तोक्यो गोमी ओन्ना
तोक्यो गोमी ओन्ना
अर्थात तोक्यो ट्रॅश गर्ल किंवा तोक्यो गार्बेज गर्ल
मियुकी (नाकामुरा मामी) ही तोक्यो मधल्या एका कॅफेमध्ये वेट्रेस आहे. तिला या कॅफेमध्ये एक मैत्रिण आहे. ही बिनधास्त मैत्रिण नवनवीन जोडीदार शोधत राहते. आपल्या शैय्यासुखाचे किस्से मियुकीला ऐकवत राहते.
मियुकी तिच्या अपार्टमेंट मध्ये राहणार्या संगीतकाराच्या (कझुमा सुझुकी) प्रेमात पडली आहे. पण हे प्रेम व्यक्त करण्याचे धाडस तिच्या मध्ये नाही. रोज रात्री ती कुणी पाहत नसतांना त्याचा कचरा उचलून आपल्या घरी घेऊन येते. त्यातून त्याच्या आयुष्याची चाहूल घेत राहते. त्याचा कफल्लकपणा, त्याच्या सिगारेटस् आणि त्यांची पाकिटे जमा करत राहते. त्याने टाकून दिलेले फाटलेले जीन्स चे जॅकेट शिवून घेऊन वापरते. आपल्या छोट्याश्या जगात ती हे सगळे करत असते. एकदा तीला त्या कचर्यात एक वापरलेला निरोध सापडतो. स्पर्धा आल्याचे जाणवल्याने अचानकपणे तीच्या प्रेमाला प्रखरता येते.
याच वेळी मियुकीवर एक साधासा नऊ ते पाच नोकरी करणारा तरूणही प्रेम करत असतो. पण ती त्याला झिडकारत राहते.
एका क्षणी एका ओस पडलेल्या मद्यालयात त्या संगीतकाराची आणि मियुकीची भेट होते. पुढे जाऊन ती रात्र त्याच्या सोबत घालवते. हा काळ बरोबर घालवल्यावर तिला काही गोष्टींची जाणीव होते.
तिने त्याच्या कचर्यातून आपल्या मनात विणलेली प्रतिमा प्रत्यक्षाहून भिन्न असते. तिचे प्रेम त्या प्रतिमेवर असते. प्रतिमेला तडा गेल्याने ती अचानकपणे मुक्त होते आणि एका क्षणी तिने गोळा केलेला सर्व कचरा फेकून देते.
चित्रपटातल्या कोणत्याही व्यक्तीरेखा फारश्या परिणामकारक दिसत नाहीत. मियुकी साधीशी पण चमत्कारीक वाटते.
चित्रपट बघून संपल्यावरही मी बराच काळ विचारच करत बसलो. मला चित्रपट विस्कळीत वाटला. पण र्युचि हिरोकी इतका ढोबळ चित्रपट बनवेल असे वाटले नाही. अजून विचार केल्यावर मला वाटले की यातून अजून काही अर्थ असावा. कदाचित मला हा चित्रपट पूर्णत्वाने समजला नाही. कदाचित भाषांतराचाही परिणाम असावा. हा चित्रपट कंझ्युमरिझमवर भाष्य करतो वगैरे वाचले पण मला तितकेसे झेपले नाही. तुम्ही पाहिला असेल नि या चित्रपटात तुम्हाला काही अर्थ सापडत असेल तर अवश्य कळवा, लिहा.
चित्रपटाचे नावः तोक्यो गोमी ओन्ना Tokyo Trash Baby
भाषा: जपानी
वर्षः २०००
पटकथा लेखक: शोतारो ओइकावा Shôtarô Oikawa
दिग्दर्शकः र्युचि हिरोकी Ryuichi Hiroki
प्रमुख अभिनेते: नाकामुरा मामी Nakamura Mami, कझुमा सुझुकी Kazuma Suzuki
Comments
कदाचीत -
चित्रपटाचं थोडक्यात दिलेलं वर्णन आवडलं.
दिगदर्शकाला हे सांगायच असावं :
१. दिसतं तस नसतं
२. मनाला मिळालेली मुक्ती (इथे चित्रपटाच्या शेवटी) खुप मौल्यवान असते.
३. व्यक्तीप्रेम हे अंध नसावं
मला "नो कंट्री फोर ओल्ड मेन" ह्या चित्रपटातुन काय सांगायचे आहे ते अजुन कळाले नाही :(.
-------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
कथाबीज म्हणून आवडले
जे कथानक सांगितले आहे, ते कथाबीज म्हणून आवडले. (याची उत्तम लघुकथासुद्धा लिहिली जाऊ शकेल असे वाटते. कदाचित कवितासुद्धा.)
रूपक सहजतेने सांगितले आहे की बटबटीत आहे, त्यावर चित्रपट तरेल किंवा बुडेल.
जमला तर चित्रपट बघीन. ओळखीबाबत धन्यवाद
रुपक
रुपक मानले तर तसे बर्यापैकी 'फ्लॅट' रितीने दिले आहे. मला ढोबळ वाटले. यावर बेतलेली कथा किंवा कविता वाचायला आवडेल.
-निनाद
कदाचीत -
चित्रपटाचं थोडक्यात दिलेलं वर्णन आवडलं.
दिगदर्शकाला हे सांगायच असावं :
१. दिसतं तस नसतं
२. मनाला मिळालेली मुक्ती (इथे चित्रपटाच्या शेवटी) खुप मौल्यवान असते.
३. व्यक्तीप्रेम हे अंध नसावं
मला "नो कंट्री फोर ओल्ड मेन" ह्या चित्रपटातुन काय सांगायचे आहे ते अजुन कळाले नाही :(.
-------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
व्हॉल्व्हर
व्हॉल्व्हर ची ओळख करून देतांना नेमक्या शब्दात जमत नव्हते. म्हणून या वेळी जाणीवपूर्वक तसे (स्नॅप-शॉट?) लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
आपले म्हणणे कळले. पण चित्रपट बहुदा अतीव कझ्युमरिझमच्या अतिरेका विषयीही बोलत असावा. कारण चित्रपटातली जुनी पिढी आपण बांधलेल्या कचर्याच्या बेटा विषयी अतिशय अभिमानाने बोलते.
शिवाय चित्रपट मोनोटोनस किंवा तेच ते आयुष्य जगण्याचा कंटाळा दाखवून देत असावा. मियुकी तिच्यावर प्रेम करणारा पण ९ ते ५ नोकरी करणारा बुर्झ्वा तरूण नाकारत राहते. तिला अयशस्वी का असेना, पण वेगळ्या वाटेवर चालणारा तरुण आवडतो.
-निनाद