निकिता

निकिता

एका दरोड्यात ओढली गेलेली तरुण मुलगी - निकिता (ऍन परियाउद) थंडपणे तीन पोलिसांचा खून पाडते. पोलिस पकडतात पण खुनशी आणि भयानक हिंसक निकिता तेथे त्वेषाने झगडा देते. कोणत्याही प्रकारे तिला काही सांगणं अवघड असते. अर्थातच तिला देहदंडाची शिक्षा होते आणि लिथल इंजेक्शन तिला दिले जाते.

एका पांढर्‍या खोलीत तिला जाग येते. त्या खोलीत येणार्‍या काळ्या सुट मधल्या माणसाला ती विचारते हा स्वर्ग आहे का? अर्थातच तो नसतो. तिचे मरण कव्हर अप करून शवपेटी पुरली जाते त्यात ती नसतेच. हा व्हिडियो बॉब (थेकी कारियो) तिला दाखवतो. 'असं समज की मी सरकारसाठी काम करतो आणि सरकारने तुला देशसेवा करण्यासाठी अजून एक संधी द्यायची असे ठरवले आहे' असं बॉब तिला सांगतो.

निकिता हे झेपत नाही ती त्याच्या डोक्यात खुर्ची घालते. झटापटी नंतर बॉब तिला शांत करण्यात यशस्वी होतो. तिला विचार
करायला वेळ देऊन खोली सोडतो.

अर्थातच तिला पर्यायच नसल्याने निकिता त्या ट्रेनिंगसाठी तयार होते. सरकारी पातळीवर थंड डोक्याने नको असलेल्या लोकांचे काम तमाम करण्याचे प्रशिक्षण!
तिला ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येतं. निकिताची तडफ आणि त्वेष इतका भयानक असतो की तिचा ज्युडो प्रशिक्षक प्रशिक्षण देतांना जखमी होतो. त्याला ती आवरतच नाही.
गन ट्रेनिंगच्या वेळी पिस्तुलाची ओळख करून देण्याच्या आतच निकिता ते उचलते आणि दणादण टारगेटवर चालवते. टारगेतच्या चिरफळ्या उडतात. चकित झालेला गन ट्रेनर विचारतो की तू हे आधी वापरले आहे का? तर ती म्हणते की माणसांवर, पण टारगेटच्या पुठ्ठ्यावर पहिल्यांदाच चालवले!
हळूहळू निकिता ट्रेनिंगमध्ये रस घेते. तिची एक मेक अप ट्रेनर तिला स्त्रीपणाची जाणीव करून देते आणि त्याचा वापर करण्याचा सल्ला देते.
तिन वर्षांनी ट्रेनिंग संपते.
बॉब भेटायला येतो. तो तिला म्हणतो की तुझ्या वाढदिवसानिमित्त मी तुला या कॉम्प्लेक्स मधून बाहेर जेवायला नेणार आहे. पॅरिस मधल्या एका शानदार मोठ्या हॉटेलमध्ये ते जेवायला जातात.

बॉब तिला एक सुंदर वेष्टन असलेले खोके भेट देतो. निकिता ते उघडते तर त्यात एक रिव्हॉल्व्हर असते. निकिता चकित होते. पण बॉब तिला सांगतो की. तुझ्यामागे असलेल्या टेबलवर चार लोक आहेत त्यातल्या दोघांना तू खलास करायचे आहे. मग पळत सुटायचे आणि पुरुषांच्या मुतारीत पोहोचायचे तेथे शेवटी एक खिडकी आहे. त्या खिडकीतून खाली उडी मारायची तेथे एक कार उभी असेल ती तुला ट्रेनिंग काँप्लेक्स मध्ये घेउन येईल. मी येथून गेल्या नंतर तू सुरुवात करू शकतेस. ही तुझी टेस्त आहे. असे म्हणून बॉब निघून जातो. सुन्न झालेली निकिता काही क्षण बसून राहते. पण नंतर निग्रहीपणे उठते आणि सरळ त्या दोघांना शांतपणे गोळ्या घालते. आणि पुरुषांच्या मुतारीत पळत जाते. शेवटी पोहोचते. तेथे सांगितल्या प्रमाणे खिडकी असते, पण विटांनी बांधून बंद केलेली... धडपडत संतापलेली निकिता धवत सुटते आणि किचन मध्ये पोहोचते. तोवर खून झालेल्यांचे रक्षकही तेथे पोहोचून गोळागोळी सुरु होते. निकिता प्रत्येक ठिकाणी कडवे प्रत्युत्तर देते. एक जण शेवटी एक रॉकेटच किचन मध्ये डागायला घेतो.

पुढे काय होते, निकिता या प्रसंगातून सुटते का?
असासिन म्हणून काम करू शकते का? ते चित्रपटातच पहा.
पॉइंट एंड शुट क्याटेगरीतली ही फ्रेंच फिल्म पहिल्या फ्रेम पासूनच प्रचंड पकड घेते. चित्रपटाचे चित्रण मनोवेधक आहे. फाईट सिक्वेन्स जबरदस्त आहेत.

चित्रपटाचे नाव - La Femme Nikita
भाषा - फ्रेंच
वर्ष - १९९१

(ऋषिकेशने विनंती केल्यामुळे चित्रपटाची कथा पुर्ण दिली नाहीये!)

Comments

धन्यवाद

चांगली ओळख आहे, चित्रपट नक्की शोधेन.

हेच म्हणतो

डाऊनलोड करून पाहतो.

तिची एक मेक अप ट्रेनर तिला स्त्रीपणाची जाणीव करून देते आणि त्याचा वापर करण्याचा सल्ला देते.

स्त्रीपणाची जाणीव झाल्यानंतर त्याचा केलेला वापर हा 'फक्त प्रौढांसाठीच्या' श्रेणीतला आहे का? म्हणजे घरी सर्वांसोबत चित्रपट पाहायचा की बिग बॉसच्या वेळेत पाहायचा ते ठरवता येईल.

उत्तम सिनेमा

उत्तम सिनेमा, स्पोईलर देऊन कहाणी देता येऊ शकते.

अधिक माहिती - संजू बाबाचा कारतूस हा सिनेमा 'निकिता'चे हिंदी भ्रष्ट रूप आहे.

अवांतर - ह्याच स्वरुपात नायिका केंद्रित सिनेमामध्ये गर्ल विथ ड्रगन-टॅटू विशेष आवडला.

छान ओळख

वा! कथा पूर्ण न दिल्याबद्दल आभार!
ओळख आवडली हे वे सां न
La Femme Nikita डाऊनलोडायला लावतो

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

दुरुस्ती

निकिताला देहदंडाची शिक्षा दिली जात नाही तर जन्मठेप दिली जाते. तिने तुरुंगात झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली असे दाखवून तिला प्रशिक्षणासाठी नेले जाते. (क्षणभर वाटले की मी वेगळाच चित्रपट पहातो आहे.)

ड्रामा की थ्रिलर?

पकाऊ वाटला. कदाचित कथाविषय खूप जुना झाल्यामुळे असे वाटले असावे.
मुळात कथाच पटली नाही. निकिता क्रिमिनली इन्सेन असते की केवळ रस्ता भटकलेली? केवळ 'रस्ता भटक'लेल्यांना असे 'गायब' करून 'वापर' करण्याचे समर्थन होऊ शकत नाही. तसे केले तर ती संस्था खलप्रवृत्तीची ठरते पण संस्थेचे चित्रणही 'मानवी'च आहे.
थरारपटांना अत्यावश्यक असलेले असे, चमकदार प्लॉट एलेमेंट सुद्धा फारसे नाहीत. प्रियकराशी गप्पा मारतामारता खून करण्याचा प्रसंग चांगला आहे.
अभिनयही खास नाहीत. व्यक्तिचित्रण ढोबळ वाटले. प्रशिक्षणानंतर निकिताच्या व्यक्तिमत्वात बदल अपेक्षित होता.
'एक स्त्रीकेंद्री चित्रपट' म्हणायला निकिताच्या स्त्री असण्याचे काही विशेष महत्व सापडले नाही (म्हणूनच कारतूस हा चित्रपट पुरुषकेंद्री बनविता आला असावा).
ज्याँ रीनोला इतके कमी फुटेज? ज्याँ रीनोचा, त्याच दिग्दर्शकासोबतचा (चार वर्षांनी प्रदर्शित झालेला) लिऑन चांगला होता (बिच्छूसुद्धा बरा होता).

उम्म्म्म्....

चित्रपट जर ओरिजिनल आहे असे बघितल्यास व्यावसायिक सिनेमा मध्ये एक नवीन कल्पना म्हणून दखलपात्र आहे, बाकी निकिता क्रिमिनली इन्सेन पेक्षा नुसतीच वेडी असावी असे वाटणारे काही प्रसंग आहेत. आणि तसेही हिंदी चित्रपट सृष्टीनेच तद्दन बकवास चित्रपट बनवायचे कंत्राट घेतलेले नाही ;)

हुशार स्त्री हिंस्त्र झाली तर ती जास्त भयानक असू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न असावा, पुरुष केंद्रित सिनेमा असता तर एवढा देखील चालला नसता असे वाटते.

लिऑन छान होता त्याच्या हिंदी रिमेक मध्ये अमिताभ/नसीर एकदम फिट्ट बसतील असे वाटते.

 
^ वर