तीन प्रकारचे डेव्हलपर्स

व्यवस्थापनाबद्दलचा विशेसषतः संगणक क्षेत्रातील व्यवस्थापनाबद्दल खूप मस्त लेख वाचनात आला. यामध्ये कोणत्याही आय टी कंपनीमधील डेव्हलपर्स ची प्रमुख ३ व्यक्तीमत्वे अधोरेखित केलेली आहेत. त्यांचा कंपनीवर होणारा परीणाम आणि दुष्परीणाम टाळण्याचे उपाय सुचविले आहेत. लेख मूळातून वाचण्यासारखा आणि उल्लेखनिय आहे.

प्रथम व्यक्तीमत्व - वेठीस धरणारे डेव्हलपर्स
या पठडीत येणारे डेव्हलपर्स हे बरेचदा स्ट्रॅटेजिक प्रॉड्क्टवरती अनेक मुख्य निर्णय स्वतःचे स्वतः घेतात मग भलेही त्यांना परवानगी असो वा नसो. स्वतःच्या चूकीच्या निर्णयांनी ते कंपनीला तसेच ग्राहकाला वेठीस धरतात. जॉनचच उदाहरण घ्यायचं तर जॉनला एक अतिशय दोषपूर्ण (डिफेक्टीव्ह) असे वेब टेस्टींग टूल दिले होते. हे टूल जुन्या परिभाषेत होते आणि जॉनला यातील दोष दूर करण्याचे काम सोपविले होते. पण जॉनच्या मते या टूलमधील दोष (डिफेक्टस) ही वरवर दिसणारी कणकण होती, मूळात रोग अतिशय गंभीर होता. आणि या रोगावर एकच उपाय होता तो म्हणजे संपूर्ण प्रॉडक्टच्या प्रॉडक्ट नव्या परिभाषेत लिहून काढणे. आता समजा जॉनचे म्हणने खरे असले तरी ते व्यवहार्य नव्हते कारण ग्राहक हे टूल वापरत होता आणि त्यांच्याकडे तितका वेळ नव्हता. पण जॉन आता एक वेगळीच खेळी खेळू लागला ती म्हणजे तो दोष दूर करण्यात मुद्दाम विलंब लावू लागला. कंपनीचे वेळापत्रक ढासळू लागले, कंपनीने ग्राहकाचा रोष ओढावून घेतला आणि सरतेशेवटी जॉनची हकालपट्टी झाली.
तर मूळातच अशा वेठीस धरणार्‍या डेव्हलपर्स ना कसे ताळ्यावर आणायचे त्या परामर्ष या लेखात येतो.

द्वितिय व्यक्तीमत्व - महाराजे/महाराण्या डेव्हलपर्स
हे डेव्हलपर्स ज्यांना नवनवीन कोड लिहीण्याची दांडगी हौस असते परंतु तोच् स्वतः लिहीलेला कोड पुढे राखण्याची (मेंटेन) तितकीच नावड असते.हे लोक एकामागे एक निर्मीतीक्षम प्रकल्प (क्रिएटीव्ह असाइनमेन्ट्स) स्वतःपुरते निर्माण करत जातात, शोधत जातात पण नंतर अपेक्षा ही की उरल्या सुरल्या प्रकल्पाची जबाबदारी अन्य कोणीतरी खांद्यावर घ्यावी. आरंभशूर!!! अशा लोकांचे सहकारी या लोकांवर खार खाऊनच असतात कारण यांचे प्रकल्प नंतर बिचारे सहकारीच राखत (मेंटेन) बसलेले असतात.
अशा डेव्हलपर्स बरोबर कसे वागायचे याचा उहापोह या लेखात छानच केला आहे.

तृतिय व्यक्तीमत्व - झडप घालणारे डेव्हलपर्स
हे डेव्हलपर्स बहुसंख्य वेळा एखाद्या प्रॉडक्टवर नवशिके असल्यापासून लागतात, नंतर त्याच प्रॉडक्टबद्दल स्वमेहनतीवर एकूण एक शिकून घेतात. त्यातील खाचाखोचा, गुण-दोष यांचे पूर्ण द्न्यान मिळवतात. पण मुख्य म्हणजे स्वतः कमावलेलं द्न्यान नंतर दुसर्‍या कोणालाही देत नाहीत. याबद्दल समर्थन काय तर- दुसर्‍याला शिकवण्यात जास्त वेळ जाईल त्यापेक्षा मी चुटकीसरशी समस्या सोडवेन. अशा रीतीने त्या प्रॉडक्टचा संपूर्ण ताबाच हे लोक घेऊन टाकतात. आणि मग यांचे पद अढळ पद बनते. ना यांना कोणी काढू शकते ना या लोकांना हलायचे असते.कंपनीत अशी स्वतःची जागा बनवली की व्यवस्थापन यांच्यापुढे दात आणि नखं काढलेल्या सिंहासारखे हतबल होऊन जाते.अशी वाईट परिस्थितीच येऊ नये म्हणून काय करावे हे या लेखात आले आहे.

मला हा लेख खूप आवडला. अशी व्यक्तीमत्व आजूबाजूला पाहीली आहेत. कंपनी आणि व्यवस्थापनाला त्रास होताना पाहीला आहे. त्या दृष्टीने हा लेख वास्तववादीच आहे. लेखिकेला अनेक दशकांचा मौल्यवान अनुभव आहेच.

लेखनविषय: दुवे:

Comments

गमतीदार

गमतीदार. लेखात या तीन व्यक्तिमत्त्वांना दिलेली नावेही गमतीदार आहेत :
१. चांचा (हायजॅकर)
२. फडावरची तारका (प्रिमा डॉना)
३. नियंत्रणपिसाट (कंट्रोल फ्रीक)

बाकी उपाय दिलेले आहेत ते सामान्यज्ञानातले आहेत - म्हणजे सोर्स कोड कुण्या एका डेव्हलपरला काबीज करू देऊ नका - तशा प्रकारची यंत्रणा आधीपासून राबवा, वगैरे.

चपखल नावे

अरे ही नावे फारच मस्त वाटतात अगदी चपखल :)
धन्यवाद धनंजय.

जबराट

तिन्ही नावे जबराट!

डेवलपर

डेवलपर कसाही असो तो डिझाईन डॉक्युमेंटेशन करतो की नाही हे माझ्यामते महत्त्वाचे आहे. जर तो करत असेल तर कधीही त्याला नारळ देता येईल. करत नसेल तर आधी करायला लावून नंतर नारळ देता येईल - यात थोडासा वेळ जाऊ शकतो त्यामुळे चांचा, फता किंवा निपि असला तरी डिडॉ करतो का नाही हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे. ;-)

माझ्या प्रोजेक्टवर एक एकपाठी-जिनिअस आर्किटेक्ट आहे. सर्व याच्या डोक्यात असते. त्याला मध्यरात्री उठवून प्रश्न केला तरी तो क्षणभर विचार करून झटकन उत्तर देईल. एखादा प्रश्न आज विचारला आणि वर्षभराने विचारला तरी त्याचे उत्तर तेच असेल परंतु जे काही आहे ते फक्त याच्या डोक्यात आहे आणि याच्या डोक्याचा ऍक्सेस मला नाही. तो डेवलपर नाही त्यामुळे त्याला नारळ देणेही सोपे नाही ही माझी रड. :-(

बाकी, असे नमुने दिसतात हे खरे.

आम्ही एका प्रकारच्या नमुन्याला मेसायाह् असे नाव दिले आहे. हे प्राणी कुठेही सापडतात. सारी दुनिया का बोझ हम उठाते है अशी त्यांची श्टाईल असते. एकंदरीत त्यांनी कामाचा ताबा घेतलेला असतो. खाचाखोचा त्यांना माहित असतात पण आपल्याला हवी तेवढीच आणि हवी तशीच माहिती ते इतरांना पुरवत असतात. लोकांना वाटत असते की ते त्यांच्या मदतीला तत्पर असतात, संकटातून त्यांना वाचवत असतात. तसे ते करतच असतात पण सोबत आपली पोझिशन बळकट करत असतात. मात्र जे खरेच सारी दुनिया का बोझ हम उठाते है या समजूतीत मरेस्तोवर काम करत असतात त्यांना मी हमाल असे म्हणते. ;-)

मजबुत तटबंदी

--सारी दुनिया का बोझ हम उठाते है अशी त्यांची श्टाईल असते. एकंदरीत त्यांनी कामाचा ताबा घेतलेला असतो. खाचाखोचा त्यांना माहित असतात पण आपल्याला हवी तेवढीच आणि हवी तशीच माहिती ते इतरांना पुरवत असतात.--

प्रत्येकाला असे व्हावे असे वाटत असते. ते न होऊ शकणारे अशा लोकांबद्द्ल पोटशूळ होऊन अनेक कारवायात गुंतलेले असतात. त्यामुळे वरील मंडळी अधिकाधिक मजबुत तटबंदी घालतात.

सहमत

खाचाखोचा त्यांना माहित असतात पण आपल्याला हवी तेवढीच आणि हवी तशीच माहिती ते इतरांना पुरवत असतात.

वरले वाक्य '१००% यशस्वी आणि टेश्टेड' आहे. :-) बाकी मेसायाह् बनू नये कारण इतर तुमचा दुस्वास करू लागतात आणि कधीतरी क्रूसावर चढायची वेळ येते हे पाहिले आहे.

सहमत

डेवलपर कसाही असो तो डिझाईन डॉक्युमेंटेशन करतो की नाही हे माझ्यामते महत्त्वाचे आहे. जर तो करत असेल तर कधीही त्याला नारळ देता येईल. करत नसेल तर आधी करायला लावून नंतर नारळ देता येईल - यात थोडासा वेळ जाऊ शकतो त्यामुळे चांचा, फता किंवा निपि असला तरी डिडॉ करतो का नाही हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे. ;-)

व्यावसायिक आयुष्यात केटी (knowledge transfer) ही संकल्पनाच मुळी स्वसंरक्षणाच्या अंतःप्रेरणेला जागृत करते.

डिझाइन त्याची बेबी आहे

तो आर्किटेक्ट जिनियस असेलही पण मुख्य म्हणजे हे डिझाइन त्याची बेबी आहे म्हणून त्याला ते पाठ आहे. जेव्हा तुम्ही डेटाबेस शून्यापासून डिझाइन करता, नॉरमलाइझ करता, प्रायमरी-की, फॉरीन की इतकी पक्की मेंदूत जाऊन बसते की एक चित्रमय ई-आर आकृती तयार होते. मग नवल ते काय की झोपेतूनही तुम्हाला ते सांगता येईल.
त्याने डॉक्युमेंट करणे हे महत्वाचे आहेच. लेखात लिहील्याप्रमाणे त्याचे द्न्यान हे कंपनीचे ऍसेट् आहे त्याची खाजगी मालमत्ता नाही.

जीनिअस माणसे

तो आर्किटेक्ट जिनियस असेलही पण मुख्य म्हणजे हे डिझाइन त्याची बेबी आहे म्हणून त्याला ते पाठ आहे.

माणसे फक्त त्यांच्या विषयांत तज्ज्ञ असल्यास त्यांना मी जिनिअस म्हणणार नाही. जिनिअस माणसाचे वेगळेपण सर्वत्र (देहबोली, शब्दांची निवड वगैरेपासून सुरु..यांना कुठलाही विषय वर्ज्य नसतो, अनेक विषयांतील सखोल माहिती असते. ते इतरांच्या नेहमी १० पावले पुढे असतात.) उठून दिसते. या माणसाच्या प्रतिभेपुढे इतर सतत दबल्यासारखे वागतात. उच्चपदस्थ ही यांच्यासमोर आपले तोंड उघडून आपला मूर्खपणा जाहीर करण्यास बिचकतात. अशा लोकांना कामाच्या ठिकाणी अतिशय मान मिळतो. त्यांची एखादी गोष्ट चुकत असेल, इतरांना खटकत असेल तरीही त्याकडे डोळेझाक केली जाते.

जिनियससुक्त

अगदी बरोबर वर्णन केले आहे तुम्ही.

स्वपरीक्षण

मेक्यानिकल इंजिनीयरींग व इतर नॉन-कॉप्युटर इंजिनीयरींग कंपन्यांकडून म्यानेजमेंट तंत्रद्न्यान (६ सिग्मा, तत्सम) उसने घेऊन् घेऊन अजुनही काहीच दिशा न मिळालेल्या ह्या इंडस्ट्रीचा असा उपहासात्मक लेख प्रथमच वाचनात आला. स्वपरीक्षणाच्या मार्गावर जायला सुरुवात केलेली दिसतेय त्यासाठी आयटीवाल्यांना शुभेच्छा.

कोडरला सर्वोच्च न्यायालयटाइप ताशेरे मारणा-या ह्या लेखिकेने एखादेवेळस टेस्टरला धरुन बडवले पाहीजे असे वाटून गेले. तरीही आपण थोडेफार शेरे येथे टेस्टर-म्यानेजर लोकांसाठी मारु शकतो- त्यातील हा पहीला प्रयत्न.

१. डंब-ल-डोरः फक्त म्यान्युएल टेस्टींग करु शकणारा हा डंबलडोर ८-९ वर्षांनंतरही कुकी म्हणजे काय? असे साधे-साधे प्रश्न विचारले तरी उत्तरे देऊ शकत नाही.

हेहेहे!

कुकीचे जाऊ द्या... टेस्टस्क्रिप्ट म्हणजे काय हे ही माहित नसणारे महाभाग टेस्टर म्हणून समोर उभे राहतात. त्यांना बंडलबोर म्हणता येईल. ;-)

सांभाळा

सांभाळा हो! नाहीतर टेस्टर कम्युअनिटीशी बंधुत्व ठेवणारे "टेस्टरबद्द्ल एव्हढा राग का?" असे लेख टाकतील

छान !

मस्त् आहे लेख.
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

मनुष्य स्वभाव

शुचि यांचा लेख छान आहे.आय टी क्षेत्राशी एक संगणक वापरणारा याच्या पलीकडे कोणताही संबंध आयुष्यात कधीच आलेला नसल्याने तांत्रिक शब्द व त्याचे अर्थ समजू शकले नाहीत.
पण मला हे जाणवले की शुचि यांनी वर्णन केलेले तीन व्यक्तीस्वभाव फक्त आयटी क्षेत्रापुरतेच मर्यादित नाहीत. अगदी साध्या व्यवस्थापकीय कार्यालयाचे उदाहरण घेतले तरी हे तीन स्वभाव लगेच दिसू शकतात्त. नियमातील खाचा खोचा ज्यांना पक्क्या माहीत असतात असे थोडेसेच लोक प्रत्येक कार्यालयात असतात. ते कार्यालयातील सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवू शकतात. व्यवस्थापक सुद्धा त्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही. नवीन कोणत्याही प्रकल्प किंवा प्रकरण (केस) हातात घेण्यास इच्छूक मंडळी असतातच. त्यांचा अशा प्रकल्पातला रस लवकरच संपतो व त्यांची खरकटी दुसर्‍या कोणालातरी चडफडत काढावी लागतात. मी 30 वर्षापूर्वी एका मोठ्या वाहन उद्योगातल्या कंपनीत नोकरी करत होतो. त्या वेळी आमच्याकडे अशी अनुभवाने सिद्ध झालेली समजूत होती की कोणतीही अडचण त्यावर कार्यवाहीच केली नाही तर काही दिवसांनी आपोआपच सुटते. या पद्धतीने सर्व प्रॉब्लेम्स आपल्या टेबलावरच्या फाईलमधेच कार्यवाही न करता ठेवणारेही महाभाग असतातच.
त्यामुळे शुचि यांनी वर्णन केलेले व्यक्तीस्वभाव फक्त आयटी मधेच सापडतात असे काही नाही. ते सगळीकडेच असतात. यात आयटी वाल्यांची एक्स्क्लूझिविटी काही नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अर्ध हळकुंडही पुरेर्से

आयटीतल्या अनेकांना अर्ध हळकुंडही खूप होतं पिवळे व्हायला.
नॉन-आयटी मधल्या ऑटॉमोबाइल इंजि. २-३ वर्षात तो स्वतः जमशेदजी टाटा असल्याचा भास होतो का? नाही. आयटी मधल्या अनेकांना त्यांनी एखादी ल्याग्व्ज ल्हीली असल्याचा भास होतो, ते स्वतः बिल गेट असल्याच्या थाटात वावरत असतात.

 
^ वर