सायलेंटियम

सायलेंटियम

साल्झबर्ग या ऑस्ट्रीयातल्या छोट्याश्या गावात आत्महत्त्या करण्याची लाट आली आहे की काय असे वाटत असते. त्यातच गावातील प्रतिष्ठित अश्या समारोह अध्यक्षांच्या जावयाच्या आत्महत्त्येने गावात खळबळ माजते. हे अध्यक्ष साल्झबर्ग गावाचे नाव मोठे व्हावे म्हणून निरनिराळे समारोह आयोजित करण्याचे मनावर घेत असतात. त्यासाठी वेगवेगळे कलाकार मिनतवारीने गावात बोलावले जातात.

पण यावेळी ही आत्महत्त्या नसून खून आहे असा संशय तयार होतो. कारण या माणसाने चर्चच्या सध्या आर्चबिशप असलेल्या व्यक्तीवर लैंगिक शोषणाचे जाहीर आरोप केलेले असतात. कट्टर धार्मिक ख्रिश्चन मंडळी यामुळे बिथरलेली असतात.

अशावेळी ब्रेनर (जोसेफ हेदर) नावाचा एक खासगी गुप्तहेर तेथे येतो. हा गुंता सोडवण्याच्या प्रयत्नाला लागतो. चर्चमध्ये एक मुला-मुलींची बोर्डींग शाळाही असते. या शाळेत मुली मात्र बहुदा गरीब आशियातील देशातून येत असतात. ब्रेनर चर्चमध्ये नोकरी मिळवतो आणि ती जागा आतून समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
ब्रेनरला चर्चमध्ये ख्रिस्ताचा क्रूस दुरुस्त करण्याचे काम दिले जाते. तो जड आणि भला मोठा क्रुस वाहून नेतांना ब्रेनर जिन्यावरून धडपडतो आणि बेशुद्ध पडतो. त्या रुग्णवाहीकेमध्ये जाग येते. नशीबाने रुग्णवाहीकेचा चालक बर्टी, त्याचा जुना मित्र निघतो. हा चालकही नकळतपणे या गुंत्यात सामील झालेला असतो.

ब्रेनरला हळूहळू ध्यानात येऊ लागते की चर्चने चालवलेली शाळा म्हणजे प्रत्यक्षातला एक कुंटणखाना आहे. बाहेरून ऑस्ट्रीयन किंवा जर्मन भाषा न येणार्‍या गरीब मुली आणवल्याने त्या गायब झाल्या तरी कुणाला फार फरक पडत नाही.
पण अजूनही या भानगडी मागे नक्की कोण आणि कसे गुंतले आहे याचा संदर्भ त्याला लागत नाही.

त्यात अजून एक आत्महत्त्या होते. त्यात ब्रेनर संशयित ठरवला जातो. चर्चचा फादर, फरारी असलेल्या ब्रेनरला सत्य सांगण्याचे आमिष दाखवून एका ठिकाणी बोलावतो आणि पोलिसांच्या हवाली करतो. ब्रेनरला समारोह अध्यक्षांची सुंदर आणि तरुण मुलगी सोडवते. शिवाय त्याला आपल्या नवर्‍याच्या आत्महत्येचा गुंता सोडवण्याचे कामही देते.

ब्रेनर हा गुंता सोडवतो का? कोण असते या खुनी मालिकेत आणि का? चर्चचे काम नक्की कसे चालत असते? समारोह पूर्ण होतो का? त्या मुलींचे पुढे काय होते ते चित्रपटातच पहा.

थ्रिलर स्वरूपाचा बर्‍यापैकी वेगवान आणि गुंतागुंतीची कथा असलेला हा चित्रपट आहे.
मला बरा वाटला. कथेमध्ये बर्‍यापैकी गुंतून राहिलो. पुढे काय होणार ही उत्कंठा शेवटपर्यंत राहिली.
चर्चच्या पवित्र स्वरूपा मागचे काळेकुट्ट सत्य पाहतांना कसे तरीच झाले. कथेला येणारी अनपेक्षित वळणे आणि कलाटण्या मस्त आहेत. ब्रेनरने क्रुस आपल्या खांद्यावरून वाहून नेणे वगैरे कथेला सयुक्तिक.

(चित्रपट पाहतांना कृपया ऍक्शन सीन्सची हॉलिवुडशी तुलना करू नका. कारण त्यातल्या ऍनिमेशन्सनी आपला अपेक्षांचा 'बार' फार उंचावून ठेवलाय. यातल्या ऍक्शन्स बर्‍यापैकी वेगवान आहेत.)

चित्रपटाचे नाव : सायलेंटीयम Silentium
भाषा: ऑस्ट्रियन- जर्मन
वर्षः २००४
लेखक: वुल्फ हास Wolf Haas
दिग्दर्शकः वुल्फगॅन्ग मुर्नबर्गर Wolfgang Murnberger
प्रमुख भुमिकेत: जोसेफ हेदर Josef Hader, सायमन श्वार्झ Simon Schwarz आणि इतर

Comments

किती चित्रपट

आपला चित्रपट अवलोकनाचा वेग मानावा लागेल.

खरे तर

खरे तर पाहतो बरेच, पण लिखाण मात्र काही मोजक्या चित्रपटांवरच होते. ;)

-निनाद

आपले अवलोकल

छान असते. पण मी एकही चित्रपट बघु शकलेलो नाही - काही काही कारणास्तव

उत्सुकता वाढली.

कथेने चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली. अर्थात, त्याचे कारण धार्मिक उठाठेवींतील इंटरेष्ट नसून थ्रिलर चित्रपट आवडतात इतकेच आहे.

यासारखाच लियाम निसनचा टेकन हा चित्रपट आवडला होता.

चर्चच्या पवित्र स्वरूपा मागचे काळेकुट्ट सत्य पाहतांना कसे तरीच झाले.

दीपा मेहताचा वॉटर पाहिला नाहीत का? पाहिला तर चर्चच्या पवित्र स्वरूपामागचे काळेकुट्ट सत्य पाहताना कसेतरीच होणार नाही. :-)

तसे नव्हे

दीपा मेहताचा वॉटर पाहिला नाहीत का? पाहिला तर चर्चच्या पवित्र स्वरूपामागचे काळेकुट्ट सत्य पाहताना कसेतरीच होणार नाही.

मला फक्त इतकेच सांगायचे आहे की, हिंदू किंवा ख्रिश्चन अशा रिलिजियस पॉलिटिकल दृष्टिकोनातून ते वाक्य आलेले नाही.
चित्रपटात काही वेळा मेरीची प्रार्थना काही पात्रे करतात. त्या अनुषंगाने ते विधान आहे.

(वैयक्तीक म्हणाल तर प्रामाणिकपणे सांगायचे तर मला चर्च चे शांत आणि स्वच्छ वातावरण आवडते. असेच देऊळही आवडते. पण अशी देवळे क्वचित दिसतात.)

-निनाद

 
^ वर