घरकाम/बालसंगोपन व जीडीपी
कधीकधी आपल्या मनात एखादा विचार रुंजी घालत असतो. आणि कर्मधर्मसंयोगाने तोच विचार मांडणारं किंवा निदान त्याचा उल्लेख तरी करणारं पुस्तक हाती येतं. मग वाटतं की हा, आपला विचार अगदीच चुकीचा नव्हता. किंवा आपल्या आधी निदान काही लोकांनी तरी या दृष्टीकोनातून या विशिष्ट प्रश्नाकडे बघितलं आहे. घरकाम हे जीडीपी* मध्ये कसं मोजतात? किंवा मोजतात का? याबाबत विचार करताना माझं असंच झालं. 'बाईमाणूस' हे उत्तम पुस्तक नुकतंच हाती आलं. (बाईमाणूस या वाचनीय पुस्तकाविषयी हा लेख नाही. पण ते वाचायच्या काही दिवसच आधी माझ्या मनात या प्रश्नाविषयी विचार चालू होता.) त्यात करुणा गोखलेंनी स्त्रीमुक्ती चळवळीचा आढावा घेतलेला आहे. स्त्रीच्या जीवनातल्या प्रश्नांपैकी एक म्हणजे सर्वसाधारण स्त्रीची दखलच न घेण्याच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या यंत्रणांचा कल. अनेक संस्थांमध्ये (धर्मसंस्था, कुटुंबसंस्था वगैरे) हे होतं हे त्या उलगडून दाखवतात. अर्थशास्त्रामध्येदेखील हे होतं.
एखाद्या देशाचं जीडीपी मोजताना त्या विशिष्ट देशात, त्या वर्षी कुठच्या वस्तु व सेवांचं उत्पादन झालं याची मोजदाद केली जाते. राष्ट्राच्या कार्यशीलतेचा, प्रगतीचा, आर्थिक तब्येतीचा तो मानदंड असतो. कमी दरडोई जीडीपी असलेले देश गरीब, अधिक दरडोई जीडीपी असलेले देश श्रीमंत. जितकं उत्पादन अधिक तितका समाज 'सुखी', असं मानलं जातं. अधिक जीडीपी चांगलं, जीडीपी वाढीचा दरही जास्त असणं चांगलं मानलं जातं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते बरोबरही आहे. तो एक थंबरूल आहे, आणि त्याच्या मर्यादा कुठे सुरू होतात हे सांगणं कठीण आहे.
पण जीडीपी मोजताना फक्त रुपया-पैशांत विकल्या गेलेल्या वस्तूंचा समावेश होतो. जीडीपी मोजण्यातली ही प्रचंड मोठी त्रुटी आहे असं मला वाटतं. एके काळी उत्पादन खूपच मर्यादित होतं. मनुष्य शिकार करायचा तेव्हा ती बऱ्याच वेळा शेजाऱ्यांबरोबर वाटायचा. एका अर्थाने ही विक्रीच होती, कारण जेव्हा त्याच्या शेजाऱ्याला शिकार मिळे तेव्हा त्याला त्याची किंमत मांसाच्या स्वरूपातच परत मिळे. नंतर हीच व्यवस्था थोडी क्लिष्ट होऊन बलुतेदार पद्धती निर्माण झाली. ते एकमेकांना आपापल्या वस्तू व सेवांची देवाणघेवाण (बार्टर) करत. प्रत्यक्ष खरेदी-विक्रीचे (रुपया-पैशांत मोजले जाणारे) व्यवहार कमी होते. ती किती आदर्श व्यवस्था होती वगैरे मला म्हणायचं नाही. पण जसजसं उत्पादन वाढलं, अधिक गरजा भागवल्या जाऊ लागल्या तसतसं देवाणघेवाणीसाठी सर्वमान्य एकक - चलन, पैसे - निर्माण झालं. मग पुढे एक काळ असा आला की सर्वच उत्पादन पैशात मोजलं जाऊ लागलं. निदान अर्थशास्त्रज्ञ सोयीसाठी तेच मोजमापाचं एकक मानू लागले.
पण ही स्थिती योग्य आहे का? मानवाच्या अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा रुपया-पैशांमध्ये बऱ्यापैकी अचूक मोजता येतात. पण त्यापलिकडे गरजाच नाहीत हे म्हणणं धाडसाचं ठरेल. त्या गरजा असणं, व त्या भागवल्या जाणं हे बऱ्याच वेळा अजूनही बार्टर पद्धतीवर - देवाणघेवाण तत्वावर घडतं. अर्थशास्त्राच्या दृष्टीतून मात्र याची मोजमाप करण्याचा प्रयत्न होत नाही. जीडीपी मोजताना तरी नाही. याचा अर्थ ती मोजमाप करण्यासाठी एककंच नाहीत असं नाही. अगदी टोकाचं उदाहरण द्यायचं झालं तर पती-पत्नीमध्ये होणारा संभोग. याची किंमत तत्वतः ठरवता येते. थायलंडसारख्या देशात या इंडस्ट्रीचं राष्ट्रीय पातळीवर जीडीपीसाठी अडीच ते दहा टक्के योगदान असतं (संदर्भ - थायलंड, विकिपीडिया).
पण इतक्या टोकाला जायची गरज नाही. आपण साधं घरकाम व बालसंगोपनाचं उदाहरण घेऊ. पारंपारिक समाजांत ही जबाबदारी स्त्रीवर असते. नवरा बाहेर कामाला जातो, बायको घरचं बघते. घरचं बघणं म्हणजे त्यात स्वयंपाक करणं, घरातली लहानमोठी कामं करणं, मुलांची काळजी घेणं अशी अनेक कामं येतात. मात्र नवरा जे मिळवतो ते जीडीपीमध्ये मोजलं जातं, बायको घरात जे करते त्याचा कुठेही हिशोब नाही. दुसऱ्या दृष्टीकोनातून विचार केला तर समजा त्या बाईने घरकाम करण्याऐवजी बाहेर नोकरी केली आणि घरकामासाठी बाई ठेवली व मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघरात ठेवलं तर लगेच जीडीपी वाढतं. कसं हे बघण्यासाठी काही काल्पनिक आकडे घेऊ. जोपर्यंत ती बाई स्वतःच सगळं सांभाळते तोपर्यंत तिचं जीडीपीसाठी योगदान शून्य. आता समजा तिने ताशी १०० रुपयांची नोकरी घेतली. त्यासाठी ती ताशी २० रुपये पाळणाघरासाठी देते व ताशी १० रुपये घरकामाच्या बाईसाठी देते. तसंच ती प्रवासासाठी, बाहेर खाण्यासाठी, नोकरीसाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी ताशी १५ रुपये देते. आता समाजोपयोगी काम खरं तर ताशी १०० रुपयांचंच वाढलं. मात्र जीडीपीच्या हिशोबात १४५ रुपयांची किमान भर पडली. किमान अशासाठी की तिने खर्च केल्यामुळे इतर उद्योगांना चालना मिळते आणि जीडीपी आणखीनच वाढतं. म्हणजे जीडीपी वाढवा म्हणून ओरडणारे अर्थशास्त्रज्ञ कृत्रिमरीत्या हा आकडा फुगवण्यासाठी एका विशिष्ट समाजव्यवस्थेला पुष्टी देत आहेत का?
माझ्या माहितीत अमेरिकेतलं उदाहरण आहे, जिथे आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी आईने वर्षाला सत्तर हजार डॉलरची नोकरी सोडली. तिचं गणित सोपं होतं. मुलांना चाइल्ड केअरमध्ये ठेवायचं तर वर्षाला पंचवीस ते तीस हजार, टॅक्स पंधरा हजाराचा जाणारच, शिवाय गाडी ठेवणं, बाहेर खाणं यात आणखीन खर्च. त्यातून किती हातात राहाणार? एवढी दगदग, जिवाचा आटापिटा करून शेवटी मुलांना आई मिळणार नाहीच. त्यापेक्षा ती घरी राहिली तर जे सुख मिळेल ते हातात पडणाऱ्या दहा पंधरा हजारापेक्षा कितीतरी अधिक असेल. तिने जो हिशोब केला तो तिच्या दृष्टीने बरोबरच आहे. बहुतेक जण असाच हिशोब करतात व या किंवा त्या बाजूचा निर्णय घेतात. यात कुठचा निर्णय बरोबर व कुठचा चूक असं म्हणायचं नाही. मला म्हणायचं आहे की आपल्याकडे असलेल्या मर्यादित साधनांचा, आपल्या गरजा भागवण्यासाठी जो हिशोब सामान्य माणसं करतात, त्या हिशोबाचा अंतर्भाव अर्थशास्त्रात झाला पाहिजे. शेवटी अर्थशास्त्राचा तोच गाभा आहे. पण तसं होताना दिसत नाही. अर्थशास्त्रज्ञ 'पैशांचा व्यवहार झाला तरच आम्ही तो मोजू' असं काहीसं हटवादीपणे म्हणताना दिसतात. त्याचा परिणाम विशेषतः स्त्रियांच्या समाजाला, अर्थव्यवस्थेला, मानवी आनंदाला असलेल्या योगदानाला शून्य मानण्यामध्ये होतो.
मी जे विचार मांडले आहेत ते कोणी 'सर्वच गोष्टींचं कमोडिटायझेशन व्हावं' अशा कोत्या अर्थाने घेतील. कमोडिटायझेशन या शब्दाला खरेदी-विक्रीचे संदर्भ आहेत. मला असं म्हणायचं आहे की मानवी आनंदासाठी जे व्यवहार होतात ते सर्वच अर्थशास्त्राच्या अभ्यासात यावेत. अस्मितेची किंमत करता येत नाही, पण अस्मिताहीन धनवान समाज व अस्मिता असलेला पण गरीब समाज यांना एकाच तराजूने तोलू नये. निदान निव्वळ पैशांच्या देवाणघेवाणीवरून तरी नाही. शेवटी आदर्श समाज निर्माण करायचा असेल तर काय वाढवलं पाहिजे याला 'पैसा' किंवा 'उत्पादन' हे उत्तर अपुरं आहे. पण तो निकष वापरला तर उत्पादन म्हणजे काय याचं मोजमाप तरी शक्य तितकं अचूक हवं. आनंदाची मोजदाद किती प्रमाणात करता येईल, व कुठे थांबावं लागेल हे मला सांगता येत नाही. पण सामान्य माणसं त्यांच्या सामान्य जीवनांत जे हिशोब करताना दिसतात ते करण्याचा तरी प्रयत्न व्हावा. वरच्या उदाहरणातल्या स्त्रीला जर सत्तर हजाराच्या नोकरीऐवजी दीड लाखाच्या नोकरीची ऑफर असती तर कदाचित तिने स्वीकारली असतीही. म्हणजे मुलांची जी काही कुचंबणा होईल ती वरकड ऐशी हजाराने भरून निघेल असंही तिला वाटेल. असा विचार करण्यात काहीच गैर नाही. मुद्दा असा आहे की किमती ठरवणं कठीण आहे म्हणून शास्त्रीय पातळीवर तो प्रयत्नच होऊ नये हे बौद्धिक आळशीपणाचं लक्षण वाटतं. अर्थशास्त्रासारख्या शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या शास्त्राने हा प्रयत्न न करणं लांच्छनास्पद आहे. की हे केवळ पुरुषप्रधान, पाश्चिमात्य विचारसरणीतून होतं? तसा मनापासून प्रयत्न होण्याला काय मर्यादा आहेत?
(* जीडीपी - G.D.P. - gross domestic product. राष्ट्राचं वार्षिक उत्पादन)
Comments
अंशतः सहमत
कमोडिटायजेशनचा आग्रह पटला पण त्याला पुरुषप्रधान/पाश्चिमात्य अशी विशेषणे देणे पटले नाही.
कमोडिटायझेशन
आग्रह कमोडिटायझेशनचा नाही. कमोडिटायझेशन हा तसा नकारात्मक छटा असलेला शब्द आहे. किमानपक्षी कमोडिटी कशाला म्हणावं, या बाबतीत निकष एकच असावेत असा आग्रह आहे. घरकाम करण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी बाई ठेवली व तिला पैसे दिले तर लगेच ती कमोडिटी झाली पण गृहिणीने तीच कामं केली तर त्याची मोजदाद नाही असा दुटप्पीपणा नको. पुरुषप्रधान/पाश्चिमात्य ही विशेषणं काहीशी प्रश्नार्थक रीतीने आलेली आहेत. स्त्रीमुक्ती चळवळीच्या समर्थकांकडून अनेक प्रस्थापित संस्थांना ती लावली जातात. मला त्यात थोडंफार(च) तथ्य वाटतं. तुम्हाला जर ती विशेषणं पटली नसतील तर थोडा ऊहापोह करावा.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
दिनूचे बिल
मुळात, श्रमांची तुलना केवळ उपयुक्ततेच्या निकषावर करण्याचा उद्देश असेल तर प्रत्येक श्रमाचे कमोडिटायजेशन करावेच लागेल. परंतु, आज बहुतेक सर्व श्रमांचे मूल्य उपयुक्ततेपेक्षा डेरिवेटिव अशा तथाकथित मागणीवर ठरते. उपयुक्ततेच्या (पदार्थ उदा., अन्न, खनिजे, पोलाद, सिमेंट, रसायने, इ. किंवा सेवा उदा. सावकारी, रोगोपचार, अभियांत्रिकी, वकिली, ताळेबंद तपासणे, शिक्षण, इ.) पलिकडेही, लोकप्रियतेच्या निकषावर चित्रपट, आर्मानीचे सूट, हुसेनची चित्रे, सोने/हिरे या जगण्यासाठी निरुपयोगी असलेल्या उत्पादनांचाही जीडीपीमध्ये समावेश केला जातो. समाजाची जगण्याची क्षमता मोजणे हा जीडीपीचा उद्देशच नसतो, समाजाचे परस्परावलंबित्व मोजणे हा उद्देश असतो असे वाटते. म्हणजे असे की एखाद्या उत्पादनाच्या आंतरिक मूल्यापेक्षा त्या उत्पादनामुळे समाज एकमेकांशी किती बांधला जातो ते पाहिले जाते. घरातील व्यवहार कितीही प्रेमाचे/शत्रुत्वाचे असतील तरी समाजाच्या दृष्टीने ते एक (ब्लॅक बॉक्स) एकक असते. मुलाने रंगविलेले चित्र बापाने करोडो रुपयांना विकत घेतले तरी त्यातून समाजाचे समाजपण वाढत नसावे.
जीडीपी आणि पीपीपी
जीडीपी हा राष्ट्राच्या आर्थिक सुबत्तेचा मानदंड मानण्यामुळे निर्माण झालेले गोंधळ अनेक आहेत. त्यापैकी एक लेखकाने चांगल्या रित्या मांडलेला आहे. जीडीपी कसा भ्रामक असतो याचे दुसरे एक उदाहरण म्हणजे जुन्या झालेल्या परंतु राहण्यास सर्व प्रकारे योग्य असलेल्या इमारती किंवा इतर स्थापत्य पाडून त्या जागी नवीन इमारत किंवा स्थापत्य निर्माण करणे. या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मधे प्रत्यक्षात नवीन काहीच घडलेले नसते. चीन मधे या प्रकारची ऍक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात चालू असते.
जीडीपी हा मानदंड म्हणून मानण्यात येणार्या या अडचणींमुळे आता पीपीपी किंवा परचेस पॉवर पॅरिटी हा मानदंड वापरावा असे मत होत चालले आहे. यात काही मूलभूत वस्तूंचे त्या देशातले भाव लक्षात घेऊन त्या राष्ट्राच्या आर्थिक सुबत्तेचा अंदाज बांधला जातो. उदाहरणार्थ भारतात कॉफीचा कप जर 20 रुपयाला मिळत असला आणि तीच कॉफी अमेरिकेत पावणे दोन डॉलरला मिळत असली तर भारतातले 20 रुपये हे पावणे दोन अमेरिकन डॉलर्स एवढे आहेत असे मानले जाऊन तुलना केली जाते. (अनेक गोष्टींच्या किंमतीचा विचार आवश्यक असतो. फक्त कॉफी नाही.)
हा मानदंड वापरला की जीडीपी च्या वापरामुळे होणारे गोंधळ बर्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. यात कमोडिटायझेशन करण्याची आवश्यकताच उरत नाही. चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
पीपीपी ठीक आहे, पण...
पीपीपी वापरून काही मूलभूत गोंधळ कमी होतात याबद्दल वादच नाही. पण तरीही न मोजल्या जाणाऱ्या गोष्टी मोजल्या जाव्यात ही अपेक्षा चुकीची नाही. हे सर्वच देशांत करावं लागेल. मानवाला उपलब्ध असलेली संसाधनांचं त्याच्या गरजा भागवण्यासाठी सुयोग्य रीतीने वाटप करणं हा अर्थशास्त्राचा हेतू आहे. जर या गणितात काही संसाधनं मोजलीच नाहीत, व काही भागलेल्या गरजा मोजल्याच नाहीत तर येणारी उत्तरं साफ चुकीची असू शकतात. घरी बनवलेलं अन्न कच्च्या मालाच्या किमतीव्यतिरिक्त 'फुकट' व रेस्टॉरंटमध्ये शेफ व वेटरना पगार हे दुटप्पी झालं. गृहिणीच्या कामाचा तो दुर्लक्षाने मारून केलेला अपमान वाटतो.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
हम्म!
जीडीपीबाबत लेखाचा सूर पटणारा आहे. किंबहुना, वर मांडलेला विचार बायकांच्या मनात कधीना कधी येत असावाच. (म्हणजे जीडीपीपर्यंत नाही परंतु मी काम करत होते तेव्हा मूल्य नव्हते परंतु हेच काम दुसरा करू लागला तेव्हा मूल्य आले.)
हे फारसे पटले नाही. बायकांच्या कामाचे मूल्य पुरुषाच्या तुलनेने पूर्वी कमी गणले जात असावे. लेखक पाश्चिमात्य देशाचे उदाहरण घेतो परंतु तेथे बाई आणि पुरुष हे दोघेही अशी अनेक कामे करतात की त्यांचे मूल्य ठरवता येत नाही. संगोपन पुरुषही करतात, लॉन मोविंग करतात, साफसफाई करतात, गाडीची निगा राखतात, ड्रायवरचे काम करतात, बाजारहाट करतात, मेकॅनिकचे काम करतात वगैरे. (माझ्या घरात आजतागायत प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन ही माणसे कधीही आलेली नाहीत.) मला वाटते जे काम मनुष्य स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी करतो त्याचे मूल्य ठरवले जात नाही. लहान मुले बर्याचदा कळत-नकळत मोठ्यांची करमणूक करतात. त्याचेही मूल्य ठरत नाही.
पुरुष १०० हजार डॉ. कमवतो परंतु ७० हजार डॉ. कमावणार्या बाईशी लग्न करतो आणि मग मुले झाली की बाईचा पगार पुरुषापेक्षा कमी असल्याने ती नोकरी सोडून घरी बसते हे गणित सहसा दिसते. याला पुरुषप्रधान संस्कृती म्हणता येईल. हे गणित उलटे असते तेव्हा घरी बसून मुले सांभाळणारे पुरुष पाहिले आहेत.
डॉलर व्हॅल्यू
हे मत मांडलेलं नसून निव्वळ प्रश्न आहे. म्हणजे वैचारिक आळस की स्त्रीकडे दुर्लक्ष करण्याची पूर्वापार चालत आलेली पद्धती (की इतर काही) असा प्रश्न विचारायचा होता. त्यात पाश्चिमात्य विशेष दुर्लक्ष करतात असं म्हणायचं नव्हतं. तर स्त्रीमुक्तीवाद्यांनी मांडलेली कारणपरंपरा कितपत लागू आहे असं विचारायचं होतं.
या सगळ्या गोष्टींची डॉलर व्हॅल्यू काढता येते, व काढली जावी. बाकी लहान मुलांनी कळत नकळत केलेल्या करमणुकीची 'किंमत' काढता येईल की नाही माहीत नाही. पण अशा सर्व जीवनव्यवहारांचा, त्यांच्या आनंदाचा व उपयुक्ततेचा विचार तरी व्हावा. (उदा. मूल करमणूक करतं म्हणून मी दिवसातले दहा तास घालवणार नाही - माझा वेळ मी इतर अधिक उपयुक्त, अधिक आनंददायी कामांसाठी घालवीन. हे मार्जिनल युटिलिटीचं तत्व लागू करता येईल.)
हे बरोबरच. मुद्दा घरकामाची किंमत धरली जात नाही - व सध्या तरी बहुतांशी ते करणाऱ्या स्त्रिया आहेत म्हणून स्त्रियांवर अन्याय होतो असं म्हटलं. जर ते प्रमाण समसमान झालं तर दोहोंवर समसमान अन्याय होईल. तरीही अर्थशास्त्रातली त्रुटी राहातेच.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
अर्थशास्त्रातील वाक्य
लेखातील मुद्यांशी सहमत.
घरसांभाळणारीशी (हाउसकीपर) लग्न केलेत की जीडीपी ढासळतो. अशी अर्थेशास्त्रातली एक म्हण आठवली. बर्याच बार्टर पद्धतीत जीडीपीचा र्हास होतो. एवढेच नाही तर ज्यांची नोंद होत नाही असे अनेक उधोग जीडीपीतून सुटलेले असतात. किराणा देणारा वाणी आणि मॉल मधील संघटीत दुकान यात मॉल मधील दुकान जास्त जीडीपी दाखवत असतो. घरगडी, बस्तु दुरुस्त करून देणारे, रस्त्यावर मोलमजूरी करणारे असे कित्येक जण जीडीपीत आपले अस्तित्व पूर्णपणे दाखवत नाहीत. (माझी अशी शंका आहे की त्यांचा जीडीपीत समावेश जवळपास नसावा.)
अर्थशास्त्रातील जीडीपी आणि युटीलिटीची कल्पना यात मोठे अंतर आहे. आज कुठलेही थंड प्रदेशातील देश जास्त (स्कॅन्डेनेविया, कॅनाडा) जीडीपी उत्पन्न दाखवतात. यातील एक भाग म्हणजे अतिशय थंड हवेमुळे घर, अन्न, कपडे आणि उर्जेच्या रोजच्या (जगण्याला आवश्यक) गरजा या त्यापेक्षा जास्त उष्ण असलेल्या देशांपेक्षा जास्त असतात. त्यामुळे त्यांची युटीलिटी (कदाचित हलाकीत असले तरी ) कमी असली तरी जीडीपी जास्त असतो.
याशिवाय पर्चेसिंग पॉवरचा मुद्दा पण विचारात घेण्यासारखा आहे.
प्रमोद
सुखी माणसाचा सदरा
-हे मुद्दे योग्य आहेत आणि ते पटतात. प्रत्येक गोष्टीचे आर्थिक मूल्य ठरवण्याचा अट्टाहास नसावा पण तिचे सामाजिक मूल्य काय आहे? त्याचा विचार अर्थशास्त्रात अंतर्भूत करायला हवा. त्यापरता 'सुखी माणसाचा सदरा' हा मुद्दा आहेच.
-हे कशासाठी आले आहे? स्त्री-पुरुष असा भेदविचार असू नये. घरातली लहान मुलेही कामे करतात. त्यांचा अंतर्भाव यात कसा होईल?
किंमत ठरली
मुद्दा असा आहे की किमती ठरवणं कठीण आहे म्हणून शास्त्रीय पातळीवर तो प्रयत्नच होऊ नये हे बौद्धिक आळशीपणाचं लक्षण वाटतं.
किंमत कधी ठरेल? तर या धडपडीचा उपयोग झाला तर.
आपली आई घरातही खूप राबते, एवढा विचार मुलांच्या मनात एरवीही येत असतो (किंवा यावा अशी अपेक्षा असते, सामाजिक पातळीवर).
त्यामुळे आईला मिळणारा आदर, महत्त्व इ. त्याचे "मोल" असते. अर्थशास्त्रीय दृष्टीतून या कामाचे मोल नसते. कारण तेथे वैयक्तिक पातळीवरचे "मोल" चुकवणे, पांग फेडणे ही संकल्पना नाही. पण घासकडवी म्हणतात तसे झाले तर उद्या नॉट फॉर प्रॉफिट संस्थेला दान केलेल्या पैशाचा करामध्ये थोडीफार सूट मिळण्यासाठी फायदा होतो तसा आई किंवा घरगुती कष्टकरी बायको या संस्थेचा करात सूट मिळवण्यासाठी फायदा होणे अशी संकल्पना तयार झाली, तर मजा येईल :-)
मोल, मान, पांग
आपण डॉक्टरला देखील मान देतो. पण त्याच्या सेवेबद्दल पैसे देणं हे अपेक्षितच असतं. मान वगैरे ऑप्शनल असतो.
करात सूट वगैरे माहीत नाही, पण समाजात निर्माण होणाऱ्या महत्त्वाच्या सेवेचं काहीतरी मूल्य मान्य करावं, हिशोबात घ्यावं. नाहीतर आपण चुकीच्या गोष्टी ऑप्टिमाइझ करत बसू.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
भावना आवडली पण लेख तसा समजला नाही
घरकाम आणि बालसंगोपनाला समाजात मिळावा तितका मान मिळत नाही, या भावनेशी मी सहमत आहे. समाजातल्या ऐतिहासिक आणि आधुनिक पुरुषप्राधान्याचा याबाबतीत काही संबंध आहे, हे विश्लेषणही पटते.
- - -
पण बाकी कसलातरी हिशोब केला पाहिजे, या बाबत लेखाचा रोख मला कळलेला नाही. जीडीपी या आकड्याचा उपयोग हल्ली कशासाठी करतात?
तुमच्या ओळखीच्या कुटुंबातल्या बाईने सत्तर हजारारांची नोकरी सोडली, त्याचा हिशोब तर व्यवस्थित दिलेला आहे. अशा कृती करताना हिशोब व्यवस्थित होतो, आणि जीडीपी वाढते की कमी होते, याच्याकडे व्यक्ती यथेच्छ दुर्लक्ष करते. उलट जीडीपीचा आकडा या बाबतीत नि:संदर्भ आहे.
तुम्ही म्हणता की या असल्या उत्पादनाचा अभ्यास अर्थशास्त्रात व्हावा. होतोच. मायक्रोइकोनॉमिक विश्लेषण करताना ऑपर्च्यूनिटी कॉस्ट, बार्टर्ड सर्व्हिसेस वगैरे हिशोब केलेच जातात. अर्थशास्त्राचे सिद्धांतही या विवेचनामुळे बदलायची गरज नाही, की प्रायोगिक विश्लेषणेही बदलायची गरज नाही.
अन्यत्र याच चर्चाप्रस्तावाखाली श्री. अवलिया म्हणतात की :
हे चर्चाप्रस्तावक (श्री. घासकडवी) सुसंदर्भ मानतात. म्हणजे स्वतःच्या उपयुक्ततेसाठी केलेले उत्पादन आणि खर्चसुद्धा सुसंदर्भ आहे. तसे पाहाता मी श्वास घेण्याकरिता स्नायूंचा "खर्चिक" वापर करतो, स्वतःला अन्न भरवतो आणि माझे सुदृढ दीर्घायुष्य उत्पादन करतो. या सर्व उलाढालीचा हिशोब सुसंदर्भ होऊ लागेल.
यावरून सहज लक्षात येईल, की काही खर्च-उत्पादने जीवनासाठी अत्यावश्यक असली, तरी बाजारपेठ त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. बाजारपेठेचे दुर्लक्ष म्हणजे "या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत" असे प्रतिपादन मुळीच नसते. बहुतेकांचा श्वासोच्छ्वास, अन्न भरवणे, यांची सार्वत्रिक बाजारपेठ नाही इतपत म्हणण्यापुरते ते दुर्लक्ष असते. या दोन क्रियांची उदाहरणे केवळ अचरट नाहीत. ज्या थोड्या लोकांना स्वतःच्या बळाने श्वासोच्छ्वास करता येत नाही, किंवा स्वतःला अन्न भरवता येत नाही, ते लोक या सेवा बाजारातून विकत घेतात. रेस्पिरेटर, परिचारक-सेवा यांची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत किती पैशांची-सेवेची उलाढाल होत आहे? हा बाजारपेठेला उपयोगी आकडा आहे. "पण जे लोक स्वतःच्या बळावर श्वास घेत आहेत, आणि स्वतःला अन्न भरवत आहेत, त्यांचा हिशोब का नाही केला? हा त्यांचा अपमान नाही काय?" असे कोणी म्हणाले तर बाजारातले ग्राहक-विक्रेते किंकर्तव्यमूढ होतील. त्यांचा हिशोब केला म्हणून बाजारपेठेतील (किंवा बाहेरील) व्यक्तीची कुठली कृती बदलणार आहे?
चर्चाप्रस्तावक म्हणू शकेल "स्वतःची सेवा सोडा". मग बालसंगोपनच घेऊ. बाळपणी आईवडलांनी मला मोफत अन्न भरवले, अंग धुतले, वगैरे. पालक असेच आजकालही बाळासाठी करतात. आता इस्पितळात बाळाची काळजी घेणारी परिचारिका असली - तिच्या सेवेचा दर कसा ठरवायचा? जितकी बाळे या सेवेसाठी बाजारात आहेत ती गरज मानावी, जितके सेवादाते बाजारात उपलब्ध आहेत त्यावरून पुरवठा, आणि त्या दोहोंवरून सेवेची किंमत ठरवता येईल. जे पालक आपल्या बाळांना स्वतः न्हाऊमाखू घालत आहेत - बाजारपेठेत नाहीत - त्यांचा हिशोब उत्पादक आणि ग्राहक म्हणून केला तर आपण करू शकतो ना. पण त्या प्रचंड उत्पादनावरून आणि ग्राहकसंख्येवरून इस्पितळातल्या बाळासाठी परिचारिकेच्या सेवेची किंमत कशी ठरवणार? बाजारपेठेबाहेरच्या ग्राहक-उत्पादकांचा हिशोब न-करता सेवेची किंमत ठरवली जाते. म्हणजे जगातल्या सर्व पालक-बालकांच्या आनंदमय नात्यांचा अपमान होत नाही.
("बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई" या गाण्यात थोडेसे अर्थशास्त्रीय विश्लेषण करायचा प्रयत्न केला आहे. पण तो काव्यालंकार मानून त्याबद्दल कोणीही गंभीर विचार करत नाही. पण वाटल्यास मायक्रोइकोनॉमिक विश्लेषण करता येईल. पण ते विश्लेषण केल्यानंतर फक्त "पैशांची आदलाबदल न होणार्या आई-बाळांमधील देवाणघेवाण" याबद्दल ज्ञान मिळेल. परिचारिकेच्या सेवेबद्दल किती मोबदला द्यावा याबद्दल काहीच उजेड पडत नाही.)
ग्रॉस हॅपिनेस प्रॉडक्ट
मुद्दा पटला. छान विषय काढलात.
भुतान हा विकसीत देश नाही (पाश्चिमात्यांच्या दृष्टीकोनातून) पण तो सुखी देश आहे.
आपण जी डि पी मोजतो आणि आपला असा संभ्रम होऊन जातो की - जास्त जि डी पी म्हणजे जास्त सुख.
आपण जी डि पी पेक्षा जी हॅ पी (ग्रॉस हॅपिनेस प्रॉडक्ट) कसे मोजता येईल एकडे लक्ष दिले पाहिजे. जी डि पी ठिक आहे पण त्याला मर्यादा आहेत हे समजून घेतले म्हणजे झाले.
http://rashtravrat.blogspot.com
वाह!
हा लेख मी आज पुन्हा वाचला. त्यानिमित्ताने मोजके का होईना पण आलेले प्रतिसाद आणि घासकडवी यांची उत्तरे वाचली. धनंजयच्या प्रतिसादाला त्यांनी उत्तर का दिले नसावे अशी शंकाही वाटली. रिटेच्या शंकांनाही उत्तर नाही.
ही चर्चा खुद्द लेखकामुळेच तर थंडावली नाही ना असा प्रश्न पडला.
कदाचित एकच लेख अनेक ठिकाणी एकाचवेळी प्रकाशित केला की लेखकांना दोन्ही/तिन्ही आघाड्या सांभाळणे कठिण होत असावे.
असो. पुनर्वाचनाचा आनंद घेता आला हे ही नसे थोडके.
बायदवे, हा प्रतिसाद नं: १४ ;-) ह. घेणे.
धन्यवाद
"राजेश यांनी माझ्याही प्रतिसादाचा प्रतिवाद करणे का टाळले असावे यामागचे एक कारण स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद" असे मी लिहीत असतानाच वरील प्रतिसाद बदलण्यात आला आहे (आणि माझ्याही प्रतिसादाचा उल्लेख तेथेच आला आहे). आता माझ्या प्रतिसादाला शून्य-माहिती-प्रतिसाद या गटात मोजावे लागेल :(
हे खरे आहे
मी दोन्ही ठिकाणी दिलेला (मला आठवणारा) एकच लेख आहे (की लेखमाला) - "एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग"
दोन्ही ठिकाणी समरसून उत्तरे देणे फारच कठिण झाले असते. एके ठिकाणी चर्चा थंडावल्यानंतर तो लेख मी दुसर्या ठिकाणी दिला.
दोन्ही ठिकाणी चर्चेत बराच फरक होता. दोन्ही ठिकाणी चर्चा केल्याबद्दल मला कुठलेच शल्य वाटत नाही.
चांगला विषय
खाजगीवाल्यांनी टाकलेल्या चर्चेच्या निमित्ताने आपण एका उत्तम विषयावरील चर्चेवर अन्याय करतो आहोत हे कळले. घरकाम आणि बालसंगोपन ही महत्त्वाची कामे आहेत. प्रत्येक वेळी स्त्रीनेच हे काम करायला पाहिजे असेही नाही. असो.
मला असं म्हणायचं आहे की मानवी आनंदासाठी जे व्यवहार होतात ते सर्वच अर्थशास्त्राच्या अभ्यासात यावेत.
हरकत नाही. अशी दरपत्रके तयार करायला हवीत. उदा. पत्नीने पतीच्या आनंदाखातर मोगऱ्याचा गजरा घातला. (२० रुपये). वगैरे वगैरे.
तूर्तास एवढेच.
हा प्रतिसाद नं: १५.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
कप्पाळ!
माझ्यामते तुमचा प्रतिसाद १६ आहे तरी १५ वा असे मोजताय. दरपत्रक बनवून गणित काय करणार? ;-) ह. घ्या.
मी प्रतिसाद टाकेपर्यंत
मी प्रतिसाद टाकेपर्यंत रिटेंनी प्रतिसाद टाकला होता.
दरपत्रक बनवून गणित काय करणार? ;-) ह. घ्या.
हीहीही. दरपत्रकाची आयड्या चांगली आहे पण. लग्न ठरवताना दरही ठरवून घ्यावेत.
दरपत्रक बनवून गणित काय करणार? ;-) ह. घ्या.
हीहीही. जाऊ द्या ह्यावर एखादी आधुनिकोत्तर कविता सुचत होती.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
छान
अरे वा! मस्त चर्चा. पण घासकडवींनी अशी पाठ का फिरवली समजले नाही. इकडे प्रतिसाद कमी आले म्हणून की काय?
असो ह्या घ्या माझा प्रतिसाद नं. १७
कॉजॅलिटी!
नव्हे, पाठ फिरवली म्हणून प्रतिसाद कमी आले!
समरसून प्रतिसाद द्या
नव्हे, पाठ फिरवली म्हणून प्रतिसाद कमी आले!
पाठ फिरवली काय करताय समरसून प्रतिसाद द्या की जरा. (कापूसकोंड्याची गोष्ट सांगूच्या धरतीवर).
अवांतर:
रिटे, तुमचं लग्न झालंय का? नसेल तर मग आधी दरपत्रक तपासून बघा. ही चुंबने, ह्या मिठ्या वगैरे वगैरे तुम्हाला कितपत परवडतील ह्याचा हिशेब करा. (बाय द वे त्यातही पोस्टपेड आणि प्रीपेड असा काही प्रकार असतो का?) असो. काही दिवसांनी डेबिट, क्रेडिट कार्डे निघाल्यास नवल नाही.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
दरपत्रक
दरपत्रक पाहण्यापूर्वी: पहिल्या चुंबनाचे मूल्य हे पहिल्या रात्रीहून अधिक असते हे लक्षात ठेवा बरंका (असे मी नाही म्हणत इथे एका तुलनात्मक अभ्यासात म्हंटले आहे. )
बाकी ह्यावरुन 'रिटेंचे लग्न' अशी एक लेखमालाच सुचते आहे:
मुलगी होमिओपथी डॉक्टर आहे. घाटपांड्यांनी पत्रिका जुळवून दिली आहे. गजानन महाराजांच्या साक्षीने संजोप राव लग्न लावत आहेत. सगळे विधी यथासांग पार पडत आहेत का ह्यावर थत्ते बारीक लक्ष ठेवून आहेत..अहाहा
मग तुम्हीच घ्या की मनावर
मग शिंदे तुम्हीच घ्या की तेवढे मनावर. बघा एखादे अनुरूप स्थळ. दरम्यान घासकडवी त्यांना ह्या संकल्पना, ह्या कमॉडिटी मार्केट मध्ये कसे ट्रेडिंग करायचे ते समजावून सांगतीलच. बाय दे डोमेस्टिक प्रॉडक्ट ग्रॉस का असतो बरे?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
ठोक तसाच निव्वळही असतो
देशांतर्गत एकूण/ढोबळ/ठोक उत्पादनासारखे (जीडीपीसाठी प्रतिशब्द) देशांतर्गत निव्वळ उत्पादन (नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट) ही संकल्पनादेखील उपलब्ध आहे.
त्यामुळे अंतर्गत उत्पादनात फक्त ठोकशाहीच (किंवा कलम १४४) चालते असे नाही ;-)
("देशांतर्गत एकूण/ढोबळ उत्पादन" हे शब्दप्रयोग सकाळ वर्तमानपत्रातले आहेत. यासाठी शालेय पाठ्यपुस्तकातला प्रतिशब्द काय आहे?)
सकल/स्थूल उत्पादन
एकूण/ढोबळ/ठोक उत्पादना साठी सकल/स्थूल उत्पादन हे पर्यायही आहेत. शालेय पुस्तकातला प्रतिशब्द बघावा लागेल. [ ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टला असभ्य किंवा गावंढळ घरगुती उत्पादनही म्हणता येईल. ;) (ग्रॉस = इनडीसेंट, क्रूड)]
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"