बर्फ चालला... बर्फ चालला... भारताकडे!

एसी चालला... एसी चालला.. या जाहिरातीप्रमाणे बर्फ चालला... बर्फ चालला... भारताकडे! अशी जाहिरात 1830च्या सुमारास अमेरिकेतील बोस्टन शहरात झळकली असती. कारण फ्रेड्रिक ट्युडोर हा उद्योजक त्याकाळात ठिकठिकाणी बर्फ पुरवण्याच्या व्यापार करत होता. आजकालचे शिक्षण सम्राट वा साखर सम्राट याप्रमाणे एकेकाळी बोस्टन येथे फ्रेड्रिक ट्युडोर यास 'बर्फ सम्राट' म्हणून लोक ओळखत होते. हा बर्फ सम्राट 1833 ते 1860 या काळात भारतातील ब्रिटिश राज्यकर्त्यांना बर्फाचा पुरवठा करत असे.

1830 च्या सुमारास जे कोणी ब्रिटिश अधिकारी इंग्लंडहून भारतात येत होते त्यातील प्रत्येकाला इथल्या उन्हाचा (व रात्रीच्या वेळी रम - व्हिस्कीसाठी बर्फ नसल्याचा!) फार त्रास होत असे. छताला टांगलेले पंखे (त्यांना ओढण्यासाठी 2-4 भारतीय मजूर!), हातातील पंखे, वाळ्याचे ओलसर पडदे, मोठमोठे हॉल्स, वरांडा हे सर्व असूनसुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात कलकत्ता, मुंबई, मद्राससारख्या समुद्राकाठच्या दमट हवामान असलेल्या शहरात ब्रिटिश कासावीस होत असतं. कोमट जिन-व्हिस्की पीत असताना त्यांना हटकून घराकडची आठवण येत असे.

1933च्या डिसेंबर महिन्यात कलकत्ता बंदरात तुस्कानी नावाची बोट येऊन थांबली. ही बोट अमेरिकेतून आलेली होती. बंदरावरील कामगारांना बोटीत कुठला माल भरला आहे याची उत्सुकता होती. कस्टम्सचे सोपस्कार पूर्ण होण्यासाठी दुसर्‍या दिवशीची रात्र उजाडली. बोटीचा कप्तान, क्लेमेंट लिट्लफील्ड यानी माल उतरवण्यास परवानगी दिल्यानंतर आतील माल पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण हा माल म्हणजे बर्फाच्या मोठमोठ्या लाद्या होत्या. कुठलेही जकातकर न भरता माल उतरवण्यास परवानगी देण्यात आली. एवढेच नव्हे तर यानंतरही बर्फावर कुठल्याही प्रकारचा कर लादणार नाही अशी हमी देण्यात आली. अमेरिकेतून बर्फाची निर्यात करणार्‍या बोस्टनच्या रॉजर्सला त्याकाळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विलियम बेंटिंक कडून एक सुंदर भेट पाठवण्यात आली.

कलकत्ता शहराला बर्फ ही काही अगदीच नवीन वस्तू नव्हती. हुगळी नदीच्या किनारी 40 किलोमीटर्स दूरवरील चिनासूर या गावातून डिसेंबर- जानेवारी महिन्यात बर्फाचे पापुद्रे नावेतून कलकत्त्याला येत होते. चिनासूर येथील काही स्थानिक उद्योजक नदीकिनारी खड्डे खणून पाणी गोठवून बर्फ तयार करत होते व रातोरात तयार झालेला बर्फ (विरघळण्याच्या आत!) नावेतून पाठवून देत होते. कमाई चांगल्यापैकी होत असावी. परंतु अस्वच्छ पाण्यापासून तयार केलेला हा बर्फ खाण्यालायक नसे. फार फार तर प्यायचे पाणी थंड ठेवण्यासाठी चारी बाजूला टाकण्यासाठी त्याचा वापर होत असे. परंतु हेही नसे थोडके! रम-व्हिस्कीच्या ग्लासमध्ये अशा बर्फाचे तुकडे टाकून पिणे हे मृत्युला आमंत्रण दिल्यासारखेच ठरले असते. परंतु तुस्कानी बोटीतून आणलेले बर्फ मॅसाचुसेट्स येथील पाण्यापासून बनवलेले शुभ्र, चवीला गोड व चमकदार होते. ब्रिटिश अधिकारी अशा बर्फाच्या प्रेमात पडले.

पहिल्याच खेपेत शंभर टन बर्फ कलकत्त्याच्या बंदरात येऊन पडले होते. कलकत्त्यातील ब्रिटिश अधिकार्‍यांनी दोन दिवसात पैसे गोळा करून बर्फ साठवून ठेवण्यासाठी खास Ice House बांधून घेतले. त्याच्या दृष्टीने हा एक अमूल्य ठेवा होता. Ice House चे चालक चकाकणार्‍या बर्फाचा तुकडा एका काचेच्या खिडकीत ठेवून ग्राहकांना आकर्षित करत होते. बर्फाचा तुकडा विरघळला की दुसरा तुकडा आणून ठेवत. चार आण्याला एक पौंड (450 ग्राम) या दराने बर्फाची विक्री होत असे. चिनासूरच्या काळसर बर्फापेक्षा हा बर्फ स्वस्त होता. बघता बघता 'गोठवलेल्या पाण्या'चा हा धंदा बरकतीला येऊ लागला. नियमितपणे बर्फाच्या बोटी कलकत्ता, मुंबई व मद्रास बंदरात येऊ लागल्या. 1833 मध्ये 100 टन बर्फ आणले होते. हाच आकडा 1847 मध्ये 3000 टन झाला होता. बर्फाची किंमत अर्ध्यावर आली. काही कारणाने बर्फ बंदरात येण्यास उशीर होत असल्यास बर्फाचे रेशनिंग करण्यात येत असे. डॉक्टरांच्या सर्टिफिकेटची मागणी केली जात असे.

बोस्टनचा व्यापारी, फ्रेड्रिक ट्युडोर यानी अशा नाजूक, 'नाशवंत' वस्तूंचा व्यापार कसा काय करू शकला याचे आजही आश्चर्य वाटेल. 22 वर्षाचा हा तरुण बर्फाच्या या प्रकल्पासाठी अक्षरश: वेडा झाला होता. सर्व जण ही कल्पना ऐकून त्याला मूर्खातच काढत होते. बोस्टनच्या भोवतालच्या तळ्यातील व नदीतील नैसर्गिकरित्या तयार झालेले बर्फ आणून एका गोदामात तो साठवून ठेवत असे व नंतर बोटीतून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत असे. बर्फाच्या या धंद्यात अनेक जण गुंतले होते. न्यू इंग्लंड राज्याचे आर्थिक व्यवहार बर्फाच्या या एका उद्योगावर निर्भर होते. हेन्ऱी डेव्हिड थोरो हा अमेरिकन लेखक "गेली पंधरा दिवस मी पाहतोय. शंभर जण रात्रंदिवस घोडे, गाड्या, शेतकी अवजार यांचा वापर करत चार्लस्टन व न्यू ऑर्लियान्स मधून मुंबई, कलकत्ता या ठिकाणी ट्युडोरच्या विहिरीचे पाणी पाठवत आहेत" असे वर्णन करतो.


जेव्हा फ्रेड्रिक ट्युडोरने हा धंदा सुरू केला तेव्हा जवळच असलेल्या न्यू ऑर्लियान्स व हवानापर्यंत त्याचा माल पोचत असे. परंतु विलियम रॉजर्स व सॅम्युएल ऑस्टिन या भागिदारांच्या उत्तेजनामुळे भारतापर्यंत बर्फ पोचवण्याची महत्वाकांक्षी योजना त्यानी आखली. परंतु बोस्टन बंदरातील व्यापार्‍यांना या व्यवहारासंबंधी अनेक अडचणी होत्या. कुठलीही बोट अशा प्रकारचा माल पोचवण्याची खात्री द्यायला तयार नव्हती. 25000 किमीच्या या प्रवासातून 'पाणी ' पोचवण्याची किंमत काय असेल व नफा किती मिळेल याबद्दल ते साशंक होते. त्यांच्या मते ही एक वेडपट कल्पना होती. परंतु फ्रेड्रिक ट्युडोर हार मानायला तयार नव्हता. शेवटी त्यानी तुस्कानी बोटच विकत घेतली. बर्फाच्या साठवणुकीसाठी बोटीत काही सुधारणा केल्या. बर्फ साठवण्यासाठी लाकडाचा भुस्सा व लाकडाच्या फळीपासून बनवलेले सुमारे 60 सेंमी जाड आवरण त्यानी तयार करून घेतले. बोटीच्या चहूबाजूला 46 सेंमी जागा सोडल्यामुळे बाहेरची उष्णता बर्फापर्यंत पोचत नव्हती. ती सर्व जागा लाकडाच्या भुश्श्याने भरून काढली. बर्फ साठवण्याच्या ठिकाणी यापेक्षा दुप्पट जाडीचे आवरण वापरले. बर्फावर दाब देवून एका लादीचे वजन सुमारे 180 टन भरेल एवढे केले. प्रत्येक लादीवर लादीची जाडी मोजण्याचे मापक बसविले. पाणी किती साठले याचा अंदाज यावरून करत असे. विरघळलेले पाणी साठवणुकीच्या खोलीतून बाहेर काढण्याची व्यवस्था त्यानी केली. व हे पाणी नंतर उपसून समुद्रात सोडले जात होते. नंतरच्या वीस वर्षाच्या या खालखंडात ट्युडोर यानी केवळ कलकत्ता या बंदरातून सुमारे अडीच लाख डॉलर्सचा नफा कमविला. म्हणूनच त्याला बोस्टनचे सहकारी व मित्र 'बर्फ सम्राट' म्हणून ओळखू लागले. परदेशातून आणलेले बर्फ साठवण्यासाठी मुंबई, मद्रास सारख्या बंदरात Ice House बांधले गेले. सुमारे 50 वर्षे यांचा वापर केला गेला.

1862 मध्ये प्रशीतन (Refriogeration) प्रक्रियेचा वापर करून बर्फ तयार करू शकणार्‍या यंत्राचा शोध लागला. अमेरिकेत सियेब ईथर बर्फ यंत्राला भरपूर मागणी होती. 1878मध्ये बंगाल आइस कंपनी बर्फ तयार करून विक्री करू लागली. 1882मध्ये क्रिस्टल आइस कंपनीची स्थापना झाली. या स्थानिक कंपऩ्यामुळे अमेरिकन बर्फ व्यापाराला तडा बसला. कलकत्ता व मुंबई येथील Ice House ची पडझड झाली. काळाच्या पोटात त्या लुप्त झाल्या. परंतु मद्रास येथे ब्रिटिशांच्या नाजूक प्रकृतीवरील उपायासाठी बांधलेली Ice House आता विवेकानंद स्मारक संग्रहालय म्हणून मिरवत आहे.

संदर्भ: Down to Earth
(Aug 16-31 2010)

लेखनविषय: दुवे:

Comments

खूप आवडला लेख

खूप आवडला लेख. माझ्यासाठी ही माहीती खरंच पुर्णपणे नवीन आहे. ह्या लिंकेवर अधिक माहीती आहे.

लेख आवडला

लेख आणि माहिती आवडली.

(बोटीचे नाव "टस्कनी" असावेसे वाटते.)

टस्कनी

Tuscany चे मराठीकरण करताना चूक झाली असावी. शक्य होत असल्यास, संपादकानी कृपया ही चूक दुरुस्त करावी.

टस्कनी/तस्कनी

तस्कनी हा मध्य इटलीमधील एक प्रसिद्ध भाग आहे. अत्यंत निसर्गरम्य, दा विंचिसारख्या बाप लोकांचे जन्मस्थान आणि लै भारी वाइन. :)

इटालियनमध्ये T चा उच्चार त असा होतो. याचे इटालियन नाव ला तोस्काना आहे. याचे अमेरिकन नाव टस्कनी आहे. (अमेरिकन लोक त म्हणायचा आळस करतात आणि ट म्हणतात.)

लेख आवडला हे सांगायला विसरलो. :)

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

टस्कनी








आपाचे टक्सनी हा मुक्तस्रोत प्रकल्प सर्विस कंपोनंट आर्किटेक्चर पुरवण्यासाठीच्या पायाभूत सुविधा देते.

छान

लेख फारच रोचक आहे. भारत आणि बॉस्टनमधील पूर्वीचा व्यापार केवळ चहापुरता मर्यादित नव्हता. बॉस्टन टी पार्टी प्रसिद्ध आहेच. पण बर्फाचा व्यापार चालत होता याबद्दल माहिती नव्हती. बॉस्टनमध्ये बंदरालगतच्या भागात एक इंडिया स्ट्रीट आहे. नाव बहुदा जुनेच असावे.

तुस्कानी बोटीतून आणलेले बर्फ मॅसाचुसेट्स येथील पाण्यापासून बनवलेले शुभ्र, चवीला गोड व चमकदार होते. ब्रिटिश अधिकारी अशा बर्फाच्या प्रेमात पडले.

वावा! बोट टस्कनी असावी.

मस्त लेख आवडला

फ्रेडरीक ट्युडोर

हिमनग ओढत आणून पाण्याचा पुरवठा

मध्यंतरी मुंबईला पिण्याच्या गोड्या पाण्याचा पुरवठा नॉर्दन अथवा सदर्न हेमीस्फीयरमधून एखादा हिमनग ओढत आणून करण्याचा विचार होता त्याची आठवण आली.

लेख खूप आवडला

माहितीपर लेख खूप आवडला. माहितीबद्दल खूप-खूप आभारी आहे.

मस्त लेख

प्रत्येक ओळीत उत्सुकता वाढवित नेणारा लेख आहे. लेख म्हणण्यापेक्षा गोष्टच म्हणावीशी वाटते. सुरुवातीस स्वप्नवत (व सर्वसामान्यांस वेडपट) वाटणार्‍या अचाट व भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरविणार्‍या अमेरिकन उद्योजकतेचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
जयेश

अनुमोदन

अगदी हेच म्हणतो.

माहितीपर लेख उत्तम.

माहितीपर लेख उत्तम.

फार पूर्वी मुंबै नगरीवरील एका प्रवासवर्णन-माहितीपर पुस्तकांत मुंबैतील बर्फाच्या व्यापाराविषयी माहिती देतांना लेखकाने "थिजलेल्या पाण्यास बर्फ असें म्हणतांत" अशी व्याख्या वाचल्याचे ह्यावरून आठवले. हे पुस्तक मराठीभाषेतील होते, लेखकाचे अथवा पुस्तकाचे नांव आठविले नाही. असो.

हिमालयातील बर्फ मी चाखलेले आहे. ते गोड लागते. खरेतर भारतात इतका मोठा हिमपर्वत असतां येवढा उपद्व्याप थोर ईंग्रजांनी कां बरें केला असावा? असा प्रश्न पडतो. मात्र, हा माहितीपर लेख उत्तम आहे. धन्यवाद.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

लेख आवडला

नवीन माहिती मिळाली. धन्यवाद!

छान लेख

आगळ्यावेगळ्या विषयाची माहिती करून देणारा. आवडला.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

लेख आवडला

फार छान लेख. करमणूक आणि माहिती दोन्ही झाले.
बर्फाची वाहतूक यापूर्वीही होत असावी.

मोगल बादशहासाठी काश्मिरहून बर्फ नेला जात असे वाचल्याचे/ऐकल्याचे (गाईड कडून) आठवते.
असा बर्फ बोटीच्या माध्यमातून नेणे जास्त सोयीचे आहे. कदाचित तो यमुनेतून (यमुनोत्री वगैरेतून) नेला जात असेल.
माझ्या माहितीला फारसा संदर्भ नाही.

प्रमोद

चांगला लेख

रोचक माहितीबद्दल धन्यवाद.

लेख मस्तच! आभार!

खूप आवडला लेख. माझ्यासाठीदेखील ही माहीती पुर्णपणे नवीन आहे. ह्या रोचक माहितीबद्दल आभार.

नशीब! श्री. हैयो हैयैयो म्हणतात त्याप्रमाणे हिमालयाच्या बर्फाकडे त्यांनी बघितले नाहि अथ्वा बघुनही तो वापरला नाही.. आपल्या अनेक नद्यांचे पाणी पर्यायाने एकुणच भारतातील मोठ्या क्षेत्रातील जीवनमान ह्या हिमालयीन बर्फावरच आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

प्रवासखर्च

मला वाटते हिमालयातील बर्फ अगदी जवळच्या छावण्यांपर्यंतच पोचू शकत असे.

खुश्कीच्या मार्गावरून त्या काळात बर्फ दूरपर्यंत नेणे दुरापरस्त वाटते. जहाजातूनसुद्धा बराच बर्फ वितळत असेल. पण भरपूर वजन जहाहातून नेता येते.

 
^ वर