हॉम राँग

हॉम राँग

हॉम राँग हा चित्रपट एका थाई 'रनत एक' (उच्चार योग्य आहे का ते कळवणे, रनाड् असाही उच्चार ऐकल्या सारखे वाटले!) संगीतकाराच्या आयुष्याचा प्रवास उलगडतो. चित्रपटाचा काळ सुमारे १८८० ते १९४०.
सॉर्न हा संगीताची उपजत देणगी आणि समज असलेला मुलगा आहे. परंतु त्याच्या भावाचा संगीताच्या नादातून वाद आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला रनत एक संगीत वाद्यांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो चोरून एक पडक्या बुद्ध मंदीरात या रनत एक या वाद्याची आराधना करतो. गावातल्या मंदीरात होणार्‍या एका संगीत जलशात सॉर्न वर रनत वाजवण्याची वेळ येते. त्याचे वादन ऐकल्यावर सर्वांना खात्री पटते की सॉर्न एक मोठा संगीतकार होणार. नाईलाजाने त्याचे वडिल त्याला रनत एक वाजवण्याची परवानगी देतात. त्याची आणि त्याच्या कलेची कीर्ती सर्वत्र पसरू लागते. सर्वत्र वाहवा मिळत असतांना एका संगीत जलशात मात्र त्याची गाठ एका मोठ्या रनत संगीतकाराशी पडते. त्या वयाने मोठ्या असलेल्या दाढीवाल्या संगीतकाराचे ते विलक्षण वाजवणे ऐकून सॉर्नचा रनत वाजवण्याचा आत्मविश्वासच हरवतो!
तो जिद्दीने त्या संगीतकारासारखे वाजवण्याचा प्रयत्न करत राहतो. पण त्याला जमत नाही. शेवटी तो मित्राला सांगतो की मी रनत सोडले!
त्याचा मित्र त्याच्यावर भडकतो. तो म्हणतो की मी काही तुझ्यासारखे रनत वाजवू शकत नाही पण तू माझ्यासारखे मुठीत मासे पकडू शकत नाहीस! आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही गूण असतात. तुला त्या दाढीवाल्या संगीतकारासारखे वाजवता आले नाही तरी तुला तुझ्यासारखे वाजवता येते आणि ते महत्त्वाचे आहे. परत रनत वाजवायला लाग!' असे त्याला बजावतो. सॉर्नचे मन पालटते. तो रनत वाजवायला घेतो. दरम्यान त्याची कीर्ती राजदरबारात पोहोचते.
राजा त्याला बोलावतो आणि आपल्या संगीत चमूतला प्रमुख वादक म्हणून सामील करायला सांगतो. राजवाड्यातल्या वास्तव्यात तो सुरुवात करायला म्हणून वाद्ये ठेवलेल्या खोलीत जातो. त्या खिडकीतून त्याला एक सुंदर मुलगी झाडावरून फुले काढतांना दिसते. नकळतपणे सॉर्न एका व्हायोलिन सारख्या दिसणार्‍या वाद्यातून कोवळे सूर झंकारू लागतो. ती मुलगी दिसेनाशी झाल्यावर तो थांबतो.
त्याबरोबर मागून एक झोपलेला माणूस उठून बसतो आणि विचारतो की का थांबलास? मी मुलगी असतो तर या सुरां मुळे एव्हाना तुझ्या प्रेमात पडलो असतो. सॉर्न दचकतो. त्याला वाटते की हा साफसफाई करणारा नौकर असावा, तो त्याला टाळतो आणि जेवायला जातो. राजवाड्यात काम करणारी ती मुलगीही नेमकी तेथे येते. सॉर्न आणि ती मुलगी प्रेमात पडतात.

इकडे सॉर्नची संगीत साधना सुरू असते. पण एक दिवस त्याला कळते की राजाने संगीताची जुगलबंदी आयोजित केली आहे आणि ती जुगलबंदी त्या विलक्षण संगीत वाजवणार्‍याशीच आहे. परत त्या दाढीवाल्या वादका समोर कसे वाजवायचे या विचाराने सॉर्न राजवाड्यातून पळून जातो. राजा भडकतो. सर्वत्र त्याच शोध घेतला जातो. त्याच्या जुन्या मित्राला मात्र सॉर्न परत त्याच पडक्या मंदीरात लपून बसलेला सापडतो. सोर्नला कळते की त्याच्या गायब होण्याने वडलांनी हाय खाल्ली व ते आजारी आहेत. सॉर्न वडलांची माफी मागतो आणि राजवाड्यात हजर होतो. मागे भेटलेला साफसफाई करणारा नौकर वाटलेला प्रत्यक्षात एक चाणाक्ष संगीत गुरू असतो. सॉर्नला जुगलबंदीच्या ताणात आलेले तो पाहत असतो. जुगलबंदीच्या आधी त्याच्या साधनेमध्ये तो सॉर्नचे वाजवणे ऐकतो. आणि सॉर्नला हलकेच सांगतो की,' मला वाटते की आवाज नैसर्गिक येत नाहीये. तू या वाद्याच्या नाड्या जरा जास्त आवळून बांधल्या आहेत. मी त्या जरा मोकळ्या करतो! नाड्या मोकळ्या असल्या की आवाज आपोआप बदलेल!' सॉर्न काय मनोमन समजतो आणि त्याच्या नैसर्गिक शैलीत धून वाजवू लागतो.

जुगलबंदीचा - पिफतचा दिवस उजाडतो.
पण पुढे काय होते? संगीतावरील सरकारी नियंत्रणाचे काय? जपानी आक्रमणाचा प्रभाव? सामान्य जनता काय करते? ते चित्रपटातच पाहा.

चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये वर्तमानात आणि भूतकाळात मागे पुढे होत राहतो.
प्राचीन थाई संगीताचा प्रवास, त्याचे पाश्चात्य संगीताचा होऊ घातलेला शिरकाव आणि त्याचे बदलणारे अर्वाचीन स्वरूप. देशाला आधुनिक करण्यासाठी त्यावर आलेली वेडपट सरकारी नियंत्रणे तसेच जपानी आक्रमण याचे सुरेख चित्रण या चित्रपटात आहे. चित्रपटात काही उपकथानके आहेत पण मी ती येथे दिली नाहीयेत. पारंपारिक संगीतप्रेमाची सुंदर कथा हा चित्रपट उलगडून सांगतो.
चित्रपटाचे चित्रण ही एक खास जमेची बाजू आहे. १८८० सालचा जुन्या वेशभुषेतला थायलंड पाहून, हा भारत नाही यावर विश्वास बसत नाही. अतिशय रम्य असे चित्रण आहे.
चित्रपटाचे संगीत या विषयी मी काय बोलावे? अनेकानेक सुंदर पारंपारिक थाई संगीताच्या धुनी यात ऐकण्याची सुसंधी!

मात्र चित्रपट वर्तमान आणि भूतकाळात मागेपुढे होत राहिल्याने काही वेळा लय तुटली असे मात्र वाटले.
तसेच जुगलबंदी असली तरी कलाकार इतके जीव खाऊन त्वेषाने का वाजवतात हे ही कळले नाही.
हा चित्रपट लुआँग प्रदीत पैरोह् यांच्या जीवनावर आधारीत आहे असे म्हंटले जाते.

चित्रपटाचे नाव: हॉम राँग Hom rong इंग्रजी नाव The Overture
देश: थायलँड
भाषा: थाई
वर्ष: २००४
दिग्दर्शक: इत्तीसुंतॉर्न विचैलक Ittisoontorn Vichailak
लेखक: इत्तीसुंतॉर्न विचैलक व इतर
संगीत: चत्चै Chatchai
प्रमुख भूमिका: अनुचित सपनपाँग Anuchit Sapanpong
अदुल दुल्यारत Adul Dulyarat
नरोंग्रीत तोसा अंग् Narongrit Tosa-nga
सोमलेक सक्दीकुल Somlek Sakdikul

सबटायट्ल्स: चित्रपट आंतरराष्त्रीय स्तरावर वितरित असल्याने सबटायट्ल्स आहेत.

रनत एक विषयी थोडेसे-
रनत एक हे संतूर सारखे वाद्य आहे. पण यात तारा नसून लाकडाच्या पट्ट्या आहेत. या पट्ट्या वादीने माळेसारख्या बांधलेल्या असतात. त्या पट्ट्यांच्या खाली एक होडी सारखा पोकळ भाग असतो ज्यामुळे आवाज घुमतो. या पट्ट्या वाजवून ध्वनी निर्माण केले जातात आणि त्यातून सरगम निर्मिती साधली जाते. पारंपारिक पिफत या थाई संगीतातले हे प्रमुख वाद्य आहे. वादक एकावेळी बहुदा दोन रनत एक वाजवायला घेऊन बसतात.
कुणाकडे अजून माहिती अथवा याचे संगीत उपलब्ध असेल तर जरूर द्या!

Comments

विचीत्र नाव

विचीत्र नाव पाहून पिक्चर पहायचा की नाही हे ठर्वणे आता बंद केले पाहीजे असे वाटले वरील टिका वाचून.
तुम्हाला हा चित्रपट पहावा असे का वाटले?

:)

विचीत्र नाव पाहून पिक्चर पहायचा की नाही हे ठर्वणे आता बंद केले पाहीजे असे वाटले :)

खरे आहे! नाव वाचून चित्रपट कसा कळावा... त्यासाठी तो पाहिलाच पाहिजे. नाही का?
थाई चित्रपट आहे म्हंटल्यावर उत्सुकता वाटली म्हणून पाहिला. मला तर कथेचे चित्रण आवडले. फ्लॅशबॅक्समुळे काहीसा रसभंग होत राहीला तरी लोभस सेटींग्ज आणि संगीत यामुळे चित्रपट पाहावासा वाटला.

- निनाद

कंडीशनल

--नाव वाचून चित्रपट कसा कळावा... त्यासाठी तो पाहिलाच पाहिजे. नाही का?
मी ब-याच गोष्टी अनुभवाने कंडीशनल करुन ठेवल्या आहेत.
पिक्चर पहायचा
{
जर, नाव आवडले नाही

पहायचा नाही

जर नाव आवडले नाही पण सोबत बरी असेल

पहायचा

}

हे असं काहीतरी असतं.

एक शंका...........

हे एवढे विविध प्रकारचे चित्रपट तुम्हाला कोठे मिळतात ?
उपप्रश्न : इतके चित्रपट पाहायला तुम्हाला वेळ केव्हा मिळतो ? (आवड असेल तर सवड होते हे उत्तर नको. )

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

कोठे मिळतात ?

हे एवढे विविध प्रकारचे चित्रपट तुम्हाला कोठे मिळतात ?

आमच्याकडे ऑस्ट्रेलियात एस बी एस नावाचे एक वाहिनी आहे त्यावर निरनिराळे चित्रपट दाखवले जातात. शिवाय मी ज्या विद्यापीठासाठी काम करतो त्यांचे माध्यम आणि चित्रपट यांचे शिक्षण देणारे विभाग खूप मोठे आहेत. अभ्यासासाठी म्हणून तेथे गाजलेल्या आणि न गाजलेल्या चित्रपटांचा मोठा साठा आहे. त्यातून जे समोर येईल ते पाहत असतो. कधी छान तर कधी अस्वस्थ करणारे अनुभव येऊन जातात. मुळात चित्रपट हे माध्यम आवडते.

उपप्रश्न : इतके चित्रपट पाहायला तुम्हाला वेळ केव्हा मिळतो ?

बहुतेक चित्रपट एक ते दीड तासाचे असतात. त्यामुळे फार वेळ जातो असे होत नाही. कित्येकदा चित्रपटाविषयी लिहिण्यात माझा जास्त वेळ जातो. :) सगळ्याच चित्रपटांविषयी लिहिणे होतेच असेही नाही. सध्या घरी कुणी नसल्याने वेळ बराच मिळाला म्हणून लिखाण घडले, मालिका सुरुच राहिली. नाही तर बघा-लिहायला तेव्हढा मिळत नाही. आता मिळेल असेही फारसे दिसत नाही. २ दिवसात प्रतिसादही द्यायला जमले नाही. पण जमेल तसे लिहीन.

-निनाद

सॉरी निनाद

चित्रपट चांगला असेलही पण एकंदर विषय रंजक वाटला नाही बहुदा मांडणीदेखील हटके असावी.

किंचीत १९४२ अ लव्ह स्टोरी मधे जसे (सुखवस्तू) प्रेमी अनिल कपूर देशप्रेम / देशकार्यात भाग घेतो तसे आपल्या ठराविक आयुष्यात जगलेला सॉर्न शेवटी परकीय धोरणांविरुद्ध आपल्या कलेच्या माध्यमातून एक ठाम भूमीका घेतो. पण कदाचित मधला भाग थाई जनतेच्या दृष्टीने रोचक रंजक असेलही, मला तितकासा वरचे परिक्षण वाचताना वाटला नाही.

 
^ वर