आज्ञार्थी वाक्ये आणि व्यक्तीस्वातंत्र्य

खूपदा एका गोष्टीचे कौतुकमिश्रीत नवल वाटले आहे - जर आपण एखाद्या अमेरीकन व्यक्तीस विचाराल "मी अमूक एक गोष्ट करू का?" तरी त्याचे उत्तर तू हे कर अथवा हे करू नकोस असे न मिळता " I will do so & so" किंवा "No. I will not do so & so" असे मिळते. विशेषतः या अशा दाखल्याचा भरपूर (व्यक्तीगत)विदा माझ्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी हा प्रश्न विचारला आहे तेव्हा तेव्हा अमेरीकन (जन्म/संगोपन आदिने अमेरीकेत असलेल्या) व्यक्तीने मला बहुधा याच अर्थाचे उत्तर दिले आहे.

बालसंगोपनाची काही उदाहरणे पहाण्यात आली -
एका मध्ये मुलगा त्याच्या बॅगकडे लक्ष देत नव्हता. भारतिय आपण करवादून किंवा शांतपणे पण "आज्ञार्थी" सांगीतले असते की "बॅगकडे लक्ष दे" याउलट अमेरीकन गोर्‍या आईने त्याला सांगीतले की "जॉन तू बेजबाबदार वागतो आहेस. तुझी बॅग चोरीस जाईल" ...... "John your bag is going to get stolen I am telling you right away. you are being irresponsible." म्हणजे तिने घटना आणि परीणाम फक्त एका संवादात समोरासमोर मांडले. त्यांचा अन्वयार्थ/सांगड लावून अनुरूप कृती करण्याचे स्वातंत्र्य मुलावर सोपविले.
स्वतःचे मत असे दुसर्‍यावर न लादणे हा यांच्या भाषिक वैशिष्ट्याचा नमुना म्हणावा लागेल काय?
मला मांडायचा मुद्दा हा आहे की - मूळच्याच कमी आज्ञार्थी वाक्यांमुळे आज हा समाज अधिक व्यक्तीस्वातंत्र्याच्या आहारी गेलेला दिसत असेल काय? याच्याउलट आपण मुलांना काय करावे काय करू नये हे अति सांगतो का?
बरेच दिवसांपासून हा प्रश्न माझ्या मनात होता. येथे त्याचे उत्तर मिळेल असे वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

रोचक निरीक्षण आहे

रोचक निरीक्षण आहे. आता मी जरा लक्ष देऊन असे संवाद ऐकेन.

(भाषिक वैशिष्ट्य नसावे. सांस्कृतिक वैशिष्ट्य असावे. भारतातील माझे नातेवाईक बघता नव्या पिढीतले पालक - माझे चुलत-मावस भाऊ-बहिणी वगैरे - त्यांच्या मुलांना पुष्कळदा कार्यकारणभाव सांगून स्वातंत्र दिल्यासारखे समजावतात. त्या मानाने मागच्या पिढीत - म्हणजे माझे चुलते-मावशा वगैरे - अशी "मुलांशी वाटाघाटी" तेवढी करत नसत. आणि त्या पूर्वीच्या पिढीत तर असले "लाड" मुळीच होत नसत, असे ऐकून आहे.)

भाषा आणि निगडीत संस्कृती

भाषा आधी आली आणि तिने संस्कृती घडविली की संस्कृती व्यक्तीस्वातंत्र्यप्रिय आहे म्हणून तिला अनुरूप भाषा घडत गेली हा संशोधनाचाच विषय होईल.
पण निदान त्या त्या भाषेने त्या त्या सामाजाच्या जडणघडणीवर मोठा परिणाम होतो असे म्हणता येईल का?
म्हणजे आपण जी भाषा वापरतो ती आपल्यावर (पक्षी समाजमनावर) दृष्य-अदृष्य परिणाम करत असते हे विधान धाडसी ठरेल का?

संशोधनाचा विषय आहे :-)

(अ) भाषा ऐकल्यामुळे संस्कृती बदलते की (आ) संस्कृती बदलल्यामुळे भाषा बदलते?
माझ्या मते (अ) आणि (आ) दोन्ही प्रक्रिया होत असल्या तरी (आ) प्रक्रिया अधिक प्रबळ असावी.

इंग्रजीत "ईट् युअर् स्पिनच्!", "डोन्ट् प्ले वुइथ् युअर् फूड्!" अशी आज्ञार्थी भाषा आधुनिक काळातही उपलब्ध आहे. (नुसते प्राचीन शब्दप्रयोग नाहीत.) त्यामुळे भाषा उपलब्ध असून मोठ्या प्रमाणात वापरली जात नाही, हे संस्कृतीचे माहात्म्य वाटते.

किंवा प्रत्येक काळात पुन्हा-पुन्हा चिघळणारा "पोलिटिकल् करेक्टनेस्"चा वाद घ्या. आजकाल कित्येक शब्दप्रयोग असे आहेत, की काही लोक अमानुष म्हणून अशिष्ट मानतात, पण अन्य लोक तथ्यदर्शक आणि शिष्ट मानतात. (उदाहरणार्थ स्त्रीचा अबला किंवा कमकुवत म्हणून उल्लेख.) मात्र पूर्वी सर्व सभ्य लोक ते शब्दप्रयोग सहज करत. पुढच्या काळात ते शब्दप्रयोग सर्वच लोक अपमानास्पद मानतील. (म्हणजे आजकाल कुठलाही सभ्य अमेरिकन व्यक्ती कृष्णवर्णीय व्यक्तीचा "नि**" म्हणून उल्लेख करत नाही. पण १८५०-१९०० काळात कृष्णवर्णीयांच्या बाजूने लढणारे लोकही - उदाहरणार्थ मार्क ट्वेन - हा शब्द वापरत असत.) त्यावरून मला तरी असे वाटते, की संस्कृती ही आधी बदलते, भाषा त्यानंतर बदलते.

पण होय - भाषासुद्धा संस्कृतीवर काही परिणाम करत असावी.

सहमत आहे

जर आपण एखाद्या अमेरीकन व्यक्तीस विचाराल "मी अमूक एक गोष्ट करू का?" तरी त्याचे उत्तर तू हे कर अथवा हे करू नकोस असे न मिळता " I will do so & so" किंवा "No. I will not do so & so" असे मिळते. विशेषतः या अशा दाखल्याचा भरपूर (व्यक्तीगत)विदा माझ्याकडे उपलब्ध आहे.

सहमत आहे. मला अगदी स्पष्ट आठवते की अमेरिकेत नोकरीचा पहिला दिवस होता. माझे मुख्य काम सुरु झाले नव्हते. माझ्या बॉसने मला विचारले की शेअर पॉइंटवर एक पेज डिझाईन करशील का? मी तिला करून दाखवले. त्यात तिला बदल हवे होते. तिचे वाक्य असे सुरु झाले - 'If I were you ....'

मला तिच्या बोलण्याचे कौतुक आणि आश्चर्य दोन्ही वाटले होते. तिच्याजागी मी असते तर 'हे असे नाही तसे कर' असे सरळ सांगितले असते. मी अनेकदा माझ्याबरोबर काम करणार्‍या लोकांना 'मला डायरेक्ट बोलण्याची सवय आहे' असे सांगून सावध करत असते. :-) कोणजाणे त्यांना माझे बोलणे न आवडावे.

मीही फार कमी आज्ञार्थी वाक्ये ऐकली आहेत. लहान मुलांच्या बाबतीतही अतिशय कमी.

याच्याउलट आपण मुलांना काय करावे काय करू नये हे अति सांगतो का?

माझ्या मते हो आणि नाही पण माझ्या अमेरिकन मैत्रिणींच्या मते हो. ;-) त्यांच्यामते भारतीय पालक जरा अतिच करतात.

हा भाषिक नाही, सांस्कृतिक फरक आहे या धनंजय यांच्या म्हणण्याशी सहमत आहे.

हलके घ्या.

येथील वर्कप्लेस् कल्चरच्या उदाहरणावरून सुचले : अमेरिकन ऑफिसातल्या आदर्श वर्तनासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास स्क्रँटन इथल्या डंडर-मिफलिन् या कंपनीचे उदाहरण अत्यंत आदर्श आहे. :-)

समांतर

एका मध्ये मुलगा त्याच्या बॅगकडे लक्ष देत नव्हता. भारतिय आपण करवादून किंवा शांतपणे पण "आज्ञार्थी" सांगीतले असते की "बॅगकडे लक्ष दे" याउलट अमेरीकन गोर्‍या आईने त्याला सांगीतले की "जॉन तू बेजबाबदार वागतो आहेस. तुझी बॅग चोरीस जाईल" ...... "John your bag is going to get stolen I am telling you right away. you are being irresponsible." म्हणजे तिने घटना आणि परीणाम फक्त एका संवादात समोरासमोर मांडले. त्यांचा अन्वयार्थ/सांगड लावून अनुरूप कृती करण्याचे स्वातंत्र्य मुलावर सोपविले.

स्थळ- गावाकडील एस्टी स्टँड
एक बाई आपल्या मुलाला सामानाकडे लक्ष द्यायला सांगत आहे
"मुडद्या, ध्यान कुडं हाये! तुपल्याला कव्हाधरनं गठुड्याक पघायला सांगतिये. निस्त बोंबलत गिळायला पाहिजे. गठुड ग्याल म्हंजी! तुह म्हतारं देनार हायका भरुन!"

अ) भाषा ऐकल्यामुळे संस्कृती बदलते की (आ) संस्कृती बदलल्यामुळे भाषा बदलते?
माझ्या मते (अ) आणि (आ) दोन्ही प्रक्रिया होत असल्या तरी (आ) प्रक्रिया अधिक प्रबळ असावी.

धनंजयच्या मताशी सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

रोचक

रोचक निरिक्षण. याचा संबंध संस्कृतीशी अधिक असावा. इंग्लंडमध्ये (आणि इतर इंग्रजी वापरणार्‍या देशांमध्ये) काय वापरतात बघायला हवे.

अमेरिकेतील व्यक्तीस्वातंत्र्य गुंतागुंतीचा विषय आहे. यात एक भाग अमेरिकेत स्थायिक झालेले लोक मूळ इंग्लंडमध्ये कुठून आले होते हा ही आहे. अमेरिकेत स्थायिक झालेले स्कॉटलंडमधून आलेले लोक (टेक्सासकडील भाग) आणि इंग्लंडच्या इतर भागातून आलेले लोक (उत्तरेकडील भाग) यांच्या वागणुकीत बराच फरक असतो.
--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

सहमत

याचा संबंध संस्कृतीशी अधिक असावा. इंग्लंडमध्ये (आणि इतर इंग्रजी वापरणार्‍या देशांमध्ये) काय वापरतात बघायला हवे.

सहमत आहे. इंग्लंडात असे पुष्कळ अनुभव आले आहेत. माझी काही आवडती वाक्यं:

I don't think that's a very good idea किंवा You may want to think twice before saying/doing that - हे मूर्खपणाचं आहे.
I wouldn't quite put it like that - मी अजिबात सहमत नाही. (आणि वर हे द्वयर्थी वाक्य वापरत केलेल्या अश्लील विनोदांची पखरणही मित्रांमध्ये करतात!)
I wonder how my mother would have reacted to that किंवा I wonder if this would send horses running wild in the street- हे असभ्य आहे.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

अगदी अगदी.

अमेरिकेतल्या नातेवाईकांना भेटून परत आल्यावर सर्वात प्रथम (म्हणजे जेट् लॅग् आणि प्रदूषण हे विषय संपल्यावर) जाणवतो तो हा आज्ञार्थ.अमेरिकेत भाजीच्या टोपलीत आपण एखादी नको असलेली भाजी चुकून टोपलीत टाकलीय हे काउंटरवर लक्षात आल्यावर 'मी ही वस्तू माझ्या बिलातून काढून टाकू इच्छितो ' अशा अर्थाच्या इंग्रजी वाक्याऐवजी 'आपण कृपया ही वस्तू काढून टाकावी' असे कितीही नम्रपणे सांगितले तरी त्या काउंटरवाल्या महिलेचे डोळे काही वेगळेच सांगून जात. ह्या आज्ञार्थावर आमच्याकडे वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या गटांबरोबर कितीदातरी वादविवाद झाला आहे. मला असे वाटते की आपल्याकडे आपली वैयक्तिक कामे इतरांकडून (यात स्थळकाळानुसार नोकर,सुना,मानाने लहान अशी नाती,आई-वडीलसुद्धा येतात)करून घेण्याची पद्धत आहे. त्यातून आपल्याकडे श्रमप्रतिष्ठा नाही. शिवाय उच्चनीचता आणि विषमता पक्की मुरलेली. त्यामुळे वागण्याबोलण्यात हातवारे आणि आज्ञार्थ येतो. जेव्हा समोरची व्यक्ती वयाने,मानाने किंवा पैशाने लहानमोठी असली तरी घटनेने तिला समान अधिकार मिळालेले आहेत,तिचे व्यक्तिस्वातंत्र्य जपले गेले पाहिजे ही संकल्पना आपल्या संज्ञाप्रवाहात मूळ धरेल,तेव्हा आपल्या वागण्याबोलण्यात फरक पडेल.

ही सभ्यता आपल्याला शिकण्यासारखी आहे!

ही सभ्यता आपल्याला शिकण्यासारखी आहे! किंबहुना आपण शिकायलाच हवी!!

का?

सहवैमानिकाने आज्ञार्थाऐवजी विध्यर्थ/संकेतार्थ/विधानार्थ वापरल्यामुळे अनेक अपघात घडलेले आहेत.
हा नम्रपणा भंपक आहे. ऍप्रेजलमध्ये 'वीकनेस' ऐवजी 'एरिया ऑफ इम्प्रूवमेंट' असा शब्दप्रयोग ऐकला की मला राग येतो.
"कॅन प्लीज यू डू धिस वर्क?" असा प्रश्न विचारल्यावर 'येस' असे उत्तर देऊन (काम न करता) गप्प बसावे असा विचार मनात येतो. त्यांना "डू धिस वर्क"/"प्लीज डू धिस वर्क" असे म्हणण्यात काय अडचण असते?

सत्यवचन! पण आज्ञार्थी आणि सूचक यांच्यात कुठेतरी सुवर्णमध्य हवा!

सत्यवचन! पण आज्ञार्थी आणि सूचक यांच्यात कुठेतरी सुवर्णमध्य साधायला हवा!

असहमत

मला पाश्चात्य संस्कृतीतील हीच औपचारीकता, नम्रपणा अफाट आवडतो.
"वीकनेस" या शब्दामध्ये भूतकाळातील परखड सत्य आहे पण पुढे काय्? तर "एरिया ऑफ इम्प्रूव्हमेन्ट" मध्ये आशेची किनार आहे, मॅनेजरचा माझ्यावरचा विश्वास आहे. मला वाटतं छटेमधे फरक आहे. आणि ज्यांची मातृभाषा इंग्रजी आहे त्यांच्याकडूनच या छटा योग्य वेळी सामोर्‍या येणं अपेक्षीत आहे.
ऑफीसमध्ये सडेतोड राहून काम करणे मुष्कील होईल , विशेषतः व्यवस्थापकांना "आयर्न फिस्ट इन् वेलव्हेट ग्लव्ह" हे धोरण अवलंबावेच लागते.

गप्प बसा!

हा नम्रपणा भंपक आहे. ऍप्रेजलमध्ये 'वीकनेस' ऐवजी 'एरिया ऑफ इम्प्रूवमेंट' असा शब्दप्रयोग ऐकला की मला राग येतो.

गप्प बसा! असे आज्ञार्थी सांगून गप्प बसणे होणार आहे का? :-) नसल्यास, आज्ञार्थी आणि नम्रपणामुळे त्या व्यक्तीस काय मोठा फरक पडतो? ;-)

तुमचे मुद्दे दोन्हीकडून समर्थन करणारे

विमानातील पायलट-कोपायलट यांच्यामध्ये थेट संवाद हवा, याबाबत हल्ली फार बोलबाला आहे.

माल्कम ग्लॅडवेल याने "टिपिंग पॉइंट"मध्ये याबद्दल चर्चा केली आहे. (याबाबत वॉलस्ट्रीट जर्नल ब्लॉगमधील दुवा). मला मूळ आकडेवारी बघायला आवडेल. जपानी भाषा कोरियन भाषेसारखीच उच्च-नीच-भेद करणारी आहे. जपानी विमानांत पायलट जपानी बेलतात का? त्यांचे अपघात अधिक होतात का?

मुद्द्यात दम आहे. पण अशी सेल्फ-इंप्रूव्हमेंट च्या घराण्यातली किंवा चुलतघर्‍आण्यातली पुस्तके विकता यावीत म्हणून कार्यकारणभाव फारच तानतात, असे मला वाटते. आणि काही म्हटले तरी या उदाहरणात अमेरिकन बोलण्याची पद्धत "थेट पद्धत" मानलेली आहे, आणि कोरियन पद्धत "आडवळणी".

म्हणजे शुची त्यांच्या अमेरिकन अनुभवाचे वर्णन करतात, त्या "तुझे-स्वातंत्र्य-आहे" भाषिक लकबीने विमानांचे अपघात होणार नाहीत, असे वाटते.

शिवाय हे लक्षात घेण्यासारखे आहे, की कोरियन भाषेच्या उच्चनीचभेदात उच्चपदस्थ थेट आज्ञा देऊ शकतोच. त्यामुळे विमान अपघातांचा मुद्दा खरा पाहाता उच्चनीचतेबाबत आहे, की स्वातंत्र्य-देणार्‍या-आडवळणी-आज्ञेबाबत आहे, हे बघितले पाहिजे.

- - -

ऍप्रेजलमध्ये 'वीकनेस' ऐवजी 'एरिया ऑफ इम्प्रूवमेंट' असा शब्दप्रयोग ऐकला की मला राग येतो.

का बरे? हे अप्रेझल कुठल्या संदर्भात आहे? माझ्या हाताखाली काम करणार्‍या व्यक्तीबद्दल मी अप्रेझल करत असेन, त्याला बडतर्फ करायचे नसेल, तर अप्रेझलमधून सुधार अपेक्षित आहे, हे तर तथ्य आहे. "वीकनेस" म्हणून जर हे तथ्यच सांगितले जात नसेल, तर मग तो अधू शब्द न वापरल्याबद्दल रुखरुख का वाटते?
मागे घराच्या किमतीचे अप्रेझल केले होते (अमेरिकेत) त्या अहवालात "एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट" असा वापर कुठेही आला नव्हता.

- - -

"कॅन प्लीज यू डू धिस वर्क?" असा प्रश्न विचारल्यावर 'येस' असे उत्तर देऊन (काम न करता) गप्प बसावे असा विचार मनात येतो.

हे काही कळले नाही. म्हणजे असा प्रश्न विचारला तर "सॉरी, आय कॅनॉट डू इट्" असे खरे उत्तर देण्याऐवजी "यस, आय कॅन" असे खोटे बोलण्याची शक्यता वाढते? मात्र "प्लीज डू धिस वर्क" म्हटल्यानंतर "नो, मॅडम" असे खरे म्हणण्याची शक्यता अधिक होते? असा काही माझा अनुभव नाही.

- - -
"प्लीज" हे सुद्धा ऐतिहासिक "इफ यू प्लीज, = आवडेल तर, आवडावे तर" या अटीचे अर्थ-हरवलेले रूप आहे. मात्र हा अर्थ त्या प्राचीन उमराव-लोकांना लोकांना सांगावासा वाटला, तसा आजकालच्या लोकांनाही सांगायला हवा असेल. या बाबतीत अर्थदरिद्री झाल्यामुळे "प्लीज" शब्द चालायचा नाही. तर मग "कॅन यू/कुड यू" वापरतात.
- - -

मला वाटते शुची यांच्या उदाहरणात किंवा त्या मुलाला परिणामांचा विचार करून सामानाकडे दुर्लक्ष करायचे ०-पेक्षा-अधिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्याच्या आईचे त्या पद्धतीने रागावणे निरर्थक-मृदू नसून काही प्रमाणात तथ्यवाहक आहे.

मान्य

या उदाहरणात अमेरिकन बोलण्याची पद्धत "थेट पद्धत" मानलेली आहे, आणि कोरियन पद्धत "आडवळणी".

म्हणजे शुची त्यांच्या अमेरिकन अनुभवाचे वर्णन करतात, त्या "तुझे-स्वातंत्र्य-आहे" भाषिक लकबीने विमानांचे अपघात होणार नाहीत, असे वाटते.

शिवाय हे लक्षात घेण्यासारखे आहे, की कोरियन भाषेच्या उच्चनीचभेदात उच्चपदस्थ थेट आज्ञा देऊ शकतोच. त्यामुळे विमान अपघातांचा मुद्दा खरा पाहाता उच्चनीचतेबाबत आहे, की स्वातंत्र्य-देणार्‍या-आडवळणी-आज्ञेबाबत आहे, हे बघितले पाहिजे.

मी सेल्फ हेल्प वाचत नाही, गॅल्डवेल मात्र बरा वाटला.
"तुझे-स्वातंत्र्य-आहे" या प्रकारच्या संदेशावर कृती घडण्यात थोडी दिरंगाई होईल असे वाटते.

माझ्या हाताखाली काम करणार्‍या व्यक्तीबद्दल मी अप्रेझल करत असेन, त्याला बडतर्फ करायचे नसेल, तर अप्रेझलमधून सुधार अपेक्षित आहे, हे तर तथ्य आहे.

अपेक्षित की इच्छित? "सुधार जमला तर बरे नाहीतर गच्छन्ति अटळ आहे" असा संदेश नसतो काय?

हे काही कळले नाही. म्हणजे असा प्रश्न विचारला तर "सॉरी, आय कॅनॉट डू इट्" असे खरे उत्तर देण्याऐवजी "यस, आय कॅन" असे खोटे बोलण्याची शक्यता वाढते? मात्र "प्लीज डू धिस वर्क" म्हटल्यानंतर "नो, मॅडम" असे खरे म्हणण्याची शक्यता अधिक होते? असा काही माझा अनुभव नाही.

खरे/खोटे हा मुद्दा नाही, तो 'हो/नाही' उत्तरासाठीचा प्रश्न आहे, "काम कर" अशी आज्ञाच नाही ;)

"प्लीज" हे सुद्धा ऐतिहासिक "इफ यू प्लीज, = आवडेल तर, आवडावे तर" या अटीचे अर्थ-हरवलेले रूप आहे. मात्र हा अर्थ त्या प्राचीन उमराव-लोकांना लोकांना सांगावासा वाटला, तसा आजकालच्या लोकांनाही सांगायला हवा असेल. या बाबतीत अर्थदरिद्री झाल्यामुळे "प्लीज" शब्द चालायचा नाही. तर मग "कॅन यू/कुड यू" वापरतात.

जुन्या अर्थाला दुर्लक्षावे असे ठरवितानाच "कॅन प्लीज यू डू धिस वर्क?" असा स्पूनरिजम झाला! आधी मी 'प्लीज'ला वगळून "कॅन यू डू धिस वर्क?" आणि "डू धिस वर्क" ही दोन प्रतिस्पर्धी वाक्ये प्रयोजिली होती.

मला वाटते शुची यांच्या उदाहरणात किंवा त्या मुलाला परिणामांचा विचार करून सामानाकडे दुर्लक्ष करायचे ०-पेक्षा-अधिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्याच्या आईचे त्या पद्धतीने रागावणे निरर्थक-मृदू नसून काही प्रमाणात तथ्यवाहक आहे.

मान्य.

उगाच..

>>माल्कम ग्लॅडवेल याने "टिपिंग पॉइंट"मध्ये याबद्दल चर्चा केली आहे.
हा मुद्दा बहुदा What the Dog Saw मध्ये आहे.

शक्य

तो मुद्दा आउटलायर्स या पुस्तकात वाचल्याचे स्मरते!

आउटलायर्सच

अरे हो..आउटलायर्सच..गफलत झाली.धन्यवाद.

खरेच की

(यांच्यापैकी कुठलीच पुस्तके मी वाचलेली नाहीत.)

कोरियन एअरबद्दल कथा "आऊटलायर्स" वाचत असणार्‍या एका स्नेह्याने मला सांगितली, असे अंधूक आठवते.

अप्रेझल

वळणावळणाने बोलण्याबाबतीतला एक रोचक लेख


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद

चपखल लेख. धन्यवाद.

विषय चांगला

विषय चांगला आहे. प्रतिसादही आवडले. भौगोलिक परिस्थितीचाही भाषेवर परिणाम होत असावा असे वाटते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कूल

युरोप मध्ये त्यामानाने वातावरण थोडे कूल आहे, पल्याड एवढी औपचारिकता तिथे जाणवत नाही पण अल्याड एवढा तुच्छ्पणा पण जाणवत नाही. अमेरिकेला गेल्यावर तेथील हा सामाजिक शिष्ठाचार भावतो, पण त्यानंतर युरोपात गेल्यावर (फ्रांस वगैरे अपवाद सोडल्यास) तेथील अनौपचारिक वातावरण खूपच सहज व सामावून घेणारे वाटते.

भारतात देखील मुंबई मध्ये एकप्रकारचा शिष्ठाचार पाळला जातो, तो जाणवण्यासाठी पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रात जावे.

"John your bag is going to get stolen I am telling you right away. you are being irresponsible." म्हणजे तिने घटना आणि परीणाम फक्त एका संवादात समोरासमोर मांडले. त्यांचा अन्वयार्थ/सांगड लावून अनुरूप कृती करण्याचे स्वातंत्र्य मुलावर सोपविले.
स्वतःचे मत असे दुसर्‍यावर न लादणे हा यांच्या भाषिक वैशिष्ट्याचा नमुना म्हणावा लागेल काय?

एका मराठी स्त्रीला हे जाणवणे खूपच उत्तम आहे, माझे हे विधान आक्षेपार्ह्य वाटू शकेल पण जर ते स्त्रीला जाणवले तरच ते पुढच्या पिढीत जाण्याची शक्यात दाट आहे म्हणून मी तसे विधान केले.

तसेच वर धनंजय ह्यांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे की ह्याचा संबंध भाषा वैशिष्ट्यापेक्षा संस्कृतीशी अधिक आहे, समोरच्याच्या स्वातंत्र्याचा आदर केला तरच तो आपल्या स्वातंत्र्याचा आदर करेल ही भावना डोक्यात असते, ती व्यक्त करण्यासाठी म्हणून अमुक एक भाषा वापरली जाते.

घसगुंडीवरून घसरण्यापूर्वी..

एक चार वर्षाची अमेरिकेत जन्मलेली मराठी मुलगी घसरगुंडीवरून घसरण्यापूर्वी मला म्हणाली, "तुम्हाला माहितेय्? जेव्हा छोटी माणसं घसगुंडीवरून घसरतात तेव्हा मोठी माणसं काय करतात? खाली उभं राहून त्यांना झेलतात्त.". इतक्या लहान वयातही आडवळणाने कसे बोलावे, हे अमेरिकनांकडून शिकावे.--वाचक्नवी

अगदी! अगदी!!

"तुम्हाला माहितेय्? जेव्हा छोटी माणसं घसगुंडीवरून घसरतात तेव्हा मोठी माणसं काय करतात? खाली उभं राहून त्यांना झेलतात्त.".

उत्तम उदाहरण. 'तुम्ही मला झेलाल का?' या साध्या प्रश्नासाठी ५० शब्द खर्च करतील. मलाही कधीतरी माझ्या सहकार्‍यांना हे विचारायचे आहे की ''तुम्ही सरळ का बोलत नाही, आडवळणाने का बोलता?' पण हे त्यांना कोणत्या आडवळणाने विचारावे हे न कळल्याने मी अद्याप विचारलेले नाही. ;-)

अस

त्याना विचारा कि, " तुम्ही या ऑफिसातुन रोज घरि जायला कोणता मार्ग चूज करता?? इथुन थेट एअरपोर्रवर जाता तिथून इजिप्तला जायला विमान पकडता मग मस्तपैकि पिरॅमिडे पाहून मग पुन्हा या शहरात यायला विमानात बसता आणि मग या शहरात येता त्यानंतर घरी जाता?? कि ऑफिसातुन थेट घरी पळता??"

कालच

टीव्हीवर 'आईस एज ३' पाहताना "इफ आय वेअर यू..." ने सुरू होणारे वाक्य ऐकले आणि या लेखाची आठवण झाली.

 
^ वर