वॉल्व्हर

वॉल्व्हर

चित्रपटाची सुरुवात दोघी बहिणी आणि एक मुलगी घाईने स्मशानभूमीत जाण्याने होते. दोघीजणी आपल्या आईवडिलांच्या समाधी-शिला स्वच्छ करतात. या दोघी बहिणींचे आईवडील एका आगीत जळून वारले आहेत. असे बोलण्यातून लक्षात येते. त्यानंतर त्या आजीच्या घरी जातात. जातांना रायमुंदाला आणि पावलाला पाहून ओळखीचे कुणी भेटतात. ते म्हणतात, 'अगदी तुझ्या वडिलांसारखे डोळे आहेत हिचे'.
आजीकडे त्यांना त्याची आई जशी बिस्किटे करत असे तशीच बिस्किटे मिळतात. त्या दोघींना आनंद होतो. आपली आजी इतकी म्हातारी असूनही इतके सगळे कसे काय सांभाळते याचे त्यांना आश्चर्य वाटते.

रायमुंदा (पेनेलोप् क्रुझ) आणि सोल (लोला द्युनास्) या दोघी बहिणी ला मंचा नावाच्या एका खेड्यामध्ये मोठ्या झाल्या पण आता (बहुदा माद्रीद) शहरात राहत आहेत. रायमुंदा कुठे मिळेल तेथे छोट्या मोठ्या नोकर्‍या करते. तिला एक तेरा चौदा वर्षांची टीन-एज मुलगी आहे. तिचे नाव पावला (योहाना कोबो). त्या दिवशी खेड्यातल्या स्मशानभूमीतून घरी परत आल्यावर बियर वर बियर पीत बसलेला रायमुंदाचा सहचर किंवा नवरा, पाको, तिला सांगतो की त्याची नोकरी गेली आहे!
वैतागलेली रायमुंदा नेहमीप्रमाणे दुसर्‍या दिवशी बसने नोकरीवर जाते. सायंकाळी परत निघाल्यावर तिला मुलगी पावला बस स्टॉपवर तिची वाट पाहत थांबलेली दिसते. काय झाले म्हणून चौकशी केल्यावर ती काही बोलत नाही. पण मग हळूहळू रडतरडत सांगू लागते की वडिलांनी म्हणजे पाकोने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. तिने त्याचा प्रतिकार केला. पण तिला पाको म्हणाला की मी तुझा बाप नाहीये! या झटापटीत पावलाच्या हातात स्वयंपाक घरातली सुरी लागली आणि तिने त्याला सुरीने पाकोला सोडण्यासाठी धमकावले. पण त्याने ऐकलेच नाही आणि ती सुरी पाकोच्या पोटात खुपसली गेल्याने तो स्वयंपाकघरात मरून पडला. घरी आल्यावर रायमुंदा स्वयंपाक घरात पाकोचे रक्ताच्या थारोळ्यात प्रेत पाहून हादरते. जरा सावरल्यावर ती प्रथम पावला ला सांगते की, 'लक्षात ठेव कोणत्याही परिस्थितीत हा खून मी केला आहे. तू बाहेर होतीस आणि तुला याची काहीच माहिती नाही. आता तू बाजूच्या खोलीत जा, मी पाहते.'

मोठ्या धीराने ती सगळे रक्त साफ करायला घेते. पावला तिला विचारते की पाको माझा बाप नव्हता का? मग कोण आहे माझा बाप. रायमुंदा तिला सांगते की पाको खरच तिचा बाप नव्हता. पण तिचा बाप कोण हे मात्र सांगत नाही.
ते करत असतांनाच नेमकी घराची बेल वाजते. पावला आणि रायमुंदा दोघीही एकमेकींकडे पाहत राहतात.
रायमुंदा दार उघडते. रायमुंदाला ओळखणारा, कोपर्‍यावरच्या रेस्टॉरंटचा मालक दारात उभा असतो. तो सांगतो की रेस्टॉरंट चालत नाही, मी आता काम शोधायला दूर जातो आहे. तू रेस्टॉरंटच्या किल्ल्या तुझ्याकडे ठेव कुणी रेस्टॉरंट बघायला आले तर त्याला दे. रायमुंदा त्याला हो हो करते. तेव्हढ्यात त्याला रायमुंदाच्या मानेला रक्त लागल्याचे दिसते. तो विचारतो की तुला काही लागले आहे का? ती म्हणते की नाही. तिचा प्रश्नांकित चेहरा पाहून तो म्हणतो की, 'तुझ्या मानेला रक्त लागले आहे.' रायमुंदा चलाखीने त्याला सांगते की, 'ते काही नाही, ते बायकांचे प्रश्न असतात त्याचे आहे.' त्याला पटते आणि तो जातो.

रायमुंदा परत कामाला लागते. तेव्हढ्यात फोन वाजतो. पावला फोन घेते. रायमुंदाची बहीण सोलचा तो फोन असतो. ती सांगते की गावाकडची आपली आजी वारली. आपल्याला उद्या गावाकडे जावे लागेल. रायमुंदा सांगते की मला शक्य नाही. सोल चकित होते. ती म्हणते की तिने तुला सांभाळले. आणि तू येणार नाही? सगळे गाव विचारेल की रायमुंदा का नाही आली... पण रायमुंदा सांगते की तिला काही महत्त्वाचे करायचे आहे आणि ती येऊ शकत नाही. तसेच ती पुढे सांगते की पाकोबरोबर मोठे भांडण झाले आणि पाको सोडून गेला. तो आता परत येईल असे वाटत नाही.

रात्रीच रायमुंदा आणि पावला मिळून पाकोचे प्रेत एका जाड दुलईत गुंडाळून त्या बंद रेस्टॉरंटपर्यंत निर्मनुष्य रस्त्यावरून ओढत घेऊन जातात. रेस्टॉरंटच्या डीप फ्रीझर मध्ये ते प्रेत टाकून रायमुंदा त्याला कुलूप ठोकते. फ्रीजर चालू ठेवते.

आजीच्या शेवटासाठी सोल गावात जाते. गावात अनेकानेक अफवा पसरलेल्या असतात. त्यात सोल आणि रायमुंदाची आगीत जळून मृत्यू पावलेली आई कुणा-कुणाला दिसलेली असते. गावातल्या त्या जुनाट वाड्यात सोल प्रवेश करते. पुढच्या भागात कुणीच नसते. सोलला जिन्यावर आवाज ऐकू येतो. आणि तिला तिची आई जिन्यावरून आलेली दिसते. सोल घाबरून पळत सुटते आणि आतल्या भागात जाते. तेथे गावातली सगळी मंडळी आणि तिची गावातली शेजारीण ऑगस्तीन असतात. सोल ला धीर येतो. इतर भेटीगाठी होतात. गावातल्या अफवा सोलच्याही कानावर जातात. ऑगस्टीन सांगते की, 'जर एखाद्या माणसाचे काही कार्य करायचे राहिले असेल तर ते दिसतात. पण त्यात घाबरण्यासारखे काही नाही.'

ज्या दिवशी रायमुंदा आणि सोल चे आईवडील आगीत मृत्यू पावतात तेंव्हाच ऑगस्तीनची आई चमत्कारिकरित्या गायब झालेली असते. तिच्या गायब होण्यामुळे ऑगस्तीन दु:खी असते. ती कशी गायब झाली हे कळावे अशी तीची इच्छा असते.

दफनाचा कार्यक्रम आटोपून सोल शहरात येते. कार पार्क करते आणि घरात जायला लागते तर तिला तिच्या कार मधून आवाज येतो, 'सोल! सोल मला बाहेर काढ'. सोल दचकते आणि थांबते.
परत आवाज येतो, 'सोल, माझ्या मुली मी येथे आहे कारच्या डिकीमध्ये. मला बाहेर काढ.' सोल धीर धरून कारची डिक्की उघडते. आत मध्ये तिला दिसलेली तिची आई - आयरीन, असते. आई तिला सांगते की, 'घाबरू नको मी खरोखर येथे आहे आणि मी जिवंत आहे.'

सोल काहीशी घाबरत तिच्या जवळ जाते. आईने जवळ घेतल्यावर तिला पटते की आई खरोखर आहे. तिला आनंद होतो. दोघी घरात येतात. आई तिला सांगते की मीच आजीला सांभाळायचे म्हणून सगळे ठीक झाले. आता सोल ला त्या अफवांचा, बिस्किटांचा आणि टापटीपीचा अर्थ लागतो.
सोल तिच्या फ्लॅटमध्येच तिचे पार्लर चालवत असते. पण तिच्या काही गिर्‍हाइकांना माहीत असते की सोलचे आईवडील वारले आहेत. मग त्या दोघी असे ठरवतात की आयरीन रशियन म्हणून तेथे राहील आणि सोल ला मदत करेल. आई इतर चौकशी करते तेव्हा सोल सांगते की तिचा पार्टनर दोन वर्षांपूर्वी तिला सोडून गेला. आणि रामुंदाचा पाकोही तिला सोडून गेला.

आई म्हणते की आपण तिघीही पुरुषांच्या बाबतीत दुर्दैवी आहोत. सोल चकित होते. ती विचारते की तू दुर्दैवी कशी काय? वडील तर तुझ्या मांडीवर, तुझ्या मिठीत वारले. आई तिला सांगते की, असे तुम्हाला वाटते. त्या माणसाने मला आयुष्यभर फसवले. जमेल तेथे लफडी केली आणि मला ते त्याचे सहन होईनासे झाले.
एक दिवस तो आणि ऑगस्तीनची आई घरामागच्या झोपडीत एकत्र असतांना मी पाहिले. मला ते सहन झाले नाही आणि मी त्या झोपडीला आग लावली. त्यातचे ते दोघे जळून मेले. तुम्हाला वाटले की ते आम्ही दोघे आहोत. मला पोलीस पकडतील म्हणून मी पळून गेले. पण नुसतीच कशी राहणार? म्हणून भ्रमिष्ट झालेल्या तुझ्या आजीकडे राहिले. तिलाही सोबत आणि तिच्या बोलण्यावर कुणाचा विश्वास नाही. या दोन बाबींवर चालत राहिले. तरी कुठे तरी मी दिसतच असे, म्हणून गावात अफवा पसरल्या की माझे भूत परत आले आहे.
सोलला धक्का बसतो आणि आईचे ममत्वही वाटते.

सोल गावाकडून परत आली म्हणून रायमुंदा तिला भेटायला येते. चटपटीत आणि चलाख रायमुंदाला आईचा वास येतो. ती सोलच्या फ्लॅटमध्ये इकडे तिकडे पाहते. गेस्टरूमचे कपाट उघडल्यावर तिला आईचे कपडे दिसतात. ती सोल ला म्हणते की तू आईचे कपडे का आणलेस? मेलेल्या माणसाचे कपडे काय करायचे तुला? शिवाय तिला आजीची पेटीही दिसते. त्यात तिचे काही दागिने आणि एक जुना फोटो अल्बम असतो. आजीची पेटी स्वतःच ठेऊन घेतल्याबद्दल रायमुंदा संतापते. सोल काहीबाही उत्तर देऊन तिला टाळते. पण रायमुंदा निघून जाते.

पण एकीकडे रायमुंदाला पत्ता लागू नये म्हणून आयारीन लपूनच राहते. आणि गिर्‍हाइकांसमोर रशियन मदतनीस म्हणून उभी राहते.

रायमुंदा रेस्टॉरंटमध्ये सगळे ठीक आहे की नाही हे पाहायला तेथे जाते. तर तेथे जेवणाची चौकशी करायला एक माणूस येतो. तो म्हणतो की आम्ही येथे चित्रपटाचे चित्रिकरण करत आहोत आम्हाला तीस जणांचे जेवण हवे. रायमुंदाला संधी दिसते. ती त्याला हो म्हणते आणि परस्पर रेस्टॉरंट सुरु करते. सगळे ठीक सुरु राहते.

फिल्म क्रु ला एक दिवस तेथे पार्टी करायची असते. सगळे येतात पण पावला मात्र पार्टीत यायला तयार नसते. ती रायमुंदाला कारण देते की पाको तेथे असतांना मला चांगले वाटत नाही. रायमुंदा तिला आग्रह करते. तर पावला तिला म्हणते की, 'तुला कसे समजेल आपल्याच वडलांचा खून केला की कसे वाटते ते.' रायमुंदा थंड नजरेने तिला पाहत राहते. पण मग हळूहळू तिला समजावते. पावला पार्टीत यायला तयार होते. पार्टी व्यवस्थित पार पडते.
गावाकडच्या ऑगस्तीनला कर्करोगाचे निदान होते. ती त्याच्या उपक्ष्चारासाठी प्रयत्न करते. पन तिला यश येत नाही.

एकदिवस रायमुंदा काम आहे म्हणून पावलाला सोलकडे सोडून जाते.
पावला आयरीनला म्हणजे तिच्या आजीला पाहते. सोल तिची ओळख करून देते. तिच्या आईच्या लहानपणा विषयी सांगते. रायमुंदा जरा मोठी झाली आणि माझ्यापासून तुटतच गेली, इतकी की ती माझा एक प्रकारे दुस्वास करू लागली. तू मात्र तुझ्या आईपासून कधी दूर जाऊ नकोस.
रायमुंदा मनावर घेऊन त्याच रात्री पाकोची नदी किनार्‍यावर खड्डा खणून विल्हेवाट लावते.

दुसर्‍या दिवशी पावलाला परत घ्यायला रायमुंदा सोलकडे येते. तिला परत आई तेथे असल्याचा भास होतो. सोल तिला कबूल करते की आई तेथे आहे. पावला तिला आईकडे घेऊन जाते. एकमेकींना पाहून दोघींच्या डोळ्यात अश्रु उभे राहतात.

आई विचारते की तू माझ्यापासून इतकी दूर दूर का राहिलीस? रायमुंदा विस्मयचकित होऊन संतापाने म्हणते जसे काही तुला माहितीच नव्हते काय होत होते ते? आई म्हणते की मला समजले पण फार उशीरा. मला कधी वाटलेच नाही की तुझे वडीलच तुझ्यावर कधी हात टाकतील! मलाही ते सहन झाले नाही. त्या संतापापाईच मी त्याला जाळून टाकला. वडीलांनीच मुलीवर हात टाकल्याने पावला ही रायमुंदाची मुलगी आणि बहीणही असते!
शेवटी आई आणि मुलीचे मनोमिलन होते.

आयरीन ऑगस्तीनच्या उपचारांसाठी तिच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेते. ती म्हणते की तिची आई माझ्यामुले गेली मला तिच्यासाठी इतके तरी केलेच पाहिजे आणि चित्रपट संपतो.

-----------

या चित्रपटाची बांधून घालणारी कथा, ग्रामीण स्पेन आणि सगळ्या कलाकारांचा अप्रतिम अभिनय या खास बाबी आहेत.
आयुष्यभरासाठी दुखावली गेलेली रायमुंदा आपली मुलगी हीच आपली बहीण हे शल्य बाजूला थेवून ज्या प्रकारे वावरते ते जबरदस्त आहे. पाहतांना अनेक गोष्टींचे संदर्भ एकानंतर एक लागत जातात. पटकथा लेखन खासच आहे.

इतके दिवस मी पेनेलोप क्रुझला फक्त शोभेची बाहुली मानत असे. मात्र या चित्रपटानंतर कळले की ती किती सशक्त अभिनेत्री आहे. हॉलिवुडने तिला अक्षरश: वाया घालवले आहे यात शंकाच नाही.

टॉक टू मी सारख्या चित्रपटानंतर अल्मोदोवर ने चित्रपट हा निराळाच मस्तच उभा केला आहे. चित्रपटात पुरुषपात्रे नाहीशीच आहेत. स्पेन मधील ग्रामीण आणि निमशहरी स्त्री जीवनाचे उत्तम दर्शन घडवणारा चित्रपट आहे.
अर्थातच चित्रपट चांगलाच गाजला.

चित्रपटाचे नाव - Volver (उच्चार बहुदा बॉल्बर)
भाषा - स्पॅनिश
दिग्दर्शक - पेद्रो अल्मोदोवर Pedro Almodóvar

~अभिनय~
रायमुंदा - पेनेलोप क्रुझ Penélope Cruz
आयरीन - कारमेन मौरा Carmen Maura
सोल - लोला द्युनास Lola Dueñas
ऑगस्टीन - ब्लांका पोर्तिलो Blanca Portillo
पावला - योहाना कोबो Yohana Cobo
आणि इतर

पुरस्कार
पाम द ओर् साठी नामांकन
कान्स २००६ - सर्वोत्तम पटकथा सर्वोत्तम अभिनेत्री - सहाही अभिनेत्रींना विभागून
२००७ ऍकॅडमी ऍवॉर्ड - सर्वोत्तम अभिनेत्री पेनेलोप क्रुझ
गोल्डन ग्लोब, गोया आणि इतरही अनेक.

Comments

छान चित्रपट

सुरुवातीला फार्स-थरारनाट्य वाटणारे कथानक (पाकोच्या प्रेताची विल्हेवाट लावताना होणारे हास्यास्पद आडथळे...) पुढे मनुष्यसंबंधांची गुंतागुंत उकलू लागते. अशा प्रकारचे धाडसी प्रयोग आल्मादोवार कित्येकदा करतो. ते त्याला पचवता येतातच असे नाही. पण धाडसाचे अप्रूप वाटते.

चित्रपट निश्चित बघण्यासारखा आहे.

- - -
(एक विनंती : चित्रपटाच्या गुंतागुंतीचे कथानक वर सांगितले आहे, ते मला वाचायला क्लिष्ट वाटले. कथानकाचे सारभूत वर्णन करता आले असते का? आणि होय - संपादकांना विनंती करून "स्पॉयलर अलर्ट" अधिक ठळक करावा, ही सुद्धा विनंती आहे.)

(अवांतर - उच्चार - बोल्वेर्)

वर्णन

कथानकाचे सारभूत वर्णन कदाचित करता आले असते. पण नुकताच चित्रपट पाहिल्याने मला ते कसे करावे हे समजत नव्हते किंवा जमतही नव्हते. परत प्रयत्न करून पाहीन.
म्हणून कथाच देण्याचे धाडस केले. पण येथून पुढे स्पॉयलर अलर्ट नक्की देत जाईन तसेच शेवट पांढर्‍या रंगात ठेवण्याचा प्रयत्न राहील. उच्चार नेमका दिल्याबद्दल धन्यवाद!
त्याचा अर्थ 'परतून येणे' असाच धरला आहे मी.

-निनाद

धन्यवाद

चित्रपटाचे कथानक आवडले. चित्रपट इंग्रजीत डब केलेला आहे की सबटायटल्स वाचावी लागतील?

सबटायटल्स वाचावी लागतील?

माझी कॉपी २० सेंच्युरी फॉक्सची होती. त्यात इंग्रजी सबटायटल्सही होती.
कदाचित डब केलेलाही मिळू शकेल. मी प्रयत्न केला नाही.

-निनाद

डब की सबटायटल्स?

भाषा कळत नसली तरीही मूळ अभिनेत्यांच्या आवाजात संवाद ऐकणं अधिक परिणामकारक होतं असं मला वाटतं. विशेषतः परदेशी चित्रपटांमध्ये प्रसंग चित्रित करतानाच संवादांचं ध्वनिमुद्रण केलेलं असतं (सिंक साऊंड) त्यामुळे नंतर स्टुडिओत अभिनेत्यानं स्वतःचेच संवाद डब करण्यापेक्षाही प्रत्यक्ष प्रसंग जगतानाचा अभिनेत्याचा आवाज अधिक जिवंत वाटू शकतो.
(अर्थात, सबटायटल्स वाचण्यात चित्रपटातल्या प्रतिमेवरचं लक्ष उडू शकतं त्यामुळे डबिंग बरं असंही एक मत आहे. गोदारसारख्या दिग्दर्शकाच्या बोलघेवड्या आणि गहन संवाद असणार्‍या चित्रपटांचा अपवाद वगळता मला तरी असा अनुभव येत नाही त्यामुळे सबटायटल्सच बरी वाटतात.)
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

परिचय

परिचय आवडला. चित्रपट बघावासा वाटतो आहे.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

कथा-कंटाळा पण थोडाफार उपयोग

चित्रपटाची कथा वाचण्याचा कंटाळा आल्याने चित्रपटाची ओळख पूर्ण वाचता आली नाही.

या चित्रपटाची बांधून घालणारी कथा, ग्रामीण स्पेन आणि सगळ्या कलाकारांचा अप्रतिम अभिनय या खास बाबी आहेत.
आयुष्यभरासाठी दुखावली गेलेली रायमुंदा आपली मुलगी हीच आपली बहीण हे शल्य बाजूला थेवून ज्या प्रकारे वावरते ते जबरदस्त आहे. पाहतांना अनेक गोष्टींचे संदर्भ एकानंतर एक लागत जातात. पटकथा लेखन खासच आहे.

वरील मजकुर उपयोगी वाटला.

अवांतर: पेनेलोपी असा उच्चार असावा.

_____
व्हेन पिपल डोन्ट फियर व्हॉट इज टेरिबल, द ग्रेट टेरर कम्स.

खरे आहे

खरे आहे, चित्रपट कंटाळवाणा असू शकतो!
वेगवेगळ्या भाषेतले आणि संस्कृतीतले चित्रपट पाहतांना कधी कधी धीर जास्तच घट्ट धरून ठेवावा लागतो. पण कधी कधी सुंदर कथाही आणि सादरीकरणे सापडून जातात. ते सापडण्याच्या क्षणासाठी अनेक तास भंगार पाहण्यात घालवलेले कधीकधी चालतात...

येथून पुढे तिला पेनेलोपी म्हणण्यात येईल! - धन्यवाद!

-निनाद

किंचित खुलासा

खरे आहे, चित्रपट कंटाळवाणा असू शकतो!

चित्रपटातील घटनाक्रम सविस्तर सांगणे कंटाळवाणे वाटले. कालच पाहिला. चित्रपट अजिबात कंटाळवाणा वाटला नाही.

वेगवेगळ्या भाषेतले आणि संस्कृतीतले चित्रपट पाहतांना कधी कधी धीर जास्तच घट्ट धरून ठेवावा लागतो.

हे खरेच.

_____
व्हेन पिपल डोन्ट फियर व्हॉट इज टेरिबल, द ग्रेट टेरर कम्स.

 
^ वर