आधुनिकोत्तर कोणास म्हणावे?

आजकाल जालावर वावरतांना आधुनिकोत्तरवाद (पोस्ट मॉडर्निजम) या संकल्पनेविषयी काहीबाही वाचायला मिळते. मला या संकल्पनेविषयी फारशी माहिती नाही. विकिपिडियावरील माहिती चांगली आहे पण फारसे समजले नाही. उपक्रमावरील सुजाण व व्यासंगी वाचकच याबाबत मार्गदर्शन करू शकतील.

तर मला पडलेले प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत:
१. आधुनिकोत्तरवाद म्हणजे काय?
२. आधुनिकोत्तरवादी लेखक कोणास म्हणावे? मराठीत अशा लेखनाची काही उदाहरणे आहेत का?
३. साहित्यात इतरही संकल्पना आहेत. उदा. देशीवाद, आधुनिकवाद वगैरे यांच्या काँटेक्स्टमध्ये आधुनिकोत्तरवाद कोठे बसतो?

धन्यवाद.

लेखनविषय: दुवे:

Comments

कुरोसावा आणि आंतोनिआनी

‘आम्ही थुकलो तरी ती कलाच’ हा चौकटीमोडू आधुनिकोत्तर दृष्टिकोन तात्पुरता बाजूला ठेवू. कुरोसावाच्या कथनपध्दतीत धनंजय यांना आधुनिकोत्तर न वाटणारा शेवटचा भाग नि:संदिग्ध नैतिकता मांडतो हे बरोबरच आहे. त्याच्याशी तुलना म्हणून एका वेगळ्या कथनपद्धतीचं उदाहरण देतो. कदाचित त्यामुळे नि:संदिग्ध नैतिकता न मांडता काय म्हणता येतं याचा अंदाज येईल.

विखंडितपणाचे काही प्रकार आपण आधी पाहिले आहेत. दुसऱ्या महायुध्दानंतर युरोपमध्ये एक भावनिक पोकळी निर्माण झाली होती. प्रचंड मानवसंहार आणि क्रौर्य पाहिल्यानंतर जगण्यात निरर्थकता जाणवत होती. त्याला अधोरेखित करणारा अजून एक प्रकार घडला. पन्नासच्या दशकात समृध्दी आली; मध्यमवर्ग वाढला; आपण आज ज्याला चंगळवाद म्हणतो किंवा उपभोगवाद म्हणतो तो फोफावला. याची परिणती एका दिशाहीन सुखलोलुपतेत झाली. ‘अध्यात्म किंवा डाव्या विचारसरणीत याचं उत्तर किंवा यावर उपाय असेल’ अशी पूर्वी असणारी आशाही एव्हाना संपली होती. वरवर उत्तम चाललंय पण आत काहीतरी खुपतंय आणि तरीही तसंच जगावं लागतंय; पुष्कळ प्रगती झाली पण त्यात माझ्या स्थितीला उपाय मिळत नाही; मग यातून सुटकाच नाही का? असा एक वेगळा विखंडितपणा मग त्यातून आला.

१९६०ला कान महोत्सवात एक चित्रपट प्रदर्शित झाला. मायकेलँजेलो आंतोनिआनी या दिग्दर्शकाचा "L'Avventura" नावाचा हा चित्रपट त्यातल्या कथनामुळे आणि दृश्य संकल्पनांमुळे गाजला. प्रेक्षकांनी त्याला हुडुत केलं पण त्याला ज्यूरी पारितोषिक मिळालं. आजही सिनेमाच्या इतिहासात एक पथदर्शी म्हणून काहीजण त्याला नावाजतात तर अनाकलनीय म्हणून काही धुतकारतात. असं नक्की काय त्यात होतं?

आना आणि क्लोदिया या दोन मैत्रिणी आणि आनाचा मित्र (प्रियकर म्हणता येईल असा, पण नातं थोडं संदिग्ध आहे) सांद्रो इतर दोन जोडप्यांसोबत बोटीतून समुद्रात फेरफटका मारायला जातात. एका बेटावर उतरले असता आना आणि तिच्या मित्रात वितुष्ट (ब्रेक-अप) येतं. नंतर लक्षात येतं की बेटावरून आना नाहीशी झालेली आहे. मग तिचा शोध सुरू होतो. आना सापडत नाही. पण तिचा शोधही मागे पडतो. क्लोदिआ आणि आनाचा मित्र सांद्रो यांत जवळीक निर्माण होते. पण तीही संदिग्ध आहे. म्हणजे नक्की कुणाची कमिटमेंट किती याविषयी संदिग्धता आहे. सांद्रोच्या एका सहकाऱ्याच्या प्रचंड घरात एक पार्टी असते. पुष्कळ पाहुणे असतात. ते दोघं तिथं एक रात्र घालवतात. त्यांच्या खोलीत क्लोदिया एकटीनं रात्र घालवते. सांद्रो येत नाही. पहाटे उठून पाहाते तो सांद्रो दुसऱ्या एका बाईच्या (बहुधा एक उच्चभ्रू कॉलगर्ल) मिठीत तिला सापडतो.

ती तिथून चालू लागते. एका खुल्या जागेत येते. उभी रहाते. रडत असते. तो तिला शोधत तिथं येतो. एका बाकावर बसतो. हताश. ती लांब उभी. ती त्याला पाहते. बाकापाशी येते. मागे उभी रहाते. त्याच्याही डोळ्यात अश्रू दिसतात. ती हळूहळू आपला हात पुढे करते, पण त्याला स्पर्श करावा का याविषयी संदिग्ध. मग हळूच त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. पुन्हा पुन्हा फिरवत राहते. सांत्वन केल्यासारखा. मागे माउंट एटना (निद्रिस्त ज्वालामुखी). चित्रपट संपतो. (शेवट इथे पाहता येईल.)

चित्रपटकथनाचे काही पारंपरिक नियम इथं पाळलेले नाहीत. चित्रपट संथ लयीत आहे. संवाद थोडे आहेत. फारसं काही घडत नाही. सुरुवातीला आना आणि सांद्रो केंद्रस्थानी वाटतात. मग आना नाहीशी होते. इथपर्यंत संथ चाललेला चित्रपट आता पकड घेईल असं वाटतं. पण तसं होत नाही. आनाच्या नाहीसं होण्याला सोडून देऊन चित्रपट सांद्रो आणि क्लोदिआभोवती फिरू लागतो. आणि त्यांच्याभोवतीच संपतो. शेवट सांगू नये असा नियम पाळण्याची किंवा सांगितला आहे असा स्पॉइलर लावण्याची काही गरजही भासत नाही. कारण सुरुवातीला आना आणि सांद्रो ज्या स्थितीत असतात तशाच काहीशा स्थितीत क्लोदिआ आणि सांद्रो अखेरीला दिसतात.

मैत्रिणीच्या प्रियकराला प्रतिसाद देताना क्लोदिआला अपराधी वाटतं. तो स्खलनशील आहे हेही तिला दिसतं. आधी आना नाहीशी झाल्यानंतर म्हणजे तिच्या अनुपस्थितीत क्लोदिआशी जवळीक साधून आनाशी केलेल्या प्रतारणेविषयी आणि नंतर क्लोदिआशी केलेल्या प्रतारणेविषयी तो निर्विकार किंवा बेशरम वाटत नाही. मुळातच अपूर्ण, सदोष, संदिग्ध असलेल्या अशा नात्याकडे दोघंही ओढली जातात. ते अपूर्ण आहे हे दोघांनाही कळतंय. आसपासच्या इतर स्त्री-पुरुषांच्या नात्यांतही निरर्थकता आणि पोकळपणा जाणवतात. काही निव्वळ वासनेवर आधारित आहेत, तर काही निव्वळ एकमेकांना त्रास देण्यात मिळणाऱ्या क्रूर समाधानाच्या जोरावर टिकून आहेत. तरीही आयुष्य पुढे चाललंय. त्यामुळे समस्या अशी काहीच नाही. यात नैतिक-अनैतिक असा स्पष्ट निवाडाही नाही. असलीच तर न-नैतिकता आहे आणि तीही नैतिकता झुगारून देणार्‍या ऑस्कर वाईल्डच्या डोरिअन ग्रेसारखी बेफिकीर नाही. राशोमॉनच्या शेवटी एक मानवतावादी, नैतिक कृती दाखवून मनुष्यजातीला काही आशा आहे असं कुरोसावा सुचवतो. इथं तशी सुटकाच नाही. सर्व अडकलेले आहेत. असं अपूर्ण, पोकळ, निरुत्साही, निराश जगत राहणं भयंकर आहे. त्यामुळे समस्या तशी सर्वव्यापी आहे. तिला अंत नाही. त्यामुळे ही स्थिती धड शोकान्तही नाही. ती फक्त आहे.

आस्वादकांच्या याला टोकाच्या प्रतिक्रिया येताना दिसतात. गोष्ट भरकटत जाते (किंवा गोष्ट अशी फारशी नाहीच) म्हणून काहींना कंटाळा येतो; सगळं काही संदिग्ध अन अंतही स्पष्ट नाही म्हणून काही लोक चिडतात. काही लोक मात्र प्रचंड सुन्न होतात.

यात आधुनिकोत्तर म्हणावं असं काय आढळतं?
नो फ्यूचर: भूत/भविष्य असं काही यात नाही. सांद्रो आधीच्या मैत्रिणीबरोबर अधिक किंवा कमी सुखी नाही. क्लोदिआ एकटी असताना अधिक किंवा कमी सुखी नाही. भविष्यात दोघं एकत्र राहिले तरी ते अधिक/कमी सुखी नसणार. त्यांच्या एकत्र राहण्याला किंवा न राहण्याला त्यामुळे फार अर्थ नाही. कदाचित हे लक्षात येऊनच आनानं आत्महत्या केली असेल. पण तिचं नक्की काय झालं, किंवा ती नाहीशी झाल्यावर उरलेल्या दोघांच्या नात्याचं नक्की भविष्य काय हे न सांगितल्यानं काही फरक पडत नाही.

मानवी संस्था आणि विचारचौकटींचा फोलपणा: धर्म, विवाह, कुटुंब, राजकीय विचारसरणी, मानवतावाद, प्रेम अशा कोणत्याही संस्थांत किंवा ‘इझम’मध्ये मानवी नातेसंबंधांतल्या मूलभूत प्रश्नांची उकल नाही.

काही वेळा यालाच आधुनिकता म्हणतात. मग आधुनिक आणि आधुनिकोत्तर यात फरक कसा करायचा?
आधुनिकतेत गोंधळ/संभ्रम दाखवला असेल तरीही त्या (केओस)मधून काहीतरी वाट निघेल याविषयीची आशा असते. आस्वादकाचं शंकानिरसन, समाधान किंवा समस्या निराकरण त्यामुळे होतं. उदा: राशोमॉनमध्ये अखेरचा मानवतावाद ही आशादायक गोष्ट आहे. या व्यतिरिक्त (उदा.) कलाकार हे निराकरण करू शकतात अशी आशाही कधी कधी त्यात असते आणि त्यामुळे कलाकाराला एक उच्च स्थान त्यात दिलेलं असतं. आधुनिकोत्तरतेत अशी उत्तरं किंवा निराकरण आढळत नाही.

आधुनिकोत्तर कथनशैलीत इतरही अनेक बाबी आहेत. पण त्यांविषयी नंतर चर्चा करता येईल.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

 
^ वर