असा हा पुर्वांचल

पूर्वांचल छात्र शिबीर २०१०, नांदेडच्या निमित्ताने प्रकाशित झालेली 'सांकव' ही स्मरणिका माझ्या वाचनात नुकतिच आली. पूर्वांचलातील बांधवांच्या प्रती आपल्या मनातील एकात्मतेचे हृदयबंध बळकट व्हावेत. सीमाप्रश्न सदोदित चघळणारे आम्ही अंतर्गत यादवी मात्र उघड्या डोळ्यांनी बघत असतो. अनुपम सौंदर्याने नटलेला, निसर्ग संपत्तिची उधळण असलेला निसर्गाची उपासना करणार्‍या विभिन्न जनजातीय बांधवांनी व्यापलेला हा सीमावर्ती भूभाग आज फुटीरता, उग्रवाद, यांनी कलंकित झाला आहे. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या या पूवांचलातील काही भागात भारतीयांना प्रवेश करण्यासाठी प्रवेशपत्र लागते. या विध्वंसक कृत्यांना पायबंद घालण्यासाठी समस्त भारतियांच्या मनाचं उन्नयन होवून मनामनाचे बंध घट्ट् करणारा बंधुत्वाचा सेतू अर्थात 'सांकव' साधला जावा यासाठी गेल्या पन्नास वर्षाहुन अधिक कालापासुन विविध सेवा संस्थां आपल्या कार्याद्वारे पूर्वाचलांत कार्यरत आहेत्. एखाद्या ठिकाणचे प्रश्न समरस झाल्याशिवाय समजून घेता येत नाहीत आणि समरसतेला आत्मीयतेची बैठक हवी. आभाळ फाटलय म्हणून हतबल होण्यापेक्षा आपल्या कुवतीनी दोन टाके घालायचे! केव्हातरी ते नक्कीच शिवले जाईल. निदान फाटल्याची लांबी तरी कमी होईल

याच दृष्टीनी पूर्वांचलातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना आपल्याकडे आणून शिक्षण दिले जाते. महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांचे एकूण तेरा छात्रावास चालतात. या छात्रावासातून शिक्षण घेणारे विद्यार्थी उद्याच्या शांत. एकात्म, संपन्न पूर्वांचलाचे प्रवक्ते बनतील ही अपेक्षा आहे. महाराष्ट्रात चालणार्‍या या सर्व छात्रावासांचे एकत्रीकरण दरवर्षी पूर्वांचल छात्र शिबीरातून होते. सैनिकसंत गुरुगोविंदसिहजींच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या गोदाकाठी वसलेल्या नंदीग्राम नगरीत यावर्षीचे शिबीर संपन्न झाले. त्यानिमित्ताने सर्व सामान्यापर्यंत हा विषय पोहचावा, त्यावर चिंतन व्हावं आणि कृतीतुन एकात्मतेचं, सामाजिक संवेदनेचं दर्शन घडावं, या उद्देशाने स्मरणिकेची निर्मीती. यातील लेख माहिती पुर्ण तर आहेतच पण तेथील संस्कृती व इतिहास याची ओळ्ख सर्वसामान्यांना व्हावी या उद्देशाने डॉ. शरद हेबाळकर यांनी लिहिलेला एक लेख साभार, उपक्रमींसाठी देत आहे.

कामरुप आणि भगवान शिव

सार्‍याच देवता अत्यंत सामर्थ्यवान. प्रत्येक देवाच्या शक्तीचं वेगळं वैशिष्ट्य-सारेच महाविनाशकारी अस्त्रांनी संपन्न होते. तरीही दुष्टांचा संहार करतांना देवेंन्द्राचंही कुशल नेतृत्व कमी पडत होतं. आणि ही समस्या सुटण्याचा एकच मार्ग होता. भगवान शिव आणि जगज्जननी उमा यांना संतती झाली तरच अद्वितीय नेतृत्व देणार्‍या महान योध्द्याची प्राप्ती होऊ शकत होती.

योगीराज शिवांना समाधी अवस्थेतुन बाहेर आणायचं आणि शिवपार्वति मिलन घडवून आणायचं हे तर कर्मकठीण कार्य. पण दुसरा उपाय नव्हता. अखेर देवेंन्द्रानं ते साहस केलं. शिवांना समाधी स्थितीतून बाहेर काढून त्यांच्यात कामवासनेचा संचार व्हावा ही कामगीरी कामदेवांवर सोपविण्यात आली. देवेन्द्राची आज्ञा आणि सगळ्या देवांची विनवणी यामुळे या कामाच्या भयंकर परिणामाची कल्पना असूनही कामदेव आपल्या कामगिरीवर निघाला.

आपले धनुष्य सरसावून पहिला अरविंद हा कामबाण कामदेव 'मदनाने' भगवान शिवाच्या दिशेने सोडला. त्याचा काही परिणाम झाला नाही. अशोक आणि आम्र हे आणखी दोन बाण सोडले. शेवटी नवमल्लिका आणि निलोत्पळ हे प्रभावी बाण सोडले. भगवान शंकर ताडकन उठले. थरथर कापत उभ्या असलेल्या कामदेवाकडे पाहून त्यांनी संतापून आपला तिसरा नेत्र उघडला. क्षणार्धात कामदेव अग्निजाळांनी लपेटला गेला. उरला एक राखेचा ढिगारा. कामदेव मदनाची पत्नी रती अक्षरशः वेडी झाली. तिचा आक्रोश भगवान शंकरानाही पाहवेना. रती त्यांच्या पायावर कोसळली. भगवान शिवांनी तिला उठवून म्हटले. विलाप करु नकोस, कामदेवाची रक्षा घेउन प्रगज्योतिषपुरला जा, आणि आश्चर्य घडले. शिवकृपा झाली. कामदेव मदनाला तिथे नवीन रुप प्राप्त झाले. कामदेव आणि रती तिथेच राहून शिवार्चनेत मग्न झाले.

हे प्रागज्योतिषपुर म्हणजेच आजचे गुवाहाटी आणि आजचा पुर्वांचल म्हणजे कामदेव आणि रतीच्या वास्तव्यामुळे यथोचित नाव प्राप्त झालेला कामरुप. वर्तमान अरुणाचल, नागालैंड, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा मणिपुर आणि आसाम हा सारा भुप्रदेश कामरुप मध्येच होता.फार फार वर्षांपुर्वी पूर्व बिहारमधील पूर्णिष्ठा आणि बांगला देशातिल रंगपुर व मैमनसिंह जिल्हे कामरुपचेच भूभाग होते. हा कामरुप रत्नपीठ,कामपीठ, स्वर्णपीठ आणि सीदार पीठ असा चार पीठात विभागलेला होता. योगिनीतंत्रात त्याचे वर्णन आहे. कामरुप हे नाव तर प्राचीन आहे. कालिकापुराणात त्याचा उल्लेख आहे. "हाम्भुनेत्राळीनिर्दग्धः कामशम्मोर्नुग्रहात् म्हणुन हा कामरुप - भारतमातेच्या पूर्वाचल-उगवत्या सूर्याचे पहिले सोनेरी किरण इथे पडतात.

किरातांची भूमी

कामरुप ही किरातांची भुमी आहे. सारे किरात शिवोपासक आहेत. बोझे, कछारि, दिमासा, कोच, ळाळुंग, गारो, राभा, पहाडीतील खासि, जयंतिया, कार्बी, नागा, मिझो, मिकीर सार्‍या जनजाती किरात आहेत. किरात हा वंश नाही ते या सार्‍यांचे गौरवास्पद विशेषनाम आहे. कामरुप किरातांचा आहे. आणि या सार्‍या जनजाती कुठल्या ना कुठल्या रुपात शिवपार्वतीच्याच उपासक राहिल्या आहेत. बायौ बुढा हा बोडोंचा शिव तर शयौ बुढी ही पार्वती. बा म्हणजे पाच यौ म्हणजे तत्व. सिनू वृक्ष म्हणजे पंचत्वाचे प्रतीक. त्याच्या पाच शाखा असतात. डिमासा तर महान नदीचे पुत्र. धनशिरी नदीचे डिमासा भाषेतील नाव डिसा आहे. डि म्हणजे पाणी मा म्हणजे महान आणि सा म्हणजे संतान. त्यांचे मूळ पुरुष डिलोओब्रा आणि सांग्रीबा नद्यांच्या संगमस्थानी रहात होते.

सार्‍या जनजातींच्या आपल्या सुंदर श्रुती आहेत. खासी जनजाती तर अधिकच भाग्यवान आहे. मेघालयातील सोपेसेवंश पर्वतावर एक सुंदर वेल होती. इतकी उंच की धरतीमध्ये तिचे मूळ होते तर वरचे टोक थेट आकाशात गेले होते. आकाशातील देवता त्या वेलीवरुन धरतीवर यायच्या. विहार करायच्या आणि परत जायच्या. एका देवाच्या मनात स्वार्थी विचार आला. आपण राजा बनण्याच्या इच्छेने त्याने वेलच कापून टाकली. आकाशातून येणार्‍या जाणार्‍यांचा मार्ग बंद झाला. झिलय देवाला हे पसंत पडले नाही. त्याने दापाहशिन्यु या दैवी कन्येला धरतीवर पाठविले. खासी जन तिचीच संतान आहेत. खासी मध्ये एक म्हण आहे. "लौंगयेङ ना का दिंथेर" म्हणजे स्त्री पासुन ही (खासी) जनजाती निर्माण झाली. खासी आणि पूर्वांचलातील अन्य अनेक जनजातीत स्त्रीचा सन्मान आहे. या जनजाती मातृसताक आहेत.

कामरुपची धारणा किरातांनी दिली. किरातांचा धर्म तो कामरसाचा धर्म. दिसंतांची संस्कृती भारतिय म्हणूनच कामरुपची म्हणजेच पूर्वांचलाची संस्कृती भारतीय. योगिनीतंत्रात किरातांच्या जीवन पध्दतीचे वर्णन आले आहे. किरातांमध्ये संन्यासविधी नाही. दीर्घकालीन व्रते नाहीत. संसर्ग दोष नाही. म्हणजे जातीभेद नाही. मत्स्यमांस निषेध नाही. हंस, कबुतर, कासव, सुवर इत्यादी सर्व प्राणी भक्ष्य आहेत. तरीही बहुतेक सार्‍या जनजाती एकादशी, पौर्णिमा, व पवित्र तिथीला मांस मच्छ खात नाहीत.

किरात मुळातच अत्यंत अतिरुपशील आहेत. सत्यवादी आणि प्रामाणिक आहेत. कष्टाळू आणि दीर्घोद्योगी आहेत. शूर आणि स्वातंत्र्यपिय आहेत. पूर्वांचलाच्या सार्‍या जनजातीत हे गुण आहेत.

पहाडी प्रदेशातील मनू - मिझो

मिझोचा प्रदेशही पर्वतीय आहे. उत्तर दक्षिण पसरलेल्या समांतर अशा पर्वतांच्या रांगा आणि त्यातील खोल दर्‍या-उंच बांबूची दाट वने, मिझोचा अर्थच पहाडी प्रदेशातील मनू. 'मि' म्हणजे मनुष्य आणि 'जो' म्हणजे पहाडी प्रदेश. लुशाई आणि हमार या त्यांच्या जनजाती. लुसाई ज्या टेकड्यातून रहातात त्या डोंगराचे नाव पण लुशाईच. त्यांची पांशिअन हा देव सृष्टिचा निर्माता. त्याच्या अंकित असलेला खुआबांग हा देव त्याच्या भक्तांच्या अंगात येतो अशी त्यांची श्रध्दा आहे. भटके लुसाइ मणिपुरच्या प्रदेशात आहेत. आज बहुसंख्य मिजो ख्रिश्चन शाळेत पण त्यांची स्वतःची एक परंपरा आहे. भाषा आहे.

शूर आणि बुध्दिमान नाग

नाग ही एकच जनजाती नाही. अंगामी, आअ, कुबई, कचा, लेंगमी, कोन्याक, रेंगमा, जेलियांग अशा सार्‍या किरातांची 'नाग' ही सामान्य संज्ञा आहे. नाग हे त्यांचे कुलचिन्ह आहे. या प्रामाणिक , बुध्दिमान आणि शूर जनजातीचा प्रमुख देव सूर्य, पण प्रत्येक जनजातीचे देव आहेत. अंगामी नागांचा देव उकपेनुअकाई- तर आअंचा देव पाषाण स्वरुप आणि तोच त्यांचा मूळ पुरुष . रैंगमाच्या दृष्टीने सूर्य पुरुष आहे तर चंद्र हा देवी आहे. नागकन्यांचे आकर्षण रामायण काळातही होते. श्रीरामाचा पुत्र कुशाचा विवाह नागकन्येशी झाला होता. रावणाचा पराक्रमी पुत्र मेघनाद हा नागभुमीचा जावई होता.

परशुराम आणि अरुणाचल

अरुणाचल देखील हिमालयाच्या पर्वतशृंखलेतच आहे. कुण्डिल आणि विदर्भ ही अरुणाचल मधील प्राचीन राज्यांची नावे. परशुरामकुण्ड अरुणाचलात आहे. पिता जमदग्नी यांच्या आज्ञेने परशुरामांनी परशुने त्याच्या मातेचा वध केला. प्रसन्न झालेल्या जमदग्नी ऋषींनी त्याला वर मागायला सांगितले. परशुरामाने आईला जिवंत करण्याचा वर मागितला. परशुरामांची माता जिवंत झाली. पण आपण मातृहत्या केली याचे शल्य कायमच होते. परशुराम अस्वस्थ होते. आपले पाप धुवून काढण्यासाठी अखेर ते लोहित मध्ये आले. तेथील कुंडात स्नान करुन पापमुक्त झाले. आजही मकरसंक्रांतीला हजारो भाविक परशुराम कुण्डात स्नान करण्यासाठी येतात. महाभारतकालीन प्रसिध्द भीष्मकनगर ही लोहीत जिल्ह्यातच आहे. अरुणाचलमधील जनजाती सामान्यपणे नम्र आणि सरळ आहेत. काही बौध्द धर्मीय आहेत. लुंगचांग, योगली, सोसांग, रोनरोग, खेमसिंग, मोकलुंग, लोंगकी, लुंग्री इत्यादी जनजाती तांगसा आहेत. सिकिया, आ किंवा रांग काड हवा हा त्याचा सर्वश्रेष्ठ देव आहे. ते सूर्याची पण पूजा करतात.

मातृशक्ती आणी पौरुषाचं प्रतिक धान

कामरुपाच्या लोकपरंपरेचं अभिन्न अंग म्हणजे धान. ते मातृशक्ती आणि पौरुष दोन्हीचं प्रतिक आहे. धानाच्या गर्भातूनच तांदुळ बाहेर येतो. यासंदर्भात एक सुंदर जनश्रुती आहे. पूर्वी तांदळावर आवरण नव्हते. एकदा एक हावरट ब्राम्हण झाडाचे नांदूळ तसेच ओरबाडून खाऊ लागला. लक्ष्मी देवीने ते पाहिले. तिला ते सहन होईना. तिने त्यामुळे तांदळावर त्वचा चढवली. तेव्हापासून तांदूळ हातसडिने मोकळा करुन त्याचा उपयोग करु लागले. तांदूळ साठवायच्या कोठीघरात दिवा लावून ठेवतात. कोठीतुन प्रथम धान बाहेर काढतात तेव्हा एक शराईत (विशिष्ठ थाळीत) लक्ष्मीदेवीसाठी गुळ, केळी यांचा नैवेद्य ठेवतात. तांबूल ठेवतात. तांबूल कच्चा सुपारीचा असतो. कामरुपच्या स्त्रियांना तांबूल फारच प्रिय असतो.

रत्नभुमी मणिपुर

मणिपुरचा प्रदेशही मूळ किरातांचाच. कमाल, लुआंग, मोइरंग आणि मेईयेई या मूळ जनजाती मेईमेई म्हणुनच ओळखल्या जातात. तंगखुळ, काबुई, कोईराव, मारिंग या नागजनजाती या शिवाय कुकी आहेत, फुंगनाई आहेत. पाखेंबा हा सर्वश्रेष्ठ देव. तो विश्वपिता आहे. प्रत्येक गावाची एक रक्षक देवता असतेच. या ग्रामदेवतेला लासनई म्हणतात. उमंगलाई ही वनदेवता तर इमुंगळाई ही गृहदेवता. याशिवाय पानथोयबी, नौंगशाबू, युमथाईलाई अशा अनेक देवता आहेत. धार्मिक सण , उत्सव, रथयात्रा या बाबतीत तर मणिपुरी खुपच उत्साही आहेत. माड शांग (होळी) उत्सव म्हणजे तर आनंदाची पर्वणीच. मणिपुरी नृत्य ही तर मानवी सृष्टीला मिळालेली कलेची अपूर्व देण्गी आहे. महाभारत कालात अर्जुन मणिपुरला आला होता. मणिपुर्च्या राजकन्येशी, चित्रांगदेशी त्याचा विवाह झाला. बभ्रुवाहन हा त्यांचा पुत्र. माता, पिता दोघांकडुनही त्याला शौर्य, साहस, आणि बुध्दिमत्तेची देण्गी मिळाली होती.

रुक्मिणीहरण

सारा पुर्वांचल प्राचीन ऐतिहासीक घटना पौराणिक कथा, आध्यात्मिक जनश्रुती आणि सांस्कृतिक परंपरा या दृष्टीने भारतिय संस्कृतीचा अभिन्न अंग आहे. कामरुप ही जशी किरातभूमी, नागभुमी तशी असुर भुमी पण होती. असूर शुर होते , देखणे आणी सुंदर ही होते. भगवान शिवांचे उपासकही होते. पण महत्वाकांक्षी आणि विलासता यामुळे समाजाला त्रासदायक ठरत असत. महाभारताच्या काळापुर्वी महिरंग दानवाचा वंश कामरुपच्या राज्यावर होता. त्याच्यानंतर इटकासुर, शंबरासुर, रत्नसुर आणि घटकासुर हे राजे झाले. भुमीपुत्र नरक घटकासुराला ठार मारुन राज्यावर आला. मिथिलेच्या जनकाने त्याचे पालन केले होते. तो विष्णुभक्त होता. विदर्भ राजकन्या मायादेवी ही त्याची पत्नी. तिच्यापासुन भगदत्त हा मुलगा झाला. युधिष्टिराने राजसूय यज्ञ केला त्यावेळी भगदत्त हस्तिदंत, गेंड्याच्या कातडीच्या ढाली, विविध आकाराची वस्त्रे इत्यादी घेउन इंद्रप्रस्थास गेला होता. त्याच वेळी त्रिपुरा नरेश चित्रयुध्द पण इंद्रप्रस्थास गेला होता. युधिष्ठिराने चित्रासुरास सन्मानदर्शक श्वेतछत्र दिले होते. त्रिपुराच्या राजघराण्यात त्या श्वेतछत्राची पुजा होत होती.

नरकाचे दुसरे नाव भौमासुर. तो नंतर इतका दुष्ट प्रवृत्तीचा झाला की अखेर श्रीकृष्णांना स्वतःला त्याच्यावर स्वरी करुन त्याला ठार मारावे लागले. श्रीकृष्णांनी भगदत्ताला प्रागज्योतिष्च्या सिंहासनावर बसविले. नरकासुराने हजारो राजवंशी कन्यांना बंदी केले होते. त्यांना मुक्त करुन कृष्णाने प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली व त्यांचे पुनर्वसन केले. श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी पूर्वांचल कन्या मानली जाते लोहित जिल्ह्यात कुण्डिल नदीच्या काठी भिष्माकाची राजधानी भीष्मकनगर होती. तेथून द्हा कि.मी वर राम्रेश्वरीचे मंदिर आहे. रुक्मिणीहरणाची घटना तिथे घडली. रुक्मीला-रुक्मीणीच्या भावाला ते पसंत नवहते. त्याने कृष्णाला अडवले. युध्दात तो पराजित झाला. श्रीकृष्णानी त्याला जिवदान दिले पण त्याचे मुण्डन करुन सोडुन दिले. या भुप्रदेशात इंदुनिशनी ही जनजाती आहे. ही जनजाती रुक्मिणीशी आपला संबंध जोडते. इंदुमिशनी आपल्या डोक्यावरचे मागचे केस काढतात. पुढच्या केसाचा बुचडा बांधून त्या त एक लाकडाचा तुकडा खोचतात. या क्षेत्रातील पुटिया राज्याचे वंशज आजही स्वत्;ला भीष्मकाची संतान म्हणवतात.

अनिरुध्द उषाचा प्रणय

दुर्योधन प्रागज्योतिषच्या भगदत्ताचा जावई. भानुमति ही त्याची पत्नी भगदत्ताची मुलगी होती. कौरव पांडवाच्या युध्दात भगदत्ताने दुर्योधन चा पक्ष घेतला. श्रीकृष्णांनी त्याच्या पित्याचा वध केलेला होता. या युध्दात भगदत्त मारला गेला. दुर्योधनाचा आणखी एक विवाह ब्रम्हपुत्रेच्या उत्तर किनार्‍यावरील कुरुबा येथील राजकन्या 'लक्ष्मणा' हिच्याशी झाला होता. श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युन्म याचा विवाह मामाच्या मुलीशी म्हणजे रुक्मीची कन्या रुक्मावति हिच्याशी झाला होता. अनिरुध्द हा प्रद्युन्म आणि रुक्मावतिचा पुत्र.

वर्तमान तेजपुर हे त्या काळातील शोणितपुर. बाणासुर हा तिथला राजा होता. तो शिवभक्त होता. बाणासुरची कन्या 'उषा' अनिरुध्दावर प्रेम करीत होती. उषाची चित्रलेखा नावाची सखी होति. बाणासुराचा अमात्य कुमांड याची ती मुलगी. चित्रलेखाला मायावी विद्या अवगत होती. तिने अनिरुध्दला शोणीतपुरला आणले. अनिरुध्द व उषाचा गांधर्व विवाह झाला. बाणासुराला हे समजले तेव्हा तो संतापला. त्याने अनिरुध्दाला कारागृहात डंबले. आपल्या नातवाला सोडविण्यासाठी श्रीकृष्णाना यावे लागले. बाणासुर शिवभक्त होता. कृष्णाना प्रत्यक्ष शिवाशी युध्द करण्याचा प्रसंग आला. या सार्‍या घटनांशी संबंधित स्थाने आजही तेजपुरमध्ये दाखविली जातात.

कामरुपच्या इतिहासाची अखण्डता

महाभारत काळापासुन कामरुपच्या इतिहासाची अखण्डता लक्षात येते. भौमासुर( नरकासुर) पासून १८ पिढ्याम्ची माहिती मिळते. त्यानंतरची माहिती उपलब्ध नसली तरी एका सुबाहू नामक राजाला ठार मारुन त्याचा मंत्री सुपवी हा राजा झाला. त्याने 'बर्मा' राजवंशाची स्थापना केली. सातव्या शतकातील प्रसिध्द राजा भाल्करबसी त्याचा वंशज होता. डिमापुर येथील हैडम्ब वंशाची १८० पिढ्यांची वंशावाळ उपलब्ध आहे. भीमाने हिडिम्ब या असुराशी युध्द करुन त्याचा वध केला. त्याची बहीण् हिडिंबा शूर होती. सदगुणी आणी सुंदर होती. भीम आणी हिंडींबा यांचा मुलगा घटोत्कच याच्यापासुन हैडम्ब वंश सुरु झाला. घटोत्कचाचा पुत्र बर्बरिक हाही अत्यंत शुर होता. श्रीकृष्णांनी नरकासुराशी युध्द केले त्यावेळी त्याचा अमात्य मूर यालाही मारले. मूरची कन्या मौर्वी पण शूर होति. तिचे दुसरे नाव होते कामकण्टकटा. आपल्या पित्याच्या वधाचा सुड घेण्यासाठी ती स्वतः रणांगणात उतरली. अखेर कामाख्या देवीच्या मध्यस्थीने युधद थांबले. देवीच्या साक्षीने भीम पुत्र घटोत्कच आणि मौर्वी यांचा विवाह झाला. बर्बरिक मध्ये या दोघांचेही शौर्य एकवटले होते. भारतिय युध्दाचे वेळी त्याने म्हटले होते. "जो पक्ष पराजित होताना दिसेल त्याच्याकडुन मी लढेन व एकच दिवसात युध्द जिंकून देईन. अखेर श्रीकृष्णांनी भेदनीतीचा अवलंब करुन त्याचा नाश केला.

पूर्वांचलाचा जावई - अर्जुन

अर्जुनाच्या तर तीन पत्नी पूर्वांचल कन्या होत्या. मणिपुरची राजकन्या चित्रांगदा हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. तिच्यापासुन बभ्रुवाहन हा मुलगा झाला. दुसरी पत्नी होती उत्खुषी ती नागकन्या होती. तिचा पुत्र इरावान. जयंतीया हे स्त्री राज्य होते. अर्जुनाशी जयंतीयाची शूर राजकन्या प्रमिला हिने युधद् केले. त्या प्रसंगातून त्यांचा विवाह झाला. पूर्वांचलातील हे सारे संबंध कुरु वंशाशी संबंधित आहेत.सार्‍या जनजातींचे क्षत्रियत्व, शौर्य, स्वतंत्र वृत्ती यांचाच तो इतिहास आहे.

स्वतंत्र पूर्वांचल

त्यामुळेच मुस्लीम आक्रमकांशी शेकडो वर्षे संघर्ष करुन पूर्वांचल स्वतंत्र राहिला. बंगालपर्यंत धडक देणार्‍या बाख्तियार खिलजीचा सर्वनाश ब्रम्हपुत्रेच्या तीरावरच झाला. ब्रम्हपुत्रेच्या उत्तरेस 'कानाइ बरसी बोरा' येथील १३ व्या शतकातील शिलालेख त्यांची साक्ष देतो. या शिलालेखात म्हटले आहे.
शके तुरग युक्मेशे मधुमास त्रयोदशे - कामरुपे समागत्य तुरस्कः क्षयमाणयु:
(शके ११२७(सन १२०६)मध्ये चैत्र त्रयोदशीला तुरुष्कांचा विनाश झाला.) सतराव्या शतकापर्यंत हे संघर्ष चालू होते. अहोम वंशी राज्यांचाही यात महत्वाचा वाटा होता. १६८२ मध्ये झालेल्या संघर्षात प्राप्त झालेल्या तोफेवर असाच एक महत्वपुर्ण लेख आहे. त्यात म्हटले आहे.

"श्री श्री स्वर्गनारायणदेव गदाधरसिंन यवनं जिला गुवाकहृद्यामिदम् प्राप्तं शके १६०४
((१६०४ म्हणजे सन १६८२ मध्ये यवनांना (मुस्लिमांना) जिंकून ही तोफ प्राप्त केली)

ब्रिटीशांबरोबर पूर्वाचलातील जनजातीच्या राज्यांनी आणी वनवासी बंधुंनी केलेला संघर्ष हेही भारताच्या इतिहासातील एक सुवर्णपानच आहे.

(सौजन्य- 'सांकव स्मरणिकेतुन साभार)

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगले संकलन

चांगले संकलन आहे. नागा जमात ही ईशान्य भारत सोडून इतरत्रही असावी. श्रीलंकेत होती. अनंतनाग या कश्मीरच्या भागात असावी. तक्षशीला ही तक्षकाची नगरी असे प्रवाद आहेत. खांडवदाह झाला त्यातही नाग वंशाचे लोक होते असे वाटते. वगैरे.

कंबोडिया व व्हिएटनाम मधील प्राचीन जमाती

कंबोडिया व व्हिएटनाम मधील स्थायिक प्राचीन जमातींना नाग जमात असेच म्हणले जात असे. ही जमात मंगोलियन वंशाची नव्हती तर मलै वंशाची होती. या नाग जमातीची एक राजकन्या व एक भारतीय ब्राम्हण यांच्या विवाहातून जी प्रजा निर्माण झाली त्यांचेच वंशज सध्याचे कंबोडियन लोक आहेत अशी कहाणी कंबोडिया मधे ऐकली व पुस्तकांच्यात वाचली.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

कंबोडियाचा नाग वंश

तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी वाचताना भारत आणि मेघनादाच्या पत्नीमुळे श्रीलंकेचाच विचार केला पण कंबोडियाचा नागवंश मला आठवायला हवा होता. :-) माझ्याच एका जुन्या लेखातला भाग येथे देत आहे.

कंभोज देशाचा ब्राह्मण राजपुत्र कौंडिण्य स्वयंभू (कम्बु स्वयंभूव: कंबोडियामधे) समुद्रमार्गाने (सौराष्ट्रातील बंदरातून प्रवास सुरू करून) मजल दरमजल करत अतिपूर्वेला पोहोचला. तिथे त्याची नजरभेट ड्रॅगन राजाची (नाग वंश?) मुलगी मीरा (Mera) हीच्याशी झाली आणि तो तिच्यावर भाळला. ड्रॅगन राजा एका पाणथळ प्रदेशावर राज्य करत होता. एक दिवस राजकन्या आपल्या नौकेतून विहारासाठी जात असता कौंडिण्याने तिच्यावर मायावी बाण मारला, जेणे करून राजकन्या त्याच्या प्रेमात पडली. आपल्या जावयाला भेट म्हणून ड्रॅगन राजाने या पाणथळ जागेतले सर्व पाणी पिऊन टाकले आणि तो भूभाग कौंडिण्याला राज्य करण्यास भेट दिला. या नव्या राज्याचे नाव पडले कंबुजा आणि कम्बु व मीरा यांच्या नावांच्या संकरातून या राजघराण्याला ख्मेर हे नाव पडले

उत्खुषी?

अर्जुनाच्या बायका : द्रौपदी, चित्रांगदा, सुभद्रा आणि उलुपी. यांत उत्खुषी कुठून आली?
तुलाo नागकन्यका उलुपी पूर्वी पार्थावर भुलली गं|--इति रामजोशी(चित्रपटातले.)---वाचक्नवी

मंगोलीयन वंश आणि वेगळे गुण

मला नेहमी पडणारा प्रश्न असा आहे की, येथील लोक खेळात का पुढे नाहीत? चीन, जपान, व इतर मंगोलीयन वंशाच्या नागरीकांच्या देशातील लोक ज्या अंगभूत चिकाटीने काही विशिष्ठ खेळांमधे पुढे आहेत, तसे हे नाहीत. असे का?

पुर्वांचल आणि पूर्वांचल

महाराष्ट्राचे ज्याप्रमाणे विदर्भ, वर्‍हाड, मराठवाडा, खानदेश, कोंकण आणि पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र असे भौगोलिक विभाग आहेत, तसेच उत्तर प्रदेशाचे दुआब(याच्या मध्यभागात व्रजभूमी येते), रोहिलखंड, अवध, उत्तरी बुंदेलखंड, उत्तरी बागेलखंड आणि पूर्वांचल असे सहा भौगोलिक विभाग आहेत. (दक्षिणी बुंदेलखंड आणि दक्षिणी बागेलखंड मध्य प्रदेशात आहेत.) त्यांतल्या पूर्वांचलात कमीतकमी १७ जिल्हे आहेत. वाराणशी, गोरखपूर, मिर्झापूर, जौनपूर, कुशीनगर ही पूर्वांचलातली महत्त्वाची शहरे. गौतम बुद्धाचे सारनाथ हे गांवही पूर्वांचलात येते. भारतीय घटनेने अधिकृत ठरवलेल्या प्रमुख भारतीय भाषांपैकी एक अशी भोजपुरी, ही या विभागात बोलली जाणारी भाषा आहे. कोंकणीप्रमाणेच भोजपुरीतही साहित्यनिर्मिती होत असते. आंतरजालावर काही भोजपुरी संकेतस्थळेही आहेत.

विश्वास कल्याणकरांचे 'पुर्वांचल' वेगळेच दिसते आहे.---वाचक्नवी

नवीन काही नाही

विश्वास कल्याणकरांची ही ट्रिक जुनीच आहे. नाव काहीही असते पण सांगायचा आतला अजेंडा निराळाच असतो. येथे त्यांना अरुणाचल प्रदेश, आसाम बद्दल लिहायचे असावे. नाव पूर्वांचल देऊन टाकले. मुख्य मुद्दा शेवटी त्यांनी मांडलाच आहे. त्यांना सांगायचे आहे की त्यामुळेच मुस्लीम आक्रमकांशी शेकडो वर्षे संघर्ष करुन पूर्वांचल स्वतंत्र राहिला.
चन्द्रशेखर

एक सुधारणा

जरी तशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असली तरीसुद्धा, भोजपुरी भाषेला अजून घटनेच्या ८व्या परिशिष्ठामध्ये अधिकृत भारतीय भाषेचे स्थान मिळालेले नाही.
अधिकृत २२ भाषा अशा :
१ ते १४(जानेवारी १९५० पासून) : संस्कृत, हिंदी, उर्दू, मराठी, गुजराथी, पंजाबी, काश्मिरी, बंगाली, आसामी, उडिया, कानडी, तामीळ, तेलगू, आणि मल्याळी.
१५. (२१वी घटनादुरुस्ती १९६७प्रमाणे) : सिंधी.
१६ ते १८(७१वी घटनादुरुस्ती १९९२प्रमाणे) : कोंकणी, मणिपुरी, नेपाळी.
१९ ते २२(९२वी घटनादुरुस्ती २००३प्रमाणे) : बोडो, डोग्री, मैथिली, संथाळी.
गंमत अशी की, बोडो भाषा बोलणारे फक्त १५ लाख लोक आहेत, तर भोजपुरी बोलणारे सुमारे १५ कोटी(चू.भू.द्या.घ्या.).
त्याचप्रमाणे, इंग्रजी भाषा ही भारताच्या अनेक राज्यांत नुसत्या राज्यकारभाराचीच नाही तर सर्वार्थाने अधिकृत भाषा आहे. पण तिला घटनेच्या आठव्या परिशिष्ठात स्थान नाही. --वाचक्नवी

संस्कृती व इतिहास

तेथील संस्कृती व इतिहास याची ओळ्ख सर्वसामान्यांना व्हावी या उद्देशाने

संस्कृती व इतिहास या नावाखाली मायथॉलॉजी दिलेली आहे. याला इतिहास म्हणत नाहीत. बाय द वे, हे पुराणकथांमधले नाग म्हणजे नेमके कोण हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. आमच्या एका नागा मित्राने दावा केला होता की ते मूळचे चिनी. त्यांच्या जमातीचे नाव आहे नाक्का. त्याचे नागा झाले.

बाकी गोष्टी चांगल्या आहेत. गोष्ट म्हणून घेतल्या तरच.

बाणासुर शिवभक्त होता. कृष्णाना प्रत्यक्ष शिवाशी युध्द करण्याचा प्रसंग आला. या सार्‍या घटनांशी संबंधित स्थाने आजही तेजपुरमध्ये दाखविली जातात (!)

कृष्णाचे आणि शिवाचे युद्ध हा इतिहास आहे म्हणायचा.

त्यामुळेच मुस्लीम आक्रमकांशी शेकडो वर्षे संघर्ष करुन पूर्वांचल स्वतंत्र राहिला

हे त्यामुळेच म्हणजे हेच का -

पूर्वांचलातील हे सारे संबंध कुरु वंशाशी संबंधित आहेत.सार्‍या जनजातींचे क्षत्रियत्व, शौर्य, स्वतंत्र वृत्ती यांचाच तो इतिहास आहे

मनोरंजक विचार आहेत. (या विचारांना रेसिस्ट म्हणावे काय?)

अवांतर - कुरुवंशातील लोक उर्वरित भारतात नसावेत बहुदा.

 
^ वर