मेरे मन ये बता दे तू...
राम राम मंडळी,
' मेरे मन ये बता दे तू..मितवा ' या गाण्यातली मला दिसलेली सांगितिक सौंदर्यस्थळे सांगण्याचा हा एक प्रयत्न!
मितवा... मेरे मन ये बता दे तू' हे गाणं http://www.bollyfm.net/bollyfm/mid/11/tid/6254/mp3soundtrack.html इथून उतरवून घेऊन ऐकता येईल. इच्छुकांनी या लेखाबरहुकूम हे गाणे ऐकल्यास लेखात जे लिहिले आहे त्याचा संदर्भ पटकन लागण्यास मदत होईल असे वाटते!
' मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू.. '
'मेरे' तल्या शुद्ध गंधाराने श्रीगणेशा. 'मन', 'ये ' चा पंचमावरील सुरेख ठेहेराव. 'ये बता' मधली 'पसां' संगती गाण्यातला स्वाभाविक 'षड्ज-पंचम' भाव दाखवते. ' बता ' या अक्षरांनी तार षड्जापाशी केलेले मंजूळ knocking! या ठिकाणी लयीचा फार नाजूक टच जाणवतो आणि अक्षरशः सुखावून जातो. क्या बात है..
'दे' वरील पंचम व 'तू' वरील शुद्ध धैवत यांची कानाला अत्यंत गोड लागणारी 'पध' ही संगती. याच संगतीमुळे ' मेरे मन ये बता दे तू ' मधला 'दे तू' कमालीचा गोड आणि लोभसवाणा वाटतो! शिवाय 'पध' ही आरोही संगती ' मेरे मन ये बता दे तू ' या वाक्याचा उत्तरार्ध कायम ठेवते आणि श्रोत्यांना, आता पुढे काय ? अशी उत्सुकता लावते! ;)
' किस ओर चला है तू ' हे त्याचं उत्तर लगेचंच मिळतं! फक्त इथे 'है तू' तली 'पप' ही संगती आणि तिच्यातील इनबिल्ट पंचमावरील न्यास ह्या गोष्टी पूर्वीच्या 'दे तू' तल्या 'पध' संगतीसारखी श्रोत्यांची उत्सुकता अधिक ताणून न धरता श्रोत्यांचे समाधान करतात! विशेषत: 'चला' या शब्दावरील जागा फारच सुरेख आणि तरल आहे. क्या बात है.. ;)
' मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू.. '
वा! किती गोडवा आणि हळवेपणा आहे या ओळींत! साला ऐकूनच दिल खुष होतो. आता पुढच्या ओळी पाहू..
' क्या पाया नही तूने,
क्या ढुंड रहा है तू '
वा, किती साधे पण सुंदर शब्द आहेत! सरगम बरीचशी वरच्यासारखीच. तोच 'पध' आणि 'पप' चा संवाद. एक महत्वाचा फरक असा की ' क्या पाया नही तूने ' मधली 'नही' ही तार सप्तकातल्या शुद्ध रिषभावरून तार षड्जावर स्थिरावलेली रेंसा' ही संगती आहे. 'नही' तल्या 'ही' या अक्षरावरचा बेहलावा ऐका काय सुरेख आहे! मस्त वाटतं ऐकायला..
' क्या ढुंड रहा है तू ' मधला 'है' ही असाच सुखावह आहे! आणि त्यानंतर किंचितसा ऑफबीट टाकलेला 'तू'! वा.. मंडळी, खूप मजा येते हे गाणं ऐकतांना. हा लेख ज्यांना थोडीफार स्वरांची, लयीची ओळख आहे त्यांना अधिक चांगल्या रितीने समजू शकेल असे वाटते! अर्थात, ज्यांना स्वर समजत नाहीत त्यांचंही काहीच अडत नाही. कारण गाणं हे भावल्याशी कारण व हृदयाला भिडल्याशी कारण! ;)
पुढे जाऊया!
'जो है अनकही, जो है अनसुनी,
वो बात क्या है बता...'
यातल्या 'वो बात क्या है बता' मध्ये पहा कसा एक एक स्वर ठेवला आहे! 'वो', 'क्या' आणि 'बता' तल्या 'ता' वर धीम्या केरव्यातल्या समेची कशी छान टाळी येते पहा. मस्त...!
आगे बढेंगे!
' मितवा....कहे धडकने तुझसे क्या! '
मंडळी, 'वो बात क्या है बता...' या ओळीनंतर हे गाणं 'पनीसां' ही संगती घेऊन डायरेक्ट तार षड्जाला अनपेक्षितपणे भिडतं! एकदम वळण घेतं. इतका वेळ सुरातल्या सुरात डुंबणारं हे गाणं ताल तोच असला तरी लयीच्या दुगुनचौगुन मध्ये शिरतं! तालाच्या एका छानश्या लयबद्ध पकडीत जातं! क्या बात है मंडळी, खरंच क्या बात है! शंकर महादेवनसारखा विलक्षण प्रतिभावान कलावंत आपल्याला लाभला ही मी अत्यंत भाग्याची गोष्ट समजतो!
दिल्ली स्थानकाला भले १० फलाट असतील. १० नंबरच्या फलाटाहून मुंबईकडे येणारी पंजाबमेल सुटते. दिल्ली स्थानकाबाहेर पडते. दिल्ली स्थानका बाहेरही रुळांची गर्दी असते. त्यातून एक एक रूळ बदलत, ओलांडत अखेर ती मुंबईकडे जाणार्या ठाराविक रुळावर येते आणि मग एका लयबद्ध रितीने धावू लागते. या गाण्यातल्या मितवावरही थोडंफार असंच होतं बरं का मंडळी! ;)
' मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू.. '
' क्या पाया नही तूने,
क्या ढुंड रहा है तू '
'जो है अनकही, जो है अनसुनी,
वो बात क्या है बता...'
या छानपैकी गुणगुणाव्याश्या वाटणार्या ओळी ओलांडून गाठलेला ' मितवा....कहे धडकने तुझसे क्या! हा टप्पा खासच! ;) आणि मग पुन्हा वरील सर्व ओळी आणि मितवा हे सगळं एकाच लयीत धावू लागतं.
' मितवा....कहे धडकने तुझसे क्या,
मितवा....ये खुदसे ना तू छुपा '
बाकी 'मितवा' हा शब्द सुरेखच आहे! का माहीत नाही, पण हा शब्द कानी पडला की एकदम आपलेपणा वाटतो. 'मितवा'वरच्या चार आवर्तनांच्या तार षड्जावरच्या ठेहेरावानंतर 'कहे धडकन' मधल्या 'कहे' तल्या 'हे' वर इतकावेळ पिक्चर मध्ये नसलेला कोमल निषाद अचानक प्रवेश करतो आणि या गाण्याला एक वेगळंच फिलिंग येतंम् एक वेगळाच टच येतो. खरंच मंडळी, स्वरांची जादू काही औरच! क्या बात है..
'मितवा' तल्या 'वा' वर घेतलेल्या आकारच्या जागाही सुरेख आहेत. सरगमही छान केली आहे. गाणं लिहिलंही उत्तम आहे. त्याचा अर्थ मनाला भिडतो. गाण्यातल्या दोन कडव्यांमधले टाकलेले सांगितिक तुकडे आणि त्याचं ऍरेंजिंगही मस्त आहे. मंडळी, गाण्याचं ऍरेंजिंग हेदेखील संगीत दिग्दर्शनाइतकंच महत्वाचं असतं तरच चालीचा परिणाम उत्तमरीत्या साधला जाऊ शकतो. एकंदरीतच या गाण्याची भट्टी मस्तच जमली आहे हे निर्विवाद!
असो! मंडळी सध्या इथेच थांबतो. माझं हे खूप आवडतं गाणं आहे म्हणून यातल्या काही गोष्टी आपल्याशी शेअर कराव्याश्या वाटल्या.
हा लेख मी माझा मित्र राजीव देसाई याला समर्पित करत आहे. छ्या! कधी कधी ही NRI लोकं खूप त्रास देतात. राजीव आता लंडनला असतो. अलिकडेच नोकरीधंद्यानिमित्त बदली होऊन तिकडे गेला. मुंबईत होता तेव्हा नेहमी मला आग्रहाने घरी बोलवायचा. 'ये रे तात्या, काय भाव खातो? मस्तपैकी गप्पा मारू ' असं त्याने अक्षरशः अनेकदा बोलावलं असेल! पण कामाच्या व्यापात मलाच त्याच्याकडे कधी जायला जमलं नाही. किंबहुना मी गेलो नाही असं म्हणूया!
का माहीत नाही, पण आज अचानक राजीवची खूप आठवण झाली. त्याला खरंच आज मी खूप मिस करतोय! आज संध्याकाळी राजीवकडे जांण्यासाठी खरं तर वेळही होता. भरपूर गप्पा मारल्या असत्या त्याच्याशी आणि उर्मिलाशी! पण आता राजीवच मुंबईत नाही! त्याने १० वेळा प्रेमाने बोलावलंन तेव्हा गेलो नाही, आता वाटून काय उपयोग? ;)
शेवटी माणसं जपली पाहिजेत हेच खरं. गाणं तरी माणसाला अजून वेगळं काय शिकवतं?!
पुन्हा एकदा,
' मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू.. '
या दोन ओळी गुणगुणतो आणि हा लेख संपवतो! ;)
-- तात्या अभ्यंकर.
Comments
क्या बात है तात्या!!
आज पहिल्यांदाच तुमच्या लिखाणाला पहिला वहिला प्रतिसाद द्यायचा चान्स आला....
माझं ही हे आवडतं गाणं.... तन्मयपण म्हणतो कधी कधी "मित्वा मित्वा" असं... मितवा असं कितीदा तरी सांगून ही तो मित्वा असंच म्हणतो.
असो!!! गाणं ऐकत आस्वाद घेतला... मस्त वाटलं.... चला मी पण आता या ओळी गुणगुणत कामाला लागते...
(आवडतं गीत मनापासून गुणगुणणारी) पल्लवी
बहोत शुक्रिया!
पल्लवी,
आज पहिल्यांदाच तुमच्या लिखाणाला पहिला वहिला प्रतिसाद द्यायचा चान्स आला....
बहोत शुक्रिया!
माझं ही हे आवडतं गाणं.... तन्मयपण म्हणतो कधी कधी "मित्वा मित्वा" असं... मितवा असं कितीदा तरी सांगून ही तो मित्वा असंच म्हणतो.
कोई बात नही! मौखिक परंपरेवर विश्वास ठेव! ;)
असो!!! गाणं ऐकत आस्वाद घेतला... मस्त वाटलं....
तेच महत्वाचं! ;)
तुझ्या लेकाला, तन्मयला माझे मनापासून आशीर्वाद! भगवान उसे हमेशा हसताखेलता और सुखी रखे!
तात्या.
वाह ता(ज)त्या!
वाह ता(ज)त्या!
गाण्याची इतक्या सूक्ष्मात जाउन केलेली समिक्षा कधी वाचण्याचा योग आला नव्हता!
हे सगळं इतकं सुरेख लेहिले गेले आहे की
आता आमच्या सारख्या (व्यायामवाल्यां) नी या वर
असले फालतू प्रतिसाद देणे हा पण अत्याचारच आहे!
म्हणून थांबतो-
(असे म्हणून चहाचा घोट घेणारा)
गुंडोपंत
खळेसाहेब/जाहल्या काही चुका/वसंतराव,
काहीही झालं तरी, शंकर महादेवन, आपल्या खळे काकांचा शिष्य आहे, काय ?
खळेसाहेबांच्या काही गाण्यांवर लिहायचा विचार सुरू आहे. गान्यातला लई भारी मानूस!
खळेकाकांची सर्वोत्कृष्ट रचना कोणती ? असे मला विचारल्यास, 'बगळ्यांची माळ फुले अजुन अंबरात' हे मी कुठलाही विचार न करता, आणि पूर्ण विचार करूनसुद्धा, म्हणेन.
मलाही त्यांची बरीच गाणी आवडतात. तू खळेसाहेबांचा विषय काढलास अन् लगेच मी माझ्या संगणकावर असलेलं त्यांचं मला जबरा आवडणारं गाणं, 'जाहल्या काही चुका' लावलं आहे. आपण साला या गाण्यावर जाम मोहोब्बत करतो!
'जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले.'
ओहोहो! घुसतं रे हे गाणं! क्या बात है.. यातल्या 'तू दिलेले गीत माझे' ह्या ओळीवर साली जान कुर्बान करावीशी वाटते रे! आणि रुपक काय ठेवलाय बघ..
'संपता पूजा स्वरांची हात तू देशील का?
दाटूनी काळोख येता, तू घरी नेशील का?
पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले,
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले.'
खल्लास.. दीदी छुरी चालवते यार कलेजावर!
छ्या! आता दिवसभर हे गाणं छळणार! ए मिलिंद, तू उगाच याद दिलीस खळेसाहेबांची. त्यामुळे हा प्रतिसाद लिहिण्यात किती वेळ गेला बघ! त्यातून साला आज मन्डे आहे. कामधंद्याचा पयला दिस! ;) शिवाय रोशनीवरचा लेख उपक्रमावर टाकणार आहे आपण आज उद्याकडे. तो पूर्ण करतोय. उपक्रमाने तो ठेवावा किंवा उडवावा! साला कोई फिकर नही! कोई फरक नही पडता. रोशनी, आखिर रोशनी है!
वसंतरावांविषयी, बस एक, एकच, लेख लिहा. त्या मैत्रिपार्कातल्या दिनांपासून मी तुम्हाला विनवतोय.
की तुमचे शब्द त्या माणसाचे वर्णन कारण्यास सक्षम नाहीत ?
हम्म्! आता काय बोलू यावर? एकदोनदा प्रयत्नही केला होता. लेकीन बात कुछ जमी नही. पुन्हा केव्हातरी!
तात्या.
छान
सुंदर गाणं
खरं सांगायचं तर लेखातलं काहिही समजलं नाही !! खरचं शास्त्रिय संगीत न शिकल्याचा पस्तावा तरी किती वेळा करावा लागावा !!
आणि वसंतराव !! एकदम काळजालाच हात घातला गेला !! please त्यांच्यावर लवकरात लवकर लिहा
आवडलं...
तात्या
हे गाणं तसं माझ्या आवडींच, तुम्ही त्या गाण्याबद्दल हे असे परग्रहावरचे शब्द वापरून खुप काही लिहीले आहे. त्या सोबत आमच्या मराठीत जे लिहीले त्यावरून सुध्दा आमच्या आत तुमचा लेख झिरपला.
धन्यवाद.
शंकर महादेवनसारखा विलक्षण प्रतिभावान कलावंत आपल्याला लाभला ही मी अत्यंत भाग्याची गोष्ट समजतो!
हे मात्र अगदी खरं !
नीलकांत
का...?
'ते' तात्यांच्या लेखाचे विडंबन का गायब झाले असावे...?
गिटार - रेस्टॉरंट-एकमेवाद्वितीय का राहिली?
माझा ट्रेकिंगचा अनुभव का रहिला?
मदर्स डे का रहिला?
असं का बरं?
तात्या तुमचा लेख का राहीला?
(तुम्हीच तर काही लोच्या नाय ना केलेला?)
(प्रश्नांकित) गुंड्या!
"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"
हाच
प्रश्न पडला आहे. दोन्ही लेख रसग्रहण करणारे व माहितीपूर्ण होते. मग असा दुहेरी न्याय का?
दुहेरी न्याय का हेराफेरी?
अहो योगेश राव हेच म्हणतोय मी!
दुहेरी न्याय काय मला तर हेराफेरीच वाटतेय!
(फिरलेला) गुंड्याभाऊ
"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"
उत्तरे..
गिटार - रेस्टॉरंट-एकमेवाद्वितीय का राहिली?
काय म्हाईत नाय बा!
माझा ट्रेकिंगचा अनुभव का रहिला?
काय म्हाईत नाय बा!
मदर्स डे का रहिला?
काय म्हाईत नाय बा!
असं का बरं?
काय म्हाईत नाय बा!
तात्या तुमचा लेख का राहीला?
शंकर महादेवनची पुण्याई! ;)
तुम्हीच तर काही लोच्या नाय ना केलेला?)
अरे मी काही लोच्या करू शकलो असतो तर आमच्या रौशनीवरचा लेख असा उडू दिला असता का? उपक्रमपंतांना आमची रौशनी पटली नाय बाबा! ;)
'ते' तात्यांच्या लेखाचे विडंबन का गायब झाले असावे...?
काय माहीत नाय बा! ;)
आपला,
(न पटलेला!) तात्या.
मस्त!
शंकर महादेवनची पुण्याई! ;)
हे सही!
- गुंड्या!
"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"
तेरा कसूर ना मेरा कसूर.
तात्यांच्या लेखाचे विडंबन का गायब झाले असावे...?
मीही "यारा ओ यारा"स्वर- देव. या गाण्यातील सौंदर्यस्थळांवर लिहीत होतो.ते कळंलं की काय उपसंपादकाला.माझा लेख येण्याच्या आधी" तेरा कसूर ना मेरा कसूर, गायब करून माझ्या सारख्या प्रतिभावंताला थोपवण्याचा प्रयत्न दिसतोय.
आपला
संकेतस्थळावरील एक प्रतिभावंत.
समिक्षक.
मी पण लिहिणार होतो हो!
मी पण लिहिणार होतो हो जुम्मा चुम्मा दे दे या भावनाविवश गाण्यावर... पण...
(चुंबक) गुंड्या!
"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"
:-))))
गुंड्या अफाट रे..:-))
तरी नशिब 'चोली के पिच्छे क्या है' च रसग्रहण नाही करावसं वाटलं तुला..
चला परत एकदा मारामारी सुरु. उपक्रमचं नाव बदलून आखाडा करुया..
अभिजित
सुरेख!
तात्या,
फारच सुरेख लिहिलं आहे. हे माझंही अतिशय आवडतं गाणं आहे.
आणि तात्या, आपल्या गेटटुगेदरमध्ये,
या रब्बा देदे कोई जान भी अगर,
दिलबरपे हो न दिलबरपे हो न कोई असर
या गाण्याविषयी तुम्ही खूप छान सांगितले होते. तेही इथे लिहा ना प्लीज.
-ईश्वरी.
भिडले........ !
' शेवटी माणसे जपली पाहिजेत हेच खर.गाण तरी माणसाला वेगळ काय शिकवत ?'
तात्या ,तुझे लेखन नेहमी वाचतो.छान असते, तरीपण प्रतिक्रिया द्यावीशी वाटली नव्हती.[ का कुणास ठाउक ?] हा लेखही अभ्यासपुर्ण लिहीला आहेस. जरा जादा अभ्यासपुर्ण झाला आहे.व्याकरणात ज्यास्त शिरलास .[ पुणेरी पुणेकर ना तू ! ] तरिपण एखाद्या गाण्याचे असे सुराला धरुन परिक्शण क्वचितच वाचायला मि़ळते. [तुझ्याच शब्दात ...' क्या बात है?' ]
पण सर्वात भिडले ते 'शेवटी माणसे ........... '
सध्या दुर्मिळ होत चाललेला हा धागा मला ईथे गवसला. मितवा बद्दल लिहिताना तुला तुझा एक 'मितवा ' आठवला. बस् ! 'गाण तरी माणसाला वेगळ काय शिकवत म्हणण्यापेक्शा गाण्यातुन माणसाने हे शिकले पाहिजे. नाहितर गातात एक आणि वागतात एक. भक्तीगितांच्या कार्यक्रमावर करोडो रुपये मिळवीणारे संध्याकाळी ऐश करताना आपण बघतोच ना ? गाण्याने सुरांना जवळ आणले ; असुरांना नाही. माणसाच्या मनातला सुर कळला कि संगितातला सुर जुळलाच. म्हणुनच म्हटले आहे ना...' रे मन सुरमे गा S S S'
एकुण मजा आला. किप इट अप !
धन्यवाद/रे मन सूर मे गाओ..
सर्व प्रतिसादींचे अनेक आभार...
केशवराव,
तात्या ,तुझे लेखन नेहमी वाचतो.छान असते, तरीपण प्रतिक्रिया द्यावीशी वाटली नव्हती.[ का कुणास ठाउक ?]
चलता है. आज दिलीस ना, मग झालं तर!
.[ पुणेरी पुणेकर ना तू ! ]
नाही रे बाबा. मी पुणेरी नाही. मी कोकणच्या लाल मातीतला, आंब्याफणसातला, नारळसुपारीतला, आणि मण्यारफुरश्यातला! ;)
पण सर्वात भिडले ते 'शेवटी माणसे ........... ' सध्या दुर्मिळ होत चाललेला हा धागा मला ईथे गवसला. मितवा बद्दल लिहिताना तुला तुझा एक 'मितवा ' आठवला. बस् ! 'गाण तरी माणसाला वेगळ काय शिकवत म्हणण्यापेक्शा गाण्यातुन माणसाने हे शिकले पाहिजे.
क्या बात है केशवा. वरील संपूर्ण दाद ही मला नसून गुरुवर्य भाईकाकांना आहे असे मी मानतो आणि त्यांना समर्पित करतो! अजून काय लिहू?
भक्तीगितांच्या कार्यक्रमावर करोडो रुपये मिळवीणारे संध्याकाळी ऐश करताना आपण बघतोच ना ?
चालायचंच! ;)
माणसाच्या मनातला सुर कळला कि संगितातला सुर जुळलाच. म्हणुनच म्हटले आहे ना...' रे मन सुरमे गा S S S'
क्या बात है केशवशेठ, आपने भी क्या याद दिलाई!
'रे मन सूरमे गा..
कोई तार बेसूर ना बोले'
जीवन है सुखदुख का संगम,
मध्यम के संग जैसे पंचम
दोनोको एक बनाए!
हे गाणं बरचसं यमनमधलं बरं का! मन्नादासाहेबांनी आणि आशाताईंनी गायलं आहे. मन्नादांचा रसाळ स्वर आणि आशाताईंची नेहमीची तयारीची फिरत! क्या बात है..
फार सुरेख गाणं आहे ते!
हे गाणं आपल्याला इथे ऐकता येईल..
आपला,
(गाण्याखाण्यातला) तात्या.
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)
जीवन डगर मे, प्रेम नगर मे..
मेरे मन ये बता दे तू...
हे गाणं इथे पाहा..(आज जालावर मुशाफिरी करताना सापडलं)
शाहरुख आणि राणीवर चित्रित झालेलं हे गीत. आमची राणी बाकी काय छान दिसते हो! आपंण तर साला तिच्या प्रेमातच आहोत! क्या बात है.. :)
श्शश्श शाहरुख हा प्राणीदेखील आपल्याला आवडतो. तसा टॅलेंटेड आहे! :)
शंकर महादेवन जेव्हा सरगम गातो तेव्हा बाकी राणी मस्तच नाचली आहे हो! वा..! शंकरने सरगम सहीच गायली आहे!
जीवन डगर मे, प्रेम नगर मे
आया नजर मे जबसे कोई है,
तू सोचता है, तू पुछता है
जिसकी कमी थी, क्या ये वही है?
राणीकडे पाहता पाहता मितवाचा हा स्वतःच्या मनाशीच चाललेला संवाद सुंदर आहे. जिसकी कमी थी, क्या है वही है? या प्रश्नाचं उत्तर मितवा लगेचंच देतो..
हा ये वही है, हा ये वही है
तू इक प्यासा, और ये नदी है
मग? :)
काहे नही इसको तू खुलके बता?..
अरे भाई, अगर छोकरी अच्छी लगती है तो बोल दे ना बॉस! (ह्या ओळी गाण्यातल्या नाहीत बरं का! हे आपलं आमचं मुंबईवाल्याचं हिंदी आहे! :)
काहे नही, इसको तू, खुलके बता या सर्वांमधला ऑफबिट छानच टाकला आहे!
अरे बाबा माझ्या मितवा, मनोगता,
ये जो है अनकही, हो है अनसुनी
वो बात क्या है बता, मितवा....
मेरे मन ये बता दे तू,
किस और चला है तू
क्या पाया नही तुने,
क्या ढुंड रहा है तू..
बा माझिया मना, सांगून टाक एकदा तू नक्की कुठे चालला आहेस? तुला काय हवं आहे अन् तू काय शोधतो आहेस :)
मस्त गाणं आहे! गाण्याचं चित्रिकरण आणि लोकेशनस् ही छान आहेत.
हिंदी चित्रपटांत अशी छान छान गाणी यापुढेही यावीत हीच इच्छा!
आपला,
(मितवा) तात्या.