ऍबल कॉन एला

चित्रपट कथा वय सुचवणी १५ + साठी

ऍबल कॉन एला Hable con ella इंग्रजी मध्ये टॉक टू हर.

बेनिनो आणि मार्को एका नृत्य नाटिकेमध्ये शेजारी शेजारी बसतात. बेनिनो मार्कोला पाहतो आणि एका प्रसंगामुळे त्याच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून तो त्याच्या लक्षात राहून जातो.

बेनिनो हा पेशाने नर्स आहे आणि तो एका इस्पितळात काम करतो. त्याची अनेक वर्षे आजारी असलेली आई नुकतीच वारली आहे. या इस्पितळात बॅले नृत्य करणारी सुंदर तरुणी ऍलिशिया, अपघातात कोमात गेल्याने बेशुद्ध आहे. बेनीनी तीची सुशृषा करतो आहे. बेनीनी तिच्या प्रेमात पडलेला आहे. इतका की त्याचा पूर्ण विश्वास आहे की तीला सर्व काही कळते. त्यामुळे ऍलिशिया जरी कोमात असली तरी तो तिच्याशी कायम संवाद साधतो. म्हणजे आपण एकमेकांशी बोलतो असे तसेच. तिला तिच्या आवडीच्या चित्रपटांच्या कथा सांगतो. मासिकातील चित्रे दाखवतो. पण ती मात्र कोमात आहे. तिची सुषृशा मनापासून करतो अगदी तीची पाळी आल्यावर तिचे पॅड्स् बदलण्यापासून ते तिचे केस कापणे नेलपेंट लावून देणे वगैरे सर्व काही.
पुढे ही जवळपास एकतर्फी प्रेम कथा फ्लॅशबॅकमध्ये उलगडत जाते.

मार्को हा एक पत्रकार आहे. तो त्याच्या पहिल्या प्रेमापासून आताशा वेगळा होण्याचा प्रयत्न करतो आहे. लिडिया नावाच्या एका मॅटेडोर ची मुलाखत घेण्यासाठी तो तीच्या संपर्कात येतो. लिडियाही तिच्या प्रियकरापासून विभक्त होण्याचा प्रयत्न करते आहे. लिडिया आणि मार्को काही चमत्कारिक घटनांमुळे एकमेकांच्या जवळ येतात आणि प्रेमात पडतात. काही काळ एकत्र घालवतात. असेच एकदा एका खेळासाठी ती जात असतांना लिडिया मार्कोला म्हणते. की मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. हा खेळ झाल्यावर आपण बोलूया, पण काय आणि कशा विषयी हे मात्र ती सांगत नाही. मार्को हो म्हणतो पण खेळ भलतीकडेच जातो. वेदनांनी बेभान झालेला तो बैल लिडियाला चिरडतो. या अपघातात लिडियाही कोमात जाते. मार्को उध्वस्त होतो. लिडियाला ज्या इस्पितळात ठेवतात तेथेच बेनिनो आणि त्याची ऍलिशिया ही असते. मार्को तेथे असतांना, बेनिनोला ऍलिशियाशी नेहमीप्रमाणे बोलतांना पाहतो. त्याला ते विचित्र वाटते.

बेनिनो मार्कोला सांगतो की तूही लिडियाशी बोलले पाहिजेस. तिच्या बरे होण्यामध्ये ते फार महत्वाचे आहे. पण मार्को हा संवाद लिडियाशी साधू शकत नाही. तो बेनिनोला परखडपणे ऐकवतो की असा संवाद शक्य नाही. तिच्या मेंदूलाच मार बसला आहे. तिला काहीही कळत नाहीये. बेनिनोला ते पटत नाही.

एक दिवस तो मार्कोला म्हणतो की मला ऍलिशियाशी लग्न करायचे आहे. मार्को चकित होतो. तो त्याला विचारतो की असे कसे शक्य आहे? ऍलिशिया कोमात आहे. ती हो कसे म्हणेल? तो बेनिनोला तो विषय डोक्यातून काढून टाकायला सांगतो.

बेनिनो मात्र ऍलिशियाला आपण पाहिलेल्या चित्रपटांच्या कथा सांगत राहतो.
एका दिवशी उघडकीला येते की ऍलिशियाची पाळी चुकली आहे. ऍलिशिया गरोदर आहे. इस्पितळाची मॅनेजमेंट खडबडून जागी होते. चौकशीमध्ये सारा संशय बेनिनोवर येतो. बेनिनोला बलात्काराच्या आरोपावरून कारागृहात धाडले जाते.

पुढे काय होते? बेनिनोला ऍलिशिया मिळते का? तिचे कोमातले गरोदरपण? लिडिया बरी होते का? लिडियाला काय सांगायचे असते? मार्को पुढे काय करतो हे चित्रपटातच पाहा.

चित्रपटाच्या दोन्ही नायिका शारिरीक खेळातल्या/पेशातल्या आहेत तर नायक नर्स अणि लेखक पत्रकार असे साधेसुधे शारिरीक पेशाशी तसा संबंध नसलेले आहेत.

अप्रतिम चित्रपट, खिळवुन ठेवणारे नाट्य. अनवट विषयावरची वेगळीच प्रेमकहाणी असेही म्हणता येईल.
अल्मोदोवरने नेहमीप्रमाणेच गुंतागुंतीच्या आणि अनपेक्षित कथेने खिळवून ठेवले आहे.
जावियेने केलेले बेनिनोचे काम मस्तच आहे. मला बेनिनोचे निस्सीम प्रेम करणे आवडून गेले.
सेक्स अँड ल्युसियाची अभिनेत्री पाझ वेगा ही या चित्रपटात दिसून जाते.

अल्मादोवरच्या व्हॉल्व्हर या चित्रपटाची ओळख आपण मागे पाहिली होती. त्याच्या पात्रांचा वेगळेपणा त्याही सादरीकरणात आपल्याला जाणवला असेल अशी आशा आहे.

चित्रपटाचे नाव: हॅबल कॉन एला Hable con ella
भाषा : स्पॅनिश
वर्षः २००२
लेखक दिग्दर्शकः पेद्रो अल्मोदोवर Pedro Almodóvar
अभिनयः बेनिनो - जाविये कमारा Javier Cámara, मार्को दारीयो ग्रांदीनेत्ती Darío Grandinetti,
ऍलिशिया- लिओनोर वॅटलींग Leonor Watling, लिडिया रोझारियो फ्लोरेस Rosario Flores

पारितोषिके - अनेक!

सबटायटल्स - इंग्रजी
वितरण - २०थ सेंच्युरी फॉक्स - तबकडीवर उपलब्ध

लेखनविषय: दुवे:

Comments

छान...!

छान कथानक आहे राव...!

>>>बेनिनोला ऍलिशिया मिळते का? तिचे कोमातले गरोदरपण? लिडिया बरी होते का? लिडियाला काय सांगायचे असते? मार्को पुढे काय करतो हे चित्रपटातच पाहा.

चित्रपट पाहणे होईल की नाही माहिती नाही पण पुढे काय होते ते उत्कंठावर्धकच आहे.
कृपया मला व्य.नि. करुन पुढे काय होते ते सांगणे.

-दिलीप बिरुटे
[आपलाच]

वेगळाच विषय हाताळणारा चित्रपट

नैतिकतेच्या आपल्या कल्पनांबाबत मूलभूत प्रश्न विचारून प्रेक्षकाला अस्वस्थ करणे, ही आल्मादोवार याची हातोटी.

"आब्ले कोन एय्या" चित्रपटात तो बेनीनो आणि मार्को यांच्या एकतर्फी प्रेमप्रकरणांचे सामांतर्य बेमालूम उभे करतो. दोन उपकथानकात दिग्दर्शकाच्या मते कमालीचे सामांतर्य आहे, हे प्रेक्षकाला अर्धा सिनेमा होईपर्यंत समजत नाही. मग तो आपल्याला विचारतो - मार्कोचे प्रेम आपण उदात्त मानतो, आणि बेनिनोची भावना गुन्हेगारी व्हावी इतकी मनोविकृती, ते काय म्हणून?

दिग्दर्शक अव्वल दर्जाचा आहे, म्हणून अर्थातच या चित्रपटातल्या दोन उपकथानकांत सामांतर्य आहे, हे तो मला पटवू शकतो. हे आल्मादोवारचे यश आहे. पण अशा परिस्थितीमध्ये खरेच सामांतर्य आहे, हे काही मला पटत नाही. त्यामुळे या चित्रपटातील कथनामुळे मी जरी अस्वस्थ झालो, तरी या नैतिक ऊहापोहामुळे जीवनाकडे बघायची माझी दृष्टी काडीइतकीही बदललेली नाही. हे आल्मादोवारचे अपयश आहे.
- - -
निनाद यांनी करून दिलेली ओळख आवडली, हे सांगायचे राहून जायला नको!

सामांतर्य

"तरी या नैतिक ऊहापोहामुळे जीवनाकडे बघायची माझी दृष्टी काडीइतकीही बदललेली नाही. हे आल्मादोवारचे अपयश आहे."

कदाचित असे असेलही. पण तरी चित्रपट प्रश्न उपस्थित करून अनेक प्रश्नांची उत्तरे न देताच संपतो.
एक स्वस्थ करून जाणारा अनुभव, इतके मात्र नक्की म्हणता येते.

-निनाद

नैतिक विरुद्ध अनैतिक

सिनेमा पाहीला नाही पण धनंजय यांनी वर म्हटल्याप्रमाणे अस्वस्थ करणारे कथानक आहे खरे.

दोन व्यक्तींमधील शरीरसंबंध माझ्या मते तेव्हा निकोप म्हणता येईल जेव्हा दोन्ही व्यक्तींची संमती त्या संबंधाला असेल. वरील उदाहरणात एक व्यक्ती तर कोमात आहे त्यामुळे तो संबंध बलात्कारच ठरतो. अशा संबंधास अनैतिकच म्हणावे लागेल.

समजला नाही

जालावर कथानक वाचले, दिग्दर्शकाचा संदेश गवसला नाही.

चित्रपट निर्मीतीचे मूळ

पेद्रो अल्मोदोव्हर हा दिग्दर्शक म्हणतो की गेल्या १० वर्षातील काही खर्‍या घटनांतून Talk To Her या चित्रपटाची निर्मीती झाली. काही घटना पुढीलप्रमाणे -एक अमेरीकन स्त्री तब्बल १६ वर्षांनंतर कोमामधून जागी झाली; रुमानियातील स्मशानात काम करणारा रात्रपाळीचा राखणदार एका तरुण मुलीच्या प्रेताकडे आकर्षित झाला, आणि ती मेलेली तरुणी जिवंत झाली कारण ती केवळ कॅटेलेप्सी मुळे मेलेल्यासारखी वाटत होती (यावर एक फ्रेन्च सिनेमा देखील आहे); न्यू यॉर्क् मध्ये ९ वर्षे कोमात असलेली मुलगी कोमामध्येच गरोदर राहीली, त्याचा संशय त्या दवाखान्यात काम करणार्‍या एका परिचारकावर गेला.

आश्चर्य

पेद्रो आल्मोदोवरचे कौतुक योग्य आहे परंतु त्याचबरोबर अल्पविराम या पल्लवी जोशी आणि विक्रम गोखले यांच्या प्रसिद्ध सिरिअलची आठवण कुणालाही न व्हावी हे खेदजनक आहे. म्हणतात ना काहीजण की पाश्चात्यांचे सर्वच चांगले. ;-)

जवळ जवळ याच कथानकावर बेतलेला - एक तरुण लग्न ठरलेली मुलगी कोमात जाते. तिच्याबद्दल प्रथमतः सहानुभूती ठेवणारे हळूहळू तिच्यापासून दूर जाऊ लागतात. तिचा प्रियकर मात्र तिच्या बाजूला ठाम उभा राहतो. हॉस्पिटलचा डिन/संचालक किंवा जो कोणी उच्चपदस्थ याची सहानुभूती असल्याने तिची काळजी हॉस्पिटलात चांगली घेतली जाते परंतु एक वॉर्डबॉय तिच्यावर वाईट नजर ठेवून असतो. पुढे तिला दिवस गेल्याचे कळते आणि बहुधा बाळंतपणात ती कोमातून बाहेर येते. जन्माला आलेले मूल स्टीलबॉर्न असते की नाही ते मला नेमके आठवत नाही.

हे मूळ गुजराथी नाटक होते असे वाटते. (चू. भू. दे. घे.)

अरे हो! ही सिरिअल येऊन १० वर्षांहून अधिक काळ उलटला आहे.

सत्यकथा

मला असे वाटते की अशीच काहीतरी मुंबईत घडलेली सत्यकथा आहे. जुने जाणते लोक कदाचित सांगू शकतील.
हा काळ कदाचित ७० च्या दशकाचा होता? आठवत नाही.

अरुणा शानभाग

अरुणा शानभागचीच कथा अशाप्रकारची आहे. थोडी वेगळ्या अंगाची पण थोडी अशीच.

अल्पविराम

अरूणा शानभाग

अरूणा शानभागच म्हणायचे होते. धन्यवाद.

मालिका

मालिका पाहणे कधी झाले नाही. त्यामुळे अशी मालिका होती हेच मुळात मला माहिती नाही. आठवण्याचा प्रश्नच आला नाही!

-निनाद

मान्य

मालिका पाहणे कधी झाले नाही. त्यामुळे अशी मालिका होती हेच मुळात मला माहिती नाही. आठवण्याचा प्रश्नच आला नाही!

आमचे-त्यांचे करण्याचा तुमचा उद्देशही नसावा. सिरिअल बरीच जुनी आहे त्यामुळे अनेकांनी पाहिली नसावी. तरीही इतकीही जुनी नाही की कुणालाही (फक्त लेखकालाच असे नव्हे आणि त्या कुणालाही मध्ये माझाही समावेश असल्याने आणि मला आठवण आल्याने तसेही ते वाक्य बाद झाले आहे. ;-))आठवण येऊ नये म्हणून मी तसे विधान केले. निदान, अरुणा शानभागची तरी.

गेल्या दहा वर्षातील घटनांनी दिग्दर्शकाने या चित्रपटाची निर्मिती केली असल्यास आणि त्याला त्याबद्दल प्रशंसा मिळत असल्यास, त्यापूर्वीही भारतात असा विषय व्यवस्थित* हाताळला गेला आहे एवढेच दाखवून द्यायचे असेल

तुम्ही नव्या चित्रपटांची माहिती करून देता हे मला आवडते. निदान त्यामुळे आपल्याकडे असे काही पाहिले आहे का** हे कुतूहल चाळवते.

* हिंदी सिरिअल्सना व्यवस्थित हाताळले असे म्हणणे हा विनोद आहे असे काहीजणांना वाटणे शक्य आहे. ;-) या सिरिअलमध्येही उगीच नाटकीपणा आणण्यासाठी ताणून ९० भाग करणे वगैरे होते. तरीही, सुलभा देशपांडे, अंजन श्रीवास्तव, विक्रम गोखले, पल्लवी जोशी, मोहन गोखले वगैरे सारख्या कलाकारांमुळे आणि विषयामुळे सिरिअल फार प्रसिद्ध झाली होती.

** हल्ली हॉलिवूडवाले चित्रपटाच्या शेवटी एअरपोर्टवर फारच भागमभाग करतात. :-(

चित्रपट सिरियल

चित्रपट बघणे सिरियल्स बघण्या पेक्षा चांगले . . कुठे दोन अडीच तासांचा चित्रपट आणि कुठे वर्षानुवर्ष चालणाऱ्‍या सिरियल्स. .

हं, पण

बरेचदा (इस्पेशली हिंदी) चित्रपट पाहताना जीवावर येतं. (सायको-)हॉलिवूडपट (हिंदी, मराठी चित्रपटांच्या मानाने) कमी वेळात त्यांचा उद्देश (बहुधा) सार्थ करतात, म्हणून कंटाळा आल्यावर ते पाहण्याचा पर्याय उपलब्ध असतो (ह्म्म, जवळ असायला देखील हवे, म्हणजे डीव्हीडीज् अथवा चित्रफिती वगैरे). मालिकांबाबत विचारू नका.

 
^ वर