गांधी पुण्यतिथीनिमित्ताने...

आज महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त गांधीजींच्या स्मृतीस अभिवादन.

गांधीजी, अहींसा आणि त्याला अनुलक्षून स्वातंत्र्य म्हणल्यावर निघणारे वाद (आणि तेच इतर देशभक्त, स्वातंत्र्य सैनीक/सेनानींच्या बाबतीत) चावून चावून चोथा झालेले आहेत. त्यामुळे कृपया करून या धाग्याचा उपयोग त्यासाठी करू नये ही विनंती.

वास्तवीक "गंगेमधे गगन वितळले" हे अंबरीश मिश्र यांचे गांधीजींवरील पुस्तक वाचून अनेक वर्षे झाली. मात्र त्या पुस्तकातील एक मुद्दा माझ्या कायम डोक्यात घोळत राहीला. तो म्हणजे, आत्ताच्या भाषेत जर बोलायचे झाले तर गांधीजींनी, "जस्ट डू इट" असे म्हणत अंग झोकून दिले. तत्कालीन काँग्रेस चळवळ* आणि काँग्रेस नेतृत्वाला ते सुरवातीपासून मान्य होते अशातला भाग नाही. पण नंतर एकदा का सगळी जनता मागे जात आहे, हे लक्षात आले, तेंव्हा पर्यायच राहीला नाही आणि काँग्रेस चळवळ देखील गांधीजींच्या मागे गेली. आता हा श्री. मिश्र यांचा मुद्दा बरोबर का चू़क ह्यावर चर्चा होऊ शकते. पण त्याहूनही अधिक चर्चा मला या संबंधात "नेतृत्व" तयार कसे होते यावर कराविशी वाटत आहे.

गांधीजींच्या आधी एक टिळक होते ज्यांना "असंतोषाचे जनक" हे चिरोलने एखाद्या शिवीसारखे म्हणले पण ती त्यांची जनतेच्या दृष्टीने मानाची उपाधीच झाली. टिळक ज्या काळात आले त्या काळात काँग्रेसचे नेतृत्व हे एका विशिष्ठ अंगाने देशभक्ती करत होते. त्या मवाळगिरीस टिळकांच्या जहाल विचार पद्धतीने एका अर्थी "आउट ऑफ बॉक्स" असा विचार दिला आणि कधी अध्यक्ष नसताना देखील जनतेचे नेतृत्व केले. गांधीजी आले तेंव्हा टिळक गेल्याने "जहाल मतवादी राजकारणी नेतॄत्व" उरले नव्हते आणि काँग्रेस नेतृत्व हे परत त्यांच्या "टेक इट इझी" पद्धतीने इंग्रजांविरुद्ध लढा देत होते. यात या काँग्रेसी नेतृत्वास कमी करायचा प्रश्न नाही आणि उद्देशही नाही... मात्र गांधीजी आले परत एकदा "आउट ऑफ बॉक्स" विचार करत केवळ काँग्रेस चळवळीसच नाही तर सार्‍या जनतेस हलवले आणि शस्त्र हातात धरता आले नाही तरी लढा देता येऊ शकतो, असे दाखवत नेतृत्व दिले.

अशी अनेक नेतृत्वाची उदाहरणे देता येतील. पण राजकीय नेतृत्वाची उदाहरणे त्यामानाने कमीच मिळतील... मुद्दा इतकाच की, "आउट ऑफ बॉक्स" विचार हा केवळ उद्योगधंद्यातच लागत नाही तर मरगळलेल्या समाजमनास परत जागे करण्यासाठी आणि जनतेला या ना त्या रूपाने भरडवणार्‍या राजकारण्यांना खर्‍या अर्थाने विरोध करण्यसाठी म्हणून देखील करावा लागतो. तसा विचार करणारे आणि "जस्ट डू इट" म्हणत पुढे नेणारे नेतॄत्व जनतेला मिळाले तर त्यातून ती चळवळ, त्यातील गुणदोषांसकट यशस्वी होण्याची शक्यता असते. तेच मार्टीन ल्यूथर किंगने केले आणि मंडेलांनी केले.

मात्र जर हेच नेतृत्वहीन पद्धतीने झाले तर एखादी उल्का तात्पुरती आकाशात चमकून लक्ष वेधते, तितकेच काहीसे दुर्दैवाने अशा अपयशी चळवळींचे भाग्य ठरते. तिआनमेन च्या बाबतीत हेच झाले. अफगाणिस्तानात /इराकमधे चळवळ ही बाहेरच्यांच्या स्पूनफिडींगने झाली तर ते शक्य होऊ शकत नाही... आत इजिप्तच्या बाबतीत काय होईल ते समजेलच.

बाकी अजून एक प्रश्न आज सतत भेडसावत आहे, जर आज गांधीजी असते तर त्यांनी नक्की आजच्या राज्यकर्त्यांच्या विरुद्ध आवाज उठवताना, कशा प्रकारे, "आउट ऑफ बॉक्स" विचार केला असता? आवाज उठवला असता हे देखील नक्की, अहींसात्मकच राहीले असते हे देखील नक्की, पण गांधींजींच्या व्यक्तीमत्वाचा विचार केल्यास त्यांनी वापर करताना वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले असते असेच वाटत राहते. पण कसे, याचे उत्तर मला मिळत नाही आहे, तुम्हाला ते उत्तर माहीत आहे का अथवा ते उत्तर व्यवहारात वापरणारा गांधी कुठे आहे, ते माहीत आहे का?

-----------------------------
* काँग्रेस हा राजकीय पक्ष म्हणून नंतर त्यातूनच जरी उदयास आला असला तरी, काँग्रेस चळवळ म्हणूनच स्वातंत्र्याच्या पहाटे पर्यंत अस्तित्वात होती. थोडक्यात नंतरच्या काँग्रेसींवर शक्यतो चर्चा नसावी असे वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

समयोचित् लेख

गांधीजींच्या स्मृतीस अभिवादन.

आवाज उठवला असता हे देखील नक्की, अहींसात्मकच राहीले असते हे देखील नक्की
सहमत.

पण गांधींजींच्या व्यक्तीमत्वाचा विचार केल्यास त्यांनी वापर करताना वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले असते असेच वाटत राहते
असे वाटण्याचे कारण काय?

मला वाटते, अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात "माहितीच्या अधिकाराचा कायदा" आणण्यासाठी जशा प्रकारचे आंदोलन केले तशाच प्रकारचे आंदोलन त्यांनी केले असते, असे म्हणण्यास वाव आहे.

असहकार नक्कीच केला असता पण कायदेभंग कदाचित केला नसता. उपोषणाचा मार्ग नक्कीच चोखाळला असता.

कदाचित, स्वतंत्र भारताने बनवलेले कायदे अभ्यासून, त्यांचाच उपयोग अधिक परिणामकाराक रीतीने सत्ताधार्‍यांविरुद्ध केला असता, असे म्हणता येईल.

शेवटी हा जर-तरचा प्रश्न आहे. कल्पनाविलास करावा तेवढा कमी!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नेतृत्व

प्रत्येक चळवळीला एक नेतृत्व लागतं; ते नेतृत्व लार्जर दॅन लाईफ असेल तर चळवळ यशस्वी होण्यात मदत होते. गांधीजींचे असे असणे चळवळीला पूरक ठरले. याचबरोबर गांधीजींच्या "आउट ऑफ बॉक्स" विचारात पुरुष-बायका-म्हातारे-लहान मुले सर्व सामील होऊ शकत होते. तेही कसल्याही पार्श्वभूमीची गरज नसताना. त्यामुळे ही चळवळ आपली आहे याची उपरती होण्यास जागा होती.

आज गांधीजी असते तर त्यांनी नक्की आजच्या राज्यकर्त्यांच्या विरुद्ध आवाज उठवताना, कशा प्रकारे, "आउट ऑफ बॉक्स" विचार केला असता?

गांधीजी आता नाहीत ते बरेच आहे असे म्हणावेसे वाटते पण मूळ प्रश्नाचे उत्तर "हो" असे वाटते. त्यांनी आपल्या तत्त्वांशी फारकत घेतली नसती असे वाटते.

व्यक्ती की परिस्थिती?

प्रत्येक चळवळीला एक नेतृत्व लागतं; ते नेतृत्व लार्जर दॅन लाईफ असेल तर चळवळ यशस्वी होण्यात मदत होते.

सहमत.
"मदत होते" हे महत्वाचे आहे. मला वाटते की तशा व्यक्ती नेहमीच (कमी अधिक प्रमाणात) असतात पण त्यांना लोकप्रियता, प्रसिद्धी, यश मिळते की नाही ते परिस्थितीवर ठरते.
'मसीहा कोणत्याही अडचणीतून मार्ग काढतो, व्यक्तीचा अभाव हे चीन/अफगाणिस्तान येथील अपयशाचे कारण आहे' असे सुलभीकरण पटत नाही.

मसीहा????

देव सर्वेसर्वा असेल तर त्याला मसीहा चि कुबडी का लागते??

________________________________________________
गॉड् बोलणे हा यशाचा बेअरर् चेक् आहे
त्यामुळे मी कुणाशी क्रॉस होत नाही.

परिस्थिती

मला वाटते की तशा व्यक्ती नेहमीच (कमी अधिक प्रमाणात) असतात पण त्यांना लोकप्रियता, प्रसिद्धी, यश मिळते की नाही ते परिस्थितीवर ठरते.

सहमत आहे. किंचित वेगळ्या संदर्भात येथे परिस्थिती हाच सर्वात मोठा गुरू असे मी म्हटले होते. (आणखी एका वेगळ्या चर्चेतही असे म्हटले असता त्या विषयी शंका उपस्थित केली गेली होती पण तो धागा आता मिळत नाही)

लोकप्रियता, प्रसिद्धी आणि यश हे परिस्थितीवर अवलंबून असले तरी त्या परिस्थितीतून जाणार्‍या लक्षावधी लोकांपैकी एकालाच (किंवा एका विचारसरणीच्या गटाला) परिस्थिती "एनकॅश" कशी करायची याची उपरती होते. त्यामुळे परिस्थिती सोबत त्या व्यक्तीलाही क्रेडिट द्यावे लागतेच.

गांधी

खुद्द गांधी आत्ता असते तर अशी चर्चा अपेक्षित आहे की गांधींची विचारसरणी धारण करणारे कोणीही असते तर असा प्रश्न आहे?

तसे असल्यास आण्णा हजारे आहेतच की. आणि ते असताना सगळं बरंवाईट होतंच आहे.

खुद्द गांधी असते आणि आपली चलाख राजनीती बाजूला ठेवून निव्वळ सत्याग्रही म्हणून राहिले असते तर कदाचित आण्णा हजारेंपेक्षा वेगळं काही करू शकले असते असं वाटत नाही. (पुढच्या अनेक पिढ्यांना पुरतील एवढे प्रश्न नक्की निर्माण करून ठेवले असते हे वेगळंच.)

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

योगायोग

मात्र गांधीजी आले परत एकदा "आउट ऑफ बॉक्स" विचार करत केवळ काँग्रेस चळवळीसच नाही तर सार्‍या जनतेस हलवले आणि शस्त्र हातात धरता आले नाही तरी लढा देता येऊ शकतो, असे दाखवत नेतृत्व दिले.

ह्या गोष्टीचे मला देखील प्रचंड कुतूहल आहे. कदाचित योग्य वेळ/योग्य जागा/योग्य माणूस हा योगायोग अगदी जमून आला असणार. तीच गत मार्टिन ल्यु. किंगची.

धन्यवाद...

सर्व वाचक-प्रतिसादकांचे आभार.

@ सुनील:

'पण गांधींजींच्या व्यक्तीमत्वाचा विचार केल्यास त्यांनी वापर करताना वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले असते असेच वाटत राहते' असे वाटण्याचे कारण काय?

कारण इतकेच की गांधीजी हे आऊट ऑफ बॉक्स विचार करत असे मला वाटते. "माझा नंतरचे मत आधीच्या मतापेक्षा वेगळे असेल तर नंतरचे (लेटेस्ट) हे माझे मत समजा" असे ते म्हणत. अर्थात परीस्थितीनुरूप विचार बदलण्याची आणि ते मान्य करायची धमक त्यांच्यात होती. याचा अर्थ गांधीजींनी हातात तलवार अथवा पिस्तूल घेतली असती असे माझे म्हणणे आहे असे समजू नका. मात्र सुरवातीचे सत्याग्रह, मधल्याकाळातील दांडीयात्रा आणि नंतरच्या काळातील "चलेजाव" चळवळ करताना, "करा अथवा मरा" असे निर्णायक शब्द म्हणत त्यांनी बदल केलेच होते.

शेवटी हा जर-तरचा प्रश्न आहे. कल्पनाविलास करावा तेवढा कमी!

मला वाटते येथे माझा लेखनदोष अथवा मर्यादा समजावीत. हा प्रश्न जरी "जर-तर"च्या रुपात दिसत असला तरी उद्देश गांधीजी कसे वागले असते वगैरे नसून आत्ताच्या भारतात जे काही सर्वपक्षियांनी आणि राजकारण्यांनी तळ गाठला आहे आणि जनतेचा त्रास हा वाढतच चालला आहे त्या वेळेस नक्की कसे वागावे ह्या संबंधातील मुद्दा होता. म्हणून "गांधी पुण्यतिथीनिमित्ताने..." असे म्हणले. जर गांधीजी असे वागले असते (अथवा गांधीजींच्या ऐवजी, इतर कुठल्याही लाडक्या/पटणार्‍या नेत्याचे नाव घालता येईल) वगैरे म्हणत तसेच वागून आपण पुढे जाऊ शकणार आहोत का? नाहीतर समाजातील वाढणारी दरी, चिडचिड यातून वेगळ्या पद्धतीने इजिप्तची लाट येऊ शकते का आणि आल्यास त्या लाटेला दिशा देणारा लायकीचा लोकनायक नसणे हा मुद्दा आहे.

अण्णा हजार्‍यांनी नक्कीच मोठे काम केले आहे आणि त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या यशस्वी कामाबद्दल मला नितांत आदर आहे. पण तरी देखील कुठेतरी असे वाटते की तेच तेच शस्त्र जेंव्हा ते वापरू लागलेत तेंव्हा त्याचा उपाय कमी होऊ लागला आहे...

@ प्रियाली

...त्यामुळे ही चळवळ आपली आहे याची उपरती होण्यास जागा होती.

हेच म्हणायचे होते.

लोकप्रियता, प्रसिद्धी आणि यश हे परिस्थितीवर अवलंबून असले तरी त्या परिस्थितीतून जाणार्‍या लक्षावधी लोकांपैकी एकालाच (किंवा एका विचारसरणीच्या गटाला) परिस्थिती "एनकॅश" कशी करायची याची उपरती होते. त्यामुळे परिस्थिती सोबत त्या व्यक्तीलाही क्रेडिट द्यावे लागतेच.
"अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्‌। अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः॥", असे म्हणूनतर म्हणतात! :-)

@रिकामटेकडा
मला वाटते की तशा व्यक्ती नेहमीच (कमी अधिक प्रमाणात) असतात पण त्यांना लोकप्रियता, प्रसिद्धी, यश मिळते की नाही ते परिस्थितीवर ठरते.

सहमत. थोडे वेगळे: गीतेतील शब्द आठवले -
"अधिष्ठान, अहंकार, तशी विविध साधने | वेगळाल्या क्रिया नाना, दैव ते येथ पाचवे||"
मला येथे दैववादी/देववादी वगैरे काही अर्थ अभिप्रेत नाहीत आणि तसे डोक्यात ठेवून मी चालतही नाही. मात्र, यातील दैव याचा माझ्या लेखी अर्थ हा परिस्थितीशी लावता येईल. जर आधीच्या चार गोष्टी (अधिष्ठान, अहंकार, साधने, क्रीया) जर अमलात आणल्या तर नंतरचे सर्व परिस्थितीवरच अवलंबून असते. जे नेतृत्व असे "जस्ट डू इट" म्हणत पहील्या चार गोष्टी करते त्या नेतृत्वास भले शेवटी अपयश आलेले असोत, पण त्याला इतिहासात स्थान नक्कीच मिळते असे वाटते.

'मसीहा कोणत्याही अडचणीतून मार्ग काढतो, व्यक्तीचा अभाव हे चीन/अफगाणिस्तान येथील अपयशाचे कारण आहे' असे सुलभीकरण पटत नाही.

सुलभीकरणच केले आहे. मात्र नेतृत्व हे अनेक कारणांपैकी एक कारण असते असे नक्की वाटते आणि केवळ या संदर्भात लिहीताना ते वापरले आहे. नेतृत्वाची (अथवा तुमच्या शब्दातील "मसीहा"ची) वाट बघणारा समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही कारण सतत वापरल्या जाणार्‍या वाक्प्रचाराप्रमाणे अशा समाजात, "शिवाजी हा शेजारच्या घरात जन्माला येयला हवा असतो." असो.

@अभिजित

खुद्द गांधी आत्ता असते तर अशी चर्चा अपेक्षित आहे की गांधींची विचारसरणी धारण करणारे कोणीही असते तर असा प्रश्न आहे?

याच प्रतिसादात वर थोडेफार उत्तर आले आहेच. पण "गांधीजींची विचारसरणी धारण करणारे कोणीही" अथवा "गांधींच्या विचारसरणीने" असे म्हणा हवे तर. यातील गांधीजींची विचारसरणी म्हणजे स्वतंत्र भारताचे नागरीक म्हणून स्वतःच्याच देशातील राज्यकर्ते/राजकारण्यांच्या विरोधात योग्य तो आणि परीणामकारक आवाज उठवणे पण तो सशस्त्रपणे नाही... कारण लोकशाही देशात राजकारणी वाईट असले तरी जनतेचेच राज्य आहे आणि तसेच राहणे महत्वाचे आहे. असो.

@आजूनकोणमी

कदाचित योग्य वेळ/योग्य जागा/योग्य माणूस हा योगायोग अगदी जमून आला असणार. तीच गत मार्टिन ल्यु. किंगची.

सहमत. असे नेतृत्व आत्ताच्या जनतेला अपिल होईल, त्यासाठी ते कसे असावे हा प्रश्न आहे.

जाणता राजा !

गांधीजी असे वागले असते (अथवा गांधीजींच्या ऐवजी, इतर कुठल्याही लाडक्या/पटणार्‍या नेत्याचे नाव{मी शिवाजी घालते} घालता येईल) वगैरे म्हणत तसेच वागून आपण पुढे जाऊ शकणार आहोत का?
नक्कीच्

________________________________________________
गॉड् बोलणे हा यशाचा बेअरर् चेक् आहे
त्यामुळे मी कुणाशी क्रॉस होत नाही.

गांधी आणि स्ट्रॅटेजी

गांधींचे विचार वाचल्यानंतर मला नेहमी असे वाटते की त्यांच्यासारखा स्ट्रॅटेजिस्ट भूतकालात कधी झाला नाही व भविष्यात परत कधी होणार नाही. प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी ते अतिशय आऊट ऑफ बॉक्स विचार करत असत. मिठाचे आंदोलन हे त्यांच्या अशा विचारांचे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. सध्या गांधी असते तर त्यांनी काय केले असते हे त्यांची पुस्तके, किंवा चरित्र वाचून कधीच समजणार नाही हे नक्की. एका बाबतीत माझी खात्रीच आहे की ते असते तर त्यांनी उपाय तर शोधून काढलाच असता व भारतातील 120 कोटी लोकांच्या तो पचनीही पाडला असता.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

+१

120 कोटी लोकांच्या तो पचनीही पाडला असता.
---- :) सहमत्

________________________________________________
गॉड् बोलणे हा यशाचा बेअरर् चेक् आहे
त्यामुळे मी कुणाशी क्रॉस होत नाही.

 
^ वर