समाजाच प्रबोधन करण्याची गरज.....

आपल्या समाजात एकीकडे बर्‍याच वैचारीक चर्चा होतात. तर त्याच वेळी दूसरीकडे जुन्या विचारसरणीचा पगडा दिसतो.

आपल्या समाजात पैसे खाणारा, गुंडगीरी करणारा, दारु पिऊन गटारात लोळाणारा, स्त्रीयांवर बलात्कार करणारा माणुस एकवेळ उजळ माथ्यानी फ़िरु शकतो वा एखादा वेश्येकडे नेमानी जाणारा माणुससुद्धा समाजात उघडपणे वावरु शकतो पण जोरजबरदस्तीनी वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेली एखादी वेश्या, तीची मुलं, तीला सहानुभुती दाखवणारी मंडळी ही मात्र समाजाच्या दृष्टीनी नालायक ठरतात.

वेश्या, त्यांची मुलं व HIV बाधीत व्यक्तींबाबत समाजाची दृष्टी इतकी कलुषीत असते की आपण कल्पनाच करु शकत नाही. मी या बाबतीत काही काम करतो म्हणल्यावर माझ्या अनेक मित्रांनी माझ्याशी संबंध तोडले. ऑरकुटवर अनेक मित्रांनी मला फ़्रेंड लिस्टमधुन डिलिट केलं. अर्थात अनेक नवीन मित्र मिळाले.

आपल्या सुशिक्षित समाजातसुद्धा ( अर्थात सुशिक्षित कोणाला म्हणायच हा प्रश्नच आहे ) हीच कल्पना आहे की या प्रकारचं काम करणारे कार्यकर्ते हे वेश्येकडे जात असलेच पाहिजेत. आपल्या समाजात कोणी नुसती कुजबुज केली की अमका अमका माणूस वाईट आहे, त्याच्या चारित्र्याबाबत बोलल की लगेच ऎकणार्‍याला खर वाट्तं, पण एखादा माणूस खुप चांगला आहे अस म्हणल. तर "काय सांगाव, खर खोट त्या प्रमेश्वरालाच माहिती" असा लगेच रिमार्क येतो.

एकीकडे लिव्ह-ईन रिलेशनस्‌ला व समलिंगी विवाहांना कायदा मान्यता देतोय. तृतिय पंथियांना कायद्यानी मतदानाचा हक्क मिळालय, रेशन कार्ड मिळालय. त्यांना लिंग बदलाचा हक्क मिळाला आहे. तर दूसरीकडे आजही विधवा, घटस्पोटीत व अनाथ व्यक्तींकडे बघण्याची समाजाची दृष्टी कलुषीत दिसते. एखाद्या लग्न मोडलेल्या व्यक्तीबाबत वाटेल त्या वावड्या उठवल्या जातात. घटास्पोटित व्यक्तिंना अपमानीत वागणुक मिळते. एखाद्या मुलं न झालेल्या जोडप्याकडे समाज अशा नजरेनी बघतो की त्यांना मेल्याहुन मेल्यासारखं होतं. मला एक कार्यकर्ता माहीती आहे की ज्याच लग्न, तो HIV ची माहिती तरुण वर्गापर्यंत नेण्याच काम करतो, या एकाच कारणास्तव तीन वेळा मोडल आहे.

माझी एक विद्यार्थिनी आहे, ती एका वेश्येची मुलगी आहे. ही वेश्या हैद्राबादच्या खानदानी वेश्या कुटुंबातली आहे. (यात सुद्धा खानदानी हा प्रकार आहे बरं का ! ) त्यांचे संबंध पूर्वी राजे रजवाड्यांशीच असायचे, सध्या ते असतात मोठ्या उद्योगपतींशी. ही मुलगी अत्यंत सुंदर आहे, एक खानदानी सौन्दर्य आहे तीच्याजवळ. प्रचंड बुद्धीमत्ता आहे, नम्रता आहे विचार करण्याची क्षमता आहे. या मुलीला ग्रॅज्युएट झाल्यावर चांगली नोकरी मिळाली. बरे दिवस आले आईनी वेश्याव्यवसाय बंद केला. या मुलीच्या प्रेमात मुलं नाही पडली तरच नवल. पण अनेकजण ती एक वेश्येची मुलगी आहे, तेव्हा तीची छेड काढायला आपल्याला पूर्ण परवानगी आहे, असाच अर्थ घेतात व तीच छेड काढायचा प्रयत्न करतात. कॉलेजचे प्रोफ़ेसरसुद्धा यात मागे नाहीत. आज ही समाजाची विचारसरणी आहे.

वेश्यागृहातुन सोडवलेल्या बाईला व तीच्या मुलांना कामं मिळत नाहीत. चांगल शिक्षण मिळत नाही. एखाद्या हिजड्याला भिक मागणं वा शरिर विक्रय करणं या शिवाय दूसरा कोणाता तरी उद्योग करावा अस वाटत असेल तर त्याला समाज उभा करत नाही. त्यांना जर शरिरविक्रय करायच नसेल, भिक मागायची नसेल, तर एकमेव मार्ग उरतो व तो म्हणजे गुन्हेगारी वा गुन्हेगारांना मदत करणं. खर तर या लोकांच योग्य पद्दतीनी पुर्नवसन नाही केल तर ते आपल्या सर्वांसाठि फ़ार धोक्याच आहे.

आज समाजाच प्रबोधन करण्याची गरज आहे. आपल यावर काय मत आहे ?

लेखनविषय: दुवे:

Comments

शंका

बाकी सारी मते पटली पण

HIV बाधीत व्यक्तींबाबत समाजाची दृष्टी इतकी कलुषीत असते

व्याभिचारानेच बहुतेक गुप्तरोग होत असतील आणि व्याभिचार निषिद्ध असेल तर असे होईलच ना?

एकीकडे लिव्ह-ईन रिलेशनस्‌ला व समलिंगी विवाहांना कायदा मान्यता देतोय. तृतिय पंथियांना कायद्यानी मतदानाचा हक्क मिळालय, रेशन कार्ड मिळालय. त्यांना लिंग बदलाचा हक्क मिळाला आहे. तर दूसरीकडे आजही विधवा, घटस्पोटीत व अनाथ व्यक्तींकडे बघण्याची समाजाची दृष्टी कलुषीत दिसते.

तुमच्या हेतूविषयी शंका घेत नाही पण या वाक्याच्या पहिल्या भागात नाराजी व्यक्त होते आहे.

जमेची बाजू

प्रबोधनाची गरज ही प्रत्येक समाजाला आहे. १००% प्रबोधन झालेला समाज सापडणे कठिण असावे; प्रबोधनाचे विषय आणि व्याप्ती बदलते इतकेच.

कुठलाही समाज नव्या संकल्पनेला राजरोस तयार होत नाही. त्यासाठी वेळ, शिक्षण, संयम या सर्वांची गरज पडते. जेव्हा तुम्ही म्हणता,

ऑरकुटवर अनेक मित्रांनी मला फ़्रेंड लिस्टमधुन डिलिट केलं. अर्थात अनेक नवीन मित्र मिळाले.

तेव्हा विधानात आशा दिसून येते, जे महत्त्वाचे आहे. समाजातील काहीजणांना तरी विषयाचे महत्त्व पटले आहे हे कळते. ही जमेची बाजू आहे. किंबहुना, ज्यांनी तुम्हाला आज डिलीट केले ते भविष्यात तुम्हाला पुन्हा ऍड करण्याची शक्यता आहे कारण संपूर्ण समाज तुमच्या मताविरुद्ध नाही. काहीजणांचे अलरेडी प्रबोधन झालेले आहे.

ही मुलगी अत्यंत सुंदर आहे, एक खानदानी सौन्दर्य आहे तीच्याजवळ. प्रचंड बुद्धीमत्ता आहे, नम्रता आहे विचार करण्याची क्षमता आहे. या मुलीला ग्रॅज्युएट झाल्यावर चांगली नोकरी मिळाली. बरे दिवस आले आईनी वेश्याव्यवसाय बंद केला.

इथेही मला प्रबोधन दिसते. त्या मुलीचे आणि तिच्या आईचे. त्यांनी स्वतःला वेश्याव्यवसायातून बाहेर काढले ही प्रबोधनाची पहिली पायरी. दुसरी पायरी त्यापेक्षा उंच असेल आणि गाठायला थोडा वेळ लागेल.

-१

>>एखाद्या हिजड्याला भिक मागणं वा शरिर विक्रय करणं या शिवाय दूसरा कोणाता तरी उद्योग करावा अस वाटत असेल तर त्याला समाज उभा करत नाही.

याच्याशी असहमत आहे. हिजड्यांना (म्हणजे जे चौकात भीक मागताना-आणि त्यावेळी इतर सामान्य नागरिकांना हॅरॅस करताना दिसतात ते) भीक मागण्याची सक्ती कुणी करत असेल असे वाटत नाही. माझ्यासमोर साडी नेसून येणारा हिजडा पँट शर्ट घालून आला (आणि विचित्र हावभाव करीत नसेल) तर त्याला नॉर्मल काम द्यायला माझी किंवा बहुधा कोणाचीच हरकत नसेल.

बाकी प्रबोधनाची आणि मनोवृत्ती बदलण्याची गरज नेहमीच असते याच्याशी सहमत. शेजारच्या संकेतस्थळावरचा कौल तुम्हीच टाकला आहे का?

नितिन थत्ते

माझे मत

तुमच्या कामाचे कौतुक वाटते.
पण ह्या विशयावर समाजाचे प्रबोधन कसे काय होऊ शकते?
तुम्ही समाजातील ज्या वर्गाबद्दल बोलत आहात, तो टक्केवारीने नेहमीच कमी असतो. ज्यांची टक्केवारी कमी असते त्यांना अशाप्रकारचेच दुय्यम दर्जाचे जीवन जगावे लागते. अशांना 'आदर्श मानणे' समाजाला पेलण्यासारखे आहे का? त्यांची टक्केवारी खूप जास्त झाली तर मग चित्र वेगळे होवू शकते.

सध्यातरी जे जसे आहे तसे स्विकारत आपल्यापरीन आपली स्वप्रतिमा हळू-हळू सुधारत, आपले आयुश्य सुखी कसे करता येईल, हे प्रत्येकाने पहायचे.

शुभेच्छा

उपक्रमवर स्वागत

तुमचे कार्य चांगले वाटले. नक्की काय करता याबद्दल लिहलेत तर अजून आवडेल.

जोरजबरदस्तीनी वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेली एखादी वेश्या, तीची मुलं, तीला सहानुभुती दाखवणारी मंडळी ही मात्र समाजाच्या दृष्टीनी नालायक ठरतात.
यातील जोरजबरदस्ती शब्द खटकला. स्वेच्छेने व्यवसायात आलेल्या/करणार्‍याबद्दल सहानुभूती नसावी असे त्यातून ध्वनित होते.

'वेश्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करायला हवे. असे पुनर्वसन करताना समाजाने मुक्त मनाने पाठिंबा द्यायला हवा.' असे तुमचे म्हणणे दिसते. तुमच्या कार्यास शुभेच्छा.

प्रमोद

शंका

जोरजबरदस्तीनी वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेली एखादी वेश्या, तीची मुलं, तीला सहानुभुती दाखवणारी मंडळी ही मात्र समाजाच्या दृष्टीनी नालायक ठरतात.
यातील जोरजबरदस्ती शब्द खटकला. स्वेच्छेने व्यवसायात आलेल्या/करणार्‍याबद्दल सहानुभूती नसावी असे त्यातून ध्वनित होते.

(मुलांना कधीच स्वेच्छा नसते म्हणून त्यांना संरक्षण हवेच हे मान्य परंतु) चैनीसाठी* ही कृती करणार्‍या व्यक्तींबद्दल सहानुभूती का असावी? त्यांचे पुनर्वसन म्हणजे नेमके काय करावे?
शिरस्त्राण न घातलेल्या दुचाकीस्वाराला अपघात झाल्यास नुकसानभरपाई मिळते काय? धूम्रपान करणार्‍यांना विम्याचे हप्ते समानच असावेत काय? पर्वतारोहण करताना अपघात झाल्यास मिळणारी सहानुभूती न्हाणीघरात घसरून अपघात झाल्यास मिळणार्‍या सहानुभूतीइतकीच असावी काय?
* 'सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक किमान परिस्थिती' ची व्याख्या केली की चैनीची व्याख्याही शक्य होईल.

हे लक्षात आले नाही

मान्य.

मला कदाचित सहानुभूतीत सहवेदना दिसली होती. (इतर व्यावसायिकांना जेवढी सहानुभूती तेवढीच इथे.)
दुसरे असे की शिरकाव कसा झाला, त्यानंतर स्वेच्छा आहे का मजबूरी अशा प्रश्नांचे उत्तर पुढील काळासाठी फारसे गंभीर नसावे.

प्रमोद

सहानुभूती

चैनीसाठी* ही कृती करणार्‍या व्यक्तींबद्दल सहानुभूती का असावी? त्यांचे पुनर्वसन म्हणजे नेमके काय करावे?

आणखी एक तिसरा प्रकार -

स्वेच्छेने चैनीसाठी प्रवेश परंतु नंतर व्यवसाय न रुचल्याने, व्यवसायाच्या काळ्या बाजूंनी घेरले गेल्याने इतर व्यवसायांसारखा चटकन बदलता येण्याजोगा व्यवसाय नसल्याने जर या व्यक्तीची व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी मदतीची अपेक्षा असेल तर सहानुभूती वाटणे शक्य आहे असे वाटते.

सहानुभूतीचे पारडे कोणासाठी जड असावे हा वेगळा मुद्दा.

अवांतरः वरील प्रवृत्तींना तर आपल्याकडे डोक्यावर बसवायची फॅशन निघाली आहे. थोडेफार जवळीक साधणारे उदाहरण मोनिकाताई बेदींचे. ह. घ्या.

व्याख्या

'सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक किमान परिस्थिती' ची व्याख्या---

(सन्मान याचा अर्थ् मी आत्मसन्मान या अर्थाने घेते. ) अशाप्रकारे जगण्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे मनासारखे शिक्षण व त्यासाठि आवश्यक ती सर्व साधने.
कपड्यांचे तीन जोड- १ अत्यावश्यक २. पहिला ओला झाला कि.. स्टेपनी म्हणुन. ३. या दोघामधला कालांतराने जो सर्वात आधि खराब होइल तो घरी घालता येइल.
ज्या वेळि भुक लागेल् त्या वेळि अन्न... पाणि... आणि.... आंघोळ, झोप, अभ्यास यासाठी आवश्यक असे घर खरेदि करण्यासाठी पैसा.

कसे ठरवणार?

माझ्या भुवया खराट्यासारख्या जाड्या आहेत. मला पार्लरमध्ये जाऊन त्या ट्रीम केल्या नाही तर खूप न्यूनगंड येतो. माझा हा न्यूनगंड दूर करण्यासाठी अवश्यक पैसा चैनीत मोडतो की "आवश्यक किमान परिस्थिती" मध्ये?
_________________________________________________
वरील सर्व गोष्टींसाठी माझ्याकडे पैसा आहे पण माझ्या दातांचे सिमेंट/चांदी चे फिलींग सारखे करावे लागते. हा पैसा कोणत्या पर्यायात मोडतो?
____________________________________________________
पुस्तकवाचन ही माझी मानसिक गरज आहे. महीन्याला ४ जाड पुस्तके हा खर्च.... वगैरे वगैरे वरीलप्रमाणे.

उत्तर

»
प्रतिसाद
कसे ठरवणार?
प्रेषक शुचि (सोम, 01/24/2011 - 20:33)
माझ्या भुवया खराट्यासारख्या जाड्या आहेत. मला पार्लरमध्ये जाऊन त्या ट्रीम केल्या नाही तर खूप न्यूनगंड येतो.
>>> हा आपला न्युनगंड असल्याने पार्लरपेक्षा आपल्याला मानसिक उपचारांची जास्त् आवश्यकता आहे. व हा खर्च अतितत्काळ् गरज या प्रकारात मोडतो.
_________________________________________________
वरील सर्व गोष्टींसाठी माझ्याकडे पैसा आहे पण माझ्या दातांचे सिमेंट/चांदी चे फिलींग सारखे करावे लागते. हा पैसा कोणत्या पर्यायात मोडतो?
>> अतितात्काळ गरज
____________________________________________________
पुस्तकवाचन ही माझी मानसिक गरज आहे. महीन्याला ४ जाड पुस्तके हा खर्च.... वगैरे वगैरे वरीलप्रमाणे.
>> जगण्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे मनासारखे शिक्षण व त्यासाठि आवश्यक ती सर्व साधने. हे मी आधिच् स्पष्ट केलं आहे ना....

कामाचं कौतुक आहेच.

प्रबोधन होणे गरजेचेच आहे यात शंकाच नाही. आपण वर उल्लेख करता त्या घटनांकडे पाहण्याची दृष्टी आज तितकी निकोप नसेलही, पण बदलांची सुरुवात होत आहे. काही जुन्या विचारसरणीचा पगडा काळाच्या ओघात मागे पडेल. आणि भविष्यात याबाबतीत कोणतीही विषमता असणार नाही असे वाटते. आपले काम कौतुकास्पदच आहे.

अवांतर : मागे एकदा भिन्न कादंबरीचा मुसुंनी परिचय करुन दिला होता. काही दिवसापूर्वीच भिन्न कादंबरी वाचून संपवल्यानंतर आपला अनुभव त्या तुलनेत काहीच नाही असे वाटले.

-दिलीप बिरुटे

कार्य

तुम्ही या बाबतीत काही काम करता म्हणजे नक्की काय काम करता?? ते सान्गाल का??

लेख

लेख आवडला. "प्रबोधना"ची प्रक्रिया सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. ती व्हायची गरज आहे याच्याशी सर्वसाधारणपणे सहमत आहे.

माझ्या बाबतीत घडलेला एक गमतीदार किस्सा सांगतो. सुमारे दहा वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे. परदेश प्रवास करत होतो. विमानात शेजारी एक वयस्क बाई होत्या. गौरवर्ण, घारे डोळे. त्यांची बॅग चढवाउतरवायला मामुली मदत केल्याने त्यांच्याशी संवाद घडायला सुरवात झाली. त्यांनी माझी एकंदर बरीच चौकशी केली. स्वतःबद्दल जे सांगितले त्यावरून त्या आपल्या मुलाकडे का मुलीकडे काही महिन्यांकरता चाललेल्या होत्या. माझे शिक्षण, नोकरी, वास्तव्य याबद्दल अनेक प्रश्न त्यांनी विचारले. माझे पहिले नाव मी सुरवातीलाच सांगितले होते. शेवटी अनेक प्रश्नांनंतर त्यांनी माझे आडनाव विचारले. मला काय लहर आली नकळे , मी त्यांना "कांबळे" असे उत्तर शांतपणे दिले. ( हे माझे खरे नाव नव्हे.) राहिलेल्या प्रवासात आमचा संवाद फारसा झाला नाही.

मी म्हण्टल्याप्रमाणे, "प्रबोधना"ची प्रक्रिया सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. ती व्हायची गरज आहे याच्याशी सर्वसाधारणपणे सहमत आहे.

प्र. का. टा. आ.

प्र. का.टा.आ.

स्वदेस

म्हणजे एकंदर त्या बाइ देशीच होत्या तर.... गौरवर्ण घारे डोळे यामुळे निर्माण झालेला गैरसमज् लगेच दूर झाला.

गरज आहे खरी

उपक्रमावर तुम्ही लिहिते झालात हे चांगले. तुमच्या कार्याची आणि अनुभवांची अधिक माहिती देत जावी, ही विनंती.

हो

असेच वाटते.

 
^ वर