संग्रहणीय की संग्राह्य?

डिस्क्लेमर्स-
१. प्रा. अशोक केळकरांच्या अभिनंदनाच्या चर्चेत व्यत्यय नको म्हणून ही वेगळी चर्चा आहे.
२. इथे कोणाचीही चूक दाखवायचा उद्देश नाही तर नेमक्या आणि योग्य शब्दाऐवजी दुसरे शब्द वापरल्याने असा अनर्थ होतो हे दाखवायचे आहे.

प्रा. केळकरांच्या रुजुवात पुस्तकाबद्दल पुढील अभिप्राय वाचण्यात आला.

वा! अत्यंत चांगले पुस्तक आहे. संग्रहणीय, विचारप्रवर्तक.

लेखकाला "संग्रहणीय" हा शब्द बहुधा "संग्राह्य" म्हणजे "संग्रहात ठेवण्याजोगा"या अर्थाने वापरायचा आहे हे लक्षात आले. तरी "संग्रहणी"या शब्दाचा अर्थ "हगवण, अतिसार" असा असल्याने त्यातून भलताच अर्थ निघू शकतो. म्हणून त्या ऐवजी नेहमीच्या वापरामधला "संग्राह्य" हा शब्द वापरावा असे वाटते. दोन्ही शब्दांचे मोल्सवर्थचे दुवे खाली दिले आहेत.

संग्रहणी

संग्राह्य

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद

"संग्रहणीय" आणि "संग्राह्य" आणि "संग्रहणी" शब्दांची व्युत्पत्ती संस्कृतातला (सम्+ग्रह्) धातू आहे.

संग्रहणीय आणि संग्राह्य कृत्य-प्रत्ययांत आहेत - त्याचा अर्थ "अमुक करण्यास लायक" असा होतो.
"सम्+ग्रह्" धातूच्या संदर्भात "संग्रह करण्यास लायक"

"संग्रहणी" हा कोठ्यात मलसंग्रह झाल्याच्या संदर्भातला रोग आहे.

व्युत्पत्तिसाम्य असले तरी "संग्रहणी" आणि "संग्रहणीय" शब्दांचा अर्थ एकसारखा नाही.

त्याच प्रमाणे "धरणी" आणि "धरणीय" या दोन्ही शब्दांची व्युत्पत्ती धृ-धातूपासून आहे, "धारण करते ती" आणि "धारण करण्यालायक"असा अर्थसंबंधही दिसतो; तरी दोन्ही शब्दांचे अर्थसंदर्भ वेगवेगळे आहेत. त्याच प्रमाणे "करणी" आणि "करणीय" शब्दांत व्युत्पत्तिसंबंध आहे, पण अर्थवलये वेगवेगळी आहेत. मराठीमध्ये "करणी" शब्द कित्येकदा अशुभ संदर्भात वापरला जाणारा शब्द आहे, तर "करणीय" मध्ये अशुभ भावना नाही.

(वरील व्युत्पत्ती थोडक्यात जमेल तितकी स्पष्ट द्यायचा प्रयत्न केलेला आहे. वाक्यांचा विपर्यास करून "धनंजय व्युत्पत्ती सांगण्याबाबत अविश्वसनीय आहे" हे कसे दाखवले जाईल त्याबद्दल उत्सूकता लागून आहे. ही पैज नाही - दुर्दम्य इच्छा असल्यास असा विपर्यास सहज करता येईल याबद्दल मुळीच शंका नाही - पण तो विपर्यास कितपत कलात्मक आणि कल्पक असू शकेल, त्याबद्दल उत्सूकता आहे.)

संग्रहणीय हा हिंदी शब्द

व्युत्पत्तिसाम्य असले तरी "संग्रहणी" आणि "संग्रहणीय" शब्दांचा अर्थ एकसारखा नाही.


जालावर उपलब्ध असलेल्या ईशब्दकोष, मोल्सवर्थ, श्रीधर गणेश वझे या मराठी - इंग्रजी शब्दकोषांमध्ये पाहिले असता "संग्रहणीय" असा शब्द मिळाला नाही. वेब्स्टर्सच्या बहुभाषिक शब्दकोशामध्ये हा शब्द हिंदी भाषेत आपण वापरला त्या अर्थाने वापरला जातो असे समजले. मराठीमध्ये हा शब्द आपण वापरला तसा इतर कोणी वापरल्याचे माझ्या वाचनात- जे दुर्लक्ष करण्याजोगे नक्की नाही - नाही.

अनेक शब्दांचे मराठी आणि हिंदीमध्ये अर्थ वेगळे होतात हे मी वेगळे सांगायला हवे असे नाही. उदा. सहवास या शब्दाचा अर्थ मराठीत सान्निध्य तर हिंदीत संभोग. त्याच वेब्स्टर्समधली एक मजेशीर नोंद इथे बघा.

वायग्रा या देसी वायग्रा का सहवास का वक्त बढ़ाने से कोई लेना-देना नहीं होता...

हिंदीत वापरला जाणारा शब्द त्याच अर्थाने मराठीत वापरायचा असेल तर निदान त्यातून मराठीत गैरअर्थ निघणार नाही याचे भान - खास करून प्रा. केळकरांसारख्या भाषातज्ज्ञाचे अभिनंदन करताना- ठेवायला हवे.

बाकी कंसातल्या शेवटच्या दोन वाक्यांचे प्रयोजन समजले नाही. आपल्या कुठल्या वाक्याचा विपर्यास केला? "कल्पक आणि कलात्मक" यातून मी खोटे बोलतो असे म्हणायचे आहे का?

विनायक

त्यांना भेटेन तेव्हा विचारले असते, पण नाही विचारणार

प्रा. केळकरांना पुढच्या वेळेस भेटेन तेव्हा त्यांनाही "अभिनंदनाबाबत गैर अर्थ घेतला का" विचारले असते. पण असले फालतू प्रश्न विचारून दर्जेदार संवादातील वेळ वाया घालवण्याची माझी मनीषा नाही.

हिंदीत वापरला जाणारा शब्द त्याच अर्थाने मराठीत वापरायचा असेल तर निदान त्यातून मराठीत गैरअर्थ निघणार नाही याचे भान - खास करून प्रा. केळकरांसारख्या भाषातज्ज्ञाचे अभिनंदन करताना- ठेवायला हवे.

अभिनंदनार्थ हा शब्द मी वापरलेला आहे, आणि हिंदी प्रभावामुळे वापरलेला नाही. मराठीभाषक म्हणून वापरला आहे. कदाचित आमच्या घरगुती बोलीतून "-णीय"ची लकब अधिक असेल. पण माझी घरगुती बोली हिंदी-प्रभाव-क्षेत्रातली नाही. याचा गैर अर्थ मराठीच्या प्रमाण बोलीत निघत नाही. तुम्ही वाटल्यास गैर अर्थ घ्या, पण तो गैर अर्थ मराठीतला नाही.

मराठी भाषा तुम्हाला बर्‍यापैकी येते. मूळ अर्थ कळतो. पण कुठलातरी दुय्यम अर्थ घेऊन विपर्यास करत आहात. (आणि "संग्रहणीय"चा तर कुठला दुय्यम अर्थही गैर नाही.) दुय्यम अर्थ "खोटा" नसतो. (या ठिकाणी तुम्ही घेतलेला दुय्यम अर्थ चुकलेला आहे, ही बाब अलाहिदा.) पण कुठला दुय्यम अर्थ घेऊन अर्थ अतिशय विचित्र होईल, अशा प्रकारे दुय्यम अर्थाबाबत कलात्मकता आणि कल्पनाशक्ती कितपत वापरली जाईल? याबाबत उत्सूकता होती, इतकेच.

-अनीय/-अणीय हे कृत्-(किंवा "कृदंत"-)प्रत्यय आहेत. ते धातूंपुढे नियमानुसार वापरून मराठीत शब्द कधीही वापरता येतात.

यौगिक शब्दाला (म्हणजे कृत्-तद्धित-समास) रूढ अर्थ असला तर तो अर्थ प्राथमिक होतो. नाहीतर यौगिक अर्थ स्पष्ट असतो. हे सर्व तुम्हाला माहीत असलेच पाहिजे. तुम्ही अन्यत्र "साहित्यनिर्मितीक्षमता" या यौगिक-सामासिक शब्द वापरलेला आहे. आंतरजालावर शोधता हा शब्द वापरलेले एकच पान सापडते, आणि वापर तुम्हीच केलेला आहे. (या उल्लेखामुळे आता कदाचित हे दुसरे पानही सापडेल.) मोल्सवर्थच्या शब्दकोशातही तो शब्द सापडला नाही. तरी त्याचा यौगिक अर्थ स्पष्टच आहे. मराठीत यापूर्वी कोणी वापरला असेल-नसेल त्याचा विचार न करता हा शब्द मराठीत वापरता येतो. तुम्ही तो वापरला, म्हणजे एवढे सगळे तुम्हाला आधीच कळते. "संग्रहणीय" शब्दाला यौगिक अर्थापेक्षा वेगळा रूढ अर्थ नाही, हे तुम्ही वेगवेगळ्या शब्दकोशांत तपासलेले आहे. तर यौगिक अर्थ घेण्याला धोपटमार्ग स्वीकारण्याऐवजी ध्वनिसाधर्म्याच्या आडवाटेने "संग्रहणी"पर्यंत कसे काय पोचला?

तुमचे वाचन दुर्लक्ष करण्याजोगे नाही, असे तुम्हीच वर सांगितले आहे. "-अनीय" प्रत्यय मराठीत वापरातला आहे, त्याच्यापासून बनलेले बक्कळ यौगिक शब्द तुम्हाला माहीतच असले पाहिजेत. आतापावेतो हा प्रत्यय वापरून बनवलेले शब्द वाचनात आले की शब्दकोशाचा टेकू तुम्हाला लागत नसावा. यौगिक शब्दाचे घटक बघून अर्थनिश्चिती करता यावी. या ठिकाणी काय म्हणून अर्थनिश्चिती करण्यात गोंधळ झाला?

उत्तर

याचा गैर अर्थ मराठीच्या प्रमाण बोलीत निघत नाही. तुम्ही वाटल्यास गैर अर्थ घ्या, पण तो गैर अर्थ मराठीतला नाही.

"संग्रहणीय" शब्द मराठी कोशामध्ये नाही. आता - त्याची फोड करायचे १. संग्रह-नीय = संग्रहणीय (संग्रह करण्याजोगे) अशी करता येते तशीच २. संग्रहणी - य = संग्रहणीय (संग्रहणीशी संबंधित , संग्रहणीकारक) अशीही करता येते. आपल्या लेखनात अनेक वेळा "पाणिनीय" शब्द पाणिनी-य = पाणिनीचे अश्या अर्थाने आपण वापरलेला आहे. त्यासारखीच ही फोड आहे. अशी फोड होऊन अर्थाचा अनर्थ नये म्हणूनच पूर्वीचे लोक हा शब्द वापरत नसावेत.

मराठी भाषा तुम्हाला बर्‍यापैकी येते. मूळ अर्थ कळतो. पण कुठलातरी दुय्यम अर्थ घेऊन विपर्यास करत आहात. (आणि "संग्रहणीय"चा तर कुठला दुय्यम अर्थही गैर नाही.) दुय्यम अर्थ "खोटा" नसतो. (या ठिकाणी तुम्ही घेतलेला दुय्यम अर्थ चुकलेला आहे, ही बाब अलाहिदा.) पण कुठला दुय्यम अर्थ घेऊन अर्थ अतिशय विचित्र होईल, अशा प्रकारे दुय्यम अर्थाबाबत कलात्मकता आणि कल्पनाशक्ती कितपत वापरली जाईल? याबाबत उत्सूकता होती, इतकेच.

"पाणिनीय"शब्द ज्यापद्धतीने आपण वापरता त्याच पद्धतीने मी "संग्रहणीय" शब्द वापरतो. पहिला शब्द विपर्यास नसेल तर दुसरा कसा? की आपला तो बाब्या...?

यौगिक शब्दाला (म्हणजे कृत्-तद्धित-समास) रूढ अर्थ असला तर तो अर्थ प्राथमिक होतो. नाहीतर यौगिक अर्थ स्पष्ट असतो. हे सर्व तुम्हाला माहीत असलेच पाहिजे. तुम्ही अन्यत्र "साहित्यनिर्मितीक्षमता" या यौगिक-सामासिक शब्द वापरलेला आहे. आंतरजालावर शोधता हा शब्द वापरलेले एकच पान सापडते, आणि वापर तुम्हीच केलेला आहे. (या उल्लेखामुळे आता कदाचित हे दुसरे पानही सापडेल.) मोल्सवर्थच्या शब्दकोशातही तो शब्द सापडला नाही. तरी त्याचा यौगिक अर्थ स्पष्टच आहे. मराठीत यापूर्वी कोणी वापरला असेल-नसेल त्याचा विचार न करता हा शब्द मराठीत वापरता येतो. तुम्ही तो वापरला, म्हणजे एवढे सगळे तुम्हाला आधीच कळते.

"साहित्यनिर्मितीक्षमता"शब्दावर नेमका आक्षेप काय आहे? ज्या अर्थाने मी वापरला आहे त्यापेक्षा कुठला वेगळा अर्थ निघतो? आक्षेप जरूर सांगा. पटले तर मान्य करेन आणि वापर थांबवेन. नाही पटले तर न पटण्याची कारणे सांगेन.

"संग्रहणीय" शब्दाला यौगिक अर्थापेक्षा वेगळा रूढ अर्थ नाही, हे तुम्ही वेगवेगळ्या शब्दकोशांत तपासलेले आहे. तर यौगिक अर्थ घेण्याला धोपटमार्ग स्वीकारण्याऐवजी ध्वनिसाधर्म्याच्या आडवाटेने "संग्रहणी"पर्यंत कसे काय पोचला?

हा शब्द कोशात नाही त्यामुळे "यौगिक अर्थापेक्षा वेगळा" काय मुळात कुठलाच अर्थ नाही. आता "संग्रह करण्यायोग्य" किंवा " संग्रहणीसंबंधित" असे दोन्ही अर्थ "यौगिक" असावेत. असे असताना पहिला महत्त्वाचा आणि दुसरा दुय्यम कसे ठरवले? सुदैवाने किंवा दुर्दैवाने मला "संग्रहणी" शब्दाचा अर्थ माहिती आहे. त्याचा "पाणिनीय" सारखा "य" प्रत्यय लावून मी शब्द केला हे आडवळण कसले? तुम्हाला कदाचित् "संग्रहणी" माहिती नसल्याने आडवळणाने वाटले असेल. मी राजमार्गानेच पोचलो आहे.

तुमचे वाचन दुर्लक्ष करण्याजोगे नाही, असे तुम्हीच वर सांगितले आहे. "-अनीय" प्रत्यय मराठीत वापरातला आहे, त्याच्यापासून बनलेले बक्कळ यौगिक शब्द तुम्हाला माहीतच असले पाहिजेत. आतापावेतो हा प्रत्यय वापरून बनवलेले शब्द वाचनात आले की शब्दकोशाचा टेकू तुम्हाला लागत नसावा. यौगिक शब्दाचे घटक बघून अर्थनिश्चिती करता यावी. या ठिकाणी काय म्हणून अर्थनिश्चिती करण्यात गोंधळ झाला?

संग्रहला -अनीय प्रत्यय लावून "संग्रहणीय शब्द होतो तसा तोच शब्द "संग्रहणी" ला "य "प्रत्यय (पाणिनीय सारखाच) लावूनही तयार करता येतो, ज्यामुळे त्याचा अर्थ बदलतो. याच कारणाने अर्थनिश्चिती करण्यात गोंधळ होऊ शकतो (इथे मी गोंधळ न करता अदमासाने योग्य अर्थ लावला आहे). संग्राह्य शब्दाची कश्या प्रकारे फोड करावी याबद्दल संभ्रम होत नाही म्हणून हा शब्द जास्त योग्य आहे हे माझे मत आहे.

"पाणिनीय"मध्ये प्रत्यय "य" नाही

"पाणिनीय"मध्ये प्रत्यय "य" नाही. तेथे त्या अर्थाने फक्त व्यक्तींच्या नावांना लागणारा "ईय" प्रत्यय झालेला आहे.

तुम्हाला "संग्रहणी+य" अशी फोड करावीशी वाटली, त्यामुळे तुम्हाला शिसारी आली याबद्दल दिलगीर आहे. मात्र कोणाला काय आठवण येईल, याबद्दल अशा बाबतीत काही सूत्र मिळत नाही. आणि त्यावरून शब्दप्रयोग करण्याबद्दल निर्देश घेणे मला प्रशस्त वाटत नाही.

वाचकांपैकी अनेकांना जो अर्थ जाणवला, तो मला अभिप्रेत असलेला अर्थ होता. क्वचित काही लोकांना शब्दाची वेगळीच फोड करून वेगळा अर्थ जाणवतो, निश्चित अर्थ जाणवत नाही. याबाबत चिंता करताना स्मरावे "रघुपति मति माझी आपुलीशी करावी", आणि चिंता त्यागावी.

हेही तितकेसे खरे नाही

तेथे त्या अर्थाने फक्त व्यक्तींच्या नावांना लागणारा "ईय" प्रत्यय झालेला आहे.

आणखी स्वीय (स्व - ईय) (स्वीय सचिव = पर्सनल असिस्टंट) असा शब्द आहे. स्व हे व्यक्तीच नाव नाही. त्यामुळे व्यक्तींच्या नावांव्यतिरिक्तही इतर शब्दांना ईय प्रत्यय लागत असावा. जात हेही व्यक्तीचे नाव नाही तरी जातीय हा ईय प्रत्यययुक्त शब्द आहे. जाणते लोक आणखीही उदाहरणे सांगू शकतील.

त्यामुळे पाणिनी - ईय = पाणिनीय तसेच संग्रहणी - ईय = संग्रहणीय

विनायक

बरे

बरे.

तुमचे ग्रहणीय असे मुद्दे सुरू होईस्तोवर गप्प बसतो. "-ईय" आणि "-अनीय" प्रत्ययांशी तुमची अधिक ओळख होईल तेव्हा लिहावे.

सर्वश्री रिकामटेकडा, राधिकाबाई, वाचक्नवी, विसुनाना, आजानुकर्ण या सर्वांबद्दल आदर आहेच. त्यांनी "संग्रहणीय" शब्दाचा अर्थ घेतला तो मला अभिप्रेत असलेला अर्थच आहे.

वैयक्तिक रोखाचे प्रतिसाद आणि उपप्रतिसाद संपादित केले आहेत.

कोश आणि कोष

मराठीमध्ये साधारणपणे कोष हा शब्द, कीटकांच्या अळीच्या अंगाभोवती विणलेल्या आवरणासाठी, वस्तूंच्या संग्रहासाठी, वस्तुसंग्रह केलेल्या जागेसाठी आणि शब्दांखेरीज अन्य भाषिक शब्दसमुच्चयांच्या साठ्यासाठी वापरात आहे. निव्वळ शब्दसंग्रहासाठी कोश हा शब्द अधिक प्रचलित आहे. अर्थात, असा फक्त संकेत आहे, बेतोड नियम नाही!--वाचक्नवी

क्षमस्व

वाचक्नवी

मीच चुकून "शब्दकोष" असा शब्द वापरला आहे याबद्दल क्षमस्व. यापुढे लक्षात ठेवून शब्दकोश वापरेन.

प्रतिसाद

विनायक,
तुम्ही जो 'संग्राह्य' शब्दासाठी जो दूवा दीला आहे त्याप्रमाणे 'हे पुस्तक संग्राह्य आहे.' असे म्हटले तर त्याचा अर्थ 'हे पुस्तक संग्रहात (असलेले) आहे.' असा होईल. उदा.: बाह्य संबंध = बाहरचे संबंध
'बाहेरकरण्याजोगे संबंध' असा अर्थ होत नाही.
'संग्रहणी' ह्या शब्दाचा अर्थ 'संग्रह करण्यासाठीची वस्तू'. उदा. पुस्तांच्या शेल्फला, संगणकातील 'फोल्डर' वा 'डिरेक्टरी' यांना हा शब्द वापरता येवू शकेल.
वंदनीय, माननीय, ह्या शब्दानुसारच 'संग्रह करण्याजोगे' ते 'संग्रहणीय' होवू शकते.
मराठी व संस्कृत मध्ये असे फरक असणारच, असे वाटते. हिंदीतली मंडळी शब्दांचा वापर (मराठीच्या दृश्टीने जरी) चूकीचा करीत असली तरी व्याकरणातील शब्दसाच्यांचा वापर योग्य पद्धतीने करतात.

'डिस्केलमर' ला 'संनजझि' - संबंधित नसलेल्या जबाबदार्‍यांचा झिडकार' असा पर्याय कसा वाटतो.

सहमत!

सतीश रावले म्हणतात ते बरोबर वाटतंय..
संग्राह्य म्हणजे संग्रहात असलेले....आणि संग्रहणीय म्हणजे संग्रह करण्याजोगे...हा पोटभेद वगळता एरवी दोन्ही शब्द संग्रहासंबंधी वापरण्यास हरकत(मराठीतली...हिंदीतली नव्हे. ;) ) नसावी

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

कविधावि

य तव्य अनीय यांपैकी काहीही प्रत्यय चालतात. उदा., पूज्य=पूजण्याजोगे, वंद्य=वंदण्याजोगे, कर्तव्य=करण्यास योग्य, प्रातःस्मरणीय=सकाळी स्मरण करण्याजोगे, इ. हे सारे विध्यर्थी शब्द आहेत.
(तरीही, 'संग्रहणीय' हा शब्द मला सवयीचा* नाही. 'संग्रहणी' या शब्दाला विशेष अर्थ असल्यामुळे 'संग्रहणीय' या शब्दाला 'संग्राह्य' या शब्दाशी समानार्थी धरू नये असे मला वाटते.)
* आधिकारिक या अशाच एका कृत्रिम शब्दाची आठवण झाली.

सहमत ला पर्याय

'सहमत' ला सराम्हतेबवा (सतीश रावले म्हणतात ते बरोबर वाटतंय) हा पर्याय कसा काय वाटतो?

सन्जोप राव
तंग आ चुके है कश्मकशे जिंदगी से हम
ठुकरा न दे जहां को कहीं बेदिली से हम
हम गमजदा है लाये कहां से खुशी के गीत
देंगे वही जो पायेंगे इस जिंदगी से हम

लेना है तो ठिक सो लो, नही तो देंने भी लगेंगे वैसे जैसा पाया है!

'झिडकार: संबंधित नसलेल्या अटींचा, जबाबदार्‍यांचा' असे लिहायला हवे होते.

रावले, देव - लिहिण्यापूर्वी दुवा नीट वाचा

मी दिलेल्या दुव्यावरचा मूळ अर्थ देवनागरी लिपीत जसाच्या तसा देतो आहे.

संग्राह्य (पी. ८१०) (पॉसिबल, पर्पज्ड, नेसेसरी वगैरे.) टु बी कलेक्टेड, असेंबल्ड, अमास्ड, , गॅदर्ड टुगेदर

तुम्ही जो 'संग्राह्य' शब्दासाठी जो दूवा दीला आहे त्याप्रमाणे 'हे पुस्तक संग्राह्य आहे.' असे म्हटले तर त्याचा अर्थ 'हे पुस्तक संग्रहात (असलेले) आहे.' असा होईल. उदा.: बाह्य संबंध = बाहरचे संबंध

मी वर दिलेल्या इंग्रजी शब्दांपैकी कुठल्या शब्दाचा अर्थ "संग्रहात असलेले" असा होतो हे सांगाल का? उगाच काहीही लिहायचे?

विनायक

डिस्ट्रिब्युटिविटी

to be collected, assembled, amassed, gathered together

याची फोड त्यांनी

  1. to be collected
  2. to be assembled
  3. to be amassed
  4. to be gathered together

अशी न करता

  1. to be collected
  2. assembled
  3. amassed
  4. gathered together

अशी केली असावी.
क्ष्

सहमत

वाह्...! शतप्रतिशत सच् बोला आपने रावलासहाब..! :) बहोत खुब...!

गूगल

गूगलवर संग्रहणीय आहे असा शोध घेतला असता हे दिसले.

(नुसते संग्रहणीय शोधल्यास हिंदी पानांचा नॉइझ येतो म्हणून संग्रहणीय आहे असे शोधले.)

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

आरागॉर्न

तू दिलेल्या दुव्यावर टिचकी मारली असता संग्रहणीय शब्द मराठीत वापरतात असे दिसते. त्यातले पहिले दोन धनंजयांचेच उपक्रमावरचे आहेत. बाकी लोकप्रभा, पुस्तकविश्वमधले २००९ - १० असे अगदी अलिकडचे आहेत. यावरून हिंदीच्या प्रभावाने मराठीतही हा शब्द वापरायची पद्धत अलिकडे सुरू झाली आहे असे वाटते. बहुतेक तरूण लोकांना "संग्रहणी" शब्दाचा अर्थ माहिती नसल्याने आक्षेपार्ह वाटत नाही. पण ज्यांना तो माहिती आहे त्यांना "संग्रहणीय" आक्षेपार्ह वाटेलच.

विनायक

काका, काढा पाटी पुस्तक !

>>>>पण ज्यांना तो माहिती आहे त्यांना "संग्रहणीय" आक्षेपार्ह वाटेलच.
काहीही आक्षेपार्ह वाटणार नाही. पूर्ण वाक्य काय आहे ? वाक्यातून बोलणा-याला, लिहिणा-याला काय अर्थ अभिप्रेत आहे ते महत्त्वाचे आहे.

असं म्हणतात की, कोणत्याही भाषेतील शब्दांचे सामर्थ्य त्याच्या अर्थात साठविलेले असते’ शब्दाची मांडणी करतांना प्रत्येक शब्द हे एकमेकांचे सहाय्यक असतात किंवा शब्दांची जुळणीच योग्य अशी करावी लागते. आणि हे कशासाठी करावे लागते ? शब्दांची योग्य रचना यासाठी करावी लागते की, बोलणा-याच्या मनातील भावना पूर्णपणे व्यक्त झाल्या पाहिजे.

''वा! अत्यंत चांगले पुस्तक आहे. संग्रहणीय, विचारप्रवर्तक.''

वरील वाक्यातून बोलणा-याच्या मनातला भाव वाचकापर्यंत पोहचतो की नाही ? तर वरील वाक्यातून बोलणा-याच्या मनातला भाव वाचकापर्यंत पोहचतो. पुस्तक संग्रह करण्यासारखे आहे हा अर्थ त्याच्यातून प्रकट होतो. आणि म्हणूनच मनातली भावना प्रकट करण्यासाठी शब्दांची जी योग्य रचना केली जाते त्याला आपण 'वाक्य' म्हणतो. म्हणतो की नाही ?

आता वळूया शब्दांच्या रुपाकडे. आणि थोडसं शब्दशक्तीबद्दलही विचार करुया.

एखादा शब्द उचारल्याबरोबर ऐकणा-याला वाच्यार्थाचा उघड असा अर्थबोध होतो त्याला म्हणायचं अभिधाशक्ती. 'पुस्तक संग्रहणीय आहे' यातून वाच्यार्थ एकच निघतो की पुस्तक संग्रह करुन ठेवण्यासारखे आहे. बाकीच्या शब्दशक्तीबद्दल पुन्हा कधी तरी अभ्यास करु.

शब्दांची नव-नवीन रुपे येत आहेत. ऐकणेबल, बघणेबल, वगैरे तेव्हा नव्या शब्दांचे स्वागत करु या. शब्दामधील निघणा-या अर्थांबद्दल चर्चा करुन उगाच माय मराठीची गोची करु नका. मराठी भाषा समृद्ध करु या. काय म्हणता ?

-दिलीप बिरुटे

येस् टिचर्

तेच् म्हणतो.

मी मराठीतला भाषा तज्ञ नाही

तरी पण लहानपणापासुन जे ऐकले ते संग्राह्य - संग्रहणीय ऐकले नव्हते (ऐकले नाही म्हणुन चुक असे म्हणत नाही मी). पण आज ऐकल्यावर संग्रहणीय हा संग्राह्य ला समानवाचक शब्द असु शकतो असे वाटते. जस्ट गट फिलिंग.

अन्यत्र केलेली चर्चा

अन्य संकेतस्थळावर श्री. विनायक यांनी हीच चर्चा केलेली आहे. त्याचे उत्तर तिथे दिले आहे. परंतु वाद या स्थळावरील उपयोगाबाबत असल्यामुळे तो प्रतिसाद येथेसुद्धा देत आहे.

- - -

"संग्रहणीय" हा शब्द नुकताच मी वापरलेला आहे. वापराच्या ठिकाणी श्री. विनायक यांनी नोंदवलेल्या याच मतावर विस्तृत चर्चा केलेली आहे.

-अनीय हा प्रत्यय मराठीत उपलब्ध आहे. प्रत्ययांत शब्द वापरण्यासाठी मराठी-स्व-भाषकाला शब्दकोशाची गरज कधीच नसते.

माझ्या प्रत्यय-वापराच्या लकबींमध्ये फारतर माझ्या घरगुती बोलीचा परिणाम असेल, परंतु माझी घरगुती बोली हिंदी प्रभावाच्या प्रदेशातली नाही.

"संग्रहणी" हा रोग कोठ्यात होणाऱ्या मलसंग्रहाच्या संदर्भात वापरला जातो. कधीतरी कुठेतरी मलाचा संग्रह होतो, म्हणून "संग्रह" शब्द आणि त्यास प्रत्यय लावून होणारे सर्व उपशब्द अस्वच्छ होत नाहीत.

वर श्री.अद्वैतुल्लाखान म्हणतात की हा शब्द मराठीत नाही. मराठीत उपलब्ध प्रत्यय मराठीमध्ये उपलब्ध अर्थांनी वापरून बनलेला शब्द मराठी नाही, याबाबत ते कुठला ठोकताळा वापरतात, ते मला समजलेले नाही. श्री. मिलिंद फणसे यांनी केलेली सांत्वना "हे असे चालायचेच" मानून घेण्याशिवाय गत्यंतर नाही.

श्री. अद्वैतुल्लाखान निर्देश करतात की "संग्रहणी" शब्दाच्या विटाळामुळे "संग्रहणीय" शब्द हिंदीतही वापरू नये. ते संस्कृतात "संग्रहणी" शब्द आहे, त्यामुळे त्याचा विटाळ सर्व संस्कृतोद्भव भाषांना होतो, असे मानतात. आता "संग्रहणीय" हा शब्द विना-विटाळ मुळात संस्कृतातच सापडतो. मोनिएर-विल्यम्सच्या शब्दकोशात त्यांना "संग्रहणीय"तो सापडेल. या शब्दाचा विटाळ संस्कृतातच धुवून पावन झालेला आहे. हिंदी किंवा मराठी भाषकांनी मलमूत्राचा किंवा रोगाचा बाऊ न-करताअ हा शब्द वापरण्यास हरकत नाही.

मुळात बघता "संग्रहणी" शब्दातला अस्वच्छ भाग होता तो "संग्रह" नव्हे, की "णी" नव्हे. तर अध्याहृत असलेला "मल"संग्रहणी मधील "मल" अस्वच्छ होता. संस्कृतातही "संग्रहणीय" या शब्दात "मल" कधी अध्याहृत नव्हताच. "संग्रहणीय" शब्द संस्कृतात घाणेरडा नाही, हिंदीत घाणेरडा नाही, की मराठीत घाणेरडा नाही. संस्कृत स्वभाषा नसलेल्या व्यक्तीने संस्कृत शब्दकोशात बघून खात्री करून तो शब्द संस्कृतात वापरावा, हिंदीभाषकाने हिंदीमधील लोकव्यवहार स्मरून तो शब्द वापरावा, आणि मराठी भाषकाने मराठी प्रत्ययांबद्दल आपला आत्मविश्वास न-गमावता तो शब्द वापरावा.

एखादे वात्रट मूल "संग्रहणीय" मधील शेवटचे अक्षर खोडून रोगाची आठवण करून देईलही. पण वात्रट मुलांच्या कल्पकतेला घाबरून चांगले शब्द गमावता कामा नये.

संग्रहणी, संग्रहणीय, संग्राह्य वगैरे

पहिल्यांदा प्रतिसादात संग्रहणीय वाचला तर 'साठवून ठेवावे असे' असा अर्थ मला लक्षात आला. 'संग्राह्य' हा अधिक प्रचलित शब्द आहे पण 'संग्रहणीय' वापरण्यात काय गैर आहे? 'संग्रहणी' हा शब्द आजवर वाचनात आलेला नाही. किती उपक्रमींना शब्दकोष न पाहता हा शब्द माहीत असावा याविषयी साशंक आहे. कुणाला 'पादुका', 'गुद्दा' वगैरे शब्दांमुळे इतर काही शब्द आठवत असल्यास हे शब्द वापरण्यास अयोग्य समजावेत का?

_____
व्हेन पिपल डोन्ट फियर व्हॉट इज टेरिबल, ग्रेट टेरर कम्स.

अनाकलनीय चर्चा हेतू

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
संग्राह्य=संग्रहणीय=साठवण्यास योग्य=साठवण्याजोगे..(जोगे या योग्य चा अपभ्रंश. य चा ज होतो. जसे भार्या--->भाजा, कार्य-->काज इ.)
संग्राह्य=संहग्रहणीय यात शंकेला कुठेही थारा नाही.दोन्ही शब्द मराठीत वापरतात.
काही उदाहरणे: पूज्य, पूजनीय.
(सु)श्राव्य, श्रवणीय
असह्य, असहनीय
अतुल्य, अतुलनीय.
माझ्या मते संग्राह्य,संग्रहणीय याचा अर्थ worth collecting, worth adding to the collection असा होतो

तरीही

असहतव्य, अतुलतव्य, श्रवतव्य, पूजतव्य, असे शब्दप्रयोग कदाचित व्याकरणशास्त्रीय असतीलही परंतु ते प्रचलित आहेत की नाहीत ते मतदानाने ठरवावे लागेल ना? प्रांतांनुसार मताधिक्ये वेगवेगळीही असू शकतील.
"'संग्रहणीय' हा शब्दप्रयोग चूक नसला तरी 'संग्राह्य'इतका प्रचलित नाही" असा चर्चाप्रस्ताव असेल तर कोणी आक्षेप घेईल काय?

होय तसे सर्वेक्षण करता येईल

होय तसे सर्वेक्षण करता येईल.

आणि तुम्ही म्हणता तशी मताधिक्ये कमीअधिक असतीलही. असा निष्कर्ष असेल तर आक्षेप कसा काय असू शकतो? समोरच्या शंभर आंब्यांत ९० हापूस आहेत, आणि १० माणकुराद आहेत, तर ९०% आंबे हापूस आहेत - हे तर साधे गणित झाले. आक्षेप काहीच नाही.

मात्र माणकुराद हे आंबेच नाहीत, किंवा आंबा समजून माणकुराद खाल्ला तर गोठ्यातले "आंबोण" चाखल्यासारखे घाण वाटेल अशी चर्चा येथे चालू आहे. आणि त्याचा प्रतिवाद चालू आहे. मला वाटते, "गणित-सर्वेक्षण करता येते, करावे, त्या आकड्यांबद्दल आक्षेप घेता येणार नाही" वगैरे मुद्दे अप्रस्तुत आहेत.

*

असहतव्य, अतुलतव्य, श्रवतव्य, पूजतव्य, असे शब्दप्रयोग कदाचित व्याकरणशास्त्रीय असतीलही परंतु ते प्रचलित आहेत की नाहीत ते मतदानाने ठरवावे लागेल ना?


वरील उदाहरणांत "तव्य" प्रत्यय नियमानुसार जोडलेला नाही. परंतु हा तपशील बाजूला ठेवून मूळ मुद्द्याला विचारात घेतलेले आहे. कदाचित "तव्य" प्रत्ययजोडणीचे नियम मराठीभाषकांत सवयीचे नाहीत, असा काही निष्कर्ष काढता येईल. परंतु ज्या अर्थी तुम्ही वरील उदाहरणे घेतलेली आहेत, त्या अर्थी हे सर्व शब्द तुमच्या कानाला खटकतात, असे वाटते. मराठीशी आयुष्यभराच्या ओळखीमुळे "चूक खटकणे" इतपत तरी नियम तुम्ही आत्मसात केलेला आहे, हा निष्कर्ष ठीक आहे का? प्रत्ययाची सुयोग्य जोडणी काय, ते तुम्ही अगदी थोड्या विचाराअंती जाणालच याबद्दल खात्री आहे. ते सुयोग्य जोडणीचे शब्दही कमी प्रचलनाचेच आहेत. पण तुम्हाला खटकणार नाहीत.
*

कुठल्याही भाषेत जोडणीचे नियम प्रचलित असतानाही "अ"+"ब" अशी विवक्षित जोडणी यापूर्वी कधीच झालेली नसेल - एकदासुद्धा नाही. हे तर अपेक्षितच आहे. सर्व वैध जोडण्यांची संख्या अगणित नसली, तरी फार मोठी आहे. अमुक एक वैध जोडणी करण्याचा प्रसंग आजवर कोणाला आला नसेल. उदाहरणार्थ अवयवांची वैध जोडणी केलेला हा शब्द घ्या :
"नीलगायीपाठीमागूनही"
या घटकांची जोडणी केलेला हा शब्द इतका अप्रचलित असावा, की आजवर एकाही मराठीभाषकाने तो वाचला-ऐकला नसेल.
"हा शब्द कधी सार्थ वाक्यात वापरलेला ऐकला-वाचला आहे काय?" असे सर्वेक्षण केले तर मी खुद्द "नाही" असेच उत्तर देईन. माझे भाकित आहे, की अशा सर्वेक्षणात ~१००% "वापरात ऐकला-वाचला नाही" अशी उत्तरे येतील.

तरी हा शब्द सार्थ वापरण्याची वेळ माझ्यावर आली, तर मी त्या सर्वेक्षणाला काही एक वजन देणार नाही. कधी जंगलात फेरफटक्याबाबत मी लेख लिहिला, तर तो शब्द वापरण्यास मुळीच कचरणार नाही, आणि बहुतेक मराठीभाषक तो शब्द मराठीतला म्हणूनच वाचतील, आणि अर्थही समजतील, अशी रास्त अपेक्षा ठेवेन.

सारांश : शब्दप्रयोगांच्या वारंवारितेबद्दल सर्वेक्षणे करावीत, आकड्यांचे विश्लेषण करावे, हे सगळे त्यांच्या ठिकाणी चांगलेच. पण तो मुद्दा या चर्चेत अप्रस्तुत आहे.

खुलासा

नेहमीच्या वापरामधला "संग्राह्य" हा शब्द

या विधानाला पाठिंबा देण्याव्यतिरिक्त माझा प्रतिसाद चर्चाप्रस्तावाशी संबंधित नाही. बाकी चर्चा खवतून करेन.

उपचर्चा

किंवा आंबा समजून माणकुराद खाल्ला तर गोठ्यातले "आंबोण" चाखल्यासारखे घाण वाटेल अशी चर्चा येथे चालू आहे.

आंबोण चाखल्यास ते 'बेचव' वाटू शकते 'घाण' कसे काय वाटू शकेल? 'घाण' चवी साठी गोठ्यातला 'शेण' हा शब्द अधिक योग्य होता.

घाण,बेचव,शेण आणि आंबोणचे अर्थ पाहण्यासाठी: मोल्सवर्थ

(ह.घ्या.)

आपल्याशी सहमत

सहमत आहे

अरे अरे अरे

अहो ह्या दिवसात माणकुर, हापूस ची कशाला आठवण् काढुन दिलीत??? अजुन ३-४ महिने कसे घालवयचे आम्ही??

उगाच

नव्या शब्दांचे स्वागतच करायला हवे. मराठीत संग्रहणीय शब्द वापरायला काहीच हरकत नाही. मला तरी खटकला नाही. भाषेत एकाच वेळी अधिक प्रचलित किंवा कमी प्रचलित रूपे/शब्द एकाच वेळी सुखाने नांदत असतात ना.

अवांतर :
विचार करणे ह्या संयुक्त क्रियापदासाठी (कंपाउंड वर्ब) एखादा चांगला पर्याय कुणी सुचवाल का? महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषकांना मी सोचून सोचून परेशान झालो असे म्हणताना मी ऐकले आहे. सोचमे हे क्रियापद मराठीत आल्यास फार बरे होईल असे वाटते. सुटसुटीत आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत

नव्या शब्दांचे स्वागतच करायला हवे. मराठीत संग्रहणीय शब्द वापरायला काहीच हरकत नाही. मला तरी खटकला नाही. भाषेत एकाच वेळी अधिक प्रचलित किंवा कमी प्रचलित रूपे/शब्द एकाच वेळी सुखाने नांदत असतात ना.

+१ सहमत.

अवांतर: मला संग्रहणी शब्द संग्रहणीय शब्दापेक्षा जास्त नवीन वाटला.

'विचार करणे'च्या संक्षिप्त रूपाची वाट पाहून राहिलोय. :)

प्रमोद

मगजमारी

मागे मगजमारी हा शब्द स्वीकारला होता त्याची आठवण झाली. ;-)

इथे संग्रहणी या शब्दावरून उगीच मगजमारी सुरु आहे असे वाटते. फाईल या शब्दासाठी संग्रहणी हा शब्द वापरता येईल का?

जानबुचके

मगजमारी उगीच नसावी, जानबुचके* आहे असे वाटते. ;-)
*
मगजमारी शुरु करने वाले के बारे मे बोलरेला हुं.

-Nile

सचिंत

विचार करणे ह्या संयुक्त क्रियापदासाठी (कंपाउंड वर्ब) एखादा चांगला पर्याय कुणी सुचवाल का? महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषकांना मी सोचून सोचून परेशान झालो असे म्हणताना मी ऐकले आहे.

चिंतणे हे क्रियापद चालेल ना?

छे

अजिबात नाही
पेशवाइत गेल्यासरख वाटतय्... नको

वारंवारिता लक्षात घ्यायला हवी

या चर्चेतला हा माझा पहिला आणि शेवटचा प्रतिसाद असेल. असे आधीच सांगितल्याने वादासाठी वाद होणार नाहीत अशी आशा आहे.

श्री. धनंजय यांचे संग्रहणीय आणि संग्राह्य या दोन्हींतील प्रत्यय समानार्थी असल्याने हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत हे म्हणणे पटते. परंतू अर्थ आणि व्याकरण या दोन गोष्टींवरच शब्द-वापराचे संकेत ठरत नाहीत असे वाटते. यात वारंवारिता, त्या शब्दाचा 'फील' हे घटकही अंतर्भूत होतात असे वाटते. यनावालांनी दिलेली य-अनीय ची जोडी वाचून पटकन जाणवलेली गोष्ट म्हणजे श्री. गोरे म्हणतात त्याप्रमाणे 'अनीय' वाले शब्द हिंदी वाटत आहेत आणि 'य' वाले शब्द मराठी वाटत आहेत. याचे कारण म्हणजे एकाच अर्थाचे दोन संस्कृत प्रत्यय मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांत वापरले जात असले, तरी या दोन्ही भाषा हे दोन प्रत्यय वेगवेगळ्या वारंवारितेने वापरत असतात. मराठीत 'य' अधिक वापरला जातो व हिंदीत 'अनीय' अधिक वापरला जातो, हे माझे गट फिलिंग आहे. ते खरेच तसे आहे का, हे सखोल अभ्यासाशिवाय कळणार नाही. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे 'रंगमंच' या सारखे शब्द. आपण मराठीत या शब्दातील कोणतेहे व्यंजन हलन्त उच्चारत नाही. हिंदीत मात्र याचा उच्चार रंग्-मंच् असा म्हणजे ग् आणि च् हे हलन्त उच्चारून केला जातो (मधले हायफन सिलॅबिक ब्रेक दर्शवते). हे दोन्ही उच्चार आपल्यासमोर ठेवले, तर यातला मराठी उच्चार कोणता व हिंदी उच्चार कोणता हे लगेच कळते. वास्तविक या दोन्ही शब्दांमागील व्याकरण, त्यांचा अर्थ, त्यांचा वापर हे सर्व तंतोतंत समान आहे. परंतू जेव्हा आपण सामासिक शब्द उच्चारतो, तेव्हा त्याच्या दोन घटकांचा पूर्ण उच्चार करण्याला आपण मराठी भाषिक प्राधान्य देतो, तर हिंदीत तसे होत नाही.

आता आणखी एक उदाहरण घेऊ- 'कार्य' आणि 'कर्तव्य' या दोन मराठी शब्दांचे. दोन्हींत वापरलेले प्रत्यय समानार्थी आहेत, मूळ् धातू समानार्थी आहे, पण दोन्हींच्या अर्थांत फरक आहे. "त्यांचे या क्षेत्रातले कार्य मोठे आहे." आणि "ते त्याचे कर्तव्यच आहे" या दोन वाक्यांतला फरक वेगळा सांगायला नको. हा फरक निर्माण झाला आहे, तो वापराच्या संकेताने. तसे बघता 'एबल' हा इंग्रजी प्रत्ययही आता मराठीत सर्रास वापरला जातो. जसे 'तिथली पावभाजी मुळीच खाणेबल नाही.' पण या प्रत्ययाचा प्रयोग सध्या केवळ 'स्लँग'पुरताच सीमित आहे.

आणखी एक मुद्दा असा, की शब्द ऐकून समोरच्याला व्याकरण कळतेच असे नाही. त्यात य्-अनीय हे संस्कृत प्रत्यय. येथे काहींना 'संग्राह्य'चा अर्थ 'आधीच संग्रहात असलेला' असे वाटला, यावरूनच हे दिसून येते. (येथे कोणाचीही टर खेचण्याचा उद्देश नाही, हे कृपया ध्यानात घ्यावे.)

आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आता हे असेच शब्द वापरले जाणार याची आता आपण् मानसिक तयारी केली पाहिजे. स्टार माझाच्या बातम्या ऐकून माझे डोके उठते. एकदा संबंध दिवस स्टार माझाच्या बातम्या ऐकून आणि वाचऊन त्यांच्या बोलणयातल्या आणि लिहिण्यातल्या चुकांची यादी करून त्यांना पाठवण्याचा विचार होता. पण् तितका वेळ नसल्याने तो बेत रहित झाला. शिवाय या निमित्ताने भारतीय भाषांतील देवाणघेवाण् वाढते आहे आणि संस्कृत शब्दांना आणि व्याकरणाला चलती येते आहे, हेही नसे थोडके. भाषा म्हटली की ती बदलत राहणाअरच. आपल्या भाषेतलेच शब्द वापरावे इतर भाषांतले मुळीच घेऊ नयेत, असे म्हटले कीकी भाषा अधिकधिक साचत जाणार.

शुद्धलेखनातल्या चुकांबद्दल क्षमा असावी. इथे फाँटचा नवीन प्रॉब्लेम सुरू झाला आहे का, मी टंकित केलेले वाक्य सुमारे ३ मिनिटांनी पडद्यावर अवतरते आहे.

राधिका

रूढार्थ आणि यौगिक अर्थ

अनेक ध्वनिरूपे वापरात राहाणार असली, तर कालांतराने ती सर्व स्वतःसाठी वेगळी अर्थवलये बनवतात, असे होते खरे.

"कृत्य/कार्य/कर्तव्य/करणीय" मध्ये रूढार्थांत फरक खूप मोठे आहे.
कृत्य - केलेले
कार्य - करण्यासाठीचा प्रकल्प
कर्तव्य - करण्याची नैतिक जबाबदारी
करणीय - करण्यालायक

म्हणून काही आपण पूज्य/पूजनीय मध्ये समांतर अर्थछटा कल्पत नाही
पूज्य - ?? पूजलेले किंवा पूजण्यासाठीचा प्रकल्प ?? (हे चूक आहे)

पूज्य/पूजनीय मध्ये अर्थछटांचा थोडा फरक आहेच. पण तो "कृ"च्या रूपांइतका भिन्न नाही. त्याच प्रमाणे वंद्य/वंदनीय यांच्यातही अर्थछटांचा थोडा फरक आहे, पण फार मोठा फरक नाही.

भिन्नभिन्न रूढार्थ प्रचलित नसले, तर यौगिक (घटकांपासून मिळणारे) अर्थ सहजप्राप्य आहेत, तेच मराठीभाषकाला समजून येतील. या चर्चेमध्ये ज्यांनी-ज्यांनी थेट मत नोंदवले आहे, त्यांनी "अनोळखी शब्द होता, पण संग्रह-करण्यालायक असा अर्थ लगेच कळून आला" असेच मत नोंदवले आहे. जर असा अर्थ कळून येतो असा अनुभव असेल, तर "कुठला रूढ अर्थ नसला तर यौगिक अर्थ कळतो" या सिद्धांताची प्रायोगिक सिद्धताच आहे. आणि प्रायोगिक सिद्धता आहे, सिद्धांतही आहे, तर "कृत्य/कार्य/कर्तव्य/करणीय प्रमाणे कुठला रूढार्थ वेगळा असल्याचे कल्पावे काय?" ही शंका अप्रस्तुत आहे.

"अनीय" सोडून क्षणभर वेगळे उदाहरण घेऊया "-की" प्रत्यकाचे : "भाऊबंदकी" येथे विशेष रूढ अर्थ आहे - "भाऊबंदांत मालमत्तेच्या वाटपावरून झालेले भांडण". रूढ अर्थ प्राथमिक असतो. "भाऊबंद+की = भाऊबंद असल्याची स्थिती/हुद्दा/व्यवसाय" हा यौगिक अर्थ दुय्यम होतो. बहुतेक वापरांत दुय्यम त्याज्य आहे.

पण "पाटीलकी" शब्द ऐकला, रूढ अर्थ वेगळा कुठला नसला, तर "पाटील+की = पाटील असण्याची स्थिती/हुद्दा/व्यवसाय" हा यौगिक अर्थ सहज कळून येतो. "भाऊबंदकी"सारखा कुठला रूढ अर्थ तर नाही ना? असले प्रश्न सतावतात नाहीत. म्हणून "पाटीलकी" शब्दाचा यौगिक अर्थ घेण्यात कोणाचाच विलंब होत नाही. यौगिक अर्थ त्याज्य नाही.
तसेच "मास्तरकी, डॉक्टरकी" हे शब्द घेऊ - हे शब्द कोशांत सापडत नाही, पण पुणे जिल्ह्यातील गावांत मी ऐकलेले-वापरलेले आहेत. "मास्तर+की", "डॉक्टर+की" या घटकांपासून अर्थ काढण्यात काहीच विलंब किंवा शंका वाटू नये.

"संग्रहणीय" शब्दाचा कुठला विलक्षण रूढ अर्थ (भाऊबंद-की सारखा) माहीत नसेल तर त्याच्या घटकांपासून (मास्तर-की, डॉक्टर-की सारखा) अर्थ काढण्यास विलंब का लागावा? मनात शंका का यावी?

- - -

अंत्य 'अ' निभृत करण्याबाबत हिंदी आणि मराठीतील नियम वेगळे आहेत. त्याचे येथे काय देणेघेणे? फारतर असे म्हणू - "ह" आणि "य"-कारांत शब्दांचा अंत्य 'अ' हिंदीमध्ये निभृत होतो, पण मराठीमध्ये पूर्ण उच्चारला जातो, याचा "संग्रहणीय" चर्चेशी संबंध आहे. हिंदीमध्ये "वन्द्-नीय्" असा उच्चार होतो, तर मराठीमध्ये "वन्दनी".

त्याच प्रमाणे "संग्रह्-णीय्" असा हिंदी उच्चार होईल, "संग्रणी" असा उच्चार मराठीमध्ये होईल. पण मराठी वाक्यात, मराठी परिच्छेदात उच्चार मराठी नियमांच्या अनुसार होईल, हे गृहीतच धरायला हवे ना?

- - -
वारंवारितेचा अभ्यास कोणाला करायचा आहे, त्यांनी जरूर करावा. मात्र "कंपॅरेटिव्ह फिलॉलॉजी" आणि "व्याकरण" यांच्या कक्षा वेगळ्या आहेत. अमुक व्युत्पत्तीचे शब्द उडियामध्ये किंवा बंगालीमध्ये मराठीपेक्षा अधिक वारंवारितेने येतात - या प्रकारचा अभ्यास कंपॅरेटिव्ह फिलॉलॉजीचा. एखाद्या भाषेच्या अंतर्गत शून्यावेगळी अशी, पण कमी वारंवारिता असली तर त्या शब्दप्रयोगांची व्यवस्था व्याकरणात लावावीच लागते. दुसर्‍या कुठल्या भाषेत वारंवारिता अधिक आहे, ही बाब व्याकरणाच्या अभ्यासात दुर्लक्षणीय आहे.

"ळ" ध्वनीची वारंवारिता हिंदीपेक्षा मराठीत जास्त आहे, आणि मराठीपेक्षा कन्नडात कदाचित जास्त आहे. ही बाब अभ्यास करण्याजोगी आहे, आणि रोचकही आहे. पण मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना "महाकाल" शब्दात हिंदीच्या भेसळीची भीती, किंवा "महांकाळ" शब्दात कन्नडाच्या भेसळीची भीती अप्रस्तुत आहे. ती दोन्ही रूपे कमीअधिक वारंवारितेने मराठीभाषक वापरतात, तर त्या दोहोंची सोय मराठी व्याकरणामध्येच लागली पाहिजे.

संग्रहणीय प्रतिसादलेखन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
(१)रूढार्थ आणि यौगिक अर्थ आणि(२) अन्यत्र केलेली चर्चा हे श्री.धनंजय यांचे दोन्ही प्रतिसाद प्रस्तुत चर्चेच्या संदर्भात बिंदुगामी (टु द पॉइंट) आहेतच. तसेच हे अल्पलेखनसुद्धा मराठी भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टीने मला महत्त्वपूर्ण वाटते.त्यांनी नेमके विश्लेषण सोदाहरण केले आहे.विषयाचे पूर्ण आकलन झाले तरच असे लेखन करणे शक्य आहे. मला तरी या प्रतिसादवाचनामुळे नवीन ज्ञान मिळाले.

मलाही

धनंजयांचे प्रतिसादलेखन मलाही संग्रहणीय वाटले. अगदी सहमत.

वारंवारिता

शब्द योग्य आहे की नाही हे ठरवायला वारंवारिता हा निकष असूच शकत नाही. पारंपारिक, तात्कालिक, लोकं, केसं, जिरं, मिरं, जन्ता हे शब्द वारंवार ऐकायला लागतात म्हणून त्यांचा तसला वापर बरोबर आहे? संग्रहणीय कितीही वेळा वापरला तरी त्याचा मराठीतला अर्थ संग्राह्य असा होणार नाही.--वाचक्नवी

संग्रहणी

संग्रहणी हा शब्द आणि त्याचा अर्थ माहीत होता. त्यामुळे जालावर प्रथम चौकस यांच्या एका पुस्तक परीक्षणात वाचला तेव्हा तो खटकला होता. (पादुका, पादत्राणे, गुद्दा, शीला वगैरे शब्द सवयीमुळे खटकत नाहीत).

मात्र धनंजय यांनी दिलेले स्पष्टीकरण पूर्णपणे पटण्यासारखे आहे. संग्राह्य आणि संग्रहणीय हे एकाच अर्थाचे शब्द आहेत याबाबत काहीही शंका नाही. श्री. रावले यांनी दिलेले स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संग्रहणी होण्याजोगे / संग्रह करण्याजोगे

संग्राह्य = संग्रहणीय हे धनंजय यांचे मत पटते.
पण पुढे "संग्रहणी होण्याजोगे" (जास्त खाल्ल्याने/अशुद्ध पाणी पिल्याने इ.) या शब्दसमुच्चयासाठी कोणता एकच शब्द वापरता येईल? असा प्रश्न पडला...
उदा. तू 'संग्रहणीय' खात आहेस...?

संग्रहणीय - एक उदाहरण

कंटेक्स्ट बेस्ड अर्थ घ्यावा लागेल असे वाटते.

'तू संग्रहणीय खात आहेस' याचे उदाहरण म्हणून या वाक्यावरून साईनफेल्डच्या ' The Frogger या भागात एलेन तिच्या बॉसकडे असलेला किंग एडवर्डच्या विवाहातील केकचा तुकडा खाते हा प्रसंग आठवला. तो केक ऐतिहासिक महत्त्व असल्याने व अतिशय जुनाट असल्याने दोन्ही अर्थांनी संग्रहणीय होता. :-)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कपाटाऐवजी पोटात?

संग्रहणीय म्हणून कपाटात ठेवायची वस्तू पोटात घातली की दुसर्‍या अर्थाने संग्रहणीय होते असे म्हणावे का?

संग्रहणीय प्रकृती

एखाद्याचे पोट किंवा तब्येत संग्रहणीय आहे या वाक्याचा काय अर्थ घ्यावा?---वाचक्नवी

शब्दाच्या अर्थाचा परीघ

माझ्या मर्यादा, माझी क्शमता :
माझा मराठीचा अभ्यास सतत चालू आहे/ असतो. (तो असतो स्वनिरीक्शणावर आधारलेला.) शाळेत संस्कृत मी फक्त पाचवी ते आठवी पर्यंतच (जुजबी) शिकलो.
--
ह्या चर्चेत विनायक ह्यांच्या स्मरणपटलावर एक अमूक शब्द ज्या अर्थाने 'ग्राह्य' होता, 'गृहित' धरलेला होता, 'ग्रंथीत' झालेला होता, तो शब्द वेगळ्या अर्थव्यक्तीने त्यांच्या समोर येण्याने त्यांनी त्यांचा 'ग्रह' व्यक्त करण्यासाठी हा चर्चा प्रस्ताव ठेवला. जेणेकरून त्या चर्चेतून असे उत्तर निघावे जे सर्वांकडून 'ग्रहणीय' होवू शकेल.
--
प्रत्येक शब्दाच्या अर्थाला स्वत:चा परीघ असतो. ह्या परीघाला स्तर ही असतात, विभाग ही असतात.
जेंव्हा एखाद्या शब्दातून त्या शब्दाच्या अर्थाच्या परीघाचे विशिश्ठ अंगंच व्यक्त करायचे असेल तर त्यासाठी विशिश्ठ शब्दसाच्याद्वारे प्रत्यल लावून तो(मूळ) शब्द व्यक्त करता येवू शकतो. आणि म्हणून दोन वेगवेगळे साचे एकाद्या शब्दपरिघाचा एकच अंग दाखवत असेल तर दोश कुठे असू शकेल?

एक वेळं शब्द बनविता येणं सोपं असतं. पण साचा बनविता येणं खूप कठिण! कारण प्रत्येक शब्दाला स्वतःचे गुणधर्म (प्रॉपर्टीज) असतात. जिथे गुणधर्म जुळतात तिथेच शब्दसाचा वापरता येतो. आणि म्हणून प्रत्येक शब्दाचे गुणधर्म धुंडाळत बसणे हे सोपे काम नाही. मराठीत जे शब्दसाचे वापरले जात आहेत, त्यातील बहुतेक करून संस्कृतच्या (पूर्वीच्या) आभ्यासकांकडून प्राप्त झालेले आहेत. एक शब्दसाचा जरी लक्शात ठेवला तरी अनेक शब्दाचा अर्थ आपोआप लक्शात येवू शकतात. तसेच एका शब्दसाच्यापासून अनेक शब्द आपोआप जन्माला येवू शकतात. कमीत कमी शब्दांचा वापर करीत अनेकांगी विचार जिथे/जेंव्हा व्यक्त करणे गरजेचे असते तिथे शब्दसाच्यांचा वापर गरजेचा ठरतो.

भाशा कधीही तोकडी नसते. त्या भाशेचे भाशीक विचार कसे करतात? व ते सामुहिकपणे आपल्या विचारांचे/ भावनांचे अर्थवहन करण्यासाठी भाशा ह्या माध्यमाचा कसा वापर करतात, नव्हे कसा वापर करू शकतात? ह्या त्यांच्या 'सामुहिक बौद्धिक क्शमते' वरच ती भाशा तोकडी आहे की नाही हे ठरवता येईल.

शाळेत जे मराठीचे व्याकरण शिकवले जाते. त्यात वर्णबोध स्तरावरचेच व्याकरण शिकवले जाते. शब्दबोधन, वाक्यबोधन स्तर ह्या वरती मराठी व्याकरणात विचार केला जायला हवा, त्यावर सर्वसंमती होवून तो लेखनबद्ध व्हायला हवा.

अय बाबा काय बोलतुस तू

काहिच्या काहीपण अर्थ घेता यार तुम्ही लोक. . (मी फक्त हा धागा सुरु करण्यालाच बोलतोय. .) अशाच जर सामान्य माणसाच्या चुका काढत बसलात तर त्याला बोलायला जागाच राहायची नाही. . 'संग्रहणीय' या शब्दाचा अर्थ तुम्ही तुम्हाला भेटणाऱ्‍या शंभर जणांना थेट विचारा (ऑफलाईन विचारा कुठल्या वेबसाईटवर नाही) त्यातल्या एक दोघांनी जरी 'हगवण' असे उत्तर दिले तर अशी चर्चा करण्यात अर्थ आहे. .

अर्धवट द्न्यान अद्न्यानापेक्षा हानिकारक असते. . .
(मी मराटीचा मास्तर नाइ माज्या चुका काडू नगा)

सामान्य?

इथे धनंजय हे सामान्य वकुबाचे व्यक्ती नाहीत म्हणूनच त्यांनी वापरलेला शब्द चर्चेस पात्र ठरला असावा असा अंदाज आहे. :-)

बाकी चालू द्या!

 
^ वर