा मानव्य ज्ञानशाखांत होतं. याशिवाय अर्थात धनंजयनं म्हटलं तसं फ्रेंच वाङ्मय मूळ भाषेत वाचता येईल वगैरे फायदे तर होतेच. त्यामुळे फ्रेंच शिकणं जवळजवळ भागच होतं असं म्हणता येईल.

आता भाषा शिकताना/शिकल्यानंतर जाणवलेले घटकः

फॅशन, केटरिंग अशासारख्या व्यवसायांत पडणार्‍यांनाही फ्रेंच भाषा उपयोगी पडते. माझ्याबरोबर शिकणारे पुष्कळ जण अशा कारणांसाठी फ्रेंच शिकत होते.
जर्मन किंवा उत्तर युरोपिअन देशांतले लोक इतर भाषा शिकायला उत्सुक असतात, पण फ्रेंच लोक हे जवळजवळ एकभाषक असतात. त्यामुळे फ्रेंच लोकांशी किंवा फ्रान्सशी व्यावसायिक संबंध आला तर त्यांच्या मोडक्यातोडक्या इंग्रजीशी सामना करण्यापेक्षा फ्रेंच शिकणं फायद्याचं ठरतं.

याहून वेगळ्या जाणवलेल्या गोष्टी: भाषेतून संस्कृतीचा परिचय होतो आणि त्यातून एक वेगळा परिप्रेक्ष्य मिळतो. आपल्यावरच्या इंग्रज राजवटीच्या इतिहासामुळे (आणि नंतरच्या अमेरिकन आर्थिक सत्तेमुळे) अनेकदा असं लक्षात येतं की अँग्लो-सॅक्सन परिप्रेक्ष्यात अडकले राहण्याचा धोका ब्रिटन-अमेरिकेप्रमाणे आपल्याकडच्या उच्चशिक्षितांमध्येदेखील असतो. ब्रिटिशांच्या (आणि नंतर अमेरिकनांच्या) अनेक गृहितकांविरोधात असण्याचा इतिहास असलेल्या फ्रेंच संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी या आंग्ल-केंद्री परिप्रेक्ष्याहून वेगळ्या जाणवतात. त्यांचा परिचय झाल्यामुळे अनेक बाबतींत अधिक परिपूर्ण किंवा व्यापक दृष्टिकोन मिळतो. माझ्या दृष्टीनं ही कदाचित सर्वात मोलाची गोष्ट आहे.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

स्पॅनिश

व्यवहाराच्या दृष्टीने आणि शिकण्यातल्या सोपेपणाच्या दृष्टीने स्पॅनिश अधिक उपयुक्त ठरू शकेल, असं वाटतं. मी दोनेक वर्षांपूर्वी येथील विद्यापीठ विस्तारित विभागातून (एक्स्टेन्शन) फ्रेंचचे काही धडे वर्षभर गिरवले होते. सराव आणि स्वाध्यायाच्या अभावी आता जुजबी बोलण्या-वाचण्यापलीकडे फारशी प्रगती नाही; ह्या दृष्टिकोनातून स्पॅनिश अधिक सोपी ठरावी. फ्रेंच शिकल्याचा फायदा म्हणजे इंग्रजीतील काही वाक्प्रचारांचा शब्दश: अर्थ कळणे, थोडी चिकाटी दाखवल्यास इंग्लिशमध्ये अनुवाद होऊन आलेले साहित्य मूळ फ्रेंचमध्ये वाचता येणे (आणि काही वेळेस रेस्तराँतील मेन्यूचा अर्थ समजणे) इतका नक्कीच आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

मत

माझा अनुभव सांगायचा झाला तर भाषा शिकण्याची आवड आधीपासूनच होती पण शास्त्र शाखेत गेल्यामुळे तिला फारसा वाव मिळाला नाही. नंतर इटलीमध्ये वास्तव्य करण्याचा योग आला तेव्हा नेटाने इटालियन शिकण्याचे मनावर घेतले. साधारण दोन-एक वर्षात जवळजवळ कुठल्याही विषयावर चर्चा करणाइतकी प्रगती झाली. बातम्या, कॉमिक्स इ. वाचता येतात. दांतेची डिव्हाइन कॉमेडी आणि इतालो काल्व्हिनोचे साहित्य मूळ भाषेत वाचण्याचा मानस आहे, कधी पूर्ण होतो बघू या.

सध्या फ्रेंचशी झटापट चालू आहे. थोडे दिवस तमिळ शेजारी लाभल्यामुळे तमिळशी अत्यंत जुजबी ओळख झाली.

भाषा शिकण्याचे बरेच फायदे इतर प्रतिसादांमध्ये आलेच आहेत. याखेरीज एका इटालियन मित्राचे वाक्य नेहेमी आठवते. When you learn a new language, you can break through the culture and experience it from the inside. त्या संस्कृतीचा विचार करण्याचा दृष्टीकोन अनुभवास आल्यावर आपला दृष्टीकोन अधिक व्यापक होतो. तसेच एखाद्या कथेचा अनुवाद वाचणे आणि ती कथा मूळ भाषेत वाचणे यातही हा फरक जाणवतो.

मुलांना भाषा शिकणे सोपे जाते त्यामुळे जी आवडेल, शक्य असेल ती भाषा जरूर शिकू द्यावी. नंतर आणखी एखादी शिकायची असेल तरी हरकत नाही. नंतर तीच भाषा शिकण्यासाठी तिप्पट मेहेनत करावी लागते. भाषातज्ञ स्टीफन पिंकर यांच्या मते One free lunch in the world is to learn another language in early childhood.

अमेरिकेत स्पॅनिश उपयोगी ठरेल असे प्रतिसादांवरून दिसते आहे. स्पॅनिश शिकण्याचा आणखी एक फायदा म्हणजे ही रोमान्स लॅंग्वेजमध्ये येते. या गटातील एक भाषा शिकल्यावर बाकीच्या शिकायला सोप्या जातात कारण बरेच शब्द सारखे असतात, व्याकरणात समानता असू शकते. त्यामुळे इच्छा असल्यास नंतर फ्रेंच, इटालियन शिकायला सोपे जाईल.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

धन्यवाद

अनेकजणांच्या प्रतिसादांतून स्पॅनिशवर शिक्कामोर्तब झाल्याचे पाहून आनंद झाला.

शाळेतला विषय असल्याने फार काटेकोरपणे शिक्षक कोण? कसे शिकवणार? वगैरेंबाबत फारसे पर्याय नाहीत परंतु अनेक सदस्यांच्या प्रतिसादांतून रोचक माहिती मिळाली. चिंजं, आरागॉर्न, धनंजय, नंदन, अभिजित आणि राधिका यांच्या स्वानुभावाबद्दल धन्यवाद.

पण ह्यापलीकडे जाऊन माझे व्यावहारिक नसलेले मत असे आहे - मुले जी भाषा शिकत आहेत ती तुम्हास देखील शिकणे अपरिहाःर्य आहे, जर भाषा घरात बोलली गेली तर ती जास्त उत्तम रित्या मुले शिकू शकतील असे माझे मत आहे.

आजूनकोणमी यांचे मत मान्य आहे किंबहुना मी स्वतः तिच्यासोबत स्पॅनिश शिकायच्या विचारात आहे; फक्त माझा उत्साह टिकायला हवा. ;-)

असो. सध्या जरा बिझी आहे; चर्चेत भाग घेऊन निर्णयास मदत करणार्‍या सर्वांचे घाईघाईने आभार मानून रजा घेते.

 
^ वर