प्राप्तीकराचा दर किती असावा?

आजच रेडीयोवर एक संभाषण ऐकले त्याचा सारांश असा होता की उत्पन्नावरून कराचा दर वेगवेगळा असावा का?
जवळपास प्रत्येक देशामधे प्राप्तीकरासाठी उत्पन्नावर आधारीत वेगवेगळे दर लावले जातात (टॅक्स ब्रॅकेट्स). हे योग्य आहे का? जितके अधीक उत्पन्न तितका अधिक दर (अधिक कर नव्हे, तर दरही)
मी ऐकलेल्या संभाषणातील एका व्यक्तीचे मत असे होते की हा दर सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे. ज्याचे उत्पन्न अधिक तो आपोआपच जास्त कर भरेल. पण दर मात्र सारखाच असला पाहिजे.
ह्यावर उपक्रमींना काय वाटते?

उत्पन्न वाढत जाईल तसा कराचा दरही वाढत जावा का?

लेखनविषय: दुवे:

Comments

हाऊ यू पुट इट्

येथे जास्त उत्पन्नधारकांना जास्त दर असे मांडून ते इल्लोजिकल/अन्याय्य असल्याचे आर्ग्युमेंट केले आहे. त्या ऐवजी आपण असे म्हणू " भारतात आयकराचा दर ३०% आहे. पण ज्यांचे उत्पन्न 'क्ष' पेक्षा कमी आहे त्यांना सवलतीचा दर २०% लागू आहे. त्यांचे उत्पन्न 'य' पेक्षाही कमी आहे त्यांना आणखी सवलतीचा दर १०% लागू आहे. आणि अगदी कमी उत्पन्न असलेल्यांना करातून पूर्ण सूट आहे."

आता लॉजिकल/न्याय्य वाटतंय का?

नितिन थत्ते

याही पलिकडे

प्राप्तीकराच्या दरांच्या टप्प्यांकडे 'उत्पन्नाचं पुनर्वितरण' वगैरे सोशालिस्ट संकल्पनांच्या आधारे बघितलं जातं. माझ्या मते हे चूक आहे. प्राप्तीकराचे दर हे मार्केट फोर्सेसनी ठरतात. एखाद्या संस्थेला आपण सरकार असं नाव दिलं, लोकशाही पद्धतीने वगैरे प्रतिनिधी निवडून दिले म्हणून तिचं कार्य बदलत नाही. सरकार ही एक सर्वसाधारण इन्शुरन्स एजन्सी आहे. आपापल्या हक्कांवर बाधा येऊ नये म्हणून सरकार काळजी घेईल अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. ज्यांचं उत्पन्न अधिक, ज्यांची मालमत्ता जास्त आहे ते या इन्शुरन्स एजन्सीचे हाय रिस्क कस्टमर. त्यांना रिस्कप्रमाणे प्रीमियम द्यावं लागणं हे पूर्णपणे लेझे फेअर शी अनुरूप आहे. ज्या व्यक्तीला महिना दहा हजार रुपये मिळतात, व त्यातले साडेनऊ हजार घरखर्च चालवायलाच जातात त्याची रिस्क आहे महिना पाचशे रुपयांची. याउलट ज्या व्यक्तीला महिना एक लाख मिळतात व घरखर्चासाठी ऐशी हजार जातात त्या व्यक्तीची रिस्क आहे महिना वीस हजाराची. मग दुसऱ्या व्यक्तीला फक्त दहापट मिळत असताना चाळीसपट द्यावे लागले तर त्यात काय चूक आहे?

हे आकडे उदाहरणासाठीच दिले आहेत, मुद्दा दहा हजार की एक लाख की दहा लाख हा नाही... मुद्दा आहे तो म्हणजे ज्या प्रमाणात उत्पन्न वाढतं त्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात डिस्पोझेबल उत्पन्न वाढतं. या वरकड, डिस्पोझेबल उत्पन्नावर (जवळपास एकाच दराने) टॅक्स असतो. त्या दृष्टीने बघितलं तर तो साधारण पस्तीस टक्के असावा... ज्यांचा टॅक्स विशिष्ट रकमेपेक्षा कमी असेल त्यांना तो माफ असतो - पुन्हा टॅक्स गोळा करण्यासाठी येणारा खर्च निघत नसेल तर माफ करण्यातच फायदा आहे. कॅपिटॅलिझमचा विजय असो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

अभिनव कल्पना

रिस्क इन्शुरन्सची कल्पना आवडली. पूर्वी कधी वाचली नव्हती.

नितिन थत्ते

प्रतिसाद आवडला

प्रतिसाद आवडला.

माझ्यामते 'डिडक्शन' हे घरखर्च चालवण्यासाठीच दिलेले असते. कर हा डिडक्शन वजा जाता उरलेल्या उत्पन्नावर भरायचा असतो. आता हे जे काही उर्वरीत उत्पन्न आहे त्यावर कराचा वेगवेगळा दर असावा का?

ज्याच्याकडे २०,००० आहेत त्याची रिस्क जास्त आहे पण ३५% दराने तो करही जास्त भरणार. ज्याच्याकडे ५०० आहेत तो ३५% दराने कमी भरणार. (दोघांनाही एकच दर लावला तरी रक्कम वेगळी भरावी लागणार) तुमच्या मते ५०० रुपये अतिरीक्त उत्पन्न असणार्‍याला ३५% पेक्षा कमी दर लावावा का?

डिडक्शन

स्टॅंडर्ड डिडक्शनकडे मी 'या उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असेल तर कर इतका कमी आहे की तो वळता करून घेण्यासाठीचा खर्च अधिक येईल' म्हणून माफी - या दृष्टीकोनातून बघतो. आणि कुठचीही कंपनी 'कस्टमर सॅटिस्फॅक्शनसाठी' काही खर्च करते तसंच सरकारही करतं, असंही म्हणता येईल. त्याप्रमाणे जास्तीत जास्त कस्टमरांना जास्तीत जास्त खुष करण्यासाठीच्या या पॉलिसीज आहेत. मार्जिनल युटिलिटीच्या तत्वानुसार १०००० रुपये मिळवणाऱ्याला ५०० परत मिळाल्याने (टॅक्स न कापला गेल्याने) जितकं समाधान मिळतं त्यापेक्षा कमी समाधान एक लाख मिळवणाऱ्याला ५००० परत मिळाल्याने होतं.

शिवाय सरकारच्या बाबतीत लोक हे कस्टमरच नव्हे तर इक्वल व्हॅल्यू शेअरहोल्डर्स आहेत. गरीब शेअरहोल्डरांना केवळ त्यांच्या शेअरच्या बहुमतामुळे कंपनीच्या पॉलिसी आपल्या अनुकूल करून घेता येतात. कॉर्पोरेट जगतात हे सर्रास चालतं. मग समाजात घडलं तर त्याला आक्षेप का?

असा विचार केला की मग सोशालिझम व कॅपिटालिझम असं द्वैतच नष्ट होतं. सगळेच मार्केट फोर्सेस. चलनं वेगवेगळी.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

फरक

कल्याणकारी सरकार या कल्पनेत "लोकांना स्वतःचे हित समजत नाही म्हणून आम्हीच सक्ती करणार" ही संकल्पना थोडीतरी असतेच आणि ती मर्यादित असली तर योग्यच ठरेल असे मला वाटते. पॉपुलिस्ट सरकारचे "जास्तीत जास्त कस्टमरांना जास्तीत जास्त खुष करण्यासाठी" असे वर्णन योग्य ठरेल परंतु वेल्फेअर स्टेट ही कल्पना त्यापेक्षा वेगळी वाटते.

असहमत

सरकार पूरवत असलेल्या बर्‍याचशा सेवा पब्लिक गुड या प्रकारात मोडतात. या सेवा बाजार तत्त्वांवर आधारित व्यवस्थेत पूरवता येत नाही. त्यामुळे 'सरकार' या सुविधा पुरवते. बाजारात उपलब्ध असलेल्या 'पाहीजे तेवढीच मागणी' व 'चॉइस' या दोन्ही गोष्टी करव्यवस्थेत आढळून येत नाहीत.

इन्शुरन्स मूख्यत: अनिश्चित, अनपेक्षित नुकसान कमी करणारी सेवा आहे. देश युद्धात हरला किंवा सरकारात बदल होऊन मालमत्ता जप्त केली गेली (या दोन्ही अनिश्चित घटना आहेत) तर नुकसान कमी व्हावे म्हणून बाजारात ऑफशोअर बँकिंग वगैरे सुविधा उपलब्ध आहेत. सरकार करदात्यांशी मालमत्ता टिकवली जाईल असा कुठलाही करार करत नाही.

'इक्विटी' हे करव्यवस्थेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट्य आहे. उत्पनातील विषमतेची सोशल कॉस्ट (असंतोष, गुन्हे वगैरे) असते. तिला कमी करण्यासाठी प्रोग्रेसिव करव्यवस्था आवश्यक आहे, जास्त मालमत्तेच्या लोकांना जास्त वाचवण्यासारखे असते म्हणून नाही.

थोडं वेगळं...

सरकार ही इन्शुरन्स कंपनी आहे म्हणजे तिची मोनोपोली नाही असं नाही. पण ती थोडी स्वीकारार्ह मोनोपोली आहे, कारण योग्य प्रकारे प्रयत्न करून त्या कंपनीचे नियम, किमती वगैरे थोड्या बदलता येतात. त्यातही श्रीमंतांना अधिक चॉईसेस असतात. माझा कारखाना मी बंगालमध्ये काढावा की गुजराथमध्ये असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांना ही सरकार संस्था अधिक फायदेशीर पडते.

देश युद्धात हरला किंवा सरकारात बदल होऊन मालमत्ता जप्त केली गेली

रशियात, चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली तेव्हा किती लोकांची मालमत्ता ऑफशोअर बॅंकिंगमुळे सुरक्षित होती? मालमत्ता पैशांच्या स्वरूपात असणं ही बऱ्यापैकी नवीन घडामोड आहे. बाह्य धोक्यांपेक्षा बऱ्याच वेळा आंतर्गत धोके अधिक महत्त्वाचे असतात.

सरकार करदात्यांशी मालमत्ता टिकवली जाईल असा कुठलाही करार करत नाही.

करार हा शब्द थोडा खटकला. राज्यघटना असते - तीत जनतेचे हक्क दिलेले असतात व पीनल कोड असतं त्यात हक्कभंग करणाऱ्यांना शिक्षा सांगितलेली असते. चोरी हा गुन्हा आहे, व तीबद्दल चोराला शोधून, पकडून, शिक्षा देण्यास सरकार बद्ध आहे. त्यासाठीची यंत्रणा आहे. यापेक्षा दुसरा काय 'करार' करणार? बऱ्याच लोकांना पुरेशी सक्षम कायदापालन व्यवस्था ही सुरक्षेची काही प्रमाणात हमी वाटते.

'इक्विटी' हे करव्यवस्थेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट्य आहे. उत्पनातील विषमतेची सोशल कॉस्ट (असंतोष, गुन्हे वगैरे) असते.

(तुम्हाला इक्वॅलिटी म्हणायचं आहे बहुतेक) मी हेच म्हणतो आहे, फक्त भांडवलशाही परिभाषेत मांडतो आहे. श्रीमंतांकडे पैसा असतो, त्या बळावर त्यांना काही गोष्टी करता येतात. गरीबांकडे संख्याबळ असतं, त्याच्या जोरावर त्यांना संपत्ती हिरावून घेता येते. या दोन शक्तींची तडजोड म्हणून श्रीमंत अधिक प्रमाणात पैसे सरकारच्या थैलीत (नाईलाजाने) टाकून शांतता विकत घेतात अशा प्रकारची माझी मांडणी आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सरकार, उत्पादक: काही साम्य पण मुलभूत भिन्नता

सरकार, ग्राहक व उत्पादक हे अर्थव्यवस्थेत निर्णयक्षमता असणारे मूख्य घटक आहेत. इन्शुरन्स कंपन्या देणारी सेवा व सरकार देत असलेल्या सेवा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. इन्शुरन्स कंपनीचे निर्णय 'जास्तीत जास्त' नफा या तत्त्वास अनुसरून मागणीनुसार सेवा पुरवतात. सरकार (कमीत कमी थिओरेटिकली)
'जास्तीत जास्त' कल्याण या तत्त्वाचा अंगिकार करते. हे तत्त्व प्रत्यक्षात मतभेद आहेत. साम्यवाद असो की भांडवलशाही या वर्गीकरणात फारसा फरक पडत नाही.

मालमत्तेचा हक्क घटनेत असणे शक्य आहे. मालमत्तेचा हक्क जपण्याची श्रीमंतांसाठी जास्त उपयुक्तता असू शकेल. करव्यवस्था मात्र या एकाच हक्काच्या जपणुकीसाठी कार्यरत नसते. पुर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे काही सुविधा ज्या उत्पादक पुरवू शकत नाहीत त्या पुरवण्यासाठीही करव्यवस्थेचा वापर केला जातो.

यापेक्षा दुसरा काय 'करार' करणार?

मालमत्तेची हमी सरकार देते काय? ही हमी म्हणजे करार. माझी जमीन कुठल्या महत्त्वाच्या व्यापक जनहितार्थ कारणासाठी वापरणे आवश्यक असल्यास सरकार माझी इच्छा नसतांनाही माझी जमिन विकण्याची सक्ती करते.

(तुम्हाला इक्वॅलिटी म्हणायचं आहे बहुतेक)

नाही इक्विटीच म्हणायचे आहे.

या दोन शक्तींची तडजोड म्हणून श्रीमंत अधिक प्रमाणात पैसे सरकारच्या थैलीत (नाईलाजाने) टाकून शांतता विकत घेतात अशा प्रकारची माझी मांडणी आहे.

सर्वच लोक नाइलाजाने कर भरतात.

या प्रतिसादाचा सर्वच बाजार तत्त्वांवर चालते या कल्पनेला छेद देणे आहे. तुमच्या प्रतिसादातून तसे असल्याचे प्रतित होत होते.

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

सामाजिक करार

चर्चा वाचून रुसोची आणि त्याच्या सामाजिक करार संकल्पनेची आठवण झाली.

प्रमोद

पण.

याउलट ज्या व्यक्तीला महिना एक लाख मिळतात व घरखर्चासाठी ऐशी हजार जातात त्या व्यक्तीची रिस्क आहे महिना वीस हजाराची. मग दुसऱ्या व्यक्तीला फक्त दहापट मिळत असताना चाळीसपट द्यावे लागले तर त्यात काय चूक आहे?

विमा कंपनीचे उपमान आपण दिले आहे, जर रिस्क मोठी तर द्यावा लागणारा कर मोठा तसेच मिळणारा परतावा देखील मोठा असायला हवा, असे मानल्यास ह्या दहापट उत्पन्न मिळणाऱ्या व्यक्तीला कोणच्या स्वरुपात मोठा परतावा मिळतो? सरकार तर्फे सर्व करदात्यांना समानतेने वागवले जाते असे दिसते? सोशालिस्ट संकल्पना ग्राह्य धरल्यास जास्त उत्पन्नाला जास्त कर हे पटू शकते पण आपल्या विमा कंपनीच्या उपमानाशी ते मिळते जुळते नाही.

भारतात डायनामिक सोशलिझम चालतो असे म्हणल्यास हि संकल्पना योग्य वाटू शकते.

कसली समानता?

जर रिस्क मोठी तर द्यावा लागणारा कर मोठा तसेच मिळणारा परतावा देखील मोठा असायला हवा, असे मानल्यास ह्या दहापट उत्पन्न मिळणाऱ्या व्यक्तीला कोणच्या स्वरुपात मोठा परतावा मिळतो?

या मालमत्तेचं संरक्षण हाच परतावा आहे. वरकड मालमत्ता ही उत्पन्नाच्या समप्रमाणात वाढत नाही हे दाखवून द्यायचं होतं. म्हणून वरकड मालमत्तेच्या प्रमाणात असलेले कर आपल्याला उगाचच श्रीमंतांवर अन्यायकारक असतात असं वाटतं.

सरकार तर्फे सर्व करदात्यांना समानतेने वागवले जाते असे दिसते

तुम्ही समाजात राहाता तेव्हा गरीब, उपाशी समाज आपल्या जिवावर उदार होऊन, क्रांती वगैरे करून तुमची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करू शकेल. जगाच्या इतिहासात वेळोवेळी हे घडलेलं आहे. ही रिस्क गरीबांसाठी शून्य असते, श्रीमंतांसाठी खूप मोठी असते. या रिस्कपासून संरक्षण सगळ्यांनाच सम प्रमाणात मिळतं असं म्हणण्याला काय अर्थ आहे? एखाद्या जवाहिऱ्याच्या दुकानात चोरी झाली तर अत्यंत कसून तपासणी होते. पण गरीब बाईचं मंगळसूत्र मारलं गेलं तर पोलिस तक्रारसुद्धा लिहून घेईल की नाही खात्री नाही. मग भले तिच्या उत्पन्नाच्या मानाने तिचं जितकं नुकसान झालं त्यापेक्षा त्या जवाहिऱ्याचं नुकसान त्याच्या उत्पन्नाच्या मानाने कमी का असेना. याला तुम्ही समानता म्हणाल का?

डायनामिक सोशलिझम किंवा मिश्र व्यवस्था वगैरे कृत्रिम शब्द तयार करण्यापेक्षा सगळेच मार्केट फोर्सेस म्हणावं ना. गाल्ब्रेथने संघटित वाटाघाटी करण्याची गटांची शक्ती (कामगारांचा संप वगैरे) याचा विचार केलेलाच होता. अनेक इतर अर्थशास्त्रज्ञानी केलेला आहे. वस्तु (उपभोग्य), किंमत, चलन यांच्या व्याख्या रुंदावल्या की काम झालं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

?

वरकड मालमत्तेच्या प्रमाणात असलेले कर आपल्याला उगाचच श्रीमंतांवर अन्यायकारक असतात असं वाटतं.

वरकड मालमत्तेच्या प्रमाणात कर नसून वरकड मालमत्ता वाढते तसे हे प्रमाणसुद्धा वाढते.

नक्की?

>>मालमत्तेचं संरक्षण हाच परतावा आहे
>>जवाहिऱ्याच्या दुकानात चोरी झाली तर अत्यंत कसून तपासणी होते. पण गरीब बाईचं मंगळसूत्र मारलं गेलं तर पोलिस तक्रारसुद्धा लिहून घेईल की नाही खात्री नाही

जवाहिऱ्याच्या दुकानातील चोरीची तपासणी हे त्याच्या "कर"(कोणचा!!) भरण्यावर अवलंबून आहे असे आपले मत आहे काय? आणि सरकार केवळ गरीब बाईचे मंगळसूत्र आहे म्हणून कायदा वेगळा लावतं असे आपले मत आहे काय? वास्तविकता आणि कायद्यामागचा अर्थ वेगळा आहे, नाही?

हा 'कर' न भरता इतर काही 'कर' भरले असता, दुसऱ्याची मालमत्ता देखील आपल्या संरक्षणामध्ये राहू शकते असा ऐकिवात/वाचनात आहे.

मोठ्यांनी मोठा कर भरावा कि नाही ह्यासाठी मालमत्तेचं संरक्षण हे कारण निदान आपल्या देशात लागू पडत नाही असा मला वाटते.

>>डायनामिक सोशलिझम किंवा मिश्र व्यवस्था वगैरे कृत्रिम शब्द तयार करण्यापेक्षा सगळेच मार्केट फोर्सेस म्हणावं ना. गाल्ब्रेथने संघटित वाटाघाटी करण्याची गटांची शक्ती (कामगारांचा संप वगैरे) याचा विचार केलेलाच होता

नाही, मार्केट फोर्सेस हि भांडवलशाहीकडे झुकणारी आहे, मला मिश्र व्यवस्था किंवा डायनामिक सोशलिझम असेच म्हणायचे आहे. असो हे अवांतर.

कोलबेर आणि रँड

ह्या चर्चेवरून कोलबेर ह्यांची खालील चित्रफीत आठवली:


अमेरिकन्ज़ आरॅक्च्युअली रीडिंग.

माझे मत कोलबेरप्रमाणेच ;)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्राप्तीकराचा दर

श्री डार्क मॅटर यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. प्राप्तीकर दर काय असावा या संबंधी काही ठोकताळे जगभर वापरले जातात. त्याच्यातील महत्वाचे असे आहेत.
1. हा दर असा असावा की कर देणे कर दात्याला फार ओझे वाटू नये. 1980 सालापर्यंत प्राप्तीकराचा भारतातला अधिकतम दर 85% च्या आसपास असे. या मुळे मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांची निर्मिती व समांतर अर्थव्यवस्था भारतात निर्माण झाली व त्याचे दुष्परिणाम अजुनही दिसत आहेत.
2. ज्या लोकांचे उत्पन्न कमी आहे अशा लोकांना जर या कराचा बोजा वाटू द्यायचा नसेल तर हा दर न्यूनतम ठेवणे आवश्यक असते. इतकी वर्षे भारत सरकारची अशी धोरणे होती की हा मूलभूत दर जास्त ठेवायचा व तो कमी करता ये ईल अशा अनेक सवलती देत रहावयाचे. या पद्धतीत सबँध कर वसूली आणि निर्धारण प्रणाली जटिल होत जाते व भ्रष्टाचाराला भरपूर वाव निर्माण होतो. या साठी अता जगभर मूलभूत दर कमी ठेवायचा पण तो सर्वव्यापी ठेवायचा असे धोरण ठेवले जाते. भारतात या प्रमाणेच मूलभूत दर 10% ठेवण्यात आलेला आहे.
3. ज्या लोकांचे उत्पन्न जास्त असते अशा लोकांना या पेक्षा जास्त दराने कर भरणे शक्य असते. व कुरकुरत का होईना ही मंडळी कर भरतात. म्हणून त्यांच्या साठी दर जास्त असतो. ही दरांची स्लॅब पद्धत जगभर फॉलो केली जाते व योग्यच आहे.
4. आता हा मूलभूत दर किती असावा? भारतात तो 10 % आहे. माझ्या मताने हा दर सिंगापूर सारखा 7% असणे जास्त श्रेयस्कर ठरावे. सिंगापूर मधे 7%, 15% व 30% अशा 3 स्लॅब्स आहेत. (चू.भू. द्या. घ्या.) या स्लॅब्स भारतातल्या 10%, 20% आणि 30 % पेक्षा मला जास्त योग्य वाटतात. सिंगापूर मधल्या दरांचे सर्वसामान्यांना ओझे वाटत नाही व टॅक्स भरण्याकडे त्यांचा कल असतो.
5. मूलभूत टॅक्स चा दर काय उत्पन्नापासून लागू करावयाचा? याबाबत सुद्धा मतभेद आहेत. भारतातील 1.5 लाखाची उत्पन्नाची न्यूनतम पातळी फारच कमी आहे असे वाटते. सध्याच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग प्रमाणे ही पातळी 5 लाखाची असणे जास्त श्रेयस्कर ठरावे. तसेच ही पातळी कॉस्ट ऑफ लिव्हिंगच्या निर्देशांकाला जोडली गेली पाहिजे. दरवर्षी हा निर्देशांक जसा असेल त्या प्रमाणे ही न्यूनतम पातळी बदलत राहणे आवश्यक वाटते.
पूर्वी पेक्षा भारतातले आयकर दर आता पुष्कळच योग्य झाले आहेत हे खरे असले तरी या सुधारणा होणे आवश्यक वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

स्लॅब्स

सिंगापूर मधे 7%, 15% व 30% अशा 3 स्लॅब्स आहेत. (चू.भू. द्या. घ्या.) या स्लॅब्स भारतातल्या 10%, 20% आणि 30 % पेक्षा मला जास्त योग्य वाटतात.

मुळात अश्या स्लॅब्स असाव्यात का? सगळ्यांना एकच दर का असू नये?

:)

कॉलिंग thanthanpal.
क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.......

शेतकर्‍यांना अप्रत्यक्ष कर असावा

शेतकर्‍यांना अप्रत्यक्ष कर असावा. जसे की बी बियाणे आणि खते यावर, जेणे करुन त्यांचा होणारा खर्च लक्षात घेता येईल. उत्पन्न अनिश्चित असल्याने उत्पन्नावर कर घेता येणार नाही. पण कर्ज माफी ऐवजी कर् जर माफ केला तर जास्त चांगले. अगदी अत्यल्प कर म्हटले तरी बराच महसुल गोळा होईल आणि तो शेतकरी संबंधीत योजनांसाठीच वापरला जाईल. सध्या भारतात मुठभर करदाते देशाला आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारी सरकारला पोसत आहेत. थोडक्यात कर भरणार्‍याला त्याचा काहीच फायदा नाही. कर भरल्याचा अभिमान वाटण्या ऐवजी आपण लुटले जातोय हिच भावना जास्त आहे.


अर्थक्रांती

अर्थक्रांती प्रतीष्ठान बद्दल काय मत? त्यांचा प्रस्ताव जास्त चांगला आहे, नाही का?

तुषार

विश्व जालावरील मराठी जग

मत

मत पूर्वीच दिले आहे.

नितिन थत्ते

वयाच्या ४२ नंतर प्राप्तीकरात ५ वर्षे १००% सुट

प्राप्तीकर आता आहे तेव्हढाच जरी ठेवायचा असेल तरी एक सुधारणा करणे जमु शकेल. प्रत्येक भारतीय करदात्याला वयाच्या ४२ नंतर प्राप्तीकरात ५ वर्षे १००% सुट दिली पाहीजे. त्या काळात करदाता भविष्यनिधी जमवु शकेल.
असे करायचे नसल्यास, सरकारने प्रत्येक करदात्याला पोस्ट-रीटायरमेंट एज मासिक खर्च चालवता येईल इतके उत्पन्न दिले पाहीजे.

उपभोग

असा मी असामी हे ४२ वर्षाचे असल्याची माहिती कळली. ;-)

असो.

घासकडवी म्हणतात त्याप्रमाणे श्रीमंत असलेले सार्वजनिक सोयींचा अधिक उपभोग घेतात. उदा मोटारीतून जाणारे चार जण रस्त्याची जेवढी जागा दरडोई व्यापतात त्या मानाने व्होल्वोने/एष्टीने जाणारे लोक कितीतरी कमी दरडोई जागा व्यापतात.

दरडोई मिळणारे पाणी देखील जास्त असते. वगैरे वगैरे

घासकडवींनी म्हटलेले मालमत्तेचे संरक्षण हे तर आहेच.

नितिन थत्ते

नाही

सर, नाही, माझे वय ४२ व्हायला अजुन बराच अवकाश आहे!

चर्चा

सदस्यहो, तुमचे प्रतिसाद नक्कीच रोचक आहेत. पण पुन्हा एकदा तुमचे लक्ष मूळ मुद्याकडे वेधू इच्छीतो. त्यावर अजून उहापोह झालेला नाही.

उत्पन्न वाढत जाईल तसा कराचा दरही वाढत जावा का?
प्राप्ती कराच्या दरात स्लॅब्स असाव्यात का?

उत्तर

होय

नितिन थत्ते

उपप्रश्न

होय असेल तर का होय आणि नाही असेल तर का नाही? असा उपप्रश्न एंबेडेड होता.

मार्जिनल सरप्लस

प्रश्न परत एकदा दुसर्‍या अँगलने मांडून पाहतो.

कमी उत्पन्न असणार्‍याला कमी दराने कर लावावा का?
उत्पन्न कमी होत जाईल त्याप्रमाणे कमी दराच्या स्लॅब असाव्यात का?

मी या प्रश्नाकडे बाजार दृष्टीकोनातून पहात नाही. वेल्फेअर स्टेटच्या कल्पनेतूनच पाहतो.

मुळात प्राप्तीकर लावण्यात काहीच लॉजिक नसते. तुम्ही पैसे कमावले म्हणून त्यातले काही सरकारने का घ्यायचे याला तर्कशुद्ध उत्तर काहीही नाही. सरकारला पैसे हवे म्हणून ते कोठून तरी आणि कसे तरी घेणे.

कराचे दर ठरवताना करवसुलीचा खर्चही लक्षात घेतला जातो. कमीतकमी लोकांकडून जास्तीत जास्त कर हे तत्त्व पाळले जाते.

वर अनेक लोकांनी म्हटल्याप्रमाणे ज्याची कर देण्याची ऐपत आहे त्याच्याकडून जास्त कर हे रीझनेबल वाटते.

एक उदाहरण पाहू
एका चार माणसांच्या कुटुंबाचे उत्पन्न १०००० रु आहे आणि खर्च ८००० रु आहे. त्यांच्या उरलेल्या २००० रुपयांतून त्यांना भविष्याची तरतूद वगैरे करायचे आहे. त्यामुळे त्याला त्या २००० रुपयांचे महत्त्व फार जास्त आहे. त्यातून जर १००० रु कर मागितला तर त्याला ते अन्यायकारक वाटेल. तसे ते अन्यायकारक असेलही.

दुसर्‍या एका चारच माणसांच्या कुटुंबाचे उत्पन्न ५०००० रु आहे. हे कुटुंब अगदी सढळ खर्च करू लागले तरी त्यांचा खर्च २५००० पेक्षा जास्त जाणार नाही. त्या कुटुंबात २५००० रु वरकड आहेत त्यातून ५००० रु कर म्हणून मागितले तर त्यांना ते जड वाटणार नाहीत. जड पडणार तर नक्कीच नाहीत. म्हणजेच ५०००० रु उत्पन्न असलेल्याला १० टक्के इफेक्टिव्ह कर हा सहज भरता येईल असा आहे. तर १०००० रु उत्पन्न असलेल्याला १ रु कर सुद्धा अन्यायकारक आहे.

आणखी तिसर्‍या कुटुंबाचे उत्पन्न २०००००रु महिना आहे. त्याचा अगदी उधळपट्टीचाला खर्चही ५०००० पेक्षा जास्त होणार नाही. त्याच्याकडे तर दीड लाख रुपये वरकड असतील. त्याच्याकडून महिना ५०००० रु कर घेतला तरी त्याला तो सहज परवडून तरीही त्याच्याकडे लाख रु वरकड शिल्लक राहतील.

नितिन थत्ते

 
^ वर